
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके पाळणा अभंग ८७१
आकारेंवीण पाळणा पहुडलें । निराकार म्हणोनी वोसणाईलें ॥१॥ जो जो जो बाळा निराकार पाळणा । व्योमी व्योमाकारी झोप घेई ॥धु ॥ चौदा निःशब्दी जागृत केलें । एकवीसी हालवुनी बाळ उठविलें ॥३॥ बापरखुमादेविवरू निजी निजविलें । कांहीं नव्हे ऐसें कांहीं ना केलें ॥४॥
अर्थ:-
निराकारस्वरूप परमात्मा हाच कोणी एक पाळणा त्यामध्ये जीवरूपी बालक निजविले. त्याला आत्मविस्मृतीची झोप लागली. व ते ‘हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझे हेना ॥ज्ञा. ॥अशा त-हेचे बरळु लागला. अशा वेळी श्रीगुरूरूपी माऊली तेथे येऊन पाळणा हालवून जो जो म्हणजे जागा हो, जागा हो असे म्हणून झोके देऊ लागले.आणि त्या गाण्यांमध्ये चिदाकाशरूपी पाळण्यांत चिदाकाशरूप होऊन झोप घे.त्या एकवीस तत्त्वांत गुरफडून निजलेल्या बालकाला चौदा विद्यारूपी शब्दांनी हालवून आत्मस्वरूपा विषयी जागे केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी आपल्या स्वरूपांच्या ठिकाणी त्याला स्वस्वरूप केले. वास्तविक झोपेमध्ये जसे जीवाला दुसरे काही कळत नाही. त्याप्रमाणे पंढरीरायांनी त्या जीवरूपी बालकाला आपल्या स्वरूपाशिवाय इतर कशाचेही भान राहू दिले नाही. असे माऊली सांगतात.
