👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६८
चालतां लवडसवडी । बाहुली मुरडली । माथां गोरसाची दुरडी । जाय मथुरे हाटा । सवेंची विचारी जीवीं । महियाते सादावीं । तंव तो अवचितां पालवी । नंदानंदनु ॥ पाहे पां सुखाचेनि मिसें । झणीं करी अनारिसें । तेव्हां उरलें तें कैसें । माझें मनुष्यपण । विनवी सखीयातें आदरें । तुम्ही गुह्यांची भांडारें । अघटित घडिली या शरीरें । प्रगटित न करा साजणी वो ॥१॥ काय करणें वो काय करणे वो ॥धृ॥ देखोनी सांवळा तनु । लुब्धला माझा मनु । लागलेंसे ध्यानु । द्वैत निवडे ना । डोळां भरुनीयां बाळा । देखे श्रीरंगु सांवळा । वेथे वेधल्या सकळां । गोपी गोविंदा सवें । ठेला प्रपंचु माघारा । भावो भिनला दुसरा । पडिला मागिल विसरा । कैचें कैचें आपुलेपण । । सहज करितां गोष्टी । पाहाता पडिली मिठी । जाली जन्मेंसाठी सखियेसाजणी वो ॥२॥ ऐसी सोसिता सोसणी । सखी झाली विरहिणी । आजि मथुराभुवनीं । मज गमेल कैसें । सरलें सांजणे विकणें । निवांत राहिलें बोलणें । पूर्ण गोरसा भरणे । माथा त्याजूनियां । जाली अकुळांचे कुळ । तनु जात बरळ । फिटले भ्रांती पडळ । दोन्ही एक जालीं । । बापरखुमादेवीवरी । अवस्था लाऊनी पुरी । भावें भोगूनी श्रीहरि । मन मुक्त साजणी वो ॥३॥
अर्थ:-
एक गौळण गोरसाची भांडी दूरडीत घेऊन मथुरेच्या बाजारांत धांदलीने जात असता एकाएकी बाहुली मुरडली तो श्रीकृष्ण केव्हां भेटेल असा विचार करीत असता तो तिच्या मनांतला विचार श्रीकृष्णाने जाणून तिच्यापुढे स्वतः श्रीकृष्ण प्रगट होऊन तिला खूण करुन बजावू लागले. सुखप्राप्तीच्या निमित्त इच्छेने संसाराकडे मन जाऊ देशील? असे बोलल्याबरोबर माझे मनुष्यपण कसे उरेल? ही माझी कृष्णसबंधाने झालेली स्थिति तुम्ही गुप्त ठेवाल अशी माझी खात्री असल्यामुळे माझ्या शरीराची कृष्णमय झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवा. काय करावे वो ! ती कृष्णांची सांवळी तनु बघितल्याबरोबर माझे मन लुब्ध होऊन गेले. काय करावे सखे? त्याचे ध्यान लागून गेले. कृष्णाशिवाय डोळ्यांना द्वैत दिसेनासे झाले. तो बालक सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण बधितल्याबरोबर मीच काय सर्व गोपीनां वेध लागून गेला. प्रपंच आठवेनासा झाला. दुसरा भाव नाहीसा झाला. मागील प्रापंचिक गोष्टीचा विसर पडला. तेथे आपलेपणा ठेवा कोठे. सहज त्या कृष्णाची गोष्ट बोलता बोलता एकदम दर्शन होऊन जन्माचे सार्थक झाले.अशी ती गौळण श्रीकृष्ण परमसौख्याचा उपभोग घेत असतांना भगवान एकाएकी गुप्त झाले. त्यामुळे ती विरहिणी होऊन म्हणते. आज मला मथुरेत करमेल कसे? दही दूध विकणे वगैरे सर्व व्यवहार संपले. बोलणे थांबले. माझ्यावरची पाटी टाकून पूर्ण गोरस जो परमात्मा त्याने मी परिपूर्ण झाले. माझे कुळ नष्ट झाले आतां शरीर व्यवहार अव्यवस्थित झाला. कारण देहाभिमानाची भ्रांती गेली त्या श्रीकृष्णाचे व माझे ऐक्य झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण परमात्मा त्याने माझ्या भावाचा भोग घेऊन व मला परमात्मरुप करुन श्रीहरिने मनाला संसारांतून काढून मुक्त केले. असे माऊली सांगतात
