ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.702

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-५ वे, गुरुवर्णन अभंग ७०२

गुरू हा संतकुळीचा राजा । गुरू हा प्राणविसांवा माझा । गुरूवीण देव दुजा । पाहतां नाहीं त्रिलोकीं ॥१॥ गुरू हा सुखाचा सागरू । गुरू हा प्रेमाचा आगरू । गुरू हा धैर्याचा डोंगरू । कदाकाळी डळमळीना ॥२॥ गुरू वैराग्याचे मूळ । गुरू हा परब्रह्म केवळ । गुरू सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ॥३॥ गुरू हा साधकाशी साह्य । गुरू हा भक्तांलागी माय । गुरू हा कामधेनु गाय । भक्तां घरीं दुभतसे ॥४॥ गुरू घाली ज्ञानांजन । गुरू दाखवी निजधन । गुरू सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ॥५॥ गुरू मुक्तीचें मंडन । गुरू दुष्टाचें दंडन । गुरू पापाचें खंडन । नानापरी वारितसे ॥६॥ काया काशी गुरू उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हाशीं । बापरखुमादेविवराशी । ध्यान मानसीं लागलें ॥७॥

अर्थ:-
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ तसेच दयाळु श्रीगुरू आपल्या शिष्याविषयी काय करतात याचे वर्णन या अभंगात केलेले आहे. गुरू हा संत कुळांतील राजा आहे. गुरू हा माझ्या जीवाचे विश्रांति स्थान आहे. गुरूवांचून त्रैलोक्यांमध्ये देव नाही. गुरू हा सुखाचा समुद्र आहे. प्रेमाचा आगर आहे. तसेच तो धैर्याचे डोंगर असून कसल्याही अवस्थेमध्ये डगमगणारा नाही. गुरू हा वैराग्याचे मूळ कारण आहे. तो शुद्ध परब्रहा आहे. गुरू हा लिंग देहातील सत्य आत्मा व मिथ्या साभास अंतःकरण ही दोन्ही एकच समजणे व त्यामुळे अंतःकरणाश्रित असलेले पाप पुण्य, सुखदुःख वगैरे धर्म सत्य जीवात्म्यावरही मानले जातात. शुद्धात्मा व साभास अंतःकरण याचे ऐक्य मानणे यालाच शास्त्रीय भाषेत ग्रंथी असे मानतात. व माऊलीने तिला गांठ असे म्हटलेले आहे. या गांठी मुळेच शुद्ध जीवात्म्याच्या ठिकाणी अनेक प्रपंच दुःखे प्रतीत होतात. ही आत्मस्वरूपांच्या ठिकाणी भासणारी दुःखे नष्ट करावयाची असेल तर शुद्ध जीवात्मा आणि मिथ्या साभास अंतःकरण ही अत्यंत भिन्न आहेत असा निश्चय करून देणे म्हणजे ग्रंथिभेद होय. ती लिंग देहात असलेली आत्मा व अनात्मा यांची गांठ श्रीगुरु तात्काळ सोडतात. गुरु हा साधकाला आत्मज्ञान प्राप्त करून देण्याला सहाय्य आहे. गुरू हा साधक भक्तांची आई आहे. गुरु हा भक्तांची इच्छा पूर्ण करणारी कामधेनु आहे. आणि ती भक्ताघरी त्याला ज्ञान देते. ज्ञानांजन असून साधकाला मोक्ष निधान दाखवितो. गुरू हा मुमुक्षुला आत्मज्ञान प्राप्तीचे सौभाग्य देऊन सांधुच्या ठिकाणी असलेला आत्मबोध त्याला प्राप्त करून देतो. गुरू म्हणजे मोक्षाची शोभा असून दुष्टांचे दंडन करणारा आहे तसेच मुमुक्षुच्या अनेक पातकांची अनेक प्रकाराने निवृत्ति करतो. श्रीगुरू हे तुझा देहही प्रत्यक्ष काशीच आहे. असा उपदेश करून तारक मंत्र देतो. तो तारक मंत्र आम्हाला श्रीगुरूनी दिल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल यांचे ध्यान आमच्या मनाला लागले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading