👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गाईच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८५०
तिही त्रिपुटी तिचे वाडे रे । सवालक्ष चरावया जाय रे । ते दैत्यापाठीं हुंबरत लागे रे । भक्ता घरीं दुभे सानुरागें रे कान्हो ॥१॥ तिचें नाम शांभवी आहे रे । तिची रुपरेखा ते काय रे कान्हो ॥२॥ येकी चौमुखी गाय पाहें रे । तिचा विस्तार बहु आहे रे । तिच्या नाभिकमळी जन्म वासु सांगे रे । तिसी आदि पुरुषु बाप माय रे कान्हो ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु पाहीं रे । ते भक्तां ओळली आहे रे । तें दोहतां भरणा पोहे रे । चारी धारा वर्षत आहे रे कान्हो ॥४॥
अर्थ:-
भोक्ता, भोग्य, भोग इत्यादि त्रिपुटीचा व्यवहार चालणारे तिन्ही लोक हे तिचे वाडे आहेत. व जी आपण ‘सवालक्ष चरावया जाये रे’ म्हणजे तिच्याकडून दररोज सवालक्षाची घडामोड होते. व जी गाय दैत्यांच्या पाठीमागे त्याला मारण्याकरिता हुंबरत म्हणजे ओरडत असते. आणि आपल्या भक्ताच्या घरी मात्र मोठ्या प्रेमाने दूध देते. तिचे नाव शांभवी असे आहे. तिची रूपरेखा सांग पाहू काय आहे ती? एक चौमुखी म्हणजे ब्रह्मदेव गाय आहे. ती तूं पहा. जिचा विस्तार फार मोठा आहे. म्हणजे सर्व जगत जिचा विस्तार आहे. तिच्या नाभिकमळी जन्म असून,आदिपुरूष परमात्मा तिचे आईबाप आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पाहा. त्यांना पाहिले असता ते भक्ताला प्रसन्न होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार धारांनी वर्षाव करतात असे माऊली सांगतात.
