सारदामाता चरित्र भाग ४, (१६ ते २०)

शामा देवींनी जगध्दात्रीची पूजा केल्यानंतर सारदा देवीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली  त्यांना दक्षिणेश्वरी जायची ओढ लागली  तोच दुसऱ्या दिवशी त्यांची सासू चंद्रमणीच्या निधनाची बातमी आली  त्या लगेच दक्षिणेश्वरी पोहोचल्या  रामकृष्णांची कृश झालेली तब्येत बघून............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

शामा देवींनी जगध्दात्रीची पूजा केल्यानंतर सारदा देवीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली  त्यांना दक्षिणेश्वरी जायची ओढ लागली  तोच दुसऱ्या दिवशी त्यांची सासू चंद्रमणीच्या निधनाची बातमी आली  त्या लगेच दक्षिणेश्वरी पोहोचल्या  रामकृष्णांची कृश झालेली तब्येत बघून…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! सारदामाता !!!    

         भाग – १६

             एके संध्याकाळी माताजी रामकृष्णांसाठी जेवण घेऊन गेल्या  जेवण झाल्यावर भांडी आवरून त्या जायला निघाल्या  तोच त्यांना रामकृष्णांनी थांबायला सांगितले  म्हणाले, मन घट्ट करून, मी काय सांगतो ते ऐका     

            “मी जेव्हा कोणाच्याही हातचं खाईल, रात्री कलकत्त्याला राहील  भोजनातला मुख्य पदार्थ दुसऱ्याला देऊन उरलेलं खाईल, तेव्हा मी हे शरीर सोडणार असं समजा “

“आपण असं बोलल्याने माझ्यावर काय परिणाम होतो याचा विचार केला का?” सारदा म्हणाल्या

             रामकृष्ण म्हणाले, “हो, विचार केला   खरं म्हणजे मला खूप काम करायचे होते  परंतु विधिलिखिता पुढे आमचं काय चालणार? ठरलेल्या वेळी गेलंच पाहिजे  माझ्या जाण्याने तुम्ही दुःखी कष्टी झालेलं मला आवडणार नाही  माझे अनेक शिष्य माझ्यावर श्रद्धा ठेवून येतात  ती सर्व तुमची मुले आहेत  तुम्ही त्यांना प्रेम देऊन कार्यरत ठेवायचे आहे  त्यांना तुमची फार गरज आहे  माझं राहिलेल काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे “

             पतीच्या निर्वाणीच्या बोलण्याने माताजींच्या मनावर जबरदस्त आघात झाला  आवंढा गिळून अश्रू मागे परतवले  त्यांच्या अंगावर शाल पांघरुन आपल्या खोलीत आल्या  त्या रात्री त्यांनी जेवण केले नाही  रात्रभर त्यांना झोप आली नाही

             रामकृष्णांची तब्येत ठीक नव्हती  तरीही शिष्य मंडळींच्या प्रश्नाला उत्तर देत, त्यांचे शंका  निरसन करीतच होते

                 एक दिवस माताजी व रामकृष्ण बोलत बसले असता,  रामकृष्णांनी एकदम विचारले, “तुम्हाला दरमहा किती रुपये लागतील?”

“लागतील पाच सहा रुपये “

  रामकृष्णांना माहीत होते, ५-६ रुपयात महिन्याचा खर्च भागणे शक्यच नाही  ते म्हणाले, तुम्हाला किमान महिन्याचे पाचशे सहाशे रुपये तरी लागतील  तेवढी रक्कम तुम्हाला मिळावी, म्हणून बलराम बापूकडे जमा करतो  अशी निर्वाणीची भाषा का? अहोऽ! माझा अंतकाळ जवळ आला आहे  माझ्या नंतर तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून तजवीज करतोय  त्या काय बोलणार?  आलेला आवंढा गिळून स्वतःला सावरले

           रामकृष्णांचा घसा दुखतच होता  औषधांचा उपयोग न होता दुखणे, वेदना वाढतच होत्या  भक्तांनी  कुमार टोळीत वास्तव्याला असलेल्या कवी राज गंगा प्रसाद सेनांना बोलावले  त्यांनी तपासून तीन दिवस उपचार सुरू असेपर्यंत, पाणी एकदम बंद करायला सांगितले  त्याप्रमाणे पाणी सोडून दिले  तहान लागली तर माताजी दूध देत होत्या  उपयोग होतच नव्हता  त्यांच्या घशाचा आजार वाढतच होता  वरवर सगळं पूर्वीसारखा चालू होतं  पण चैतन्य नष्ट झालं होतं  दक्षिणेश्वराचे वातावरण उदास झाले होते  सर्वांना चुकवून माताजी आपले अश्रू  स्वतःच पुसत होत्या  भक्त  मनापासून ठाकुरांची सेवा करीत होते  माताजींना इतक्या लोकांचा स्वयंपाक करावा लागत होता

              चांगल्या निष्णात डॉक्टरांचा इलाज करणे आवश्यक आहे हे जाणून भक्तांनी शामपुकुरला भाड्याचं घर घेऊन तिथे रामकृष्णांना आणले  कलकत्त्याचे प्रसिद्ध डॉक्टर महेंद्रलाल सरकार त्यांना औषध देऊ लागले  पण योग्य पथ्य पाणी सांभाळले जात नसल्यामुळे, औषधाचा उपयोग होत नव्हता  या घरात आडोश्याची जागा नसल्यामुळे, संकोची स्वभावाच्या माताजी आल्या नव्हत्या  

          माताजी शिवाय शामपुकारला रामकृष्ण बेचैन होते  तर तिकडे दक्षिणेश्वरला माताजी! भक्त स्त्रियांचे काही बोलणे ऐकून त्या शामपुकुरला आल्या  पती समोर जाऊन त्यांचा बांध फुटला  अश्रू आवरणे कठीण झाले  रामकृष्णांनी कारण विचारल्यावर, म्हणाल्या, “आपण माझ्यावर रागावून इकडे आल्याचे समजलं, म्हणून ताबडतोब आले  तुम्हाला राग यावा असं कोणता अपराध  माझ्याकडून घडला?”

” छे! छे! मी रागावलोच नाही “

            भक्त मंडळी रामकृष्णांची सेवा मनापासून करत होते  

               दोन अडीच महिने औषध पाणी करूनही आजार वाढतच गेला  डॉक्टरने त्यांना हवेशीर जागेत नेण्याचा सल्ला दिला  कासीपोर मार्गावर मोकळ्या जागेत असलेल्या गोपीचंद घोषचे घर भाड्याने घेतलं  समोर बाग असल्यामुळे परिसरात मोकळी हवा खेळत होती  हे घर माताजींना फार आवडलं  स्वयंपाक इथेही करावा लागे  पुतणी लक्ष्मी सोबतीला होती

              एके दिवशी दुपारी गोपालदा आला  त्याची माताजीवर खूप भक्ती होती  यावेळी कसे काय आलात? ठाकुरांची तब्बेत बघायला  त्या म्हणाल्या, गोपालदा, इतकी औषध पथ्य पाणी करूनही त्यांना बरं का नाही वाटत? आतांपर्यंत काहीतरी उतार पडायला हवा होता  गोपालदाला उत्तर देणे कठीण झाले  म्हणाला, माताजी, तुम्ही ज्ञानी आहात  माताजी,  सर्व परमेश्वरी इच्छेने घडत असते  तुम्ही मन घट्ट करा

           क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!  संताजी घोरपडे  !!!

                  भाग – १७

               औरंगजेब पुढे म्हणाला, संताजीने पोरवया पासूनच शिवाजीचा गनिमी कावा उचलला  शिवा जाऊन इतकी वर्ष झाली तरी, या भूमीतली चिमूटभर माती सुद्धा हाती लागत नाही

         संताजी घोरपडे दिवस-रात्र मोगलांच्या मागावर धावत होते  बिदनुर मध्ये मोगलांचा पराभव करून संताजी घोरपडे विशाळगडावर असलेल्या ताराबाईंना भेटायला जाताना कापशीला मुद्दाम मुक्काम केला  बहिर्जी व मालोजीही आले होते  बहिर्जीला गजेंद्र गडाची जहागिरी मिळाल्यामुळे त्याचा ओढा तिकडे होता  मालोजीही दत्तवाडला स्थायिक होण्याच्या विचारात होते  संताजी येताच तिन्ही बंधूंची खलबते सुरू झाली

               त्याचवेळी नारोचेही लग्न संताजींनी मोठ्या थाटात करून दिले  लक्ष्मी बहिरेवाडीच्या वाड्यात नांदायला आली  नारोचे लग्न होताच, बहिर्जी गजेंद्रगडला व मालोजी दत्तवाडला स्थायिक झाले  कापशीला घोरपडे वाड्यात फक्त त्यांच्या दोन पत्नी सोयराबाई, द्वारकाबाई आणि राणोजीचेच वास्तव्य होते  

              दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास संताजीराव विशाल गडी पोहोचले  हुकूमतपन्ना रामचंद्र सदरेवरच होते  त्यांना मुजरा करताच पंतांनी उठून त्यांना अलिंगन दिले  धनाजी जाधव ही तेथेच होते  संताजींनी बिदनूरच्या मोहिमेची सविस्तर माहिती रामचंद्र पंतांना दिली  शंकराजी म्हणाले, दक्षिणेतल्या सर्व मांडलिक राज्यांना स्वतःची जाणीव करून दिल्यामुळेच ते लढायला तयार झाले  कुमक कशी जमवली हे सांगून, संताजीराव म्हणाले, राणी चन्नम्मा देवीचे मराठ्यांवर फार उपकार आहेत  महाराजांना तर सुरक्षित जिंजीला पोहोचवलेच, परंतु जाननिसार खान विरुद्ध लढण्यासाठी आपली बंदूकधारी तुकडी आमच्या मदतीला पाठवली

                 धनाजी जाधव म्हणाले, बंदूक चालवणारे ५००० सैन्य, पायदळ असा फौजफाटा घेऊन बादशहाने सर्जाखानला साताऱ्यावर चाल करायला  पाठवले  संताजीचं कर्नाटकच्या लढाईतून लक्ष काढण्यासाठी व स्वतःच्या फौजेचा बचाव करण्यासाठीच ही मोहीम आखली असावी

        रुस्तमखान साताऱ्यावर चालून आल्याची वार्ता कळताच, सेनापती संताजींनी आपल्या सेनेसह ते रुस्तमखानवर चालून गेले  बरोबर धनाजी जाधव, रामचंद्रपंत, शंकराजे नारायणही होते  रुस्तमखान्याने आपला मुलगा गरीब खानला ५००० सैन्य देऊन, त्याला सैन्याच्या आघाडीवर ठेवले  मोगल सैन्याच्या आघाडीला हत्ती होते  युद्धाला धडपणे तोंड लागायच्या आततच मराठ्यांच्या बंदूकधारी सैन्याने आघाडीच्या मोगल सैन्यावर गोळी बार सुरू केला  आघाडीवर असलेल्या हत्तींवर गोळ्यांचा वर्षा होताच, ते मागे फिरले व आपल्याच सैन्याला पायाखाली तुडवू लागले  हे पाहून, रुस्तमखान पुढे धावला  इतक्यात मराठ्यांच्या गजदलाने हल्ला चढवला  त्यामुळे मोगल स्वारांचे घोडे उधळले  ते काही केल्या आवरल्या जात नव्हते  तशाही परिस्थितीत रुस्तमखान मराठ्यांशी शौर्याने लढत होता  त्याने सर्व शक्तीनिशी मराठ्यांच्या एका तुकडीवर हल्ला केला  

          या तुकडीत नेमके संताजीराव होते  मोगलांच्या हल्ल्याने मराठे सैन्य पळून जाऊ लागले  अर्थात मोगलांना चकवण्याची संताजींनी आखलेली ही गनिमी काव्याच्या चालीचा एक भाग होता  मोगलांनी पळून जाणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग सुरू करताच, मराठ्यांच्या राखीव दुसऱ्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला केला  त्यात अनेक मोगल सैनिक जखमी झाले  मोगली घोडे हस्तगत केले  त्यामुळे चिडलेल्या रुस्तमखाने आपला हत्ती मराठ्यांच्या अंगावर घातला  गोळीबारामुळे रुस्तमच्या कपड्यांनी पेट घेतला  रुस्तमखान बाणाने आणि गोळीबाराने जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन खाली पडला  मराठा सरदार मानाजी मोरेंनी रुस्तमला आपल्या छावणीत नेले

          रुस्तमखानचा मुलगा गरीबखानने मराठ्यांवर हल्ला केला  पण तोही काही वेळातच जखमी होऊन खाली कोसळला  

             रुस्तमखानच्या छावणीत मराठ्यांची एक  तुकडी घुसून त्याची मुले, बायकांना पकडून सातारच्या किल्ल्यात कैद केले  बादशहाला बातमी कळताच, त्याने तात्काळ गाझीउद्दीनखान, बहादूरखान व दिलेरखान यांना साताऱ्याला वेढा घालायची आज्ञा दिली  आणि हेही कळवले की, रुस्तम व त्याच्या दोन बायका आणि मुले मराठ्यांच्या ताब्यात आहे  त्याने आपला गुर्जबदार मीर हसनला पालखी आणि चार घोडे देऊन रुस्तमच्या बायका मुलांना आणण्यास पाठवले  त्याचबरोबर रुस्तमास निरोप पाठवला की, तुझ्या दोन्ही बायका व मुले छावणीत पोचली आहेत  तसेच तुझ्या सुरक्षेसाठी फौज तैनात करण्यात आली आहे

                इकडे रुस्तमखान १६ दिवस मराठ्यांच्या कैदेत होता  त्याच्या ४००० घोडे व आठ हत्तींचा पाडाव झाला  शिवाय एक लाख रोख रक्कम दंड द्यावा लागला  या सर्व बातम्या बादशहाला कळल्या तेव्हा, तो अतिशय चिंत्ताक्रांत झालाय  मराठ्यांच्या सेनापती संताजीने मोकळीस आलेल्या हिंदवी स्वराजास वाचवण्यासाठी मोगली सरदारांना पराभूत केले औरंगजेबाची झोप उडाली    

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
             दि  २२-१०-२०२३

!!!  सारदामाता  !!!

                  भाग – १८  

            रामकृष्ण म्हणाले, “अहोऽ! जगाचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे ” सारदा माता म्हणाल्या, “पण मी एक सामान्य स्त्री! माझेकडून येवढे कठीण काम कसे होईल?”

भावावेशात जाऊन ठाकूर म्हणाले, “मला खूप काही करायचं होतं, पण हातून काहीच झाले नाही  ते सर्व तुम्हालाच करायचं आहे  आणि तुम्ही ते करणार आहात   हे काम स्वतःसाठी नसून, जनकल्याणार्थ करायचे आहे  तुम्हाला योगेन, गोलप, नरेन, राखाल, बलराम, गोपाल हे शिष्य मदत करतील “

           “त्यांच्या सहकार्याने मी नक्की करेन  आता खाऊन घ्या व विश्रांती करा “

 रामकृष्ण म्हणाले, “यापुढे हा देह विश्रामच करणार आहे  राहिलेलं काम तुम्हालाच पूर्ण करायचे आहे “

         रामकृष्ण आजारातून  बरे होणार नाही याची सर्वांनाच खात्री पटली  माताजीही पती वियोगाचे दुःख सहन करण्याची मनाची तयारी करत होत्या

     एक दिवस रामकृष्णांनी त्यांना विचारले, “तुम्हाला कधी स्वप्न पडतात का?”

  “होय!परवा रात्री जगन्माता माझ्यासमोर आली  त्यांची वाकडी मान पाहून, आश्चर्य प्रगट केल्यावर, माता म्हणाली , रामकृष्णच्या गळ्याला काही झालं ना, त्यामुळे  मलाही झाले  मला काही अर्थबोध झाला नाही  जागी होऊन डोळे उघडून पाहिलेत तर, कोणीच नव्हते “

           पत्नीचे ऐकून रामकृष्ण गंभीर झाले  म्हणाले, “जगाच्या कल्याणासाठी मी अनेकांचे पाप स्वतःकडे घेतली  त्याचाच परिणाम हे दुखणे  मीच सर्व कष्ट भोगणार  तुमच्यापैकी कोणाला काही शिल्लक ठेवणार नाही “

               डॉक्टर महेंद्रांनी रामकृष्णांच्या जवळच्या शिष्याला बोलावून सांगितले, “मी खूप प्रयत्न केले  पण यश आले नाही  आता फक्त परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे ” हे ऐकून शिष्यांच्या डोळ्यात पाणी आले

           त्या संध्याकाळी निरंजन, राखाल, योगेन खजुरांचा रस प्यायला झाडाजवळ उभे होते माताजी  खिडकीतून बाहेर पाहत असतांना, त्यांना दिसले, रामकृष्ण त्वरेने जिना उतरत आहेत  जिथे त्यांना साधं कुशीवर वळवताना दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, ते एवढा मोठा जिना कसे उतरले? पण अविश्वास तरी कसा करणार? भ्रम झाला असावा असे वाटून सत्य पडताळण्यासाठी  त्या ठाकूरांच्या खोलीत गेल्या   त्यांचा रिकामा बिछाना पाहून त्या घाबरल्या  चहूकडे बघितलं  पण ते कुठेच नव्हते  त्या चिंताग्रस्त होऊन  स्तब्ध विचार करीत उभ्या असतांनाच त्यांना दिसले, ते पहिल्यासारखे वेगाने आपल्या खोलीत आले होते  व बिछान्यावर अंग टाकले  ते स्वतः सांगतील म्हणून त्यांनी वाट पाहिली पण ठाकूर काही बोलले नाही

         दुसऱ्या दिवशी त्यांना दूध पाजताना, माताजींनी विचारले, “तुम्हाला बिछान्यावरूनही उठणे शक्य नसताना काल धावत पळत कुठे गेला होतात?”

” कोण? मी? कसं शक्य आहे?”ठाकूर म्हणाले

 माताजी म्हणाल्या, “प्रथम मलाही तसेच वाटले  पण नंतर स्वतः खात्री करून घेतली “

” म्हणजे, तुम्ही मला पाहिलत ? “

“होय!”

          सांगणे आवश्यक असल्याचे जाणून, ते सांगू लागले     “काल ही आपली अबोध पोरं, समोरच्या बगीच्यात  खजुरीचा रस प्यायला गेली होती  या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आपल्या दोघांवर आहे  ज्या झाडाजवळ ही मुले उभी होती, त्या झाडाच्या मुळाशी मोठा भयंकर विषारी काळा साप होता  त्याने दंश केला असता, म्हणून मी पळत गेलो  त्याला हाकलून पुन्हा न येण्याची ताकीद देऊन परत आलो ” 

     दिवसेंदिवस रामकृष्णांचा वाढता आजार पाहून, डॉक्टरने आपले प्रयत्न निष्फळ झाल्याचे सांगितले  माताजी फार अस्वस्थ झाल्या  त्यांना वास्तविकतेची जाणीव झाली  पण मन मानायला तयार नव्हते  मनात  म्हणाल्या, डॉक्टरांनी हात टेकले आता दैवी उपाय करून पहावा  तारकेश्वराला नवस करावा  त्यांनी आपला विचार पतीला सांगितल्यावर, ते म्हणाले, सोबत लक्ष्मी आणि एखाद्या सेविकेला घेऊन जा

              ठाकूरांच्या पथ्य पाण्याबद्दल आवश्यक सूचना देऊन, त्या तारकेश्वरी पोहोचल्या  हात पाय धुऊन मंदिरात जाऊन तिघींनी भक्ती भावाने नमस्कार केला  पुष्कळ वेळ झाला तरी माताजी आपली भूक तहान हरपून ध्यान मग्न होत्या  या दोघींनी आणलेली शिदोरी खाऊन भूक शांत केली  माताजी दोन दिवस त्याच अवस्थेत बसून होत्या  परंतु देवीची कृपा झाली नाही  तिसऱ्या दिवशी त्यांची समाधी उतरली  ओढ्यावर जाऊन थंड पाण्याने स्नान केले  तारकेश्वराची पूजा करुन नमस्कार केला

     थकलेल्या मनाने रात्री निद्रीस्त झाल्या  मध्यरात्री त्यांना भयानक स्वप्न पडले  भयानक आवाज होऊन मंदिर कंपित झालं  समोर मडक्यांची उतरंडी दिसली  कोणीतरी वरच्या मडक्यावर काठीचा प्रहार केला  वरच्या मडक्याचे तुकडे तुकडे झाले  ते दृश्य पाहून त्या चक्रावल्या  त्यांना जाग आली  स्वप्नाने  त्यांना बरंच काही सांगितलं  वरचं मडकं फुटलं  बाकीची तशीच आहे  याचा अर्थ ते मूळ मडकं स्वरूपात मिसळलं  मनुष्य देहाचेही तसंच आहे  मी इथे का आले? कोणाचा पती? मी निर्जल उपवास कोणासाठी केले? प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे  कोणी कुणाच नाही  या स्वप्नाने माताजींच्या मनात वैराग्य निर्माण झाले  तारकेश्वराच्या कुंडात स्नान करून ध्यानस्थ झाल्या  ध्यान संपल्यावर,  दोघींना म्हणाल्या, “लवकर आटोपा  आपल्याला लगेच निघायचे आहे “

            क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!  सारदामाता  !!!

                 भाग – १९

                  तारकेश्वरवरून येताच, माताजी सरळ रामकृष्णांच्या खोलीत गेल्या  माताजींना पाहताच, रामकृष्णांना त्यांच्यात कालीमातेची मूर्ती दिसली  त्यांनी विचार केला, माझ्या नंतर रामकृष्ण मठाची प्रमुख होऊन हीच कार्य सांभाळण्यास सक्षम आहे  ही अनेक शिष्य जमवून हिंदुस्तानात सर्वत्र संघाचा प्रचार करेल  त्यांना समाधान वाटले  तारकेश्वरीच्या मंदिरातील सर्व घटना त्यांनी अंतरज्ञानाने जाणल्या होत्या  तरी माताजींना विचारले, तारकेश्वर काही  म्हणाले का? त्या गप्प असलेल्या पाहून, रामकृष्ण म्हणाले, विधिलिखित टळत नसते  जन्ममृत्यू आणि भोग अटळ आहे  या देहाचं जीवित कार्य संपलेले आहे  यापुढे हे कार्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे   जगात शाश्वत काहीच नाही

          माताजी काहीच न बोलता, त्यांना खाण्यासाठी काही आणायला आपल्या खोलीत आल्या  त्या स्वयंपाक करीत असताना, योगींद्र मोहिनीने विचारलं, माताजी, ठाकूर इतके ब्रह्मनिष्ठ असल्यावर त्यांना इतक्या वेदना का भोगाव्या लागतात?

           माताजी म्हणाल्या, खरं म्हणजे त्यांना समाधी अवस्थेत देहत्याग करणे कठीण नव्हते  परंतु या शिष्यांना योग्य मार्गदर्शन देऊन सूत्रबद्ध करण्याकरिता त्यांना आयुष्य हवंय! म्हणून ते इतक्या जीवघेण्या वेदना सहन करत शिष्यांना उपदेश करतात  चर्चा करतात  हेच उपवन त्यांचे महान समाधी स्थान आहे

          संध्याकाळी त्या फारच उदास होत्या  काहीच  करावेसे वाटत नव्हते  तरी काम करीत होत्या  शशी (रामकृष्णनंदन) येऊन बाबा बोलवत असल्याचा निरोप दिला

 त्या चटकन उठून रामकृष्णांच्या खोलीत गेल्या  रामकृष्ण डोळे मिटून बिछ्यान्यावर पहूडले होते  हलक्या आवाजात म्हणाले, आलात तुम्ही? आज माझ्या मनात ब्रह्म भावाचे उद्दीपन होत आहे  माताजींनी आपले अश्रू  आवरून धरले  ठाकूरांच्या भोवती मृत्यू रेंगाळत असल्याचे त्यांना स्पष्ट जाणवले  रामकृष्णानी शेवटच्या टप्प्यात सुद्धा सेवाधर्म सोडला नाही  ते मरणासन्नावस्थेतही भाव समाधीत मग्न असत

              एकदा रामकृष्ण उशांच्या आधाराने बसले असता, माताजी लक्ष्मीसह प्रवेशल्या  त्यांना पाहून बोलण्याची ताकद नसूनही ते म्हणाले, हे पहा मी शेवटच्या प्रवासाला निघालोय  चहूकडून माझ्या भोवती पाश आवळला जात आहे  कसे बसे म्हणाले, तुम्ही चिंता करू नका  आज पर्यंत जशा राहिलात तशाच रहा  नोरेन, राखाल, शशी, बळवंत, गोपाल हे शिष्य तुमची काळजी घेतील  माझ्यापेक्षाही जास्त प्रेम तुमच्यावर करतील  लक्ष्मीची काळजी घ्या  पतीचे निरवानिरवीचे बोलणे ऐकून, माताजींना ते एखाद दुसराच दिवस या जगात राहतील हे जाणून त्या थरारल्या  मनाचा ताबा सुटला  हुंदके आवरता आले नाही

        दुसरा दिवस उजाडला  माताजींनी स्नान करून देवाची पूजा केली  सगळे एकनिष्ठ शिष्य रात्री जेवले नसल्यामुळे त्यांनी खिचडी केली  परंतु करपून गेली  वरची चांगली खिचडी शिष्यांना दिली व शरीरात बळ राहण्यासाठी अनिच्छेने करपलेली खिचडी स्वतः खाल्ली

            गच्चीत वाळत घातलेल्या रामकृष्णाचा पंचा गायब झाला  गच्चीतला माठ फुटून तुकडे तुकडे झाले  दिवस असूनही अंधारल्यासारखे वाटत होते  दिवस संपून संध्याकाळ झाली  शिष्य आपली भूक तहान हरवून गेले होते  खोलीत सर्व शिष्य आणि भक्त उदास बसून होते

            मध्यरात्र उलटली  रामकृष्ण प्रगाढ समाधीत असल्याचे जाणवले  मुखावर दिव्य तेज उमटले होते  ते समाधीत असतानाच महासमाधीत समाविष्ट झाले  कोणीतरी डॉक्टर सरकारांना घेऊन आले  त्यांनी तपासून नकारार्थी मान हलवली  नमस्कार करून बाजूला उभे राहिले  ती तारीख होती १६ ऑगस्ट १८८६

          सर्व उपस्थितांनी ठाकूरांचे अंतिम दर्शन घेतले  उद्यान भवन मुक रुदन करू लागला  माताजी  आक्रदंत म्हणाल्या, मला एकटीला सोडून का गेलात? त्या अफाट दुनियेत मी एकटी कशी राहू? त्यांचे करुण रुदन ऐकून, नरेंद्र त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले, माताजी, आम्ही सर्व एवढे बलदंड पुत्र असताना, तुम्ही स्वतःला एकट्या का समजता? तुमचे अश्रू आमच्या स्वामींना आवडणार नाही  ठाकुरांचा देह गेला असला तरी, आत्मा तुमच्यातच समाविष्ट आहे

        रामकृष्णांची निधन वार्ता वायुवेगाने पसरली  भक्तगण मिळेल त्या वाहनाने उद्यान भवनात आले  आत्यंतिक श्रद्धेने फुले वाहून अंतिम दर्शन घेतले  शवयात्रा निघाली  पिता, गुरूस्थानी असलेल्या ठाकूरांना गंगातीरी नरेंद्रांनी अग्नी दिला पूर्ण पूर्णत्वात मिळाले  आकाशात झेपावणाऱ्या ज्वाला बघून सर्व मंडळी शोकाकुल झाले  दुपारी कोणी जेवले नाही

           नरेंद्रंनी अस्थि कलश रामकृष्णांच्या पलंगावर ठेवला  माताजींनी नमस्कार करून, अंगावरील एक एक दागिना उतरवू लागल्या  शेवटचं हातातलं सोन्याचं कंगन काढायला सुरुवात करताच, रामकृष्ण समोर उभे दिसले  आजारी पडण्यापूर्वी जसे तेज:पुंज दिसत होते अगदी तसेच  माताजींचे दोन्ही हात धरून म्हणाले, मी काय मेलो आहे का? सौभाग्य चिन्ह का काढता? तुम्ही सौभाग्यवतीच आहात  आम्ही सदैव तुमच्या पाशीच आहोत आणि अदृश्य झाले  हातातील कंगन तसेच राहू दिले  असं असलं तरी त्या जगाच्या दृष्टीने विधवाच होत्या  अंगावर दागिने ठेवणे, रुंद काठाच्या साड्या नेसणं रुढीविरुद्ध होतं  टीकेला तोंड द्यावे लागले असते, म्हणून त्यांनी पांढऱ्या साडीची मोठी किनार कापून छोटीशी किनारीच अस्तित्व ठेवून साडी वापरणे सुरू केले

          क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!  सारदामाता  !!!

                भाग – २०

              दुपारी स्नान करून माताजी रामकृष्णांच्या खोलीत आल्या  पदराने अश्रू पुसून तिथेच आसनस्थ  झाल्या  बलराम माताजीसाठी आणलेली पांढरी साडी गोलपकडे देत म्हणाला,  ही माताजींना द्या  ती म्हणाली, काठ नसलेली साडी त्यांना कोण देणार? मग म्हणाली, थांबा! मी माताजींना पाहून येते  गोलप खोलीत आली  माताजी ध्यानस्थ होत्या  माताजींचा कुंकुविरहित चेहरा अतिशय भकास दिसत होता  त्या पांढरीच साडी नेसल्या होत्या, पण अगदी १-२ रेषा असतील एवढी बारीक लाल किनार होती  गोलप तशीच मागे परतली  बलरामला म्हणाली, “माताजी अशी साडी नेसणार नाहीत  परत करा  का? कारण ठाकुरांचे अस्तित्व अद्याप आहे  ते माताजीतच समाविष्ट आहेत “

           “म्हणजे, आम्हाला ठाकूरांचे दर्शन माताजीतच होईल तर?” 

“होय!”

         तीन दिवसानंतर भक्तगण विचार करू लागले   ठाकुरांसाठी हे घर घेतले होते  आता नव्वद रुपये भाडे भरणे आपल्याला कठीण जाईल  नरेंद्र म्हणाले, माताजींचे दुःख कमी होईपर्यंत काही दिवस त्यांना अस्थि कलशा सोबत राहू द्यावं  सर्वांना त्यांचं म्हणणं पटलं होतं  परंतु परिस्थितीला नाही  बरीच चर्चा झाल्यावर, मुदत संपताच, अस्थि कलश रामबाबूच्या कानकुरगाच्या बागेत ठेवून, माताजींना दुसरीकडे ठेवण्याचा प्रस्ताव आला  काहींनी विरोध केला    त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, अस्थिकलशचे दोन भाग करु  एक कलश रामबाबूच्या कानकुरगाच्या बागेत,  व दुसरा कलश माताजींबरोबर बलराम बाबूच्या घरी ठेवावा  प्रस्ताव सर्वांनाच आवडला  एकजण म्हणाला,  २३ ऑगस्टला ठाकूरांचा वाढदिवस आहे  त्यादिवशी दोन्ही कलश पाठवावेत

              प्रस्ताव माताजींना आवडला नाही  मनात म्हणाल्या, सोन्यासारखा माणूस गेला  आणि त्यांचे शिष्य अस्थि कलशासाठी भांडताहेत  हे या मुलांना शोभतं का? अशा सर्व परिस्थितीचा त्यांना उबग आला  जीवन संपवण्याचा विचार मनात आला  त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केलं  दुपारच्या डोळे मिटून बसल्या असता, रामकृष्ण समोर येऊन म्हणाले, ” इहलोक संपवण्याच्या विचाराचा त्याग करा  माझे अपूर्ण कार्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे  माझं शरीर दिसत नसले तरी मी तुमच्यातच आहे हे लक्षात ठेवून जीवन संपवू नका ” माताजींनी डोळे उघडले  आसपास कोणीच नव्हतं  भास म्हणावा तर, तीच मूर्ती, तोच आवाज होता  त्यांच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक होते  देहत्याग करण्याचा विचार त्यांनी सोडून दिला  त्यांची अवस्था नरेंद्रच्या लक्षात आली  त्यांनी बलराम बाबुला, त्यांना त्यांच्या घरी नेण्याची सूचना केली

           माताजी बलराम बाबूच्या घरी गेल्या  पती विरहाने त्या दुर्बल झालेल्या पाहून, शिष्य चिंताग्रस्त झाले  आपापसात ठरवून विवेकानंद म्हणाले, त्यांना मनःशांती साठी तीर्थयात्रेला पाठवावं  येणारा खर्च आपण सर्वांनी मिळून जमवू  त्यांच्यासोबत गोलप, अभेदानंदन, लाटू व काही स्त्रिया दिल्या

           यात्रेला सुरुवात झाली  निसर्ग सौंदर्य पाहून, त्यांच्यात पुष्कळ फरक पडला  मध्ये देवधरला उतरुन वैद्यनाथाचे दर्शन घेतले  काशीविश्वेश्वराच्या पवित्र स्थानी  बनारसला गेले  तिथे एक आठवडाभर थांबले  त्यांच्यात होत असलेले परिवर्तन पाहून, सगळ्यांनाच बरे वाटले  माताजी उत्साहाने वेणी माधवच्या मनोऱ्यावर चढल्या  मनातलं दुःख बाजूला सारून, त्या आनंद उपभोगू लागल्या

                 गोलप, योगिन सोबत माताजी मंदिरात पोहोचल्या तेव्हा आरती सुरू होती  तिथे भावविष्ट झाल्या  आरती संपल्यावर सर्वांबरोबर त्या तंद्रीतच निवास्थानी आल्या  त्या गोलपला म्हणाल्या, “ठाकूरांनी माझा हात धरून चालवत इथपर्यंत आणले  अदृश्य स्वरूपात ठाकूर माझ्याजवळच आहेत “

             बनारसचा मुक्काम संपवून मंडळी प्रयागला आली  तिथे गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमावर स्त्रियांनी स्नान करायचे ठरवले  प्रयागमध्ये रामकृष्णांच्या अस्थि, केस आणि नखं स्नानाच्या वेळी अर्पण करायचे माताजींनी ठरवले  शिष्यांनी नावेची व्यवस्था केली  पहाटे सर्वजणी गंगातीरी आल्या  दुरून आवाज येत होता   

    ” धरू जाता धरिता नये। टाकू जाता टाकीता नये।  

       जेथे तेथे आहेच आहे। परब्रम्ह तें

  जिकडे तिकडे जेथे तेथे। विन्मुख होता सन्मुख होते।

       सन्मुखपण चुकेनाते काही केल्या।

       बसले माणूस उठून गेले। तेथे आकाशचि राहिले।

      आकाश चहूकडे पाहिले। तरी सन्मुखची आहे।।”

             सूर्योदय होत असताना, त्या अंधुक प्रकाशात एक मनुष्य गात गात पुढे येताना दिसला  अंगात भगवी कफनी, गळ्यात रुद्राक्षांची माळ, हातात कमंडलू, तो स्वतःतच मग्न होता  माताजी समोर येऊन त्याने नमस्कार केला  स्वामीजी, आपण कुठून आलात? कोण आहात?

           महाराष्ट्राचे दैवत असलेल्या रामदास स्वामींचा शिष्य, अयोध्याला आलो होतो  रात्री स्वामींचा कालीमातेचे दर्शन घेण्याचा आदेश मिळाला  म्हणून आलो  माताजी, आपल्या रुपात जगन्मातेने मला दर्शन दिलं  धन्य धन्य झालो!

            क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

सारदामाता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading