
चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! श्रीमंत रमाबाई पेशवे !!!
भाग – ११.
श्रीमंत माधवराव पेशवे बिछान्यावर पडून शून्यात पहात विचार करत होते समेट घडला त्या प्रित्यर्थ मेजवानी ठेवली आणि ऐनवेळी काकांची तब्येत बिघडली, की नाटक असावं? वाटते त्यांचे कान फुंकले असावे. आमची तब्येत ठीक नसताना, तब्येतीकडे दुर्लक्ष करून, आम्ही ही कठीण जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करतो. काका मात्र आमचा जराही विचार करत नाही. किती मनस्ताप सोसायचा आम्ही? विचारात मग्न असतानाच रमाबाई आत मंचकाजवळ येऊन उभ्या राहिल्यात. हळुवार आवाजात म्हणाल्या, स्वामी झोपलात?
झोपेची आणि आमचा ३६ चा आकडा झाला आहे. रमाबाई त्यांचे पाय चुरावे म्हणून पंचकांच्या कडेवर टेकल्या. पायाला हात लावताच चमकून म्हणाल्या, अगोऽबाई! स्वामी, तुमचे अंग तापाने फणफणलय. काल पर्वती पर्वतीवर गेला तेव्हा तर ताप नव्हता. मग आज अचानक? काही मनस्ताप घडणाऱ्या गोष्टी घडल्या की आमचं अंग फणफणून येते. मग शरीराचा नुसता दाह होतो. थकवा येतो. भोजन करीत असतानाच अंग जड झाले होते. पंगतीतून उठता येत नव्हते. यजमान म्हणून शिरस्ता पाळावा लागला. ऐनवेळी काकांची तब्येत का बिघडली? का वैर्याची भूमिका घेऊन आमच्याशी वागत आहेत?
रमाबाई म्हणाल्या, लहान तोंडी मोठा घास होईल, पण बोलल्याशिवाय राहवत नाही. रमा, बोला.. तुमचं मन देखील आम्हाला कळू द्या.
रमाबाई म्हणाल्या, आम्ही लहान असलो, अनुभव कमी असले तरी, शनिवार वाड्यात कोण कसा आहे ते आम्हाला चांगलं समजते. खरं म्हणजे दादासाहेब फार भोळे आहेत. आणि म्हणूनच पेशवाईची वस्त्रे त्यांनी छत्रपती शाहू राजांना सांगून आपल्याला द्यायला लावली. त्यांच्या मनी वाईट भावना असती तर स्वतःसाठी प्रयत्न केला असता. आज वाड्यात वेळोवेळी जी वादळे उठतात ते केवळ आनंदीकाकी मुळेच. तुम्हाला पेशवे पद मिळाल्यापासूनच त्यांची धुसफूस चालू आहे. त्या गोड गोड बोलतात पण ते वरवरच असते. त्यांचा आपल्यावर असलेला राग वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होत असतो. स्वामी, तुम्ही काकींपासून सांभाळून राहा. त्यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत
रमा, आम्हाला सारं समजतं. पण आमची अवस्था अडकित्यात सुपारी अडकल्यासारखी झाली आहे. दादासाहेबांना हे कळायला हव. कुणी सांगावं त्यांना? काय नशिबात आहे कळत नाही.
पाय चुरता चुरता रमाबाई म्हणाल्या, राजवैद्यांना बोलवते. बरं वाटेल. अहोऽ, औषध घेतले की तेवढ्यापुरता आराम पडतो. औषधांच्या अंमल कमी झाला की पुन्हा ताप चढतो. औषध घेऊन नुसता कंटाळा आलाय. पण पर्याय नाही स्वामी. त्या म्हणाल्या, स्वामी, आम्ही ऐकले की, इंग्रज डॉक्टरचे औषध घेतले की आजार कायमचा बरा होतो.
आम्ही पण ऐकून आहोत. पण त्या औषध सेवनाने धर्म बुडतो असा समज आहे. त्या औषधाचा आणि धर्माचा काय संबंध आहे स्वामी? असं म्हणतात त्यांच्या औषधात गायीची चरबी असते. खरं खोटं परमेश्वराला माहीत. स्वामी कान आणि डोळ्यात अंतर असते. ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नये अस आम्हाला वाटतं.
वसईत एक नामांकित इंग्रज डॉक्टर आहे असे ऐकले. त्याचे औषधाने रामबाण उपाय होतो म्हणतात. वेळ मिळाली की आम्ही त्याच्याकडून उपचार करून घेण्याच्या विचारत आहोत.
स्वामी, वेळीच उपचार व्हायला हवा. आजार जास्त बळावला की मग आरोग्य आटोक्याच्या बाहेर जातो.
रमा, आम्हालाही आजारपणाचा कंटाळा आला. नाही म्हटलं तरी काही अंशी कामात दुर्लक्ष होतेच. आम्हाला ते मान्य नाही. त्यात वाड्यातील बिघडलेली स्थिती, शत्रूची डोकेदुखी, स्वतःच्या आजाराकडे देखील लक्ष द्यायला वेळ नाही.
अत्यंत व्यथित स्वरात श्रीमंत पेशवे म्हणाले, प्रियदर्शनी, तुम्ही आता वयात आला आहात. यौवनाच्या सिमेवर येऊन उभ्या आहात. तुमच्याही अंतरंगात काही भावना, इच्छा असतील. आम्ही असं सतत आजारी, तुमच्या मनाची खूप खूप घालमेल, हेंडसाळ होत असेल ना?
स्वामी, स्वतःबद्दल एवढं वाईट वाटून घेऊ नका. हा आजार कायम थोडेच राहणार आहे? सुख दुःख ऊन पाऊसारखं आहे. हेही दिवस निघून जातील. मग आपण ही उणीव भरुन काढू. मंचकावरुन उठत म्हणाल्या, राज वैद्याला बोलावून घेते.
राजवैद्य आपला बटवा घेऊन आले. नाडी तपास तपासता म्हणाले, श्रीमंत आतापर्यंत दिलेल्या औषधाचा गुण आला नाही. आता एक प्रभावी औषध देऊन पाहतो. श्रीमंत म्हणाले, वैद्यजी, तुम्ही औषध देता तेवढ्यापुरता फरक पडतो. पुन्हा जैसे थे. हा कसला आजार आहे? तुमचं निदान झालं असेल ना? होय स्वामी! राजवैद्य एकदम अबोल झाले. समोर रमाबाई असल्यामुळे बोलू की नाही असा त्यांना प्रश्न पडला. श्रीमंत पेशव्यांनी ते बरोबर ओळखले. म्हणाले, सांगावे. काही लपवू नका. त्या खंबीर आहेत. वैद्य म्हणाले, मला वाटते क्षयाची बाधा झाली असावी.
रमाबाईच्या तोंडून नकळत शब्द आले… अगोऽबाई! या वयात? काही वेळा तारुण्यात देखील अशी बाधा होऊ शकते. पण घाबरू नका. सध्या आजार प्राथमिक अवस्थेत आहे. उपचार होऊ शकतो. हे रामबाण औषध दुधात उगाळून श्रीमंतांना देऊन टाका. येतो मी असे म्हणून वैद्य निघून गेले.
पतीला औषधाची मात्रा दिली. त्यांच्या अंगावर लोकरीची शाल पांघरली. हलकेच रमाबाई बाहेर पडल्यात. क्षय रोगासारखा दुर्धर आजाराचे नाव ऐकून त्या धास्तावल्या. एकदम अबोल झाल्या.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – १२.
दुसऱ्या दिवशी पेशव्यांना पुष्कळ प्रसन्न वाटत होते. अंगातला ताप उतरला होता. थोडा थकवा जाणवत होता. पण ताजे तवाने वाटत होते. रात्री ताप असल्यामुळे स्नान केले नाही. ते महालातील सदरेवर येऊन बसले नाही, तोच दादासाहेब वडगावला निघून गेल्याची बातमी आली. सोबत आबा पुरंदरे होते. दोन दिवसांनी सखाराम बापू ही जाऊन मिळाले. पेशवे काळजीत पडले.
वडगाववरून येणाऱ्या वार्तेने पेशवे अधिक त्रस्त झाले होते. रघुनाथरावांना समजवायला मोठे मोठे सरदार गेले व अपयश पदरी घेऊन परतले. स्वतः खुद्द श्रीमंत माधवराव पेशवे गेले पण त्यांनाही जुमानले नाही. गोपिकाबाई ही गेल्या, त्याही तशाच परत आल्या. गोपिका बाईंचाही मान न ठेवल्याने पेशव्यांना अतिशय संताप आला. गोपिकाबाई म्हणाल्या, माधवा, मनस्ताप नका करून घेऊ. आधीच तुमची तब्येत ठीक नाही. मनाविरुद्ध काही झालं की, आणखी तब्येत बिघडते.
इकडे काका छळत आहे आणि तब्येत. तुमची कुचुंबना होत आहे. नुकतीच वार्ता आली की, रघुनाथराव पाषाणला गेले. पेशव्यांनी आपल्या सरदारांना फौजा गोळा करण्याचे आदेश दिले. त्या सर्वांना राजनिष्ठेच्या शपथा दिल्या. पुण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
त्याचवेळी भयंकर मनाचा थरकाप उडवणारी बातमी आली. रघुनाथराव निजामाला जाऊन मिळाले. आणि मुरादखान व विठ्ठल सुंदरला घेऊन ते पुण्यावर चालून येत आहे. सैन्य खर्चासाठी त्यांनी पैठण लुटले. ऐकून सर्वचजण बेचैन झाले होते.
श्रीमंत माधवराव पेशवे कमालीचे संतप्त होऊन गरजले…. स्वतःची इज्जत घालवली. अटकेपार मराठा दौलतीचा झेंडा फडकवणारा हा वीर शत्रूला सामील झाला. जिथं फुल वेचली तिथं गोवर्या गोळा करायला निघालात. पण काका दौलत अजून पोरकी झालेली नाही. आम्ही पोरसवदा असलो तरी दौलतीकडे वक्रदृष्टी टाकणाऱ्याच्या हात कलम करून सडेतोड जबाब देऊ.
बहुतेक सरदारांच्या फौजा पुण्यात येऊन थडकल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सारी तयारी जातीने पाहिली होती. थोड्याच पेशवे वेळात निघणार, तोच रमाबाई आल्या. रमाबाईंचा चेहरा काळजीने, चिंतेने ग्रासलेला पाहून, श्रीमंत थोडे बेचैन झालेत. पण स्वतःला आवरत हसून म्हणाले, हे काय? तुम्ही चेहरा का पाडला? क्षात्राणीने लढाईवर निघालेल्या पतीला प्रसन्न मुद्रेने हसत निरोप द्यायचा असतो. रमाबाई हसलेल्या पाहून माधवराव म्हणाले, हा.. आता शोभून दिसता.
ज्या दिल्ली दरवाजातून थोरले पेशवे अटकेच्या मोहीम वर निघाले होते, दिल्लीचे तक्त फोडण्यासाठी भाऊ काका बाहेर पडले होते, त्याच दरवाजातून आम्ही बाहेर पडत आहोत. पण शत्रूचे नाही तर स्वकियांचे रक्त सांडण्यासाठी. रमाबाई म्हणाल्या सांभाळून राहावं. हो पण वरच्याने सांभाळलं पाहिजे ना? नंतर आई गोपिका बाईचा आशीर्वाद घेतला. माधवा शांत डोक्याने पाऊल उचला.
आईसाहेब काळजी करू नका. आमच्याकडून पेशवे परिवाराला व मराठी दौलतीला कलंक लागेल असे कोणतेही गैर कृत्य होणार नाही. नंतर अस्वस्थ मनाने रमाबाईंनी त्यांना ओवाळले. माधवरावांनी आई व पत्नीकडे एक कटाक्ष टाकला व त्वरेने बाहेर पडले.
घोड नदीच्या दोन्ही तीरावर माधवरावांच्या व रघुनाथ रावांच्या फौजदार आमने-सामने उभ्या राहिल्या. पहिल्या दिवशी दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान झाले. तेही आपल्याच लोकांचे. दोन्ही कडचे लोक मराठी होते, आप्त होते .हे पाहून श्रीमंतांनी मध्यस्थीसाठी मल्हारराव होळकरांना दादा साहेबाचे मन वळविण्यास पाठवले. दोन्ही तळावर पाच सहा चकरा मल्हाररावांच्या झाल्यावर, माधवरावांनी तळ मागे घेतल्यावरच तहाची बोलणी होऊ शकेल असा निरोप पाठवला. पेशव्यांनी आळेगाव जवळ तळ ठोकला. आता मल्हारराव निरोप घेऊन येतील तह होईल असे सर्वांना वाटत होते. पेशवे सुद्धा डेऱ्या बाहेर उभे होते, तोच गोपाळराव पटवर्धन वेगाने दौडत आले. मुजरा करत म्हणाले, श्रीमंत, शेवटी दादा साहेबांनी डाव साधला. ते चालून येत आहेत. त्यांनी आपल्याला बरोबर कोंडीत पकडले आहे. आपली छावणी विस्कळीत आहे. जमवाजमवीला वेळ बिलकुल नाही. तेव्हा आपण कुठेतरी सुरक्षित स्थळी जावे. तोवर मी दादासाहेबांना रोखण्याची शिकस्त करतो.
ऐकून काष्टावत सुन्न झालेले पेशवे खिन्नपणे हसून गोपाळराव यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, गोपाळराव, तुम्हा सर्वांना मृत्यूमुखात सोडून एकाकी टाकून पळून जाऊ म्हणता? आमच्या शब्दावर विसंबून तुम्ही या मोहिमेत भाग घेतला. आम्ही अजून एवढे पाषाण हृदयी नाही झालो. नामुष्की पत्करण्या पेक्षा लढता लढता मृत्यूंजय होऊ दे. चला सेनेला एकत्र करा आपण कडवी झुंजू देऊ.
नौबतीचा आवाज ऐकून, जो जिथे होता तिथून अर्धस्नान सोडून, चुलीवर रटरटणारे भांडे टाकून धावत आला. श्रीमंत तयार होऊन डेर्या बाहेर आले. समोर उभे असलेल्या त्यांच्या घोड्यावर त्यांनी मांड टाकली. पेशव्यांचा घोडा उधळताना पाहून सैन्यात उत्साह संचारला. हजारो सैनिक पेशव्यांच्या पाठी दौडू लागले. त्याचवेळी दादासाहेब तळावर तुटून पडले दोन्ही पक्ष अटीतटीने लढत होते.
दिवसभर लढाई चालू होती. दिवसभर अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नव्हता. संध्याकाळ झाली लढाई थांबली. डेऱ्या समोर पेटलेल्या शेकोटीतल्या ज्वालाकडे पेशवे अबोल होऊन पाहत होते. बाजूला त्यांची जीवाला जीव देणारा देवबा म्हणाला, स्वामी, थोडं अंग टाकावे. नाहीतर ज्वर उचल खाईल. अरे देवबा नको काळजी करूस. शरीरारच्या थकव्यापेक्षा मनाच्या जखमा एवढ्या तीव्र भयंकर आहेत की, आम्हाला स्वस्थता लाभणार नाही. तेवढ्यात गोपाळराव आले. श्रीमंतांच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून त्यांना आपला हुंदका आवरता आला नाही. गोपाळराव, तुम्ही प्रयत्नाची शिकस्त केली पण अपयश पदरी आले. आता आणखी अधिक मनुष्यहानी होण्यापेक्षा उद्या सकाळी काकांच्या स्वाधीन होतो.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – १३.
दुसऱ्या दिवशी श्वेत वस्त्र परिधान करून पेशवे डेर्याबाहेर आले. ते आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेत, तोच त्र्यंबक मामा अजीजीने म्हणाले, श्रीमंत, मी येतो तुमच्याबरोबर. कशाला मामा? आम्ही काही बोलणे करायला नाही जात. शरणागत म्हणून जात आहोत. श्रीमंत पेशव्यांनी घोड्याला इशारा दिला पाठोपात ३०० घोडी होती. रघुनाथराव आपल्या डेऱ्यात मखमली लोडाला टेकून बसले होते. आजूबाजूला त्यांचे खुश-मस्करे त्यांची वारेमाप स्तुती करीत होते. प्रशंशेने खुललेले दादासाहेब म्हणाले, अजून माधवाचे दुधाचे दात देखील पडले नाहीत, आमचे डावपेच त्यांना कळायचे नाही. उगीच नाही आम्ही अटकेपार झेंडा रोवला. तेवढ्यासाठी तर पुणे सोडून मोघलांच्या आश्रयाला आलोय. तोच गंगोबा तात्या धावत समोर येऊन उभे राहिले. दादासाहेब, श्रीमंत पेशवे माधवराव पांढरे कपडे परिधान करून खाली मान घालून इकडेच येत आहे. लगेच दादासाहेब डेर्याबाहेर येऊन पाहिले. एवढे ३०० घोडे, पण टापांचा आवाज नव्हता. ते दृश्य पाहून क्षणभर त्यांचे मन पिळवटून निघाले. पण क्षणभरच! लगेच अहंकार व स्वार्थी भावना जागृत झाली. गडबडीने डेर्यात शिरले.
रघुनाथ रावांच्या ढेऱ्यासमोर येताच पेशव्याच्या इशाऱ्याने मागची घोडी जागीच थांबली. पेशव्यांनी पायातली मोजडी बाहेर डेऱ्यात ठेवून आत शिरले. रघुनाथ रावांना मुजरा केला. तुम्ही…तुम्ही.. पेशवेऽऽ आता कोणती अट घेऊन आलात? अट? शरणार्थी अटी घालत नसतो. उलट लादलेल्या अटी त्याला मान्य कराव्या लागतात. तुम्ही जी आज्ञा द्याल ती आम्ही पाळू. पण आपल्याच सेनेची हानी यापुढे नको.
दादासाहेबांचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय बोलता माधवराव? आमचा विश्वास बसत नाही. काका, आम्ही आपला कोणता अपराध, विश्वासघात केला, ज्यामुळे आमच्यावर तुमचा विश्वास नाही? भावनावश झालेल्या पेशव्यांनी डोईवरचे पागोटे बैठकीवर ठेवले. व दाराशी असलेले काकांचे चढाव हाती घेऊन पेशवे म्हणाले, डोईवरचा शिरपेच आपल्या पायाशी ठेवला असता तर त्याचा अपमान झाला असता, म्हणून तो बैठकीवर ठेवला. आपले चढाव हाती घेतले आहे. आणि मुजरा करून ते डेऱ्या बाहेर जाण्यास वळले. पेशव्यांच्या त्या उदात्त वागणुकीने दादासाहेब सद्गतीत झाले. माधवाऽ, तुझा शिरपेच राहिला. राहिला नाही काकासाहेब. मुद्दामच ठेवला आहे. आपले चढाव घेऊन जात आहोत. आता तारा नाहीतर मारा.
माधवरावांच्या नेत्रात अश्रू तराळले. उघडी बोडकी, हाती चढाव असलेली ती माधवरावची मूर्ती पाहून दादासाहेबांना एकदम भडभडून आले. आवेगाने पुढे होऊन त्यांच्या हातातील चढाव घेऊन बाजूला फेकले. आणि माधवरावांना आपल्या घट्ट मिठीत घेतले. पेशव्यांच्या पाठीवर तीर्थदान होत होते. पाझरल्या डोळ्यांनी दादासाहेब म्हणाले, माधवा, आम्हाला अशी सनक का येते कळत नाही. अशी सनक आली की, सारे सारे विसरून भलतेच गैर कृत्ये करतो. तुला सहाय्य करण्याऐवजी, पाठीशी उभे राहण्याऐवजी पाठीत खंज्जीर खुपसला. माधवा, तुझ्या या दुर्दैवी काकाला क्षमा कर.. क्षमा कर.. आणि दादा साहेबांनी बैठकीवरचा शिरपेच पेशव्यांच्या मस्तकावर ठेवत म्हणाले, माधवा, तू निश्चिंत मनाने तळ्यावर जा. आम्ही तळ्यावर आलो की मोकळ्या मनाने बोलू. मुजरा करून श्रीमंत पेशवे डेऱ्या बाहेर पडले.
दुसऱ्या दिवशी श्रीमंत माधवराव पेशवे आणि दादासाहेबांचे तळ आळेगावला पडले. रघुनाथरावांच्या डेऱ्यात वाटाघाटी सुरू झाल्या. पेशव्यांनी शरणागती पत्करल्यामुळे गोपाळराव पटवर्धन व त्रिंबकराव पेठे नाराज होऊन माघारी फिरले होते. आळेगावच्या तळावर पेशवे अगदी एखादी पडले होते. रघुनाथ रावांच्या डेऱ्यात सारी मंडळी जमा झाली होती. पेशवे आधीच हजर झाले होते. दादा साहेबांनी बोलण्यास सुरुवात केली. माधवाने यानंतर आमच्या सल्ल्याने राजकारभार करावा. सखाराम बापू कारभार बघतील. मात्र ज्यांच्या सल्ल्याने माधवने हे वर्तन केले त्यांची आम्ही गय करणार नाही. त्यांना योग्य तो धडा देऊ. काकासाहेब, आम्ही कुणाचा सल्ला ऐकून ही कार्यवाही केली नाही. माधवराव, तुम्ही शरणांगत आहात हे विसरू नका. शरणागतला मत नसते. माधवराव पेशवे विस्फरल्या नेत्राने दादा साहेबांकडे बघतच राहिले. आता सलोख्याला तुम्ही मान्यता द्यायलाच हवी .माधववराव पेशवे कठीण परिस्थितीत सापडले होते. नाईलाजाने म्हणाले जशी आपली आज्ञा.
सलोख्यामध्ये जिंकलेला उदगीरचा मुलूख व दौलताबादचा किल्ला दिला. मुरादखानला जेवढे खुश करता येईल तेवढे केल्यावर, मुरादखान त्याच्या तळावर निघून गेला. या साऱ्या वाटाघाटीत माधवराव पेशव्यांना खूप मनस्वी त्रास झाला. मराठ्यांनी जे मिळेल होतं ते सर्व दादासाहेबांनी सरळ सरळ निजामाच्या घशात ओतल होतं. पेशव्यांना इतका मनस्ताप झाला की त्यांच्या ज्वराने उचल खाली. खोकल्याची उबळ सुरू झाली. श्रीमंत आपल्या डेऱ्यात पडून राहू लागले.
देवबा घाबरा घुबऱ्या होऊन धावत येऊन म्हणाला, श्रीमंत श्रीमंत घात झाला. हजारेक गाडदीनी हातात नंग्या तलवारी घेऊन चारी बाजूंनी वेढले आहे. एवढं घाबरण्याचं कारण नाही. तलवार म्यान कर. मुजरा करून तो डेर्याच्या दरवाजा जवळ जाऊन पहारा करू लागला.
पेशव्यांनी आळेगावला शरणागती पत्करून सहा महिने उलटले होते.
दादासाहेब सूडाने पेटले होते .माधवरावांच्या कारकिर्दीत असलेले साऱ्यांना काढून टाकले. त्यांचे जागी आपली माणसे नेमली. पण त्यांची ही मनमानी फार काळ टिकू शकली नाही. निजाम आणि जानोजी भोसले फौजेसह भिवरे नदीच्या काठावर येऊन धडकला. ही बातमी कानावर येताच दादासाहेब चिंताग्रस्त झाले. निजामाने खलिता पाठवला होता. त्यात त्याने निजामा कडून घेतलेले सारे किल्ले परत मागितले होते. शिवाय या पुढील राज्यकारभार निजाम, भोसलेच्या सहाय्याने होईल ही पण अट घातली होती.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – १४.
या सर्व प्रकरणात माधवरावांनी नुसती बघायची भूमिका घेतली होती. दादासाहेब म्हणाले, माधवा, तुम्हाला आमची होत असलेली फजिती पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत असेल ना? काकासाहेब, तुमच्या आमच्यातला फरक हाच आहे. राज्यावर आपत्ती यावी, राज्य बुडाव ही हिन प्रवृत्ती आमच्यात नाही. ज्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा एक एक रक्ताचा थेंब सांडून ही मराठा दौलत उभी राहिली, त्या दौलतीचे होत असलेले धिंडवडे पाहून आम्हाला काहीच वाटत नाही हा कोता विचार सोडून द्या. मग.. मग तुम्ही असे गप्प का ?
आम्ही शरणार्थी कैदी. आपण द्याल ती आज्ञा पाळायला आम्ही वचनबद्ध आहोत. सखाराम बापू म्हणाले, श्रीमंत, दाराशी शत्रू येऊन थडकला असता तुम्ही त्रयस्था सारखे राहणार हे बरोबर वाटत नाही. ऐकले मात्र, आणि श्रीमंतांचा भडका उडाला. तडतड लाह्या फुटू लागल्या. बापू, फार बोललात. हे सर्व तुमच्या सल्ल्याने झालं. सूडबुद्धीने वागून, विश्वासू, भरवसाच्या माणसांचा काटा काढला. गोपाळराव सारख्या इनामी सेवकाला देशोधडीला लावलं. त्यांना निजामाच्या आश्रय घ्यायला भाग पाडले. निजाम बलवत्तर होऊन विजयी झाला तर तुम्ही नामानिराळे राहाल. खापर मात्र फुटेल आमच्या काकासाहेबांवर. काका साहेबांचे खाडकन डोळे उघडले. त्यांच्यापुढे सर्व गोष्टी स्वच्छ झाल्या. म्हणाले, कुठून दुर्बुद्धी झाली आणि यांच्या सल्ल्याने वागलो. मी हे प्राण घातक संकट ओढून घेतलं. काकासाहेब, एवढे हताश होऊ नका. आणि सारा कारभार पुन्हा माधवरांच्या कडे आला. त्यांनी तडफने पावले उचलली. काका पुतण्यांची मन निवळली. श्रीमंतांना नवचैतन्य भरल्यासारखं वाटलं. एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाज येईल असे राजकारण श्रीमंत पेशवे खेळत होते. त्यात ते यशस्वी होत होते. श्रीमंतांची धडाडी व मुरब्बीपणा पाहून दादासाहेब मनोमन प्रभावीत होत होते. वय लहान पण कीर्ती महान. आपण देखील त्यांना वचकून असतो. माधववराव पेशव्यांच्या डावानुसार मल्हारराव निजामापासून जानोजी भोसल्यांना फोडण्याची शिकस्त करत होते. निजाम देखील अलीकडे भोसलेंशी फटकून लागत होता. हे शल्य जानोजी भोसलेंना जाणवत होते. मल्हारराव होळकरांशी तडजोड केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मल्हाररावांच्या प्रयत्नाला यश आले. निजामापासून भोसले फुटले होते. महादजी शितळेने विठ्ठल सुंदरला टिपले. त्यामुळे युद्धाची बाजी पलटली. राक्षस भुवनाच्या या अटीचटीच्या लढाईने श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला. थकलेले असूनही पेशवे आनंद विभोर झाले होते. केलेल्या राजकारणाला गोड फळे आली होती. यात महाजी चितळेंचा फार मोठा सहभाग होता. माधवरावांनी त्यांना सरदारकी व मांजरीगाव इनाम दिले. मुजरा करून चितळे निघून गेले.
तेवढ्यात कोसळत्या पावसात दादासाहेब आले. श्रीमंत पाण्यात भिजत उभे असलेले पाहून म्हणाले, माधवा, तू स्वतःला जपलं पाहिजे. आधीच तुझी तब्येत नाजूक आहे. अशा पावसात भिजल्याने आजारी पडशील. तू मराठी दौलतीचा आधारवड आहेस .ही दौलत मोठ्या आशेने तुझ्याकडे पाहत आहे. दादासाहेबांचा स्वर ओला झाला. आज तुमच्या मुळे या कठीण प्रसंगातून निभावलो. आता आम्ही या राज्याच्या जबाबदारीतून मोकळे झालो. तुमच्या खंबीर नेतृत्वाखाली मराठा दौलत निश्चितच सुरक्षित राहील.
पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. दादासाहेब पुन्हा आपल्या मूळ पदावर गेले. पण यावेळी पेशव्यांनी त्यांना जुमानले नाही. त्यांची कान उघडणे केली.
श्रीमंत पेशव्यांच्या तर्कानुसार निजाम मेतकुटीला येऊन तहास तयार झाला. पेशव्यांच्या सार्या मान्य केल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. निजामाशी तह करून श्रीमंत माधवराव पेशव्यांनी पुण्याकडे प्रस्थान केले. आणि दादासाहेब पुण्यात न येता परस्पर आनंदवल्लीस निघून गेले. राक्षसभुवनाचा भरघोष विजय संपादन करून, विजयी वीर पुण्यात येत असल्याच्या बातमीने पुणेकऱ्यात नुसता उत्साह संचारला. पुणेकर मोठ्या दिमाखाने बोलत होते, श्रीमंत माधवराव पेशव्यांनी पानिपतच्या पराभवाचा कलंक धुवून काढला. आळेगावच्या शरणागती नंतर पेशवे प्रथमच पुण्यात येत होते. या मधल्या काळात शनिवार वाड्यावर लहान मोठे वाईट प्रसंग आले होते. पेशवे दादा साहेबांच्या नजरकैदेत होते. तेव्हा त्यांनी शनिवार वाड्यावर गाडद्यांचे पहारे बसवले होते. गोपिकाबाई व रमाबाई सिंहगडावर स्थलांतरित झाल्या होत्या.
श्रीमंत पेशव्यांच्या नगरप्रवेशा वेळी निजाम हल्ल्याची कोणतीच निशाणी पेशव्यांच्या नजरेत पडू नये म्हणून सारे पुणे झटत होते. शनिवार वाडा सजला होता. पुण्यातील घराघरावर गुढ्या तोरणे उभारली होती.
खूप दिवसांनी श्रीमंत पेशवे शनिवार वाड्यात प्रवेशणार म्हणून, पेशवीण रमाबाई त्यांच्या स्वागता साठी नखशिकाखांत सजल्या. आपल्याच सौंदर्यावर त्या लुब्ध झाल्या. त्याचवेळी पार्वतीबाईनी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. शिरता शिरता म्हणाल्या, अगोऽबाई! किती सुंदर दिसतेस ग रमा आज? आमचा माधव येणार म्हणून सारा आनंद, उत्साह तुमच्या डोळ्यातून पाझरत आहे. आरतीचं तबक तयार ठेवले ना? आम्ही थोरल्या बाईसाहेबांच्या दालनाकडे जाऊन येतो. त्या सुद्धा आपल्या पुत्राने एवढ्या भीम पराक्रम केल्यावर भेटीस उत्सुक असतील ना? पार्वती बाई निघून गेल्या.
सलामीच्या तोफांचे आवाज होऊ लागले. लोक आपल्या पेशव्यांच्या दर्शनासाठी अधीर झाले होते. अत्यंत मंद गतीने अंबारीचा हत्ती पुढे सरकत होता. त्या पाठोपाठ भगव्या झेंड्याचे आणि जरी पटक्याचे हत्ती आघाडीवर होते. त्या भव्य दिव्य मिरवणुकीने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-७-२०२३.
!!! रमाबाई !!!
भाग – १५.
अंबारीत विराजमान असलेल्या श्रीमंत पेशव्यांवर मागे खवस खान्यात असलेले गोपाळराव पटवर्धन आणि त्रिंबक मामा पेठे हे चवर्या ढाळीत होते. दुतर्फ उभी असलेली रयत पेशव्यांवर फुले उधळत मोठमोठ्याने घोषणा देत होते. श्रीमंत माधवराव चिरायू होवोऽऽ कीर्तीवंत होवोऽऽ मराठी दौलतीचा विजय असोऽऽऽ. त्या घोषणांनी वातावरण भारले होते.
अंबारीचा हत्ती दिल्ली दरवाजा जवळ येऊन उभा राहिला. शनिवार वाड्याच्या सज्जावरून श्रीमंतावर सोन्या रुप्यांची फुलं उधळल्या जात होती. शनिवार वाड्यावर भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडकत होता. श्रीमंत हत्तीवरून खाली उतरले. दरवाज्यापाशी कुळंबीणी घागरी घेऊन उभ्या होत्या. भालदार चोपदारांच्या ललकारात श्रीमंत गणेश महालांच्या प्रवेश दारात आले. शास्त्री बुवांनी त्यांच्या हाताला पुष्पहार लपेटला. नंतर पेशवे दरबारात प्रवेशले. सगळ्यांचे मुजरे स्वीकारीत मसनदी पुढे येऊन तख्ताला त्रिवार नमस्कार केला. व मसनदीवर विराजमान झाले.
दरबाराला रितसर प्रारंभ झाला. नाना फडणीसांनी श्रीमंतांच्या हाती साताऱ्याहून छत्रपती महाराजांचा आलेला खलिता दिला. श्रीमंतांनी खलिता मस्तकी लावला व वाचायला सुरुवात केली. राक्षसभुवनाच्या विजयाने छत्रपती महाराज खूप प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद पाठवले. श्रीमंत म्हणाले, शास्त्रीजी, छत्रपती महाराजांना आमचे दंडवत कळवा. आज आम्हाला एकाकी वाटत नाही. आमच्या पाठीशी एक प्रबळ शक्ती असल्याची जाणीव झाली .त्यानंतर राक्षसभुवनाच्या लढाईत स्वतःच्या प्राण्याची परवा न करता युद्धात झोकून दिले अशा पराक्रम गाजवणाऱ्या वीरांचा श्रीमंतांनी स्वहस्ते मान वस्त्रे देऊन सत्कार केला. सत्कार सोहळा आटोपल्यावर दरबार संपल्याची श्रीमंतांनी घोषणा केली. आणि ते आपल्या महालाच्या दालनात आलेत.
दरवाज्यात रमाबाई आरतीचे तबक घेऊन उभ्या होत्या. रमाबाईंनी त्यांना औक्षण करून ओवाळले. ओवाळणीत श्रीमंतांनी हिऱ्याची अंगठी टाकली. पेशव्यांनी रमाबाई कडे पाहिले. क्षणभर नजरेला नजर भिडली. हिऱ्यापेक्षाही तेजस्वी नेत्रांना रमाबाईंना नजर देता आली नाही. त्या झटकन आत निघून गेल्या. शेजारी उभ्या असलेल्या गोपिकाबाई आणि पार्वती बाई गालातल्या गालात हसल्या.
पेशवे आपल्या दालनी आलेत. पाठोपाठ ह्या दोघेही आल्या. गोपिकाबाई कौतुक करत म्हणाल्या, या वयात तुम्ही दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाला तोड नाही. पण आईसाहेब, काकासाहेब पुण्याला आले असते तर आनंदात भर पडली असती. पण ते परस्पर आनंदवल्लीला निघून गेले. पार्वती बाई म्हणाल्या, स्वभाला औषध नाही. तुम्हा दोघात गोडवा निर्माण झाला हे महत्त्वाचे आहे. असे म्हणून पार्वतीबाई दालनातून बाहेर पडल्या. काही वेळात गोपिकाबाईही गेल्या.
रात्रीचे भोजन झाल्यावर श्रीमंत आपल्या दालनी येऊन मंचकावर विश्रांती घेत पहुडले होते. त्यांना प्रतीक्षा होती आपल्या लाडक्या रमाची.. प्रियदर्शनीची. तोच दालनात पायातील साखळ्यांचा छम छम आवाज आला. रमाबाई मंचकाजवळ आल्यावर, पेशवे म्हणाले, प्रियदर्शनी.. किती हा उशीर? का उशीर झाला? स्वामी, वाड्यातील थोरांचा मान ठेवून वागावं लागते. सर्वीकडे शांतता झाल्यावर मगच येता आले.
स्वामी, आपल्यावर या मोहिमेचा बराच ताण पडलेला दिसतो. रमा, युद्ध म्हटलं की, ताण येणारच. त्यात काका साहेबांचा ताण वेगळाच होता. पण मोठं यश पदरी पडल्यामुळे या ताणाचे आता काही वाटत नाही.
स्वामी तुम्हाला नसेल वाटत पण, तुम्ही मोहिमेवर गेल्यावर घरी असलेल्या राजस्रीया सतत त्यांच्या चिंतेत जळत असतात. एक एक दिवस पार पाडणे कठीण जाते. चिंता केल्याने युद्धावरच संकट टळते का? टळत नाही स्वामी. पण हिंदू स्त्रीनं आपली जीवनरेषा आपल्या पुरुषाशी जोडलेली असते. ती त्याची छाया असते. म्हणूनच तिला आपल्या पुरुषाची जीवन साथीनी म्हणतात. आम्ही तर चक्क गजाननला पाण्यात बुडवून ठेवले होते. अजून काढले की नाही? आपल्याला ओवाळल्याबरोबर पहिलं काम तेच केलं. आपण तिकडे युद्धभूमीवर संकटाशी झुंजत होतात. आणि आम्ही पाण्याच्या थेंबही न घेता उपवास केले. रात्री उपवास सोडताना अगदी थोडेच अन्न घ्यायचं. अंथरुणावर पाठ टेकल्यावर रात्रभर तळमळत आपल्या चिंतेत जळत राहायचं.
स्वामी, एक विचारू? विचारा ना! एकांती बोलण्यासाठी परवानगी कशाला हवी? स्वामी, मोहिमेत आमची आठवण येत होती का? खरं खरं सांगू… म्हणून तर विचारले.
रमा, आम्ही सतत युद्धाच्या धामधुमीत असायचो. शत्रूचा बिमोड कसा करायचा, कायम त्याच विचारात गुरफटून गेलेलो असायचं. पण रात्री मंचकावर पडायचं तेव्हा मात्र तुमची सुंदर मूर्ती डोळ्यासमोर समोरून हलत नसे. विशेष म्हणजे आम्ही जेव्हा शरणार्थी झालो होतो, त्या कडवट दुःखाने पोळून निघालो होतो. काकासाहेबांच्या नजर कैदेत असताना आमच्यावर बरीच बंधन होती. तेव्हा तुमची आठवण खूप सतावायची. स्मृती रूपाने का होईना तुम्हीच आमच्या मनोराज्यात विहरत असायच्या. दोनचा टोला झाला तसे, दोघेही गोष्टी मधून भानावर आले. दोघेही झोपेच्या अधिन झाले.
राक्षसभुवनाच्या लढाईचे सारे सूत्र माधवरावांनी आपल्या हाती घेतल्यामुळे त्यांच्या नाजूक प्रकृतीवर अतिशय ताण पडला. पुण्यात परतल्यावर दोन दिवसांनी अचानक त्यांची तब्येत ढासळली .ज्वराने अंग फणफणले खोकला. सुचू देत नव्हता. अशक्तपणा खूपच वाढला होता. संध्याकाळची वेळ झाली तरी पेशवे मंचकावरच झोपलेच होते. गोपिकाबाई त्यांच्या दालनात आल्यावर संध्याकाळच्या वेळी माधवराव झोपलेले पाहून त्यांनी घाबऱ्या घाबऱ्या विचारले, रावसाहेब, काय झालं? बरं नाही का?
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २५-७-२०२३.


