👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१३ वे, मदालसा अभंग ८४२
उपदेश उपरती ज्ञान ध्यान एकनिष्ठ । विज्ञान तें आटलें रे दृश्यादृश्य तेथे दृष्ट । आदिअंत हरपला सर्व ब्रह्म एक वाट । नित्य नेम चालतां रे होय वैकुंठ प्रगट ॥१॥ जे जो जे जो निजानंदे आत्माराम प्रसिद्ध । उपदेश ऐकें बाळा मदालसा प्रबोध । उपजोनी संसारी रे एकतत्त्व तेंचि सिद्ध ॥धृ॥ द्वैताद्वैत खोडी निःशेष आटली आस । कल्पना हो बुडाली रे सर्व दिसे हृषिकेश । ममता हे समूळ माया हेही न दिसे उद्वस । हरपती स्वयंज्योती ऐसा होई रे उदास ॥२॥ विकृतिभान गाढे तेथें न दिसे बिरडें । इंद्रिय रसना दृढ याचें निरसले कोडें । मिथ्या हे मोहपाश तोडी व्यसन सांकडें । मानस परीकर हेही शोधी निवाडें ॥३॥ प्रपंच झोंबो नेदी यांचे उठवी धरणे । शरीर जन्ममरण याचें करी कां रें पारणे । निवटुनी सांडी बापा सर्वभरी नारायणें ॥४॥ मी माझें दुजेपणा तेथें वायां घेसी लाहो । निरसी ममता बापा करी हरिनामें टाहो । शून्य हे भेदी कां रे जन्ममरण निर्वाहो ॥५॥ धारणा धीट करी ध्येयपण रे हे सांडी । अखंडता निजसुख कामधाम रे मांडी । स्मरतां नामावळी विषय हे शरीर सांडी । क्रूर रे नव्हे बापा सदा आत्माने ब्रह्मांडी ॥६॥ त्रिकाळज्ञान गुज अखंड आत्मा रे चेतवी । नित्यता हरिकथा विष्णु कृष्ण मनरंजवी । सकळ परिपूर्ण होशी जीव शिव रे भावी । मन ध्यान एकरूप सर्वदा हरि गोसावी ॥७॥ शांति निवृत्ति क्षमा दया सर्व भूतीं भजन । आचरण एकपक्षं सर्वरूपी जनार्दन । अलक्षसंकल्प भावी सर्व होई नारायण । विसरें कामना रे सेवी ब्रम्हसनातन ॥८॥ एकट मन करी निवृत्ति घरी निर्वाहो । चेतवितांना इंद्रियांसी आत्मारामें नित्य टाहो । सेवासुख करी बापा प्रसन्न लक्ष्मीचा नाहो ॥९॥ सुति मांडी नाममात्रें सेवी तत्पर रसना । उपरती तितिक्षा रे लय लक्षी ध्यासी ध्याना । हरपेल मी माझें होशील ब्रह्मांड येसणा । जिव्हा हें मन चक्षु करी श्रीगुरू निरोपणा ॥१०॥ तुझा तूंचि विदेहिया आत्मनाथ एकतत्त्वीं । हरपती इंद्रियें रे जीवशिव एके पंक्ती । नाहीं नाहीं अन्य रूप स्वयें परमात्मा ज्योती । सुटेल जन्ममरण उपजेल प्रत्यक्ष दीप्ती११ ॥ आकाश तुजमाजीं हरपसी परब्रह्मीं । न भजतां इंद्रियांसी हरपती यया उर्मीं । बीज तें निरूपिलें सहज राहें रे तूं समी । शमदम रिगुनिगु याचा दाह रे संगमी ॥१२ ॥तटाक देहभूमी रेचक कुंभक आगमी । चंद्रसूर्य ऐसे जाणा पूर्ण परिपूर्ण रे रमी । लोलुंगता ऋद्धिसिद्धी धारणाते मनोरमी । होशील तूंचि सिद्ध गुरूशिष्य सर्व समी ॥१३ राहो नेदी विषयसुख वायां उद्वेग विस्तार । प्रेमामृत हरिनाम हेंचि सेवीं रे तूं सार । भजतां नित्यकाळ तुटे विषयाचार । तया योगे होईल रे वृत्ति हे एकाकार ॥१४॥ उद्भट सुख साधीं जेणें दिसे आत्मानाथ । बिंबामाजी बिंब पाहें सर्व होई तूं सनाथ । निश्चित निराळा रे निगम साधीं परमार्थ । धिटिव ऐसी आहे सर्व पुरती मनोरथ ॥१५॥ उष्णातें घोंटी बापासम चांदिणें धरीं । तेथील अमृतमय चकोर होई झडकरी । लक्ष हें परब्रह्मीं सदा पूर्णिमा ते सारी । निवतील अष्टही जंगे बोल्हावती शरीरीं ॥१६॥ त्रिकाळ ज्ञानकळा येणें साधले रे निज । तितिक्षा मनोवेगें नित्य प्रत्यक्ष ब्रह्मबीज । साकार निजघटीं तो प्रगटे अधोक्षज । पर्वकाळ ऐसा आहे गुरूमुखें रे चोज ॥१७॥ हें ऐकोनियां पुत्र मातें विनविता पै जाला । उपदेश ब्रह्म लक्षीं सर्वत्र केला वो काला । सांडिले संप्रधार आत्मा एकत्र वो केला । कैसे हे उपदेशणे वेदांसी अबोला ॥१८॥ ऐकें तूं मदालसे मज बोध आत्मारामीं । ऐकतां वो उपदेश बहुत संतोषलों उर्मीं । प्रेमांमृत जीवनकळा वोल्हावतु असे धर्मी । निःशेष विषये वो ते समर्पिलें परब्रह्मीं ॥१९॥ विपरीत माते जालें आप आपामाजीं थोर । चैतन्य हें क्षरलेंसे हाची धरीला वो विचार ॥२०॥ माझा मी गुरू केला मातेचा उपदेश । न दिसे जनवन सर्व रूप महेश । निराकारी एक वस्तु अवघा दिसे जगदीश । हरपले चंद्रसूर्ये त्याची माजीं रहीवास ॥२१॥ अनंत नाम ज्याचें त्याचाबोध प्रगट । गुरूखूण ऐसी आहे नित्य सेवी वैकुंठ । नेणें हें शरीरमाया रामकृष्ण नीट वाट । उच्चारू वो एकतत्त्व सेवा सुख वो धीट ॥२२॥ हे ऐंकोनी मदालसा म्हणे भला भला पुत्रराया । उपजोनी संसारीं रे तोडीं तोडीं विषया । मुक्त तूं आहासी सहज शरण जाय सद्गुरू पाया । आदिनाथ गुरू माझा त्या निवृत्तीसी भेटावया ॥२३॥ तेथूनी ब्रह्मज्ञान उपदेश अपार । समरसें जनी वनी राज्य टाकीं असार । यामाजी हिंसा तुज द्वेषिता रे चराचर । चैतन्य ब्रह्म साचें एकरूपें श्रीधर ॥२४॥ ज्ञानदेव निवृत्तीसी शरण गेला लवलाहीं । हरपली निज काया मन गेलें ब्रह्मडोहीं । निरसली माया मोहो द्वैत न दिसे कांहीं । अद्वैत बिंबलेंसे जनवन ब्रह्म पाही ॥२५ ॥
अर्थ:-
चरित्रांत केल्याप्रमाणे मदालसा आपल्या मुलांना उपदेश करीत आहे हे पुत्रा परमात्म्याच्या ज्ञानाकरिता श्रीगुरूमुखांने उपदेश ग्रहण करून एकनिष्ठपणाने वैराग्य, ध्यान व ज्ञान संपादन केले असता प्रपंच ज्ञान बाधित होऊन दृष्ट अदृष्ट पदार्थाचा आत्मदृष्टीने लोप होऊन जातो. जगतच नाही असा अजातवांदाचा सिद्धांत पटल्या नंतर जगताची उत्पत्ति स्थिति व अंत हे भाषाच उरत नाही. एक सच्चिदानंदस्वरूप ब्रह्मच आहे व ते माझे स्वरूप आहे असा निश्चय होतो. पण अशा भूमिकेला प्राप्त होण्याला अनेक जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण घडले पाहिजे. तरच परमात्मा प्रगट होतो. हे बाळा, तूं आत्मानंदा विषयी सावध रहा हा उघड उपदेश मी तुला करीत आहे. कारण जन्माला येऊन जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करणे हेच एक मनुष्य जन्माचे साध्य आहे दैत तत्सापेक्ष अद्वैत यांचा समूळ निरास करून टाक व अशा कल्पना ह्या टांकून देऊन तूं सर्वत्र ऋषिकेशी परमात्मा भरला आहे. असे पाहा. म्हणजे माया ममता या ओसाड होऊन जातील. जेणे करून स्वयंप्रकाश परमात्म्याच्या ठिकाणी त्या नाहीशा होऊन जातील. असा तूं देहादि पदार्थाविषयी उदास होऊन जा. जगतांचे भान दुःखदायक असून त्यातून सुटण्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. जिव्हादि इंद्रिये बलवान आहेत. यातून कसे सुटावे? इत्यादी कोडी आपोआप सुटतात. मिथ्या दुःख देणारा मोहपाश तोडून टांक व्यसनाने संकट, तसेच कष्ट देणाऱ्या मनास प्रपंचाचा विचार कर व त्यांत सत्य काय आहे ते पाहा. दुःख देणारा प्रपंच,शरीर, जन्ममरण ही सर्व अज्ञान कार्ये आहेत. याचे जे अज्ञान त्याचा नाश करून सर्व नारायण स्वरूप आहे असा निश्चय कर.ज्या व्यवहारांत हा मी आहे. हे माझे आहे व हे दुसऱ्याचे आहे. याशिवाय दुसरी गोष्ट नाही. याला कारण असणाऱ्या अहं मम बुद्धीचा नाश कर. व ज्या अज्ञानामुळे जन्ममरण दिसतात त्याचाही नाश करून भगवन्नामाचा टाहो फोड. काम क्रोध सोडून धैयनि सतत ध्यान कर पण ध्येयाला भिन्न पाडु नको. असे नामस्मरण केले तर हे दुष्ट विषय शरीरातून जातील.आत्मा नित्य ब्रह्मरूप आहे. असा निश्चय कर.हरिकीर्तनांत, नामस्मरणांत मनाची करमणूक करून घे. व मनालाही नित्य एकरूपाने व सर्वास अधिष्ठान असणाऱ्या हरिचे ध्याने लाव तसेच ज्ञानस्वरूप सर्वांतरयामी अखंड अशा आत्म्याचे ज्ञानाचा प्रयल कर. शांती, विषयापासून मनाची निवृत्ति,क्षमा, दया, आणि सर्व प्राण्याविषयी आत्मत्व बुद्धि असू दे. तसेच सर्वाभूती भगवत्भाव ठेऊन कल्पनेतील व कल्पनेच्या पलीकडील पुढे होणारे सर्व परमात्मरूप आहे. असे समजून, वैषयीक इच्छा सोडून सनातन ब्रह्माचे ध्यान कर. मन एकाग्र करून विषयापासून निवृत्त होण्याचा प्रयल कर जर विषयांनी इंद्रियांना जागृत केले तर मोठ्याने आत्मारामाविषयी नामस्मरण कर. आनंद देणारा लक्ष्मीचा पति जो नारायण त्याचे चिंतन कर. सोडणे किंवा तोडणे हे ज्या जिव्हेमुळे होते. ती जिव्हा नामस्मरणांत तत्पर ठेव वैराग्य,कष्टावाचून दुःख सहन करणे व परमात्म्याच्या ठिकाणी मनाचा लय करणे असे केले तर अहं मम’ अध्यास जाऊन ब्रह्माएवढा व्याप्त होशील अरे तुझी वाणी, मन, डोळे, इत्यादि इंद्रिये श्रीगुरूंच्या किर्तनांत तत्पर ठेव.इंद्रियांचे तडाख्यात न जाता तूं आपल्या आपल्याशी च विचार करशील तर मला देहसंबंध नसून एकरूप परमात्म्यातच मी आहे. असे ज्ञान प्रगट होऊन जन्ममरणांतून सुटशील. इंद्रियांना विषय न दिलेस तर त्यांची कसमस मोडून आकाशादिप्रपंचासह तुझा परमात्म्यांत लय होईल हे वर्म तुला सांगितले.आतां ब्रह्मत्वाचा निश्चय कर जीवब्रम्हैक्यज्ञानानंतर शम, दम,इंद्रिये विषय संबंध या सर्वांना मिथ्याच ठरते. देहरूपी किनाऱ्यावर रेचक, कुंभकरूपी उगवणारे चंद्र सूर्य आहेत. असे जाण त्या ध्यानैक तत्पर होऊन मन रममाण झाले तर तुला रिद्धिसिद्धी प्राप्त होतील. व गुरू शिष्यांच्या ठिकाणी एकरूपाने असणारे परमतत्त्व तूंच होशील प्रेमामृतरूपी व सर्वांचे सार ते घेतले असता संसारच निवृत्त होतो. असेच नेहमी नामस्मरण करशील तर विषय सुटून वृत्ति एकाकार होईल.आत्मज्ञानाने परमसुख प्राप्त करून घे. सर्व जीवांमध्ये एक परमतत्त्व बघ व तूही परमात्मरूप हो ज्या योगाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.त्या वेदांने सांगितलेल्या निश्चित मर्गानी परमार्थ साध. ताप नाहीसा करून शीतलत्व देईल अशा चांदण्यातील परमात्मरूप पौर्णिमा पहा. व चंद्राचे ठिकाणी तूं चकोर पक्षी होऊन अमृतमय हो. त्यायोगाने शरीर शांत होऊन अष्टसात्त्विक भाव उमटतील.अशा त-हेच्या साधन चतुष्टय संपत्तीने स्वतःचे ज्ञानस्वरूपत्व प्राप्त होईल. तितिक्षेसह तीव्र इच्छेने प्रयल केला तर या शरीरांतच ब्रह्मभाव प्रगट होईल. असे हे गुरूमुखांने श्रवण करणे ही मोठी पर्वणीच आहे. हा उपदेश ऐकून मुलगा म्हणतो.ज्या परमात्मवस्तुबद्दल वेदही गप्प बसतो. अशा लक्ष्यब्रह्माच्या उपदेशाने सर्व अनात्मवस्तुंना मिथ्यात्व ठरून एकच आत्मा सर्वत्र व्याप्त कसा आहे. हे समजल.आई हा आत्मबोध ऐकून मला अतिहर्ष झाला. या उपदेशरूपी प्रेमामृत जीवनंकलेने अष्टसात्त्विक भाव उत्पन्न होऊन सर्व विषयही ब्रह्मरूप झाले. माझी काय विलक्षण स्थिति झाली आहे ही पहा. मी माझ्यामध्ये मावेनासा झालो. मला तर असे वाटते की परमात्मा जगतरूपाने नटला आहे. आई तुझ्या या उपदेशाने आता मी, माझा गुरूने हे सर्व जगत भिनत्वाने प्रतितीला येत नसून चंद्र सूर्यादि सर्व निराकार परमात्मरूपच दिसते. या जगदीशाने सर्व व्यापले आहे व त्यामध्येच माझा रहिवास आहे.असा बोध असून शरीरासह मायाकार्य जगताचे भान नष्ट होऊन नामस्मरणांत दंग असणे ही अनंताचे ज्ञानाची व नित्यमुक्ततेची गुरुखूण आहे. म्हणून निर्भय व अद्वैत आनंदरूप व्हावे. असे मुलांचे बोलणे ऐकून मदालसा म्हणते. बाळा धन्य आहे तुझी, विषयाचे पाश तोडणे हे मुख्य आहे. तूं मूळचा मुक्त आहेस म्हणून अदिनाथांच्या परंपरेतील सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ त्यांना शरण जा. सर्व ठिकाणी समब्रह्मच आहे. या दृष्टीने असार म्हणून प्रपंच टाकलास तर ठिक, नाहीतर त्यांचा व्देषाने त्याग केला तर ती हिंसा होईल. ब्रह्मचैतन्य एकरूपाने सर्वत्र व्याप्त आहे.मी गुरूनिवृत्तीनाथांना शरण झाल्याबरोबर अज्ञान व अज्ञानकार्य जगत नाहीसे होऊन मनासह स्वतःचे शरीर ब्रह्मरूप झाले. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे हे जाणून जनवन सर्वत्र अद्वैत ब्रह्मदृष्टी झाली
असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
