संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर
भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ६ वा
श्रीमत्परमहंस
वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे शिष्याप्रती । त्वां ऐकावें एकचित्तीं ।
पुत्र सांगे पित्याप्रती । तेची उक्ती सांगतों ॥१॥
सह्याद्रीवरी अर्जुन । जातां देखे पदचिन्ह ।
वज्रांकुश ध्वज नलिन । शोभायमान उमटलें ॥२॥
पाहतां सचिन्ह पाउलें । अर्जुनाचें मन दाटलें ।
अंगीं रोमांच उठले । नेत्रीं सुटले प्रेमाश्रु ॥३॥
मन झालें निश्चळ । इंद्रियें न करिती खेळ ।
बुद्धी झाली विमळ । राहिली केवळ चेष्टाहीन ॥४॥
अंतर्बाह्य नेणें कांहीं । मीतूंपण ठावें नाहीं ।
पददर्शनाची गती ही । योग्यां नाहीं ठावी जी ॥५॥
दैवयोगें ये देहावर । करीं तया नमस्कार ।
तेथें लोळे सादर । टाकी अंगावर ती माती ॥६॥
म्हणे अहो धन्य हे मही । जें पद अलभ्य देवांलाही ।
तें अश्रांत सेवी ही । ऐसी नाहीं दुजी धन्या ॥७॥
रोमांचसे तृणांकुर । उभारून पाठीवर ।
सुचवी हर्ष निर्भर । कृपापात्र हे भूमी ॥८॥
तंव देखिले वृक्ष फलित । शाखाग्रें नम्र होत ।
म्हणे अर्जुन हे निश्चित । केवळ भागवत वाटती ॥९॥
पूर्वीं केला अपराध । ताठा धरोनी मदांध ।
म्हणोनी हा तमोंध । वृक्षजन्म दधिला ॥१०॥
असें मनीं आणून । फळें पुढें करून ।
शाखामस्तकें नमून । करिती वंदन भक्तीनें ॥११॥
हा पर्वत मनोरम । वाटे हा भागवतोत्तम ।
नित्य सेवी हा सत्तम । पुरुषोत्तमचरणरजा ॥१२॥
नित्य कंदमूल फळ । भगवंता दे स्वादुजळ ।
हा भाविक प्रेमळ । भक्त केवळ वाटे हा ॥१३॥
असें म अनीं चिंतून । चाले पुढें अर्जुन ।
चकोर चांदणें पाहून । आनंदघन होय जेवी ॥१४॥
तेवी आश्रम पाहोनी । वेदध्वनी ऐकूनी ।
पुढें अर्जुन येऊन । पाहे नयनीं भगवंता ॥१५॥
कोटी कंदर्प गाळूनी । मूर्ती ओतिली वाटे मनीं ।
मंद हास्य दिसे वदनीं । पाहतां मनीं हर्ष होय ॥१६॥
आजानुबाहु सुरेख । पहातां डोळां होय सुख ।
दृष्टी चिकटे सविवेक । सेवी चोख रूपामृत ॥१७॥
प्रफुल्ल कमलवदन । वाटे घ्यावें चुंबन ।
शरीर परम शोभन । वाटे आलिंगन दृढ घ्यावें ॥१८॥
दिसे दिगंबर मूर्ती । परम गोजिरी आकृती ।
तेथोनि न फिरे मागें वृत्ती । जेवी गती योगियाची ॥१९॥
मायेची करोनियां नारी । प्रेमें तिशीं क्रीडा करी ।
तें देखोनी पळती दुरी । अविचारी मुनी जे ॥२०॥
गर्गवचन स्मरून । हा खेळ जाणून ।
केवळ प्रेमळ अर्जुन । भाव धरोनी राहिला ॥२१॥
दत्त म्हणे जा निघोन । नातरी करीन ताडन ।
येरू तथास्तु म्हणून । श्रीचरण चुरूं लागे ॥२२॥
अंकीं ठेवून चरण । भावें करी संवाहन ।
जरी दत्त करी निर्भर्त्सन । तिकडे मन न देई ॥२३॥
जसी कां सती नारी । कोपें पती मारी तरी ।
सेवेसी न अंतरीं । न अंतरीं धरी तें ॥२४॥
प्रभूचे पाय चुरतां । नखमाणिकें चमकतां ।
हार्दतम जाय अस्ता । स्वरूपीं लीनता सहज हो ॥२५॥
सहज होतां सेवन । समूळ नासे अज्ञान ।
ज्ञानें भगवत्प्रेमबंधन । हो तें तोडून कोण टाकी ॥२६॥
ट अकी पदीं लोटूनि दत्त । तरी शिष्य न सोडित ।
जेवी लोहचुंबका धरित । तसा संसक्त होई राजा ॥२७॥
करी पादसंवाहन । मद्य मांस दे आणून ।
दे सुगंधस्रक् चंदन । फळें आणून देतसे ॥२८॥
निद्रा आळस सोडून । चरणीं मन लावून ।
न सांगतां अक्री सेवन । उच्छिष्ट पानप्रसाद घे ॥२९॥
त्याचें जाणाया अंतर । कौतुक करी ईश्वर ।
बाहु पाडी धरेवर । ईक्षणमात्रेंकरून ॥३०॥
हांसोनि बोले आपण । भूपा अरिष्ट हें दारुण ।
पळत जा येथून । येईल मरण वाटतें ॥३१॥
अशुद्ध संगाचें हें फळ । मी असें अमंगळ ।
कर्म बहिष्कृत केवळ । भक्ष्याभक्ष्यवर्जित ॥३२॥
मी उन्मत्त नग्म । नग्न स्त्रिये घेऊन ।
क्रीडा तिसीं करून । राहें अनुदिनीं भूपाला ॥३३॥
माझा संसर्गदोष । तुज लागला विशेष ।
तोचि करील प्राणशोष । नि:शेष तुला झळकोन ॥३४॥
ऐसें ऐकोनि वचन । गर्गोपदेश स्मरून ।
बोले नमस्कार करून । तो अर्जुन दत्तातें ॥३५॥
देवा व्यर्थ कां मोहविशी । समजलों मी मानसीं ।
लोकानुसारें वदसी । लीला दाविसी तसाच ॥३६॥
तूं सर्वात्मा पुरुष । घेशी मायेनें हा वेश ।
असोनियां निर्विशेष । सविशेष भाससी ॥३७॥
तूं अनघ निश्चळ । अनघा ही शक्ती केवळ ।
आपुल्यावरी घेसी आळ । जगज्जाळ आधाराची ॥३८॥
हें जग उपजेल जरी । जगीं असशील तूं तरी ।
हें तो मृगजळापरी । हें विकारी दृष्ट नष्ट ॥३९॥
तूं आणि विश्व चराचर । जो उभयांचें नेणे अंतर ।
तो भेददर्शी पामर । तो शास्त्रें बद्ध होतो ॥४०॥
नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध ।
एवं यथार्थ जाणें जो बुद्ध । तो हो अशुद्ध त्वत्सम ॥४१॥
अज्ञां दिसे हा भेद । त्यां बांधी धर्मे वेद ।
त्यांचे शिरीं विधिनिषेध । तूं तो निर्बाध सर्वथा ॥४२॥
देह जावो अथवा राहो । त्वद्रूपीं मन निश्चळ होवो ।
विपरीत भावना न राहो । हा निश्चय भगवंता ॥४३॥
ऐकूनी अर्जुनाचें वचन । श्रीदत्त प्रसन्न होऊन ।
धन्य रे तूं भूपनंदन । देतों वरदान माग आतां ॥४४॥
तूं भक्तीतत्व जाणसी । ह्मणोनि मज न सोडिसी ।
जिवलग तूं आवडसी । भक्त होसी निश्चळ ॥४५॥
जे माझे अनन्य भक्त । त्यांपाशीं राहें मी सतत ।
जे असती अभक्त । दु:खयुक्त ते होती ॥४६॥
तूं न धरितां देहस्वार्थ । सोडोनियां भोग्यार्थ ।
मत्सेवा केली यथार्थ । केलें सार्थक जन्माचें ॥४७॥
ऐसें बोलतां दत्त । राजा झाला पुलकांकित ।
निरिच्छ असून निश्चिंत । प्रारब्धप्रेरित वदे तो ॥४८॥
देवा जरी प्रसन्न होसी । देईं सर्व समृद्धीसी ।
यावें मला एकुलत्यासी । प्रजापालनसामर्थ्य ॥४९॥
अविरोधें धर्मार्थकाम । असावें यश नि:सीम ।
म्या व्हावें बलधाम । देवो मन्नाम नष्टलाभ ॥५०॥
धर्में प्रजापालन । व्हावें परचित्तज्ञान ।
स्मरती त्याला घडावें दर्शन । सर्वसिद्ध्यागमन असावें ॥५१॥
सहस्त्र बाहू असावें इच्छितां । जय मिळावा सर्वथा ।
इच्छित स्थानीं जाण्याकरितां । अकुंठित गती असावी ॥५२॥
सदा सर्वज्ञता असावी । स्वर्गीं पाताळीं गती व्हावी ।
कुमार्गीं प्रवृत्ती न व्हावी । सदा असावी सत्संगती ॥५३॥
अतिथी पूज्य यावें घरीं । अक्षय द्रव्य असावें भांडारीं ।
अरी नर रहावा भूमीवरी । व्हावें महीवरी साम्राज्य ॥५४॥
आयुष्य पूर्ण असावें । धारातीर्थीं मरावें ।
भवत्तुल्यानें मारावें । तुमचें असावे नित्य स्मरण ॥५५॥
भक्ती असावी भवच्चरणीं । सदोदित अव्यभिचारिणी ।
हेचि आवडी माझे मनीं । असें म्हणोनी नमस्कारी ॥५६॥
प्रभु ह्मणे हे दिले वर । तूं होसी सप्तद्वीपेश्वर ।
ऐसें बोलतां योगेश्वर । फुटले सुंदर दोन भुज ॥५७॥
मग प्रेमें दाटून । दृढ घेई देवाचें आलिंगन ।
आलिंगितां द्वैतभान । जाऊनी निश्चळ राहिला ॥५८॥
ओळखोनी अंत:स्थिती । वरदान आणूनी चित्तीं ।
त्यावरी माया सोडिती । पुन: उठविती तयातें ॥५९॥
श्रीदत्त म्हणे तयासी । त्वां जावोनि माहिष्मतीसी ।
राज्याभिषेक आपणासी । करवी विधिसी मदाज्ञेनें ॥६०॥
तथास्तु म्हणोन अर्जुन । भावें गमन करून ।
म्हणे शिरसा मान्य वचन । विस्मरण न व्हावें तुमचें ॥६१॥
माझें असावें स्मरण । आपले हे चरण ।
हेंचि माझें जीवन । येथें प्रमाण मन तुमचें ॥६२॥
जेवी बाळा सोडून । दुरावे जरी कुर्मीण ।
त्याचें करितां स्मरण । तया जीवन येतसे ॥६३॥
जीवन येतसे भक्तां । तुम्हीं मनीं आठवितां ।
जेवीं कुर्मिणीनें विसरतां । बाळें पंचता पावती ॥६४॥
कूर्मिणीला येवो भ्रमप्रमाद । तुम्ही ईश्वर स्वच्छंद ।
तुह्मां न ठावा भ्रमप्रमाद । साक्षी वेद देतसे ॥६५॥
तुमचे आज्ञेकरून । जीवावरी आवरण ।
घाली माया दारुण । ह्मणोनी भ्रमण पावती ॥६६॥
तीच माया तुम्हांपासीं । तिचें आवरण नये तुह्मांसी ।
लौकिक मायेसी । उपमेय जी ॥६७॥
स्वाधीन स्वाश्रय माया । अन्या ठेवी मोहुनियां ।
ती नावरी स्वाश्रया । लोकत्रया ठावें हें ॥६८॥
जैसा पाळला कुतरा । छु म्हणतां धरी परा ।
धन्यावरी नये त्याच्या घरा । सेवी त्यावरी न भोके ॥६९॥
जो होई तुझा भक्त । त्यापुढें माया हो अशक्त ।
मी तुझा भक्त व्यक्त । अव्यक्त माया काय करील ॥७०॥
माह्मां मायेचें नाहीं भय । आह्मां पुढें काळ काय ।
दैवरेषेवरी पाय । देवूं हे पाय आठवितां ॥७१॥
देवा योगक्षेमाची वार्ता । सोडूनि देवूं सर्वथा ।
जेथें तेथें तुझ्या कथा । गाऊं माथा नम्र करूनी ॥७२॥
असो आतां हें मागणें । सर्वथा आह्मां न विसरणें ।
आह्मां वांचवावें स्मरणें । हें गार्हाणें पुन: पुन: ॥७३॥
असें म्हणोनी अर्जुन । चाले मागें पाहून ।
जेवीं सासुर्या जातां सून । पुन:पुन: फिरोनि मागें पाहे ॥७४॥
स्मरण ठेवूनी अंतरीं । राजा आला रेवातीरीं ।
प्रवेशला माहिष्मतीपुरीं । येती सामोरी पौरमंत्री ॥७५॥
देव ऋषी आणि महर्षी । त्यांतें आणीलें संतोषीं ।
त्यांहीं मंत्रवद्यघोषीं । अभिषेक केला विधीनें ॥७६॥
स्वर्णपवित्रयुक्त स्रेखा । औदुंबराची ओली शाखा ।
तिणें अभिषेकिती तीर्थोदका । नाना शाखामंत्रेंसी ॥७७॥
त्यांसी अभिषिक्त अर्जुन । देई क्षेत्र – गो – स्वर्ण ।
दीनांघकृपणा धन । देई अन्न यथेच्छ ॥७८॥
वसुरुद्रादित्य देव । आले मरुद्गण विश्वेदेव ।
त्यांहीं अभिषेकिला राव । महोत्सव तेव्हां झाला ॥७९॥
महाराज अर्जुन । सर्वांचें करी पूजन ।
ते देती आशीर्वचन । सुखी आयुष्यमान् हो ह्मणुनी ॥८०॥
नाना राजे करभार । घेऊनि आले समोर ।
डांगोरा पिटे नृपवर । ते सर्व पौर ऐकतां ॥८१॥
माझ्या वांचोनी जो करीं । जरी कां शत्र धरी ।
किंवा जो हिंसा चौर्य करी । त्याला मारीन ठार मी ॥८२॥
ऐसें ऐकोनी वचन । शस्त्रें देती टाकून ।
भयें पाळिती वचन । लीन होवोन सर्वदा ॥८३॥
तोचि झाला क्षेत्रपाळ । ग्रामपाळ पशुपाळ ।
सेना धान्य धनपाळ । विप्रपाळ तोचि झाला ॥८४॥
अग्नि चोर रिपु व्याळ । यांहीं प्रजा होता व्याकुळ ।
नाना रूपें धरोनी संभाळ । करी भूपाळ विपद्धर्ता ॥८५॥
नष्ट लाभे नाम घेतां । दर्शन दे ध्यान करितां ।
सर्वां झाली अरोगता । वृष्टी पडे यथाकाळीं ॥८६॥
सुफळा झाली धरा । भूपें यज्ञें भूसुरामरां ।
तृप्त केलें न्यायें नरा । पाळी फिरे जो त्रिलोकीं ॥८७॥
माघ कृष्ण अष्टमीदिनीं । अनघाष्टमी व्रत करूनी ।
ब्राह्मणां भोजन दे दुसरे दिनीं । प्रतिवर्षीं नियमानें ॥८८॥
जो हें अष्टमीव्रत करील । तो नर सुखी होईल ।
सकलाभिष्ट लाभेल । हे बोल मानील जो ॥८९॥
यद्दिनीं मिळाला वर । तद्दिनीं उत्सव करी थोर ।
श्रीदत्तदर्शन वारंवार । करी प्रेमभर होवोनी ॥९०॥
जो परम दुर्धर्ष तेजस्वी । बळी सहस्त्रकर कीं रवी ।
विजयी सुकीर्ति मिरवी । नुरवी जो दु:खवार्ता ॥९१॥
ज्याला नसे विस्मरण । करे शरणागतरक्षण ।
सर्वैश्वर्य भोगून । गाथा वदवीं जगीं हे ॥९२॥
( श्लोक ) न नूनं कार्तवीर्यस्य । गतिं यास्यंति पार्थिवा: ।
यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभि: ॥९३॥
एके दिवशीं सहस्त्र नारी घेवोनियां रेवातीरीं ।
स्वच्छंदें अर्जुन क्रीडा करी । तंव देवारी रावण आला ॥९४॥
अर्जुन हा महाशूर । नारदवाक्यें जाणूनी निशाचर ।
आला करावया समर । तया देखती त्या नारी ॥९५॥
अर्जुनें नेत्रसंकेत करून । स्त्रियांकरवीं करविलें बंधन ।
बाळा खेळावया लागून । ठेविला नेऊन सदनांत ॥९६॥
पोर धरिती त्याच्या करा । भोवंडिती त्या निशाचरा ।
हें कळलें कुबेरा । प्रार्थुनी नृपवरा सोडविला ॥९७॥
असा बळी तो अर्जुन । नगरींही नित्य राहून ।
नानारूपीं सप्तद्वीप धुंडोन । राज्यपालन करी धर्में ॥९८॥
नसते कार्तवीर्याय । हा तयाचा मंत्र होय ।
येणें सर्वारिष्टक्षय । होय हा निश्चय जाणावा ॥९९॥
प्रणवबीज लावून । जपतां होय भवबंधमोचन ।
र्हींबीज लावून । जपतां सर्वैश्वर्य मिळेल ॥१००॥
ऐंबीज लावितां वाक्सिद्धी होई । सर्वविद्यापारंगत होई ।
लक्ष जपतां कार्यसिद्धी होई । मंत्रशक्तिप्रभावें ॥१०१॥
श्रींबीजें लक्ष्मी मिळे । द्रांबीजें अपमृत्यु टळे ।
रोगपीडा पळे । आरोग्य मिळे निश्चयें ॥१०२॥
वषट्बीजें वशीकरण । वौषट्बीजें होई आकर्षण ।
हुंबीजें होई विद्वेषण । फट्बीजें उच्चाटाण होतसे ॥१०३॥
ठ: ठ: बीजें होय स्तंभन । खें खेंबीजें होय मारण ।
नम:बीजें होय स्तंभन । होय पोषण स्वाहाबीजें ॥१०४॥
सौ:बीजें होय क्षोभन । क्लींबीजें वशीकरण ।
ग्रहभूतादि निवारण । हुंफट्बीजें होईल ॥१०५॥
अक्षिरोग मेह सन्निपात । श्लेष्मज्वर क्षय कुष्ठ ।
गुल्म पैत्तिक वात । देश कालोत्थ संगज ॥१०६॥
हे रोग समस्त । किंवा त्रिविध उत्पात ।
प्रणवबीजें होती शांत । परप्रयोगाचा अंत होईल ॥१०७॥
दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त । तें सहस्त्र जपें मिळे वित्त ।
घनदीप लावून एकांत । जपतां साधे प्रयोग ॥१०८॥
( श्लोक ) । कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥१०९॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृते षष्ठोध्याय: ॥६॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
संपा
संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर
भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ७ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
असा प्रतापें दुर्धर । चौर्यायशीसहस्रवर्षें शूर ।
राज्यकरी नृपवर । योगीश्वर प्रसादें ॥१॥
धर्मबळें जो सुमती । सप्तद्वीप वसुमती ।
पाळी एकला आपुले हातीं । नमूनी राहती मांडलिक जया ॥२॥
श्रीदत्ताचें करी दर्शन । नमस्कार करूं येई प्रतिदिन ।
अधीं कधींही राहून । धर्मचिंतन करीतसे ॥३॥
एवं चौर्यायशी सहस्त्र । वर्षें लोटतां नृपवर ।
एके दिनीं शय्येवर । होवोनी एकाग्र विचारी ॥४॥
म्यां काय केला पुरूषार्थ । हा श्रम केला व्यर्थ ।
राज्यानें काय होईल स्वार्थ । पुढें अनर्थ ओढवेल ॥५॥
जें जें दृश्य सकळ । तें तें नाशिवंत चपळ ।
जें केवळ निश्चळ निर्मळ । तें विपुळ न जाणिलें ॥६॥
रायें रंका वर देतां । कोंडा मागे रंक तत्वतां ।
तैसे म्यां केलें वर घेतां । दुर्दैवता पुढें ये कीं ॥७॥
श्रीदत्त प्रसन्न होऊण । संतोषें देतां वरदान ।
म्यां काय घेतलें हें मागोन । केवळ भुलोन मूढपणें ॥८॥
देवाचा काय अन्याय । म्यांच माझा केला अपाय ।
सर्व सोडून ज्याचे पाय । योगिवर्य इच्छिती ॥९॥
त्याचे धरूनी चरण । न चुकविलें जन्ममरण ।
राज्य अंधकूप गहन । डोळस असूनी त्यांत पडलों ॥१०॥
क्षणभंगुर विलास लक्ष्मीचा । काय भरवसा आयुष्याचा ।
काय उपयोग परिवाराचा । अंतकाळाची वेळ येतां ॥११॥
कोण कोणाचे पुत्र दार । कोण कोणाचे मित्र किंकर ।
कोठें राहील राज्य भांडार । हा परिवार लटिकाच ॥१२॥
जो निजकरें शत्रु बांधी । त्याला बांधूनी घेती स्कंधीं ।
जो प्रतापें जाळी सुधी । स्मशानामधीं टाकिती तया ॥१३॥
जया वंदिती भूपती । तया बांधूनीया स्वहस्तीं ।
मृगसा फिरविती युवती । कृमि वितू भस्म अंतीं ज्याचें ॥१४॥
त्या देहाचें उपलालन । कराया केलें दुराचरण ।
असें माझें मूढपण । ज्याणें शीण मनीं नये ॥१५॥
दयाळु परमेश्वर । तया असो नमस्कार ।
तेणेंच हा सुविचार । आजी सारभूत दिधला ॥१६॥
तो असे सकरुण । तया जावें शरण ।
त्याचे धरावे चरण । तयाविण कोण तारी ॥१७॥
असा विरक्त होवोन । सह्याद्रीवरी ये तो अर्जुन ।
तत्पूर्वींच भगवान् । बसे ध्याननिश्चळसा ॥१८॥
शिष्याचे परीक्षार्थ । गुरूला हें उचित ।
जेणें शिष्याचें दृढचित्त । होई हित देई जें ॥१९॥
कायावाचामनेंकरून । सर्वभावें करी भजन ।
तरी देव न सोडी ध्यान । त्याचें मन ओळखी जो ॥२०॥
उदकही न पितां । खिन्न होवोनी स्तवितां ।
वारंवार नमनही करितां । न दे श्रीदत्त आश्वासन ॥२१॥
मग होऊनी खिन्न । राजा करी स्तवन ।
सद्गद होऊन । दृष्टी लावून श्रीचरणीं ॥२२॥ ( पद )
जय करुणाकरा जगदुद्धारा । अजि कां रुससी परमोदारा ॥ध्रु०॥२३॥
तूं मायबापा धरितां कोपा । कोण माझ्या तापा शमवी बापा ॥२४॥
बालवाक्यापरी स्तव अवधारी । वारी मम चिंता तूंचि भवाअरी ॥२५॥
तुज शरणागत तेचि कृतार्थ । व्यर्थ कीं हें मत वद वेदसंमत ॥२६॥
जो मम भक्त मत्पदीं सक्त । दोषवियुक्त तो सुखी मुक्त ॥२७॥
नाश न होई मम भक्ताचा । न करी मिथ्या हे तव वाचा ॥२८॥ ( गीत – जोगी )
अजि सखया रुससि कांरे । भववैरे श्रीहरे ॥ध्रु०॥२९
तव भक्त त्वत्परायण । होवुनि म्यां प्राण हे ।
धरियेले रे दयाब्धे निष्टुरता बाण हे ।
नाराजी अजि होऊनी । सोडिसि कां कोण हे ॥
सोदि बरें बोल बारे काय चुकलों भवतरे ॥३०॥
वांचुं कसा जेवि मासा जळ नसतां तळमळे ।
मजविषयीं कां न तूंझें मन बापा कळवळे ।
धेनु जसी धांवें वत्सालागिं तसा कळकळें ।
आजि दयादुग्ध पाजी ना तरि रे मी मरें ॥३१॥
( भोला नाथ दिगंबर ) ( पद चाल – इसतन धन० ॥ )
मजवरि कां बरि दृष्टि नसे । जरी मी दोषि असे धृ० ॥३२॥
माझ्या दोषा नाहीं गणित । अगणित भूकणसे ॥३३॥
नाहीं दयाळू लोकीं तुजसम । मजसम दोषि नसे ॥३४॥
रोगीच नसतां मग कोण पुसता । असतां वैद्य जसे ॥३५॥
दयनीय नसतां दयाळू वार्ता । पुसतां कोण असे ॥३६॥
गुरु माय बाप तूं हरी ताप । कोप तव चित्तीं नसे ॥३७॥
( ओवी ) । यद्रूपीं जडजगभ्रांती । दिसे स्वप्नोपम असती ।
अलातचक्रसी तच्छांती । करिती यती ज्ञानबळें ॥३८॥
जगभ्द्रांती शमवून । जयाचे पदीं जावून ।
भक्त होती अत्यंत लीन । पुनरावर्तन नसे त्यांचें ॥३९॥
असें ज्याचें हें पद । जेथें निरतिशयानंद ।
तो तूं त्र्यधीश गोविंद । अससी स्वच्छंद निश्चयें ॥४०॥
देवा मी तुझा भक्त । बद्ध झालों निश्चित ।
जन्ममरणभयत्रस्त । शोकमोहग्रस्त असें ॥४१॥
दया कां नये तव मना । करी प्रसन्न वदना ।
न सोसवे भवयातना । हें तव मना न ठावें कीं ॥४२॥
आतां स्मरलें मज खास । प्रसूतीवेदना वंध्येस ।
न ठावी तेवी तव मनास । भवत्रास कसा कळेल ॥४३॥
सर्वज्ञ तूं नित्यमुक्त । जन्ममरणभयातीत ।
शोकमोहादिवर्जित । सदोदित पूर्णानंद ॥४४॥
जेवी गर्भश्रीमंत । दुष्काळ नेणे संतत ।
तेवि तूं शिव अनंत । भववेदना नेणसी ॥४५॥
नसो तुला भवानुभव । जें असे साक्षी वैभव ।
तेणें पाहें हा जीव । कसा भवव्यथित हें ॥४६॥
सूर्यनेत्रें विश्वा पाहसी । तो तूं नेत्र कसे झांकिसी ।
अजुनि मला कीं नेणसी । उपेक्षिसी कीं दयाब्धे ॥४७॥
वस्त्रीं भरलें जेवि सूत । तेवी जग हें त्वदुदरांत ।
तो तूं काय माझा अंत । घेसी अनंत असूनी ॥४८॥
तूं सच्चिदानंद नारायण । तूंचि भवभयहरण ।
म्यां धरिले चरण । शरणागत होऊनी ॥४९॥
कोण जाणे तुझा मनोगत । ब्रह्मादिक नेणती अंत ।
मी पामर अत्यंत । तव हृद्गत काय जाणें ॥५०॥
आतां होई प्रसन्न । करी अपराधक्षमापन ।
उघडोनिया नयन । प्रसादवचन बोल बापा ॥५१॥
विषयसुख कुत्सित । त्यासाठीं संसारबिळांत ।
घुसतां डसला अकस्मात । काळसर्प मूषका जेवी ॥५२॥
भवाटवींत पडलों । तापत्रयवणव्यानें पोळलों ।
दीन आर्त मुमूर्षु झालों । दयाघना आलों शरण तुज ॥५३॥
हा तुझा अवतार । दे भक्ती ज्ञान वैराग्य वरे ।
करी मुमूक्षूंचा उद्धार । हा निर्धार मच्चित्तीं ॥५४॥
भोगी संसारसुख । ह्मणसी तरी हें दु:ख ।
याहुनी वाटे बरें विख । त्याला पराड्मुख मी झालों ॥५५॥
स्त्री पुत्र मित्र द्रव्य । राज्यभोग मायामय ।
स्वरूपावरक हें हेय । उद्वेग होय स्मरतांही ॥५६॥
घेऊनी विंचवाचें प्रावरण । सर्पाचें उ सें करून ।
खदिरांगारीं शयन । सुखें करूनी निजवेल कीं ॥५७॥
एकाद्यास घडेल हेंही । भवसुख त्याहूनही ।
प्रमादमृत्युमोहीं । घाली जें तापोद्वेगद ॥५८॥
त्याहूनि बरा नरकवास । नको वार्ता त्याची आह्मांस ।
हा निश्चय केला खास । तुझी कास धरिली म्यां ॥५९॥
भवचक्राहूनी इतर । शत्रू वज्र दंडधर ।
भूत भौतिक हिंस्त्र । त्यापासूनि दर न वाटे ॥६०॥
भवचक्रभंगोपाय । केवळ हे तुझे पाय ।
हाचि मनाचा निश्चय । भयाचें भय पाय हे ॥६१॥
करितां पायांचा आश्रय । होय आनंदाश्रुसांद्रकाय ।
भवचक्राचा होईल लय । यापुढें श्रेय काय तें ॥६२॥
जे नर पराड्मुख । त्यां दे हे विषयसुख ।
ते असती उन्मुख । विषयसुख भोगावया ॥६३॥
मी सरज्ञ विरक्त । मुमुक्षु तुझा भक्त ।
तव पदीं आसक्त । करी मुक्त मुकुंदा ॥६४॥
नाहीं इहपर भोगेच्छा । कोण पाहे तया तुच्छा ।
पादसेवेची धरी वांच्छा । ती पुरवी इच्छा कल्पवृक्ष ॥६५॥
धन्य अत्री अनसूया । वंदूं तयांचिया पायां ।
ज्याचा न ठावा आम्नाया । आणिलें तया नामरूपा ॥६६॥
तो तूं साक्षात्परमेश्वर । निजभक्तांचें माहेर ।
मला केवी करिसी दूर । काठीनें नीर दुरावें कीं ॥६७॥
नमो भक्ताधिव्याधिनाशा । विश्वाध्यक्षा हृषीकेशा ।
वासुदेवा परेशा । मायाधीशा तुज नमो ॥६८॥
ऐसी स्तुति करून । मूर्च्छित झाला अर्जुन ।
पुन: होवोनी सावधान । करी स्तवन भावार्थें ॥६९॥
( भूपाळी ) ॥ उठि उठि मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।
त्यांची पुरवी तूं कामना । पाही नयन उघडूनी ॥७०॥
उघडुनियां करुणादृष्टी । दासा धरीं आपुले पोटीं ।
नको येऊं देऊं हिंपुटी । घाली कंठीं मिठी हर्षें ॥७१॥
हर्षें तुझे पदीं रंगले । दारागारा विसरले ।
निजदेहा न भुलले । विनटले निजभावें ॥७२॥
निजभावें येतां शरण । लपविसी कां बां चरण ।
जेणें तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचें ॥७३॥
नको करूं निष्ठुर मन । शीघ्र देईं आश्वासन ।
तूं अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥७४॥
उठी उठी बा सद्गुरुराया । उठी उठी करुणालया ।
उठी उठी बा चिन्मया । निज माया आवरी ॥७५॥
( ओवी ) ॥ असें स्तवूनी अर्जुन । उभा राहे धरूनी मौन ।
तव उदया आला अरुण । अरुण दिसे प्राचीमुख ॥७६॥
सिद्ध मुनी ऋषी देव । दर्शना येती अप्सरा गंधर्व ।
ते वंदोनी जाती सर्व । जयां गर्व न ठावा ॥७७॥
सह्याद्रिवासी मुनी । तेही जाती वंदूनी ।
मृत्तिका जल घेवूनी । आला मुनी शांततपा ॥७८॥
मग श्रीदत्त उठोन । करीं मृज्जल घेऊन ।
नैरृती दिशे जाऊन । मलोत्सर्ग करून पातला ॥७९॥
मृज्जल समिधा घेऊनी । तंव आला दुसरा मुनी ।
श्रीदत्तें शौच करूनी । दंतधावन पैं केलें ॥८०॥
सरोवरीं केलें स्नान । केलें देवर्षिपितृतर्पण ।
तंव एक मुनी येऊन । भस्म वल्कल देतसे ॥८१॥
करूनि त्रिपुंड्र धारण । वल्कल तें पांघरून ।
करूनी संध्यावंदन । पुन: ध्यान आरंभिलें ॥८२॥
राजा मनीं झाला खिन्न । उभा राहे हात जोडून ।
मग शांततपा बोले वचन । नमन करून गुरूतें ॥८३॥
भगवन् हा तुमचा दास । उभा राहे करून उपवास ।
यानें आपुली धरली कस । यास उदास न करावा ॥८४॥
हा करी भक्ती बरवी । यसी उपेक्षा न करावी ।
कृपादृष्टी यावरी करावी । हा भाविक ठावा असेल ॥८५॥
हंसोनी बोले श्रीदत्त । काय इच्छितें याचें चित्त ।
आणिक इच्छी जरी वित्त । तरी देतों सत्वर ॥८६॥
माझ्या भक्ता काय दुर्लभ । सर्व सिद्धी केल्या सुलभ ।
यावरी ठेविला लोभ । अजुनी सिद्धी किती देऊं ॥८७॥
ऐकूनी श्रीदत्तवचन । राजा झाला साश्रुलोचन ।
म्हणे देवा तूं प्राणजीवन । माझें मन जाणसी ॥८८॥
पुरे पुरे परीक्षा । बरवी केली हे शिक्षा ।
आतां करी कृपेक्षा । न करी उपेक्षा दीनाची ॥८९॥
तृषिता द्यावें पान । क्षुधिता द्यावें अन्न ।
दुर्गता द्यावें धन । करावें अवन आर्ताचें ॥९०॥
योग्या योग्य द्यावें । हे सर्वज्ञा काय सांगावें ।
आतां म्यां काय मागावें । त्वां जाणावें अंतरींचें ॥९१॥
आतां कांहीं नाहीं कांक्षा । घेतां आपुली दीक्षा ।
दैवें झाली मुमुक्षा । ज्ञानदीक्षा द्यावी आतां ॥९२॥
स्वबुध्द्या करितां श्रम । शास्त्रीं झाला मला भ्रम ।
न कळे ज्ञाननिष्ठाक्रम । इंद्रियग्राम नावरे ॥९३॥
वाङ्मनसागोचर । ब्रह्म एक परात्पर ।
जग मायिक क्षणभंगुर । तें खोटें म्हणे वेदांती ॥९४॥
दुसरा म्हणे सत्य हे । म्हणोनी व्यवहार करी हे ।
मीमांसक म्हणे सुखी होते हे । कर्मयोगें निश्चय ॥९५॥
काणाद बोले हे असद्धेतुक । सांख्य बोले जीव अनेक ।
योगी म्हणती योगें ये सुख । म्हणे क्षणिक शून्यवादी ॥९६॥
कोणी म्हणती ईश्वर निमित्त । कर्मपरतंत्र कोणी म्हणत ।
कोणी प्रधान कारण बोलत । कोणी म्हणत द्वंद्वज हें ॥९७॥
स्वस्वपक्ष सिद्ध करिती । श्रुतिप्रमाण दाखविती ।
भ्रम पावे माझी मती । म्हणोनी प्रणती म्यां केली ॥९८॥
यांमध्यें सत्य काय । मुमुक्षूनें करावें काय ।
म्हणोनी धरिले हे पाय । मोक्षोपाय दाखवा ॥९९॥
माझी आज्ञा त्रिभुवनीं । कोणी न जाती उलंडुनी ।
शत्रु ठेविल भृत्य करोनी । समृद्धी सदनीं अक्षय ॥१००॥
सर्व भोग भोगिले । माझें मन कंटाळलें ।
आतां ज्ञानावांचून भलें । न मानिलें कांहींच म्यां ॥१०१॥
बोलतों वाहूनी आण । गुरुदेव माझे आपण ।
दृढ धरिले हे चरण । करा उत्तीर्ण भवापासुनी ॥१०२॥
कोणत्याही युक्तीनें आतां । काढा मज वरता ।
भीतो ह्या भवगर्ता । दुसरा उद्धर्ता नाहीं मला ॥१०३॥
ब्रह्मादिकांचे गुरु आपण । यालागीं वेद प्रमाण ।
तुम्हांहूनी दयाळु कोण । मायावरण काढील हें ॥१०३॥
कायावाचामनेंकरून । तुम्हांवरी निश्चय ठेऊन ।
बैसलों धरणें घेऊन । सर्व आपण जाणतसां ॥१०४॥
देवा पूर्वीं आपण । सुप्रसन्न होऊन ।
माग ह्मणतां वरदान । ऐहिक धन मागितलें ॥१०५॥
त्या वेळीं माझें दुर्दैव । तेथें आलें घेवोनी धांव ।
तेणें ऐहिक वैभव । मागविलें क्षणलवविरस जें ॥१०६॥
तुझी माया दुर्धर । कोण लावी तिचा पार ।
आतां करितों नमस्कार । माझा उद्धार करावा ॥१०७॥
इति श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचिते श्रीदत्तमाहात्म्ये सप्तमोsध्याय: ॥७॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर
भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ८ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु ह्मणे दीपकाप्रती । ऐसी अर्जुनें करितां विनंती ।
आश्वासूनि तयाप्रती । म्हणती तया योगिराज ॥१॥
आर्जुना तूं सात्विक । दैवी संपत्तीचा नायक ।
प्रारब्धवशें सकळिक । भोग भोगिले मद्वरें ॥२॥
माझ्या सेवेच्या योगानें हें । वैराग्य जाहलें आहे ।
आतां सत्वर पाहें । याच डोला मुक्तिसुख ॥३॥
आत्मस्वरूप जाणणें । तरी शास्त्रप्रमाण घेणें ।
शास्त्रांचें एक तत्व जाणणें । द्वैत न पाहणें सुविचारें ॥४॥
शस्त्रांचें तात्पर्य एक । असे सांगतों तें ऐक ।
एकदां देवनायक । गुरुदर्शंना पातला ॥५॥
दूरीं देखतां गुरुवर । पायीं चालोनि ये इंद्र ।
करी भावें नमस्कार । परमादर करूनि ॥६॥
गुरु बसवी तयसी । तो बैसोनि देखे शिष्यासी ।
झटले जे शास्त्राभ्यासीं । अन्य मानसीं न आणिती ॥७॥
कोणी लौकायत शास्त्र । कोणी पढती कामशास्त्र ।
कोणी शिल्प सौगतशास्त्र । न्यायशास्त्र कोणी पढती ॥८॥
तें ऐकोनि इंद्र पुसे । म्हणे गुरो काय हें असे ।
आपण पढवितां कसें । बंध येतसे ज्यायोगें ॥९॥
उपजतांची पूर्वाभ्यासें । विषयवासना होतसे ।
ती कामादिशास्त्राभ्यासें । बुडवितसे ठार नरकीं ॥१०॥
आधींच उल्हास । त्यांत पातला फाल्गुनमास ।
तसें क्षुद्रशास्त्रें ह्यांस । विषयाध्यास होईल ॥११॥
हे होत विषयाक्रांत । दु:शास्त्रीं करितां आसक्त ।
जेवी अंध कूपांत । लोटावे तसें हें वाटे ॥१२॥
मुळीं हे कामुक । हीं शास्त्रें अर्थात्मक ।
गुरु ह्मणे इंद्रा ऐक । मनीं कौतुक न मानी ॥१३॥
शास्त्रें न होती बाधक । सर्वांचें तात्पर्य एक ।
सात गथा सांगतों ऐक । मन नि:शंक होईल ॥१४॥
कापिल्यनगरीं शिल्पज्ञ । होता नामें विधिज्ञ ।
वास्तुशास्त्रीं अभिज्ञ । ज्याला प्राज्ञ मानिती ॥१५॥
क्षेत्रशुद्धि आय व्यय । जाणे शल्यज्ञानोपाय ।
विधिनें बांधी आलय । सुखालय केवळ तें ॥१६॥
तेणें बांधितां घर । त्यांत घडती निरंतर ।
धर्म उत्सव अध्वर । लोका ज्वर न येती ॥१७॥
त्याकरवीं लोक । घरें बांधविती सुरेख ।
त्या घरीं नित्य होय सुख । होती मख मंगलें ॥१८॥
तो विधिज्ञ प्रसिद्ध झाला । द्रव्य लाभे त्या कुशला ।
कधीं नेणे मिथ्या बोला । सर्वां भला वाटे तो ॥१९॥
जीं लोकांचीं घरें बांधी । तेथें नोहे आधिव्याधी ।
अपमृत्यु न ये कधीं । शास्त्राधारें घरें बांधितां ॥२०॥
तो मरोनी स्वर्गा गेला । सुख भोगोनी पुन: आला ।
भूमीवरी राजा झाला । पूर्वपुण्यबलानें तो ॥२१॥
प्रासाद देवालयें । बांधवी धर्मशाळा स्वयें ।
पूर्तेष्ट दत्त करितां ये । तया मृत्यु सुखानें ॥२२॥
पुन: स्वर्गीं जाऊन । दिव्य भोग भोगून ।
पुन: भूतळीं येऊन । विप्रकुळीं जन्मला ॥२३॥
कर्माची गती गहन । दुर्लभ हें नरजनन ।
सर्वेंद्रियानिधान । पुण्यवंता मिळे क्वचित् ॥२४॥
त्यांमध्यें विप्रजाती । मिळतां सायास होती ।
होनें विद्वान् सुमती । हें तो अतिपुण्यफळ ॥२५॥
जन्मा येतां ब्राह्मण । सूर्य करी गोदान ।
म्हणोनि थोर ब्राह्मण । करी उद्धरण लोकांचें ॥२६॥
तो शिल्पज्ञ पूर्वींचा । पुढें तया राजाचा ।
जन्म लाभला मग साचा । झाला विप्राचा पुत्र तो ॥२७॥
गर्भीं येतां गर्भाधानादि । क्रिया घडल्या यथाविधि ।
मातेला दु:ख न दे कधीं । सुवेळी सुधी जन्मला ॥२८॥
पिता त्याचें जातकर्म । करी प्रेमें दानधर्म ।
करोनियां नामकर्म । देवशर्मा म्हणती तया ॥२९॥
स्वरूपें सौम्य दिसत । प्रकृतीनें असे शांत ।
लोकांचीं मनें तो कांत । रमवी अश्रांत सुखी तो ॥३०॥
यथाकालीं चौल करून । केलें मौंजीबंधन ।
तो करी वेदाध्ययन । घालवीना मन खेळाकडे ॥३१॥
संध्यावंदन अग्निकार्या । करी गुरूची सपर्या ।
धर्में पाळी ब्रह्मचर्या । धरी औदार्या स्वभावें ॥३२॥
संहिता – पद – क्रम । अंगें शास्त्रें यथाक्रम ।
पढला ज्याला न हो भ्रम । सफळ श्रम तयाचे ॥३३॥
सार्थ विद्या मिळवून । व्रताचरण करून ।
गुरूला दक्षिणा देऊन । समावर्तन करी तो ॥३४॥
बुद्धिरूपशीलसंपन्न । पाहूनि कन्या कुलीन ।
तिशीं विवाह करून । गृह्याचरण करी तो ॥३५॥
वेदशास्त्रार्थतत्वज्ञ । करी नित्य पंचयज्ञ ।
विशेषत: जपयज्ञ । करी प्राज्ञ दैवयोगें ॥३६॥
स्मयीं स्नानसंध्यावंदन । होम जपयज्ञ पठन ।
करी गुरूशुश्रुषण । भगवद्भजन प्रेमभरें ॥३७॥
कर्मीं अभिमान न करी । फळाची इच्छा नच धरी ।
निर्ममत्वें वागे घरीं । उदासीनापरी सर्वथा ॥३८॥
आगंतुक साधन । करी यज्ञदानाध्ययन ।
प्रतिग्रह याजनाध्यापन । यांहीं जीवन करीतसे ॥३९॥
ईश्वरोद्देशें कर्म करितां । चित्ता ये शुद्धता ।
प्रतिग्रहा तो सोडी ज्ञाता । तपत्तेजहर्ता जो ॥४०॥
होतां ईश्वरीं आवडी । याजनाध्यापना सोडी ।
भिक्षेची धरी आवडी । सोडी गोडी विषयांची ॥४१॥
शम दम तप शौच । क्षांति आर्जव ज्ञान साच ।
आस्तिक्य विज्ञान हेंच । स्वाभाविक ब्रह्मकर्म ॥४२॥
हें प्रक्रुतिवशें मिळालें । कामादिक पळाले ।
मीपणही गळालें । उत्तरोत्तर विप्राचें ॥४३॥
कर्में झालें मन शुचि । श्रवणाची लागली रुचि ।
समाप्ति गृहस्थाश्रमाची । करूनि वनीं रहिला ॥४४॥
शीतोष्ण सहन करी । ध्याननिष्ठ अंतरीं ।
श्रीहरीचें चिंतन करीं । न धरी योगक्षेमवांच्छा ॥४५॥
असा महाव्रत होवोनी । सर्वसंन्यास करूनि ।
गुरूपदिष्टचिंतनीं । निशिदिनीं निमग्न हो ॥४६॥
असा महाव्रत होवोनी । सर्वसंन्यास करूनि ।
श्रवणें विपरीत भावना । निमाल्या मनापासून ॥४७॥
करूनियां योग । केला प्रतिबंधभंग ।
वासनाक्षय मनोभंग । ज्ञानयोग मिळवी जो ॥४८॥
बोध वैराग्य उपरती । पूर्णपणें जेथें वसती ।
त्यालागीं किंकरी मुक्ती । हे उक्ति सत्य असे ॥४९॥
असा जीवन्मुक्त । विप्र झाला ईशभक्त ।
प्रारब्ध भोगूनि असक्त । विदेहमुक्त झाला तो ॥५०॥
शास्त्र तें शासन करी । ईशवाक्य तें हो कां क्षुद्र जरी ।
विश्वास ठेविता त्यावरी । ये गति बरी अनुक्रमें ॥५१॥
शिल्पशास्त्रविधीनें । वागतां विधिज्ञानें ।
गति अनुक्रमानें । घेतली योगानें दुर्लभ जी ॥५२॥
ही एक गाथा अशी । दुसरीही असे तशी ।
गुरु सांगे इंद्राशी । दत्त ह्मणे अर्जुना ऐक ॥५३॥
नर्मदेच्या तीरीं । माहिष्मती नगरी ।
द्विज एक अवधारी । गीत वादित्रीं रत असे ॥५४॥
तो स्वरूपें सुंदर । असे कवी उदार ।
पूर्ण जाणे कामशास्त्र । धुंडे सुंदर नारीतें ॥५५॥
मिळावी सुलक्षणा पद्मिनी । हें चित्तीं ठेवूनि ।
पातला राजसदनीं । रायें वंदूनि पूजिला ॥५६॥
राजा ह्मणे विप्रासी । काय इच्छा मानसीं ।
विप्र ह्मणे रायासी । शास्त्रोक्त नारी धुंडितों ॥५७॥
जाणें मी कामशास्त्र । तसेंच सामुद्रिक शास्त्र ।
नारी मिळावी पवित्र । शास्त्रयुक्त लक्षणांची ॥५८॥
ऐकून त्याचें वचन । रायें तया स्वकन्यारत्न ।
दाविलें तें पाहून । मोहित होवोनि तो पडला ॥५९॥
शास्त्रोक्त सर्व लक्षणें । पाहतां पीडिला कामबाणें ।
सावध होवोनि क्षणें । यथेष्ट वीक्षणें पाहिली ॥६०॥
मुख पाहतां विप्राचें । भुललें मन कन्येचें ।
हार्द जाणोनि दोघांचें । राजाचें मन सुखावलें ॥६१॥
राजा म्हणे हा सुपात्र । विप्र असे पवित्र ।
मीही असें अपुत्र । हा घरजांवई करावा ॥६२॥
विप्र कन्येसी पाहून । राहिला मोहित होऊन ।
कन्येंचेंही अंत:करण । रंगलें याहून काय पाहूं ॥६३॥
जरी हा असे निर्धन । याला द्यावेम राज्यार्धदान ।
असा विचार करून । मुहूर्त पाहूनि लग्न करी ॥६४॥
ब्राह्मविधीनें कन्यादान । दिलें राज्यार्ध आंदण ।
केला उत्सव सोळा दिन । जांवई ठेवून घेतला ॥६५॥
चक्रवाकासमान । परस्पर प्रेमबंधन ।
झालें तयांचें अनुदिन । आनंदनिमग्न होती ते ॥६६॥
वाचे मना अगोचर । तें सुख आत्यंतिक पर ।
आत्मस्वरूप तें वर । नित्य निरतिशय जें ॥६७॥
मनुष्यानंदाहूनि । उत्तरोत्तर शतगुणी ।
ब्रह्मसुखांत जीं तयाहूनि । शतगुणीं आत्मसुख ॥६८॥
रत्यारूढ तेंची पूर्ण । कामशास्त्रीं जो विचक्षण ।
जाणे ब्रह्मसुखाचें लक्षण । तो घे पूर्णपणें तें ॥६९॥
पामरें भोगितां नारी । सोपाधिक सुख घेतो अंतरीं ।
नित्य निरतिशय सुखाची सरी । मैथुनांतरी त्या द्यावीकीं ॥७०॥
शास्त्र नेणे तया स्पष्ट । स्पर्धासूयादि दुष्ट ।
रतिसुख जाणे स्पष्ट । मानी प्रेष्ठ तत्वज्ञ ॥७१॥
मैथुनांतीं शयनांतीं । जी बाणे पूर्णस्थिति ।
ती सदैव जे पाळिती । जीवन्मुक्ति तयां हातीं ॥७२॥
हें नेणे तो पामर । धरीं संसार अनिवार ।
विषयासक्ति निरंतर । करी पराड्मुखपणें ॥७३॥
असा तो ब्राम्हण । कामशास्त्रप्रवीण ।
रत्युपाधीनें जाणून । ब्रह्मांनंदीं निमाला ॥७४॥
राजकन्या हृष्ट झाली । विप्रचरणीं रमली ।
कधींही दृष्टि आपुली । अन्यत्र न घाली क्षणमपि ॥७५॥
धरोनि पतीची चित्तवृत्ती । रमे राजकन्या सती ।
मानी परब्रह्म पती । ती सुमती धन्य हो ॥७६॥
दोघांनीं न केलें पातक । स्वप्नींही न देखिलें दु:ख्ह ।
परस्पर भोगूनि सुख । राहती एकमनेंसी ॥७७॥
यथायोग्य पाळिती धर्म । जो असे गृहाश्रम ।
तदनुगुणें करिती कर्म । परब्रह्मनर्म ज्याचें ॥७८॥
जें सुख देव नेणती । तें सुख ते अनुभवी ।
सुखें मरोनी ते अंतीं । दोघेंही जाती गंधर्वलोकीं ॥७९॥
तेथेंही दंपती होऊन । होती नादब्रह्मलीन ।
गीतवाद्यताननिपुण । गंधर्वगण मान्य झाले ॥८०॥
एके दिनीं हिमाचळीं । ते स्वच्छंद गाती त्या वेळीं ।
गाणें ऐकूनि चंद्रमौळी । तयांजवळी पातला ॥८१॥
गाणें मंजुळस्वर । तालासह सप्तस्वर ।
बावीस श्रुति धरिता उर । तान बरोबर एकुणपन्नास ॥८२॥
रागांसह रागिणी । विरामारह दावितां त्यांनीं ।
हर्षा न पुरे धरणी । शिवाचे श्रवणीं भरे तें ॥८३॥
गीतरागे हराचें मन । त्यांणीं हरितां सोडून ध्यान ।
हर बोले होऊनि प्रसन्न । कर उचलून प्रेमानें ॥८४॥
तुह्मी सुशिक्ष्य उत्तम । तुमचें गाणें मनोरम ।
यापुढें काय साम । आनंदधाम हें गाणें ॥८५॥
जैसें तुह्मीं गाइलें । ऐसें अद्यापि न ऐकिलें ।
माझें मन पूर्ण धालें । ऐकतां भलें गाणें हें ॥८६॥
तुम्हां न होईल त्रास । तुम्हां देतों स्वर्गवास ।
तेथें रमवूनि देवांस । करा निवास आनंदें ॥८७॥
असें म्हणोनि शंकरें । विमानीं बैसवोनि त्वरें ।
तयां मानपुर:सरें । स्वर्गावरी पाठविलें ॥८८॥
त्यांचीं गाणीं ऐकूनि । किन्नर किन्नरी जाती भुलोनि ।
गंधर्वहि ऐकोनि । चकित होऊनि राहती ॥८९॥
ऐसा तो ब्राह्मण । स्वर्गीं देवगंधर्वाहून ।
मान्य झाला अनुदिन । आनंदलीनमानस ॥९०॥
कालांतरीं एके दिनीं । उत्सव झाला ब्रह्मभुवनीं ।
तेथें गंधर्वं बोलावूनि । आणिले असती अनेक ॥९१॥
जो हा पूर्वींचा ब्राह्मण । गंधर्व झाला जाण ।
त्यालाही देवगण । घेऊनि आले ब्रह्मलोकीं ॥९२॥
मृदंगादि आनन्द वाद्यें । वीणादिक तंतुवाद्यें ।
मुरलीप्रमुख सुषिर वाद्यें । वाजती घनवाद्यें तालादिक ॥९३॥
अप्सरा कौशल्यें नाचती । हाव भाव कळा दाविती ।
गंधर्व प्रेमभरें गाती । आनंदविती देवांसी ॥९४॥
सर्वांमध्यें विस्पष्ट । ब्राह्मणाचा स्वर उत्कृष्ट ।
सर्वांचें चित्त करी हृष्ट । झाला संतुष्ट ब्रह्मदेव ॥९५॥
सर्व गंधर्वां वारूसि । त्या दोघां पुढें बैसवूनि ।
ब्रह्मा ऐके चित्त देऊनि । त्यांचीं गाणीं मनोरम ॥९६॥
ऐकतां ज्यांचें गाणें । साक्षात् ब्रह्मानंद होणें ।
संतोषूनि ब्रह्मा म्हणे । धन्य जिणें तुमचें हें ॥९७॥
नादब्रह्मात्म तत्व जें । ज्यासमान नाहीं दुजें ।
म्हणूनि सर्वोत्तम जें । तें उमजे हा एक ॥९८॥
विलक्षण ह्याचा आनंद । दुसर्या देई परमानंद ।
केवळ ब्रह्मरसास्वाद । सर्व खेद वारी जो ॥९९॥
याचा नित्य निवास । ब्रह्मलोकीं व्हावा खास ।
आतां स्त्रियेसह ह्यास । माझे जवळी ठेवितों ॥१००॥
ऐसें ब्रह्मा बोलून । सुप्रसन्न होऊन ।
तया दे स्वसन्निधान । प्रेमें मानपुर:सर ॥१०१॥
ऐसा तो ब्राह्मण । कामशास्त्रप्रवीण ।
पुढें गंधर्व होऊन । ब्रह्मलोकीं राहिला ॥१०२॥
कृतोपासकां जी गति । ती आली तया पुढती ।
तेणें घेतली क्रममुक्ति । पुनरावृत्ति न हो तया ॥१०३॥
ज्यांचें अपक्क ज्ञान । ते ब्रह्मलोकीं येऊन ।
तेथें श्रवणादि करून । क्रमें निर्वाण पावती ॥१०४॥
जे केवळ पुण्येंकरून । ब्रह्मलोकीं येऊन ।
राहती तयां ये पतन । पुण्य भोगून सरतांचीं ॥१०५॥
गुरु म्हणे इंद्रा ऐक । कामशास्त्रनिश्चायक ।
तो ब्राह्मण सस्त्रीक । ब्रह्मलोकवासी झाला ॥१०६॥
तो क्रममुक्तीचा अधिकारी । जाहला असे जो यापरी ।
शास्त्रतत्व निर्धारी । क्रमें चारी मुक्ति घेतो ॥१०७॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । द्वितीय गाथा ऐकून देवराणा ।
पावोनियां समाधाना । तृतीयोदाहरन पुसतसे ॥१०८॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवसरस्वतीविरचिते श्रीदत्तमाहात्म्ये
अष्टमोsध्याय: श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥८॥
संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर
भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ९ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य।
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । परिसे करूनी एकमना ।
ह्या तिसर्या उदाहरणा । समाधाना पावसी ॥१॥
वेदशर्मा विप्र एक । गोदावासी सुविवेक ।
तया पुत्र झाला एक । नामे अन्वर्थक सुशील ॥२॥
तो स्वाचारसंपन्न । गायत्री जपे करी श्रवण मनन ।
दैवयोगेंकरून । सात भूतांनीं गांठिला ॥३॥
सातही ब्रम्हराक्षस । पीडिती त्या पुत्रास ।
नानापरी देती त्रास । न देती ग्रास भक्षावया ॥४॥
सातांच्या चेष्टा सात । एकाकाळीं एक येत ।
एवं विप्र सतत । भूतग्रस्त झाला असे ॥५॥
एक रडे एक उडे । एक हंसे गाढें ।
एक नाचे पुढें पुढें । खायी गायी पडे एक ॥६॥
द्विजाअंगीं घुसती । अशा चेष्टा दाविती ।
कांहीं उपाय न चालती । झाली भीती ब्राह्मणा ॥७॥
म्हणे माझा पुत्र एक । त्याला भूतें देती दु:ख ।
पाहूनियां झाला शोक । उभय लोक अंतरले ॥८॥
श्रीदत्ताचा उपासक । मी असोनी हें दु:ख ।
केवीं झाले विवेक । तोही चोख न राहे ॥९॥
असा करी विप्र शोक । तंव आला भिक्षुक ।
दुर्गंधांगी मलिन मूर्ख । दिसे लोकदृष्ट्या तो ॥१०॥
भिक्षा देतां त्याची कांती । पाहतां विप्रा झाली भ्रांती ।
म्हणे हा कीं दिनपती । माझी मती भ्रमतसे ॥११॥
करूं याचें परीक्षण । असें म्हणतां तत्क्षण ।
भिक्षुक धांवे त्वरा करून । पाठी लागोन धांवे विप्र ॥१२॥
भिक्षुक वनीं चालिला । द्विज पाठीसी लागला ।
पाषाण मारी तयाला । जा जा मागें फिर म्हणे ॥१३॥
मार सोसोनि ब्राह्मण । जाऊनी दृढ धरी चरण ।
म्हणे आलों शरण । करी रक्षण सत्पुरुषा ॥१४॥
भिक्षु म्हणे मी व्रात्य भ्रष्ट । तूं ब्राह्मण पूज्य श्रेष्ठ ।
विप्र म्हणे आपण वरिष्ठ । स्पष्ट देव भूलोकीं ॥१५॥
हंसूनी भिक्षु दावी रूप । तों दिसे त्रिमूर्तिस्वरूप ।
विप्र म्हणे गेलें पाप दर्शन ताप नष्ट झाले ॥१६॥
भूतें त्रासिला माझा सुत । तुम्ही त्याला करा मुक्त ।
हांसोनि वदे भिक्षुक दत्त । मंत्र सात हे घे तूं ॥१७॥
एका एका भूता । एक एक मंत्र योजितां ।
तत्काल ये बद्धता । होईल मुक्तता पुत्राची ॥१८॥
जसे मनाचे मळ । एका एका शास्त्रें केवळ ।
जाऊनी आत्मयाची आळ । दुरावे तत्काळ तया परी ॥१९॥
एका एका मंत्रें एक एक । भूत जाईल नि:शंक ।
परस्परविरुद्ध ते ऐक । न जाती एक मंत्रानें ॥२०॥
असें बोलोनी सविधान । सात मंत्र सांगून ।
गुप्त झाला भगवान । विप्र वंदून मागें फिरे ॥२१॥
विप्र घरीं येऊन । सुस्नात होऊन ।
यथाविधी न्यास ध्यान । करून प्रयोग करितसे ॥२२॥
एक भूताचें झालें बंधन । ती एक चेष्टा जाऊन ।
पुत्र पावला समाधान । मंत्रविधानबळानें ॥२३॥
विप्रें असा सात दिवस । उपाय केला तयास ।
बांधोनी सात भूतांस । टाकिलें खास मंत्रबळें ॥२४॥
ज्या ज्या भूताची जी जी चेष्टा । तो तो बद्ध होतां ती अदृष्टा ।
झाली अशा सातही चेष्टा । जाऊनी पुत्र मुक्त झाला ॥२५॥
मग तो अभ्यास करून । मुक्त झाला द्विजनंदन ।
असा क्षुद्र शास्त्रापासून । उपयोग जन करितात ॥२६॥
मंत्रशास्त्रही उपकारक । ही तिसरी गाथा सुरेख ।
आतां चौथी गाथा ऐक । मन नि:शंक होईल ॥२७॥
सह्याद्रिनिकट मातापुर । तेथें वसे द्विजवर ।
विष्णुदत्तशर्मा पवित्र । कर्मशूर गृहस्थ ॥२८॥
पत्नी तयाची सुशीला । सदा वागे अनुकूला ।
सदा आदरी पतिसेवेला । न हो प्रतिकूला कधींही ॥२९॥
तो विप्र श्रीदत्तोपासक । असे कर्मठ मीमांसक ।
यथाकालीं आन्हिक । करी विवेकपूर्वक तो ॥३०॥
अश्वत्थ असे त्याचे दारीं । ब्रह्मराक्षस वसे त्यावरी ।
भूतबळी भक्षण करीं । वैश्वदेवांतरी टाकितां ॥३१॥
न देती जे बलिदान । करी तयांचें पीडन ।
भूतांचा हा स्वभाव म्हणून । वैश्वदेव करूनि बलि द्यावा ॥३२॥
विष्णुदत्तें बळि देतां । नित्य येऊनी तो खातां ।
राक्षसा ये शांतता । शुद्धान्न सेवितां काय नोहे ॥३३॥
एके दिनीं घेऊनी बळी । विष्णुदत्त आला वृक्षातळीं ।
ब्रह्मराक्षस तत्काळीं । अश्वत्थमूळीं उतरला ॥३४॥
भयंकर तो दिसत । विप्र झाला चकित ।
थरथरां कांपे भयभीत । म्हणे हें दुरित काय आलें ॥३५॥
रूप दिसे विशाळ । मुखही अति विक्राळ ।
जेवीं भेटतां शार्दूळ । गाय व्याकुळ होतसे ॥३६॥
व्याकुळ हो तसा द्विज । म्हणे हें काय विघ्न आज ।
रुसला कीं योगिराज । माझी लाज न ठेवी कीं ॥३७॥
भ्याला ब्राह्मण जाणून । राक्षस शांत होऊन ।
बोले मंजुळ वचन । देतों वरदान राक्षस मी ॥३८॥
तूं देशी बलिदान । तें नित्य भक्षून ।
शांत झालों म्हणून । उपकार फेडीन तुझे आतां ॥३९॥
ऐसें राक्षसवचन । ब्राह्मणानें ऐकून ।
आपुलें कर्म म्हणून । करी स्तवन दत्ताचें ॥४०॥
अनंत ( पद ) अहहा कौतुक हें लोकीं । दत्ता दाविसी कीं ॥ध्रु०॥
करितां नित्य तुझी सेवा । धरुनी मनीं ह्या सद्भावा ।
धर्महि आचरितां देवा । भूता प्रसन्न करविसि कीं ॥४२॥
जीं असती भूतें क्रूर । त्वत्स्मरणें तीं जाती दूर ।
तुज स्मरतां आजि कां समोर । राक्षस घोर दाविसि कीं ॥४३॥( ओवी ) ॥
राक्षस म्हणे ब्राह्मणा । काय ही तुझी विचारणा ।
जरी तूं अससी शाहणा । दैववाणा होऊं नको ॥४४॥
मनीचें भय सोडून । आतां घेई वरदान ।
नको करूं अनुमान । मी सुप्रसन्न देतसें ॥४५॥
विप्र ऐकूनी वचन । मनीं करी चिंतन ।
जरी मागावें पुत्रसंतान । तरी निर्धन मी असें ॥४६॥
जरी मागावें धन । तरी राहाया नाहीं स्थान ।
काय मागावें हें मन । एक निर्धार न करी ॥४७॥
जरी नश्वर ऐहिक । तरी मागावा कीं परलोक ।
तोही नश्वर म्हणती लोक । निर्वाणसुख मागों कीं ॥४८॥
असा विप्र गडबडूनी । मग गृहांत जाऊनी ।
संशयास्पद होऊनी । सांगे पत्नीप्रती सर्व ॥४९॥
पत्नी म्हणे प्राणेश्वरा । मागूं नका नश्वरा ।
श्रीदत्ताची भेटी करा । ऐशा वरा मागावें ॥५०॥
होतां श्रीदत्ताची भेटी । सर्व संपदा पडती गांठी ।
याहूनि प्राप्ति नाहीं मोठी । योगी ज्यासाठीं तळतळती ॥५१॥
पडतां दत्ताची गांठ । सर्व देव देतील भेट ।
संपदा न सोडतील पाठ । मग आटाआट कासया ॥५२॥
असें प्रियेचें भाषण । ऐकतां तो ब्राह्मण ।
म्हणे हेंचि शहाणपण । श्रीचरण पहावे ॥५३॥
तो तथास्तु म्हणून । पुन: बाहेर येऊन ।
म्हणे दत्ताचें दर्शन । व्हावें हें दान दे भूता ॥५४॥
भूत म्हणे नाम त्याचें । ऐकतां मन आमुचें ।
भितें तथापि वाचे । वदलों तें साचें करीन ॥५५॥
त्वां केला उपकार । जरी हा प्रत्युपकार ।
न घडे तरी धिक्कार । असो निर्धारपणें मला ॥५६॥
आतां यत्नें दर्शन । तुला निश्चयें करवीन ।
तूं धीर धरून । धरीं चरण दृढ त्याचे ॥५७॥
तो नानारूपधर । देवादिकां दुर्धर ।
भक्तिगम्य योगिवर । जया निर्धार मिळे तया ॥५८॥
जरी होईल दर्शन । तरी कृतकृत्य जीवन ।
निजकुला उद्धरोन । घेईल निर्वाण मानव ॥५९॥
राक्षस असें बोलुनी । गुप्त होई तत्क्षणीं ।
ब्राह्मण आश्चर्य पाहुनी । घरीं येवूनी राहिला ॥६०॥
मद्याचे दुकानांत । एकदां पातला दत्त ।
राक्षस तें जाणत । विप्राप्रत सांगतसे ॥६१॥
म्हणे विप्रा त्वरें जावें । श्रीच्या पदीं लागावें ।
मागें पुढें न पाहावें । तरीच गावेल पद त्याचें ॥६२॥
उन्मत्तसा मद्यापणीं । जो फिरे त्याचे चरणीं ।
लागें निश्चय करूनी । न करीं मनीं अनुमान ॥६३॥
ऐकूनी विप्र धांवत । तसाचि देखिला उन्मत्त ।
दुर्गंधांग मक्षिकावृत्त । म्हणे हा अवधूत होय कीं ॥६४॥
आधीं जातीचा भूत । तया काय ठावा दत्त ।
लोक हांसतील निश्चित । पाय धरितां मद्यप्याचे ॥६५॥
मनीं विकल्प येतां असा । दत्त गुप्त झाला सहसा ।
विप्र तळतळे जसा मासा । म्हणे कसा मी दुर्दैव ॥६६॥
जरी असता हा उन्मत्त । तरी न होता गुप्त ।
राक्षसें हाचि दत्त । म्हणोनि निश्चित दाविला ॥६७॥
कशी माझी दुष्टवासना । कसा दावूं भूतां वदना ।
पत्नी म्हणेल भक्तिहीना । कां निधाना दवडिलें ॥६८॥
असा अनुतप्त होउनी । विप्र आला परतूनी ।
भूत म्हणे धिक्कारूनी । तुझा मद्वचनीं न विश्वास ॥६९॥
असो पुन: अजुनी । दत्ता दावीन दुरोनी ।
सावधान होवोनी । लागे चरणीं धीरानें ॥७०॥
मग कांहीं काल गेल्यावर । स्मशानीं खेळे योगेश्वर ।
हाक मारूनी असुर । विप्राप्रती सांगतसे ॥७१॥
तुझा देव स्मशानीं बसून । अंगीं धूळ माखून ।
बरोबर कुत्रे घेऊन । करी क्रीडन कौतुकें ॥७२॥
तो जाणे आत्माराम । आत्मक्रीड उत्तम ।
ज्या भजती मुनिसत्तम । मुक्तिधाम तेंचि जाण ॥७३॥
जाणावया तयाची गती । भूतांची काय शक्ती ।
मीं पूर्वीं केली भक्ती । म्हणोनी युक्ती सांगतों ॥७४॥
मी भक्त असोन । विप्रांचा केला अवमान ।
त्या पापें असा होऊन । राहिलों तरी स्मृती असे ॥७५॥
मग विप्र जाय स्मशानीं । दत्त मारी अस्थी घेऊनी ।
मरणभयें पळे सदनीं । भूत निर्भर्त्सूनी वदे तया ॥७६॥
मिथ्याभूत देहा भुलून । पाप्या देवा देशी सोदून ।
तथापि दावितों अजून । यापुढें जाण दैव तुझें ॥७७॥
मग पुन: एके दिनीं स्मशानीं । मृतखरमांस तोडुनी ।
कुत्र्या कावळ्या दे वांटूनी । त्या पाहूनी विप्रांते जाणवी ॥७८॥
पत्नी म्हणे व्हा सादर । विप्र म्हणे मी न सोडी धीर ।
भूत म्हणे जरी योगेश्वर । देईल वर तये वेळीं ॥७९॥
दर्शश्राद्धीं द्यावया क्षण । आलों तुम्हीं घ्यावें आमंत्रण ।
असें मागावें वरदान । विप्र तथास्तु म्हणोन निघाला ॥८०॥
देव. स्मशानीं विप्र येऊन । तशीच मूर्ती पाहून ।
जाऊनी दृढ धरी चरण । न सोडी ताडन करितांही ॥८१॥
म्हणे दत्त कां पाद धरिसी । विप्र म्हणे आलों क्षण द्यावयासी ।
येरू म्हणे भ्रष्टासी । कां देशी श्राद्धीं क्षण ॥८२॥
मी धर्माधर्मवर्जित । विप्र म्हणे हें यथार्थ ।
परमात्मा तूं समर्थ । तुला किमर्थ धर्मधर्म ॥८३॥
हांसोनि ॐ तथा म्हणे दत्त । निजस्वरूप दाखवित ।
कुत्रे होती श्रुती मूर्तिमंत । वायस होत शास्त्रें तीं ॥८४॥
योगभूमी दिसे स्मशान । पाहतां चकित झाला ब्राह्मण ।
दत्त म्हणे होतां मध्यान्ह । स्नान करूनी येतों मी ॥८५॥
पंक्तियोग्य असेल ब्राह्मण । तरीच मी करीन भोजन ।
विप्र तथास्तु म्हणोन । वंदन करूनी घरीं आला ॥८६॥
राक्षसाप्रती येऊन । सर्व सांगे वर्तमान ।
पंक्तियोग ब्राह्मण । आणू कोठून शोधूनी ॥८७॥
भूत बोले अग्नि आदित्य । पंक्तियोग्य असती तथ्य ।
तुझें कार्य झालें सत्य । माझें अगत्य स्मरण करी ॥८८॥
विप्र सदनीं येऊन । भार्येप्रती सांगे सर्व विस्तारून ।
तीही अत्यंत हृष्ट होऊन । पाक करून राहिली ॥८९॥
तंव मध्यान्हीं पातले दत्त । म्हणती अजूनी विप्र न दिसत ।
विप्र रेखूनी स्वरूप अद्भुत । पाहे विस्मित होऊनी ॥९०॥
तंव पत्नी आसन देऊन । म्हणे करावें उपवेशन ।
सत्वर येतील ब्राह्मण । तथास्तु म्हणून दत्त बसे ॥९१॥
पत्नी बाहेर येऊन । सूर्या प्रार्थी हात जोडून ।
भो सर्वात्मन् कश्यपनंदन । जीवां चेतन करिसी तूं ॥९२॥
ब्राह्मणांचें तूं दैवत । रूपांतरें येऊनी त्वरित ।
श्राद्धीं क्षण घ्यावा निश्चित । अत्रिसुत वाट पाहे ॥९३॥
असी प्रार्थना ऐकून । विप्ररूप घेऊन ।
सत्वर उतरला अरुण । तया आसन देई सती ॥९४॥
दत्त म्हणे षड्दैवत । दर्शश्राद्ध हें निश्चित ।
तीन विप्र पाहिजेत । तिसरा येतो म्हणे सती ॥९५॥
अग्निशाळेंत जाऊन । प्रार्थी सती हात जोडून ।
अग्ने तूं गृहस्पती म्हणून । प्रख्यात होसी कर्माध्यक्ष ॥९६॥
तुला असो गृहाची लाज ।तूं होवोनी द्विज ।
श्राद्धीं क्षण घेईं आज । योगिराज वाट पाहे ॥९७॥
असें प्रार्थितां अग्नी विप्र होऊन । देवस्थानीं बैसला येऊन ।
विप्रें संकल्पादि करून । केलें श्राद्ध यथाविधी ॥९८॥
तीन देव तृप्त झाले । पितर सद्गतीतें पावले ।
द्विजें अष्टोत्तरशतनामें स्तविलें । दत्ता वंदिलें प्रेमानें ॥९९॥
विप्र म्हणे माझी मती अल्प । जरी माझे मनीं विकल्प ।
देवा तूं सत्यसंकल्प । माझें निर्विकल्प मन केलें ॥१००॥
धन्य हे माझे नेत्र । हें रूप पाहोनी झाले पवित्र ।
हें धन्य माझें गात्र । कुळगोत्र पवित्र करी ॥१०१॥
मी तो क:पदार्थ । तुम्ही भगवान् समर्थ ।
पूर्ण केले मनोरथ । झालों कृतार्थ कुळासह ॥१०२॥
राक्षसाच्या वचनें करून । देखिले म्यां हे चरण ।
दत्त म्हणे रे ब्राम्हणा । तो राक्षस जाण भक्त माझा ॥१०३॥
दुर्दैवें दुर्गत झाला । हें उच्छिष्ट देईं त्याला ।
तोही जाईल सद्गतीला । घे मुक्तीला स्त्रियेसह तूं ॥१०४॥
माझी भक्ती दुर्लभ जाण । ती तुला मिळाली दैवेंकरून ।
तूं इहपर भोग भोगून । सायुज्य निर्वाण घेशील ॥१०५॥
असें म्हणोनी श्रीदत्त । विद्या परोपकारार्थ देत ।
कामगती विमान दे सविता । भाव्यसंपदा दे अग्नी ॥१०६॥
आज्ञा घेऊनी तिघे जाती । विप्र दत्ता चिंती चिंतीं ।
उच्छिष्टाशनें राक्षसा ये गती । ये जीवनमुक्ती सस्त्रीक विप्रा ॥१०७॥
करितां मीमांसोक्त कर्म । विप्रा मिळालें अलभ्य शर्म ।
शास्त्राचें जो जाणील वर्म । सर्व धर्मफळ घे तो ॥१०८॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीविरचिते श्रीदत्तमहात्म्ये नवमोsध्याय: ॥९॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर
भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १० वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमहात्म्य
श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हने परमपवित्र । विष्णुदत्ताची गाथा विचित्र ।
जो दत्तभगवान् स्वतंत्र । होतो परतंत्र भावभुकेनें ॥१॥
अद्यापि यज्ञ ज्याला । तृप्ती न करिती तयाला ।
तृप्तीचा ढेंकर आला । श्राद्धान्न जेवितां हर्षानें ॥२॥
धन्य ती सुशीला सती । दत्ता जेवूं वाढी जी स्वहस्तीं ।
आग्रह करूनी निगुती । दीक्षिता गती न ये ही ॥३॥
धन्य तो विष्णुदत्त । ज्याचें परम शुद्ध चित्त ।
आराधोनियां श्रीदत्त । उद्धरिलें समस्त कुळ ज्याणें ॥४॥
धन्य तोही राक्षस । आपणासह विप्रास ।
उद्धरी ऐशा परम हितास । दावी तो खास परम गुरु ॥५॥
श्रीदत्तें विष्णुदत्तावर । अनुग्रह केला हा थोर ।
करावया परोपकार । दयेनें वर विद्या दिधल्या ॥६॥
ज्या ज्यावरी अनुग्रह करी । तो तरे या संसारीं ।
विष्णुदत्तासम उपकारी । ब्रह्मांडोदरी विरळ ॥७॥
ग्रहभूत डचकती । विष्णुदत्ता देव भीति ।
नुरवी लोकांची खंती । महामती दत्तवरें ॥८॥
आतां ऐक देवनाथा । पांचवी असे हे गाथा ।
कर्मविपाकाची कथा । मोक्षपंथा मिळेल ॥९॥
हरिशर्मा विप्र गोदावासी । एक पुत्र झाला त्यासी ।
अल्पवय असतां तयासी । मातापितयासी मृत्यु आला ॥१०॥
धनी होता म्हणून । तयाचें जाहलें लग्न ।
परि व्याधिग्रस्त दु:खमग्न । सदा उद्विग्न मन ज्याचें ॥११॥
उपजतांचि बरोबर गुल्मरोग । तेरावे वर्षीं क्षयरोग ।
अठरावे वर्षीं जलोदर रोग । सर्वांग निस्तेजस्क झालें ॥१२॥
एकुणीस वर्षें होतां अतिसार । कासश्वास बरोबर ।
पुढें झाला भगंदर । मग त्रिदोषें जोर केला ॥१३॥
करितां औषधदान । मृत्युंजयजप हवन ।
ग्रहदेवांचें अर्चन । करितां रोगांचें शमन न झालें ॥१४॥
त्याची भार्या सोला वर्षांची । ऐकूनि कीर्ति विष्णुदत्ताची ।
येऊनि पाउलें धरी त्याचीं । सौभाग्यदान द्या म्हणे ॥१५॥
माझा पती वीस वर्षांचा । त्याला गुल्मरोग जन्माचा ।
क्षयरोग आठ वर्षांचा । तीन वर्षांचा जलोदर ॥१६॥
एक वर्षाचा जीर्णज्वर । षण्मासांचा अतिसार ।
चौमासांचा भगंदर । त्रिदोष थोर वाढला आतां ॥१७॥
केले अनेक उपाय । तरी न झालें आरोग्य ।
मला द्यावें सौभाग्य । तुम्ही सभाग्य दत्तभक्त ॥१८॥
असी प्रार्थना ऐकून । तिचे सदनीं येऊन ।
तया विप्रा पाहून । बोले वचन विष्णुदत्त ॥१९॥
पूर्वपापें सर्व रोग होती । प्रायश्चित्तें पापें शमती ।
कर्मविपाकीं हे ख्याती । ऋशिसंमती अशीच असे ॥२०॥
ब्रह्मवधदोषें क्षय झाला । द्वादशाब्द प्रायश्चित कीजे तयाला ।
देवद्रोहें गुल्म झाला । षडब्द तयाला प्रायश्चित ॥२१॥
जलोदरा द्वादशाब्द । जीर्णज्वरा एकाब्द ।
भगंदरा एकाब्द । योजी अब्द अतिसारा ॥२२॥
पत्नीकरवीं विष्णुदत्त । करवी असें प्रायश्चित्त ।
ज्या ज्या रोगांचें जें जें प्रायश्चित्त । तें तें करितां तो तो रोग जाई ॥२३॥
त्रिदोषावरी रसायन । देतां त्याचें निरसन ।
जाहलें तेव्हां तो ब्राह्मण । बैसला उठोन सुखानें ॥२४॥
त्याचें हृदय स्पर्शोन । विष्णुदत्त मंत्र म्हणोन ।
तया देई आशीर्वचन । मनीं स्मरोनी श्रीदत्ता ॥२५॥
मग त्या द्विजा आरोग्य । आयुष्य प्रजा ऐश्वर्य ।
यश दिव्यगती वीर्य । मिळालें औदार्य विप्रवरें ॥२६॥
दत्तपदीं दृढ भक्ती । मिळाली उत्तम मुक्ती ।
निर्मळ जाहली मती । मंत्रशक्ती अशी हे ॥२७॥
विप्रस्त्री म्हणे विष्णुदत्ता । त्वां सौभाग्यदान दिलें आतां ।
यथेच्छ घेई वित्ता । विष्णुदत्त नको म्हणे ॥२८॥
तूं केवळ माझी कन्या । होसी निश्चयें विश्वमान्या ।
पतीसेवनें हो धन्या । तुम्हा अन्या गती नाहीं ॥२९॥
स्वप्नींही परपुरुषा न देखे ती । जाण ते उत्तम सती ।
बंधुसमान नरां देखे ती । मध्यम सती जाणावी ॥३०॥
परपुरुषा पाहुनी । उपजे काम जरी मनीं ।
राहे प्रयत्नें आवरूनी । कनिष्ठ सती ती जाण ॥३१॥
परपुरुषा भोगी नारी । ती जारिणी निर्धारी ।
ती विधवा होई जन्मांतरीं । पुन: पुन: निश्चित ॥३२॥
जी जारकर्म करी । ती कुलत्रय घाली रौरव घोरीं ।
स्वयेंही नरकीं कष्ट भारी । भोगी ती नारी दुर्भगा ॥३३॥
यास्तव साध्वी तूं आतां । धरीं पतीच्या चित्ता ।
स्वप्नींही न सोडीं सद्वृत्ता । मिळेल सुभगता अखंडित ॥३४॥
असा उपदेश करूनी । निस्पृह तो ये स्वभवनीं ।
विप्रा कर्मविपाक शास्त्रेंकरूनी । रोग जाऊनी ये सद्गती ॥३५॥
प्रायश्चित्तें रोगनाश । मग आरोग्य दे रस ।
तसा शास्त्रें होतां अविद्यानाश । प्रबोध ब्रह्मरस देतसे ॥३६॥
जरी फळाची लालुची । शास्त्रीं दाविली साची ।
ती मना वळवावयाची । युक्ती शास्त्राची जाणावी ॥३७॥
एक पुत्र बहु गोड खातां । रोगी झाला त्याची माता ।
त्या निंब पाजी तो तत्वता । न पिये माता तया बोले ॥३८॥
बाळा निंब जरी कडू । हा पितां तुला देईन लाडू ।
हें ऐकतां निंबरसाचा गडू । पिये तो लाडू मिळेल म्हणूनी ॥३९॥
हातीं लाडू देउनी । अपथ्य होईल म्हणूनी ।
युक्तीनें घे काढूनी । त्यापासूनी दयाळु माय ॥४०॥
लड्डूकासारिखें गौण फळ । आरोग्य हें मुख्य फळ ।
भवार्त हा जेवी रोगी बाळ । श्रुती कनवाळ मातेपरी ॥४१॥
शास्त्र नव्हे हें स्वर्गार्थ । नव्हे हें वशीकरणार्थ ।
नव्हे कामभोगार्थ । शत्रुघातार्थ नव्हे हें ॥४२॥
शस्त्र बुद्धिशुद्धी करी । युक्तीनें भ्रम निवारी ।
एतदर्थ अवधारी । साहावी गाता बरी असे ॥४३॥
सह्याद्रीचे उत्तरेस । विप्र एक करी वास ।
एके दिनीं मित्रानें त्यास । आपल्या गांवास पांचारिलें ॥४४॥
त्याची भार्या सुरूपा असे । तियेसी तो सांगतसे ।
मला मित्रानें पाचारिलें असे । एक मास रहावया ॥४५॥
त्वां सुखें राहावें घरीं । मी येईन मास लोटल्यावरी ।
तें ऐकूनियां नारी । पाथेय त्याकरीं देतसे ॥४६॥
तें घेऊनी तो निघाला । ती स्त्री स्नाना आली नदीला ।
मार्गी अश्वत्थीं झोटिंग बैसला । तेणें ती अबला देखिली ॥४७॥
ब्रह्मचारीदशेंत । जो मरे कामार्त ।
तो होय झोटिंग भूत । कामलंपट दुर्धर्श ॥४८॥
भूतवर्तमानज्ञान । भूतांला येतें स्पष्ट कळून ।
तिचा पती गेला हें जाणून । पतिसा होऊन ये घरीं ॥४९॥
त्याची भार्या पतिव्रता । नेणें तयाचिया कपटा ।
पती आला जाणूनि त्वरिता । हास्यवदनें पुढें आली ॥५०॥
तया आसन देऊण । पादप्रक्षालन करून ।
तें तीर्थ शिरसा वंदून । वायू घालूनी श्रम वारी ॥५१॥
मंद मंद वाक्यें बोले । त्वरित कां आगमन झालें ।
किंवा अपशकुन पाहूनी फिरविलें । काढिलेलें प्रस्थान माघारा ॥५२॥
किंवा माझ्या स्नेहामुळें । प्रवासीं मन न वळे ।
सतीचें मन विरहें वाळे । तुम्हां कळे हे यथार्थ ॥५३॥
मग तो कपटी काय बोले । ज्याकरितां मीं गमन केलें ।
ते मार्गीं जवळचि भेटले । त्यांणीं फिरविलें माघारां ॥५४॥
अशी ऐकूनी त्याची उक्ती । म्यां मागें फिरविली गती ।
पुन: जाऊं मासांती । व्यर्थ तुला वियोगार्ति कां द्यावी ॥५५॥
असें हें कपट्याचें वचन । तिणें सर्व ऐकून ।
तें यथार्थ मानून । करी तत्सेवन निष्कपटें ॥५६॥
अशी तीशी वश करून । तो झोटिंग दुर्जन ।
तीशीं रमे अनुदिन । पतीसमान होवोनी ॥५७॥
वय अवस्था रूप शीळ । शब्द वर्ण आकार सरळ ।
चाल चालणूक सकळ । दावी खळ पतीसमान ॥५८॥
रात्रौ करितां संग । तिचें चुरलें सर्वांग ।
परी त्याचा पुरा न हो भोग । ज्या नये भंग सुरतयुद्धीं ॥५९॥
त्याचें बळ दांडगेपण । भोगशक्ती दारुण ।
विकारही विलक्षण । जाणूनि शीण पावे नारी ॥६०॥
ती नारी खिन्न होउनी । विचार करी आपुले मनीं ।
भोग न देतां धर्महानी । देतां ग्लानी येतसे ॥६१॥
असें चिंतूनी हो दु:खित । त्याविषयीं संदेह वाटत ।
परी सांगावया लाजत । हा अनर्थ इतरांप्रती ॥६२॥
प्रत्यहीं सर्वरात्र तिला भोगितां । तया नये तृप्तता ।
तिये आली कृशता । तंव मास लोटतां पती आला ॥६३॥
तो द्वारीं पातला । तंव स्वसमान एक दारीं बैसला ।
तो त्याणें पाहिला । संदेह झाला तयासी ॥६४॥
विप्र म्हणे तूं कोण । माझें रूप घेऊन ।
माझे घरीं राहून । कापट्य करून साचा होशी ॥६५॥
झोटिंग बोले तया लागूनि । मी प्रख्यात घरधनी ।
तूं कोण आलासी कोठुनी । माझें रूप घेऊनी कपटिया ॥६६॥
तूं कपटी तूं कपटी म्हणती । असे परस्पर भांडती ।
तेथें ग्रामस्थ लोक येती । तेही भुलती तयां पाहतां ॥६७॥
दोनी दिसती समान । खरा खोटा निवडी कोण ।
त्यांचें भांडण दारुण । निवारील कोण कसें ॥६८॥
विप्र म्हणे सर्वांसी । घरांतूनी दवडा यासी ।
तो म्हणे दारांतून यासी । घालावा तुम्ही ग्रामलोक ॥६९॥
माझी नारी सुंदर । भोगीन म्हणतो हा पामर ।
करुनी आला रूपांतर । परी मी घर न सोडीन ॥७०॥
जरी करील हा बलात्कार । तरी मारीन मी ठार ।
हें ऐकूनी ते नर । कांहींच उत्तर न देती ॥७१॥
सासूसासरे विप्राचे । येऊनी पाहती रूप त्याचें ।
ते म्हणती विष्णुदत्ताचे । घरीं न्यावें या दोघां ॥७२॥
जेणें आराधिला दत्त । सर्वज्ञ तो विष्णुदत्त ।
सर्वांचें ओळखी चित्त । तो निश्चय करील ॥७३॥
मानलें हें वचन सर्वांस । सर्व म्हणती त्या दोघांस ।
घेऊनियां स्त्रियेस । विष्णुदत्ता भेटूं चला ॥७४॥
तेंही बरें म्हणून । स्त्रियेसी पुढें करून ।
तेही दोघे निघोन । विष्णुदत्ता येऊनी भेटले ॥७५॥
सर्व वर्तमान ऐकून । सत्कारें सर्वां बैसवून ।
झोटिंगालाही ओळखून । बोले वचन विष्णुदत्त ॥७६॥
अवस्था वय रूप शील । स्वर वर्ण आकार सकळ ।
नाम गोत्र आणि कुल । सांगा आपुलें दोघेही ॥७७॥
दोघेही एकच बोलत । तयां म्हणे विष्णुदत्त ।
यांत काय करावें निश्चित । आतां उपाय करितों मी ॥७८॥
जें करीन प्रमाणेंसी । तें मान्य होईल लोकांसी ।
क्षमा मागतों तुम्हासी । सभ्य म्हणती बहु बरें ॥७९॥
असें बोलूनी विप्रमस्तकीं । श्वेतमुद्रा तो रेखी ।
लाल मुद्रा भूत मस्तकीं । मंत्रें रेखी सुव्यक्त ॥८०॥
लोकां म्हणे मुद्रेवरून । चित्तीं धरा तुम्ही खूण ।
मंत्रित मुद्रा बदलून । न टाकवेल भूताला ॥८१॥
असें बोलूनी विष्णुदत्त । विप्रा बोलावूनी पुसे व्यक्त ।
भांडीं वस्त्रें धन घरांत । काय आहेत सर्व सांग ॥८२॥
स्त्रियेच्या गुप्त खुणा । सर्व सांग तूं ब्राह्मणा ।
ब्राह्मण ह्मणे यथार्थ जाणा । न सांगवेल पात्रादिक ॥८३॥
स्त्रियेच्या बाह्य खुणा । ठाऊक असती आपणा ।
याहूनि गुप्त खुणा । नेणे म्हणे सभेंत ॥८४॥
भूत सांगे पात्र वस्त्र धन । पात्रांचेंही वजन ।
म्हणे घराच्या इटाही जाण । सांगेन जरी पुसाल ॥८५॥
बाह्यांतर खुणा स्त्रियेच्या । सांगतां मनीं सभ्यांच्या ।
शंका आली बोलती वाचा । हा न साचा यथार्थ ॥८६॥
विष्णुदत्त म्हणे तयांसी । ह्या पंचक्रोशी क्षेत्रासी ।
प्रदक्षिना करूनी आम्हापाशीं । पूर्वीं येईल त्यासी सत्य मानूं ॥८७॥
बरें म्हणोनी दोघे जाती । घटिकेनें पिशाच ये मागुती ।
म्हणे प्रदक्षिणा करूनी क्षेत्राप्रती । तुम्हांप्रती प्रथम आलों ॥८८॥
सभ्य पुसती खुणा तया । तो यथार्थ सांगे तयां ।
ते म्हणती हें तों मनुष्या । घटिकेमध्यें न घडेल ॥८९॥
तेव्हां वाटतो हा भूत । दोन प्रहरांनीं विप्र येत ।
कांहीं कांहीं खुणा सांगत । तें यथार्थ सभ्य म्हणती ॥९०॥
विष्णुदत्त म्हणे ह्या पर्वतीं । सिद्ध किती वसती ।
पुसोनी त्यांच्या नामगोत्राप्रती । पर्वता प्रदक्षिणा करावी ॥९१॥
प्रदक्षिना करून । जो भेटेल पूर्वीं येऊन ।
सत्यपणा त्यावरून । आम्हां कळोन येईल ॥९२॥
असें ऐकूनी वचन । दोघे जाती निघोन ।
लोटितां घटिका दोन । प्रदक्षिणा करूनी भूत आला ॥९३॥
यथास्थित सर्व सांगे । विप्र पांच प्रहरांनीं ये मागें ।
विष्णुदत्ताप्रती सांगे । न भेटले सिद्ध कोणी ॥९४॥
हें ऐकतां विप्राचा विश्वास । झाला सर्व सभासदांस ।
विष्णुदत्त म्हणे तयास । परीक्षा एक शेष राहिली ॥९५॥
असें म्हणूनी लोखंडाची झारी । विष्णुदत्त तयापुढें करी ।
म्हणे इच्या मुखानें जाऊनी अंतरीं । तोटीनें बाहेर निघावें ॥९६॥
असें म्हणूनी स्वांगरक्षा करी । भूत मुखानें प्रवेश करी ।
विष्णुदत्त मंत्र उच्चारी । आच्छादित करी दोनी तोंडें ॥९७॥
तोटी मुख बंद होतां । मार्ग न मिळे भूता ।
हें कृत्य पाहतां । सर्वांला आनंद झाला ॥९८॥
उचलतां जड झाली झारी । तो गाडिली पर्वतावरी ।
तो आनंद सर्वांतरी । न माये त्यावरी भक्त बोले ॥९९॥
येतांच ओळखिला भूत । एकाएकीं करितां निगृहीत ।
माझ्यावरी समस्त । दोष निश्चित ठेवितील ॥१००॥
म्हणोनी हा यत्न केला । सर्वांचा संशय फिटला ।
झोटिंगही बद्ध झाला । सोडविली अबला ब्राह्मणी ॥१०१॥
शास्त्रकर्में करून । अज्ञानाचें करिती निरसन ।
तेणें संशय जाऊन । आत्मज्ञान जेंवी होतें ॥१०२॥
तसा करितां हा उपाय । प्रथम झाला संशय ।
दुसरे वेळीं गेला संशय । झाला निश्चय तिसरे वेळीं ॥१०३॥
आतां कोणी शब्द न ठेविल । आतां भूतही न सुटेल ।
साध्वीलाही दोष न लागेल । माझा बोल निश्चित ॥१०४॥
ऐकूनी असें वचन । साधु साधू ह्मणोन ।
लोक जाती निघोन । सस्त्रीक ब्राह्मण वंदन करी ॥१०५॥
म्हणे माझें अरिष्ट घालविलें । झोटिंगाचें बंधन केलें ।
माझें गह्र मला दिधलें । यश गाजविलें हें जगीं ॥१०६॥
तुम्ही भगवद्भक्त समर्थ । तुम्हां मुळींच नाहीं स्वार्थ ।
तुमचें जिणें परार्थ । सार्थकता हीच तयाची ॥१०७॥
असें म्हणूनी दंपती वंदिती । निरोप घेऊनी घरीं जाती ।
गुरू म्हणे इंद्राप्रती । शास्त्रें जाती संशय ॥१०८॥
तंत्रशास्त्रें करून । होतां भ्रमनिरसन ।
सत्य कळलें हें तसेंचि जाण । ब्रम्हज्ञान होतसे ॥१०९॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये दशमोsध्याय: ॥१०॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर
