
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
पतिव्रता मंदोदरी
मंदोदरी
भाग २१
पराभूत आणि अपमानीत झालेल्या रावणाचे अस्वस्थ मन राजकारणांत रमेना..! सतत मद्याच्या धुंदीत राहु लागला. मंदोदरीसमोर जायचे धाडस त्याला होत नव्हते. असाच विमनस्कतेत बसला असता, रंगमहालातून आपल्या महालाकडे असतां दासीसह, नुकतीच डोक्यावरुन न्हायलेली, यौवनाने मुसमुसलेली वेदवतीला पाहुन त्याच्यातला वासनामय सैतान जागृत झाला. धर्माचा, संस्कृतिचा विचार पायदळी तुडवुन तीचा भोग घेण्याची कामवासना उफाळुन आली. मानसकन्या मानलेल्या कन्येचाही विचार मागे पडला. तीच्या समोर जाऊन वासनेने बरबटल्या मनाने तीच्या पाठीवर हात ठेवला. दासीला कांहीतरी वेगळे जाणवल्याने ती लगबगीने मंदोदरीला सुचित करण्याकरितां गेली.
वेदवती तीच्या कक्षात पोहोचल्याबरोबर रावणाने प्रवेश केला. तीला जवळ ओढुन वस्राला हात घातला. तेवढ्यात उघडा असलेल्या दारांतुन विद्युतलता कडकडावी तसे त्याच्या कानावर मंदोदरीचे शब्द आदळले. “हद्द झाली! अधःपतनाची मजल स्वतःच्या मुलीवर हात टाकण्यापर्यंत जावी?” तीचे संतापाने लाल झालेले डोळे त्याच्यावर रोखत वेदवतीला आपल्याजवळ ओढले. रावण तिथुन निघुन गेला. वेदवतीला धीर देत, पाठीवर प्रेमाने व वात्सल्याने मंदोदरी हात फिरवत होती. वेदवतीच्या डोळ्यांतील अश्रु मात्र संपता संपत नव्हते.
वेदवतीला कळुन चुकले की, आता या प्रासादात आपण सुरक्षित नाही, त्यामुळे मंदोरीच्या प्रेमळ व आश्वासनालाही न जुमानता देव्हार्यांतील विष्णुमुर्ति घेऊन आराधना, उपासना करायला आणि विष्णुपती लाभावे म्हणुन कठोर तपश्चर्या करायला दुर्गम वनात निघुन गेली… हे सर्व कळल्यावर बिभिषणाने व स्वतःचा पुत्र इंदजीतने सुध्दा रावणाची चांगलीच कानउघाडणी केली. एवढा भयंकर अपमान झाल्यावर मनाच्या विमनस्क मनःस्थितीत रावण लंकेबाहेर पडला. रक्ताची चटक लागलेल्या ढाण्या वाघाप्रमाणे सावज शोधत जंगलांत इतस्ततः भटकत राहिला, जीथे विरोध होई तिथे शक्तीप्रयोग करुन रोज नित्यनव्या आहुत्या त्याच्या कामाग्नीत पडत होत्या. व्यसन वाढतच होते.
फिरता फिरता कैलासाच्या रम्य परिसरात आला असतां तिथे एका पर्णकुटी समोर झाडाखाली श्वेतवस्रा परिधानवृता वेदवती मुर्तीसमोर बसलेली दिसली. त्याने राक्षसी हसतच तिचे केस धरले व तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करु लागला. तीने आत्मबल केंद्रीत करुन विष्णूचा धावा केला. शरीरातुन योगाग्नी प्रज्वलीत झाला, त्यात जळतांना रावणाच्या कानावर तीचे संतप्त उद्गार कानावर आले, “रावणा, दुष्टा, तुझ्या नाशासाठी मी पुनः जन्म घेईन.” रावण चपापला, त्याच्या डोळ्यासमोर वेदवती जळुन तीच्या राखेचा ढिगारा समोर पडला.
राख नदीत टाकण्याच्या उद्देशाने राख भरी लागला असतां त्यात एक पुथ्वीमोलाचे तेजस्वी रत्न सापडले. रावण रत्न घेऊन लंकेत येऊन मंदोदरीला ते रत्न दिले. तीने उत्सुकतेने पेटी उघडतांच अचानक लाव्हा रसासारखे जळजळीत उद्गार कानी आले.
“मंदोदरी तूं भोळी आहेस. तुझ्या पतीला कधीच पश्चाताप होऊ शकत नाही. तो परस्री अभिलाषा सोडणे शक्य नाही. त्याच्या या व्यसनांतच लंकेचा नाश आहे व त्याचा आणि लंकेच्या नाशासाठी मी परत जन्म घेणार!”
संतापलेल्या मंदोदरीने रागाने लाल होऊन जळजळीत शब्दात कान उघाडणी करुन आपल्या महालात परतली. उघड्या पेटीतील वेदवती आपल्या पराभवाकडे पाहुन हसत आहे असा त्याला भास झाला.
त्याने पेटीचे झाकण घट्ट लावले, ही आपत्ती लंकेपासुन लांब टाकावी म्हणुन खिन्न मनाने उत्तर दिशेला निघाला. पुरेसे दूर आल्याची खात्री करुन एक खड्डा खणुन त्यांत ती पेटी पुरली. सुटकेचा निःश्वास टाकीत वर पाहिले असतां थोड्याच अंतरावर जनकाच्या मिथिला नगरीचा सुवर्ण प्रासाद मावळत्या सुर्याच्या किरणांत झळकत होता.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – २२
शूर्पणखेला स्वप्नांतही वाटले नव्हते की, एक दिवस भ्याडासारखे जनस्थानात यावे लागेल. प्रारंभी विद्युतज्जिव्हाच्या विरहाने व्यथीत होती, पण थोड्याच दिवसांत तीने आपला जम बसविला. खर दुषण आपल्या चौदा हजार फौजेनिशी सेवेला उपस्थीत होते. ती अनभिषिक्त सम्राज्ञी होती.
अमर्याद सत्ता, उमडते तारुण्य, कामुक, विलासिनि, स्वार्थी, क्रुर, मानसीक विकृत शूर्पणखाने जनस्थानात उच्छेद मांडला. देखणा, अंगापिंडाने सुद्दृढ तरुण दिसला की, त्याचा उपभोग घेऊन त्याला सोडुन द्यायची किंवा मारुन टाकायची. जनस्थानांत राक्षसी संस्कृतीचे नुसता थैमान सुरु होता. त्यांत अनेक तरुण तिच्या कामवासनेचे शिकार होत होते. सुख शांती नष्ट होऊन जीवन-मृत्युच्या हातात हात घालुन चालले होते.
त्याच वेळी राम लक्ष्मण, सीता यांचे आगमन झाले. तेथील जनतेची व्यथा, दुःख समजाऊन घेऊन आपल्या पराक्रमाने त्यांच्या जीवनात सुख निर्माण करायला सुरुवात केली. शूर्पणखाने कोण प्रतिकार करतो याचा शोध घ्यायला लागल्यावर तीला राम लक्ष्मण दिसले, मात्र! त्यांच्या पौरुषावर लुब्ध होऊन कामपुर्तिचे स्वप्न रंगवु लागली. रामाने झिडकताच तीने लक्ष्मणाकडे कामयाचना केल्यावर तीला परावृत्त करण्यासाठी त्याने नाका-कानावर आघात केला. तिची झालेली दुर्दशा पाहुन, खर-दुषनाने चौदा हजार सैन्यासह त्यांचेवर चालुन आलेत. त्यांत दुषणाचा वध झाला. खर गंभीर जखमी झाला. सर्व सैन्य नाश पावले.
ही वार्ता दुताने सांगुन त्वरीत जनस्थान सोडुन लंकेत रावणाकडे जाण्यास सुचविले. लंकेकडे तीचा रथ वेगाने धावत होता, त्याहीपेक्षा वेगाने तिचे विचार धावत होते. कामुक रावणासमोर सीतेचा मोह ऊभं करुन राम-रावणाचे युध्द झाले तरच मन शांत होईल अशा विचारांच्या आवर्तनातच लंकेत पोहचली.
शूर्पणखा तिच्या महालांतील मंचकावर वेदनेने, अपमानाने व सुडाने पेटलेल्या अवस्थेत पहुडली होती. जनस्थानाती जनतेला अत्याचाराने व कामुकवृत्तीने त्राही त्राही करुन सोडल्याच्या वार्ता मंदोदरीच्या कानावर आल्याच होत्या. पण सद्य स्थितीत शूर्पणखेचे सांत्वन करीत म्हणाली, “तुझा भाऊ
तुझ्या अपमानाचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.” त्यावर उसळून म्हणाली, “तुझा सख्खा भाऊ मायावीचा वध वालीने केला, घेतला बदला?”
मंदोदरीला वाईट वाटले, आपल्या जखमेवरची खपली काढुन हिला कोणता आनंद मिळाला असेल? सर्व माहित असुनही हीचे सांत्नन करायला आली, पण दोघेही बहिण भाऊ आपल्याला स्वस्थता, शांतता लाभु देईलसे वाटत नाही. कोणत्या चुकीचे प्रायश्चित भोगीत आहे? एवढ्या भरल्या प्रासादात एकटी, एकाकी व जोडीला न संपणारं दुःख! माझं अमर व्यथा!! संयम राखत स्वतःला सावरत दासींना तिच्याकढे लक्ष द्यायला सांगुन कक्षातुन निघून गेली.
कांही वेळाने माल्यवान, इंद्रजीत-सुलोचना, बिभिषण-सरमा येऊन तीची चौकशी करीन गेलेत. रावण आल्यावर तिखटमीठ लावुन त्याच्या अहंकाराला फुलवले आणि युध्द न करतां सीतेचे अपहरण करुन तीचा ऊपभोग घेण्याचा सल्ला त्याच्या गळी उतरविला. तुझ्या अपमानाचा नक्की सूड घेईन असे आश्वास्त करुन निघुन गेला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग-२३
ठरल्या प्रमाणे रावणाने कपटाने सीतेला पळवुन आणुन लंकेतील आपल्या महालात ठेवले. सभोवती भयानक अति क्रुर राक्षसीनी पहार्यावर होत्या. सीता खाली मान घालुन रुदन करत, दुःखी, कष्टी मनाने जमीनीकडे पाहत बसली होती, तेवढ्यांत रावण येत असल्याचे समजले.
रावण सीतेशी लग्न करण्याबद्दल तीची मनधरणी करु लागला. संतापुन सीता म्हणाली, “माझे तुकडे तुकडे केलेस तरी माझ्या पातिव्रत्याला कलंक कधीच लागु देणार नाही. सन्माने मला रामाकडे पाठव, अन्यथा तुझा मृत्यु अटळ आहे.” सीता संतापाने लालबुंद झाली. आत्मतेजाने चेहरा दैदिप्यमान दिसु लागला. अपमानित होऊन रावण तेथुन निघुन गेला.
त्याला आठवल्या रंभा, वेदवती…. व त्यांचे शाप! तो अस्वस्थ असतांनाच मंदोदरी त्याच्या कक्षात प्रवेशली. तीने सीतेला आणल्याबद्दल बरीच कान उघाडणी करुन म्हणाली, “अग्नीची ठिणगी लहान असली तरी सारंकांही भस्म करण्याचं सामर्थ्य असते.” त्यावर तो म्हणाला, “सीतेच्या स्वयंवरात झालेला अपमान विसरुं म्हणतेस?” निर्णायक स्वरात साम्राज्याची सम्राज्ञी या नात्याने सीतेला एक वर्ष अशोक वनांत बंदिवासात ठेवण्यासाठी त्याला गळ घातली.
मंदोदरी आपल्या कक्षात विचारात बुडुन गेली कांहीही झाले तरी सीतेला वाचवायचेच, कारण एका पित्याकडून स्वतःच्या मुलीचे अधःपतन कशी होऊ देणार होती? सीतेची रवानगी एक वर्षासाठी अशोक वनात करुन आपल्या विश्वासातील त्रिजटेची नियुक्ती तिच्या रक्षणासाठी केली.
रावणाने इंद्रजीतला आपल्या कक्षात बोलावुन त्याच्या मनाच्या गाभार्यालाच हात घातला, त्याच्या मायावी व हळुवार बोलण्याच्या स्पर्शाने इंद्रजीत विरघळला. मुळ प्रवृत्तींना घुमारे फुटले. पित्याची कृती समर्थनीय वाटल्याने शेवटपर्यत साथ देण्यास वचनबद्द झाला. मंदोदरीची चाल तिच्यावरच उलटवल्याचे समाधान त्याला मिळाले.
इंद्रजीत उलटल्याचे पाहुन बिभिषण-मल्यावानची चर्चा झाली. नितीच्या दृष्टीने पाहतां स्वपक्षापेक्षा रामपक्षच जास्त योग्य समजुन त्याच्याशी हातमिळवणी करण्याचे ठरविले. अशोकवनांत सीता रात्रंदिवस पतीचिंतनात मग्न राहु लागली. मंदोदरीने पाठवलेले साजश्रृंगार, वस्रालंकार पतीव्रता स्री पती जवळ नसतांना करणे स्रीधर्मास योग्य नाही असे म्हणुन परत पाठविले. त्रिजटा तीची धाकट्या बहिणीप्रमाणे काळजी घेऊं लागली.
एके संध्याकाळी नगरांत असणार्या उत्सवात सर्व पहारेकरी मद्यप्राशन करुन धुंद झाले आहेत हे पाहुन बिभिषाणाची पुत्री कला, मंदोदरी, सरमा, बिभिषण, मंत्री अविंध्य याचा निरोप घेऊन सावधतेने लपत छपत सीतेला निरोप सांगीतला की, निश्चिंत राहावे, सुरक्षतेची पुर्ण काळजी घेतली आहे.सीतेचे मन भरुन आले. या लंकेतही रावणाला विरोध करणार्या व्यक्ती आहेत तर!
एक दिवस मंदोदरीही सीतेला भेटायला अशोक वनांत आली. तीनेही सीतेला धीर दिला. सीता म्हणाली, “माते…! रावणाच्या या भोगलोलुप, वासनेने बरबटलेल्या धर्महीन लंकेत आपल्यासारखी धर्माची स्निग्ध ज्योत तेवतें आहे पाहुन खुप धीर आला.” मंदोदरी म्हणाली, “तू तर बंदिनी आहेस… पण विचार केला तर महाराणी असुनही मी तरी कुठं मुक्त आहे? वैभवाच्या सोनेरी पिंजर्यात, पतीच्या सत्तेच्या लोहश्रृंखलात मी पण बंदिनीच आहे! एकाकी आहे!”
“यांचा अन्याय अत्याचार पत्नी या नात्याने सावरण्याचा, सन्मार्गावर आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला व करत आहे पण हे सारं थांबवायला हतबल आहे, हात दुबळे पडतात, शक्ती क्षीण वाटते, ही जीवघेणी जाणीव झाली की, वाटते, या सधवेच्या जीवनापेक्षा विधवा असनं काय वाईट? सौभाग्याची बाह्य चिन्ह जरी मी धारण करीत असले तरी असं वाटते मी केव्हाच विधवा झालेली आहे.”
क्रमशः
मिनाक्षी देशमुख,
मंदोदरी
भाग-२४
संथ गतीने दिवस पुढे सरकत होते. सीतेला ठेवुन दहा महिने झाले होते. रावणाच्या आज्ञेने एका संध्याकाळी मंदोदरीसह काही स्रीया सीतेचा साजश्रृगांर करण्यासाठी ऊंची वस्रे, दागदागीणे घेऊन आल्यात व मंदोदरीला अाज्ञा केली. मंदोदरीने स्पष्ट नकार दिल्यामुळे भयंकर संतापुन “तुला सीतेची प्रमुख दासी केल्या जाईल,” हे सीतेने ऐकले मात्र, विद्युतलतेसारखी कडाडुन म्हणाली, “अरे! या साध्वी महाराणी मंदोदरीच्या भावना पायदळी तुडवतोस?”
मंदोदरीची स्थिती अतिशय केविलवाणी झाली. तीने आपल्या कक्षात इंद्रजीतला बोलावुन दासीचे वस्र आणायला सांगीतल्यावर त्याने आश्चर्यमिश्रित स्वरांत तिची समजुत घालुन निघुन गेला. मंदोदरी दुःखाने, काळवंडल्या ह्रदयाने व पाझरत्या डोळ्यांनी विकल अवस्थेत मंचकावर कोसळली.
सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेत आला. रावणपुत्र अक्षचा वध केला. त्याची शेपटी पेटवल्याने सारी लंका जाळायला सुरुवात केली. हा सर्व विनाश पाहुन रावणाला समजावण्याचा प्रयत्न मंदोदरी करीत होती. पण रावण सर्व ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. हनुमानाचे भयंकर कृत्य पाहुन रावणाने तातडीने सभा बोलावली. सभेतील रावणाच्या सर्व मंत्रीगणांनी मोठमोठ्या वल्गना केल्यात हे ऐकुन राहवले नसल्याने बिभिषणाने रामाशी सलोखा करण्याचा सल्ला देऊन म्हटले की, “धर्माने वागणार्या रामाशी विनाकारण वैर न करतां त्याची भार्या सीतेला सन्मानाने परत पाठवावं! ” अर्थातच मदमत्त रावणाला पटणे शक्यच नव्हते. त्याने बिभिषणाला सभेतुन लाथ मारुन हाकलुन लावले. अपमानीत बिभिषण मंदोदरीच्या महालाकडे निघाला.
त्याने सभेमधे घडलेला सर्व वृतांत बिभिषणाने कथन केल्यावर मंदोदरी म्हणाली, “राक्षस हे सापासारखे! त्यांना कितीही दुध पाजले तरी विषच होणार! अगदी पालथ्या घागरीवर पाणी! हे असंच घडणार! याच क्षणाची ती वाट पाहत होती.” ती म्हणाली, “श्रीरामाला शरण जाऊन लंकेची सगळी रहस्य त्यांना अवगत करावी.” बिभिषणाच्या अंतर्मनाची तार छेडल्या गेली. बरेच दिवसांपासुन त्याच्याही मनांत हाच विचार डोकावत होता.
लंकेत थैमान घालणार्या दुष्टप्रवृत्तींचा, ठाण मांडुन बसलेल्या अविकेला ताळ्यावर आणण्याचा हाच एक उपाय दिसतो. आतापर्यत पतिव्रताचं पालन करीत, केलेल्या विरोधातुन काहीच साध्य न झाल्याने पतिविरोधातुनच कांही कल्याण साधता यावं म्हणुनच हा मार्ग पत्करला.
एका दुःशील सम्राटाची पत्नी म्हणुन जगण्यापेक्षा समाजसुधार पुरुषाच्या चरणावर सौभाग्य अर्पण करुन धर्म, न्याय, नीती यांच्या उभारणीने नवसमाज निर्माण होणे अधिक श्रेयस्कर! बिभिषणाने तिचा निरोप घेतला. तिच्या डोळ्यांतुन अश्रुधारा अविरत वाहत होत्या.
हनुमानाने केलेला लंकेचा विध्वंस पाहून शूर्पणखेला सूड घेतल्याच्या अानंदाच्या उकळ्या फुटु लागल्यात. रामाला सीतेचा शोध लागल्याने सैन्य पैलतीरी येऊन पोहचले.
सागरावर सेतु बांधला. वानरसैन्य सागर तरुन येताहेत. नियमाप्रमाणे श्रीरामाने रावणाला संदेश पाठवला की, “सामंज्यसपणे सीतेला परत पाठवावे, अन्यथा लंकेच्या विध्वंशाची जबाबदारी तुझ्यावर राहील.” परंतु अहंकारी रावणावर परीणाम होणेशक्यच नव्हते. *”विनाश काले विपरीत बुध्दी”*.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – २५.
युध्द…. युध्द अटळ आहे. शेवटचा प्रयत्न म्हणुन रावणाने मायावी शक्तीने रामाचे रुप असलेले एक धडावेगळे मस्तक सीतेसमोर आणले. पण ती फसली नाही कारण तीला रामाच्या पराक्रमावर, कर्तुत्वावर पुर्ण विश्वास होता. मुखवटा मायावी असल्याचे लागलीच समजले.
युध्दापुर्वी युध्दसंधीच्या द्दृष्टीने युध्दाच्या आदल्या दिवशी रामाने वालीपुत्र अंगद याला दूत म्हणून पाठवला. दूताला बसण्यास आसन न मिळाल्याने त्याने अपल्या शेपटीचे उंच आसन तयार करुन त्यावर बसला. रावणाच्या आसनापेक्षा उंच अासनावर दूत बसल्याचे पाहुन रावण आणखीनच खळवळला. दोघांचीही खुप बोलाचाली झाली. अखेर अंगदने एक अद्भुत प्रतिज्ञा केली की, “मी रोवलेला पाय जर कोणी उचलुन दाखवला तर सीतेला मी पणात हरलो असं समजुन श्रीराम परत जातील.”
इंद्रजीतसह सर्वांचे प्रयत्न विफल झाले. शेवटी रावणाने प्रयत्न करतांच कपीने पाय काढुन घेतल्याबरोबर त्याचे तोंड कपीच्या पायावर आपटले. कपी म्हणाला, “अरे! माझे पाय धरण्यापेक्षा प्रभु रामाचे पाय धर!। हे ऐकुन रावणाचा चेहरा काळा ठिक्कर पडला. लज्जेने मान खाली घालुन आसनाकडे परतला.
सूर्योदय झाला. युध्दाचा बिगुल वाजला. दोन्हीकडचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले. रणकंदन माजले. उभयंतामधे भयंकर द्वंद सुरु झाले. मासांचा चिखल झाला, रक्ताच्या नद्या वाहु लागल्या. मोठमोठे रथी महारथी मारल्या जाऊं लागले. शत्रुनाशार्थ रावणस्वतः युध्दभूमीत उतरला. रावण-लक्ष्मणाचे युध्द चांगलेच जुंपले. लक्ष्मणाच्या एका बाणाने रावण मुर्च्छित झाला, पण लवकरच तो सावध झाला आणि एका शक्तीने लक्ष्मणाच्या ललाटाचा वेध घेतला. लक्ष्मण मुर्च्छित पडल्याची वार्ता रामाला समजल्या बरोबर संतप्त राम त्वरेने रणभूमीवर आले.
राम-रावणाचे घणघोर युध्द सुरु झाले. रामाच्या हस्तलाघवापुढे रावणाचे तेज फिके पडले. कृध्द रामाने रावणाचा रथ, सारथी, शूल, खडःग चक्र, ध्वज, अश्व छत्र छिन्नभिन्न केले. अन् अभिमंत्रीत बाणाने रावणाच्या वक्षस्थलावर प्रहार करुन त्याला मुर्च्छित केले. रामाने अर्धचंद्राकृति बाणाने त्याच्या किरीटाचे तुकडे तुकडे केले. अपमानाचे शल्य उरी घेऊन लज्जित होऊन रावणाने लंकेच्या दिशेने कुच केले.
रावणाने ज्या मानवाला कस्पटासमान तुच्छ मानले त्याच मानवाकडुन झालेल्या दारुण पराभवाने त्याच्या अंगाचा भडका उडला. त्याने निद्रेतुन कुंभकर्णाला उठवुन आतांपर्यतच्या प्रसंगाचे कथन केले. कुंभकर्ण युध्दभूमीकडे निघाला. परंतु दुर्दैवाने रावणाची पाठ सोडली नाही. सुर्य अस्ताला जाण्यापुर्वीच कुंभकर्णाच्या वधाची बातमी त्याला मिळाली.
रावणाचे पुत्र त्रिशिरा, देवांतक, नराकत आणि अतिकाय युध्दभूमीकडे निघाले.त्यांच्या रक्षणार्थ त्याचे भाऊ युध्दोत्तम,मत्त, महापार्शव व महोदर यांनाही जायची आज्ञा केली. तुंबळ युध्दात सर्वजण धारातिर्थी पडल्याच्या कळल्यावर रावणाचे डोके बधीर झाले. हतबध्द होऊन दुःखी अंतःकरणाने भुजंगासारखे फूत्कार टाकत कपाळाला हात लावुन मंचकावर बसुन राहिला.
पुत्रवधाच्या दुःखाने मंदोदरी बेशुध्द पडली. राजवैद्याची धावपळ झाली. तीच्या मुर्च्छिताची वार्ता रावणाला कळली, पण तिच्या समोर कोणत्या तोंडाने जाणार? कसं सांत्वन करणार? आजपर्यत तीचे ऐकले नाही. जे पेरलं ते उगवलं ! तो मंद पावलं टाकीत मंदोदरीच्या महालात आला. धान्यमालिनी व रावणाने मंदोदरीचे सांत्वन करायचा प्रयत्न केला, पण संतापाने व अति दुःखाने लाल झालेली बेभान मंदोदरी कडाडली, “या वखवखलेल्या वासनापुर्तित किती जणांचा बळी देणार? या स्मशान झालेल्या लंकेवर राज्य करणार ?”
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – २६ .
इंद्रजीतच्या कानी मंदोदरची काही वाक्ये पडलीत. तेव्हा तो उसळून म्हणाला, “आता हाती काहीही राहिले नाही. विजय किंवा विनाश, जिंकणं किंवा मरण एवढंच हाती आहे”, असं म्हणुन इंद्रजीत युध्दभूमीकडे निघाला. तुंबळ युध्द करुन शेवटी अमोध शरसंधानाने राम-लक्ष्मणाला नागपाशात बध्द केले. गरुडाने राम लक्ष्मणाची नागपाशातुन सुटका केल्याचे ऐकुन इंद्रजीत संतापाने बेभान झाला.
त्याच अवस्थेत अघोरी सिध्दी प्राप्त करण्याकरिता हवन करण्यासाठी सुलोचनाला धक्का देऊन निकुंभिलाच्या देवळाकडे निघाला. सुलोचना स्वैरभैर झाली. ती विचारांत गर्क असतांनाच सेवकाने एक भुजा प्रासादाबाहेर पडल्याचे सांगीतल्यावर ती बाहेर आली. भुजा इंद्रजीतची असल्याचे तीने ओळखले. त्याच्याबरोबर सती जाण्याचे तीने जाहीर केले.
हनुमंताच्या नेतृत्वाखाली वानरसेनेने इंद्रजीतच्या यज्ञाचा विध्वंश केल्यामुळे यज्ञ अर्धवट सोडुन हनुमंतावर चालुन जातांच, लक्ष्मण पुढे झाला. दोघांचे घनघोर युध्द झाले. निर्वाणीच्या क्षणी लक्ष्मणाने तेजस्वी बाणाने इंद्रजीतची भुजा तोडली, तीच भुजा सुलोचनाच्या समोर जाऊन पडली. आणि दुसर्या दिव्य बाणाने त्याचे मस्तक धडावेगळे केले.
रावण आणि मंदोदरीच्या दुःखाला पारावार राहिला नाही. ह्रदयावर दगड ठेवुन सुलोचनाच्या सांत्वनासाठी तीच्या कक्षात आलेत, तर काय बघतात! तर! सुलोचनाने सहगमनाची तयारी केलेली! दोघांनीही तिला परोपरीने समजावले पण ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. इंद्रजीतचे शीरकमल आणण्यासाठी शत्रुगोटात रामाकडे गेली. रामापुढे आपल्या सतीत्वाची परीक्षा देऊन पतीचे शिरकमल मांडीवर घेऊन चित्तेवर बसली. “जोपर्यंत चंद्रसुर्य आकाशात तेजाळत आहेत तोपर्यत तुझ्या स्रीत्वाचा महिमा या पृथ्वीवर गायला जाईल.” असा रामाने आशिर्वाद दिला. थोड्याच अवधीत चंदन कापूर यांच्या तांबड्या, पिवळ्या ज्वाळांनी सुलोचनाचा सात्विक, पवित्र देह वेढला गेला.
इंद्रजीतच्या वधाने वेडापिसा झालेला रावण सीतेची हत्या करण्याच्या उद्देशाने अशोकवनाकडे निघाल्याचे मंदोदरीला कळल्याबरोबर मंदोदरी शिघ्रतेने त्याच्या मागेच गेली. तो आता खडःगाचा वार करणार एवढ्यात मंदोदरीने त्याचा हात वरच्या वर धरला, आणि धिक्कारत म्हणाली, “एवढी जर शौर्याची चाड असेल, पराक्रमाचा अभिमान शिल्लक असेल तर बंदीवान अबलेवर भ्याडासारखा वार करण्यापेक्षा, स्री हत्येने हात कलंकीत करण्यापेक्षा ज्याने तुमच्या पुत्रांना, भ्रात्यांना यमसदनास पाठविले त्या रामावर चालुन त्याचा पराभव करुन आप्ताच्या वधाचा सूड घ्या.”
“जा… शूरासारखे युध्द करुन रणांगणावर वीरमरण पत्करा! अविवेकी, विषयांध, दुर्वतनी पतीची पत्नी म्हणुन जगण्यापेक्षा रामासारख्या धीरोदत्त शत्रुकडुन मृत्यु पत्करणार्या शूराची विधवा म्हणुन जगने मी अधिक पसंत करीन.” मंदोदरीने केलेल्या निर्भत्सनेने व उपदेशाने त्याचे अंतरंग बदलले. काही निश्चय करुन दमदार पावले टाकीत तिथुन निघुन गेला. दरबार भरवुन आपल्या मंत्र्यासोबत युध्दस्थीतीवर चर्चा! सल्ला घेऊन व्युहरचना करण्याचे ठरविले. अमावस्येच्या मूहुर्तावर ससैन्य युध्दभूमीवर आले.
राम-रावणाचे युध्द सुरु झाले. रावण पराक्रमाची, शौर्याची शर्थ करीत होती. मंदोदरीचा उर अभिमानाने, आनंदाने भरुन आला. राम-रावणाचे ते अतुल युध्द बघायला स्वर्गात देवांनीही दाटी केली. इंद्राच्या लक्षात आले की, रावण रथारुढ व राम भूमीवरुन शरसंधान करतो हे पाहुन स्वतःचा दिव्य रथ, त्यात प्रचंड धनुष्य, दैदिप्यमान कवच, सुर्यासारखे तेजस्वी बाण आणि प्रभावी शक्ती, माताली सारखा सारथी इंद्राने रामाकडे पाठविले. रामाने त्या दिव्य रथाला वंदन करुन आरुढ झाला. राम रावणाचे चित्तथरारक युध्द सुरु झाले.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
*अंतीम भाग २७*
रावण-लक्ष्मण युध्द सुरु झाले. रावणाच्या एका दैदिप्यमान शक्तीने लक्ष्मणाला मुर्च्छित केले. रामासह सारे विलाप करुं लागले. त्या दिवशीचं युध्द संपल्यावर रावण मंदोदरीच्या प्रासादात गेला. तेरा दिवसांच्या युध्दाचा शीण त्याला जाणवत होता. मंदोदरी अापल्या शितल स्पर्शाने त्याचे मस्तक चेपत होती. त्याला उदासीनतेचे कारण विचारल्यावर म्हणाला, “युध्दाचा परिणाम स्पष्ट समोर दिसतो आहे. जीवन कसं भावसंकुल बनलय. जीवनाचा जीवनपट डोळ्यासमोर सरकत आहे. घडलेले प्रसंग आतांच अनुभवतो आहे. ते बालपण, ती तपस्या, मिळवलेले वर… तुझी वनातील भेट…..तुझ्या सौंदर्याने घायाळ झालेले मन…विवाह, त्रिभुवन विजेतेपदाचं पाहिलेलं नि कालांतराने साकार झालेलं स्वप्न….आणि त्याचबरोबर जीवनाची दुसरी बाजु….. भोगवादी तत्वज्ञान, मदिरा आणि मदिरेक्षेचे व्यसन, केलेले अत्याचार, मिळालेले साध्वींचे शिव्याशाप…..”
” पण! आतां हा त्रिभुवन विजेता रणांगणावर न भूतो न भविष्यती असा पराक्रम करुनच देह ठेवील.” मंदोदरीच्या डोळ्यात असवे तरळलीत. एका महान पुरुषाची केवढी ही शोकांतिका! युध्दभूमीवर जाण्यापुर्वी मंदोदरीने रावणाला ओवाळले. डोळ्यात तरळणारं पाणी पापण्यांतच रोखुन धरले तीने! दमदार पावले टाकीतच रावण युध्दभूमीकडे निघाला. तिला फार एकाकी वाटुं लागले.
मुर्च्छित झालेल्या लक्ष्मणावर संजीवनी जडीबुटीचा वापर करुन त्याला सावध करण्यांत आले. राम निश्चिंत मनाने युध्दाला तयार झाले. युध्द सुरु झाले. रामाने वेदोक्त अभामंत्रित करुन धनुष्याचा प्रत्यंचा आकर्ण ओढुन मर्मभेद बाण रावणावर सोडला. त्या बाणाने रावणाचे वक्षस्थल विदिर्ण होऊन रक्ताच्या थारोळ्यांत कोसळला. रावणवध झाला, जणुं अहंकारच भूमीवर गळुन पडला. शूरवीरांचा आश्रय संपला नी प्रवृत्तीरुपी धर्मच नाहीसा झाला. मंदोदरीने रावणवधाची वार्ता ऐकताच ती सुन्न झाली.
कांही क्षणांनी तिच्या संवेदना जागृत झाल्या व तीला भावनावेग आवरेनाश्या झाल्यात. ती रणभूमीवर येऊन पतीचं धड आणि शिरकमल शोधुन काढले. तिच्या शोकाला पारावार नव्हता. पतीशिवाय वेगळं जीवन नसतं. मुर्तिविना हे मंदिर आज रितं झालयं… बिभिषण भरल्या कंठाने तिचे सांत्वन करीत होता. ते पाहुन श्रीराम पुढे आले, अधोवदन शोक करणार्या मंदोदरीला म्हणाले, “मंदोदरी! शांत हो! शोक आवर! वृथा मोहाच्या अाहारी जाऊं नकोस. तू उदात्त, विवेक दाखवुन लोक कल्याणासाठी स्वतःच्या सौभाग्याचाही त्याग केलास! धन्य! प्रतिव्रते धन्य आहे तुझी!”
“हे! पतीव्रते! ज्या मुल्यांसाठी पतीशी झगडलीस, ज्यासाठी आजपर्यंत जगलीस त्याच मुल्यांची प्रतिष्ठापना लंकेत करायची आहे.” ऐकुन ती भारावली, नतमस्तक झाली.
बिभिषनाने शोक आवरुन तेजस्वी, महाबलाढ्य, शूर, त्रिभुवन विजेत्या, अग्निहोत्री, महातपस्वी, वेदोपानिषदांचा अध्ययन केलेल्या आपल्या भ्रात्यासाठी चंदन, पद्मक, वाळा यांची चित्ता रचली आणि वेदोक्त व शास्रीय पध्दतीने अग्नीसंस्कार केले. चित्ता धडाडली. ज्वाला उंच उंच झेपाऊ लागल्या. बिभिषणाला भावनावेग अनावर झाला.
मंदोदरीने जड अंतःकरणाने चित्तेला नमस्कार केला. शिसं भरल्या पावलांनी ती लंकेकडे जाऊ लागली. मंदोदरी खरंच शापीत देवता! रावणासारखा त्रिभुवन विजेता पती, इंद्रजीतसारखा पराक्रमी पुत्र, त्रैलोक्याचै वैभव पायाशी लोळण घेत होते आणि तरीही ती एकाकी जीवन जगली. एकाकी दीपकळीसारखी!!!
ही अंधारलेली लंका नवमुल्यांनी प्रकाशमान करतांना ही दीपकळी विराट होईल का? विराट तेजाने तळपेल का?
समाप्त!
मिनाक्षी देशमुख.

