दत्त चरित्र, अध्याय १६ ते २० ओवीबद्ध

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १६ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्।
श्रीगणेशाय नम: ॥

गुरु म्हणे रे दीपका । जो जगीं दावी कौतुका ।
ज्याचे अनुग्रहें बोले मुका । सच्चित्सुखात्मक जो दत्त ॥१॥
तेणें साक्षात् उपदेशितां । सिद्धी ये अर्जुनाचे हातां ।
कोण मानी या अद्भुता । यन्नाम घेतां भयनाश ॥२॥
अर्जुनाचें तें वचन । श्रीदत्तात्रेय ऐकून ।
बोले आतां तुझें मन । काय इच्छी सांगावें ॥३॥
अर्जुन म्हणे श्रीगुरूसी । आज्ञा होईल जशी ।
वागणूक करीन तसी । नाहीं मानसीं अन्य भाव ॥४॥
आज्ञा झालिया गुहेंत । जावूनी बैसेन समाहित ।
अथवा हें स्वरूप पहात । बसतां चित सुखावेल ॥५॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । आजी करी संध्यावंदना ।
करूनियां भोजना । उद्या आसनावरी बैस ॥६॥
तथास्तु म्हणूनी अर्जुन । करी संध्यावंदन ।
गुरुप्रसाद सेवून । घालवी दिन सेवेंत ॥७॥


दुसरे दिवसीं उठून । नित्यकर्म करून ।
श्रीदत्तातें वंदून । गुहेंत जावून बैसला ॥८॥
करूनी मनाचें समाधान । सुषुम्णामार्ग धरून ।
ब्रह्मरंध्रीं प्राण नेवून । लीन होवून राहिला ॥९॥
तीन मास सतत । जाहला समाधिस्थ ।
पुन: षण्मासपर्यंत । समाधिस्थ जाहला ॥१०॥
पुन: एक वर्षपर्यंत । अर्जुन राहतां समाधिस्थ ।
येवूनीयां श्रीदत्त । म्हणे हा उत्थित न होय ॥११॥
राहिलें स्वत: उत्थान । म्हणूनी शिरीं कर ठेवून ।
समाधी तयाची उघडून । उठविला बळें श्रीदत्तें ॥१२॥
प्रयत्नें देहावरी । अर्जुन तो ये जरी ।
तयाचीं इंद्रियें अंतरीं । ओढ घेती स्वरूपीं ॥१३॥
अंत:करण न फिरे । तेव्हां मग योगिवरें ।
स्वेच्छेनें फिरविलें सारें । प्राणेंद्रियांत:करणग्राम ॥१४॥
हळू हळू अंगें हालवून । देहावरी आला अर्जुन ।
हळूच नेत्र उघडून । करी दर्शन गुरुपदाचें ॥१५॥
होतां पदाचें दर्शन । अर्जुन झाला तल्लीन ।
समाधिसुख विसरून । नेत्र ताटून पाहतसे ॥१६॥
माशी जगी गुळावरी । चिकटे तशी चरणावारी ।
अर्जुनाची दृष्टी निर्धारीं । चिकटून राहिली निश्चळ ॥१७॥
जसी कां पतिव्रता नारी । जरी पती निवारी तरी ।
न होतसे दूरी । भावें धरी पतिचरणातें ॥१८॥
तसा निवारितां अर्जुना । त्याची दृष्टी फिरेना ।
मग हातीं धरूनी गुरुराणा । बैसवी अर्जुना स्वसंनिध ॥१९॥


श्रीदत्त म्हणे तूं माझा भृत्य । तुझें राहिलें नाहीं कृत्य ।
तूं झालासी कृतकृत्य । हें सत्य न संशय ॥२०॥
आतां त्वां नगरा जावें । प्रजेचें पालन करावें ।
अनासक्तीनें वागावें । भावें गावें माझें यश ॥२१॥
असें ऐकतां अर्जुन म्हणे । आतां कैचें येणें जाणें ।
खुंटलें अवघें बोलणें । धरणें घेतलें येथेंची ॥२२॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । अंगिकारावें माझ्या वचना ।
लावूनी स्वरूपीं मना । बाह्याचरणा करावें ॥२३॥
जरी अवशिष्ट नसे कृत्य । तरी आचारा सेवी अगत्य ।
स्वत:चें नसतांही कृत्य । होईल सत्य परोपकार ॥२४॥
धर्म आहे सनातन । त्याला न द्यावा सोडून ।
स्वयें धर्म आचरून । जना शिक्षण तें लावावें ॥२५॥
येणें होय परोपकार । नातरी सिद्धा पाहूनी इतर ।
वागतील जरी अनाचार । होईल संहार संकरानें ॥२६॥
लोकबाधा न व्हावी म्हणून । लोक जातील भुलोन ।
असें दखवावें बाहेरून । विपरीताचरण जनामाजी ॥२७॥
तूं गृहस्थ अससी । न टाकी वर्णाश्रमासी ।
करी त्रिविध कर्मासी । सक्ती मानसीं न धरितां ॥२८॥
जे असती मुक्त । ते कोठेंही न होती सक्त ।
त्याला करी अनुरक्त । असी वस्तु जगीं नाहीं ॥२९॥
सूर्य होतां शीतल । उष्ण होतां चंद्रमंडळ ।
अधोभागीं पसरतां अनल । न मानी नवल जीवन्मुक्त ॥३०॥
जसी कुग्रामललना । नागरी कांताच्या मना ।
न रमवी तसें मुक्तजना । न रमवी जनामाजी कोणी ॥३१॥
माझा जो म्हणावा । तो मुळींच न होयीं ठावा ।
ज्याचा हा मी म्हणावा । त्याचे गांवा नेणेची ॥३२॥


असा मुक्तांचा सिद्धांत । मीतूंपणाची नसे मात ।
तसा तूंही सतत । राहे यावत् प्रारब्ध ॥३३॥
श्रेष्ठ करी जसा आचार । पाहुनी तसा वागे इतर ।
जें प्रमाण मानी थोर । वागे इतर तदनुसारें ॥३४॥
येणें न होय अतिप्रसंग । बालासमान व्हावें असंग ।
गुणबुद्धीचा करूनी त्याग । वागतां व्यंग काय होय ॥३५॥
जो आत्मरती आत्मतृप्त । आत्मरूपीं संतुष्ट ।
त्याचें कार्य न अवशिष्ट । हें सर्व शिष्ट जाणती ॥३६॥
करितां पुण्य त्याणें । नलगे स्वर्गाप्रती जाणें ।
पापही करितां त्याणें । नरकीं जाणें न घडेल ॥३७॥
तथापी हेंची बरवें । पुण्यमार्गा अनुसरावें ।
चित्तीं लक्ष्य धरावें । लोकीं वागावें असंगत्वें ॥३८॥
आतां तूं जा स्वनगरीं । प्रजेचें पालन करी ।
यागीं देवां तृप्त करी । पितृतृप्ती करी श्राद्धान्नीं ॥३९॥
गायी भूमी कन्या सुवर्ण । रथ वस्त्र भूषण ।
देवूनी तोषवी विप्रगण । करी पालन दीनांधाचें ॥४०॥
पुन: पुन: येवून । घेई माझें दर्शन ।
राज्य करितां स्मरण । ठेवी अनुक्षण निजचित्तीं ॥४१॥
तूं कधीं न भुलसी । माझ्या स्वरूपा न विसरसी ।
अंतर्निष्ठ राहसी । बाहेर व्यवहार करितांही ॥४२॥
प्रवाहपतित कर्म जरी । शुभाशुभ घडेल तरी ।
त्याचें फळ तुझे शिरीं । काळांतरीं न येईल ॥४३॥


यापरी तूं जीवन्मुक्त । प्रारब्ध भोगी अनासक्त ।
तूं होसी विदेहमुक्त । हें मदुक्त सत्य सत्य ॥४४॥
असें परिसुनी वचन । सानंद झाला अर्जुंन ।
बोले करूनियां नमन । हें वचन शिरसां मानलें ॥४५॥
म्हणूनी पायां दृध धरी । प्रेमाश्रुंनीं क्षालन करी ।
हर्श न मावे अंतरीं । जरी आंवरी पुन: पुन: ॥४६॥
प्रेमाश्रुधारा नावरती । स्थिती नये देहावरती ।
म्हणे हे चरण अंतरती । हीच खंती वाटते ॥४७॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । जा मानूनी माझ्या वचना ।
चिंतितां ह्या चरणां । जाती न मनांतूनी तुझ्या ॥४८॥
म्हणोनी देती आलिंगन । करिती त्याची बोळवण ।
मनीं चिंतूनियां चरण । गेला अर्जुन नगरासी ॥४९॥
नगरीं येतां अर्जुन । समोर येती सर्वजण ।
नगर अलंकृत करोन । समारंभें नेती तया ॥५०॥
चंदनोदकाचे सडे । मार्गीं घालिती चहूंकडे ।
वाद्यें वाजविती पुढें । द्विजगण पढे आशिर्मंत्रां ॥५१॥
वारांगना नृत्य करिती । भाट बंदी यश गाती ।
जयजयकारें गर्जती । जनपंक्ती आनंदें ॥५२॥
सुभूषित पौरकन्याजन । माडीवरी चढून ।
लाह्या शिंपिती हर्षून । गुण गावून अर्जुनाचे ॥५३॥
मोत्यांनीं तोरणें बांधिलीं । गुढियांची पंक्ती उभारिली ।
शोभवूनी गल्लोगल्लीं । संतोषली सर्व प्रजा ॥५४॥
सोन्याचे ताटीं रत्नदीप । घेवूनी सुंदरी आल्या समीप ।
पाहुनी अर्जुनाचें स्वरूप । विरहताप घालविती ॥५५॥
सोळा सहस्त्र अर्जुनाच्या नारी । आल्या रत्नें घेवूनी करीं ।
ओवाळूनी अर्जुनावरी । रत्नें दूरी टाकिती ॥५६॥
तीं रत्नें घेवून । धनिक झाले जे दीन ।
अशा समारंभेंकरून । अंतरीं अर्जुन पातला ॥५७॥


सर्वांसी बैसवून । वस्त्राभरणें देवून ।
उत्तम गौरव करून । यथाधिकारें बोळवी ॥५८॥
सप्तद्वीप पृथिवीचें । राज्य असे जयाचें ।
एकटा पालन करी सर्वांचें । श्रीदत्ताचें वचन पाळी ॥५९॥
अनेक रूपें घेवून । सर्वत्र करी संचरण ।
कुठें काय करी कोण । हें दिसोन येत जया ॥६०॥
स्वच्छंद असे ज्याची गती । कोठेंही कुंठित न होई ती ।
जसी वायुची गती । तसी गती तयासी ॥६१॥
असूनी स्वयें ब्रह्मज्ञ । केले दहा हजार यज्ञ ।
जेथें अत्रिप्रमुख कर्माभिज्ञ । ऋत्विज प्राज्ञ सर्वही ॥६२॥
सोन्याच्या वेदी घालूनी । सुवर्ण मंडप उभारूनी ।
देवाला बोलावूनी । समारंभें यज्ञ करी ॥६३॥
दिव्याभरणें लेवूनी । देवस्त्रिया घेवूनी ।
येती विमानीं बैसूनी । देव यजनीं अर्जुनाच्या ॥६४॥
तेथें अप्सरा नाचती । गंधर्व सुस्वरें गाती ।
विप्रही वेद पढती । पुरंध्री गाती तत्कीर्ती ॥६५॥
असे भूप करी याग । देवां यथेच्छ दे हविर्भाग ।
ब्राह्मणही वेदपारग । सांग करिती अनुष्ठान ॥६६॥
भूमी सुवण धनान्न । विप्रां देई कन्यादान ।
तृप्त होती द्विजजन । पक्वान्न परमान्न जेवूनी ॥६७॥
दक्षिणेसी फोडी भांडार । यथेच्छ धन नेती द्विजवर ।
रितें न होय कोशागार । सिद्धी सादर रहाती जेथें ॥६८॥
रौप्यखुर स्वर्णश्रृंगी । सवत्स धेनू शोभनांगी ।
पयस्विनी नानारंगी । देई सात्विक वृत्तीनें ॥६९॥


धर्में राज्य करी अर्जुन । अकाळीं कोणा न ये मरण ।
न होती उत्पात दारुण । नसे दुर्भिक्ष ज्याचे राष्टीं ॥७०॥
यथाकाळीं पडे पर्जन्य । सर्वत्र उत्तम पिके धान्य ।
लोक होती वदान्य । मान्य राजा राज्य करितां ॥७१॥
कोणी नसती वंध्या नगरीं । फळें पुष्पें असती वृक्षांवरी ।
विधवा न होई भूमीवरी । न करती चोरी कोणीही ॥७२॥
मूषकादि उपद्रव न होती । कोणी अधर्म न करिती ।
सकळ लोक धार्मिक होती । कार्तवीर्य राज्य करितां ॥७३॥
खङ्ग चक्र धनुर्बाण । आपुल्या करीं घेवून ।
अनेक रूपें धरून । फिरे अर्जुन सप्तद्वीपीं ॥७४॥
ज्याचा रथ इच्छागमनी । हिंडे सकळ मेदिनी ।
अर्जुन त्यावरी बसोनी । पाहे नयनीं सप्त द्वीपें ॥७५॥
क्वचित् कोणी करितां चोरी । स्वयें जावूनी तया धरी ।
तो दंड्य होई तरी । ठार मारी धर्मात्मा ॥७६॥
दुष्टांचें करी शिक्षण । शिष्टांचें करी पालन ।
सर्वांचें अंत:करण । ओळखी क्षण न लागतां ॥७७॥
अदंड्या दंड न करी । दंड्या शास्त्रोक्त दंड करी ।
क्रोधें लोभें कोणा न मारी । कामारी परी विरक्त जो ॥७८॥
भलतें कोणी सांगतां । कानावरी न धरी सर्वथा ।
भलती भीड घालितां । न मानी सर्वथा धर्मज्ञ तो ॥७९॥
पूज्यांचे ठेवी सन्मान । ब्राह्मणाचा ठेवी बहुमान ।
हे भूसुर असे मानून । देई वस्त्रधन तयांसी ॥८०॥
असा राजा जीवन्मुक्त । होवूनियां अनासक्त ।
कधीं न हो विषयासक्त । ठेवी दत्तपदीं मन ॥८१॥
एके दिवसीं फिरतां । कर्कोटकाच्या सुतां ।
देखिलें दुराचार करितां । जाता झाला तत्संनिध ॥८२॥
त्यांशीं करूनियां युद्ध । तया केलें बाणविद्ध ।
करोनियां तयां बद्ध । त्याचें समृद्ध राज्य घेई ॥८३॥


तेथें पुरी वसवून । हजारों स्त्रिया घेवून ।
नर्मदातीरीं येवून । क्रीडा करून राहिला ॥८४॥
भुजसहस्त्रें करून । नर्मदेशीं पूल बांधून ।
प्रवाह पूर्वेस फिरवून । क्रीडा करून राहिला ॥८५॥
मनोहर वैजयंती माळा । घालूनियां आपुले गळां ।
करूनी स्त्रियांचा गोळा । क्रीडा करूनी राहिला ॥८६॥
देव विमानीं चकित पाहती । किन्नरींच्या निवी सुटती ।
अप्सरा भुलोन जाती । क्रीडा पाहतां अर्जुनाची ॥८७॥
त्या नर्मदेचा पती । पश्चिम समुद्र जया म्हणती ।
पाहुनी अर्जुनाची क्रीडा ती । कोपें दुर्मती खवळला ॥८८॥
राजाच्या अंगावर । एकाएकीं आला समुद्र ।
तया पाहून राजेंद्र । हास्य करूनी राहिला ॥८९॥
समुद्र होवूनी खळ । अंगावरी येतां चपळ ।
तया करुनी निर्बळ । केला निश्चळ जागोजागीं ॥९०॥
मग तो राजा अर्जुन । हजार बाहू उभारून ।
समुद्रीं उडी टाकून । करी ताडन जोरानें ॥९१॥
ताडित होतां समुद्र । पलायन करी सत्वर ।
मरोनी जाती जलचर । कांपे थरथरां पाताल ॥९२॥
समुद्रदेवता येवून । करीं रत्नें घेवून ।
अर्जुनातें पूजून । अभयदान मागतसे ॥९३॥
शरणागतपालन । करावें हें ज्याचें व्रत पूर्ण ।
तो धर्मात्मा अर्जुन । अभयदान दे तया ॥९४॥


जया नाहीं विषयाची गोडी । मग कैंची स्त्रियांची आवडी ।
प्रारब्धकर्म देहा ओढी । आसक्ती थोडी सुद्धां न त्याची ॥९५॥
समुद्र जलें भरला असतां । इच्छा नसोनी नद्या येतां ।
तयां मागें लोटूनी न देतां । घेई स्वांतरीं प्रारब्धयोगें ॥९६॥
तसा मुक्तही निष्काम । दैवें येवून मिळतां काम ।
तयां भोगितां इंद्रियग्राम । न क्षोभे उपशम पावला जो ॥९७॥
दगडाप्रमाणें संतत । बसणें हे जीवन्मुक्तीव्रत ।
म्हणती ते केवळ अज्ञात । श्रुतिसिद्धांत नेणती ते ॥९८॥
शास्त्रप्रमाणें प्रबळ ज्ञान । साधका मिळे तें पूर्ण ।
अज्ञानतत्कार्यनाशन । करी कर्म हेंची तयाचें ॥९९॥
त्या ज्ञानाचा नाश करी असें । विशेष प्रबळ प्रमाण नसे ।
म्हणूनी आत्मज्ञान न नासे । कसें तरी वागतांही ॥१००॥
नाश करणें प्रारब्धाचा । हा धर्म नसे तयाचा ।
नाश करणें आवरणाचा । हा तयाचा धर्म होय ॥१०१॥
म्हणूनियां तत्वज्ञानी । प्रारब्ध भोगूनी राहती जनीं ।
भोगाचा शिण न घेती मनीं । ते जाणूनी प्रारब्धतत्व ॥१०२॥
ज्ञानी अज्ञानी या दोघांसी । भोग जरी समानेंसि ।
तरी काय विशेष तयांसी । म्हणसी तरी ऐक बा ॥१०३॥
स्वानुसंधान ठेवूनी ज्ञानी । स्वप्नापरी प्रारब्ध भोग मानी ।
म्हणूनी तो न शिणे मनीं । राहे जनीं उदासीन ॥१०४॥
कदाचित् भोगकालीं । मी मर्त्य ही वृत्ती उदेली ।
त्याणें ज्ञानाची हानी झाली । हें त्रिकालीं घडेना ॥१०५॥
जे रागद्वेषादिक । तीं अज्ञानाचीं चिन्हें देख ।
ज्ञानें समूळ रागादिक । नासतां शोक मग कोणा ॥१०६॥
अज्ञानी हें तत्व नेणे । म्हणोनी दु:खादिकें शिणे ।
रागद्वेषयुक्त घालवी जिणें । शोकदु:ख भेणें घे सतत ॥१०७॥
हा तयांचा विशेष जाण । ज्ञान्याचें कर्म अशुक्लकृष्ण ।
म्हणोनी प्रारब्धें भोगी अर्जुन । उदासीपणें भोग ॥१०८॥


इति श्रीदत्तमाहात्म्ये षोडशोsध्याय: ॥१६॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १७ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य

श्रीगणेशाय नम: ॥


गुरु म्हणे शिष्य ऐक । राजा परम धार्मिक ।
असा वागे धरूनी विवेक । अनेक कार्यें करूनियां ॥१॥
स्वरूपीं ठेवूनी अनुसंधान । करी यज्ञतपोदान ।
ब्राह्मणाचें नित्य पूजन । करी पालन प्रजेचें ॥२॥
जो औरस पुत्रापरी । प्रजेचें पालन करी ।
विशेषें यज्ञयागावरी । प्रीती धरी अर्जुन ॥३॥
श्रीगुरुदत्तप्रीत्यर्थ । अश्वमेध आरंभी यथार्थ ।
तो असतां कृतार्थ । स्वर्गार्थ यज्ञ करील कीं ॥४॥
तो समर्थ जाणूनी । त्याचा अश्व न धरी कोणी ।
अश्वमेध सांग होवूनी । जाती म्हणूनी भीती देव ॥५॥
त्याचें अंत:करण न जाणती । म्हणोनी देव भय पावती ।
एकत्र होवूनी सर्व म्हणती । आतां गती काय आमुची ॥६॥
आम्हां वाटतो उद्वेग । रायाचे निर्विघ्न होती याग ।
आतां तो घेईल स्वर्ग । होतां सांग सयज्ञ ॥७॥
तरी यासी करावा उपाय । जेणें पडेल अंतराय ।
राजाला विप्र असती प्रिय । हा निश्चय ठावा असे ॥८॥
यास्तव कोणीतरी । विप्रवेष घेऊनी भूमीवरी ।
जावूनियां त्याचे द्वारीं । सत्व हरावें तयाचें ॥९॥
आम्हांमध्यें सूर्य समर्थ । पुरवील सर्वांचे मनोरथ ।
त्यावांचूनियां हा अर्थ । साधाया समर्थ दुजा नसे ॥१०॥
असा विचार करूनी सुर । सूर्या धाडिती भूमीवर ।
सूर्य होउनी द्विजावर । माहिष्मतीसी पातला ॥११॥
वैश्वदेवसमयीं । अर्जुन बळी टाकूं येई ।
सूर्यही त्या समयीं । येई समोर रायाच्या ॥१२॥
पोट पाठीस लागलें । डोळेही खोल गेले ।
अडखळती पाउलें । शब्द न खुले बाहेर ॥१३॥
राजा देखूनी विस्मय करी । म्हणे राहे कोण्या देशांतरीं ।
असा दीन भूमीवरी । अद्यापवरी न पाहिला ॥१४॥
राजा समोर जाऊन । नमस्कार करून ।
म्हणे कुठूनी झालें आगमन । काय आज्ञापन भृत्यासी ॥१५॥
विप्र म्हणे रायाप्रती । ऐकूनी आलों तुझी कीर्ति ।
तुला आतिथेय म्हणती । तुझी ख्याती तीन लोकीं ॥१६॥
तू ब्रह्मण्य अससी । परम दयाळू दिससी ।
याचकां अभीष्ट देशी । म्हणूनी घरासी आलों तुझ्या ॥१७॥


जे असती उदार । ते राज्यधनपुत्रदार ।
किंवा नश्वर शरीर । यावर लोभ न धरती ॥१८॥
उदार होसी तूं तरी । माझी आतां तृप्ती करी ।
तुजवीण या भूमीवरी । न दिसे अंतरीं निश्चय हा ॥१९॥
राजा म्हणे पुरें बोल । तुझी तृप्ती केंवी होईल ।
ब्राह्मण माझें दैवत केवळ । देईन सर्वस्व माझ्यासकट ॥२०॥
विप्र म्हणे रायाप्रती । ही तुझी सप्तद्वीपा क्षिती ।
ईचेवरी उद्भिज असती । ते सर्व देतां तृप्ती होईल ॥२१॥
त्यांहीं मी तृप्त होईन । आणीक न इच्छा याहून ।
असें वचन ऐकून । हर्षें अर्जुन मनांत ॥२२॥
निश्चयें नव्हे हा नर । देवही फिरती भूमीवर ।
विष्णु गेला बळीच्या द्वारावर । तद्वत् हा अमर कोणी तरी ॥२३॥
हा दिसतो तेजस्वी । तेव्हां असावा हा रवी ।
ऐसा तेजस्वी येर्‍हवी । कोण दुसरा असेल ॥२४॥
असें मनीं चिंतून । म्हणे मागितलें देतों दान ।
परी सांगा तुम्ही कोण । मग ब्राह्मण बोलतसे ॥२५॥
मी दिवाकर भट । आलों भरावया पोट ।
लोकालोकावरुनी वाट । धरिली नीट येथवरी ॥२६॥
ऐकूनी अर्जुन हास्य करी । ह्मणे मी धन्य धरणीवरी ।
साक्षात् सूर्य माझें द्वारीं । याचक होऊनी पातला ॥२७॥
त्याचा धन्य गृहस्थाश्रम । त्याचा सफळ आचारश्रम ।
त्याचाची चुकला भ्रम । महात्मा अतिथी घरीं येतां ॥२८॥
मी दत्तात्रयकृपापात्र । जाणें योग विचित्र ।
योगबळें सर्वत्र । पुन: उद्भिज उपजवीन ॥२९॥


असा निश्चय करून । वृक्ष द्यावया अर्जुन ।
सिद्ध झाला तंव तपन । दावी प्रगटून निजरूप ॥३०॥
तें स्वरूप पाहून । हृष्ट झाला अर्जुन ।
म्हणे दिल्हें वृक्षदान । प्रतिग्रहण करावें ॥३१॥
सूर्य म्हणे रायासी । तूं खास उदार अससी ।
तरी शुष्क करूनी वृक्षांसी । देतां भक्षीन अग्निरूपें ॥३२॥
राजा म्हणे जें दान । मागितलें तें देईन ।
न करी मी वृक्षशोषण । तूं भक्षण करी सुखें ॥३३॥
सूर्य म्हणे देतों बाण । त्यांचें करी तूं संधान ।
त्यांही वृक्ष जाती वाळून । मग मी भक्षण करीन ॥३४॥
असें म्हणून भाते । देई सूर्य रायातें ।
राजाही पांचशें धनुष्यांतें । सज्ज करूनी बाण योजी ॥३५॥
एका एका बाणापासून । उपजती सहस्त्र सहस्त्र बाण ।
एकेक हजारों उद्भिज्ज शोषून । शुष्क करती क्षणार्घें ॥३६॥
ग्रामी नगरी पर्वतावरी । दुर्गवनीं नदीतीरीं ।
वृक्ष होते जे भूमीवरी । ते क्षणांतरीं जळाले ॥३७॥
ज्या ज्या वृक्षा बाण लागती । ते ते तात्काळ वाळती ।
अग्निरूपें तयाप्रती । सूर्य जाळी क्षणार्धें ॥३८॥
तृण गुल्म वृक्ष लता । सर्व हीं भस्म होतां ।
तो वसिष्थ ध्यानस्थ होता । तो उठिला त्या वेळीं ॥३९॥
वृक्ष जळती आश्रमस्थ । तें पाहूनी शिष्यां पुसत ।
शिष्य सांगति बाणघात । केला अपरिमित अर्जुनें ॥४०॥
हें ऐकतां वचन । ध्यानें विचार करून ।
होऊनी कोपायमान । निष्ठुर वचन बोले मुनी ॥४१॥
दुर्बुद्धी हा अर्जुन । राज्यभरें मत्त होऊन ।
माझा आश्रम टाकिला जाळोन । त्याला शिक्षण देईंन मी ॥४२॥
बळाचा दर्प असे याला । हा अतिशय मत्त झाला ।
प्रतियोद्धा नाहीं याला । म्हणोनि झाला हा उन्मत्त ॥४३॥


अर्जुना गर्व पुरे आतां । जमदग्नीला सुत होतां ।
तो तोडूनी तुझ्या हातां । शिरच्छेद करील ॥४४॥
असें क्रोधावेशेंकरून । बोले वसिष्ठ शापवचन ।
तपस्व्याचें तें वचन । अन्यथा कोण करील ॥४५॥
अर्जुन हा ब्राह्मणभक्त । वसिष्ठही अत्यंत शांत ।
तो हा असा शाप देत । येथें कारण भाविदैव ॥४६॥
होणारी ईश्वरी करणी । निमित्तमात्र होती प्राणी ।
स्वतंत्र नसती कोणी । वेदवाणी असी असे ॥४७॥
सर्व स्थावर जाळून । सूर्य गेला निघोन ।
अर्जुनें योगबळें करून । केलें वृक्षजीवन पूर्ववत ॥४८॥
अति दारुन ब्राह्मणाचा रोष । तच्छाप हें अनिवार्य विष ।
करी प्राणाचा शोष । हा दोश्व्ह न समवे ॥४९॥
शाप होतां अर्जुन । तत्काळ उद्धत होऊन ।
स्वर्गावरी जाऊन । देवा जिंकूं म्हणतसे ॥५०॥
त्याचे पुत्र बहुत । तयां नगरीं ठेवित ।
आपण विमानीं बैसत । स्वर्गाप्रत जावया ॥५१॥
ज्याच्या ऐश्वर्या तुळणा नाहीं । किंकरी सिद्धि त्याही ।
ज्याची गती कुंठित नाहीं । कोणी आज्ञाही न उल्लंघी ॥५२॥
स्मृतिगामी उग्रशासन । अनेक देह धरून ।
त्रिभुवनीं करी गमन । सर्वांचें मन ओळखी जो ॥५३॥
दिव्य विमानीं बैसून । स्वर्गी चाले अर्जुन ।
चैत्ररथी येऊन । क्रीडा करून राहिला ॥५४॥


पाहुनी त्या अवसरीं । यक्ष धांवले तयावरी ।
शस्त्रें सोडिती नानापरी । अर्जुन निवारी सर्वांतें ॥५५॥
नराचें मुख अश्वाचे देह । अश्वाचें मुख नराचे देह ।
असे किन्नरांचे समूह । यक्षांसह लोटले ॥५६॥
महाबल अर्जुन । पांचशें धनुष्य सज्ज करून ।
सोडी बाणावरी बाण । यक्षगण मग भ्याले ॥५७॥
छिन्न भिन्न होता देह । प्राणावरी येतां संदेह ।
यक्षकिन्नर समूह । पावले मोह त्या युद्धीं ॥५८॥
ते करिती पलायन । तयां सोडूनी दे अर्जुन ।
शस्त्रांतें सांवरून । स्वर्गभुवना चालिला ॥५९॥
त्याला पाहूनी देवदूत । जाऊनी इंद्राप्रती सांगत ।
तों अर्जुन पातला अकस्मात । दिसे कृतांतसा देवां ॥६०॥
सहस्त्रबाहू महाशूर । अर्जुन येतां समोर ।
घेवोनियां सर्व निर्जर । शचीवर सरसरला ॥६१॥
तेथें झालें तुमुल युद्ध । सर्व देव झाले विद्ध ।
आश्चर्य करिती सिद्ध । पाहुनी अर्जुनाच्या पराक्रमा ॥६२॥
अर्जुनाचे लागतां बाण । देवां अंगींचें गेलें त्राण ।
मग व्याकुळ होती प्राण । पलायन करूं इच्छिती देव ॥६३॥
मोहनास्त्र टाकूनी । देवां मोहित करूनी ।
अर्जुन येऊनी नंदनवनीं । क्रीडा करूनी राहिला ॥६४॥


शचीसह एके दिनीं । इंद्र विमानीं बैसूनी ।
पुढें ऐरावता चालवूनी । नंदनवनीं पातला ॥६५॥
तों देखिला अर्जुन । त्यावरी कोपायमान होऊन ।
वज्र वरतें उचलून । सहस्रनयन पुढें झाला ॥६६॥
तें देखून अर्जुन । हातीं विमान उचलून ।
शचीसहित इंद्रा घेऊन । गर्जना करूनी चालविला ॥६७॥
इंद्र करी आकांत । धावां धांवा देवां ह्मणत ।
देवही आले धांवत । अर्जुनाप्रत झुंजाया ॥६८॥
तेथें युद्ध झाले तुमुल । देवांचें खचलें बल ।
अर्जुनाचा प्रताप विशाल । न टिके काल जयापुढें ॥६९॥
जो योगाभ्यासधुरंधर । त्याचा देह वज्रसार ।
त्याला कोण देईल मार । खचले निर्जर मनांत ॥७०॥
कोणी होती विवस्त्र । कोणी टाकून देती शस्त्र ।
कोणी झांकिती नेत्र । कोणी वक्त्र मुरडाती ॥७१॥
कोणी हात जोडिती । त्राहि त्राहि ह्मणती ।
देव असे दीन होती । मग नृपती सोडी तयां ॥७२॥
सुटतांचि इंद्र तेथून । सर्व देवां घेऊन ।
मेरूवरी येऊन । खिन्न होऊनी वदतसे ॥७३॥
देवां दिधला स्वर्गलोक । मनुष्यां दिधला मर्त्यलोक ।
ब्रह्मदेवें तया हें दु:ख । चला निवेदन करूंया ॥७४॥
मनुष्य असूनी हा अर्जुन । बळें स्वर्गीं येऊन ।
व्यर्थ आम्हांसीं लढून । स्वर्गभुवन घेतसे ॥७५॥


हा तों बळी अनिवार । श्रीदत्तवरें झाला अमर ।
हा आमुचा करील चूर । चला सत्वर ब्रह्मया सांगों ॥७६॥
असें हें इंद्रवचन । मान्य करूनी देवगण ।
इंद्रा पुढें करून । ब्रह्मभुवना पातली ॥७७॥
जेथें वेद मूर्तिमंत । ब्रह्मदेवा वेष्टुनी राहत ।
सनत्कुमारादि ब्रह्मभूत । स्तविती ज्याला सदैव ॥७८॥
पाहूनियां चतुर्मुखा । देव विसरूनि दु:खा ।
पावले परमसुखा । ज्यांच्या हरिखा पार नाहीं ॥७९॥
साष्टांग नमन करूनी । देव उभे राहूनी ।
करसंपुट जोडूनी । स्तवन करिती तयाचें ॥८०॥
जयजया कमलासना । जगदुत्पादका चतुरानना ।
जगत्पालका जगज्जीवना । कमलजनना तुज नमो ॥८१॥
आह्मी तुझे आज्ञाधारक । आज्ञेनें वागतों जसे सेवक ।
आजपावेतों पावलों सुख । आतां दु:ख वोढावलें ॥८२॥
श्रीदत्ताच्या वरानें । उन्मत्त होऊनी अर्जुनानें ।
स्वर्गीं येऊनी बळानें । आह्मां केलें जर्जर ॥८३॥
तो नावरे सर्वथा । शस्त्रास्त्रें जाती वृथा ।
खुंटला आमुचा पंथा । आह्मीं आतां काय करावें ॥८४॥
ब्रह्मा ह्मणे देवांसी । चला जाऊं वैकुंठासी ।
भक्तकैवारी लक्ष्मीविलासी । वैकुंठवासी तारील ॥८५॥
ह्मणोनी सर्व निघती । वैकुंठाप्रती येती ।
मनीं नारायणा स्मरती । प्रेमें गर्जती नामघोषें ॥८६॥
जें वैकुंठभुवन । आनंदाचें मुख्य स्थान ।
स्वप्नींही ज्याचें स्मरण । न होई जाण दुर्भगां ॥८७॥
नलगे सूर्यादिकांचा प्रकाश । जें असे स्वयंप्रकाश ।
जेथें रोगचिंताक्लेश । लेशमात्रही न राहती ॥८८॥


सर्व काल सुखावह । जेथें नसे शोकमोह ।
पूर्णानंदाचें गृह । गरुडवाहधाम तें ॥८९॥
जें शांत दांत निर्मत्सर । निष्कपटी निरहंकार ।
जे अहैतुकीभक्तितत्पर । ते तें पुर पाहती ॥९०॥
जेथें वनें कल्पद्रुमांचीं । वृंदें फिरती कामधेनूचीं ।
सरोवरें अमृताचीं । चिंतामण्यांचीं सोपानें ॥९१॥
जेथें सुवर्णाच्या भिंती । रत्नजडित विराजती ।
जिवंत चित्रें भासती । कुंठित मती होय जेथें ॥९२॥
त्या वैकुंठाप्रती । देवांसह शचीपती ।
येवूनीयां द्वाराप्रती । द्वारपाळा जाणविलें ॥९३॥
विष्णुसारिखे द्वारपाळ । चतुर्भुज घननीळ ।
जयविजयानामें विमळ । ते कळविती विष्णूते ॥९४॥
विष्णूचे आज्ञेंकरून । देवांसह चतुरानन ।
अंतरीं येवूनी जाण । कमळलोचन पाहती ॥९५॥
वामांकीं लक्ष्मी घेवून । पीतांबर पांघरून ।
शंकचक्रगदा घेऊन । बैसला मधुसूदन आनंदें ॥९६॥
त्याला घालिती लोटांगण । देव स्तविती कर जोडून ।
जयजय जगज्जीवन । नारायणा तुज नमो ॥९७॥
तूं भक्तपाळक कृपाघन । निजभक्तांचें जीवन ।
पाहोनियां सुदीन । करिसी मन कनवाळू ॥९८॥
त्वां अवधूतरूपानें । अर्जुना दिल्हीं वरदानें ।
आजि बलात्कारें त्याणें । देवस्थानें घेतलीं ॥९९॥
आह्मी देव तुझे किंकर । आमुचा तूंची आधार ।
करा आतां प्रतिकार । राखावें अधिकार आमुचे ॥१००॥
असें स्तवितां देवांनीं । विष्णू विचार करी मनीं ।
अर्जुना शाप दे मुनी । म्हणोनी तो क्षोभला ॥१०१॥
तो असे जीवन्मुक्त । प्रारब्ध ह्या चेष्टा होत ।
त्याला स्वर्गाचा नसे स्वार्थ । व्यर्थ चेष्टा करीतसे ॥१०२॥
तसें अर्जुनाचें आचरण । काय जाणती अमरगण ।
त्याचें प्रारब्धही झालें पूर्ण । घेईल तूर्ण विदेहमुक्ती ॥१०३॥
ख्यात्याधिकाचे करीं । वध नेमिला मीं जरी ।
तया अर्जुना मारी । ब्रह्मांडोदरीं असा नाहीं ॥१०४॥
तरी म्यांच अवतारून । धारातीर्थीं देह ठेववून ।
द्यावें तया विदेहमुक्तिदान । झाला पावन पूर्वींच तो ॥१०५॥
असा विचार करून । देवां म्हणे जनार्दन ।
मी जमदग्नीपासून । रेणुकानंदन होऊन ॥१०६॥
अर्जुनासी युद्ध करीन । संग्रामीं तयासी जिंकीन ।
तुम्ही चिंता सोडून । चला स्वस्थान लक्षूनी ॥१०७॥
ऐकोनी विष्णूचें वचन । देव आनंद पावून ।
विष्णूची आज्ञा घेवून । हर्षें स्वस्थाना परतले ॥१०८॥


इति श्रीदत्तमाहात्म्ये । सप्तदशोsध्याय: ॥१७॥
श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर


भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १८ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य।
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ।

गुरु म्हणे दीपकासी । जमदग्नी कोण ऋषी ।
रेणुका माता झाली कशी । हृषीकेशाची सांग ॥१॥
विष्णु स्वयें अवतारून । अर्जुनासी कां संग्राम करून ।
कसा जिंकी जनार्दन । हें विस्तरून सांगावें ॥२॥
द्विजरूप कां धरी । निजभक्तासी कां मारी ।
हें सर्व सविस्तरीं । प्रश्नोत्तरीं निरोपावें ॥३॥
ऐकून शिष्याचें वचन । वेदधर्मा हर्षोन ।
म्हणे ऐक शिष्या सावधान । साद्यंत निरोपितों ॥४॥
जन्मांत देव नेणून । संकटें येतां मी तुझा म्हणोन ।
जो एकदांच ये शरण । त्यालाही अभयदान दे देव ॥५॥
हा तरी नित्ययुक्त । असे अर्जुन एक भक्त ।
केवी टाकील त्याला दत्त । तच्चित्तानुसार वागे जो ॥६॥
जीवन्मुक्त अर्जुन । श्रीदत्तापासीं येवून ।
विनवी हात जोडून । माझें हनन तुम्ही करा ॥७॥
क्षत्रियाचा देह बरवा । तो धारातीर्थीं पडावा ।
तरी हें कार्य न करवेल देवा । मानवाचा काय पाड ॥८॥
हा तो योगी श्रेष्ठ । असे महाबलिष्ठ ।
याला मारील असा वरिष्ठ । न दिसे ब्रह्मांड शोधितां ॥९॥
देव म्हणे तयासी । म्यां प्रतिपाळिलें तुजसी ।
या हातीं मारावयासी । मती कसी होईल ॥१०॥


अर्जुन म्हणे हें जरी । तुला न रुचे तरी ।
मृत्यु न यावा हीनाच्या करीं । रोगादिकें तरी न द्यावा ॥११॥
तुम्हां सम वरिष्ठ असेल । त्या करीं यावा अंतकाल ।
असा वर मागे भूपाल । देव तो बोल अंगिकारी ॥१२॥
हें वरदान ठेवूनी अंतरीं । देवांनीं प्रार्थितां मधुवैरी ।
स्वयें हा अवतार धरी । ब्राह्मणाघरीं ख्यात्याधिक ॥१३॥
यांत ईश्वरा काय दोष । काय तया असे रोष ।
भक्ताच्या इच्छेनें धरी वेष । प्रळयीं नि:शेष मारी जो ॥१४॥
जो ईश्वर निजकरीं । उत्पत्ती स्थिती लय करी ।
तो लेप न घे आपल्यावरी । उदासीनापरी वागे ॥१५॥
तो असे जनार्दन । बाळापरी क्रीडन ।
तया केवी ये बंधन । नित्यमुक्त असे जो ॥१६॥
जो उपजे भूमीवर । तया मृत्यु बरोबर ।
केवळ पडतां शरीर । जीवां विकार काय होय ॥१७॥
मुक्ताचें शरीर पडलें । तेणें त याचें काय गेलें ।
पूर्वींच विज्ञानबळें । बाधित केलें शरीर ज्याणें ॥१८॥
जशा जळीं लाटा येती । परस्परांवरी आदळती ।
जरी त्या फुटोनी जाती । जळाचा नाश होईल कीं ॥१९॥
तसे देह विकारी । हे नष्ट होती जरी ।
स्वरुपा हानी तिळभरे । न पडे हें अंतरीं जाणावें ॥२०॥
एवं विचारें पाहतां अंतरीं । दोष नये कोणावरी ।
असो आतां बोल भारी । अवधारी पूर्वकथा ॥२१॥
गाधी राजा कान्यकुब्जदेशीं । धर्मात्मा सोमवंशी ।
होतां तयाचे कुशीं । दैवें संतान न जाहलें ॥२२॥


तो राजा उदासीन होवूनी । भार्येसह बसे वनीं ।
श्रीशंकरा आराधोनी । कन्यारत्न लाधला ॥२३॥
तिचें नाम ठेविलें सत्यवती । रूपलावण्यसंपत्ती ।
चातुर्यखाणी महामती । वाढे सुदती ती कन्या ॥२४॥
एके दिवशीं ऋचीक ऋषी । गेला पितृदर्शनासी ।
भृगुनामें पितयासी । प्रेमें वंदी सद्भावें ॥२५॥
भृगु म्हणे ऋचीकासी । आजपावेंतो केलें तपासी ।
आतां माझी आज्ञा धरी शिरसीं । ग्रुहस्थाश्रमासी स्वीकारी ॥२६॥
गृहस्थाश्रम करून । यज्ञें देवा तोषवून ।
पुत्रमुख देखून । मग वन सेवी तूं ॥२७॥
असें भृगूचें वचन । शिरसा मान्य करून ।
ध्यानें पाहे कन्यारत्न । सत्यवतीसम अन्य न देखे ॥२८॥
मग गाधीपाशीं येवून । ऋचीक मागे कन्यादान ।
गाधी राजा गडबडून । मनीं म्हणे काय करावें ॥२९॥
हा तों तपस्वी मुनी । दरिद्री वास करी वनीं ।
याला कन्या देवूनी । काय उपयोग होईल ॥३०॥
माझी एकुलती कन्या हे । नाजूक अति सुकुमारी हे ।
वनीं कष्ट केवीं साहे । नोहे योग्य ही तापसासी ॥३१॥
फिरवावा जरी मुनी । तरी कोपेल तत्क्षणीं ।
शाप देवूनी आम्हां जाळूनी । टाकील हा क्षणार्धें ॥३२॥
तरी याला नाहीं न म्हणावें । युक्तीनें मागें फिरवावें ।
यापाशीं भलतेंच मागावें । असें योजी मनीं नृप ॥३३॥
ऋचीका सत्कारूनी । राजा म्हणे ऐक मुनी ।
माझी कन्या पाहूनी । भीड घालूनि मागती राजे ॥३४॥
मग म्यां एक पण केला । जो सहस्त्र श्यामकर्ण अश्वाला ।
भाग्यवंत देईल तयाला । हे कन्या देईन मी ॥३५॥
म्यां प्रतिज्ञा केली असी । तुम्हां ती साधेल कशी ।
असें ऐकतां वचनासी । ऋचीक नृपासी बोलत ॥३६॥


सहस्त्र श्यामकर्ण । मी आणून देईन ।
मला द्यावें कन्यादान । हें वचन न फिरवी ॥३७॥
असें म्हणूनि करी ध्यान । वरुणापाशीं अश्व पाहून ।
आकाशमार्गें गमन करून । येऊन वरुणा भेटला ॥३८॥
म्हणे वरुणा मी ऋचीक ऋषी । पाळुनि पितृवचनासी ।
साधावया गृहस्थाश्रमासी । उद्युक्त झालों ॥३९॥
गाधीची कन्या योजिली । परी एक गोष्ट अडली ।
जरी ती त्वां ऐकिली । तरी झाली कार्यसिद्धी ॥४०॥
रायें केला एक पण । जो दे सहस्त्र श्यामकर्ण ।
तया देईन कन्यादान । तुझे स्वाधीन हें आहे ॥४१॥
स्वस्त्यस्तु ते वरुणा । मला देईं श्यामकर्णा ।
ऐकोनी ऋषीच्या वचना । वरुणा भीति वाटली ॥४२॥
मनीं चिंती वरुण । हा असे तप:पूर्ण ।
याला न देतां शामकर्ण । कोपें पूर्ण शापील हा ॥४३॥
तरी अश्वां पाजावी मदिरा । मग ते न जाती मुनीश्वरा ।
योजूनि अशा विचारा । ऋषीश्वरा म्हणे वरुण ॥४४॥
माझे उन्मत श्यामकर्ण । यांला वळवी असा कोण ।
आवडे तरी दाखवून । देतों तुम्हां अश्व ते ॥४५॥
ज्यांची वायूप्रमाणें गती । भूमीला पाय न लाविती ।
पाहां मनुष्यां खावूं येती । असे असतेअए उन्मत्त ॥४६॥
ऋषी म्हणे दावी मला । मी नेईन तयांला ।
मग वरुण ऋषीला । दावी उन्मत्त श्यामकर्ण ॥४७॥
योगसिद्धी जयापाशीं । तो ऋषी देखे अश्वांसी ।
चापल्य सोडूनी तत्क्षणेंसी । शांत झाले ते सर्व ॥४८॥
योगसामर्थ्य अचाट । खंखाळ अश्व चालती नीट ।
कांहीं न करितां खटपट । अश्वां घेवून चालिला ॥४९॥
वरुणा देवूनी आशीर्वचन । सहस्त्र अश्व घेवून ।
ऋषी निघाला जलांतून । पूर्व देशीं पातला ॥५०॥


अश्वा बाहेर काढी जेथून । तें अश्वतीर्थ म्हणून ।
लोकीं झालें प्रख्यात पावन । गंगेमध्यें असे ते ॥५१॥
असें ते अश्व घेवून । ऋषी राजाप्रती येवून ।
म्हणे आणिले हे श्यामकर्ण । तुझें वचन पाळ तूं ॥५२॥
स्वस्त्यस्तु ते भूपाळा । सत्य करीं स्ववाक्याला ।
कन्यादान देई मला । आतां कशाला अवकाश ॥५३॥
अद्भुत माहात्म्य तें त्याचें । पाहतां मन गाधीचें ।
प्रसन्न झालें योगाचें । सामर्थ्य अचाट न वर्णवे ॥५४॥
हा दरिद्री म्हणून । मी करीत होतों अनुमान ।
आतां याचें सामर्थ्य पाहून । कन्यादान द्यावे वाटे ॥५५॥
ज्यापाशीं सिद्धी रांगती । त्याला होईल काय खंती ।
देवही अनुकूल होती । उत्तमगती पावेल जो ॥५६॥
हा जांवई झाल्यावरी । कृतार्थ होईल हे कुमारी ।
हा माझ्याही वंशा उद्धरी । तेव्हां कुमारी द्यावी याला ॥५७॥
असा निर्धार करूनी । सुमुहूर्त पाहुनी ।
ब्राह्मविवाहविधी करूनी । मुनीला दे कन्यादान ॥५८॥
महात्सवें विवाह झाला । आनंद झाला सत्यवतीला ।
मुनीही आनंद पावला । राजकन्येला करीं धरितां ॥५९॥
देवकन्येची उपमा द्यावी । असी सत्यवती बरवी ।
जिला पाहुनी भुले रवी । तिला तपस्वी ऋचीक वरी ॥६०॥
पाहूनी हें इंद्रादिदेव । म्हणती नवल हें अभिनव ।
योगाचें हें वैभव । अपूर्व असे वाटतें ॥६१॥
असा तो ऋचीक मुनी । गाधिकन्या वरूनि ।
तेथेंचि राहिला संतोषूनी । पावूनी मनीं परमानंद ॥६२॥
एके दिनीं गाधिराजा । लागे ऋषीच्या पदांबुजा ।
म्हणे पुढें वंशीं माझ्या । नाहीं प्रजा योगींद्रा ॥६३॥
लुप्तपिंडोदक पितर । खालीं पडतील निर्धार ।
तुम्हीं समर्थ ऋषीश्वर । करा प्रतिकार प्रयत्नें ॥६४॥


मला व्हावा सुत । तपस्वी उदार पुण्यवंत ।
त्याची कीर्ती त्रिभुवनांत । आचंद्रार्क पसरावी ॥६५॥
ज्यायोगें होवूनी ऋणमुक्ती । मला मिळेल सद्गती ।
असें म्हणूनी नृपती । ऋषीप्रती नमन करी ॥६६॥
दयाळू तो ऋचीक । म्हणे आतां राया ऐक ।
तुला होईल एक लेंक । परम सुखदायक जो ॥६७॥
आतां घेवूनी पत्नीसी । जातों पितृदर्शनासी ।
ऐकूनी राजा तयांसी । बोळवी प्रीती करूनी ॥६८॥
सत्यवतीसी घेवून । ऋचीक मुनी येवून ।
भृगूचें घेवूनी दर्शन । तया निवेदन सर्व करी ॥६९॥
ऐकून पुत्राची ख्याती । देवीसमान स्नुषा ती ।
पाहूनी ऋषीची मती । अति संतुष्ट जाहली ॥७०॥
तया आशीर्वचन देवून । राहवी आपुले संनिधान ।
सत्यवती पातिव्रत्य करून । वागे अनुदिन शांतपणें ॥७१॥
ती राजाची नंदिनी । सत्यवती मनस्विनी ।
भृगूची शुश्रुषा करूनी । हृष्ट करी अनुदिन ॥७२॥
तिचा पाहूनी स्वभाव । प्रसन्न झाला मुनिपुंगव ।
म्हणे पाहतां तुझा भाव । आनंदा वाव नसेची ॥७३॥
मी झालों प्रसन्न । देतों इष्ट वरदान ।
मग सत्यवती कर जोडून । नम्र होवून बोलतसे ॥७४॥
धर्मीं मती स्थिर व्हावी । वडिलांची सेवा घडावी ।
हीच जोड मिळावी । काय करावी इतर जोड ॥७५॥
भृगु म्हणे हे सत्य असे । तुझी निष्ठा तसीच असे ।
जें कांहीं मनीं वसे । तसें देईन माग आतां ॥७६॥
सून म्हणे आहो मामाजी । अपुत्रा दु:खी आई माझी ।
तशीच स्थिती असे माझी । तुम्हीं राजी व्हावें आतां ॥७७॥
होतां तुमची कृपादृष्टी । दु:ख कसें राहील गांठीं ।
सुपुत्र येईल पोटीं । ही मोठी गोष्ट नसे ॥७८॥
आपुला होतां प्रसाद । चारी मुक्ती धरिती पाद ।
मग तेथें तुच्छ खेद । केवी कसा राहील ॥७९॥


भृगु म्हणे सुनेसी । पुत्र होतील तुम्हांसीं ।
सांगतों उपाय तयासी । एका भावेंसी आचरा ॥८०॥
ऋतुस्नान होवूनी । परब्रह्म चिंतूनी ।
तुवां अश्वत्थापाशीं जावूनी । तया पूजोनी आलिंगावें ॥८१॥
तुझ्या मातेनें तेणें परी । आलिंगन द्यावें उदुंबरीं ।
पुत्रकामेष्टी ज्यापरी । कथिली तशी करावी ॥८२॥
संस्कृत चरू करून । ब्राह्ममंत्रें मंत्रवून ।
विप्र देतील तो प्राशन । निर्धार ठेवूनी करी तूं ॥८३॥
ब्रह्मवर्चस्वी ब्राह्मण । तुला होईल पुत्र जाण ।
वेदशास्त्रसंपन्न । घेईल सन्मान तीन लोकीं ॥८४॥
क्षात्रमंत्रें मंत्रवून । देतील जो चरू ब्राह्मण ।
तो करितां भक्षण । तुझ्या मतेला पुत्र होईल ॥८५॥
तो क्षत्रिय महाशूर । होईल अति उदार ।
ज्याचा दरारा धरणीवर । होईल थोर निश्चयें ॥८६॥
असें म्हणूनी भृगु सुता । म्हणे ऋचीका तुवां आतां ।
पत्नीसी घेवूनी तत्वतां । श्वशुरगृहाप्रती जावें ॥८७॥
तुवां ऐकिलें माझें वचन । तसी पुत्रकामेष्टी करून ।
करवी चरु प्राशन । वाढेल संतान उभयतांचें ॥८८॥
ऐकूनी असें वचन । मुनी स्त्रियेसी घेवून ।
श्वशुरगृही येवून । पितृवचन सांगे तयां ॥८९॥
गाधी आणि ऋचीक । पुत्रकामेष्टी करिती सम्यक ।
परी व्यंग झालें एक । चरुप्राशनसमयांसी ॥९०॥
कन्येचा चरु माता भक्षी । मातेचा चरु कन्या भक्षी ।
ज्ञानचक्षूनें हें निरीक्षी । विश्वसाक्षी भ्रुगु तो ॥९१॥
मग तेथें भृगु येवून । म्हणे काय केलें हें भुलोन ।
व्यत्ययें झालें चरुप्राशन । संतानव्यत्यय होईल ॥९२॥
ऐक सुने तुझा सुत । होईल क्षत्रिय बलवंत ।
होईल तुझ्या मातेला सुत । तो विख्यात ब्रह्मर्षी ॥९३॥
ऐकोनी सत्यवती नारी । मनीं अत्यंत दु:ख करी ।
म्हणे मी झालें विप्रनारी । माझे उदरीं क्षत्रिय न हो ॥९४॥
व्हावा ऋषी वेदनिपुण । तुम्हांसारिखा सर्वाभिज्ञ ।
ज्याला मानिती प्राज्ञ । असा सुज्ञ पुत्र व्हावा ॥९५॥


भृगु म्हणे आतां हें न घडे । पुन: सून पायां पडे ।
म्हणे करा येवढें । पुत्र व्हावा ब्राह्मण ॥९६॥
भृगु म्हणे सुनेसी । आतां फिरवितां मंत्रासी ।
जरी ब्राह्मणत्व ये पुत्रासी । तरी येईल पौत्रासी क्षत्रियत्व ॥९७॥
सत्यवती म्हणे श्वशुरा । येवो क्षत्रियत्व पौत्रा ।
ब्राह्मणत्व यावें पुत्रा । तुमच्या गोत्रा साजेल हें ॥९८॥
तथास्तु म्हणूनी जाई ऋषी । गाधी म्हणे मानसीं ।
येईना कां ब्राह्मण कुशीं । माझे ख्यातीसी वाढवील ॥९९॥
मग दोघी झाल्या गर्भिणी । उत्तम डोहाळे लागूनी ।
बोलती ब्रह्मज्ञान अनुदिनीं । गाधी मनीं तोषला ॥१००॥
पुंसवनादी संस्कार । यथाकाळीं करिती सादर ।
जातां नवमास बरोबर । प्रसवल्या दोघीही पुत्ररत्नें ॥१०१॥
मग जातकर्में करिती । ब्राह्मणा धन वस्त्रें देती ।
ब्राह्मण जातक पाहती । म्हणती होतील हे ऋषी ॥१०२॥
सत्यवतीचा सुत । नामें जगदग्नी प्रख्यात ।
जाहला परम बुद्धिवंत । ज्याला समस्त मानिती ॥१०३॥
हा साक्षात् शिवशंकर । धरी असा हा अवतार ।
धर्म स्थापावया भूमीवर । गौरीवर प्रगटला ॥१०४॥
पतिव्रता सत्यवती । तिची पाहूनी अति भक्ती ।
प्रसन्न होवूनी उमापती । अवतार धरी ऋषीरूपें ॥१०५॥
गाधीचा तो पुत्र । नामें जाहला विश्वामित्र ।
वाढे परम पवित्र । गायत्रीमंत्रद्रष्टा जो ॥१०६॥
क्षत्रियाचे कुशीं आला तरी । चरुसंस्कारें अंतरी ।
ब्राह्मणत्व ठसोनी सुविचारी । करी प्रयत्न विप्र व्हावया ॥१०७॥
सर्व ऋषींसी विनवून । म्हणे मला करा ब्राह्मण ।
ऋषी म्हणती वसिष्ठवचन । आम्ही मानूं सर्वथा ॥१०८॥
मग वसिष्ठासी विनवून । साठ सहस्त्र वर्षें तप करून ।
विश्वामित्र तो ब्रह्मऋषी म्हणून । प्रख्यात होवुन राहिला ॥१०९॥


इति श्रीदत्तमाहात्म्ये अष्टादशोsध्याय: ॥१८॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १९ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥


गुरु म्हणे शिष्य ऐक आतां । शंकरें अवतार धरितां ।
स्वयें अवतारे पर्वतसुता । जाहली सुता रेणुराजाची ॥१॥
रेणुका नामें पुण्यखाणी । शिवध्यानाहूनी मनीं न आणी ।
तोचि जमदग्नी जाणूनी । अनुदिनीं चिंती तच्चरण ॥२॥
तिचा निर्धार जाणून । रेणु राजा संतोषून ।
जमदग्नीला बोलावून । कन्यादान देता झाला ॥३॥
रेणुका साक्षात् पार्वती । धरितां जमदग्नीनें हातीं ।
हृष्ट होऊनी अति प्रीति । सेवा करी तयाची ॥४॥
मग आश्रम करूनी । जमदग्नी राहिला वनीं ।
अग्निहोत्र घेऊनी । तप आचरोनी राहिला ॥५॥
रेणुका ती पतिव्रता । धरूनियां पतीच्या चित्ता ।
अनुकूल वागे सर्वथा । माथा तुकाविती जिला देवी ॥६॥
तिला झाले चार पुत्र । सर्वही परम पवित्र ।
झाले पूज्य सर्वत्र । पितृसेवातत्पर ते ॥७॥
पहिला वसुमंत दुसरा वसु । तिसरा सुषेण चवथा विश्वावसू ।
चौघेही धर्मविश्वासु । वेदशास्त्रपारंगत ॥८॥


जो देवीं प्रार्थिला हरी । तो ये रेणुकेचे उदरीं ।
स्वयें अवतार धरी । भक्तकैवारी स्वयंभू जो ॥९॥
वैशाख शुक्ल तृतीयेसी । सिंहलग्नी मध्यान्हसमयासीं ।
अवतार धरी ऋषीकेशी । भार्गवराम नामें सहावा जो ॥१०॥
भृगुच्या वचनानुसार । क्षत्रियसा झाला परशुधर ।
पढूनियां वेदशास्त्र । ब्रह्मचर्यें वागतसे ॥११॥
तपश्चर्या करून । शिवाचें मन तोषवुन ।
धनुर्वेद पढून । शस्त्रास्त्रीं निपुण झाला ॥१२॥
शिवाची आज्ञा घेऊन । पितृगृहीं येऊन ।
मातापितरां सेवुन । विनीत होऊन राहिला ॥१३॥
राम हा परम धार्मिक । जो मातापितृसेवक ।
ज्याला मानिती ऋषीलोक । जो विवेकसंपन्न ॥१४॥
जो स्वयें नारायण । पुत्रपणा पावुन ।
सेवा करी अनुदिन । गौरीहररूप मातापितरांची ॥१५॥
नित्य वनीं जाऊन । समित्पुष्पफळादि आणून ।
देई सन्निध राहून । आज्ञावचन न उल्लंघी ॥१६॥
जमदग्नी पवित्र । अनुकूल ज्याला कलत्र ।
स्वाधीन वागती चारी पुत्र । अग्निहोत्र नित्य चालवी ॥१७॥
रेणुका ती एके दिवशीं । करावया स्नानासी ।
आली एकली नदीतीरासी । चिंती मानसीं पतीतें ॥१८॥
गंधर्वराजा त्या गंगेंत । सर्व स्त्रिया घेउनी बहुत ।
आला क्रीडा करीत । मदोन्मत्त गज जेवी ॥१९॥
सर्व स्त्रिया सुकुमारी । भूषणें लेऊनी नानापरी ।
नि:शंकपणें जलांतरीं । क्रीडा करिती मदभरें ॥२०॥


सुगंधी पुष्पें घवघवीती । सुगंधी बहुदूर पसरती ।
भ्रमर तेथें धांग घेती । गुंजारव करिती मदभरें ॥२१॥
गजरे तुरे हार । शोभती ज्यांच्या अंगावर ।
रत्नजडित अलंकार । यांहीं शरीर विराजे ज्यांचें ॥२२॥
चंदन कस्तूरी लिंपून । उत्तम टिळे चर्चून ।
दिव्य वस्त्रें पांघरून । स्तियांशीं रममाण होतसे ॥२३॥
तसें तें कीडाकौतुक । पाहतां रेणुकेला हरिख ।
वाटोनी लावी तिकडे आंख । म्हणे सुख उत्तम ह्यांचें ॥२४॥
दैवाची विचित्र गती । मोठेमोठेही भुलती ।
पहा हे परम सती । जगतीमाजी विख्यात ॥२५॥
जिणें आपुलें वस्त्रांतून । पाणी आणितां बांधून ।
न पाझरे त्यांतून । जीवनबिंदू एकही ॥२६॥
पातिव्रत्य जिचें असें । स्वप्नींही परमुखा न पाहतसे ।
ती भुलोनी अवलोकीतसे । तसे ते खेळ परपुरुषाचे ॥२७॥
तेणें पातिव्रत्य न्यून झालें । तत्क्षणीं तिचें मन भ्यालें ।
म्हणे म्यां हें काय पाहिलें । केंवीं झाले वरते नेत्र ॥२८॥
आतां खचित माझा पती । मला सोडील हें निश्चिती ।
आतां माझी काय गती । अंतरती उभय लोक कीं ॥२९॥
कटकटा माझ्या दुर्दैवा । का धरविसी दुर्भावा ।
हरहरा परमेश्वरा देवा । माझ्या धवा कोप न येवो ॥३०॥
असी भयभीत होऊनी । मस्तकीं जल घेऊनी ।
परतली रेणुनंदिनी । निजसदनीं पातली ॥३१॥
तंव द्वारीं जमदग्नी । साक्षात् दिसे जमदग्नी ।
रेणुकेसी पाहुनी मनीं । मनीं सर्व समजे तो ॥३२॥

म्हणे ही धैर्यापासून । भ्रष्ट झाली म्हणून ।
ब्राह्मी लक्ष्मी जाऊन । अशी दीनमुखी झाली ॥३३॥
मुनी कोपायमान होऊन । नानापरी धिक्कारून ।
म्हणे सुटलें हें सदन । न दावी वदन मला तूं ॥३४॥


मी तरी दरिद्री ऋषी । राख फांसोनी अंगासी ।
सदा असे वनवासी । वल्कलासी सेवूनी ॥३५॥
येथें कंदमुळें फळें । आमुचा आहार तुला कळे ।
तो तरी वेळोवेळे । आम्हां न मिळे भक्षावया ॥३६॥
चंपक पुष्पें मालती । सेवंती बकूळ जाती ।
तेथें स्वप्नींही न दिसती । वाटेल खंत तुज येथें ॥३७॥
येथें पलंग बिछाने । शिळेचे करून निजणें ।
अंगराज धुळीविणें । कोण जाणे या आश्रमीं ॥३८॥
येथें वास केल्यावरी । तुज कष्ट होतील भारी ।
होमधूम घेतां नेत्रीं । ढळढळां वारी वाहेल ॥३९॥
कोण हे कष्ट सोसील । तुला जेथें सुख होईल ।
तेथें त्वां जावें खुशाल । नाना ख्याल करावया ॥४०॥
राजाची धरितां पाठ । तुझें नीट भरेल पोट ।
हातीं मिळतील पाटल्या गोठ । डोईवरी मोट न येईल ॥४१॥
जरी राजासवें नांदसी । सर्वं सुख पावसी ।
सुखानें क्रीडा करिसी । कासया येसी आतां येथें ॥४२॥
त्वां जावें माघारां । उलंडूं न देई ह्या द्वारा ।
आतां मला नको तुझा वारा । जाईं जारा लक्षूनी ॥४३॥
जायेकरितां जाया । न होतसे प्रिया ।
आपुल्या कामा जाया प्रिया वदे श्रुती या वचनातें ॥४४॥
नातें आज तें तुटलें । तुझें हें मन विटलें ।
माझ्यापासूनी सुटलें । नटलें जें पररंगीं ॥४५॥
पररंगीं रंगे जी नारी । तिला तत्काळ टाकावी दूरी ।
असा विचार चतुरीं । निर्धारिला सत्य तो ॥४६॥
तेव्हां आतां त्वां जावें । वाटेल त्या पंथा धरावें ।
आवडे त्या पुरुषा भजावें । हें समजावें सत्य वचन ॥४७॥
असे अवाच्य बोल ऐकूनी । थरथरां कांपे रेणुनंदिनी ।
खिन्न झाली भ्याली मनीं । कांहीं न सुचोनी गडबडली ॥४८॥
नेत्रीं ढळढळां वाहे पाणी । मुख गेलें वाळोनी ।
अंगीं घर्म सुटोनी । भिजोनी गेलें वस्त्र तिचें ॥४९॥
बोलूं जातां शब्द न उमटे । बुद्धी सर्वथा खुंटे ।
गहिंवरे गळा दाटे । सुटे वस्त्र अंगावरूनी ॥५०॥


पुढें पाउल न उचले । संतापें अंग जळालें ।
सर्वही धैर्य वळलें । सौंदर्य वाळलें तत्काळ ॥५१॥
लांकुडाची पुतळी जसी । निश्चल राहे तसे ।
रेणुका उभी दारासी । जमदग्नी तिसी पुन: वदे ॥५२॥
टवळे न जासी येथोन । तरी तुझा घेईन प्राण ।
माझा कोप दारुण । नेणसी कठिण मन माझें ॥५३॥
जा जा येथूनी सत्वर । माझा कोप अनिवार ।
असें बोलतां मुनीश्वर । मनीं विचार करी नारी ॥५४॥
एकदां चुकोन घडला अन्याय । मी पतीचे न सोडीन पाय ।
होवो अपाय किंवा उपाय । येथूनी न जाय माघारां ॥५५॥
जरी पती मारील । तरी पाप जाईल ।
दुर्गती पुढें न होईल । असें निश्चळ करी मन ॥५६॥
पुन: पुन: सांगतां । ती माघारां न फिरतां ।
हाक मारी श्रेष्ठ सुता । वसुमंता जमदग्नी ॥५७॥
पितृवचना ऐकत । आला तेथें वसुमंत ।
जमदग्नी तया म्हणत । कोपयुक्त होउनी ॥५८॥
पुत्रा इणें केलें पाप । त्यामुळें झाला मला ताप ।
इची मान शीघ्र काप । कांप आणूं नको अंगीं ॥५९॥
ऐकूनी तातवचन । ताताचे पाय धरून ।
म्हणे कोपाचें करा शमन । एवढा कोप न करावा ॥६०॥
न मातु: परदैवतं । एवं चेच्छास्त्रसम्मतं ।
तर्ह्यस्या हननाच्छाश्वतं । हंत दुर्गतं ह्यनुभवेयं ॥६१॥
असें वदतां तनय । बापा वाटला अनय ।
म्हणे याला झाला स्मय । मला न्याय शिकवितो हा ॥६२॥
पितुर्जीवतो वाक्यकरणात् । पुत्रस्य पुत्रत्वमिति वचनात् ।
अद्य तदुल्लंघनात् । कुर्यां भस्मसात् त्वामहं ॥६३॥
असें कोपें बोलून । तया म्हणे तूं जा जळून ।
असें बोलून शापवचन । क्रूरलोचन पाहे तया ॥६४॥


तत्काळ तो गेला जळून । मग वसुला बोलावून ।
म्हणे इचें शिर छेदून । टाकून देई सत्वर ॥६५॥
वसु म्हणे ऐक ताता । पितु: शतगुणं माता ।
असी असे शास्त्रवार्ता । ती अन्यथा केवी करूं ॥६६॥
असें त्याचें वचन । ऐकतां त्यावरी कोपोन ।
म्हणे तूं जा जळून । त्वरें लक्षून अग्रजमार्गासी ॥६७॥
असें म्हणतां तो जळाला । तेणें परी विश्वावसूला ।
सुषेणालाही जाळिला । तया वेळा मुनीनें ॥६८॥
चौघे गेले जळून । परी दु:खित न झालें मन ।
म्हणे परशुराम अजून । वनांतून कां न ये ॥६९॥
तंव समिघा दर्भ घेऊन । हातीं परशू धरून ।
द्वारीं पातला नंदन । हृदयनंदन केवळ जो ॥७०॥
म्हणे रामा ही तुझी माता । करी महा दुष्कृता ।
इचें शिर तोड म्हणतां । तुझी बंधुता नायके ॥७१॥
म्यां शाप देऊन । तुझे बंधू टाकिले जाळून ।
तूं पितृभक्त जाणून । तुला सांगतों ऐक आतां ॥७२॥
हा परशु उचलून । इचें शिर छेदून ।
टाकितां माझें मन । समाधान होईल ॥७३॥
ऐकतांचि पितृवचन । तत्काळ परशु मारून ।
मातेचें शिर छेदून । टाकी कठोर मन ज्याचें ॥७४॥
काय छाती ही तयाची । दगडानें मढविली कीं लोहाची ।
मान तोड म्हणतां द्रव न येची । म्हणोनि होय तोइ महाक्रूर ॥७५॥

पुढें क्षत्रियांचा निरन्वय । करील हें नोहे आश्चर्य ।
मातृशिरच्छेदीं त्याचें धैर्य । कधींतरी अस्तमय होय कीं ॥७६॥
झटदिशी परशु मारूनी । चटदिशी मान तोडूनी ।
पटदिशी टाकिली पाडूनी । खटदिशीं मेदिनीवरी पडे ॥७७॥
शिर तुटतां चळचळा । रक्त वाहे भळभळा ।
जरी राम पाहे डोळां । ज्याचा गळा न दाटे ॥७८॥
पाहूनी त्याचें शौर्य । ओळखूनी औदार्य ।
ऋषी म्हणे हा न हो अनार्य । परम आर्य पितृभक्त ॥७९॥
मग शांत होऊनी मुनी । रामातें आलिंगूनी ।
म्हणे शाबास तूं पितृवचनीं । पूर्ण विश्वास ठेविशी ॥८०॥
मातेविषयीं स्नेह न धरिला । पापपुण्याचा विचार न केला ।
तेणें मला आनंद झाला । हो तूं भला त्रिलोकीं ॥८१॥


मी झालों प्रसन्न । तुला देतों वरदान ।
असें ऐकोनी मुनिवचन । राम वंदून वर मागे ॥८२॥
ताता माता हे उठावी । भ्रातृचतुष्टयी वांचवावी ।
मला चिरंजीवीता असावी । नसावी स्मृती मातृवधाची ॥८३॥
मिळावा सर्वत्र विजय । कधीं न यावा अपाय ।
म्यां व्हावें सदा अजेय । दीर्घ आयुष्य असावें ॥८४॥
असें मागतां रामानें । मग तथास्तु मुनी म्हणे ।
तुला कळिकाळाचें न भेणें । चिरंजीवपणें सुखें रहा ॥८५॥
तेव्हां आपोआप शिर । जोडतां रेणुका उठे सत्वर ।
पुन: उठले ते बंधु चार । रामा हर्ष जाहला ॥८६॥
मग राम उठोन । धरी मातेचे चरण ॥
पुत्रस्नेहें आलिंगून । आशीर्वाचन दे माता ॥८७॥
म्हणे माता ते अवसरीं । रामा त्वां मजवरी ।
ही कृपा केली बरी । खंती अंतरीं न धरी हे ॥८८॥
ज्या पातिव्रत्या सांभाळिती । त्यांनीं ही गोष्ट ठेवावी चित्तीं ।
जातां अन्यत्र चित्तवृत्ती । ऐसी गती वोढवेल ॥८९॥
उ:रे चित्ता कामसक्ता । कां आम्हा बुडविशी संता ।
तुला धिक्कार असो आतां । घेई शांतता अझून तरी ॥९०॥
काम ठाईंचा चावटा । भल्याभल्याचा करी तोटा ।
सज्जना बुडवी हा करंटा । मोठा खोटा तीन लोकीं ॥९१॥
लुटारु ह्या ऐशा चोरा । केवी देशी चित्ता थारा ।
आतां तरी सारासारा । विचारा करी निश्चयें ॥९२॥
तुझें ठाईं न उठतां काम । दूर होईल कीं परंधाम ।
तेव्हां तूं होई निष्काम । परंधाम दूर नसे ॥९३॥
सर्वथा कामा न सोडवे । तरी येवढें करी बरवें ।
पतिचरणा आदरी ब्रह्मभावें । एवढा काम राखी तूं ॥९४॥
मग आपोआप निष्काम । होसील तूं आत्माराम ।
यापरता उपशम । नको धाम हेंच तुझें ॥९५॥


असें चित्ता वळवूनी । आपुले स्वाधीन करूनी ।
रेणुका लावी पतिभजनीं । अनुदिनीं समरसें ॥९६॥
पतीचे चरण धरून । म्हणे मी केवल पापीण ।
दुष्टवासना उठऊन । दुष्ट दर्शन पैं केलें ॥९७॥
हा घडला महोत्पात । त्यातें तुम्हीं केलें शांत ।
बरवें दिधलें प्रायश्चित्त । हें दोहांत पापशोधक ॥९८॥
हा तुमचा नव्हे कोप । माझा वाढऊनी अनुताप ।
नि:शेष घालविलें पाप । आतां निष्पाप झालें मी ॥९९॥
कोण एवढा दयाळू । कोण येवढा कनवाळू ।
केला माझा सांभाळू । असा प्रतिपाळू कोण जगीं ॥१००॥
सद्धर्माचा उपदेश । मुर्खा ऐकतां येई रोष ।
प्रथम वाटे जें विषा अंतीं । विशेष अमृत तें ॥१०१॥
आजी केला उपकार । मला ठरविलें धर्मावर ।
जन्मोजन्मीं हाची वर । सेवावे सादर हे चरण ॥१०२॥
आम्ही पतिव्रता नारी । पतिविणें आम्हां कोण तारी ।
हा निर्धार आमुचे अंतरीं । उभयलोक हाच एक पती ॥१०३॥
असी विनंती करून । प्रसन्न केलें पतीचें मन ।
ऋषी बोले सुप्रसन्न । तुझें मन शुद्ध असे ॥१०४॥
मग ती रेणुका आनंदे । पतीशीं प्रेमें नांदे ।
पति ब्रह्म मानी अभेदें । एकमन जयांचें ॥१०५॥
साक्षाद्विष्णु राम । स्वयें वैकुंठधाम ।
असूनियां अकाम । शिवसेवातत्पर राहे ॥१०६॥
अर्जुनाचा वर । सिद्ध करावया लक्ष्मीवर ।
घरी द्विजावतार । नामें परशुधर प्रसिद्ध ॥१०७॥
गाय नेली हें मिष करूनी । अर्जुनासी युद्ध करूनी ।
समरीं त्यासी मारूनी । मोक्षसदनीं पाठवी ॥१०८॥


इति श्रीदत्तमाहात्म्ये एकोनविंशोध्याय: ॥१९॥
श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय २० वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य।
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥

दीपक म्हणे गुरुप्रती । ज्यापाशीं सिद्धी रांगती ।
जो करी विप्रांची भक्ती । मिती नाहीं ज्याच्या दाना ॥१॥
त्या नृपा विप्राची गाय । नेण्याचें कारण काय ।
हा माझा संशय । दूर करावा ॥२॥
गुरु म्हणे दीपकासी । शाप होतां रायासी ।
फेर पडला मतीसी । म्हणूनी धेनूसी नेली ॥३॥
प्रत्यहीं याग करी । पूर्ण भक्ती विप्रांवरी ।
धर्मी निष्ठा ठेवी बरी । तरी दैव पुढें आलें ॥४॥
स्वयें ज्ञानी असून । धर्मात्मा नीतिनिपुण ।
निरिच्छही असून । बळें दैवें वश केला ॥५॥
अदैव हें बळिवंत । हें सर्व विख्यात ।
ब्रह्मादिकां वागवीत । स्वहस्तगत करूनी ॥६॥


सूर्या नित्य फिरवी । ब्रह्म्याकरीं सृष्टी करवी ।
विष्णूला अवतारें नटवी । जगा मारवी रुद्रकरें ॥७॥
कोणा न सोडी दैव । हें सुख दु:ख दे सदैव ।
दैवें न सोडिले देव । न सोडी जीवन्मुक्ताही ॥८॥
ईश्वरें दैव निर्मिलें । त्याला कोणीं न त्यजिलें ।
कुमारशापें पाडिलें । वैकुंठाहूनी जयविजयां ॥९॥
चंद्रा योजी गुरुभार्येसी । इंद्रा योजी अहल्येशीं ।
ब्रह्मया योजी कन्येशीं । पळवी सीतेसी रावणाकरवीं ॥१०॥
पूषाचे दांत पाडवी । भगाचे नेत्र फोडवी ।
भृगूच्या मिशा तोडवी । छेदवी जें दक्षशिरा ॥११॥
नारदादिक दैवातें । न उल्लंघिती तयातें ।
उल्लंघील अशातें । न ऐकिता त्रिभुवनीं ॥१२॥
हें बलिष्ठ असतांही । ज्ञान्याची हानी नाहीं ।
त्याला योजितो देहीं । स्वयें पाही विनोद ॥१३॥
शरीर कां फिरेना । प्रारब्धें कां कष्टेना ।
ज्ञानी तरी ती वेदना । निजमना न आणी ॥१४॥
दैवें झाला हा शाप । म्हणोनी गायी नेई नृप ।
त्याचा मानुनी कोप । तोडी भूपशिरा राम ॥१५॥
एके दिवशीं रथावरी । बैसोनी राजा वनांतरीं ।
फिरोनी येतां माघारीं । जमदग्न्याश्रमा पाहे ॥१६॥
स्वयें चतुरंग दळभार । होती वाद्यांचें गजर ।
बंदी वाखाणिती वारंवार । नृपवरयशातें ॥१७॥
तया आश्रमा पाहूनी । राजा म्हणे आश्रमीं जावुनी ।
मुनीचें दर्शन करूनी । मग जावें नगरासी ॥१८॥
असा विचार करूनी । सैन्य तेथें ठेवूनी ।
दोघे मित्र घेवूनी । मुनीच्या आश्रमीं राजा आला ॥१९॥
तो राजा पादचारी । मुनीच्या आश्रमीं प्रवेश करी ।
जेथें कोणी न होती वैरी । त्या आश्रमा पाहे तो ॥२०॥
रायें पाहतां आश्रम । निघोनी गेला श्रम ।
म्हणे क्षणभरी करूं विश्राम । साक्षात् धर्म येथें वसे ॥२१॥


असें म्हणूनी आश्रमांत । जातां देखला मूर्तिमंत ।
अग्नीच कीं प्रकाशत । भार्गवसुत जमदग्नी ॥२२॥
गौरीहरासमान । रेणुकेसह विराजमान ।
जमदग्नी तपोधन । तया अर्जुन नमन करी ॥२३॥
साष्टांग नमस्कार । नृप करी वारंवार ।
स्तोत्रें करी अपार । हर्षनिर्भर होवूनी ॥२४॥
मस्तकीं अंजली बांधून । उभा राहे अर्जुन ।
जमदग्नी तया पाहून । आशीर्वचन दे प्रेमें ॥२५॥
देवूनियां आसन । नृपा सन्निध बसवून ।
पुसे क्षेम समाधान । मुनी प्रसन्न होवूनी ॥२६॥
राजा आसनी बसून । जमदग्नीला वंदून ।
सांगे क्षेम समाधान । कुशळ वर्तमान सर्वही ॥२७॥
राजा म्हणे ऐका मुनी । आपलें प्रसादें करूनी ।
सर्वांचें क्षेम असे पत्तनीं । सर्व समृद्धी पूर्ण असती ॥२८॥
आपुलें होतां दर्शन । प्रसन्न झालें मन ।
रेणुकामातेचे चरण । पाहतां पावन मी झालों ॥२९॥
यज्ञशाला देखिली । तीन्हीं अग्नीची भेटी झाली ।
आजी दैवरेषा उदेली । म्हणूनी झाली तुमची भेटी ॥३०॥
आम्ही क्षत्रिय दायाद । आम्हां हे तुमचे पाद ।
दर्शन देती परमानंद । श्रीदत्तपाद ज्यापरी ॥३१॥
आतां कांहींतरी आज्ञा व्हावी । या हस्तें सेवा घ्यावी ।
कृतार्थता आमुची व्हावी । म्हणून विनवी राजेंद्र ॥३२॥


मुनी म्हणे हंसोन । आम्हां असे काय न्यून ।
आजी तुम्हां द्यावें भोजन । माझें मन असें इच्छी ॥३३॥
मग बोले अर्जुन । सवें सैन्य घेवून ।
आलों घ्यावया दर्शन । दर्शनपावन जाहलों ॥३४॥
आज्ञा द्यावी मुनीश्वरा । आतां जावूं नगरा ।
मुनी म्हणे नृपवरा । सैन्यासह प्रसाद घ्यावा ॥३५॥
मुनीचें तें वचन । राजा मान्य करून ।
सैन्यासह राहून । ध्यान करित बैसला ॥३६॥
मुनीनें धेनूस प्रार्थून । यथायोग्य सर्वां अन्न ।
दिधलें प्रीतिकरून । बहुमानपुर:सर ॥३७॥
रंगविल्लिका रचूनी । यथार्ह पात्रें मांडूनी ।
पात्राजवळी दीप ठेवुनी । सुगंधी धूप जाळिले ॥३८॥
रायतीं कर्मटी कोशिंबिरी । शिक्रणी लोणचीं नानापरी ।
सांडगे पापड पक्वान्नें भारी । वामभागीं वाढली ॥३९॥
दशविध शाका पायसान्न । दक्षिणभागीं शोभमान ।
मध्यें साखरभात चित्रान्न । ठेविले द्रोण उपसेचनाचे ॥४०॥
वेळाकेशरादियुक्त । श्रीखंडादि गव्यघृत ।
आलें मिरें हिंग हळदीसहित । षड्रसयुक्त पदार्थ वाढिले ॥४१॥
पदार्थ असती प्रतप्त । वास येतसे घवघवीत ।
पाहतां नेत्र होती तृप्त । असे पदार्थ वाढिले ॥४२॥
दाणा चंदी उत्तम घांस । दिधला गजाश्वादिकांस ।
प्रार्थूनियां मुनी सर्वांस । सावकाश जेवा म्हणे ॥४३॥
सर्वही जेवूं बैसती । यथेच्छ पक्वान्नें खाती ।
घृत पायस यथेच्छ पीती । मनीं मानिती परमानंद ॥४४॥


जेवितां चतुर्विधान्न । सर्वांचें तृप्त झालें मन ।
पात्र राहिलें भरून । सर्व अन्न संपवेना ॥४५॥
सर्वही पदार्थांची । घेती अलौकिक रुची ।
गोडी तया पक्वान्नांची । न वर्णवे सर्वथास ॥४६॥
सर्वही यथेच्छ जेवून । उठोनी करिती हस्तक्षाळण ।
कस्तूरी चंदन देवुन । करशोधन करविलें ॥४७॥
नाना परींची फळें । अमृतोपम सुगंधी जाळें ।
सुवासार्थ दिलीं कमळें । विडे वेळेसहित ॥४८॥
वारा येतसे शीतळ । पसरला सुगंधपरिमळ ।
वाटे तो थाट सकळ । केवळ देवलोकींचा ॥४९॥
असें तें पवित्र अन्न । भक्षितां ते सर्वजण ।
पावोनियां समाधान । आपणा पावन मानिती ॥५०॥
जरी रायापाशीं सर्व सिद्धी । मागें फिरती नवनिधी ।
जो असतां सुधी । त्याची बुद्धी पालटली ॥५१॥
राजाचें प्रारब्ध संपलें । म्हणोनी मनीं भलतें आलें ।
धरोनी मुनीचीं पाउलें । राजा बोले त्या वेळीं ॥५२॥
म्हणे जी तूं दरिद्री । संपत्ती नसतां तुझे घरीं ।
आजी कसें येणेंपरी । सर्वां भोजन त्वां दिधलें ॥५३॥
मी सार्वभौम जरी । असें अन्न आमुचें घरीं ।
न मिळे यथार्थ कुसरीं । सर्व समृद्धी असतांही ॥५४॥
तूं त अरी कौपीनधारी । वनांतरीं निर्धारी ।
जरी संपत्ती नसतां घरीं । तरी हे बरी आयती केली ॥५५॥
याचें सांग कारण । राजाचें असें भाषण ।
ऐकोनी मुनी तत्क्षण । म्हणे कारण धेनू हे ॥५६॥


ही म आझी होमधेनू । ही असे कामधेनू ।
इची शक्ती काय वाणूं । जाण हे चिंतामणी ॥५७॥
चिंतावें जें जें मनीं । तें तें पुरवी तत्क्षणीं ।
इच्या प्रसादेंकरूनी । वनीं इच्छाभोजन देतों ॥५८॥
राजा म्हणे नवनिधी । माझेपाशीं अष्ट सिद्धी ।
असती समृद्धी । परी असी कामधेनू नाहीं ॥५९॥
तरी आतां करी प्रसाद । पुरवी हा माझा छंद ।
लागला मनीं वेध । कामधेनूपद घरीं असावें ॥६०॥
देवूं हजारों गोधन । किंवा सुवर्णरत्नधन ।
जें इच्छी तुझें मन । तें मी जाण देईन ॥६१॥
अथवा देवूं राष्ट्र एक । किंवा सुवर्णरत्नधन ।
हें ऐकोनी मुनी म्हणे ऐक । तूं विवेक आण मनीं ॥६२॥
तुझा गुरु दत्तात्रेय । त्याचे चित्तीं चिंतीसी पाय ।
त्यापुढें कायसी ही गाय । हा अन्याय करूं नको ॥६३॥
जरी मी आप्तकाम । तरी नित्य देतों होम ।
होमधेनू इचें नाम । करी होम इच्या दुग्धें ॥६४॥
जा तूं आतां स्वनगरीं । विवेक धरी अंतरीं ।
वेदविद्या असतां पदरीं । कोकशास्त्री कां रमावें ॥६५॥
घरीं असतां सती स्वनारी । स्वाधीन वागे सुंदरी ।
तिला सोडून रंडेवरी । दृष्टी करी तोची मूर्ख ॥६६॥


काय करावें धन । कासया पाहिजे दासीजन ।
कासया रत्न गोधन । कामधेनू दवडून हे ॥६७॥
असा नानापरी । मुनी जरी बोध करी ।
तो न घे अंतरीं । न निवारी दुर्वासना ॥६८॥
हा शांत असे सुशील । धेनू नेतां काय करील ।
येथें धन ठेवूनी विपुल । धेनू खुशाल न्यावी हे ॥६९॥
असा निर्धार करूनी । सेवकां बोलावूनी ।
म्हणे हे धेनू सोडूनी । घेवूनी चला नगरांत ॥७०॥
असें राजाचें वचन । ऐकतां ते सेवक जन ।
त्या धेनूतें सोडून । नगरीं घेवून चालती ॥७१॥
बहु धन गोधन । मुनिसन्निध ठेवून ।
मुनीप्रती वंदून । नगरा अर्जुन चालिला ॥७२॥
वत्स करी आक्रंदन । तिकडे न देई मन ।
असा तो राजा अर्जुन । कठोर मन करी दैवें ॥७३॥
ठेविलें जें धन गोधन । त्याचा अंगीकार न करून ।
अथवा शापवचन । न बोले मन शमवूनी ॥७४॥
न करी त्यावरी कोप । मनीं न मानी ताप ।
म्हणे देतां शाप । तपोलोप होईल ॥७५॥
हा असे धार्मिक । नेईना कां धेनू एक ।
चित्तीं आणूनी विवेक । पुन: आणून देईल ॥७६॥
असा विचार करूनी । शाप न देतां जमदग्नी ।
शांती आणूनी मनीं । ध्यान लावूनी बैसला ॥७७॥


तों इतुक्या अवसरीं । राम गेला होतां वनांतरीं ।
तो फिरूनी आला घरीं । समिधा डोईवरी घेऊनिया ॥७८॥
वत्स आक्रंदतसे । राम तिकडे पाहतसे ।
म्हणे आज कां असें । ओरडतासे हा वत्स ॥७९॥
बंधू म्हणती रामासी । राजा आला आश्रमासी ।
राहविलें तयांसी । जेवावयासी प्रार्थिलें ॥८०॥
मग सैन्यासहित राजासी । जेवविलें संतोषीं ।
राजा पुसे मुनीसी । समृधी कसी ही झाली ॥८१॥
मग मुनीनें सर्व सांगतां । राजा म्हणे हे धेनू द्या आतां ।
मुनीनें नाहीं म्हणतां । बलात्कारें नेता झाला ॥८२॥
असें ऐकतां भ्रातृवचन । राम कोपला तत्क्षण ।
दिसे जसा ज्वलन । त्रैलोक्य दहन करितो कीं ॥८३॥
पितयातें न पुसोन । राजावरी कोपोन ।
म्हणे दुष्ट हा अर्जुन । याचें कंदन करीन मी ॥८४॥
मला कोप आलिया । मी जाळीन त्रैलोक्या ।
पराक्रमा माझीया । हा भूप नेणतो कीं ॥८५॥
माझा को अनिवार । करीन ब्रह्मांडाचा संहार ।
माझ्यापुढें काय सुरावर । समरीं धीर धरतील ॥८६॥
आतां शम न घेईन मी । हा राजा असे कामी ।
हा असे उन्मार्गगामी । याला कां मी न दंडावा ॥८७॥


पहा हो माझें बळ । मी केवळ प्रळयानळ ।
जाळीन क्षत्रियांचें कुळ । खळशिक्षक मी असें ॥८८॥
ब्रह्मद्वेषी हा नृप । यावरी कां न करावा कोप ।
याचें उदेलें पाप । म्हणोनी ताप दे हा द्विजा ॥८९॥
दैव याचें कांहीं होतें । म्हणूनी शाप न दिधला तातें ।
आतां तरी मीच यातें । यमसादनातें धाडितों ॥९०॥
छेदीन त्याचे बाहु सकळ । संहारीन सर्व बळ ।
जो असे महाखळ । त्याचें कुळ न ठेवावें ॥९१॥
राम असें बोलूनी । तातालाही न पुसोनी ।
हातीं परशु घेवून । त्वरा करूनी चालिला ॥९२॥
गजांची श्रेणी पाहून । जसा धांवे पंचानन ।
तसा राम गर्जून । त्वरा करूनी चालिला ॥९३॥
जसा कां प्रळयकालीन । उठे सांवर्तक घन ।
सहाय होतां पवन । करी गर्जना तयांपरी ॥९४॥
आधींच रामाचा महाप्रताप । त्यांत उपजला कोप ।
म्हणे केव्हां भेटेल भूप । मारीन कधीं तयासी ॥९५॥
धांवे वायुप्रमाणें । पायीं भूमी द्णाणे ।
भूपाचा प्राण घेणें । केला त्याणें हा निश्चय ॥९६॥
रामाचे त्वरित गती । मार्गी लोक चमकती ।
म्हणती लोक कल्पांतीं । रुद्र मूर्ती असी धरी कीं ॥९७॥
रामाला पाहून । तर्क करिती सर्व जन ।
आज हा रुद्र अवतारून । जगाचें हनन करितो कीं ॥९८॥
असा तो राम चाले । तों पुढें सैन्य देखिलें ।
राम गर्जोनियां बोले । रे रे चोरा मागें फिर ॥९९॥


तूं ठायींचा चोरटा । कुळा लाविला बट्टा ।
आतां तुझ्या कंठा । छेदीन थट्टा हे नव्हे ॥१००॥
असा गर्जना करून । येतां राम धांवून ।
मागे वळोनी अर्जुन । पाहोनी भृगुनंदन आला म्हणे ॥१०१॥
राजा म्हणे हा तेजस्वी । प्रतापी दिसतो जेवी रवी ।
ही विष्णुमूर्ती असावी । मजवरी एर्‍हवीं कोण येईल ॥१०२॥
मज असे वरदान । ख्यात्याधिक करील हनन ।
हा असे ब्राह्मणनंदन । मजहून ख्यात्याधिक ॥१०३॥
सरला प्रारब्धाचा खेळ । आला देहाचा अंतकाल ।
म्हणूनी ब्रह्मस्वाची इच्छा केवळ । आज उपजली निश्चयें ॥१०४॥
मी ब्रह्मण्य असून । घडलें हें धेनुहरण ।
याला प्रारब्ध कारण । याला शरण रिघावें कीं ॥१०५॥
जरी जावें याला शरण । तरी हा राखील प्राण ।
मग कोणासी करूं रण । मग कोण मारील मज ॥१०६॥
आज हा सुदिन । योग हा आला घडोन ।
हा देह पडोन । जावो आतां निश्चयें ॥१०७॥
असा विचार करून । जीवन्मुक्त तो अर्जुन ।
सैन्य मागें फिरवून । रामा पाहून राहिला ॥१०८॥

इति श्रीदत्तमाहात्म्ये विंशोsध्याय: ॥२०॥
श्रीगुरुदेवदत्त ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading