दत्त चरित्र, अध्याय ११ ते १५ ओवीबद्ध

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ११ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीदत्त समर्थ ॥

गुरु म्हणे इंद्रासी । शास्त्रें न घालवी जो भ्रमासी ।
मुक्ती न मिळे तयासी । गर्भवासीं पडे तो ॥१॥
भूलोकांतूनी पर्जन्यांत । पर्जन्यांतूनी अन्नांत ।
अन्नद्वारा पितृशरीरांत । येऊनी राहे तीन मास ॥२॥
राही रेत होऊन । कामाग्नीनें तापून ।
ऋतुकाळीं होतां मैथुन । स्त्रीयोनींत प्रविष्ट होई ॥३॥
योनिरक्त विमिश्रित । राही गर्भाशयांत ।
दैवे वाडे वारेनें वेष्टित । न मरे कष्ट होतांही ॥४॥
अस्थि – स्नायु मज्जारेतानें । होती त्वचा मांस रक्त रक्तानें ।
मोदका उकडती त्या तर्‍हेनें । हा देह बने अमंगळ ॥५॥
मूत्राचें आधण विष्ठेचा दाथर । रेत रक्ताची उकड थोर ।
मातेची कूस हेंच पात्र । तयामाजी जथराग्नी उकडी ॥६॥
शुक्र अधिक असे जर । तरी उपजे खास नर ।
रक्त अधिक असे जर । नारीशरीर उपजेल ॥७॥
रक्त रेत समान होतां । खास ये नपुंसकता ।
शुक्र वायूनें भिन्न होतां । आवळे जुळे देह होती ॥८॥
अमंगळाहूनी अमंगळ । रजस्वलेचा विटाळ ।
तेथेंच उपजे बाळ । तो निर्मळ धुवूनी होय कीं ॥९॥
रेत रक्त जें एकत्र मिळतें । पांच रात्रीनें बुद्बुद होतें ।
सात दिवसांनीं पिशवी होते । पक्षानें फुगते तीच पैं ॥१०॥
महिन्यानें होई कठीण । दों मासांनीं मस्तक निर्माण ।
तिसरे मासीं पोट होवून । हस्तपादांकुर फुटती ॥११॥
चौथे मासीं त्वचा । पांचवे मासीं उद्गम नखांचा ।
साहावे मासीं नवछिद्रांचा । उद्भव होय अनुक्रमें ॥१२॥
वायू पायापासून । अंतरीं राहे प्राण होऊन ।
सातवे मासीं ताळू फोडुनी । अंतरीं चेतन प्रवेश करी ॥१३॥
मातेनें खातां अन्न । त्याचा रस नाभिछिद्रांतून ।
पोंचें पोटांत जाऊन । तेंचि जीवन गर्भासी ॥१४॥

दोन्हीं हृदयें एक होती । तेव्हां डोहाळे उठती ।
अजीर्ण कृशता वांती । मातेला सुस्ती येतसे ॥१५॥
निजकर्में भोगी हा नरक । परी तेथेंही ईश्वर संरक्षक ।
स्तन होती पुष्ट कृष्ण मुख । ही पूर्वें योजना दुग्धाची ॥१६॥
दक्षिण कूस होतां थोर । समजावा जन्मेल पुत्र ।
वामकुक्षी होतां थोर । कन्या निर्धार जाणावी ॥१७॥
लोटतां नवमास । पूर्णत्व ये गर्भास ।
स्मरोनी पूर्वं कर्मास । प्रार्थी ईश्वरास पीडूनी ॥१८॥
सातवे मासापासून । होवूनियां चलायमान ।
अवाड्मुख पीडून । वंदून बोले परमेश्वरा ॥१९॥
देवा कर्म केलें गहन । त्याचें हें दु:ख दारुण ।
भोगविलें त्वां मजलागून । पुरे शिक्षण आतां हें ॥२०॥
दुर्गंधीनें कंटाळलों । जठराग्नीनें पोळलों ।
ह्या नरकांत लोळलों । शिणलों आतां सोडवी मज ॥२१॥
निजकर्में नानायोनी । येथें आलों भोगूनी ।
वाटे मला नारकाहूनी । गर्भवास हा महा कष्ट दे ॥२२॥
आतां सोडवी येथून । यावरी पाप न करीन ।
देवा तुझें भजन करीन । तुला विसरें न कधींही ॥२३॥
असी स्तुति करितां । दशम मास प्राप्त होतां ।
सूतीदायूची लहरी उठतां । पडे योनिद्वारें किडा जसा ॥२४॥
उपजतां स्पर्शे वात । ती स्मृती जाई अकस्मात ।
सोहं विसरूनियां पोत । राहे रडत कोहं कोहं ॥२५॥
बोलो नये पराधीना । न जाणती त्याच्या मना ।
विपरीत होती सर्व योजना । शयन पानादिकांच्या ॥२६॥
बाल्यावस्था खेळांत जाय । विषयभोगीं तारुण्य जाय ।
तेव्हां धर्माधर्म दिसेल काय । संतांचे पाय न धरवती ॥२७॥
स्त्री सांगेल तें प्रमाण । माता वाटे कीं वैरिण ।
ऐकाया शास्त्रपुराण । मनीं शीण येतसे ॥२८॥
जसें मोगरीचें फूल । मावळे न लागतां वेळ ।
मनीं विषयांचा मांडितां खेळ । तारुण्य तत्काळ मावळे ॥२९॥
ईश्वरभजनीं उतावेळ । न केली त्यांचें हें फळ ।
जरेस पाठवी काळ । काना जवळ ये ती टवळी ॥३०॥
जरा हळू कानीं सांगत । मान हालउनी हातें नाहीं म्हणत ।
मग ती पाडूनियां दांत । कान डोळे आंत ओढीतसे ॥३१॥
तसें पाहुनी तें बेरूप । पोरें जवळ घालिती दूप ।
त्याच्या मनीं ये कोप । आपोआप अपमान होतां ॥३२॥
मग म्हणूं जाई राम राम । तों होई लाम लाम ।
जवळी ज्याला न पडे दाम । तो निकाम दुरावे ॥३३॥

पुन्हा काळचक्रीं पडे । परिभ्रमण पूर्ववत घडे ।
जेव्हां मनींचा भ्रम उडे । तेव्हां सांकडे कडे पडाती ॥३४॥
पूर्व संस्कारें जी प्रकृती । तदनुसार कर्में घडती ।
शास्त्राविनें न पालटे ती । म्हणूनी शास्त्रयुक्ती आदरावी ॥३५॥
शास्त्रें होतां भ्रमनिरसन । जरी हातीं येईल ज्ञान ।
स्थिरबोध न हो तंव जाण । भय दारुण वाटे कीं ॥३६॥
ऐक इंद्रा तूं आतां । सांगतों सातवी गाथा ।
प्रतिष्ठानीं विप्र होता । झाला सूत तयासी ॥३७॥
योगभ्रष्ट तो पूर्वींचा भय मानूनी द्वैताचा ।
उन्मत्त झाला असोन साचा । व्यर्थ वाचाळपण करी ॥३८॥
लोकसंगा डरे तो । विषयां विष मानी तो ।
मान न व्हावा म्हणूनी तो । राहे जडमूढ होवूनी ॥३९॥
माता म्हणे नायके सुत । विष्टामूत्रीं लोळत ।
पिता म्हणे खचित । ग्रहग्रस्त हा होय ॥४०॥
मग व्रतें करिती । नियमें देवा पूजिती ।
हातीं रक्षा बांधिती । दानें देती विप्रांला ॥४१॥
वैद्यही औषध देती । तीर्थयात्रा जप शांति ।
करिती आंगारे लाविती । भूतभीती मानूनी ॥४२॥
कांही नोहे उपयुक्त । लागलें महाभूत ।
जें जगा चेष्टवित । तें बंधांत केंवी ये ॥४३॥
अहं ब्रह्मास्मि उच्चारी । स्वयें झाला पंचाक्षरी ।
यापुढें बापुडा मंत्रीं । भागवतावांचुनी ॥४४॥
करितां उपाय फार । तो नये प्रकृतीवर ।
तो लोळे भूमीवर । मळमूत्र नेणे तो ॥४५॥
हगे मुते उभ्यानें । काय खाणें काय पिणें ।
हेंही तो मुळींच नेणे । त्याचें बोलणें न समजे ॥४६॥
न जाणे हिताहित । असीं जातां वर्षें आठ ।
मौजीबंध करी तात । सांगे कानांत गायत्री ॥४७॥
संध्यावंदन न करी । जरी तया पिता मारी ।
तरी न जपे गायत्री । मैत्री न ठेवी कोणासी ॥४८॥
विष्णुदत्ता ऐकून । तया पुत्रा घेऊन ।
त्याचे घरीं जाऊन । बोलती वंदून मायबाप ॥४९॥
हा जन्मापासून । पडें जडसा होवून ।
यासी उपाय योजून । पुत्रदान द्या आम्हां ॥५०॥
आम्हा एकचि सूत । झाला कीं रोगग्रस्त ।
भूतत्रस्त कीं उन्मत्त । ग्रहग्रस्त कीं न कळे हा ॥५१॥
विष्णुदत्त तें ऐकून । तया पुत्रा पाहून ।
ब्रम्हनिष्ठ ओळखून । म्हणे पुत्रा ठेऊनी चला ॥५२॥
पिता म्हणे हा सुत । मुतेल ह्या यज्ञशाळेंत ।
तया म्हणे विष्णुदत्त । चला निश्चिंत आपुले घरी ॥५३॥

बरें म्हणूनी ते जाती । विष्णुदत्त तयाप्रती ।
म्हणे कां घेसी ही भीति । काय चिंती चित्त तुझें ॥५४॥
तूं कोणाचा कोण । येथें येण्याचें काय कारण ।
कां दाविसी हे दुर्गुण । तुज कोण मोहवील ॥५५॥
त्वां घरीं जावें आनंदें । मायबापा सुख दे ।
लोकसंग्रह सोडून न दे । या स्वच्छंदें काय लाभ ॥५६॥
सोडूनी दे ह्या चेष्टा । तुझें काय करूं आतां ।
हें सांग तूं तत्वता । म्हणूनी माथा हात ठेवी ॥५७॥
हंसुनिया पुत्र बोले । विप्रा काय हें ऐकविलें ।
निजरूप माझें भलें । तें एकलें तूं जाणसी ॥५८॥
मूळीं न माझी उत्पत्ती । मायबाप कसे असती ।
कर्में ही अक्रिया हातीं । केवी केवी घडती बोल बापा ॥५९॥
मी सच्चिदानंद व्यापक । प्रळयजळापरी एक ।
मी कोणाचा होवूं लेक । जावूं कुठें कसा ॥६०॥
मी अन्न आणि अन्नाद । नाहीं भोग्य भोगस्वाद ।
मुळींच नाहीं भेद । परि छेद केवीं घडे ॥६१॥
जरी असतों परिच्छिन्न । तरी हा तुझा प्रश्न ।
मानितों मी समीचीन । सर्वंथा न घडे असें ॥६२॥
देशकाल वस्तु व्यापून । मी असे संपूर्ण ।
मला परिच्छेद न । भेद न सर्वथा ॥६३॥
ऐकून हें वचन । विष्णुदत्त हर्षून ।
प्रेमें तया अलिंगून । गाढ वचन बोलतसे ॥६४॥
बापा तूं साच धन्य । अससी सर्व देवमान्य ।
तुझ्यासारिखा कोण अन्य । तूं संन्यस्त साच मानी ॥६५॥
कोणीही पुरुष पाहे । कधींही अकर्मा न राहे ।
प्रकृतीस्वभावप्रवाहे । कर्म करिती हें निश्चित ॥६६॥
तरी करावें शास्त्राचरण । दुसर्‍यालाही तें शिक्षण ।
मिळेल त्याणें दूषण । कीं भूषण येईल ॥६७॥
जे वशिष्टादिक । ते ज्ञानी सम्यक ।
परंतु ते लौकिक । सर्वथा न टाकिती ॥६८॥
स्वयें आचरूनी । अन्या मार्ग दावूनी ।
ज्ञानभूमी धरूनी । पहिले मुनी राहिले ॥६९॥
पहिल्या योगभूमी तीन । योगी यांचे जागरण ।
मानिती चौथी स्वप्न । तेथें जाण ब्रह्मवेत्ता ॥७०॥
भूमी धरितां पांचवी । ब्रह्मविद्वर पदवी ।
मिळे घेई जो सहावी । तो ब्रम्हविद्वरीयान ॥७१॥

पांचवी स्वल्प निद्रा । सहावी गाढ निद्रा ।
ही स्वयें न सोडी योगमुद्रा । परत: उत्थान होय जेणें ॥७२॥
तुर्या ते सातवी । स्वत: परत: न उठवी ।
इच्या योगें ये पदवी । ब्रम्हविद्वरिष्ठसंज्ञक ॥७३॥
तो विधिनिषेधातीत । अजूनी तूं ती मात ।
नेणसी म्हणूनी भीत । करिसी व्यर्थ ह्या चेष्टा ॥७४॥
सुखी राहे जीवन्मुक्त । वागूनियां अनासक्त ।
करी कर्म शास्त्रोक्त । मुक्तसंग होवूनी ॥७५॥
येणें ज्ञान होय स्थीर । घडे लोकोपकार ।
ढिला होई अहंकार । शास्त्राधार असा असे ॥७६॥
अभिमान हाची बंध । सोडी त्याचा संमंध ।
हीच युक्ती म्हणती वुध । आत्मबोध होई जेणें ॥७७॥
ठेवितां स्वात्मदृष्टी । नोहे अहंममता भेटी ।
मानापमानाच्या गोष्टी । केंवी पोटीं येती मग ॥७८॥
असी बाणतां स्थिती । विषयवासना नुठवी ।
मना विकार केवीं होती । निरंहकृती राहतां ॥७९॥
असा जो समाहित । तोची मानिजे मुक्त ।
त्याची दृष्टी जेथें जात । तेथें होत समाधी ॥८०॥
जो कर्मफळ सोडी । अहंकारा न जोडी ।
हो कां तो अज्ञ अनाडी । बंध तोडी निश्चयें ॥८१॥
आतां तूं तरी ज्ञाता । बंधाची नसे वार्ता ।
यापरी वागतां । केवी बद्धता येईल ॥८२॥
ज्याचें अवश चित्त । होई विषयसक्त ।
तो न होई मुक्त । घेई गुप्त मार तो ॥८३॥
ज्याचें स्वात्मनिष्ठ मन । तो विषयां भोगून ।
अलिप्त असे नित्य जाण । तया कोण बद्ध म्हणे ॥८४॥
परव्यसनीं जी नारी । घरधंदा करी जरी ।
जारसंग अंतरीं । ती घरीं वावरतांही ॥८५॥
तेवीं रूपीं विश्रांत । बाहेर वावरे मुक्त ।
तसा तूं अनासक्त । होई मुक्त बाळका ॥८६॥
मोक्ष नाहीं स्वर्गावरी । खालीं किंवा भूमीवरी ।
जो अहंकारा मारी । त्याचे अंतरी मोक्ष वसे ॥८७॥
जाईचेंही फूल । चोळतां श्रम होईल ।
त्याहुनी सुखें करवेल । अहंकारत्याग तो ॥८८॥
मीतूंपणाची गती । जी उठे स्फूर्ती भ्रांती ।
ह्या मनाच्या चेष्टा निश्चिती । त्या न शिवती ज्ञात्याला ॥८९॥
चित्तीं ठेवी हा बोध । न बाधेल मग संबंध ।
तुटेल तो कर्मबंध । हा निर्बंध न मानी ॥९०॥

मग ज्ञान स्थिरावेल । शांती अंगीं बाणेल ।
मुक्तिपदीं डोलशील । माझा बोल साच मानी ॥९१॥
असें वचन ऐकून । बाळ चेष्टा दे सोडून ।
विष्णुदत्ताचे घरीं जाऊन । करी भोजन स्वस्थचित्तें ॥९२॥
सतीचे हातानें मिळतां अन्न । तयाचा भ्रम गेला निघोन ।
त्याची शांत वृत्ती पाहून । झालें समाधान मायबापा ॥९३॥
म्हणती जन्मापासून । जो धड न बोले वचन ।
त्याला न लागतां क्षण । सावधान केला विप्रें ॥९४॥
ते म्हणती विष्णुदत्ता । आम्हांवरी दया केली आतां ।
काय उपाय योजला सुता । जेणें स्वस्थता शीघ्र आली ॥९५॥
आम्हां दिलें जीवदान । म्हणोनि घालिती लोटांगण ।
घरीं जाती आज्ञा घेऊन । बाळही सावधान वागे तो ॥९६॥
शास्त्राचें एक तात्पर्य । अज्ञा पदोपदीं भय ।
संसार असतां ब्रम्हमय । वाटे मायामय तयासी ॥९७॥
स्वरूपातें भुलोनी । कर्तृत्व भोक्तृत्व वाडूनी ।
व्यर्थ जाते शिणूनी । हे अज्ञानी मूढपणें ॥९८॥
नथ गळसरींत खोंविली । तिची विसर पडली ।
तसे असे ही बोली । चतुरीं जाणिली पाहिजे ॥९९॥
नथ गळ्यांत दावितां । ती म्हणे मिळाली आतां ।
तेवीं शास्त्रीं स्वात्मा कळतां । म्हणती आतां मिळाला ॥१००॥
शास्त्रें लहान थोर । सर्व असती बोधपर ।
असें गुरूचें उत्तर । ऐकोनी इंद्र नमन करी ॥१०१॥
करा जी अपराध क्षमा । चित्तीं न ठेवा अतिक्रमा ।
असें म्हणूनी सुत्रामा । नमोनी स्वधामा चालिला ॥१०२॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । ठेवी शास्त्रसारांशीं मना ।
शास्त्रापासुनी परोक्षज्ञाना । घेवूनि विज्ञाना पावसी ॥१०३॥
जीं कर्मांचीं फळें बोलती । अणिमादी सिद्ध असती ।
तिकडे न द्यावी चित्तवृत्ती । नश्वर होती अंतीं ज्या ॥१०४॥
सर्व शास्त्रें पाहून । स्वार्थ घ्यावा शोधून ।
हंस जेवीं पाणी टाकून । दुग्ध पिवून जाई तेवीं ॥१०५॥
असें श्रीदत्ताचें वचन । सविस्तर ऐकून ।
तो कार्तवीर्य अर्जुन । बोले वंदून श्रीदत्ता ॥१०६॥
सह्याद्रीवर येवून । किंचित् जटांनीं आच्छन्न ।
जें पाहिलें हें श्रीवदन । तेणें सदन समृद्ध झालें ॥१०७॥
हें वैराग्यही झालें । शास्त्रतत्व ऐकिलें ।
आतां ज्ञान विज्ञान भलें । कृपेनें कळलें पाहिजे ॥१०८॥

इति श्रीदत्तचरिते एकादशोsध्याय: ॥११॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १२ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य।
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥

गुरु म्हणे दीपकाप्रती । अर्जुनाची परिसोनी विनंती ।
श्रीदत्त तयाप्रती । विस्तरें सांगती उत्तर ॥१॥
संसारी हे मूढ जीव । शास्त्रावरी न ठेविती भाव ।
त्यावरी अवकृपा करी देव । तेणें भवभ्रमण हो ॥२॥
स्वयें चिद्धन साक्षी असून । तीनी अवस्थेहूनि भिन्न ।
स्वयें अनुभव येत असून । जाती विसरून स्वरूपा ॥३॥
मी कर्ता मी दाता । म्हणती मी सुखदु:खभोक्ता ।
असी घेवूनी मूढता । जगीं भिन्नता पाहती ॥४॥
ही केवळ होय भ्रांती । ही जातां दूर नाहीं मुक्ती ।
हाही आत्म्यावर उपचार म्हणती । जे वेदांती निष्णात ॥५॥
मुळीं बंध नाहीं जाण । मग मुक्ती खरी म्हणे कोण ।
अज्ञबोधार्थ हें निरूपण । शास्त्रपुराण करीतसे ॥६॥
जें सत्य ज्ञान अनंत । ब्रम्ह एक सदोदित ।
भ्रमें नामरूपें निश्चित । असती कल्पीत ब्रम्हावरी ॥७॥
दिसे जो हा सर्व लोक । तें पूर्वीं ब्रम्ह होतें एक ।
भेदरहित देख । सच्चित्सुखस्वरूप ॥८॥
न दुजें तत्समान । त्याला सजातीय भेद कोठून ।
दुसरें नाहींच म्हणोन । विजातीय भेद नसे तया ॥९॥
सच्चिदानंद ब्रम्ह खास । तें असे अखंडैकरस ।
स्वगतभेद तयास । नाहींत खास वृक्षापरी ॥१०॥
वृक्षा पत्र एकदेशीं । फळ पुष्प एकदेशीं ।
ब्रम्ह सच्चिदानंद सर्वांशीं । दृष्टांत तयासी रक्तोष्ण प्रकाशदीप ॥११॥


निर्विकारा नये विकार । म्हणोनी करितां मायेचा अंगिकार ।
ती आत्मशक्ती निराकार । तिणें नये द्वैतपणा ॥१२॥
शक्ती शक्ताहूनी भिन्न नसे । लोकीं ठावें असे ।
तिणें द्वितीयत्व येतसे । असें कसें म्हणावें ॥१३॥
कोणी म्हणती पहातां माती । ईचे पुढें घडे होती ।
तेव्हां नाम आकृती । पूर्वीं चित्तीं येतसे ॥१४॥
तसें येथें मानितां । पूर्वीं कांहीं नव्हतां ।
जिव्हा मन नसतां । नामआकारता कोण करी ॥१५॥
तें अद्वितीय ब्रम्ह एक । संकल्पानें झालें स्वयें अनेक ।
म्हणोनी एकाच्या ज्ञानें सकळीक । कळे विवेक होतांची ॥१६॥
घेवूनियां माती । कुंभार घडा करी हातीं ।
हा आरंभवाद म्हणती । उपादान माती निमित्त कुलाल ॥१७॥
ईश्वर निमित्त उपादान । उभयरूप होवून ।
करी जग निर्माण । निर्विकारपण न जातां ॥१८॥
ईश्वर कोळ्याचे परी । विश्वोत्पत्ती संहार करी ।
याला कुंभारापरी । आरंभवाद न घडे ॥१९॥
आम्लानें होतें दुधाचें दहीं । हा परिणामवाद तोही ।
ह्या निर्विकार आत्म्याला नाहीं । म्हणूनी विवर्तवाद बोलती ॥२०॥
रूपें भासे शिंपीवर । किंवा सर्प दोरीवर ।
तसा हा जगदुत्पत्तिप्रकार । निर्विकार अधिष्ठान तें ॥२१॥
जीव आणि ईश्वर । यांचा भेद परस्पर ।
चितीं अविद्या तद्भेद परस्पर । हे सहा प्रकार अनादी मानिले ॥२२॥

कल्पित जाण भेद हाही । मुळीं अविद्याच नाहीं ।
मग कैंची भेदवार्ता ही । कांहींच नाहीं स्वरूपीं भेद ॥२३॥
तूं ह्मणशी कीं मिथ्या भ्रम । मग किमर्थ हा श्रवणादि श्रम ।
जरी होय मिथ्या भ्रम । महा अनर्थ घडवी हा ॥२४॥
ह्मणूनी योगादिकें करून । करावें याचें निरसन ।
जसा अग्नी मलिन सुवर्ण । मळ जाळून स्वच्छ करी ॥२५॥
तसा भ्रम मळ योगें जातां । स्वयें प्रकाशे स्वयंप्रकाशता ।
तेथें कैंची द्वैतवार्ता । आभासमात्रता जयाची ॥२६॥
गारुड्यानें दाविलें जळ । त्याणें न भिजे भूमंडळ ।
परि भुलती लोक सकळ । हें जळ म्हणोनी ॥२७॥
तेवीं जाण हें जगद्वैत । भ्रमची असे समस्त ।
संसारही भ्रमभूत । भ्रमजात सुख दु:ख ॥२८॥
हा भ्रम नष्ट होतां । मग कैंची द्वैतवार्ता ।
प्रारब्धाची काय कथा । भ्रम नासतां अर्जुना ॥२९॥
कर्मादिकें व्यर्थ श्रम । त्याणें न निरसे भ्रम ।
वस्तुज्ञानाचा क्रम । धरितां भ्रम दुरावे ॥३०॥
जो ज्ञानयोग पर । तो करी भ्रम दूर ।
तोचि आनंद निर्भर । तोचि नर कृतकृत्य ॥३१॥
असें ऐकुनी वचन । वंदूनी बोले अर्जुन ।
कसें साधावें योगज्ञान । कृपा करोन सांगावें ॥३२॥
ब्रह्म असोनी एक । कसें झालें अनेक ।
केवी आलें हें दु:ख । हा विवेक मज व्हावा ॥३३॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । स्वरूपीं नाहीं कल्पना ।
नित्यमुक्त निर्विकारपणा । तो कोणा न मोडवे ॥३४॥
शुद्धसत्व प्रकृतींत । तेंची ब्रम्ह प्रतिबिंबित ।
तोची जगाचा तात । श्रुतिसंमत ईश्वर ॥३५॥अनंत
ब्रम्हाविष्णुरुद्ररूपें धरी । तोचि सृष्टी स्थिती संहार करी ।
तोची राहे सर्वांतरीं । तोचि तारी भक्तजनां ॥३६॥
शुद्धसत्वगुणी त्याची शक्ती । तिला विद्यामाया म्हणती ।
ही उपाधिभूत प्रकृती । सर्वज्ञता येती इच्या योगें ॥३७॥
मलिनसत्व जी प्रकृती । त्यांत ब्रम्हप्रतिबिंबें पडती ।
त्यांना जीव असें म्हणती । ते असती पराधीन ॥३८॥
ते व्यष्टीभूत किंचिज्ज्ञ । समष्ट्यभिमानी जो सर्वज्ञ ।
तो स्वतंत्र ईश्वर प्राज्ञ । वागवी अज्ञ जीववर्गा ॥३९॥
मायेच्या शक्ती दोन । आवरण विक्षेप म्हणोन ।
स्वरूपा ठेवी आच्छादून । म्हणूनी आवरण ह्मणती तया ॥४०॥

ईश्वर आणि मुक्त यांसी । सोडून इतर जीवांसी ।
आवरण पडे निश्चयेंसी । मग मी अज्ञ असी प्रतीत ये ॥४१॥
असें होतां अज्ञान । कर्तृत्व भोक्तृत्व ये लागून ।
हें विक्षेपाचें कार्य जाण । नामायोनी भ्रमणरूप ॥४२॥
विक्षेप हें सुख दु:ख । विक्षेपची भूतभौतिक ।
कार्य जें सकळीक । विक्षेप एक पसरला ॥४३॥
जैसी मंदाधकारीं । पडली असतां दोरी ।
तें नेणतां अंतरीं । वाटे खरोखरी हा सर्प ॥४४॥
जो हा विकल्प घे मन । हेंची होय आवरण ।
मग धडकी कंप होय दारुण । तो विक्षेप जाण अर्जुना ॥४५॥
दोरीचें होतां ज्ञान । होय सर्पभ्रमनिरसन ।
मग विक्षेस्प राहिला म्हणून । तया कोण गडबडे ॥४६॥
जें असे जीवा अज्ञान । त्याचें होतां निरसन ।
जीवा न होय भ्रमण । विक्षेपानें सर्वथा ॥४७॥
ब्रह्मापासुनी प्रकृती । ती पासूनी महत्तत्वोत्पत्ती ।
महत्तत्वापासूनी अहंकारोत्पत्ती । त्यापासुनी होती पंचभूतें ॥४८॥
आकाश हो शब्दगुण । वायु शब्दस्पर्शगुण ।
तेज शद्बस्पर्शरूपगुण । जलाचे गुण शब्दस्पर्शरूपरस ॥४९॥
शब्दस्पर्शरूपरसगंधांनीं । युक्त असे मेदिनीं ।
भूतांच्या सत्वगुणांशांनीं । ज्ञानेंद्रियें पांच होती ॥५०॥
श्रोत्र त्वचा आणि नयन । रसना आणि घ्राण ।
ही ज्ञानेंद्रियें जाण । आतां अंत:करण ऐक ॥५१॥
भूतसत्वांश एकत्र होवून । होतसे अंत:करण ।
वृत्तिभेदें पंचधा जाण । अंत:करण निर्विकल्प ॥५२॥
संकल्पात्मक तें मन । निश्चयात्मक बुद्धि जाण ।
चित्त करी अनुसंधान । करी मीपण अहंकार तो ॥५३॥
याचा अंतर्भाव करून । कोणी म्हणती हीं दोन ।
आतां रजोगुणें जाण । कर्मेंद्रिय प्राण झाले ॥५४॥
वाचा हस्तपाद । लिंग आणि गुद ।
हीं कर्मेंद्रियें निर्वाद । प्राणाचे भेद पांच हे ॥५५॥
प्राण अपान व्यान । उदान आणि समान ।
हें पांच वायू जाण । क्रियात्मक असती हे ॥५६॥
ज्ञानकर्मेंद्रिय प्राण । मिळोनी लिंगदेह जाण ।
हाचि ब्रह्मांडीं करी भ्रमण । जोंवरी ज्ञान न होय ॥५७॥
अज्ञान हें कारण शरीर । आनंदमय कोशाचें हें घर ।
लिंगाख्य सूक्ष्म शरीर । हेंही घर तीन कोशांचें ॥५८॥
कर्मेंद्रिय पांच । रजोगुणी प्राणही पांच ।
हा प्राणमय कोश साच । करवी हाच कर्मातें ॥५९॥
ज्ञानेंद्रिय मनासहित । मनोमय कोश ख्यात ।
बुद्धि ज्ञानेंद्रियांशीं सहिताकोश हा प्रथित विज्ञानमय ॥६०॥

आकाशादि भूतांचे । दोन दोन भाग करुनी साचे ।
पुन: चार चार अर्ध्याचे । भाग करोनी ते एक ॥६१॥
आपुल्या भागीं न मिळवितां । प्रत्येकाच्या अर्ध्यभागीं योजितां ।
पंचीकरण होई तत्वतां । त्यापासूनीच सर्व शरीरें ॥६२॥
रोम त्वचा मांस नाडी अस्थी । हे पृथ्वीचे अंशें होती ।
उदकाचे पांच असती । लाळ रक्त स्वेद शुक्र मूत्र ॥६३॥
क्षुधा तृषा आणि कांती । निद्रा आळस हे होती ।
तेजाचे अंश निगुती । ऐक आतां वायूचे ॥६४॥
गमन आणि धावन । लंघन आकुंचन प्रसारण ।
हे वायूचे अंश जाण । चपळपणा असे हा ॥६५॥
काम क्रोध लोभ मोह भय । हे आकाशांश यांहीं होय ।
चतुर्विध स्थूल काय । अन्नमय कोश हा ॥६६॥
जसे खालीं वर प्रासाद । करूनी राजा करी विनोद ।
तसे जीवात्म्याचे हे प्रासाद । तीन देह जाणावे ॥६७॥
स्थूल देहाचा करूनी संग । संद्रियांनीं घेई जागृद्विषयभोग ।
विश्वनायक होई मग । धे प्रविविक्त भोग सूक्ष देहीं ॥६८॥
जागृद्वासना घेऊनी । तैजस नामक होवूनी ।
स्वप्नावस्था कल्पूनी । एक असुनी अनेकत्व पाहे ॥६९॥
कारणदेहीं जाउनी । प्राज्ञ नामक होवूनी ।
निद्रावस्था अनुभवुनी । जागृत होउनी पुन: भ्रमे ॥७०॥
देह हें अधिष्ठान । अहंकार कर्ता जाण ।
इंद्रियसमूह हें कारण । चवथी जाण वायुचेष्टा ॥७१॥
इंद्रियादिकांच्या देवता । हें पांच एकत्र होतां ।
शुभाशुभ कर्मचेष्टा । कायावाचामनें घडे ॥७२॥
इष्ट पुण्य स्वर्गादि सुख दे । अनिष्ट पाप नरकादि दु:ख दे ।
मिश्र पापपुण्य मनुष्यजन्म दे । त्रिविधकर्म दे असी गती ॥७३॥
अंडज आणि स्वेदज । उद्भिज आणि जारज ।
पांचवी योनी दिविज । कर्मभोगार्थ ह्या योनी ॥७४॥
कर्मयोगें ह्या योनी फिरे । जरी कल्पकोटी होती फेरे ।
तरी भोगिल्याविना कर्म न सरे । जंववरी बरें ज्ञान न ठसे ॥७५॥
असा सृष्टिक्रम । दावीतसे वेदागम ।
हा सत्य म्हणोनी भ्रम । घेई अधम मानव जो ॥७६॥
अमानित्वादि गुण । अंगीं घ्यावे बाणून ।
गुरुला शरण जाऊन । आत्मज्ञान जोडावें ॥७७॥
फलाभिमान त्यागून । करितां स्वधर्मानुष्ठान ।
ईश्वरप्रीती होवून । सद्गुरुचें दर्शन होईल ॥७८॥

गुरु देवासमान । श्रद्धेनें मानून ।
त्याची सेवा करूनी श्रवण । करावें निर्वाणला भार्थ ॥७९॥
गुरुच्या अनुग्रहें करून । विचार ठसेल सत्य जाण।
अन्यथा व्यर्थ ये शीण । अंतरीं ज्ञान न ठसेल ॥८०॥
राजा त्वां आश्रमोक्त । कर्म केलें अनासक्त ।
म्हणूनी झालासी माझा भक्त । आतां व्यक्त सांगतों ॥८१॥
भ्रम मोह मलहर । वैराग्य झालें जें पर ।
आतां तुजवरी सत्वर । विद्या प्रसाद करील ॥८२॥
विद्या म्हणजे ज्ञान । तें दोन प्रकारचे जाण ।
परोक्ष अपरोक्ष म्हणून । श्रुतिप्रवीण बोलती ॥८३॥देव
गुरुमुखें श्रवण करणें । उपक्रमादि सहालिंगानें ।
वेदांताचें तात्पर्य घेणें । हें जाणणें परोक्ष ज्ञान ॥८४॥
ब्रह्म एक कीं अनेक असे । असा संशय जो होतसे ।
ती संशयभावना तीही नासे । श्रवण असें करितां हें ॥८५॥
ब्रह्म नाहीं हेही मती । असत्वावरण तें म्हणती ।
तेंही नष्ट होई निश्चिती । वस्तु आहे म्हणती मग तेची ॥८६॥
श्रवणानुसारें मनना । करितां हरे असंभावना ।
स्थिर करूनियां मना । सावधाना पावूनी ॥८७॥
मी किंचिज्ज्ञ अपरोक्ष असें । ईश सर्वज्ञ परोक्ष असे ।
मग ऐक्य व्हावें कसें । वाटे ती संशयभावना ॥८८॥
तीनी अवस्थेंत ज्ञान एक । तें सदा सच्चिदानंद रूपक ।
तें प्रत्यक् उपाधीनें अज्ञत्वादिक । त्याचा विवेक नसतां दिसे ॥८९॥
आत्मा एक सदोदित । जग हें मिथ्या स्वप्नवत ।
उपक्रमोपसंहारें पहात । उपाधीमुळें द्वैतता ॥९०॥
अध्यारोपा सोडूनी । अपवादा विचारूनी ।
पाहातां एकत्व ये मननीं । चिंतितां मनीं श्रवणानुसारें ॥९१॥
वस्तु न भासे ही मती । तें अभानावरण म्हणती ।
जे हें मनन करिती । जाई अभानावरण त्यांचे ॥९२॥
असें निदिध्यासन होतां । आवरण दूर जातां ।
ध्यानें अद्वितीयता । अभ्यास करितां स्थिरावें ॥९३॥
सर्व संकल्प सोडून । एकांतीं बैसून ।
ध्यान करितां अनुदिन । स्वयें आपण ब्रह्म होय ॥९४॥
भ्रमराचें ध्यान करितां । कीटां ये भ्रमरता ।
हा ध्यानाचा प्रभाव तत्वतां । लोकीं प्रसिद्धता असे ही ॥९५॥

जीव तरी ब्रह्म असून । करितां स्वरूपाचें ध्यान ।
ब्रह्मस्वरूपा पावतां कोण । मानील निपुण आश्चर्य हें ॥९६॥
ध्यान तरी किमर्थ । म्हणसी तरी यथार्थ ।
ऐक राया कृतार्थ । होसील स्वार्थ जोडूनी ॥९७॥
जी अनिर्वचनीय ख्याती । तीणें स्वरूपीं ये भ्रांती ।
रज्जुसर्पापरी ती । मिथ्या असूनी अनर्थ करी ॥९८॥
अविद्या काम कर्मेंसी । युक्त होई दिननिशीं ।
होऊनी रागादिकां वशी । अविनाशित्व हरपवी ॥९९॥
रागद्वेषवशेंकरून । करितां त्रिविध कर्माचरण ।
त्याणें ये सदा भ्रमण । जन्ममरण पुन: पुन: ॥१००॥
राहुग्रस्त झाला रवी । म्हणती अज्ञ जेंवी ।
जिवावरी आवरण तेंवी । भास मात्र असे तें ॥१०१॥
ज्ञानावांचूनी तन्निवृत्ती । कोण करील कवण्या रितीं ।
श्रवणादिकर्में जे ज्ञानी होती । तेचि मिळती स्वरूपीं ॥१०२॥
शाब्दज्ञान परोक्ष । आत्मा तरी अप्रत्यक्ष ।
ध्यानें होई अपरोक्ष । म्हणोनी ध्यान करावें ॥१०३॥
राजा तूं सभाग्य । तुला झालें वैराग्य ।
तूं होसी उपदेशयोग्य । मोक्षभागी तूं खास ॥१०४॥
कर्म केलें मदर्पण । झालें शुद्ध अंत:करण ।
तुझी मजविषयीं जाण । दृढ भक्ती जाहली ॥१०५॥
आतां तुला निर्विघ्न । घडेल महावाक्यचिंतन ।
अपरोक्षानुभव घेऊन । समाधीमध्यें लीन हो ॥१०६॥
स्थिरऊनी तत्वज्ञान । मनाचा भंग करून ।
टाकी वासनावन । समूळ जाळून सर्वथा ॥१०७॥
मग होसी जीवन्मुक्त । प्रारब्ध भोगूनी पूर्ववत ।
विदेह कैवल्यें मद्रूपांत । मिळसील निश्चित हें मानीं ॥१०८॥
नृपा आतां तूं सादर । करी महावाक्यविचार ।
तेणें अपरोक्ष साक्षात्कार । होईल सत्वर निर्धारें ॥१०९॥

इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये द्वादशोsध्याय: ॥॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १३ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरु ॥

दत्त ह्मणे दीपकासी । आनंद झाला अर्जुनासी ।
वंदूनी प्रार्थी दत्तासी । विनयेंसी भावार्थें ॥१॥
महावाक्य कोणतें । कसें चिंतावें तयातें ।
जेणें अपरोक्षता येते । तें मातें निरोपावें ॥२॥
ऐकूनी अर्जुनाची विनंती । श्रीदत्त ह्मणती तयाप्रती ।
सोमवेदी श्वेतकेतूप्रती । अरूण सांगे तत्वबोध ॥३॥
नऊ वेळ अभ्यासे । तें तूं अससी वाक्य असें ।
युक्तीनें उपदेशिलें असें । महावाक्य तें अवधारी ॥४॥
येथें चित्त दे सादर । येणें होय साक्षात्कार ।
उतरसील भवपार । हा निर्धार धरीं मनीं ॥५॥
नित्यानित्यविचार । हें पहिलें साधन साचार ।
विषयभोग जो इहपर । त्याचा अनादर सर्वथा ॥६॥
याचे नांव इहामुत्रार्थविराग । हें दुसरें साधन चांग ।
नसतां विषयविराग । ध्यानयोग मग कसा घडे ॥७॥अ
करणें मनाचें शमन । इंद्रियांचें करणें दमन ।
व्यवहाराचें वर्जन । शीतोष्णादिक सहन करावें ॥८॥
गुरुवचनीं श्रद्धा धरावी । समाधानता चित्तीं असावी ।
हे सहा मिळोनी जाणावी । तिसरी साधनसंपत्ती ॥९॥
माझी मुक्ती व्हावी ऐसें । मन उतावेळ होतसे ।
हें चौथें साधन मुमुक्षत्व असें । सांगतसे मोक्षशास्त्र ॥१०॥

हीं चार साधनें जोडून । गुरुला शरण जाऊन ।
भावें नमस्कार करून । वाक्यविचारण करावें ॥११॥
जो शब्दज्ञाननिपुण । स्वरूपानुभवप्रवीण ।
तोचि सद्गुरु जाणून । त्याचे चरण धरावे ॥१२॥नं
उद्धतपणा सोडून । भावें करितां सेवन ।
गुरु करवील श्रवण । भ्रमनिरसन करि जें ॥१३॥
साहा लिंगें तात्पर्यग्रहण । याचें नाम श्रवण ।
उपक्रमोपसंहार जाण । पहिलें लिंग असें हें ॥१४॥
अभ्यास अपूर्वता फल । अर्थवाद उपपत्ती विमल ।
हीं सहा लिंगें सबल । करवितील श्रवण तें ॥१५॥
हें जग पूर्वीं सद्रूप । होतें ब्रह्म अरूप ।
अद्वितीय एकविसाय । असा उपक्रम करोनी ॥१६॥
हें सर्व जग ब्रह्मात्मक । हेंचि आपुलें रूप एक ।
आत्मा सत्य आहे हा विवेक । उपसंहार जाणावा ॥१७॥
उपक्रमोपसंहार मिळोन । अर्जुना हे एक लिंग जाण ।
आतां अभ्यासाचें लक्षण जाण । ऐक सांगेन निश्चयें ॥१८॥
शरीर हें अन्नमय । त्याचें कारण तोय ।
त्याचें कारण तेज होय । त्याचें सद्ब्रह्म होय कारण ॥१९॥
सन्मूल ह्या प्रजा जाण । सत्प्रतिष्ठा सदायतन ।
हा एक अभ्यास जाण । दुसरा अपधारण करी ॥२०॥
ह्या सर्व नद्यांची खूण । नामरूपें केवळ जाण ।
कृष्णा गोदा नर्मदा गंगा म्हणून । करिती जन व्यवहार ॥२१॥
त्या समुद्रीं मिळतां जाण । त्यांचीं नामरूपें ओळखील कोण ।
तसें ज्ञानानें ब्रम्ही होतां लीन । केंवी भिन्न जीव होय ॥२२॥
हा दुसरा अभ्यास । आतां तिसरा परिस ।
मधुकर आणिती पुष्परस । नाना वृक्षांचे यत्नानें ॥२३॥
ते सर्व एक होतां । त्याला येई मधुरता ।
मग एकरस होतां । ते ओळखतां न येती ॥२४॥

तेंवीं जीव सद्ब्रम्हीं मिळतां जाण । कसा ओळखील कोण ।
हा तिसरा अभ्यास पूर्ण । करी अवधारण चौथ्याचें ॥२५॥
फळांतील बीज वडाचें । अति सूक्ष्म असे साचे ।
ऋतु क्षेत्र जळानें तयाचें । मोठें झाड होतसे ॥२६॥
तसें सद्ब्रह्म जाण । सूक्ष्म असे तें जगत्कारण ।
काल दैवादियोगें तें वाढून । जगद्रूप होवूनी टवटवे ॥२७॥त
तें ब्रम्ह तूं अससी । हा चौथा अभ्यास घे मानसीं ।
आतां सावधानेंसी । लवणाचा दृष्टांत ऐक ॥२८॥
समुद्रापासोनी झालें लवण । तें नामरूप पोंचून ।
पुन्हां समुद्रीं जातां मिळोन । नामरूप सोडूनी एक होय ॥२९॥
तसा जीव ब्रम्हीं मिळतां । सोडी नामरूपता ।
ब्रम्ह होय तत्वतां । हा पांचवा अभ्यास ॥३०॥
वृक्षाची खांदी तोडितां । तिलाच ये निर्जीवता ।
तेवीं जीवें शरीर सोडितां । शरीरा ये पंचता न जीवा ॥३१॥
जीव ब्रह्म आहे म्हणून । त्याला नाहीं जन्ममरण ।
तो शरीराहून । सर्वथा भिन्न जाणावा ॥३२॥
हा सहावा अभ्यास । आतां सातवा परिस ।
चोरानें बांधूनी नेत्रांस । एका नरास पळविला ॥३३॥
देशांतरीं त्या टाकून । चोर जाती अलंकार घेऊन ।
तो रडतां ऐकून । एक सज्जन तेथें आला ॥३४॥
त्याणें सर्व जाणून । तोडूनी त्याचें नेत्रबंधन ।
त्याच्या देशाची खूण । दिग्दर्शन करूनी दाविली ॥३५॥
दावितां मग तो मेधावी । दिग्दर्शनें धरी पदवी ।
पोंचे आपुल्या गांवीं । समजावें तेंवी येथेंही ॥३६॥दे
नरा येतां मुमुक्षता । तापत्रयें कळवळतां ।
दया येई गुरुनाथा । जवळी येई कळवळे ॥३७॥
मायापटल तोडून । म्हणे हा स्वदेशमार्ग धरून ।
सावधान करी गमन । असें म्हणून मार्गी लागी ॥३८॥
मग तो त्या मार्गीं चाले । गुरुकृपेनें न भुले ।
स्थान घे आपुलें पहिलें । वेद बोले असें हें ॥३९॥

हा सातवा अभ्यास । गुरुविणें न मिळे मोक्ष खास ।
आतां आठवा अभ्यास । भावें परिस अर्जुना ॥४०॥व
येतां नरा अंतकाळ । त्रिदोष वाढे तत्काळ ।
तेणें होई व्याकुळ । प्रतिकूळ झाल्यानें ॥४१॥
मग इंद्रियें ओढ घेती । मनामध्यें लपती ।
मनाचीही होई गती । प्राणामध्यें तत्काळ ॥४२॥
प्राण तेजामध्यें होय लीन । तेजही जाई मिळोन ।
परदेवता रूपीं जाण । मग कोण कोणा जाणेल ॥४३॥
स्त्रीपुत्र जवळी रडती । मला पहा पहा म्हणती ।
तरी न फिरे मागुती । दृष्टी ती लीन झालेली ॥४४॥
तेवीं अभ्यास करितां । देहभानही उडतां ।
इंद्रियांची लीनता । होई चित्तामध्यें ती ॥४५॥वा
चित्त प्राणामध्यें लपे । प्राण तेजामध्यें लपे ।
तेज परदेवतेमध्यें लपे । अनुकूलरूपें अभ्यासें ॥४६॥
मग एक रस बाणे । तेव्हां कोणा कोण जाणे ।
जरी विस्मृती होय मरणें । पुन: शिणे जन्ममरणीं ॥४७॥
अभ्यासें रूपीं होय लीन । नराचें हरपे देहभान ।
त्याला नये मरण । आणि जनन पुनरपि ॥४८॥
हा अभ्यास आठवा । आतां ऐक नववा ।
चोरे केली म्हणूनी मानवा । धरून नेती राजदूत ॥४९॥
तो न होतां कबूल । हातीं धरवीती तप्त शूल ।
तेणें हात जळे तात्काळ । पापफळ हें असे ॥५०॥
मग त्यासी दंडिती । जरी धरितां शूल हातीं ।
चोरी न होतां सत्यता येती । जाळूं न दे त्याच्या हाता ॥५१॥
न जळतां त्याचा हात । सोडूनी देती राजदूत ।
तेंवी निरभिमानी जो निर्लिप्त । तया मुक्त करी यम ॥५२॥
तो या उभय लोकांतूनी । जायी मग सुटोनी ।
हा नववा अभ्यास मनीं । निश्चयेंकरूनी धरावा ॥५३॥
प्रत्येक अभ्यासें । तें तूं ब्रह्म आहेस असें ।
छांदोग्यामध्यें सांगितलें असे । तें हें असे दुसरें लिंग ॥५४॥
ब्रह्म असे अतींद्रिय । प्रत्यक्ष प्रमाणा अविषय ।
ब्रह्म तें निरंश होय । अनुमानागम्य आहे तें ॥५५॥

ब्रह्म अद्वितीय म्हणूनी । उपमा नसे त्रिभुवनीं ।
केवळ वेदांत वाक्येंकरूनी । धरिती ध्यानीं मिळतसे ॥५६॥
त्याला म्हणती शब्द प्रमाण । अखंडैकार्थरसज्ञान ।
शाब्दें होय नरा जाण । ही खूण तिसर्‍या लिंगाची ॥५७॥
एवं विज्ञान होतां । प्रारब्ध भोगूनीं सरता ।
ये विदेहकैवल्यता । चौथें लिंग हें म्हणती ॥५८॥
सृष्टी स्थिती प्रलय जाण । प्रवेश पदार्थशोधन ।
नियमन फल जाण । सात हे अर्थवाद ॥५९॥
हे सात मिळोन । अर्थवाद एक जाण ।
सर्वाची उत्पत्ती ब्रह्मापासून । ब्रह्मरूपी स्थिती होय ॥६०॥
ब्रह्मरूपी प्रळय जाण । जीवरूपें करी प्रवेशन ।
एक व्यापक असून । प्रवेश करी सर्वदेहीं ॥६१॥ई।
बिंबप्रतिबिंबन्यायें जरी । हा प्रवेश मानावा तरी ।
ब्रह्म अरूप निर्विकारी । कवण्यापरी प्रतिबिंबलें ॥६२॥
ब्रह्म असे अपरिच्छिन्न । त्याचा शरीरामध्यें जाण ।
प्रवेश होतो त्याची खूण । वेदांतनुपुण वदती ही ॥६३॥
जें पाहणें ऐकणें । हुंगणें चाखणें बोलणें ।
घेणें देणें जाणें येणें । मल सोडणें रति घेणें ॥६४॥
व्हावया हे व्यवहार । जें कारण अगोचर ।
त्याच रूपें साचार । ब्रह्म शरीरप्रविष्ट म्हणती ॥६५॥
ब्रह्मची स्वयें आपण । सर्वांचें करी नियमन ।
तत्त्वंपदार्थ शोधितां जाण । ब्रह्म एक लक्ष होय ॥६६॥
होतां पूर्ण विज्ञान । सर्व कामना होती पूर्ण ।
ब्रह्मज्ञानाचें हें फळ जाण । अंतीं निर्वाण निश्चळ ॥६७॥
हे सात अर्थवाद मिळोन । एक पांचवें लिंग जाण ।
सहाव्याचें करीं श्रवण । उपपत्ती म्हणून जें असे ॥६८॥
घडा होण्यापूर्वीं माती । मध्येंही व्यापून असे ती ।
घडा फुटतां अंतीं । हो ती माती पूर्ववत ॥६९॥
एक घडा पारखतां । सर्वमृद्विकार ओळखी ज्ञाता ।
जेथें ये आकारता । नाम तेथें येतसें ॥७०॥

तसें हें ब्रह्म जाण । याचें होतां ज्ञान ।
सर्व ये कळोन । हें सहावें लिंग जाण ॥७१॥
यांही श्रवण करावें । तात्पर्य तें चितीं घ्यावें ।
मग संशय नाश पावे । करितां भावें श्रवण हें ॥७२॥
आतां ऐक वाक्यविवरण । तत्पदें परब्रह्म जाण ।
त्वंपदें प्रत्यक् ब्रह्म म्हणून । श्रुती वचन प्रसिद्ध असे ॥७३॥
अंत:करण आणि त्याच्या वृत्ती । साक्षीपणें ज्याला कळती ।
ज्याची चैतन्यमूर्ती । त्वंपदार्थ तो जाण ॥७४॥
घटद्रष्टा घटाहून । वेगळा जसा तसा जाण ।
देहद्रष्टा देहाहून । असे भिन्न तो त्वंपदार्थ ॥७५॥
स्वप्रीत्यर्थ ज्याला पुत्रादिक । तत्प्रीत्यर्थ आपण न हो ऐक ।
स्वात्मा प्रियतम ज्याला एक । सुखरूप तो त्वंपदार्थ ॥७६॥
मीं असावें हें वाटे । ज्याचें स्वप्रेम न तुटे ।
जरे देहही सुटे । तरी न तुटे स्वप्रेमबंध ॥७७॥
मनाचें जाणें येणें । बुद्धीचे भाव अनुक्षणें ।
जाग्रत्स्वमनिद्रालक्षणें । जो जाणें तो त्वंपदार्थ ॥७८॥
स्वयें विकारी न होतां । बुद्ध्यादिकां खेळवितां ।
लोहचुंबकापरी जो चेता । तो त्वंपदार्थ जाणावा ॥७९॥
देहेंद्रियादि संघात । हे सर्व जड होत ।
ह्याला जो वागवी सतत । त्वंपदार्थ तो जाणा ॥८०॥
जो बोध साक्षीलक्षण । त्वंपदार्थ तो जाण ।
बोत्धृत्व आनि साक्षिपण । निर्विकारपणें जयाला ॥८१॥
देहेंद्रिय मन:प्राण । आणि अहंकार यांहून ।
जो सर्वथा असे भिन्न । निर्विकारपणें जयाला ॥८२॥
हा होय त्वंपदार्थ । आतां सांगतो तत्पदार्थ ।
हा जानता यथार्थ । सर्वानर्थ नष्ट होती ॥८३॥
तत् म्हणजे ब्रह्म एक । अतत् म्हणजे द्वैत अनेक ।
तें दूर करणें देख । अतत् व्यावृत्ती तिला म्हणती ॥८४॥
अतत् व्यावृत्तीरूपानें । आणि साक्षात् विधिमुखानें ।
तत्पदार्थ जाणणें । ब्रह्म होणें निजांगें ॥८५॥
तो विष्णु संसारधर्मरहित । स्थूलसूक्ष्मादिचिन्हवर्जित ।
अदृश्यत्वादि गुणयुक्त । तत्पदार्थ तो जाण ॥८६॥
ज्याच्या आनंदा नाहीं सीमा । जो सच्चिदानंदात्मा ।
ज्याला म्हणती परमात्मा । तो भूमा तत्पदार्थ ॥८७॥
जयाला सर्वज्ञत्व । जया असे सर्वेश्वरत्व ।
जया सर्वशक्तिमत्व । जया समत्व तत्पदार्थ तो ॥८८॥
ज्याच्या ज्ञानें सर्व कळे । ज्याचें अनंतत्व न चळे ।
प्रपंचकार्य शक्तिबळें । करी तोचि तत्पदार्थ ॥८९॥
जीवरूपीं सर्व शरीरीं । अविकारी जो प्रवेश करी ।
सर्वांचें नियमन करी । तो अवधारी तत्पदार्थ ॥९०॥

जीवां कर्मफळें देई । स्वयें अलिप्त आपण होई ।
जो परोक्ष अमृताची पोयी । तो होई तत्पदार्थ ॥९१॥
सर्वज्ञ परोक्ष तत्पदें । किंचिज्ज्ञ अपरोक्ष त्वंपदें ।
वर्णिलें असें वेदें । या भेदें ऐक्य कसें ॥९२॥
असें म्हणशी तरी ऐक । तो हा देवदत्तनामक ।
येथें तो हा ह्या पदां एक । देवदत्त देख आधार ॥९३॥
तत्पदें तो देश गतकाल । हा ह्या पदें हा देश वर्तमानकाल ।
दोनी विरुद्ध टाकुनी केवळ । घेती आधार निश्चळ देवदत्त ॥९४॥
जो पूर्वी देखिला काशींत । राज्य करी तारुण्यांत ।
तो हा भ्रष्टराज्य वृद्ध येथ । देवदत्त लक्ष्यार्थ एक ॥९५॥
दोनी अवस्था दोनी काळ । दोनी देश टाकितां केवळ ।
देवदत्त एक निश्चळ । लक्षणावृत्या जसा कळे ॥९६॥
तेंवी किंचिज्ज्ञत्व सर्वज्ञत्व । अपरोक्षत्व आणि परोक्षत्व ।
जीवेश्वराचें टाकूनी एकतत्व । लक्ष्यार्थ रूप तें घ्यावें ॥९७॥
सुखी दु:खी कर्ता भोक्ता । किंचिज्ज्ञ अपरोक्षादि हे तत्वता ।
त्वंपदाचे वाच्यार्थ आतां । लक्ष्यार्थ तुज सांगेन ॥९८॥
असज्जडदु:खरूप देहादिक । तत्प्रतिकूल सच्चिदानंद रूपक ।
प्रत्यगात्मा स्वयंप्रकाशक । लक्ष्यार्थ तो एक त्वंपदाचा ॥९९॥
ज्याचे सर्वज्ञत्वादि गुण । तो तत्पदवाच्यार्थ जाण ।
जें सत्यज्ञानानंदादिलक्षण । तें लक्ष्यार्थ जाण तत्पदाचें ॥१००॥
लक्ष्यार्थें ये अविरोध । वाच्यार्थें असे विरोध ।
म्हणूनी लक्षणावृत्ती निर्वाध । अखंडैकरसबोध करीतसे ॥१०१॥
जी स्वार्थत्याग करी । ती जहल्लक्षणा निर्धारी ।
गंगेवर गोठा येथें ज्यापरी । स्वार्थ सोडूनी तीरलक्षणा ॥१०२॥
लक्षार्थ एक असल्यामुळें । जहल्लक्षणा एथें न जुळे ।
स्वार्थ न सोडितां अन्य घेई बळें । अजहल्लक्षणा ती होय ॥१०३॥
कावळ्यापासूनी दही राख म्हणतां । त्याला कुत्र्यानें खावूं येतां ।
त्यांचेंही निवारण करिजेल तत्वता । ती अजहल्लक्षणा होय ॥१०४॥
जे विरुद्ध लक्ष्यार्थ । ते न सोडितां ये अनर्थ ।
ह्मणूनी जी करी स्वार्थ । जहदजहल्लक्षणा ती घ्यावी ॥१०५॥
विरुद्धांश तत्वंपदाचे । सोडूनी अविरुद्धांश त्यांचे ।
घ्यावा हें तत्व वाक्याचें । जाणती साचे ते तरती ॥१०६॥
तें ब्रह्म मी असें । मी तें ब्रह्म असें ।
शिष्यें जाणावें असें । सांगतसे हें महावाक्य ॥१०७॥
योगाभ्यासें मन । स्थिरवूनी हें करितां ध्यान ।
तत्काळ तुटोनी बंधन । मिळें स्थान अढळ जें ॥१०८॥

इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते
श्रीदत्तमाहात्म्ये त्रयोदशोsध्याय: ॥१३॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १४ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ।

अर्जुन नमन करूनी । म्हणे वाक्यर्थ ऐकूनी ।
आनंद झाला मनीं । आतां योग सांगावा ॥१॥
श्रीदत्त म्हणे रे अर्जुना । सावधान करी मना ।
अष्टांगयोगविचारणा । सांगतों मना स्थिरवी जी ॥२॥
यम नियम आसन । प्राणायम प्रत्याहार जाण ।
धारणा आणि ध्यान । समाधी जाण अष्टांगें हीं ॥३॥
यम नियम स्वाभाविक असती । म्हणोनी षडंग योग कोणी म्हणती ।
कोणी समाधी फळ मानिती । ते म्हणती सप्तांग योग ॥४॥
सविकल्प निर्विकल्प समाधी मानून । एक योगांग कल्पून ।
दुसरें फल मानून । अष्टांग योग म्हणती ते ॥५॥
प्राणिमात्राचें न करावें पीडन । हें अहिंसेचें लक्षण ।
बोलावें यथार्थ मृदु भाषण । हें सत्य जाण अर्जुना ॥६॥
तृणसुद्धां न चोरावें दुसर्‍याचें । हें लक्षण अस्तेयाचें ।
दु:ख जाणावें प्राण्यांचें । हें दयेचें लक्षण ॥७॥
न करावें मैथुन । हें ब्रह्मचर्यलक्षण ।
रहावें सरळपणा धरून । हें लक्षण आर्जवाचें ॥८॥
करावें दु:खादि सहन । क्षमेचें हें लक्षण ।
हानी होतांही निर्विकार होऊन । राहणें जाण धृती ती ॥९॥
दोन भाग भरून । जेवावें पथ्य अन्न ।
जलानें तिसरा भाग भरून । राहणें हा मिताहार ॥१०॥

करितां मलमूत्र विसर्जन । मृत्तिकाजळानें करावें शोधन ।
हें बाह्य शौच जाण । म्हणती ध्यान अंतर्शौच ॥११॥
हे होत दहा यम । आतां ऐका नियम ।
तेही दहा उत्तम । ऋषिस्तोम सांगतसे ॥१२॥अ
चांद्रायणादिकें देहशोषण । करणें तें तप जाण ।
दैवलाभास तोषोन । असणें तो संतोष ॥१३॥
वेदवाक्याचा विश्वास । आस्तिक्य म्हणती तयास ।
वेदांताचा जो अभ्यास । श्रवण खास म्हणती तें ॥१४॥
योग्यायोग्यसमर्पण । तया म्हणती दान ।
सर्व करावें विष्ण्वर्पंण । तेंचि पूजन निश्चित ॥१५॥
वेदोक्तकर्मीं जी प्रीती । तिला श्रद्धा म्हणती ।
कुकर्मीं लाजणें ती । र्‍ही म्हणती योग्यज्ञ ॥१६॥
जो एकादश्यादि उपवास । व्रत म्हणती तयास ।
गुरूपदिष्टमंत्राभ्यास । जप तयास म्हणिजे ॥१७॥
वाचिक जप अधम । उपांशु मध्यम ।
मानसिक उत्तम । वदे आगम त्रिविध जप ॥१८॥
हे दहा नियम । पतंजलीनें पांच यम ।
सांगितले पांच नियम । हे उत्तम असावे ॥१९॥
गोमनुष्यां मारितां हिंसा । इतरां मारितां न हिंसा ।
हे जात्यवच्छिन्ना हिंसा । ही महाव्रत न होय ॥२०॥
तीर्थावरी वर्जावी हिंसा । ही देशावच्छिन्न हिंसा ।
श्राद्धसमयीं न करणें हिंसा । ती हिंसा कालावच्छिन्न ॥२१॥
प्राणिमात्रासी न मारणें । सर्व देशीं हिंसा न करणें ।
सर्व काळीं हिंसा न करणें । तें जाणणें महाव्रत ॥२२॥नं
असे सर्व यमनियम । संपादावे ते उत्तम ।
यांही घडे परम धर्म । कर्मसाफल्य होईल ॥२३॥

अहिंसा सिद्ध झाली जयासी । तत्सन्निध राहतां जीवांसी ।
वैरभाव न उमटे मानसीं । जातीवैर्‍यासी मित्रत्व ये ॥२४॥
म्हणूनीं ऋषींच्या आश्रमांत । उंदीर मांजरासी खेळत ।
गाई व्याघ्र एकत्र होत । अहिंसा फळ असें असे ॥२५॥
सत्यानें मिळे मंत्रफळ । ब्रह्मचर्यें मिळे वळ ।
अस्तेयें मिळे धन विपुळ । कळे पूर्वफळ अपरिग्रहें ॥२६॥
बाह्यशौचें ये स्वदेहाचा वीट । अंतर्शौचें ये इंद्रियजय स्पष्ट ।
मनस्थैर्ये सौमनस्य नीट । आत्मदर्शनयोग्यता ये ॥२७॥
उत्तम सौख्य मिळे संतोषानें । देहेंद्रियशुद्धि हो तपानें ।
देवसान्निध्य हो जपानें । मिळे भक्तीनें समाधी ॥२८॥
आतां ऐक आसन । मांड्यांमध्यें पाय ठेवून ।
बसावें सरळ होऊन । स्वस्तिकासन होय हें ॥२९॥
डाव्या उजव्या कमरेखालून । उजवी डावी खोंट टेंकून ।
दोंहांतीं पाय धरून । बसतां गोपुखासन जाणावें ॥३०॥
डाव्या उजव्या मांड्यांवरी । उजवे डावे पाय करी ।
पृष्ठत: डाव्या उजव्या करीं । दृढ धरी हें पद्मासन ॥३१॥त
उलट गुढगे गुदा लावून । ढोंपरावरी बोटें पसरून ।
मुख पसरूनी नासाग्र पाहून । बसतां सिंहासन होतसे ॥३२॥
अंडाखालीं डावा पाय । लिंगावरी उजवा पाय ।
ठेवी सरळ करी काय । ठेवी हृदयप्रदेशी हनु ॥३३॥
नासाग्र दृष्टी ठेवून । बैसता होय सिद्धासन ।
बंधत्रय साधून । समाधी लावून देईल हें ॥३४॥
हात टेकूनी भूमीवरी । नाभी ठेवावी कोंपरावरी ।
अंतराळीं दंडापरी । राहतां मयूरासन होय ॥३५॥
दोनी पाय हातीं जोडूनी । शिवणीला खोटा लावूनी ।
बसावें नासाग्रनयनीं । म्हणती मुनी भद्रासन हें ॥३६॥
शववत् पडणें होतां श्रम । शवासन त्याचें नाम ।
चिरकाळ बसतां न व्हावा श्रम । ही उत्तम आसनसिद्धि ॥३७॥
जेथें उपद्रव नसे । शब्दही ऐकूं न येतसे ।
एकांतीं पवित्रस्थळ असे । सुख होतसे ज्या ठायीं ॥३८॥
तेथें मठ कीजे सुंदर । असावें लहान द्वार ।
आंत नसावें छिद्र । सारवूनी पवित्र करावें ॥३९॥

चार हातपर्यंत । पाषाण अग्नी जळवर्जित ।
करूनी बसावें निश्चिंत । गुरुआदिकां वंदूनी ॥४०॥दे
खालीं दर्भ वरी कृष्णाजिन । त्यावरी मृदुवस्त्र घालून ।
त्यावरी करावें उपवेशन । आसनविधी करूनी ॥४१॥
शरीर गळा मान । यांना सरळ करून ।
इकडे तिकडे न पाहून । नासाग्रदर्शन बसावें ॥४२॥
सर्व चिंता सोडूनी । मनीं धैर्य धरूनी ।
दृढानिश्चय करूनी । प्राणायामा करावें ॥४३॥
जंव चाले प्राण । तंव चपळ होय मन ।
चपळ होतां मन । चाले प्राण निश्चयें ॥४४॥
म्हणोनियां दोहोंतून । घ्यावें एकाला जिंकून ।
दोहोंचाही जय होऊन । समाधिसाधन होतसे ॥४५॥
प्राणायामीं दृढाभ्यास । करावा ठेवूनी विश्वास ।
असें जिंकावें प्राणास । मग श्वासोच्छ्वास बंद होती ॥४६॥
होतां प्राणांचा जय । मनाचाही होई जय ।
दोहोंचाही एकत्र विलय । असें निश्चयें जाणावें ॥४७॥
नवद्वारें रोधितां । प्राणजय ये हातां ।
परी न जिंकवें चित्ता । दृढ विरक्तता नसतां ॥४८॥
मन असे चपळ । इंद्रियां क्षोभवी तत्काळ ।
तें दृढ असूनी सबळ । श्रम केवळ तज्जयीं ॥४९॥
म्हणूनी प्राणायामादि करून । जिंकावें चपळही मन ।
कित्येक देवाचें ध्यान करून । सुखें मन वश करिती ॥५०॥व
डाव्या नासापुटांत । इडा येऊन संपत ।
तिचें चंद्र दैवत । शुभकार्य साधून दे ती ॥५१॥
उजव्या नासापुटांत । पिंगला येऊन संपत ।
तियेचें सूर्य दैवत । उग्रकार्य साधून दे ती ॥५२॥
दोंमध्यें सुषुम्ना असे । ती ब्रह्मरंध्रीं संपतसे ।
तिचे मुळीं कुंडली वसे । साडेतीन वेंटाळ्या देऊनी ॥५३॥
मुखानें सुषुम्ना मुख धरी । म्हणूनी तिच्या अंतरीं ।
प्राण प्रवेश न करी । यास्तव तिला चाळवावी ॥५४॥
ती चळे करितां अभ्यास । तो न करावा दिवसास ।
रात्रींही अभ्यास । शास्त्रें वर्ज्य असे ॥५५॥

हें तों असे कूट । याचा अर्थ ऐक स्पष्ट ।
चंद्र चालतां रात्र स्फुट । सूर्य चालतां दिवस हो ॥५६॥
डावा अपान उजवा प्राण । यांसीं करावें समान ।
तीच सुषुम्ना जाण । रात्रदिन भोक्त्री ॥५७॥
सोळा मात्रांनीं पूरक । चौसष्टांनीं कुंभक ।
बत्तीसांनीं रेचक । हा प्राणायाम उत्तम ॥५८॥
इडेनें पूरक करावा । कंठीं जालंधर बांधावा ।
जोरानें कुंभक रोधावा । रेचक करावा पिंगलेनें ॥५९॥
बांधोनियां उड्डियान । करावें हळु हळु रेचन ।
पुन: पिंगलेनें घेऊन । पूर्ववत् करोन सोडावा ॥६०॥
जिणें प्राण प्यावा । तिणें तो न सोडावा ।
असा अभ्यास करावा । पुन: पुन: त्रिकाळ ॥६१॥वा
किंवा श्वास बाहेर सोडावा । हा पूरक जाणावा ।
तसाचि तो थांबवावा । तो जाणावा कुंभक ॥६२॥
मग आंत हळू घ्यावा । हा रेचक जाणावा ।
असा अभ्यास करावा । केवळ कुंभकपर्यंत ॥६३॥
जसी मात्रावृद्धी होय । हो तसा प्राणजय ।
चिताचें होय स्थैर्य । नाडीद्वार शुद्ध होतां ॥६४॥
कफ वात आणि पित्त । हे दोष होतां शांत ।
हो योगी रोगरहित । अग्नी प्रदीप्त होय त्याचा ॥६५॥
कनिष्ठ प्राणायाम होतां । घर्म सुटे विशेषता ।
मध्यम प्राणायाम होतां । सुटे कंप सर्वांगीं ॥६६॥
उत्तम प्राणायामें जाण । ब्रह्मरंध्रीं जाई प्राण ।
श्वासोच्छ्वास बंद होऊन । निश्चळत्व ये सर्वथा ॥६७॥
जंव इंद्रियशुद्धे न झाली । कुंडली ती न हालली ।
सुषुम्णेमध्ये न झाली । प्राणाची गती जंववरी ॥६८॥
तंववरी वृथा प्रयास । केवळ पाविजे त्रास ।
मध्यमार्ग मिळतां प्राणास । आयास सफळ जाणावें ॥६९॥
मेदश्लेष्मा अधिक असतां । षट्क्रिया अभ्यसाव्या तत्वतां ।
किंवा विशेष प्राणायाम करितां । नाडीशुद्धता होतसे ॥७०॥

जे जपध्यानरहित । ते निर्बीज प्राणायाम होत ।
जे जपध्यान सहित । ते होत सबीज प्राणायाम ॥७१॥
हा सबीज प्राणायाम । योगी मानिती उत्तम ।
शीघ्र मिळे ब्रम्हरंध्रधाम । सबीज प्राणायाम करितां ॥७२॥
पांच पांच रोज चढवीत । चढवावे ऐशींपर्यंत ।
एवं त्रिकाळीं सतत । तीन मास अभ्यास करावा ॥७३॥
मग सुषुम्णापंथा । शुद्ध होय सर्वथा ।
मग कुंडली चाळवितां । प्राण वरती जातसे ॥७४॥
होतां कुंडलीचें चालन । षट्चक्रें जाती भेदून ।
ब्रम्हविष्णुशिवग्रंथी तुटून । सरळ मार्ग होतसे ॥७५॥ई।
नाभिदेशीं अग्नी जाण । तेथें तर्जनी टेंकून ।
अग्नीचेम करावें आकुंचन । दररोज तीन वेळां ॥७६॥
हातीं पाय धरून । करावें कंदाचें ताडण ।
आठ वेळ भस्त्रिका करून । निर्विकल्प मन करावें ॥७७॥
लय विक्षेप सोडून । रूपीं मन जोडून ।
राहतां वर चढे प्राण । मनाचें उन्मन होय मग ॥७८॥
दोन पळें पांच विपळें जाण । ब्रह्मांडी ठरतां प्राण ।
प्राणायाम तो मुख्य जाण । पापशमन करी तो ॥७९॥
बारापट प्राणायामकाळ । प्रत्याहार तितुका वेळ ।
बारापट उत्तरोत्तर काळ । धारणादिकांचा वेळ होय ॥८०॥
ब्रह्मरंध्रीं बारा दिन । राह्तां निश्चळ प्राण ।
निर्विकल्प समाधी जाण । यत्नें साधोन घ्यावा हा ॥८१॥
अथवा प्राण जिंकून । इंद्रियें विषयांपासून ।
मनानें घ्यावीं फिरवून । हा जाण प्रत्याहार ॥८२॥
सोडूनियां आळस । पुन: पुन: हा अभ्यास ।
करितां प्रत्याहार होई खास । मग त्रास न होय ॥८३॥
कूर्म जसा आपुलीं अंगें । आयास न होतां वेगें ।
आंत बाहेर आपुलीं अंगें । वागवी वश करूनी ॥८४॥
योगियानें तयापरी । इंद्रियें धरावीं अंतरीं ।
जरी कां जाती बाहेरी । पुन: अंतरीं ठेवावीं ॥८५॥
जया इंद्रियें वश झालीं । त्याची प्रज्ञा स्थिरावली ।
विषयेच्छा दूरावली । सिद्धी आली त्याचे करीं ॥८६॥
असा हा प्रत्याहार । जो करी तो योगीश्वर ।
विषय असतांही समोर । होती दूर तयातें ॥८७॥
जरी जिंकिलें मन । एकही इंद्रिय सुटोन ।
जाई बाहेर पळोन । तेंची मन:क्षोभ करी ॥८८॥
म्हणूनियां सादर । करावा हा प्रत्याहार ।
मग मनाचा जय सुखकर । न लागे उशीर थोडाही ॥८९॥
मग करावी धारणा । स्थिर करी अंत:करणा ।
सगुनागुणलक्षणा । द्विविध धारणा म्हणती ती ॥९०॥

आत्मरूपी अभ्यसानें । मन ठेवावें धारणेनें ।
जरी न ठरे विक्षेपानें । यत्नानें तें फिरवावें ॥९१॥
जरी न ठरे निर्गुणीं । तरी ठरवावें सगुणीं ।
पुन: पुन: यत्न करूनी । लक्ष्यावरी स्थिरवावें ॥९२॥
अर्जुना मी निर्गुण । असूनी हें सगुण ।
रूप धरिलें सुलक्षण । भक्तत्राण करावया ॥९३॥
तें हें माझें गोचर । रूप असे सुंदर ।
एक एक अवयव मनोहर । पाहतां नेत्र तृप्त होती ॥९४॥
या रूपींच पुन: पुन: । करावी स्थिर धारणा ।
येथें निश्चळ करितां मना । निर्गुणीं धारणा सहज होय ॥९५॥
मन पळतां वरचेवरी । अंतरीं खेद न करी ।
अभ्यसानें पुन: धरी । जोंवरी स्थिर होय ॥९६॥
धारणा न साधे ज्यास । ते श्रम केवळ त्यास ।
मग सोडूनी आळस । धारणाभ्यास करावा ॥९७॥
पूर्वीं ध्यान मग धारणा । ही होय दुर्विचारणा ।
म्हणती उपसमाधी ध्याना । ध्यानविस्मृती समाधी ॥९८॥
अशी धारणा साधून । मग करावें ध्यान ।
तेंही एक सगुण । एक निर्गुण पूर्ववत् ॥९९॥
तैलधारा अखंड जशी । ध्यानीं चित्तवृत्ती धरावी तसी ।
विच्छेद न यावा तियेसी । महाप्रयासीं सर्वथा ॥१००॥
ध्याता ध्यान आणि ध्येय । ही त्रिपुटी जोंवरी होय ।
ध्यानाचें हें लक्षण होय । योगीवर्य बोलताती ॥१०१॥
जेव्हां अभ्यासें ठरे । मी ध्याता हें विसरे ।
ध्यानालाही न स्मरे । ध्येयाकारें राही मन ॥१०२॥
जेथें वायू मुळीं नसे । तेथें दिवा जसा असे ।
तसें मन जेव्हां वसे । समाधी होतसे तेधवां ॥१०३॥
उडे सर्वथा देहभान । नसे बाह्याभ्यंतरज्ञान ।
तीनी अवस्था जाऊन । उन्मनी होय तेधवां ॥१०४॥
तुटे सर्वाभिमान । कैचें द्वैतानुसंधान ।
सर्वथा लपे अज्ञान । तुर्यावस्थान होतांची ॥१०५॥
आपण आपणा पाहून । जेथें जाई विरोन ।
आत्यंतिक सुख पूर्ण । बुद्धीयोगें योगी घेई ॥१०६॥
समाधी दैवा मारी । धर्मामृतवृष्टी करी ।
धर्ममेघ हें नाम चतुरीं । योजिलें असे यथार्थ ॥१०७॥
अर्जुना असा हा योग । वारी सर्व उद्वेग ।
करी दु:खाचा वियोग । जीवब्रह्मयोग करी ॥१०८॥

इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीविरचिते श्रीदत्तमाहात्म्ये
चतुर्दशोsध्याय: ॥१४॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १५ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगणेशाय नम: ॥

ऐकूनियां योगाभ्यास आनंद अर्जुनास ।
पुन: वंदूनियां गुरूंस । साशंकमानस प्रश्न करी ॥१॥
म्हणे गुरुजी कृपा करून । केलें योगाभ्यासनिरूपण ।
हृष्ट झालें अंत:करण । परी एक पुसेन तुम्हांला ॥२॥
योगें होतां साक्षात्कार । कासया वाक्यविचार ।
हा संशय करा दूर । ठेविला निर्धार तुम्हांवरी ॥३॥
ऐकूनी अर्जुनाचें वचन । हर्षें बोले अत्रिनंदन ।
केवळ योगानें नोहे निर्वाण । नसतां ज्ञान योगियां ॥४॥
प्राणायामें करून । स्थिर होतां आपुलें मन ।
जें ऐकिलें वाक्यज्ञान । त्याचें मनन करावें ॥५॥
त्या अर्था अनुसरून । परमात्म्याचें चिंतन ।
अखंड मनोवृत्ती करून । करणें मनन तेंचि होय ॥६॥
सविकल्प समाधी जाण । तेंचि निदिध्यासन ध्यान ।
विजातीयप्रत्यय टाकोन । सजातीयप्रवाहीकरण जें ॥७॥


जें नामरूप प्रत्यय । तें सर्व विजातीय ।
नित्य शुद्धबुद्धादि प्रत्यय । ते सजातीय जाणावे ॥८॥
निषेध्य आणि विधेय । आत्म्याचें दोन प्रकारचें ध्येय ।
गुण असती श्रुतिगेय । हे अभय देती ध्यानानें ॥९॥
अशब्द अस्पर्श अद्वय । अरूप अरस अव्यय ।
अगंध अनादि नित्य । अनंत अभय अभेद ॥१०॥
अगोत्र अवर्ण अदृश्य । अचक्षु:श्रोत्र अग्राह्य ।
अपाणिपाद अवेद्य । हे निषेध्य गुण होत ॥११॥
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । सत्य ज्ञान अनंत ।
परब्रह्म आत्मा अच्युत । असंग सदोदित परावर ॥१२॥
गुण हे विधेय । एवं हें गुणद्वय ध्येय ।
हाचि सजातीय प्रत्यय । हे प्रवाहवत् चिंतावे ॥१३॥
जो वाक्यार्थ निर्णीत । षड्लिंगांनीं अवधारित ।
लक्षणावृतीनें लक्षित । तोचि मननांत स्थिर होई ॥१४॥
तो मी आत्मा परब्रह्म । अखंडैकरसधाम ।
परावर शिवपरम । पुरुषोत्तम मीच असें ॥१५॥अ
असें होतां मनन । ध्यातृध्यानभाव हरून ।
अंतीं ध्येयाकार होवून । राहे मन निश्चळ ॥१६॥
निर्विकर्ल्पसमाधी हा । हा निवारी अज्ञानांधमोहा ।
उपशमवी प्रारब्धा हा । वासनावना हा जाळी ॥१७॥
चैतन्य जें व्यापक । तें स्वयंप्रकाशक ।
तेंचि प्रगटे सम्यक । सच्चित्सुखमय तेव्हां ॥१८॥
असा होतां साक्षात्कार । योगी न जाणे बाह्यभ्यंतरा ।
स्वयें चिन्मय निरंतर । निश्चळ अजस्त्र सुखरूपी ॥१९॥

ब्रह्माकार मनोवृती । अज्ञाना निवारूनी ती ।
निष्कल ब्रह्मातें अंतीं । विषयीं विस्पष्ट करी ती ॥२०॥
कार्यासहित अज्ञान । इणें जाई नष्ट होऊन ।
सच्चिदानंदलक्षण । ब्रह्म निरंजन एक उरे ॥२१॥
तूं म्हणसी ही वृत्ती असतां । मग कसी अद्वैतता ।
वृत्तीही हें कार्य होतां । मुरून जाई स्वरूपीं ॥२२॥
निवळीच्या बियेचा कल्प । गढूळ जळांत टाकतां सकळिक ।
गाळ नासूनी स्वयें देख । होई त्यापरी हें ॥२३॥
घट फुटतां घटाकाश । जेंवीं होई महाकाश ।
तेंवी होतां अविद्यानाश । उपाधिनाश होतसे ॥२४॥
उपाधी म्हणती अविद्येस । तीमुळें जीवा क्लेश ।
ती नष्ट होतां स्वयंप्रकाश । होई जीव परब्रह्म ॥२५॥
तूं म्हणशील जें अज्ञान । आणि बाहेर जें असत ।
तें इंद्रियां मना होई विदित । प्रत्यग्ब्रह्म हें तसें नोहे ॥२६॥
इंद्रियांत:करणाच्या गती । ब्रम्हस्वरूपीं न होती ।
ते असे स्वयंज्योती । कोण जाणती तयातें ॥२७॥
ब्रम्ह तेंची आत्मा होय । तो सर्वां अग्राह्य ।
तो द्रष्टा दृश्य न होय । सत्य होय सिद्धांत हा ॥२८॥
तरी ऐक वेदमत । आपुलें मुख आपणा न दिसत ।
त्यातें आरसा दाखवित । लोकीं मात असी असे ॥२९॥
तरी उपाधी आरसा । त्या जडा बोध होई कसा ।
तेव्हां स्वयें स्वरूपा जसा । पाहे तसा हाही न्याय ॥३०॥नं
आरसा असतां मळकट । मुखही दिसे मळकट ।
आरशाला असतां फूट । भासे मुखावरती ॥३१॥
स्वच्छ करितां आरशी । मुखीं स्वच्छता दिसे तसी ।
स्वच्छ करितां बुद्धीसी । स्वरूपासी स्वच्छ पाहे ॥३२॥
आरशावरी मळ आगंतुक । बुद्धीवरी रागद्वेषादिक ।
शास्त्राधारें हें करितां पृथक । होय सम्यक् स्वच्छबुद्धी ॥३३॥
जो बुद्धिप्रतिबिंबित । जो जीवनामें विख्यात ।
त्याला व्हावया बाह्य ज्ञात । करिती मदत इंद्रियें ॥३४॥
अंधकारीं घडा पाहणें । तरी दिवा नेत्र हे असणें ।
जरी दिवा पाहणें । एका नेत्रानें कार्य होई ॥३५॥
तेंवीं स्वात्मया पाहतां । बुद्धिवृत्ती पुरे तत्वता ।
इचें नांव वृत्तिव्याप्यता । फलव्याप्यता इतरत्र ॥३६॥
बुद्धिबिंबितस्वात्मदर्शन । आपणासच होई जाण ।
म्हणोनी श्रुतीचें हें वचन । इंद्रियें मन न पाहती ॥३७॥
दिव्या पाहतां दिवा नलगे । तसा स्वयंप्रकाश निजांगें ।
आत्मा तया पाहतां नलगे । साधन वावुगें कासया ॥३८॥

अज्ञान मात्र आड असे । तें बुद्धिवृत्तीनें नासतसे ।
तदर्थ श्रवणादिक असे । उपाय नसे दुसरा येथें ॥३९॥
जी ब्रह्माकार वृत्ती । तीही रूपीं मुरे अंतीं ।
तया निर्विकल्प समाधी म्हणती । परमगती हीच जाण ॥४०॥
जेथें अखंडैकब्रम्ह जाण । जेथें नसे दुजेपण ।
तेथें करितां आरोहण । न पुन: पतन कल्पांतीं ही ॥४१॥
निद्रेमाजी स्वरूपज्ञान । तेंच जागृत्स्वप्नीं जाण ।
होतसे वृत्तिज्ञान । अज्ञान त्यासी वैर न करी ॥४२॥
जेंवी उन्हानें न जळे तृण । सूर्यकांत आड येतां तत्क्षण ।
जळून जाईं सर्व तृण । वैरपण येतांची ॥४३॥
तेंवी सामान्य ज्ञान । वैर न करी अज्ञान ।
मी ब्रम्ह असें वृत्तिज्ञान । तें अज्ञानवन जाळी ॥४४॥
जो योग करूं जाई । तया सिद्धी आड येई ।
जो धैर्यें सिद्धी सोडून देई । तो घेई मोक्षसुख ॥४५॥त
अणिमादि आठ सिद्धी । यांकडे करितां बुद्धी ।
जरी होई ऐहिक समृद्धी । मोक्षसिद्धी दुरावे ॥४६॥
सिद्धिचें नश्वर फळ । मोक्ष असे निश्चळ ।
म्हणोनी ज्ञान विमळ । साधावें केवळ प्रयत्नानें ॥४७॥
झोंपेंत जातां चित । करावें तया जागृत ।
विषयीं होतां विक्षिप्त । करावें शांत पुन: पुन: ॥४८॥
असें अभ्यासानें चित्त । होतां निवांत दीपवत ।
वृत्ती शांत होती समस्त । होई कृतकृत्य योगी ॥४९॥
सर्व कर्में क्षीण होती । हृदयग्रंथी तुटती ।
संशयघट फुटती । हटती मागें शोकमोह ॥५०॥
ज्ञानें जळे संचित क्रियमाण । प्रारब्ध भोगी योगी आपण ।
मनीं न मानी तो शीण । स्वयें जीवनमुक्त होतां ॥५१॥
सर्प जसा अंगावरी । वेगळाली कात धरी ।
तिचे विषयीं अभिमान न करी । त्यापरी शरींरी मुक्त जाण ॥५२॥
अर्जुना अभ्यास जोंवरी । दृढ न झाला तोंवरी ।
वागावें अंधबधिरापरी । तरी अंतरीं योग ठसेल ॥५३॥
स्वयें समर्थ असूनी । विषयांजवळी वसूनी ।
निद्रितापरी वागे मुनी । त्याला जगीं मुग्ध म्हणती ॥५४॥
बसतां उठतां किंवा चालतां । ज्याची दृष्टी चार हातां ।
सोडून दूर न जाई तत्वतां । तो आंधळा जाणावा ॥५५॥

देहितकर किंवा अहितकर । मनोहर किंवा शोककर ।
वाक्य ऐकूनी न ऐके नर । योगी तो बधिर जाणावा ॥५६॥
हितकारक सत्य भाषण । बोले परिमित भाषण ।
जेवतां बरवें वाईट अन्न । नेणे तो जाण अजिव्ह ॥५७॥
मळमूत्रोत्सर्गार्थ जाणें । भिक्षार्थ ज्याचें फिरणें ।
यावांचुनी फिरूं नेणे । तोचि पंगू जाणावा ॥५८॥
कुमारी आणि वृद्ध नारी । किंवा तरुणी सुंदरी ।
ह्या समान पाहूनि अंतरीं । जो निर्विकारी तो नपुंसक ॥५९॥
यापरी वागूनी । योगचर्या धरूनी ।
जो अंतर्निष्ठ वागे मुनी । तो जनीं वनीं समान ॥६०॥
अर्जुना हा जाण योग । तुज म्यां कथिला सांग ।
जो श्रद्दधान विनीत असंग । तया सांग योग हा ॥६१॥
जो माझा भक्त होऊनी । सम लोष्टाश्मकांचनीं ।
हिंसा असल्यादि दे सोडुनी । तो आवडे मज योगी ॥६२॥
राजा तूंही माझा भक्त । माझे ठायीं तुझें चित्त ।
विषयीं अससी अनासक्त । मुक्तसंग सर्वथा ॥६३॥
तूं केलेस याग । शुद्ध केलेंस अंतरंग ।
म्हणोनी कथिला हा योग । करी सांग अभ्यास तयाचा ॥६४॥
तें ऐकूनी भगवद्वचन । सगद्गद होउनी अर्जुन ।
दोनी कर जोडून । करी स्तवन श्रीदत्ताचें ॥६५॥व
( अभंग ) तुज नमूं देवा ॥ ठेउनियां भावा ॥
केला हा बरवा ॥ उपदेश ॥६६॥
मोहतम गेले ॥ तापही निवाले ॥
त्वद्रूपीं निवालें ॥ माझें मन ॥६७॥
ज्ञानसूर्य मनीं । उदित होवूनी ॥
टाकिलें जाळूनी ॥ अंतस्तमा ॥६८॥
देवा तुझे पद । पाहुनी आनंद ॥
झाला गेला खेद ॥ भेद सर्व ॥६९॥
आज हें अपूर्व ॥ आलें मोठें पर्व ॥
पाहिलें पद सर्व ॥ प्रेमास्पद ॥७०॥
तूंचि मायबाप ॥ शमविले ताप ॥
घालविले पाप ॥ कोपद्वेषां ॥७१॥
केला उपशम । माझा सर्व भ्रम ॥
करिशी निष्काम ॥ धाम दिल्हें ॥७२॥
देवा परानंद ॥ सतत हें पद ॥
दिसो हाची छंद ॥ पूरवी तूं ॥७३॥
( ओवी ) तूंचि माता तूंचि पिता । तूंचि गुरु कुलदेवता ।
तूंचि स्वजन बंधु भ्राता । तुजपरता न दुजा मज ॥७४॥
तूं स्वयें देहेंद्रियातीत । सर्वेंद्रिया चालविसी सतत ।
तूं दाविली ही मात । गुहाश्रित होवुनी ॥७५॥

यापरता नाहीं स्वार्थ । दाविला जो हा परमार्थ ।
तेणें झालों कृतार्थ । आतां व्यर्थ कां भडकावें ॥७६॥
तूं भक्तिगम्य देव । तव पदीं घेतली धांव ।
पुरविला माझा भाव । आनंदा वाव नाहीं आतां ॥७७॥वा
त्वद्रूपीं हें जग भरलें । जेवीं पटीं तंतू ओंविलें ।
तें रूप आज ठावें झालें । धालें मन माझें हें ॥७८॥
या संसारवृक्षीं । जीव ईश हे दोन पक्षी ।
जीव हा कर्मफळें भक्षी । ईश्वर निरीक्षी साक्षित्वें ॥७९॥
यावत्फळाची रुची असे । तंव जीव घिरट्या घालितसे ।
तंव हें तुझें रूप असें । अंतरीं न ठसे तयाच्या ॥८०॥
जो तुझा भक्त केवळ । तो सोडी कर्मफळ ।
त्याच्या अंतरींचा झडे मळ । सबळ वैराग्य येउनी ॥८१॥
मग तो रिघे तुझे पाठीं । तूं करिसी त्यावरी दृष्टी ।
हें म्यां माझे दृष्टीं । पाहिलें आतां स्वानुभवें ॥८२॥
मन होतां निष्काम । तुझें गोड लागे नाम ।
तूंवि सत्य परंधाम । आत्माराम परमार्थ ॥८३॥
म्यां करायाचें केलें । मिळवायाचें मिळविलें ।
पाहायाचें पाहिलें । मन निमालें त्वच्चरणीं ॥८४॥
तूं अससी अगम्य । परी होसी गुरुगम्य ।
कोणाशीं करूं तुझें साम्य । अनौपम्यस्वभाव तूं ॥८५॥
असा अर्जुनें स्तविता दत्त । तत्काळ होवुनी प्रसन्नचित्त ।
म्हणे होवुनी अप्रमत्त । ऐकिला योग सर्वही ॥८६॥
ही येथें असे दरी । इचे आंत प्रवेश करी ।
स्थिर बसूनी आसनावरी । करी अभ्यास प्रयत्नें ॥८७॥
आसनीं सरळ बसूनी । स्वरूपीं दृष्टी लावूनी ।
अभ्यास करी एकाग्रमनीं । शमवूनी लय विक्षेपा ॥८८॥
जो म्यां उपदेशिला योग । त्याचा अभ्यास करी सांग ।
जें अनुभविसील तें सांग । योगवियोग झाल्यावरी ॥८९॥
जा तूं न भी अंतरीं । गुहेमध्यें प्रवेश करी ।
असें म्हणोनियां भवारी । त्याचे शिरीं ठेवी कर ॥९०॥

राजा रोमांचित होऊनी । श्रीगुरूसी वंदूनी ।
आज्ञा शिरसा मानूनी । बैसे जाऊनी गुहेंत ॥९१॥
घालूनियां दृढासन । अभ्यासानें प्राणापान ।
करूनियां समान । श्वास जिंकून स्थिरावला ॥९२॥
षट् चक्रें भेदिता । कुंडलिनी सरळ होतां ।
सुषुम्णेचें द्वार खुलतां । समाहितता पावला ॥९३॥
समाधी लागली तीन दिवस । पुन: लावी सोडूनी आळस ।
पुन: तो बारा दिवस । समाहित होऊनी उठला ॥९४॥ई।
पुन: करितां अभ्यास । समाधी स्थिरावे तीन मास ।
ती खुलतां तयास । वाटे गुरूस भेटावें ॥९५॥
येऊनी वंदी श्रीदत्तातें । आलिंगूनी तयातें ।
वदे दत्त काय तूतें । कळलें तें मातें सांगावें ॥९६॥
त्वां इतुके दिवस । गुहेमध्यें केला वास ।
काय आलें अनुभवास । तें खास सांग आतां ॥९७॥
अर्जुन म्हणे अभिनव । काय सांगूं अनुभव ।
जेथें त्रिपुटीला नाहीं वाव । तो अनुभव कसा वदूं ॥९८॥
जरी तेथें नव्हत्या वृत्ती । तरी होतां आतां अनुवृत्ती ।
तर्क येतसे चित्तीं । स्थिर होती मती जेथें ॥९९॥
जाग्रत्स्वप्नसुषुप्ती । तीनी जेथें नसती ।
इंद्रियांच्या चेष्टा न होती । उन्मनी स्थिती मना ये ॥१००॥
जें पूर्वीं होतें उद्विग्न । तें मन स्वरूपीं संलग्न ।
होतां परमानंद निमग्न । झालें भग्न संकल्प तें ॥१०१॥
तो आनंद न बोलवे । गुरुजी काय सांगावें ।
बोलतसें जीवें भावें । न वर्णवे आनंद तो ॥१०२॥
तेंची तुमचें रूप । सत्यज्ञानानंदरूप ।
तें अनुभवितां न पाप ताप । तें हें स्वरूप बाहेरही ॥१०३॥
हें सुख टाकून । अन्यत्र न जाई माझें मन ।
आतां नको राज्यधन । समाधान पावलों ॥१०४॥
दु:ख न होईल राज्य टाकितां । सुख न होईल राज्य करितां ।
झाली मनाची दृढता । खास आतां भवद्रूपीं ॥१०५॥
जो सर्वत्र व्यापून । परमात्मा असे परिपूर्ण ।
तेंचि तुमचें रूप निर्गुण । सगुणही तेंच झालें ॥१०६॥
ज्ञानपात्र करुनी । मला हातीं धरुनीं ।
कृपामृतानें भरुनी । अमर करुनी ठेविला ॥१०७॥
असें म्हणोनी लोटांगण । घालूनियां तो अर्जुन ।
भावें चरण वंदून । लीन होवून राहिला ॥१०८॥

इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीविरचित श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये पंच्यदशोध्याय ॥१५॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading