ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.960

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९६०

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके आंधळा  अभंग ९६०

देवा तुज चुकलों गा । तेणें दृष्टी आलें पडळ । विषयग्रंथीं गुंतलोंसें तेणें होतसे विव्हळ । अंध मंददृष्टि झाली । गिळू पाहे हा काळ । अवचित दैवयोगें । निवृत्ति भेटला कृपाळ ॥१॥ धर्म जागो निवृत्तिचा तेणें फेडिलें पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरुप सकळ ॥२॥ तिही लोकी विश्वरुप दिव्य दृष्टि दिधली । द्वैत हैं हरपलें अद्वैतपणे माऊली । उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊली । चिद्रुप दीप पाहे तेथें तनुमनु निवाली ॥३॥ दान हेंचि आम्हा गोड देहीं दृष्टि मुराली । देह हें हरपलें विदेह वृत्ती स्फुरली । विज्ञान हे प्रगटलें ज्ञेय ज्ञाता निमाली । दृश्य तें तदाकार ममता तेथें बुडाली ॥४॥ प्रपंच हा नाहीं जाणा एकाकार वृत्ति जाली । मी माझें हरपलें विषयांध या बोली । उपरति सद्गुरु बोधु तेथें प्रकृति संचली । शुद्ध धर्ममार्गे पंथ हाती काठी दिधली । वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलों । न कळेचि विषय अंधा । म्हणोनि उघड बोलिलों । चालतां धनुर्धरा तरंगाकारी हरपलों । ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलों ॥६॥

अर्थ:-
हे देवा मी आपल्या यथार्थ आत्मस्वरुपाला चुकलो म्हणून अज्ञानामुळे माझे डोळ्यावर पडळ येऊन विषयाच्या गुंतड्यात अटकून अतिशय दुःख भोगणारा असा होऊन विवळत आहे. दृष्टि आंधळी झाली असल्यामुळे देहच मी आहे अशी समज आहे. त्यामुळे काळ माझा ग्रास करीत आहे. या भयाने भयभीत असता प्रारब्ध योगाने सहज अत्यंत दयाधन श्रीगुरू निवृत्तीराय यांची गाठ पडली. त्यांचा स्वाभाविक धर्म जीवांना आत्मस्वरूपाविषयी जागे करण्याचा असल्यामुळे त्या श्रीगुरू निवृत्तिरायांच्या स्वाभाविक धमनि माझे डोळ्यावरील अज्ञानाचे पडळ फेडून ज्ञानाच्या योगाने आत्मज्ञानाचा बोध त्यांनी दिल्यामुळे सर्व त्रैलोक्य ज्ञानरूप दिसु लागले. त्यांनी आत्मज्ञानाची दिव्य दृष्टि दिल्यामुळे तिन्ही लोक परमात्मरूप होऊन द्वैत नाहीसे झाले. अद्वैत स्वरूप जे सद्गुरू निवृत्तिराय माऊली यांनी निजात्मब्रह्मबोध हेच कोणी एक ज्ञानांजन घालून मला त्या सावलीत शांत केले. त्या चैतन्यरूप दीपाने पाहिले असता त्या बोधाचे ठिकाणी तन आणि मन ही शांत झाली. हे श्रीगुरूंनी केलेले दान आम्हाला फार गोड होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझी दृष्टि मुराली. त्यामुळे देहदृष्टि नष्ट होऊन विदेहदृष्टि स्फुरण पावली. आत्मबोध प्रत्यक्ष होऊन ज्ञेय ज्ञानादि द्वैत नष्ट होऊन गेले. सर्व दृश्य परमात्मरूप होऊन तत्संबंधी माया नाहीशी झाली. आतां माझा निश्चय असा झाला आहे की प्रपंच हा मुळीच न झाल्यामुळे एक परमात्मरूपच वृत्ति झाली. विषयांधदशेत मी आणि माझे असा जो व्यवहार होत होता तो सर्व नष्ट होऊन गेला. विषयाविषयी निवृत्ति झाल्यामुळे सद्गुरूंनी जो बोध केला. त्याच ठिकाणी प्रकृति किंवा प्रकृतीकार्य प्रपंच लय पावले. धर्माच्या मार्गाने शुद्ध पंथ चालवण्याकरिता हातात भक्तिची काठी दिली. कारण वेदांनी प्रतिपादन केलेल्या मार्गाने ऋषीमुनी वगैरे गेले त्याच मार्गान मी चाललो आहे. विषयांधाना हे कळत नाही. म्हणून मी आपला अनुभव स्पष्ट सांगितला. याकरता प्रपंच मार्गात चालला असता धर्माचा आश्रय करा. तसा आश्रय मी केला म्हणून विषयरूपी तरंगाकडून मी सुटलो. श्रीगुरूनिवृत्तीरायांचा शिष्य जो मी त्यांच्या कृपेने सर्व द्वैताचा निरास झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading