पतिव्रता मंदोदरी संपूर्ण भाग ३, (११ ते १५)

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

पतिव्रता मंदोदरी

भाग – ११

 अत्याचाराच्या या कथा मंदोदरीच्या कानावर आल्याने ती व्यथीत, दुःखी होत होती. अशा विचारांचे संस्कार गर्भावर होणे अटळ होते. दिग्विजयी होऊन आलेल्या दशग्रिवाला अधोवदनाने मंदोदरीने ओवाळुन तिच्या महालात निघुन गेली. तिची नाराजी व रुसवा त्याला अस्वस्थ करुं लागल्याने  दशग्रिव तिच्या महालांत गेला. प्रेमाने तीच्या खांद्यावर हात ठेवीत मृदु स्वरात रागावण्याचे कारण विचारुन म्हणाला, “मी मिळविलेल्या दिग्विजयाचा अभिमान, आनंद नाही वाटला तुला?”

 मंदोदरी रोषाने म्हणाली, “तुम्ही केलेल्या अत्याचारांनी सारा आनंद काळवंडुन गेला. तश्या वार्तेचे संस्कार गर्भातील बाळावर होत आहेसे पाहुन असे वाटते, हा बाळ जन्माला नाही आला तरी चालेल, आणखी एका अत्याचार्‍याची भर नको पडायला.”

 मंदोदरीच्या सात्विक संतापाचे बोल दशग्रिवाला सहन न होऊन तिला शांत करण्यासाठी म्हणाला, “कोणीतरी हितशत्रुंनी माझी दुष्कीर्ती पसरविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.” त्याचे असत्य भाषण ऐकुन तीला भयंकर चीड आली. असत्याचा आघात असह्य होऊन सर्वांगातुन वेदना निघाल्यामुळे अंतरमहालात ती निघुन गेली.  थोड्या वेळातच दासीने पुत्ररत्न झाल्याची  वार्ता दशग्रिवाला दिली. जन्मल्या बरोबर तो मेघगर्जनेसारखा ओरडला म्हणुन त्याचे  नांव मेघनाद ठेवण्याचे ठरविले.

 दुसर्‍या दिवशी ज्योतीष्याने बाळाचे मुखावलोकन करुन पत्रिका पाहुन सांगीतले की, हा पुत्र जगद् विख्यात पराक्रमी होऊन इंद्राचाही पराजय करील. पण पुढे हा विनाशकारी सिध्दीच्या आहारी जाऊन युध्दात मानवाकडुन मारल्या जाईल. पुत्रजन्मोत्सहाचा सोहळा साजरा केला जात होता. स्रीसुलभ आनंद होऊनही मंदोदरी मात्र अंतरी दुःखीच होती. वत्सलतेचा पान्हा फुटुनही ती असमाधानीच होती. एका डोळ्यात पुत्रप्राप्तीचे अनंदाश्रु तर बाळाच्या भिषण भवितव्याने दुसर्‍या डोळ्यात दुःखाश्रु होते.

 दशग्रिवाच्या अत्याचाराच्या क्लेशकारक, देव, त्रृषी, यक्ष, गंधर्व या सर्वांना त्रास देतो अशा  वार्ता कुबेराच्या शुध्दाचारणाला पटत नसल्यामुळे दशग्रिवाला समजावण्यासाठी दुत पाठवला पण समजावने तर दुरच, अहंकारी दशग्रिवाने त्या दुताचा वध करवला आणि निरोप पाठवला की, “माझी प्रतिष्ठा पाहुन तुझ्या मनांत इर्षा उत्पन्न झालेली दिसते म्हणुन योग्य धडा शिकवण्यासाठी माझे हात कैलासापर्यंत लांबवावे लागतील”. हा सर्व वृतांत बिभिषण मंदोदरीच्या महाली येऊन कथन करीत असतांनाच दशग्रिव येत असल्याची सुचना मिळाली. मंदोदरी महालात प्रवेश केल्यावल तीथे बिभिषण दिसल्यामुळे त्याच्या कपाळावर अठ्या पडल्यात. ते पाहुन मंदोदरी म्हणाली, “महाराज! मीही अध्ययन केलं आहे. भाऊजींनी तर वेदाध्ययन, तपस्या केली आहे, शिवाय ते मंत्री आणि सल्लागार आहेत, त्यांच थोड तरी ऐकाव!”

 दूत अवैध असतांना त्याचा वध केलात. त्यावर दशग्रिव म्हणाला, “तो दूत म्हणजे कुबेराची प्रतिष्ठा! त्याच प्रतिष्ठेवर मी आघात केला. दूताला मारले नसुन त्याच्या रुपाने कुबेराची प्रतिष्ठा मातीत मिळवली आणि लौकरच त्यालाही!!”

 त्याच्या या बेताला मंदोदरी आणि बिभिषणाने विरोध केल्यावर तो म्हणाला “आमच्या महत्वाकांक्षेत कोणाचाही हस्तक्षेप, आडकाठी सहन करणार नाही. जगज्जेता व्हायचे तर घरगुती नात्यांना कुरवाळीत बसणार नाही” आणि महालाबाहेर निघून गेला.

 थोड्याच वेळात सैनिकांना इशारे देणारे नगारे वाजु लागले. ते आवाज मंदोदरी, बिभिषणाच्या कानावर आदळुन जणुं सांगत होते, हे ध्वनी विवेकाच्या आणी धार्मिक वृत्तीच्या पराभवाचेच !!!

          क्रमशः
        मिनाक्षी देशमुख.

मंदोदरी

 भाग-१२

 दशग्रिव, महोदर, प्रहस्त, मारीच, शुक, सारण, आणि युध्दोत्सुक धुम्राक्षहु प्रचंड सेनेसह आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करीत ससैन्य कैलासला येऊन कुबेराला युध्दाचे आव्हान केले. त्याचा निरोप ऐकुन दशग्रिवाच्या उद्दामपणाला कुठे तरी अडवले पाहिजे, प्रतिकार केलाच पाहिजे हे लक्षात घेऊन हजारो सैनिक गदा, मुसळे, तलवारी, शक्ती, तोमर आदी आयुधे घेऊन  आकाशाला भिडणार्‍या गर्जना करीत आपल्या उसळत्या लाटांनी किनारा गिळंकृत करायला थडकलेल्या सागरासारखे दशग्रिवाच्या सैन्यावर आदळले.

 युध्दाची ठिणगी पडली. वीरांच्या आव्हान-प्रतिआव्हानांनी परिसर दुमदुमून गेला. रणचंडीचे तांडवनृत्य सुरु होऊन रक्ताचे पाट वाहु लागले. कुबेराचे सैन्य आक्रमण परतावून लावत होते. युध्दाचा रागरंग पाहुन स्वतः दशग्रिव सैन्यात घुसुन पराक्रमाने यक्षांना दे माय धरणी ठाय करुन सोडले. यक्षाचे सैन्य पळुन गेल्यावर दशग्रिव अलका नगरीच्या सुवर्णभूषित अन् वैदुर्यरत्नयुक्त प्रवेश दारातुन आंत जाणार तोच सूर्यभानु नावाच्या व्दारपालाने प्रचंड दंडाचा त्याच्या मस्तकावर आघात केला. किरीट मातीत पडल्यामुळे संतापुन दशग्रिवाने खड्ःगाने व्दारपालाचे तुकडे तुकडे केले.

 कुबेराच्या सैन्याचा पराभव होतो आहेसे पाहुन मणिभद्र महायक्षाला चार हजार सैन्यासह युध्दभूमीत बोलावले. दशग्रिवाने शुक, सारण, प्रहस्त या राक्षसांना आकाशात गुप्त राहुन मायावी युध्दाने शस्रांचा प्रहार करुं लागले. नेता मणिभद्र मुर्च्छित झालेला पाहुन बाकीच्या यक्षांनी गारिकंदरांत, गुहेत आश्रय घेतला. हे पाहुन  स्वतः कुबेर युध्दाला सामोरा गेला. दशग्रिव-कुबेर दोघांनीही अस्र-शस्र, अमोध शक्ती एकमेकांवर सोडल्यात. शेवटी कुबेरचा पडाव होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. त्याही स्थितीत एकच विचार कुबेराच्या मनाला पोखरीत होता. या असुरी प्रवृत्तीपुढे सात्विक प्रवृत्तींना असाच पराभव पत्करावा लागणार का? कुबेराच्या पराभवाने आणि सतत मिळणार्‍या विजयाने, आतां या त्रिखंडात कोणीच शत्रु उरला नाही, या अहंकारा व बेभान आनंदाच्या धुंदीतच तो पुष्पक विमानात आरुढ होऊन सृष्टीसौंदर्य नेत्रांत साठवित विमान जात असतां अचानक विमानाची गती कुंठीत झालेली पाहुन त्याला अाश्चर्य वाटले.

 तोच कृष्णवर्ण, पिंगटवर्णाचा बलवान, लहान लहान हात असलेला वानररुप धारण केलेला नंदी त्याच्या समीप आला. त्याचे असे विचित्र रुप        पाहुन दशग्रिवाला हसु आले. रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला, “पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वतीची  क्रिडा चालु असल्यामुळे सुपर्ण, नाग, यक्ष, गंधर्व, देव, राक्षस यांना तिकडे जाण्यास प्रतिबंध करण्यासाठीं शंकरांनी माझी नियुक्ती केली आहे. ज्या माझ्या  लहान वानर रुपाला पाहुन हसलास , त्याच वानरांकडुन तुझा गर्व हरण होऊन तुझ्या कुळाचा नाश करतील.”

हे ऐकुन रावण अतिशय संतप्त होऊन म्हणाला, “ज्या पर्वतामुळे माझ्या विमानाची गती कुंठीत झाली तो पर्वतच उपटुन टाकतो.” असे म्हणुन त्याने पर्वताखाली हात सारले. त्याबरोबर शंकराने पायाचा अंगठा पर्वतावर जोराने दाबला. त्यामुळे दशग्रिवाचे हात त्या प्रचंड पर्वताखाली चिरडल्या गेलेत खुप प्रयत्न करुनही हात बाहेर काढता येईना. त्याच्या किंचाळण्याने सारे त्रैलोक्य कंपीत झाले.

 त्याची दयनीय दशा पाहुन त्याच्या अमात्याने शंकराला शरण जाण्याचा सल्ला दिला. त्याच्या अहंकाराला पहिला फटका बसला. मनोमन वृषभध्वजाला नमस्कार करुन शंकराची स्तुती करुन मुक्त करण्यासाठी विणवणी करुं लागला. बरेच दिवस उलटल्यावर पार्वतीलाच दया आली. तिच्या इच्छेखातर शंकराने त्याला मुक्त केले. हात मुक्त होताच समोर साक्षात शंकर उभे असलेले दिसले.

      क्रमशः
        मिनाक्षी देशमुख.

मंदोदरी

भाग – १३

 त्याला उठवित शंकर म्हणाले, “तू केलेल्या पराक्रमाने व स्तुतीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पर्वताखाली तुझे हात दडपल्याने तू जो भयंकर आक्रोश केला त्यामुळे सर्व त्रैलोक  तू रावित (निनादित) केल्याने ते भयभीत झालेत म्हणुन यापुढे तु ‘ *रावण* ‘ नावाने ओळखल्या जाशील. इच्छेप्रमाणे जाण्याची अनुमती आहे तुला.

 शंकराला समोर दिसताच दशग्रिवाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला.

 रावणाचा विजय होऊन परतत असतांनाच प्रहस्त, शुक, धूम्राक्ष यांनी पांच पन्नास  त्रुषींना खाऊन  टाकले. सुंदर स्रीयांना  विमानांत कोंबुन निघुन गेला. आर्यवर्तातील सगळ्या राजांनी शरणागती पत्करल्यामुळे मिळालेल्या विजयाने त्याचा असुरी आनंद उफाळुन व अहंकाराला खतपाणी मिळाल्याने  अहंकाराचा अंकुर वृक्षाचे रुप घेऊ लागला.

 शंकर प्रसन्न आहेसे पाहुन दशग्रिवाने अवशिष्ट आयुष्याचा पुर्ण उपभोग आणि शापादिकांमुळे कमी होऊ नये यासाठी ‘वर’  आणि एक दिव्य शस्र मागीतले. शंकरांनी चंद्रहास नांवाचे एक दैदिप्यमान खडःग देऊन सांगीतले की, जर याची अवज्ञा झाली तर हे खडःग तुझ्याजवळ राहणार नाही. तथास्तु म्हणुन अंतर्धान पावले,  एका नविन ‘वराने’ त्याचे सामर्थ्य आणखी वाढले. गर्वोन्मत पावले टाकीत तो विमानात चढला.

 पुष्पक विमान यमुना नदीवरुन जात असतांना यज्ञधुपाचा वास रावणापर्यत पोहोचल्याने दशग्रिवाने खाली बघीतले असतां राजा मरुत्ताचे राज्यात यज्ञ होत असल्याचे दिसुन आले. बृहस्पतीचा भाऊ संवर्त यज्ञाचा प्रमुख होता. मंत्र म्हटल्या जात होते, आहुत्या पडत होत्या. तोच एक शिष्य  घाबरत, लटपटत, कापर्‍या आवाजांत  रावण यज्ञाकडे येत असल्याचे सांगीतले. त्रुषी-मुनि घाबरलेत. देवही पक्षांचे रुप घेऊन वृक्षांवर जाऊन बसलेत. हे पाहुन  संतप्त मरुत आहुती द्यायची तशीच सोडुन युध्दाला निघाला, परंतु यज्ञाची  दिक्षा घेतली असल्यामुळे युध्दाचा अधिकार नव्हता.

 अनेक देश जिंकत जिंकत अयोध्यानगरीत विमान आल्यावर तिथल्या अनरण्य राजाला उद्दामपणे युध्दाचे आव्हान केले. संतप्त अनरण्य राजाने चतुरंग सज्ज सेनेनिशी सुरुवातीपासुनच रावणाशी मायावी युध्दाने सुरुवात केली. अग्नितुल्य बाणांचा मारा असह्य होऊन रावणाचे मंत्री  मारीच, शुक, सारण, प्रहस्त पळुन गेले. अतिशय संंतापीत, क्रोधीष्ट रावण व अनरण्य समोरासमोर येऊन दोघांमधे घनघोर युध्द सुरु झाले.

 रावणाने मायेचा अवलंबन करुन एका बाणाने अनरण्यचा मर्मभेद केल्याने राजा विव्हल होऊन खाली कोसळला. त्याने अंतीम क्षणी रावणाला शाप दिला, माझ्या इक्ष्वाकु वंशातील श्रेष्ठ वीर तुझे प्राण हरण करुन तुझ्या कुळाचा नाश होईल. आणि तो गतप्राण झाला. रावणाने  उद्दाममपणे त्याच्या प्रेताला लाथ मारली व विमानात आरुढ होऊन लंकेच्या दिशेने निघाला.

 देव, मानव, दानव, गंधर्व याच्या ज्या युवतींना अपहरण करुन आणले, त्या शोकमग्न स्वरात म्हणाल्या, “आम्हा परस्रीयांचे अपहरण करुन रममाण  होण्याचे स्वप्न रंगवतोस ना,  आमचा तुला शाप आहे की, एक स्रीच तुझ्या नाशाला कारण होईल. तिच्यामुळेच तुझा आणि तुझ्या राक्षस कुळाचा संहार होईल.”

लंकेतील ते सुवर्ण रत्नमयी प्रासाद नव्हे तर सोनेरी पिंजरा, त्या स्रीयांच्या मानेभोवती घट्ट मिठी आवळुन त्या सोनेरी प्रकाशातही काळरात्रीचा काळोख गडद होऊ लागला.

     क्रमशः
        मिनाक्षी देशमुख.

मंदोदरी

भाग-१४

 दिग्विजयावरुन रावण आल्यावर औपचारिकता म्हणुन मंदोदरी कक्षात तीचे क्षेमकुशल विचारुन जो गेला तो परत आलाच नाही. अनेक महिने लंकेबाहेर असल्याने तीला विरहात दिवस काढावे लागले, आता तो लंकेत येऊनही काही फरक पडला नाही. दिग्विजयाहुन आल्यानंतरची ही नवी प्रगती पाहुन ती खुप अस्वस्थ झाली. कुबेराचा पराभव, नंदीचा शाप, शंकरांनी केलेले गर्व हरण, ‘रावण’ नामाधिकरण, आर्यवर्तातील सार्‍या राजांचा पराभव, तसेच असंख्य सुंदर, असाह्य स्रीयांचे अपहरण, त्यांच्याकडुन मिळालेला शाप या सर्व वार्ता तिला कळल्यामुळे ती कमालीची अस्वस्थ झाली.

 लंकाधिशाची गाठ घेऊन  परत एकदा पतीधर्माची पराकाष्ठा, राज्ञीपदाची जबाबदारी, त्याला व लंकेला  या प्रलयातुन वाचवण्यासाठी आपल्या नाजुक हातांनी आकाशाला गवसणी घालायचे ठरवुन तीने देवघरात प्रवेश केला. ओघळत्या अश्रुंनी आणि भक्तीने भारावल्या मनाने शंकराला प्रणिपात करुन अनर्थाला प्रतिबंध घालण्याचे सामर्थ्य मागुन मंदोदरी लंकाधिशाला भेटायला गेली.

 रावण त्याच्या सुसज्ज्य  महालात अनेक युवतींसह भोगविलासात, कामक्रीडेत, प्रणयक्राडेत देहभान विसरुन दंग होता. त्याचवेळी मंदोदरीने महालात प्रवेश केल्यामुळे झालेला रसभंग रावणाला आवडलं नाही. तरी तिने केलेली कानउघाडणी संयमाने ऐकुन म्हणाला, “शेवटी तुही एक स्रीच…! मयदैत्याचीच कन्या ना..!”

 तीला अपमान सहन न होऊन  उसळुन म्हणाली, “तुम्ही माझ्या सामर्थ्याचं अवमुल्यन करीत आहांत. माझी माता अप्सरा कुळांतील, पिता  त्रिभुवनातील प्रसिध्द शिल्पी आहेत. माझ्यात सुध्दा योध्याला आवश्यक असणारे कर्तुत्व आहे. आपल्या या प्रचंड साम्राज्याचा भार  पेलायला समर्थ आहे. पण….”

त्याने विचारले, “पण काय?”

 त्यावर ती म्हणाली, “हे साम्राज्य राहणार आहे का? विनाशकाळ जवळ आला असे वाटतय. कदाचित आपल्याला अहंकाराच्या धुंदीत भविष्याची पावलं दिसत नसतील. व्यर्थ आहे गर्व. त्रिभुवनातील एक एक राज्य या साम्राज्यात सामील होत असल्यामुळे आपण अधिक सावध असायला हवं! कारण…”

 “इतिहास साक्ष आहे की, पराभुत, अपमानित शक्ती कधी स्वस्थ बसत नसतात. अपमानाचं व नामुष्कीचं शल्य त्यांच्या जिव्हारी भेदुन गेलेले असते. त्यामुळे सर्व समदुःखी एकत्रित येऊन विजेत्याविरुध्द एकवटुन उभे राहतात. इतिहासाचं हे सत्य नाकारु नका.”

 मंदोदरीने इतके परोपरीने, कळकळीने समजावण्याचा रावणावर काडी मात्र फरक पडला तर नाहीच उलट तीची निर्भत्सना करुन, “तुझ्या सल्ल्याची आवश्यकता नाही” असे फटकारुन निघुन जायला सांगीतले.

पराभूत मनःस्थीतीत, हरल्या हरवल्या जाणीवेने जड पावलांनी महालाबाहेर पडली. अपण अगदी एकाकी आहोत या जाणीवतेने अंतःकरणात गहीरा गडद अंधार दाटुन आला.

 उदासीनतेचे पांघरुन घेऊन विमनस्क, विचारमग्न अवस्थेत आपल्या महालांत बसली असतां, तेवढ्यात रडत, विलाप, आक्रोश करीत शूर्पणखा तिच्याकडे आली. तिचा आक्रोश पाहवत नव्हता. मंदोदरीने तीला सांत्वना देत कारण विचारल्यावर शूर्पणखाने सांगायला सुरुवात केली.

 दशग्रिव दिग्विजयासाठी पाताळात येत असल्याचे कळल्यावर खुप दिवसांनी भेट होणार म्हणुन आम्ही खुप आनंदीत झालो. त्याने प्रथम भोगवती नगरीतल्या नागांना पादाक्रांत केले. त्यानंतर मणीमय नगरीत निवातकवच नांवाच्या दैत्याबरोबर अनेक दिवस युध्द सुरु होते. पण दोघांनाही असल्यामुळे कोणाचाही पराभव शक्य नाही हे पाहून स्वतः ब्रम्हदेवाने येऊन दोघांचा समेट घडवुन दिला. नंतर वरुणाच्या नगरीत गेला. वरुण तिथे नसल्यामुळे त्याच्या पुत्रांशी युध्द करुन त्यांना पराभूत केले.

        क्रमशः
        मिनाक्षी देशमुख.

मंदोदरी

 भाग – १५

 शूर्पणखेला शोकावेग आवरेना…! तीने पुढे सांगायला सुरुवात केली…. “नंतर दशग्रिव आमच्या नगरीत येऊन युध्दाचे आव्हान केले. माझा पती विद्युज्जिव्हाने त्याला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण दुराग्रही रावणाने युध्दाचा हट्टच धरला. युध्दात विद्युज्जिव्हा मारल्या गेला.” शूर्पणखा विधवा झाली. संतापुन तीने शाप दिला, “माझ्या दांपत्य सुखाची जशी राखरांगोळी झाली तशीच तुमची सुध्दा होईल.”

 मंदोदरीच्या काळजाला शूर्पणखेचे ऊद्गार भिडले. रावणाचा उन्मतपणा, त्याचा रंगमहाल, अहंकार सारं तिच्या नजरेसमोर साकार झालं. तीच्या मनांत आलं, या दुःखाच्या वनव्यांत मी होरपळत नाही का? दांमत्यसुख आतां तरी कुठे मिळतयं? त्रिभुवनाचे वैभव आणि पराक्रमी व त्रिलोक विजेता पती असुनही सधवा असुन विधवेचे जीवन जगत नाही कां?

 पाताळांत दिग्विजय करीत असतांनाच राक्षसांचा शत्रु विष्णू हा बळीच्या राज्यात बळीला पाताळात जखडुन टाकले असे कळल्यावर बळीला बंधनमुक्त करण्याच्या हेतुने रावण बळीच्या दरबारात जाऊन बळीला बंधनमुक्त करण्याचा आपला मनोदय सांगीतला. बळीने त्याचे यथोत्चित सत्कार केल्यावर बळी म्हणाला, “मला कोणीच बंधनांत टाकलेले नाही. मी स्वतंत्र असुनही मी माझ्याच प्रतिज्ञेच्या बंधनांत आहे. स्वतःच्या शुध्द, सात्विक, लोककल्याणकारी विचारांनी व तत्वांनी बांधुन घेणे हेच खरे स्वातंत्र…! स्वातंत्र म्हणजे सैराचार नाही.”

 बळी म्हणाला, “माझेजवळ एक अत्यंत दैदिप्यमान कुंडल आहे ते तुझ्या कानात घालुन दाखव ना..!”

 असे म्हणुन त्या कुंडलाकडे अंगुलीनिर्देश केला. अहंकारलिप्त रावण मोठ्या दिमाखाने ते कुंडल एका हाताने उचलायला गेला, पण ते तसुभरही हलले नाही. खजील होऊन, सर्व सामर्थ्य पणाला लावुनही कुंडल उचलल्या जाईना. हे पाहुन बळी उठला आणि सहजतेने  कुंडल उचलुन रावणाला दाखवत म्हणाला, “हे कुंडल माझ्या पुर्वजांचे हिरण्यकश्यपुचे आहे. त्यांच्यासारख्या सामर्थ्यवंतालाही विष्णुचा पराभव शक्य झाले नाहींं. कांही क्षणातच विष्णुला ठार केलं, तिथं तुझी स्थिती काय होईल? विष्णुच्या पराभवाचा विचार सोडुन दे. त्यांच दर्शन घ्यायचं असेल तर तो दरवाज्यावर द्वारपाल म्हणुन उभा आहे.” बलीच्या उद्गारांनी खजील होऊन मान खाली घालुन रावण लंकेला परतला.

 रावण दिग्विजयाचा डंका न वाजवतां शांतपणे परतलेला पाहुन कांहीतरी विपरीत घडले असावे ही शंका मंदोदरीला आली. शूर्पणखेला रावण आल्याचं कळल्याबरोबर त्याच्या समोर जाऊन बेभानपणे किंचाळत विचारले, “काय अपराध केला होता माझ्या नवर्‍याने? कां विधवा केलेस मला..? तू सुखोपभोगात रमायचं, त्रिखंडाचा स्वामी म्हणुन मिरवायचंय, अन् मी विधवेचं जीवन जगायच…! कां ही मला शिक्षा? कां? कां? आणखी कितीजणांचे श्राप घेशील?”

 मंदोदरीने पतीची चांगलीच कानउघाडणी केली व शूर्पणखेची कांहीतरी नीट व्यवस्था करायची त्याच्याकडुन कबुल करवुन घेतले. रावणाने विचार केला, “शूर्पणखेला जवळपास ठेवण्यापेक्षा कुठेतरी दूर व्यवस्था करावी. तीला दंडकारण्याचे राज्य देण्याचे कबुल केल्यावर थोडी शांत झाली. तीच्या संरक्षणार्थ खर-दुषण आणि त्यांच्या अधिपत्याखाली चौदा हजाराची सेना देऊन तीची रवानगी दंडकारण्यात केली. मात्र भातृभावाला कायमचा तडा जाऊन अविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळेच त्याचे सुख, वैभव, तीच्या अंतर्मनात मत्सराचे तरंग सतत निर्माण होत होते.

          क्रमशः
       मिनाक्षी देशमुख.

                         

पतिव्रता मंदोदरी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading