👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८५
रवितेज किरण फांकलीया तेज । उडे रे सहज तिमीर रया ॥२॥ तैसा तूं गभस्ति निवृत्ति उदारा । उगवोनी चराचरां तेज केलें ॥२॥ तेजीं तेज दिसे अव्यक्ताचा ठसा । उमजोनी प्रकाशा न मोडे तुझा ॥३॥ चंद्रोदयीं कमळे प्रकाशिलीं सितें । तैसे तुझें भरिते करी आम्हां ॥४॥ वृत्तीची निवृत्ति देखिली म्यां तुझी । हरपली माझी चित्तवृत्ति ॥५॥ ज्ञान ऐसे नांव ज्ञानदेवा देसी । शेखीं तुवां रूपासी मेळविलें ॥६॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे श्रीगुरू निवृत्तीराया सूर्योदयानंतर जसा जगताचा अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे तुमचा अवतार या भूतलांवर झाल्यामुळे जगातील अज्ञान नष्ट करून ते तेजोमय केलेस. सूर्याप्रमाणे जे ज्ञान तुम्ही दिलेत ते मुळचे अव्यक्त ज्ञान, त्यावर विशेष ज्ञानाचा ठसा उठविला तरीही तुमचा स्वप्रकाश मोडत नाही. सूर्योदय झाला असता जशी कमळे प्रफुल्लित होतात. त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानोपदेशाने आम्हा सर्व मुमुक्षुना ज्ञानाने आनंदाचे भरते येते. हे श्रीगुरूनिवृत्तिराया ! तुमच्या स्वरूपाचा विचार केला तर वृत्तीची निवृत्तीच झाली आहे असे दिसते. म्हणूनच तुमचे नांव निवृत्ति आहे. त्या अनुभवाने माझीही चित्तवृत्ति निवृत्त झाली. आणि माझे ज्ञानदेव हे नांव ठेऊन त्या ज्ञानदेवाला आत्मस्वरूपाचे ज्ञान देऊन, शेवटी तुम्ही आपल्या स्वरूपांत मला मिळवून घेतले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
