श्रीमंत रमाबाई पेशवे चरित्र भाग २, (६ ते १०)

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी " मराठा दौलतीचे वस्त्रे" दादासाहेबांना आणि "............चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी " मराठा दौलतीचे वस्त्रे" दादासाहेबांना आणि "............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! श्रीमंत रमाबाई पेशवे !!! 

भाग – ६.

              श्रीमंत माधवराव पेशव्यांची  “श्री” वर आगाध श्रद्धा होती. त्यांचा सकाळचा बराच वेळ गणेश स्तोत्र वाचणे व पूजा धारणेत जात असे. आज सकाळीच राम शास्त्री प्रभूणे आलेत. कारण गेल्या दोन-तीन दिवसात त्यांची व श्रीमंतांची भेट होऊ शकली नव्हती. शास्त्री खास सदरात आल्यावर तिथे आधीच घोरपडे, गोपाळराव पटवर्धन बसले होते. शास्त्रींना बघून पटवर्धन म्हणाले, गेल्या दोन दिवसापासून श्रीमंतांच्या भेटीची प्रतीक्षा करतो, पण भेटच होत नाही.

            आतून मंत्रघोषाचा आवाज येत होता. शास्त्रीजी एकदम उठून चालायला लागलेले पाहून नाना फडणीसांनी विचारले, निघालात शास्त्रीबुवा? दोन दिवसापासून येत आहो आणि भेट न होता परत जातो आहोत. आम्ही काही श्रीमंतासारखे देव देव करायला मोकळे नाही. जेव्हा श्रीमंत आज्ञा करतील तेव्हा येऊ आम्ही. येऊन गेल्याचे त्यांच्या कानावर घाला. काही अंतर गेले  नाही, तोच देवबा धावत येऊन सरकारस्वामी दिवाणखान्यात आले असून आपल्याला बोलावल्याचा निरोप दिला.

          श्रीमंत आपल्या महाली मंचकावर बसले होते. शास्त्री बुवांच्या अभिवादनाचा स्वीकार करून, त्यांना बसायला सांगितल्यावर शास्त्रीजी म्हणाले, नको… आम्ही उभेच ठीक आहोत. आग्रह करून त्यांना बसायला लावले. श्रीमंत म्हणाले, नाना सांगत होते आपण दोन दिवस येऊन परत गेलात. होय! खरं आहे.माधवराव म्हणाले, सकाळी स्नान संध्या, जप, धार्मिक विधी आटोपल्याशिवाय मनाला समाधानच वाटत नाही.

          सांगा, शास्त्रीबुवा, एवढं कोणत तातडीचं काम होतं? काम?  बोला शास्त्रीजी…हरिद्वारला जाऊन उर्वरित आयुष्य गंगेकाठी परमेश्वर चिंतनात घालण्याचा विचार केला. तेव्हा आपल्या सेवेतून मुक्तता व्हावी, ही विनंती करायला आलो होतो. ऐकल्याबरोबर पेशवे आणि नाना फडणीस आश्वर्यचकित झाले. व धक्काही बसला. पण शास्रीजी असा अचानक निवृत्तीचा विचार कसा केला? शास्त्रीजी, तुमच्यासारखी खंबीर अनुभवी आधार  सोडून गेला तर आमचं काय? ही शिवरायांनी उभी केलेली दौलत ताठ मानेने उभे राहील का?

          श्रीमंत आधीच क्षमा मागून स्पष्ट बोलतो. चूक वाटलं तर क्षमा करावी. श्रीमंत आपण ब्रह्माकुलोत्पन्न.  ब्राह्मणांच्या कर्मकांडा पेक्षा ब्राह्मण्याला अधिक महत्त्व असते. आपण क्षत्रिय धर्म अंगीकारला आहे. एका सामर्थ्यशाली दौलतीचे पंतप्रधान आहात. स्वराज्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे. आपण लोकपाल राजा आहात.  आपले प्रथम कर्तव्य आहे, प्रजापालन. नंतर ब्राह्मधर्म. आपण प्रजा पालनाचा धर्म पार पाडण्याऐवजी कर्मकांडात अधिक वेळ घालवता.

      जेव्हा अधिकाऱ्यांना, सरदार, मानसबदारांना अडचण येते, तेव्हाच ते तुमच्याकडे धाव घेतात.आणि

आपण पूजापाठ, होम हवन, अनुष्ठानात मग्न असता. आपली भेट होत नसल्यामुळे महत्त्वाचे काम अडून राहतात. अशावेळी आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी कोणाकडे धाव घ्यावी?  कोणाशी सल्लामसलत करावी?  सर्द होऊन श्रीमंत म्हणाले, आम्हाला वाटलं, तुम्ही आमचं कौतुक कराल. जरूर करू. त्यासाठी आपण भगवी वस्त्र परिधान करून हिमालयात जावं. सोडा ही मसनद. आपण दोघे हिमालयात जाऊन वेदाध्ययन, होम हवन, जप तक करीत बसू. तिथे अनेक योगी मिळतील. पण आदर्श लोकपाल पेशवा मिळणार नाही या स्वराज्याला. श्रीमंत सुन्न होऊ ऐकत होते. राम शास्त्री म्हणाले, श्रीमंत! सरदार, अधिकारी कित्येक घटका बसतात. कारभारी, सेवक यांची नित्याची काम सोडून तुळशीपत्र, बिल्वपत्र गोळा करत असतात. खासे सदरेत गोपाळ दादाराव पटवर्धन, घोरपडे तीन दिवसापासून आपल्या भेटीसाठी तिष्ठत बसलेत. त्यांचे आपल्या कामाकडे दुर्लक्ष होत नाही का? ज्या शनिवार वाड्यातून शौर्याच्या गाथा गायल्या जात होत्या, आता तिथून होम हवनाचे धूर निघत आहे. मंगल घोष होत आहे. भोजनाच्या पंगती उठत आहेत. अशावेळी आमच्यासारख्या सेवकाने निर्णय कोणाच्या बळावर घ्यावेत? शास्त्रींचे बोलणे ऐकून, नाना फडणीस अत्यंत भयभित झाले.  त्यांना दरदरुन घाम फुटला. सिंहाच्या आळीलाच हात घालण्यासारखे होते. त्यातच श्रीमंतांचा शिघ्रकोपी स्वभाव. नानांनी शास्त्रीबुवांना अडवण्याचा प्रयत्न केलेला पाहून, श्रीमंत म्हणाले, नाना, बोलू द्या त्यांना. ते झोंबणारे बोलताहेत, पण सत्य आहे. आम्हाला असा अधिकारवाणीने आमची चूक लक्षात आणून द्यायलाच हवी होती. कटू असले तरी सत्य आहे. आम्हाला ऐकून घ्यायलाच पाहिजे.

           गहिवरल्या आवाजात शास्रीबुवा म्हणाले,  श्रीमंत, या मराठा दौलतीच्या चिंतेपायी बोललो. आपल्यावर असलेल्या श्रद्धेपायी बोललो. यात कोणताही वाईट हेतू नाही श्रीमंत.

           आपला एक एक शब्द आमच्या काळजाला भिडला. मांजरीच्या गळ्यात घंटा कोणीतरी बांधायलाच हवी. त्याबद्दल आपले धन्यवाद! आम्ही तुम्हाला वचन देतो, यापुढे अशी चूक होणार नाही. तुम्ही किंवा कोणताही अधिकारी केव्हाही आला तरी आमची भेट होईल. ताटकळत बसावे लागणार नाही. श्रीमंताच्या आज्ञेने शास्त्री बुवा निघून गेले.

           त्या दिवशीपासून श्रीमंत माधवराव पेशव्यांनी शनिवार वाड्यात होम हवन, अधिष्ठान करण्यास बंदी घातली. आणि श्रीमंताची भेट लगेच घडू लागली.

        श्रीमंतांच्या दिनक्रमामधे अचानक झालेला बदल बघून रमाबाईंना आश्चर्य वाटले. रमाबाई विनम्रपणे म्हणाल्या, स्वामी आज सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला? रोज दोन तीन तास चालणारी पूजा आज नुसतं तेव्हाच दर्शन घेऊन लगेच महालाबाहेर पडलात. मग त्यांनी काल घडलेला प्रसंग सांगितला. म्हणाले, राज्य सुरक्षित राहिलं तरच देव, मंदिर सुरक्षित राहतील. श्रीमंतांचा हा नित्यक्रम कायम राहिला.

        उदगीरच्या पराभवाने खुनशी निजामाने मराठ्यांचा मुलुख बेचिराख करीत, देव देवतांची नासधूस करीत पुण्याच्या रोखाने येत असल्याच्या बातम्या आल्याने तातडीने पेशव्यांनी खाजगी गुप्त बैठक बोलावली.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि. २३-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                भाग – ७.

              या महत्त्वाच्या बैठकीला दादासाहेब हजर नव्हते. ते त्याचवेळी त्यांच्या हवनाला बंदी केल्याची कागाळी गोपिका बाईकडे करीत होते. बैठक आटोपल्यावर  श्रीमंत गोपिका बाईच्या महाली गेले.  तिथे रघुनाथ रावांना पाहून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

        श्रीमंत माधवराव पेशव्यांनी आपल्या सरदारांना फौजा निजामाच्या मुलाखात घुसवण्याचा आदेश दिला. मराठी मुलखाची जाळपोळ, मंदिरे उध्वस्त करत निजाम पुण्याच्या रोखाने निघाला होता. माधवराव पेशवे आणि दादा साहेबांनी चारच दिवसात निजामाचा शेकडो  मैलांचा भूप्रदेश बेचिराख केला. हे पाहून निजामाने शरणागतीचा पाठवलेला प्रस्ताव पेशव्यांनी फेटून लावला. तरी त्याने प्रयत्न चालू ठेवले. काका पुतण्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.  पेशव्यांचा विरोध असताना देखील, रघुनाथरावांनी निजामाच्या शरणागतीचा प्रस्ताव तर स्वीकारलाच. पण, पेशवे नानासाहेबांच्या कारकीर्दीत १४ लाखाचा मिळवलेला भूप्रदेशही निजामाला परत केला. त्यामुळे श्रीमंत माधवराव पेशवे संतप्त झाले. काका पुतण्यात  बेबनाव झाला.

       श्रीमंत माधवराव एकटेच आपल्या सरदारांबरोबर कर्नाटकात हैदर वर चालून गेले. आणि दादासाहेब पुण्याला परत आले. गोपिकाबाईंना कळल्यावर त्यांनी दादासाहेबांची चांगलीच हजेरी घेतली. आणि नेहमीप्रमाणे त्यांना पश्चाताप होऊन गोपिकाबाईच्या महालातून बाहेर पडले.

         पण त्यांचा पश्चाताप फार काळ टिकला नाही. आपल्या महाली आले आणि त्रिकूटांनी त्यांचे कान भरणे सुरू केले. व त्यात ते यशस्वीही झाले.

          दीड महिना होऊन गेला तरी श्रीमंत माधवराव कर्नाटकीच्या मोहिमेवरून परतले नव्हते. जाणत्या झालेल्या रमाबाईंना आपल्या स्वामीशिवाय एक एक दिवस कठीण जात होता. त्यांच्या मनात नाही त्या त्या शंका येत होत्या. कशात तरी जीव मुठीत घेऊन शनिवार वाड्यात वावरत. पण लक्ष मात्र रोजच्या डाकेकडे असायचे.

              त्या रात्री रमाबाई भोजन करून गोपिका बाईंच्या महाली गेल्या. सासूबाईंना नमस्कार करून मंचकाच्या कडेला बसल्या. रमाबाईचा उतरलेला चेहरा बघून, गोपिकाबाई म्हणाल्या, अगं, आपला माणूस बाहेर गेला की इथल्या बायकांची स्थिती अशीच होते. जीव नुसता टांगणीला लागतो. यानंतरच्या मोहिमेत तुला माधवाबरोबर पाठवू. अशी दुःखी कष्ट राहू नकोस. या वाड्यातल्या कर्त्या स्त्रीने तरी राहू नये. आम्हाला कळले की, तू दोन-तीन दिवसापासून नीट जेवण करीत नाहीस. अशी चिंता केल्याने चिंता मिटत नाही. उलट अधिक वाढते. मनाला आवर घालायला हवा.

              आईसाहेब, थोरल्या बाई लक्ष्मीबाईंकडे पहावल्या जात नाही. गोपिताबाई म्हणाल्या, अगं, तिची हळदही फिटली नाही तोच तिचे जीवनात अंधकार पसरला. आणि याला सर्वस्वी आम्ही जबाबदार आहोत. आम्हीच अट्टाहासाने विश्वास रावांना भाऊसाहेबांबरोबर पाठवले. आणि लक्ष्मीच्या जीवनात असा रखरखित उन्हाळा आला. आईसाहेब, हे विधीलिखित होते. तुम्ही निमित्त मात्र झालात. त्यांचे आयुष्य तेवढेच असावे, म्हणून तुम्हाला नियतीने तशी बुद्धी दिली असावी. आणि थोरल्या बाईंच्या नशिबात हे भोग असावेत म्हणून त्यांना भोगावे लागत आहे.

     अगोऽबाई! एवढे शहाणपण कुठून शिकलात? परिस्थिती.. परिस्थितीने शिकवले आम्हाला हे सर्व. हे शहाणपण. हे सारं आनंदीबाई जवळ असतं तर, आज जे शनिवार वाड्यात वादळ उठलं ते उठलं नसतं. काका पुतण्यात बेबनाव झाला नसता. माधवावाची अशी कुचंबांना झाली नसती.

       आईसाहेब, आम्हाला एकच वाईट वाटतं, एवढ्या लहान वयात थोरल्या बाईंना जे जीवन जगाव लागत आहे. अळणी आणि तेही एकच वेळ, लाल आलवणात त्यांना पाहिलं की, आम्हाला अगदी भडभडून येते. केवढी ही स्त्री जातीची विटंबना? त्याला इलाज नाही. मन मारुन स्त्रीला विद्रूप यासाठी केला जाते की, परपुरुषाची नजर पडायला नको, म्हणून हा मार्ग अनुसरावा लागतो.

           त्यापेक्षा आपला प्रिय पुरुष गेल्यावर ज्या स्त्रिया सती जातात त्या खूपच भाग्यवान. एक तर त्यांची वाईट भोगातून सुटका होते. साध्वी म्हणून गणना होते. व हे रोजचे सतीच मरण टळते. बोलता बोलता बरीच रात्र झाली आणि गोपीकाबाईंना नमस्कार करून रमाबाई आपल्या महाली आल्या. मंचकावर अंग टाकले, पण झोप येईल ना. अवखळ मनाने कर्नाटकात धाव घेतली. सारे विचार पती भोवतीच फिरत होते. कधीतरी त्यांना झोप लागली.

        अर्धी अधीक रात्र झाली असेल त्यांना स्वप्न पडले. युद्धाचे सैनिक बेभान होऊन लढत होते. त्याचवेळी त्यांचे स्वामी माधवराव पेशाने लढताना दिसले. तलवारीने शत्रूचे सपासप मुंडके उडवीत होते. एवढ्यात शत्रूने तलवारीच्या घावाने स्वामींना जखमी केले. ते घोड्यावरून खाली आले. रक्ताच्या नुसता पूर वाहत होता. तो प्राण घातक वार रमाबाईंनी पाहिला. आणि स्वामीऽऽ म्हणून मोठ्याने किंचाळत उठून बसल्या. भीतीने त्यांचे सर्वांग थरथरत होते. दरदरून घाम फुटला होता. त्यांची किंकाळी ऐकून दारावर पाहणारा देणारी मंजिरी दासी धावतच आत आली. भीतीने थरथरणाऱ्या आपल्या मालकीणीला पाहत विचारले, अक्कासाहेबऽऽ, अक्कासाहेबऽ, काय झाले? एवढ्या मोठ्याने का ओरडलात? आमचे स्वामी… आमचे स्वामी भयंकर जखमी झालेत. रक्तांचा नुसता पूर वाहत होता. ते घोड्यावरून खाली आले. बाईसाहेबऽऽ, बाईसाहेब जाग्या व्हा. तुम्हाला स्वप्न पडलेले दिसते. चिंता करू नका. अशी स्वप्न पडतात तेव्हा नेमके उलटे घडलेले असते. आमचे श्रीमंत चांगले यश संपादन पुण्याला परत येतील. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. आता शांत झोपा. काही दिवसातच चांगली बातमी येईल बघा. त्यावेळी आम्ही तुझे तोंड साखरेने गोड करू. मंजीरीने त्यांना प्यायला पाणी दिले. त्यांची तगमग शांत झाली. त्या पुन्हा झोपी गेल्या.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २४-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                  भाग – ८.

                त्या स्वप्नापासून रमाबाई थोड्या दुःखी कष्टी दिसत होत्या. रमाबाईची ती अवस्था गोपिका बाईच्या नजरेतून सुटली नाही. तिसऱ्या दिवशी रमाबाई दर्शनाला गोपिकाबाईच्या महाली गेल्या. नमस्कार करुन समोर उभा राहिल्या. रमाबाईंना जवळ बसवून घेत म्हणाल्या, दोन दिवसापासून पाहत आहोत, तुम्ही कुठल्यातरी दुःखात दिसत आहात. दुःखाचे कारण आम्हाला समजेल का? अश्रू भरल्या नेत्रांनी परवा पडलेलं स्वप्न जसेच्या तसे गोपिका बाईंना सांगितलं. अगं, तुझ्यासारख्या पेशवीणने इतके हळवे असू नये. मनाला जरा खंबीर बनवावे. स्वप्न कधीच खरी नसतात. तुम्ही माधवरावावर आत्यंतिक प्रेम करता म्हणून तुम्हाला स्वप्न पडलं. त्याच्या नेहमी उलट घडत असते. सोडून द्या तो विषय. रमाबाईचे समाधान झाले.

              तेवढ्यात नारायणराव आत आले. त्यांनी दोघींनाही मुजरा केला. रावसाहेब काय म्हणतो तुमच्या अभ्यास? ठीक चालू आहे. आणखी त्यांच्या अभ्यासाची चौकशी केल्यावर म्हणाल्या, आईसाहेब, आपले रावसाहेब हुशार आहेत. आता त्यांची अकरा वर्षाची उमर झाली. लवकरच विवाह करावा लागेल. नको.. नको वहिनीसाहेब! आम्हाला भीती वाटते. आनंदी काकू सारखी मिळाली तर? असं मोठ्या माणसांविषयी बोलू नये. भिंतीला कान असतात. चुकलो वहिनीसाहेब. यापुढे नाही बोलणार. आपल्या भिंतीला तर मोठमोठे भगदाड पडली आहे. जो तो कान देऊन ऐकत असतो. तुम्हाला सारं कळत तर? आम्ही आता लहान नाही राहिलो. आणखी कोणाला घाबरता? नको तुम्ही नाव सांगाल. नाही सांगणार. थोरल्याला रावसाहेबांची भीती वाटते. त्यांचे डोळे नुसते आग ओकत असतात. त्यांच्या समोर जाण्याची आमची हिम्मत होत नाही. वहिनीसाहेब, तुम्हाला नाही वाटत त्यांची भीती? आम्हाला माहित आहे तुम्ही सुद्धा त्यांना घाबरता. खर आहे भाऊजी. तुमचे रावसाहेब मराठा दौलतीचे पेशवे आहेत. त्यांना घाबरायलाच पाहिजे ना?

         गोपिकाबाई शांतपणे दिर-भावजयीचा संवाद ऐकत होत्या. दोघातील खेळकरपणा पाहून सुखावत होत्या. थोड्याच वेळात नारायणराव मुजरा करून निघून गेले. आणि रमाबाई ही नमस्कार करून आपल्या दालनी आल्या.

          आणखी दोन दिवसांनी श्रीमंत माधवराव पेशवे कर्नाटक मोहिमे वरून परतले, ते अंगात ज्वर घेऊनच. पाण्यात बदल, खाणे पिण्याची आबाळ याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. पण हैदरअलीला चांगला मार दिला. एक कर्तबगार पेशवा म्हणून आपली चुनुक दाखवली होती. भरपूर खंडणी वसूल करून ते पुण्यात परतले होते. पेशव्यांनी आपला चांगला दबदबा निर्माण केला होता. पण या काळात मधून मधून त्यांची तब्येत बिघडतच होती. औषध पाणी नाही. मोहिमेत गुंतल्यामुळे ज्वर  अंगावर काढला. अंगात सतत ज्वर असायचा. खोकल्याची उभबळ आली की, त्यांना असह्य व्हायचं.

          सकाळची पूजा पाठ करून रमाबाई श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या महाली आल्या. माधवराव नुकतेच उठलो होते. कधी न रागवणाऱ्या रमाबाईचा  रागीट चेहरा पाहून, त्यांच्या लक्षात आले. काय झाले प्रियदर्शनीऽऽ? आम्ही आपल्या असल्या गोड बोलण्याने फसणार नाही. आपल्या अंगात एवढा ज्वर असून आम्हाला कां सांगितले नाही. आम्ही काय एवढे परके झालो? तसं नाही रमा… तुम्हाला काळजी नको म्हणून नाही सांगितले. त्याचवेळी त्यांना खोकल्याची उबळ आली. ते मोठमोठ्याने खोकू लागले. खोकताना त्यांच्या जीवाचे तगमग होऊ लागली. डोळे एकदम लाल झाले. घाबरून रमाबाई त्यांच्या पाठीवर हात फिरवू लागल्या. पाठीला हात लागल्याबरोबर त्यांच्या हाताला चटका लागला.

         चपापून रमाबाई म्हणाल्या, तुमच्या अंगात चांगलाच ज्वर भरला आहे. खोकलाही चांगलाच वाढला. तुमची एवढी तब्येत बिघडली आणि आम्हाला कळवलं पण नाही.

           अहोऽ, कर्नाटकाच्या मोहिमेवर असतांना मधून मधून तब्येत बिघडत होती. मधून ताप, खोकला येत होता. वाटले पाण्यात बदल झाला म्हणून असेल. धावपळ खूप असल्यामुळे उपचार करायलाही वेळ मिळाला नाही. दोन दिवस गेले की बर वाटायचं. पुन्हा ताप, खोकला यायचा. विचार केला पुण्यात गेल्यावर करू उपचार. पण सर्वात महत्त्वाची व आनंदाची गोष्ट म्हणजे आमची मोहीम फत्ते झाली. भरपूर खंडणी मिळाली. जरब अशी निर्माण झाली की, पुन्हा तो मराठ्यांची कळ काढणार नाही.

                तेवढ्यात माधवराव यांची तब्येत ठीक नसल्याचे समजल्यावर गोपिकाबाई त्यांना बघायला आल्या .लगेच रमाबाईने डोकी वरचा पदर सावरून अदबशीरपणे बाजूला उभ्या राहिल्या. माधवराव उठू लागलेले पाहताच त्यांना थांबवले व देवबाला आवाज देऊन राज वैद्यनाथ त्वरित औषधचा बटवा घेऊन बोलावायला सांगितले .

       राज वैद्यांनी आत येताच मुजरा केला. त्यांनी श्रीमंताची नाडी, नेत्र तपासले. काही मात्रा, काही काढा दिला. चिंताक्रांत होऊन गोपिकाबाईंनी विचारले, रावसाहेबांचा कसला आजार झाला? मोहिमेची खूप दगदग झालेली दिसते. वेळेत उपचार न झाल्यामुळे एवढा त्रास वाढला. मी दिलेले औषध नियमितपणे दिली की दोन-तीन दिवसात श्रीमंतांना आराम वाटू लागेल. मनस्ताप होईल अशा गोष्टी वाड्यात घडता कामा नये. त्यांना पूर्ण शांतता व आरामाची गरज आहे. अंगात ताप असल्यामुळे दोन-तीन दिवस त्यांनी आंघोळ करू नये. पथ्य आणि औषधी बरोबर वेळेवर मिळाली की श्रीमंतांना लवकर आराम पडेल. दोघांनाही मुजरा करून राजवैद्य निघून गेले. आणि त्याचवेळी दादासाहेबांनी प्रवेश केला. श्रीमंतांनी उठण्याचा प्रयत्न केला, पण दादासाहेबांनी पडून राहण्यास सांगितले. तुमची तब्येत ठीक नसल्याची कळताच धावत तुम्हाला पाहायला आलो.

             क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २४-४-२०२३

!!!  रमाबाई  !!!

                 भाग – ९.

               रमाबाईने श्रीमंतांना चाटण चाखले. औषधाच्या मात्र दिल्या. त्यांना झोपेची गुंगी येत असलेली पाहून गोपिकाबाई, रघुनाथराव हळूच बाहेर पडले. रमाबाई मात्र तिथेच बसून राहिल्या.

         रमाबाई जातीने श्रीमंतांची काळजी घेत होत्या. वेळेवर पथ्य पाणी औषध देत असल्यामुळे श्रीमंतांच्या प्रकृतीत फरक पडला. आता ते दालनात हिंडू फिरू लागले. अजूनही त्यांच्या अंगातला थकवा गेला नव्हता. दादासाहेब रोज सकाळी येऊन चौकशी करून जात होते. त्यांचं निर्मळ प्रेम पाहून, माधवराव सुखावत होते .आनंदीबाई भेटीला आल्या. तब्येतीची चौकशी केली. कर्नाटक मोहीम गाजवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. नंतर त्या आपल्या मूळ स्वभावावर आल्याच. उनदुनं काढून त्यांच्या मनाचा क्षोम वाढवला. माधवराव एवढे संतप्त झाले की त्यांचे सर्वांग कापायला लागले. पण त्यांनी स्वतःला सावरले. शांत केले आणि म्हणाले, काकी साहेब, तुम्ही आमच्या आजाराची चौकशी करायला आलात की…? माधवराव, तुमच्या काका साहेबांनी या दौलतीसाठी फार कष्ट घेतले आहे. आणि आता त्यांना बाहेर  फेकण्याची भीती वाटते. काकी, काकासाहेब आम्हाला श्रीमंत नाना साहेबांच्या ठायी आहेत. वडिलधारे म्हणून योग्य तो मान देतो. आमच्याबद्दल तुम्ही मुळीच भीती बाळगू नका. मनातील भीती काढून टाका. ठीक आहे. येतो आम्ही. आणि त्या दालना बाहेर पडल्या.

           श्रीमंत माधवराव पेशव्यांचे मानसिक संतुलन एकदम बिघडून गेले. ते डोळे मिटून शांतपणे पडून राहिले. त्यानंतर पार्वती बाई आल्या. आस्थेने पेशव्यांची चौकशी करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. चांगली काळजी घ्यायला सांगून निघून गेल्या. पार्वतीबाईंचे निर्वांज्य प्रेम पाहून पेशवे भारवून गेले.  पुण्यातील प्रतिष्ठित लोक, सावकार, व्यापारी, सारे खासे सरदार जातीने येऊन चौकशी करून गेले होते.

          आठ दहा दिवसांनी श्रीमंतांची तब्येत सुधारली. त्यांनी लगेच गणेश महालात दरबार भरण्याची व्यवस्था केली. राज्याची बरेचसे कामे खोळंबली होती. दरबार खचाखच भरला. सर्वांच्या नजरा श्रीमंत पेशव्यांवर स्थिरावल्या. श्रीमंत पेशवे गंभीरपणे बोलू लागले… कर्नाटक मोहिमेची माहिती सांगत म्हणाले, आम्ही निजाम अलीच्या मुलखात घुसून त्याचा प्रदेश बेचिराख करीत होतो. मराठी फौजीच्या पहिल्या धडक्यातच निजाम हतबल झाला. ते पाहून आमच्या सैन्यात वीरश्री संचारली. पानिपतच्या पराभवाचे उट्टे काढण्यास उत्सुक झाले. आम्ही हैदर अलीवर चालून गेलो. त्याला मांडलिक बनवले. त्याच्याकडून भरपूर खंडणी वसूल केली. आमच्या पाठीशी खाशे सरदार, वीर शूर शिपाई उभे राहिले तर, या दौलतीला बिकट परिस्थितीतून बाहेर काढू. आम्हाला फक्त तुम्हा सर्वांची साथ हवी.

             नंतर कारभारी सखाराम बापूंना दरबाराच्या कारभाराला सुरुवात करण्याची आज्ञा दिली. मग वेगवेगळ्या विभागातील मागण्या मंजूर करण्यात आल्या. आती महत्त्वाचा विषयावर श्रीमंतांनी लगेच मंजुरी दिली. नंतर दप्तरी आलेल्या पिडित लोकांच्या तक्रारीचा निवाडा करण्यात आला. आता शेवटचा एक अर्ज राहिला होता. तो अर्ज होता कारभारी सखाराम बापूच्या विरोधात. कारकूनाने त्या तक्रार अर्जाची भेंडोळी बापूंच्या हाती  दिली तेव्हा त्यांनी न वाचताच घाईने तसेच दरबारात आले होते. तो निनावी अर्ज आपल्या संबंधी असेलला पाहून, बापू एकदम भयभीत झाले. देहाला कंप सुटला. अंग घामाने डबडबले. श्रीमंत म्हणाले, आता शेवटचा अर्ज वाचा कारभारी. बापूंनी टाळण्याचा बराच प्रयत्न केला, पण श्रीमंतानी ऐकले नाही. ते म्हणाले, तुमच्याने वाचल्या जात नसेल तर आमच्याकडे द्या. नको श्रीमंत. गयावया करत सखाराम बापू म्हणाले, तक्रार अर्ज माझ्या विषयीच आहे. काय? दौलतीच्या कारभारांविरुद्ध तक्रार? मग तर आम्हाला समजायलाच हवे.

          हे श्रींच राज्य आहे. श्रीच्या दरबारात प्रत्येकाला सारखा न्याय मिळावा हे पथ्य आजपर्यंत आम्ही पाळत आलो. या न्याय मंदिरात तुम्हीच काय खुद्द आम्ही पेशवे अपराधी असलो तरी त्यांनाही न्यायदेवतेसमोर उभे राहावे लागेल. न्यायदानाबद्दल  समानता राखली नाही तर, श्रींच्या मसनदीवर बसण्याचा आम्हाला अधिकार नाही. द्या तो अर्ज आमच्याकडे.

              श्रीमंतांनी तो तक्रार अर्ज मोठ्याने वाचला. सोमवार पेठेत राहणाऱ्या वृद्ध दीक्षित दांमत्याची हवेली सखाराम बापूंनी आपल्या नावावर केली होती. त्या वृद्ध दांपत्याला न्याय मिळण्याची मागणी त्या अर्जात होती. बापू, हा काय प्रकार आहे? श्रीमंत हा माझ्या विरुद्ध कोणीतरी कट केला आहे. ते काही असले तरी या अर्जाची शहानिशा झालीच पाहिजे. नाहीतर रयतेला या श्रींच्या मसालादीवर विश्वास राहणार नाही. अर्ज न्यायाधीश रामशास्त्री प्रभूंणेकडे सुपूर्द करण्यात आला. दरबार संपण्याची घोषणा करून श्रीमंत पेशवे बाहेर पडले.

         खाल मानेने सखाराम बापू ही बाहेर पडले. ते सरळ दादा साहेबांच्या बदामी महालात पोहोचले. रागाने म्हणाले, दादासाहेब, आज माझ्या गळ्याला फास लागला. उद्या तुमच्या गळ्याला लागू शकतो. बापू, तुम्ही पेशव्यांचे कारभारी. तुम्ही रयतेच्या स्थावर मालमत्तेवर नजर ठेवायला नको होती. हा तुमचा अक्षम्य अपराध आहे. दादासाहेब हा फास फक्त माझ्याच गळ्याला  लागला नाही तर, उद्या आपण देखील कोणत्याही बाबतीत अडकू शकता. बापूऽऽ रघुनाथराव गरजले. पण परवा न करता, बापू म्हणाले, आज माझ्यावरती पाळी आली ती आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याला मी वेळोवेळी सावध करत आलो. तेवढ्यात तिथे आनंदीबाई आल्या….

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २४-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                भाग – १०.

                सर्व प्रकरण ऐकून आनंदीबाई म्हणाल्या, उद्या मल्हार बाबा येणार आहेत. त्यांच्यासमोर तरी बोटचेपेपणा करू नका. आम्ही तर असे सुचवतो की, तुम्ही सरळ सरळ निम्या दौलतीची मागणी करा. तुम्ही अशी मागणी केली की माधवरावावर वचक बसेल. आणि वरमून वागेल.

            दुसऱ्या दिवशी सकाळी मल्हारराव होळकर वाड्यावर आले. ते थोरल्या बाजीराव पेशव्यांपासून कार्यरत होते. आपल्या अतुल पराक्रमाने त्यांनी आपला चांगला नावलौकिक, दबदबा निर्माण केला होता. आता ते वृद्ध झाले असले तरी, त्यांचा दबदबा कायम होता. श्रीमंत माधवराव पेशवे झाल्यावर, काका पुतण्यातील कलह त्यांच्या कानी गेला होताच. आता सुद्धा दादा साहेबांचा दोन वेळा निरोप आल्याने ते शनिवार वाड्यात आले होते.

            आधी मल्हारराव श्रीमंत माधवराव पेशव्यांना भेटायला आले. तेव्हा होळकरांनी मुजरा करताच, श्रीमंत पेशव्यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. हात धरून आदराने आसनावर बसवत श्रीमंत म्हणाले, बाबाजी आपल्यासारख्या दौलतीच्या ज्येष्ठ अनुभवी सरदाराने आमच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही आधारासाठी कुणाकडे पाहावे? नाही श्रीमंत! स्वतःला एकटे समजू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपल्या तब्येती बद्दल कळले. श्रीमंत, तब्येतीची हेंडसाळ करू नका.

               दादा साहेबांचं काय  बिनसलं? आपली पायमल्ली होते असं त्यांना वाटत असेल. पण बाबाजी, आम्ही त्यांना नानासाहेबांच्या ठिकाणी मानतो. वडीलकीचा मान देतो. सल्ला मसलत करतो. कधी त्यांची अवज्ञा करत नाही. तरी काकासाहेब असे का वागतात कळत नाही. निजामाच्या लढाईपासून तर ते जास्तच करायला लागले. म्हणूनच त्यांचा दोन वेळा निरोप आला. आता तुम्ही आलात तर, बाबाजी, काहीतरी सोक्षमोक्ष लावा. नंतर सखाराम बापू विरुद्ध आलेल्या तक्रार अर्जा बद्दल सांगून म्हणाले, आता त्यांना कारभारी पदावर ठेवता येणार नाही.

        मल्हारराव म्हणाले, दादा साहेबांना इथे बोलावून घ्या.  समोरासमोर बसून बोललात तर दोघांचीही विचार आम्हाला जाणून घेता येईल. श्रीमंतांनी देवबाला दादासाहेबांना बोलावून आणायला सांगितले. तो लगेच परत येऊन म्हणाला, दादासाहेबांनी बाबाजींनाच त्यांच्या महाली बोलावले आहे. श्रीमंत म्हणाले, बाबाजी हे असं आहे. ठीक आहे श्रीमंत. आम्ही त्यांची महाली जाऊन येतो. मल्हाररावच्या बदामी महालात ते पेशव्यांच्या महाली अशा ५-६  येरझार्‍या झाल्यावर दोघांमध्ये त्यांनी समझोता घडवून आणला. या आनंदा प्रित्यर्थ तिघांनीही एका पंक्तीत जेवण केलं. नंतर मल्हारराव आपल्या तळावर निघून गेले.

               दुसऱ्या दिवशी दुपारी रमाबाई श्रीमंताच्या महाली आल्या. तेव्हा ते काहीतरी लिहीत होते. रमाबाई येताच त्यांनी कलमदान बाजूला ठेवून प्रसन्न मुद्रेने त्यांचे स्वागत करताना पाहून, सलज्ज रमाबाई म्हणाल्या, आज एवढं काय झालं? अहोऽ, या कामाच्या व्यापात तुमची साधी भेट सुद्धा दुर्लभ झाली. रमाबाई म्हणाल्या, हो ना त्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेण्यात समाधान मानतो. आपल्या प्रिय पुरुषाचे दर्शन होणे हे ही काही कमी नाही. आमचा राग तर येत नाही ना? हे काय विचारता स्वामी?

           रमा, हे वय आयुष्याचा आनंद लुटण्याचा, स्वप्न रंग उधळण्याचे दिवस. पण आम्ही हा राजधर्म पाळतांना तुमच्यावर अन्याय होतो याची आम्हाला खंत वाटते. तुमच्याही काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असतील. त्या आम्हाला पूर्ण करता येत नाही याचे वाईट वाटते.

         रमाबाई म्हणाल्या, स्वामी, हीच का आमची किंमत केली? नाही.. नाही प्रियदर्शनी! तुम्ही या वाड्यात आला तेव्हा आम्ही लहान होतो. तरी तुमचा मोठेपणा आम्हाला कळला होता. आणि आम्ही तो वेळोवेळी अनुभवला आहे. स्वामी, आमची काही स्वप्न नाहीत. आमचे एकच स्वप्न आहे. कोणते प्रियदर्शनी? त्या म्हणाल्या, आम्ही श्रींची पूजा करताना एकाच प्रार्थना करतो, हे गजानना! आमच्या स्वामींवर फार लहान वयात या दौलतीची जबाबदारी येऊन पडली. राज्याची परिस्थिती बिकट आहे. वडीलधारा कुणाचा आधार नाही. भाऊबंदीला जोर आला. रक्ताची माणसं शत्रूसारखी वागत आहे. या सर्वामुळे आमच्या स्वामींची मनःस्थिती पार बिघडून गेली. त्यांचे मनोबल वाढव. त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर काढ. आमच्या स्वामींना कीर्तीवंत बनव. हे आमचं स्वप्न  परिपूर्ण होऊ दे. यापेक्षा घरंदाज स्त्रीचे दुसरे कोणते स्वप्न असणार आहे? पती सुखातच तिचे सुख दडलेले आहे. उगीच नाही स्त्रीला अर्धांगिनी म्हणत? छान! बहुतेक श्रींनी तुमची प्रार्थना स्वीकारलेली दिसते. आमच्या काका पुतण्याचा वाद मिटला. आम्ही काका, राम शास्त्री, त्रिंबकराव मामा पर्वतीवर जाणार आहोत. आज रात्री मेजवानी ठेवली आहे. तुमचे मुदतपाक खान्यात लक्ष असू द्या. खरं म्हणजे रमाबाईंना त्यांच्यासोबत पार्वतीवर जायचे होते. पण.. त्यांनी होकार भरला व महालाबाहेर पडल्या.

       सर्वजण आपापल्या इतमामाप्रमाणे स्थानापन्न झाल्यावर श्रीमंत पेशवेंनी नारायणरावांसह प्रवेश केला. आत येताच, विचारले, काका आले नाहीत अजून? नाना म्हणाले, त्यांचा निरोप आला, प्रकृती ठीक नसल्यामुळे भोजनास येऊ शकत नाही. पेशवे म्हणाले, आता अचानक तब्येत कशाने बिघडली? खेळीमेळीच्या वातावरणात भोजनास सुरुवात झाली. पण पेशव्यांचे लक्ष राहून राहून शेजारी जात होते. त्यांना काकाची आठवण येत होती. मेजवानीचा कार्यक्रमात आलेले सर्व मंडळी निघून गेली. श्रीमंत माधवराव पेशवे आपल्या दालनात येऊन मंचकी पहूडले. त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.

              क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २४-७-२०२३.

रमाबाई पेशवे चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading