श्रीमंत रमाबाई पेशवे चरित्र भाग ६, (२६ ते २७)

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी " मराठा दौलतीचे वस्त्रे" दादासाहेबांना आणि "............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! श्रीमंत रमाबाई पेशवे !!! 

भाग – २६.

              आज रमाबाईंनी इतके वर्षाचं जमा झालेलं मळभ मनातून काढून टाकायचे ठरवले. तडतड लाह्या फुटू लागल्या. आमची स्वारी मृत्यूशी झुंज देत असताना, तुम्ही नजर कैदीतून निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला. मामाजी रक्ताचं नातं इतकं पातळ कसं हो झालं? पुतण्याची एवढी गंभीर अवस्था असताना त्यांना भेटायला धावत येण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

            राज्य लोभानं तुम्ही धृतराष्ट्र सारखे अंध बनलात. स्वार्थाची पट्टी डोळ्यावर बांधली. रक्ताच्या नात्याला विसरलात. तुम्हाला राज्यच हवं ना घेऊन टाका. पण आता भांडण तंटा मनस्ताप सहन करण्याची ताकद आमच्या स्वारीत राहिली नाही. कृपा करून त्यांना आणखी मनस्ताप देऊन बोलायला लावू नका.

         रमाबाईचा तो संतापाचा उद्रेक रणमर्दीणीचा तो अनोखा अवतार पाहून दालन सर्द झाले. रघुनाथ रावांची तर वाचाच बंद झाली. श्रीमंत पेशवे आपल्या पत्नीचा अवतार बघून विस्मयचकित झाले. श्रीमंत पेशवे शांत आवाजात म्हणाले, तुम्हाला नजर कैदेतून मोकळ व्हायचं होतं तर, आम्हाला सांगायचं होतं. पळून जायची जरूर नव्हती. ठीक आहे. आज पासून तुम्ही मुक्त आहात. इथे राहिला तरी हरकत नाही. जोडीला तुम्हाला सल्ला द्यायला सखाराम बापू आहेतच. गजानना…

                रमाबाईंनी पुढे होऊन त्यांना आधार देऊन हळूच झोपवले. श्रीमंतांना ग्लानी आली. श्रीमंतांचे मन अगदी विटून गेले. निरुत्सहाने मन भरुन गेले. काय व्हायचे असेल ते गजाननाच्या साक्षीने होईल. ते मंदिराच्या आश्रयाला आले. तिथे आल्या आल्या श्रीमंतांना फणफणून ताप आला. अंगाची  लाही लाही होऊ लागली. पोटात असह्य कळ्या उठू लागल्या. आधीच जर्जर झालेल्या शरीरात त्या असह्य वेदना सहन करण्याची ताकद राहिली नाही. त्यांच्या आकांताला परावर नव्हता. त्यांचे भोवती उभे असलेल्या जिवाभावाचे लोकही हातबल झाले होते.  पाहण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते. श्रीमंचांची अवस्था पाहणे सुद्धा असह्य झाले होते.

           रमाबाई आपल्या स्वामींची करूण हालत पाहून व्याकुळ होत होत्या. त्यांनी अन्न वर्ज केले होते. त्या नुसत्या गोमूत्रावर राहत होत्या. काळजीने, उपवासाने त्यांचा देह कृष होऊ लागला. स्वामींची तडफड पहावल्या जात नव्हती.

               माधवराव पेशवे वेदनेने तळमळत होते. मोठमोठ्याने किंचाळत होते. गजाननला साकडे घालत होते. देवा गणराया किती अंत पाहशील? आता आता.. नाही सहन होत. सोडव रेऽऽ यातून. आईऽऽ आईऽ गं!

            इच्छारामपंत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते. घाम पुसत होते. श्रीमंत म्हणाले, इच्छाराम, कट्यार दे.. काऽऽऽय? आम्ही कट्यार मागितली ऐकू नाही आले का? नको.. नको.. श्रीमंत, भयभीत होऊन इच्छाराम पंत म्हणाले, आमची आज्ञा मोडतोस? पेशव्यांची आज्ञा मोडण्याचे साहस तुला कसे झाले? नको श्रीमंत, असलं काही करायला लावू नका. ढसाढसा रडत इच्छाराम पंत म्हणाले. देवबाऽ, आसूड आण. देवबा आसुड घेऊन आला. हे पंत खाल्ल्या मिठाला विसरले. आमची अवज्ञा करतात. उडव त्यांच्या पाठीवर आसूड. हाती आसूड घेऊन गोंधळून उभा राहिलेला पाहून, श्रीमंत पेशवे एकदम संतापले, तु ही आमची आज्ञा मोडतोस? देवबाने नाईलाजाने मनाचा हिय्या करून इच्छाराम पंतांच्या पाठीवर आसूड ओढू लागला. इच्छारामपंतांची पाठ रक्तबंबाळ झाली. मध्ये पडण्याची हिंमत कोणी करू धजावत नव्हते. कोणीतरी ही वार्ता रमाबाईच्या कानी घातली.

             त्या धावतच आल्या. अतिव दुःखाने त्या म्हणाल्या, स्वामी हे काय करत आहात? आपल्या इच्छारामाची पाठ फोडली? रमाबाईच्या आवाजाने श्रीमंत भानावर आलेत. रमा ते आम्हाला दुःख आवराला सांगत होते. आम्हाला खूप राग आला. रागाच्या भरात हे घडले. रमाबाईंनी जवळच्या सेवकाबरोबर इच्छारामपंताना राज वैद्याकडे नेण्यास सांगून मला पट्टी करायला सांगितली.

        श्रीमंत पेशवे म्हणाले, रमा, तुम्ही आमच्यापासून दूर जाऊ नका. आमच्या शरीरात दाह सुरू झाला की, आम्हाला भान राहत नाही. आणि मग असा गैरप्रकार घडतो. तुम्ही जवळ असल्या की केवढ्याही मोठ्या वेदनांना तोंड देण्याची हिंमत येते. आता फार दिवस यातना भोगावे लागतील असे वाटत नाही. बोलता बोलता श्रीमंत पेशव्यांना ग्लानी आली. रमाबाई त्यांच्या शेजारीच बसून राहिल्या.

          तिसऱ्या दिवशी श्रीमंताच्या अंगात खूप ज्वर चढला .शरीराचा दाह भयंकर वाढला. श्रीमंताच्या प्रकृतीत आराम पडावा म्हणून, पुण्याची रयत व्रतवैकल्य, मंदिरात अभिषेक, ठिकठिकाणी मृत्युंजय यज्ञ, देवाची करुणा भाकत होते. थेऊरच्या रयतेने घराघरात गणेश मूर्त्या पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या.

               दुपारी श्रीमंतांची प्रकृती आणखी जास्त बिघडली. शुद्ध बेशुद्ध ग्लानी येत होती. रमाबाई त्यांच्याजवळ बसून होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू निरंतर वाहत होते. रमाबाईंच्या अंतःर्मनाला पुढचे भविष्य कळून चुकले होते. दुःखद  अंःतकरणाने त्या आपल्या महाल येऊन देवबाला बोलावलं. कोसळल्या मनाने म्हणाल्या, देवबाकाका, आमचे एक अतिशय नाजूक या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही असे काम आहे. त्यासाठी तुला पुण्याला जावे लागेल.

                 देवबा म्हणाला, आक्कासाहेब, आपली कोणतीही आज्ञा बिन बोभाट पार पाडेन. आगीत उडी टाकायला सांगितली तरी क्षणाचाही विचार न  करता घेईन. बिनघोर सांगा. काका, रमाबाईंनी पैशाची पोटली त्याच्या हाती ठेवून म्हणाल्या, तू त्वरित पुण्याला जाऊन सतीची वस्त्रे घेऊन ये. अक्कासाहेबऽ विस्फरल्याल्या  नजरेने पाहत म्हणाला सतीची वस्त्रे? होय! देवबाकाका. कुठे वाच्यता न करता हे काम बिन बोभाट करायचे आहे….

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                 अंतिम भाग – २७.

              रमाबाईंनी सोपवलेले जोखमीचे काम करण्यासाठी देवबाने त्यांना मुजरा केला. खिन्न मनाने निघाला. संध्याकाळच्या वेळी पुणे पेठेतील प्रतिष्ठित व्यापारी रमेशलाल बनसोडेच्या दुकानी देवबाने प्रवेश केला.  शनिवार वाड्यातील कपड्यांची खरेदी त्यांच्या दुकानात होत असल्यामुळे तो देवबाला ओळखत होता. देवबा म्हणाला, माझ्याजवळ वेळ नाही. मला लवकर सतीची वस्त्र द्या. लगेच थेऊरला परत जायचे आहे. काय झाले? कोण सती जाणार आहे? झालं काहीच नाही. असे म्हणून देवबाने वस्त्र घेऊन घोड्यावर भरवेगाने दौडत थेऊरकडे निघाला.

              दुसऱ्या दिवशी वाऱ्यासारखी साऱ्या पुण्यात  बातमी पसरली. एक स्वार तातडीने येऊन सतीची वस्त्रे घेऊन गेला. बघता बघता पुण्यातल्या बाजारपेठा बंद झाल्या. साऱ्या पुण्याला एक प्रकारची अवकाळी आली होती. थेऊरच्या वाटेला लोकांची रीघ लागली होती.

            लोकांची एवढी एकदम गर्दी पाहून श्रीमंतांनी चौकशी केल्यावर, ती उठलेली बातमी कळली. श्रीमंत अतिशय संतप्त झाले. चौकशीअंती कळले की, देवबाने सतीची वस्त्रे आणली. त्याला ताबडतोब श्रीमंतांसमोर हजर करण्यात आले. विश्वासपात्र देवबाने वस्त्र आणले, श्रीमंतचा विश्वासच बसत नव्हता .गर्जत श्रीमंतांनी विचारले, सांग..सांग.. कुणी तुला वस्त्र आणायला सांगितले?

            देवबा मख्ख चेहऱ्याने तसाच उभा राहिलेला पाहून श्रीमंतांच्या रागाचा पारा चढला. बोलत का नाहीस? कोणाच्या पाठिंब्याने तुला एवढे बळ आले? तरी देखील तो तसाच उभा. नाना, आत्ताच्या आता  याचा आमच्या समोर शिरच्छेद करा. देवबाने खाली वाकून आपली मान पुढे केली. कोणीतरी धावत जाऊन बातमी रमाबाईच्या कानी घातली. त्या अतिशय वेगाने येऊन गरजल्या. थांबा…

          पेशव्यांनी पाहिले रमाबाई गडबडीने येत होत्या. मुजरे झाडत होते. त्या म्हणाल्या, स्वामी, त्या गरीब देवबाचा काही दोष नाही. त्याला सतीची वस्त्रे आणायला आम्ही पाठवले होते. दोषी आम्ही आहोत. शिक्षा आम्हाला करा.

       पेशव्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलले.  मंडळींनी सुटकेचा निःश्वास टाकला. श्रीमंत अंतिम घटका मोजत होते. थेऊरला चारही बाजूने थेऊरच्या वाड्या समोर तोबा गर्दी वाढली होती. श्रीमंत सावध होताच त्यांनी नारायणरावांना जवळ बोलावून म्हटले, नारायणा, तुम्ही आता लहान नाही. तुम्हाला राज्याची जबाबदारी पेलायची आहे. काका, बापू, नानाच्या सल्ल्याने वागा. तापट स्वभाव सोडून द्या. श्रीमंतांनी काकासाहेबांना जवळ बोलावले. नारायणरावांचा हात हाती देत म्हणाले, काकासाहेब, नारायणराव लहान, हट्टी, तापट आहे. पण तुम्ही काका म्हणून त्यांना सांभाळा. पेशवाई जरी त्यांच्या नावाने असली तरी, दौलतीचा कारभार तुम्हीच पहा. आता कशाचीच काळजी राहिली नाही. काका याला आपले म्हटले की आम्ही सुखाने या जगाचा निरोप घेऊ. नको माधवा.. नको असं बोलूस. आम्ही गजाननाची शपथ घेऊन तुम्हाला वचन देतो, नारायणरावांना आम्ही पुत्रवत सांभाळू. कधीही अंतर देणार नाही.

       नंतर श्रीमंत माधवराव साऱ्या सरदार मंडळीकडे पाहत म्हणाले, आजवर तुम्ही निष्ठेने पेशवाईची सेवा केली. अशीच पुढे चालू ठेवा. मराठा दौलतीची इभ्रत वाढवा. काही गैरसमज मनात ठेवू नका. सारी मंडळींच्या डोळ्याला पानझडी लागली होती. उशा लगत रमाबाई, पार्वतीबाई, गंगाबाई यांची हुंदके आवरता आवरल्या जात नव्हते. सर्वांकडे पाहत श्रीमंत पेशव्यांनी हात जोडून नमस्कार करीत म्हणाले, आम्ही आता महायात्रेला निघालो. शोक करू नका. जातो आम्ही…. गजानना… गजानना…

            उभ्या जागी हुंदके फुटत होते. नेत्र गळत होते. गाभार्‍यात गजाननावर अखंड अभिषेकाची संतत धार चालू होती. अनुष्ठानाला बसलेले ब्राह्मण विचलित मनाने मंत्रघोष करीत होते.

            त्याचवेळी आकांत उसळला. गजाननाच्या सभा मंडपाच्या ओवरीत श्रीमंत माधवराव पेशवांचा निष्र्पाण देह दर्भशय्येवर ठेवण्यात आला. अतिव दुःखाने लोक अंतिम दर्शन घेऊन परत जात होते. सगळ्यांच्यासाठीच दर्शनाची मुभा असल्यामुळे अथांग जन समुदाय अखेरचे दर्शन घेऊन पुढे सरकत होते.

           आयुष्यभर धगधगणारा अग्नि कुंड कायमचा शांत झाला होता. आपल्या कर्तुत्वाचा झेंडा रोवून इतिहासाला कायमची नोंद करायला भाग पाडले होते. कीर्ती ध्वज फडकवून आपला इतिहास अमर केला होता. एक किर्तीवंत महापुरुष महायात्रेला निघून गेला होता. त्याच महापुरुषाची सखी, जीवनसाथी, सहचरणी आयुष्यभर जळत असलेली महानपतीव्रता साध्वी रमाबाई आपल्या महायात्रेची तयारी करीत होत्या. नखशिखांत दागिन्यांनी सजून श्वेत वस्त्रातील एकेकाळी मोहरलेला देह उपासने कृश झालेल्या रमाबाई एक एक धीमे  पाऊल टाकीत येताना दिसल्या. मुखावर आगळ वेगळे तेज होते. आजच्यासारखा साजश्रृंगार या साध्वीने संपूर्ण आयुष्यात केला नव्हता. तोच ही साध्वी पतीच्या पायावर पाऊल ठेवून महायात्रेला निघाली होती. धीम्या गतीने चालत रमाबाई श्रीमंत पेशव्यांच्या उशा लगत येऊन बसल्या.

               सर्व उपस्थीतांची मने चरकली. महायात्रेला निघालेल्या साध्वीला रोखण्याचे सामर्थ कुणातच नव्हते. एवढे दादासाहेब, आनंदीबाई पाषाण हृदयी, पण या साध्वीकडे पाहून गलबलले. पुष्कळांनी रमाबाईला सती जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण रमाबाई आपल्या निश्चयावर ठाम होत्या. एकटक पेशव्यांच्या मुखाकडे पाहत असलेल्या रमाबाई म्हणाल्या, नारायणराव उठाऽ. आमच्या महायात्रेची तयारी करा….

         वहिनीसाहेबऽऽ, हुंदका देत म्हणाले, तुम्ही.. तुम्ही गेल्यावर या शनिवार वाड्यात आमच्यावर कोण माया करणार? कुणाला आपलं म्हणून कुणाजवळ हट्ट करू? आमचे सुखदुःख कुणाला सांगू ?कोण समजून घेईल आम्हाला?

             नारायणराव, कुणाचंच कुणा वाचून अडत नाही. तुम्ही तर मराठा दौलतीचे पेशवे आहात. तुम्हाला सर्वांना सांभाळायचे आहे. वहिनीसाहेबऽऽ वहिनीसाहेबऽऽ…

               रमाबाईने धारदार आवाजात आज्ञा केली. नारायणराव उठा. आणि आमची सहगमनाची तयारी करा. यंत्रवत नारायणराव उठले. अवाज्ञा करण्याचे धाडस त्यांचे अंगी नव्हते. त्यांनी नाना फडणीसांना महायात्रेची तयार करण्याची आज्ञा दिली. नाना फडणीसांनी सतीची व्यवस्था पाहण्यासाठी जातीने उभे राहिले. आणलेली वाणे रमाबाईंनी वाटली. माधवराव पेशव्यांबरोबर रमाबाईंची अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी लोटली. नमस्काराला येत असलेल्या प्रत्येकाला रमाबाई अंगावरील काही ना काही दागिना काढून देत होत्या. गंगाबाईला आपली सासू गोपिका बाईची आठवण म्हणून नथ काढून दिली.

         पार्वतीबाई पदस्पर्श करीत म्हणाल्या, रमा तुम्ही सहगामनाचा निर्णय घेतला तो फारच सुंदर घेतला. पुरुषांनंतर स्त्रीची किंमत कवडी मोलाची होते. साध्वी रमाबाई म्हणून तुमची कीर्ती दुमदुमत राहील. पार्वती काकींच्या मुखातील शब्द ऐकून रमाबाईंना फार समाधान वाटले. श्रीमंत पेशव्यांच्या पालखी मागून रमाबाई अनवाणी पायाने जात होत्या. जो येईल त्याला ओंजळीने नाणे वाटत होत्या. बाया बापड्यांना अंगावरील दागिने उतरवून देत होत्या. घाटावर येईपर्यंत फक्त त्यांच्या कानात कुड्या राहिल्या होत्या.

                घाटावर चंदनाची चित्ता असून श्रीमंत माधवरावांचा निष्प्रान देह चित्तेवर ठेवण्यात आला. रमाबाईंनी अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. बाजूला असलेल्या सतीच्या खांबाला सात फेऱ्या मारून पूजा केली. सतीच्या खांबाला मनोभावे हात जोडून पुढील सात जन्म हाच पती मिळवे म्हणून प्रार्थना केली. त्या चितेपाशी आल्या. तसे नारायणराव आवेगाने पुढे येऊन त्यांचे पाय शिवले. फाटलेल्या आवाजात नारायणराव हुंदके देत म्हणाले, वहिनीसाहेबऽऽ, ज्या हातांनी मायेने आम्हाला जवळ घेतले, खाऊ पिऊ घातले, त्या त्या आमच्या वहिनींच्या चित्तेला अग्नी कसा लावू? अखेरचा आम्हाला मिठीत घ्या ना…. कळवळून नारायणराव म्हणाले.

            आवेगाने रमाबाईंनी त्यांना आपल्या मिठीत घेतले .अश्रूंचा अभिषेक त्यांच्या पाठीवर केला. तेवढ्याच आत्मबलाने सगळी शक्ती एकवटून नारायण रावांना आपल्या मिठीतून दूर केले. समोर अथांग असलेल्या जनसमुदायाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मग चितेवर बसून श्रीमंतांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. मुखातून स्वामीऽऽ स्वामींऽऽचा जयघोष सुरू होता.

          श्रीमंत नारायणराव पेशव्यांनी चित्तेला अग्नी दिला. अग्नीच्या ज्वाला आकाशाला भिडत होत्या. रमाबाईची आकृती धुसर होत गेली. व्यथित अंतःकरणाने सर्वजण थेऊर गावाकडे परतत होते.

        अशा या महान साध्वी, त्यागी रमाबाईंना कोटी कोटी प्रणाम!!

               !!!  समाप्त  !!!!
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २५-७-२०२३.

रमाबाई पेशवे चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading