
सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! राजा छत्रसाल म.!!!
भाग – ११.
शिवाजी महाराजांनी छत्रसाला काय मदत देऊ? असे विचारल्यावर छत्रसाल म्हणाले, महाराज, मला माझ्या मातृभूमीला मोगलांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे आहे. कृपा करून आपण आपल्या सैन्यात मला भरती करून घ्यावे. जेव्हा युद्धप्रसंग येईल तेव्हा मला सैन्याच्या आघाडीवर ठेवण्याचा गौरव प्रदान करावा. महाराज प्रसन्नपणे हसले. म्हणाले, देशाला सध्या अशाच वीरांची आवश्यकता आहे. तुम्ही आता तुमच्या प्रदेशात जा. आणि एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करा. महाराज स्वतंत्र राज्य ही केवळ अशक्य गोष्ट कशी साध्य होईल? महाराज, मोगला सारख्या बलाढ्य अफाट सैन्यापुढे माझा टिकाऊ कसा लागेल? त्यापेक्षा मी एक लहानसा शिपाई म्हणून आपल्या सैन्यात जागा मिळाली तरी मला पुरेसे आहे.
महाराज म्हणाले, छत्रसाल स्वतःला लहान आणि कमकुवत समजू नका. आम्हाला तुमच्यात देशाचे उज्वल भविष्य दिसत आहे. तुमची जन्मभूमी तुम्हाला आवाज देत आहे. तो आवाज ऐका. तुमची तलवार तोपर्यंत उठलेली राहो जोपर्यंत तिचा उद्धार होत नाही. जा …वीरा.. जा.. मातृभूमीच्या सेवेत जीवन समर्पित करा…
छत्रपतींच्या ओजस्वी वाणीने छत्रसाल रोमांचित झाले. त्यांचे बाहु स्फुरण पावू लागले. हात जोडून म्हणाले, महाराज, आपल्या या महानतेमुळेच लोकांच्या हृदयात “जाणता राजा” म्हणून प्रतिष्ठित आहात. आपण आशीर्वाद द्या की, भारताच्या मध्य प्रदेशातील लोक, सेवा आणि समर्पणासाठी लक्षात ठेवतील. आपण सोपवलेले काम आज्ञा म्हणून शिरोधार्य आहे. महाराज म्हणाले,पण हे फार कठीण आहे.आम्ही चांगले जाणून आहोत, बलाढ्य मोगलांशी टक्कर देणे सोपे नाही. काही वेळ तुम्हाला पराजही पत्करावा लागेल. पण हिम्मत न हरता, पुन्हा नव्या जोमाने उभे रहा. आम्हाला खात्री आहे, तुमचा प्रत्येक पराजय तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात असेल.
छत्रसाल हात जोडून विनम्रतेने म्हणाले, आपला आशीर्वादच कवच म्हणून माझे रक्षण करेल.
महाराज म्हणाले, तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा हाक द्या. आमची सेना तुमच्या मदतीसाठी पोहोचेल. एवढेच नाही तर आमचे उत्तरा
धिकारी सुद्धा तुम्हाला मदत करतील. महाराजांच्या आश्वासनाने भारावलेले छत्रसाल म्हणाले, आपल्या या कृपेच्या बदल्यात हा अकिंचन आपल्याला काय देऊ शकणार? पण तरीही संकल्प करतो की, जेव्हा कधी मोगल सैन्य आपल्यावर आक्रमण करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जातील, त्यावेळी त्यांना माझा सामना करावा लागेल. मी लोखंडी भिंत बनवून त्यांना आडवीन. आता आज्ञा द्यावी. छत्रसालने महाराजांच्या पायावर डोके ठेवले. महाराजांनी त्यांना हृदयाशी कवटाळले. पाठ थोपाटली.
तिसऱ्या दिवशी छत्रसालले पत्नी देवकुंवर सह पुणे सोडले. त्यांचे बरोबर पाच घोडेस्वाद आणि पंधरा शिपाई होते. देवकुवर पालखीत बसली. तांडा अहमदनगर कडे निघाला. सातव्या दिवशी अहमदनगर जवळ असलेल्या नदीकाठी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्यांना कळले की, काही अंतरावर राजा शुभकरणची छावणी आहे. छत्रसालने आपली भेटण्याची इच्छा असल्याचा शिपाया बरोबर निरोप पाठवल्यावर राजाने भेटीची अनुमती प्रदान केली.
दुसऱ्या दिवशी पाच सशस्त्र शिपयांबरोबर राजाच्या डेऱ्यावर पोहोचले .छत्रसालने राजाला जोहार केला. राजा शुभकरणरने अभिवादनाचा स्वीकार करून म्हणाले, तुम्ही राजा जयसिंगच्या सेवेत असताना मराठ्यांविरुद्ध जबरदस्त वीरता दाखवली होती आता त्या सैन्यापासून वेगळे होऊन कुठे निघालात? हे सुद्धा ऐकले होते की तुमच्या शौर्याने खूश म्हणून राजा जयसिंगने तुमच्या बढतीची शिफारस पण केली होती. मग वेगळे होण्याचे कारण काय? छत्रसाल म्हणाले, महाराज, मोगल सैन्यात भरती होणे माझी विवशता होती. आता मी त्यांची साथ सोडली. आता स्वतंत्रपणे आंदोलन सुरू करणार आहे. त्यासाठी मी पुण्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडे राहून प्रशिक्षित झालो. आता मायदेशी बुंदेलखंडी परत जात आहे. बुंदेलात राहून त्याच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम राबवणार आहे.
राजा शुभकरण म्हणाले, वेडेपणा करू नका. मोगलांशी टक्कर घेऊ शकणार नाही. तुमची इच्छा असेल तर मी तुमची शिफारस करून चांगला हुद्दा मिळवून देईल. खरं म्हणजे राजाला छत्रसालचा बुंदेल आणि क्षत्रिय स्वाभिमान रुसला नाही. त्यांनी हा अभिमान फार पूर्वीच त्यागला होता.
छत्रसाल म्हणाले माझा निश्चय पक्का आहे. बुंदेल प्रदेश मोगलांपासून मुक्त करून स्वतंत्र राज्याची स्थापना करील. तुमच्यासारख्या राज्याची मदत मिळाली तर माझी हिम्मत वाढेल. यश मिळवण्याच्या दिशेने पुढे पाऊल पडतील.
राजा शुभकरण म्हणाले, तुम्हाला मोगल सैन्यात जायचे नाही ना? तर ठीक आहे तुम्ही आम्हाला सामील होऊन आमच्या किल्ल्याच्या संरक्षण दस्तात सामील व्हा. माझा मुलगा दलपतराय तुमचे दतियामध्ये शानदार स्वागत करेल. तुम्ही आमच्या अधिन राहून काम करा. शुभकरण छत्रसाल आणि त्यांच्या नातेवाईकांचे महत्त्व जाणत होते. छत्रसालने त्यांचे अधिक राहून हात बळकट करावे असे वाटत होते. छत्रसाल म्हणाले, मी केलेल्या संकल्पात काहीही बदल होणार नाही. स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण साथ दिली नाही तर निदान आशीर्वाद तरी द्यावा.
राजाला नमस्कार करून छत्रसाल आपल्या अंगरक्षकांसह आपल्या डेर्यावर परतले. आपल्या योजनेच्या पहिल्याच पायरीवर त्यांना निराशा मिळाली.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १२.
छत्रसाल निराश मनाने आपल्या डेऱ्यावर परत आले. पत्नी देवकुंवर वाटच बघत होती. त्यांचा निराश चेहरा बघून, कारण विचारल्यावर, त्यांनी राजा शुभकरणाच्या भेटीचा वृत्तांत कथन केल्यावर, ती म्हणाली, प्रयत्न करत रहावे. मग तिने सांगितले, दोन शिपाई येऊन तुमच्याबद्दल चौकशी करत होते. ते पुन्हा उद्या येणार आहेत. ते कोणा सुजानसिंहाचे नाव सांगत होते. त्यांचा मुक्काम औरंगाबाद पासून दक्षिणेकडे दहा कोसावर आहे. ते भेटू इच्छितात. कोण आहेत हे सुजानसिंह?
छत्रसाल म्हणाले, दतियाचे राजा आहेत. आमचे वडील चंपतराय ओरछाचे राजा होते, तेव्हा हा सुजानसिंह, राजा शुभकरण अगदी छोटे राजे होते. बादशहाने जेव्हा आमच्या वडिलांना कैद करण्यास सैन्य पाठवले तेव्हा वडिलांनी सुजन सिंहाला मदत मागितली होती. पण यांनी नकार दिला होता. माझे वडील पळत होते. पण कोणी मदतीचा हात पुढे केला नव्हता. आता तेच सुजानसिंह भेटीला कशासाठी बोलावतात कळत नाही. देवकुंवरने भीती व्यक्त केल्यावर, छत्रसाल म्हणाले, राजा सुजान सिंहाशी आपले काही वैर नाही. त्यांना मोगलांना नाराज करायचे नसल्यामुळे मदत केली नव्हती. त्यांना भेटायला हरकत नाही. पण मला भीती वाटते. तुम्ही मोगल सेनेतून पळून आला आहात. तुम्हाला पकडण्याचा काही डाव तर नसेल ना? हे बघ देवी, आपल्याजवळ फार तुटपुंजे शिपाई व घोडेस्वार आहेत. त्यांना कैद करायचे असते तर आतापर्यंत त्याच्या सैन्याचा घेराव पडला असता. निरोप नसता पाठवला. म्हणून त्यांना भेटण्यास काहीच नुकसान नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी तेच दोन घोडेस्वार छत्रसालना न्यायला आले. ते म्हणाले, देवी, मी संध्याकाळपर्यंत येतो. असे म्हणून घोड्यावर स्वार झाले. छत्रसालच्या अंगरक्षकांना बाहेर थांबायला सांगून, छत्रसालांनी शिबिरात प्रवेश केला. शिबिराचा थाट वाखाणण्यासारखा होता. समोरच्या उंच आसनावर सुजानसिंह बसले होते. छत्रसालांनी राजाला नतमस्त होऊन अभिवादन केले. राजाने छत्रसालांच्या वडिलांच्या पराक्रमाची स्तुती केल्यावर, छत्रसाल म्हणाले, बुंदेले राजांनी त्यांच्याशी केलेल्या व्यवहाराने ते नेहमीच खिन्न व दुःखी होते. राजा म्हणाले, छत्रसाल तुझे दुःख समजू शकतो. मोगलांविरुद्ध ते एकाकी लढून मोगलांच्या आक्रमणाला तोंड देत राहिलेत. दारोदार भटकावे लागले. एकट्याने झुंज देत बुंदेलांचे शान राखली. मस्तक कधी झुकू दिले नाही. महाराणा प्रतापांच्या पराक्रमाची बुंदेलांच्या धरतीवर पुनरुक्ती केली. राजाजी, तुमच्याकडून पिताजींना फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण तुम्ही सुद्धा..!
राजा म्हणाले, आज निःसंकोचपणे कबूल करतो की,मोगल सैन्या पुढे आमच्या सैन्याचा टिकाव लागला नसता, म्हणून… पण राजाजी आमच्या वडिलांजवळ तरी असे किती साधन होते? राजा म्हणाले, आम्ही त्यांच्या सावलीपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. मी असे ऐकले की तू सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बुंदेले स्वतंत्र राज्य करण्याच्या संकल्प केला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी राजांकडे गेला होता.
खरं आहे. मी तिथूनच येत आहे. स्वातंत्र्य संग्रामाची एक ठिणगी घेऊन उत्तरेकडे जात आहे. राजा सुजानसिंह म्हणाले, आता माझेही विचार बदलले आहे. मी दक्षिणेत औरंगजेबाच्या सैन्याला मदत करीत आहे. आणि त्याने सेनाधिकारी फिजाई खानला आदेश दिला की, ओरछा आणि जवळपासचा प्रदेश, देवळे उध्वस्त करा. जे विरोध करतील त्यांची कत्तल करा. राजा काळजीने बोलले.
छत्रसाल म्हणाले, गोष्ट आहे तर काळजी करण्यासारखीच. म्हणूनच मी म्हणतो आपण सगळे एक होऊन स्वातंत्र्यस युद्ध करू. पण जो तो स्वतःपुरतं पाहतो. कोणी साथ दिली नाही तरी मी एकटा मोगलांविरुद्ध युद्ध करेन.
राजा म्हणाले, छत्रसाल, यावेळी मी तुझ्याबरोबर आहे. परवापर्यंत माझे सैनिक पुरेसे धन घेऊन तुझ्या डेऱ्यावर येतील. मी ओरछाला परत गेल्यावर आणखी मदत करेल. आणि करत राहील. तुझ्या संकल्पना मी तुझ्या तुझ्याबरोबर आहे. छत्रसाला अतिशय आश्चर्य वाटले .
सुजानसिंह म्हणाले, जा… चंपतरायच्या पराक्रमी वीर पुत्रा, जा… जिथे जिथे बुंदेलांचा निवास आहे तिथे तिथे आपल्या क्षत्रिय तेजाचा असा समुद्र बनव की मोगल सेना त्यात बुडली पाहिजे. अभिवादन करून छत्रसाल निघाले असता, राजा म्हणाले, छत्रसाल, जाताना औरंगाबाद वरून जा. तिथे तुझे काका बलदिवानांचा मुक्काम आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जा. छत्रसाल आपल्या डेऱ्यावर पोहोचल्यावर सुजनसिंहाचा सगळा वृत्तांत त्यांनी आपली पत्नी देवकुंवरला सांगितल्यावर, ती शंका घेत म्हणाली, सुजानसिंह बोलल्याप्रमाणे वागेल? होय! मला खात्री आहे. त्यांना बुंदेलखंडाची नाही ओरछाची काळजी आहे. त्यांना वाटले, ते बुंदेलखंडात स्वातंत्र्याची मोहीम सुरू झाली की, मोगलांचा दबाव ओरछाकडे कमी होईल. काही असो, माझा निश्चय कायम आहे.
तिसऱ्या दिवशी सुजानसिंहचे दहा घोडेस्वार, पाच घोड्यावर धनराशी लादून छत्रसाल कडे धन सोपवून निघून गेले. सुरुवात चांगली झाली होती.
दुसऱ्या दिवशी छत्रसाल आपल्या छोट्याशा तुकडीसह औरंगाबादकडे रवाना झाले. शहराच्या दोन कोस अलीकडेच काका बलदिवानांचा पडाव होता. कोणतीही औपचारिकता न दाखवता ते सगळ्यांसह काका बलदिवानांच्या पाडावात पोहोचले. पहारेकऱ्याने पती-पत्नीला बलदिवानांच्या शिबिरात पोहोचवले. दोघांनीही प्रणाम केल्यावर, देवकुंवर चुलत सासूबाई जवळ अंतःपुरात गेली.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १३.
छत्रसालांनी काकांचे चरण स्पर्श करून त्यांच्याजवळ बसले. इकडचे तिकडे बोलणे झाल्यावर, छत्रसालांनी आपला इरादा सांगितल्यावर, प्रथम तर त्यांना त्यांच्या संकल्प पासून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण छत्रसाल आपल्या इराद्यावर कायम असलेले पाहून, त्यांना स्वतःला लाज वाटू लागली. आणि म्हणाले, चंपतराय माझे आदर्श होते. तेव्हा त्यांना साथ न दिल्याबद्दल माझे मन मला धिक्कारत होते. आज संधी मिळाली. त्याचे सोने करेल. मी तुमच्यासोबत आहे.
ऐकून छत्रसालला अतिशय आनंद झाला. म्हणाले, काका तुमची साथ मिळाली तर आपण दोघेच मोगलांना पळता भूई थोडी करू शकतो. पण छत्रा, माझी एक अट आहे. लुटमार, करवसुली, दंड किंवा कोणत्याही कारणाने जे धन मिळेल, त्यात माझा अर्धा हिस्सा राहील. छत्रसाल म्हणाले, काका अर्धा नाही तुमचा ४५% व माझा ५५% राहील. कारण मला फार मोठी मोहीम राबवायची आहे. त्यासाठी धनाची आवश्यकता आहे. काकांनी आनंदाने मान्य करून त्यांना हृदयाशी धरले. डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, दोन दिवस विश्रांती घेऊन बुंदेलखंडाकडे प्रस्थान कर. थोड्या दिवसांनी मी बैगताला पोहोचेन. तिथे येऊन मला भेट. जशी आज्ञा. छत्रसालांचा चेहरा आनंद आणि उत्साहाने झगमगच होता.
कुठेही जास्त मुक्काम न करता काही दिवसातच रतनशहा असलेल्या बिजौरीला पोहोचले. इतक्या दिवसांनी भेट झाल्यामुळे दोन्ही भावांना अतिशय आनंद झाला. छत्रसाल व देवकुंवरने दादा, वहिनीला वाकून नमस्कार केला. चंद्रकुंवरने धाकट जावेला आत नेले.
रात्रीच्या भोजनानंतर दोघेही भाऊ दालनात येऊन बसले. छत्रसालने गेल्या दीड वर्षाची सविस्तर माहिती सांगितली. रतनशहा म्हणाले, तुझी एवढी धडपड वाया जाणार नाही. छत्रसाल म्हणाले, जेव्हा बुंदेलखंड मोगलांपासून मुक्त करून स्वतंत्र राज्य स्थापन करू, तीच आपल्या वडिलांना खरी श्रद्धांजली होईल. त्यानंतर सर्व बाजूंनी दोघा भावांनी विचार विनिमय केल्यावर, छत्रसाल म्हणाले, मी ताबडतोब बगैत साठी निघणार आहे. काकांनी सर्व प्रकारचे सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पत्नीला म्हणाले, तू काही दिवस इथेच बिजौरीत वहिनी बरोबर रहा. माझी व्यवस्थित व्यवस्था झाली की, तुला घेऊन जाईन.
चार दिवसांनी छत्रसालनेने आपल्या छोट्याशा तुकडीसह बिजौरी सोडली. प्रवास करता करता गावागावात स्वातंत्र्याची चेतना जागवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचा परिणाम बऱ्याचश्या गावातील लोक सैन्यात भरती होण्यास तयार झाले. काहींनी जातीची शंका काढल्यावर छत्रसाल म्हणाले, सैन्यात भरतीसाठी जातीचे बंधन नाही. बुंदेल खंडाच्या स्वतंत्र यज्ञात कोणीही आहुती देऊ शकतो. एका मुसलमानाने भरती होण्याची इच्छा दर्शवल्यावर छत्रसाल म्हणाले, आमच्या सैन्यात भरती होण्यासाठी जाती, धर्म, वर्ग, वर्ण यापेक्षा वर आहे. ज्याची इच्छा असेल त्या सर्वांनी सैन्यात भरती व्हा. तुम्हाला वेळेवर पगार आणि योग्य वेळी बढती मिळेल. तिथे जवळच एक प्रौढ महिला बसली होती. तिने विचारले, तुम्ही ज्यांना घेऊन जात आहात, ते परत येतील ना? ते परत येतील की नाही सांगता येणार नाही. पण त्यांचे कपाळावर मातृभूमीचा स्वातंत्र्य टिळा नक्की लागलेला असेल.
तिसऱ्या दिवशी छत्रसाल बगौतला पोहोचले. काका पुतण्याने चर्चा करून योजना बनवली. दोघांनी सैन्य विस्तार करावा. आसपासच्या प्रांतात फिरून बुंदेलवासीयांत स्वातंत्र्याची ज्योत चेतवावी. मोगलांच्या ठाण्यावर आक्रमण करून खजिना लुटावा. छोटे छोटे राज्य अधिन करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करावी.
दोघांनीही आपल्या योजनेला मूर्त रूप दिले. छत्रसालच्या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. छत्रसालची सैन्य संख्या वाढवून तीस घोडेस्वार आणि ३०० पायदळचे शिपाई इतकी झाली. बलदिवाणची संख्या याच्या दीडपट झाली. दोन्ही मिळून आता लहान लहान मोहिमा करू शकत होते.
छत्रसाल म्हणाले, काका, सर्वात आधी मला घंघेऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्याने क्षत्रिय धर्माचे पालन न करता शरण आलेल्या, ते सुद्धा बुंदेल्यांची मर्यादा, प्रतिष्ठेचे प्रतिक असलेल्या महाराज चंपतरायचा वध केला. काका म्हणाले, मला जेव्हा कळले की, त्या दुष्टाने महाराज चंपतराय आणि देवते समान वहिनीला दाट जंगलात नेऊन मारले. तेव्हापासून माझेही रक्त खळखळत आहे. छत्रसाल म्हणाले, माझा पहिला हल्ला त्यांचे वरच होईल. आतापासून तिसऱ्या दिवशी आपण पूर्ण तयारीशी निघू.
ठरल्याप्रमाणे काका पुतण्याने सहाराकडे कुच केले. छत्रसालने उत्तर उत्तरपूर्वेकडून आणि बल दिवाने दक्षिण पश्चिमेकडून सहाराला घेतले. सहाराच्या सरदाराला आधीच माहिती मिळाली होती की, छत्रसाल आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आक्रमण करण्यासाठी येत आहे. त्यामुळे समझौत्याचा प्रश्नच नव्हता. बाहेरून मदतीची अपेक्षा नव्हती. मूठभर सैन्यांनीशी सरदार कुंवरसेनने झुंज दिली. पण यशस्वी झाला नाही. शेवटी त्याने अधीनता स्वीकारली. दरवर्षी खंडणी कबूल केली. आपल्या मुलीचा विवाह छत्रसालची करून दिला. नववधूसह सर्वजण बिजौरीला आले. देवकुंव आणि जावांनी नववधूचे उत्साहाने स्वागत केले. उत्सवात एक आठवडा गेला.
नवीन नातेसंबंध जोडल्याने एक फायदा झाला. घंघेऱ्याचे सरदार केशरसिंग उत्साहाने छत्रसाला म्हणाले, मी मुलीला माहेर पणासाठी घेऊन सहारला जातो. तिथे सैन्याची जुळवाजुळव करतो. छत्रसाल संमती देत म्हणाले, आपला पुढचा निशाणा सिरोंज. तिथल्या जय पराजयावर पुढचा बेत ठरवू. तसेच विवाहासाठी आलेल्या पाहुण्यांनाही त्यांनी विनंती वजा निवेदन केले, आपापल्या गावी जाऊन सैनिकांची भरती करून सहारात आणावे.
सातव्या दिवशी छत्रसाल, अंगद अंगरक्षसह सहारास रवाना झाले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १४.
छत्रसालना सहाराला येऊन एक महिना झाला. या काळात सैन्य भरती व त्यांना प्रशिक्षण देण्यात व्यस्त होते. याच काळात त्यांचे भाऊबंद लहान मोठ्या सैन्य तुकडीसह पोचले होते. घोडदळ आणि पायदळाची संख्या इतकी झाली की, आता छोट्या राज्यावर आक्रमण करता येईल.
मुहूर्तावर सैन्याने सिरोंज साठी कुच केले. नगारे वाद्याच्या आवाजाने लोकांच्या अंगात विरश्री संचारत होती. या आक्रमणाची सूचना सिरोंजच्या किल्लेदार हाशिमला मिळाली. त्याने राजा आनंदरायशी चर्चा करून उघड्या मैदानावर युद्ध करण्याचे ठरविले. युद्ध सुरू होऊन एक प्रहरही लोटला नाही की शत्रू सैन्याने हार पत्करली. आनंदराय आणि हशिम गढीत शिरून किल्ल्याची दारे लावून घेतले. छत्रसालने युद्ध जिंकले पण आनंदराव आणि हसीन हाती लागले नाही. अंगद म्हणाले, त्यांना मारणे किंवा कैद केले तरच युद्ध जिंकले म्हणता येईल. विचार विमर्श करून सर्वांनुमते असे ठरले की, सध्या सिरोजचा नाद सोडून जवळच आंडेर आणि आणखी दोन तीन ठिकाणे आहेत. तिकडे जाऊन धन वसूल करण्याचा प्रयत्न करू.
दोन दिवसानंतर सैन्य आंडेरला पोहोचले. फारसा प्रतिकार न करता आंडेरच्या सैन्याने शरणा गती पत्करली .तिथे अलोट संपत्ती असलेला जन पटेल नावाचा श्रेष्ठी असल्याचे कळल्यावर, त्याला कैद केले. त्याने मरण पत्करण्यापेक्षा आपले वडिलोपार्जित धन देऊन टाकले .सिरोंजच्या युध्दाची भरपाई झाली. मग छत्रसालने पिपरहटच्या लोकांकडून बुंदेले मुक्ती संग्रामासाठी धन वसूल केले. तिथून ते धौरासागरला गेले. तिथे त्यांचे चांगले स्वागत झाले. धौरासागरचा जहागीर छत्रसालच्या मोहिमेने प्रभावित होऊन सैन्यासह छत्रसालला येऊन मिळाला. सैनिकांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून, दोन महिन्याचा आगाऊ पगार देऊन, दोन महिन्यासाठी घरी पाठवले. छत्रसालची पहिली पत्नी देवकुंवर जावेची प्रसूती असल्यामुळे येऊ शकत नसल्याने रतनशहाने कुंवरसेंनला छत्रसालची दुसरी पत्नी दांनकुवरला चित्रकुटला पाठवून देण्याचा निरोप पाठवला. त्याप्रमाणे दानकुवर चित्रकुटला आली.
एक दिवस छत्रसाला दानकुंवर म्हणाली, आपण उदास दिसताहात. चिंतित स्वरात छत्रसाल म्हणाले, तुम्हा लोकांच्या सुरक्षिततेची काळजी लागली आहे. मोगल माझ्या पाठलागावर आहे. दानकुंवर म्हणाली, तुम्हाला योग्य वाटत असेल तर, युद्धकाळात मला सहारामध्ये ठेवावे. मोगलांचे संबंध अजून पिताजीन बरोबर बिघडलेलं नाहीत. हे एकूण छत्रसाला विचित्र वाटले. हिचे वडील मोगलांशी टक्कर देत असताना, सबंध बिघडले नाही, हे कसे काय? पण त्यांनी विषय वाढवला नाही.
दोन महिन्याची सुट्टी उपभोगून सैन्य परत येऊ लागले. पण सर्व सैनिक परतले नाहीत. सर्व सैनिक येईपर्यंत आणखी दोन महिन्याचा काळ गेला. आता मोहिमेला सुरुवात करायची ठरले .त्यांनी दानकुंवरला तिच्या माहेरी सहारला पाठवून दिल्यामुळे अंतःपुराची काळजी राहिली नाही. छत्रसालने दोन्ही भाऊ, काका बरोबर चर्चा करून फौजदार खलिफावर आक्रमण करायचे ठरविले. त्यांनी आधी पथरिया लुटले. मग सिदगवा जिंकले. चंद्रपूर ताब्यात घेऊन सैन्य म्हैसुरला पोहोचले. तिथला राजा लहान असल्यामुळे राज्यकारभार त्याची आई बघत होती. त्याच्या सेनापती माधवसिंह गुजर पराक्रमी होता. त्याने बुंदेलांचा सामना केला. पण अखेर पराजित झाला. त्याला कैद केले. छत्रसाल एका सैन्य तुकडीसह राजमहालात दाखल झाले. त्यांचा सामना राजमातेशी झाला. तिने विचारले, तुम्ही राजा चंपतरायचे पुत्र छत्रसाल आहात ना? तुम्हाला माहीत होते की, इथला राजा लहान आहे. तरी त्याच्याविरुद्ध तलवार उचलली. हे शोभले का?
छत्रसाल म्हणाले, मातोश्री! तुमचा गैरसमज होतो आहे. मी कोणाचेही राज्य बळकावण्या इतका स्वार्थी नाही. मग त्यांनी आपला उद्देश कथन करून म्हणाले, हे राजे मोगलांचे पाय चाटतात. मला मदत करण्याऐवजी हतोत्साहित करतात. म्हणून मग मला युद्धाचा मार्गावर अवलंबून त्यांना अधीन करावे लागत आहे. ऐकून राजमाता म्हणाल्या, तुमचे विचार चांगले आहेत. पण मी काय समजू? तुम्ही माझ्या राज्यात मला निर्वासित केले. असहाय्य केले.
मातोश्री तुम्ही घाबरू नका. हा छत्रसाल स्त्री आणि गायींचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे. तुमचे राज्य तसेच आबाधीत राहील. फक्त बुंदेलेचे स्वप्न साकार करण्यास मदत करा. छत्रसालने मुलाला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, हे मोठे होऊन या प्रांताचे स्वामी होतील. मातोश्री, तुमचा सेनापती मुक्त करण्यात येत आहे. माझे सैन्य तुमच्या राज्याच्या सीमे बाहेर जाईल. राजमाता म्हणाल्या, बेटा, तू तुझ्या मोहिमेत यशस्वी हो. आमच्याजवळ जेवढे धनराशी आहे त्यातील मोठा भाग तुम्हाला देऊ. शिवाय दरसाल ३००० रुपये नजरांना दिला जाईल. हा माझा मुलगा मोठा झाल्यावर तुमच्या सैन्यात भरती करून घ्या.
छत्रसाल बाहेर पडल्यावर त्यांची वाट बघत असलेले बलदिवाण, रतनशहा, अंगद यांना आत घडलेली सारी हकीगत सांगितल्यावर म्हणाले, तू शत्रूला असे औदार्य दाखवत राहिलास तर, तुझे स्वप्न पूर्ण होईल का? छत्रसाल शांतपणे म्हणाले, आपला धर्म आपण पाळला पाहिजे. प्रत्येक वेळी असे नाही होणार. आता धामौनी जाऊन फौजदार खलिफचा हिशोब पूर्ण करायचा आहे. रतनशहा म्हणाले, त्याच्या मोठ्या सैन्यासमोर आपला निभाव लागणार नाही. आपली आधी आपली ताकद वाढवू. त्यापेक्षा धामौनी जवळच्या आसपासचा प्रांतावर आक्रमण करू. छत्रसाल सहमत झाले पण त्यांच्या मनातली टोचणी कमी झाली नाही.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १५.
काही दिवसांनी छत्रसालचे सैन्य धामौनीच्या जवळपासचा प्रदेश लुटून धन गोळा करून रत्नागिरी जवळ आले. फौजदार खलिफा तिथे आधीच आलेला होता. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. खलिफाचे सैन्य पैशासाठी लढत होते. तर छत्रसालचे सैन्य एका विशिष्ट ध्येयासाठी लढत असल्यामुळे मोगल सैन्याने दुपारी माघार घेतली. त्यांचा सरदार फौजदार खलिफा घोड्यावर बसून पळून गेला. छत्रसालच्या सैन्याने त्याच्या छावणीवर कब्जा मिळवला. बरीच संपत्ती हस्तगत झाली. या विजयामुळे बुंदेली सैन्याचे मनोबल,उत्साह वाढला.
छत्रसाल म्हणाले, आपला पुढचा निशाणा “बांसा”. तिथला जहागीरदार केशवराय दाॅंगी, पराक्रमी योद्धा आहे. त्याचा पराभव झाला तर, आसपासचे लोक प्रतिकार न करता आपल्या झेंड्याखाली येतील. बलदिवाण म्हणाले, केशवराय जबरदस्त योद्धा असून त्याची सेना प्रचंड आहे. शिवाय त्याची मुगल सरदारांशी मैत्री आहे. तेव्हा विचार… काका, आता विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. आपली मोहीम सतत सुरूच राहील.
छत्रसालच्या सैन्याने बासांच्या जवळ छावणी टाकली. मुहूर्त पाहून युद्धाला सुरुवात करायची होती. संध्याकाळच्या सुमानास केशवरायजींचे दोन घोडे स्वारांनी येऊन निरोप सांगितला, त्यांचे म्हणणे युद्धात दोन्हीकडच्या सैन्याची जीवित हानी होण्यापेक्षा आपण दोघे द्वंद युद्ध करू. जो जिंकेल त्याला विजयी मानला जाईल. निरोप ऐकल्यावर त्या दोघांना बाहेर थांबायला सांगून छत्रसालने आपसात विचार विमर्श केल्यावर कोणीच या द्वंदयुध्दाला होकार दिला नाही. पण छत्रसाल म्हणाले, केशवराय दाॅंगीनी सैन्याला आव्हान दिले नसून मला दिले आहे. माझ्या स्वाभिमानाला दिले आहे. मी बुंदेलखंडाच्या स्वाभिमानाचा ध्वज घेऊन निघालो आहे. मी त्याच्याशी द्वंद युद्ध करीनच.
बासांपासून दोन मैल दूर एका मैदानात आखाडा बनवल्या गेला. दोन्ही बाजूंचे सैन्य आखाड्यापासून शंभर यार्ड दूर उभे होते. आखाड्याजवळ एका बाजूने बलदिवाण, अंगद तर दुसरीकडे केशवराय दाॅंगीचा लहान पुत्र विक्रमजीत आपल्या सेनापती बरोबर सैनिकाच्या वेशात उभा होता. केशवराय आणि छत्रसाल आखाड्यात समोरासमोर आले. दोघांनी पंजे मिळवले. दोघांनीही ढाल तलवार काढून वार प्रति वार करू लागले. तलवारबाजीचा अनोखा नमुना पाहायला मिळत होता. शक्ती, स्फूर्ती आणि दक्षतेच्या अद्भुत मेळ पाहायला मिळत होता. दोघेही अगदी रक्तबंबाळ झाले होते. शेवटी छत्रसालच्या वाराने केशवरावांच्या डोक्याचे दोन शकले झाली. त्यांचे सैन्य रागाने बिथरुन युद्धाला सज्ज झाले. दोन्हीकडच्या सैन्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. पण नेतृत्वहीन शत्रू जास्त टिकले नाही. शत्रू सैन्याचा पराभव झाला. बासांच्या गढीवर बुंदेलेचा ध्वज फडकला. अनेक जखमा झालेल्या छत्रसालला गढीत राजमहालात नेण्यात आले. राज वैद्याला बोलावून उपचार सुरू केले. छत्रसाल जखमी झाल्याची माहिती कळल्यावर देवकुंवरने पालखीतून जाऊन उशीर होईल म्हणून लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने घोड्यावर जाणे पसंत केले. तिने आपल्या सोबत आणखी काही मुलींना घोडेस्वार सैनिकाच्या वेषात तयार करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बासांमध्ये पोहोचली. राजमहालाच्या रक्षकांनी छत्रसालच्या दालनात पोहोचवले. छत्रसाल अंथरुणावर पडले होते. जवळ अंगद आणि रतनशहा बसले होते. ती सैनिकी वेशात असल्यामुळे आपल्या मोठ्या दिरांना पाहून संकोचलेली पाहून दोघेही भाऊ बाहेर गेले. देवकुंरने असं जखमी अवस्थेतछत्रसालला अंथरुणात पडलेले पडलेले. पाहिले तिने दार लावून घेतले. आणि पतीच्या छातीवर डोके ठेवून हुंदके देऊन रडू लागली. तिच्या डोक्यावर हात फिरवत छत्रसाल म्हणाले, अगं वेडेऽ, जखमा वीरांचे आभूषण असतात. माझी समजूत काढू नका. मला कळले आहे तुम्ही द्वंदयुद्ध खेळतात. हेच करायचे होते तर एवढे मोठे सैन्य कशाला उभे केले?छत्रसालने तिची समजूत घालून मोठ्या मुश्किलने शांत केले.
रोषाने ती म्हणाली, आता तुम्हाला दोन महिने बाहेर पडू देणार नाही. त्यांचे चेहऱ्यावर असाह्यतेचे भाव होते. देवकुंवरने त्यांच्या सर्व गोष्टीवर मर्यादा घातल्या. ती सतत त्यांचे बरोबरच राहत होती. एक महिन्यानंतर छत्रसाल पूर्ण बरे झाले. देवकुंवरने महाकाळेश्वराला अभिषेक करवला. प्रसादाला, जेवणाला सर्व गाव आणि सैनिक होते. जेवणे समाप्त होता होताच, सहारामधून धाकट्या राणीला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची सूचना आली. देवकुंवने सगळ्यांना मिठाई वाटली. सर्व वातावरण उत्साहाने भरून गेले.
देवकुंवरने कपडे, खेळणी, मिठाई आणि पन्नास हजार रुपयांच्या नजराणे सैनिका बरोबर सहारला पाठवून दिले. आणि लवकरात लवकर पूर्ण सुरक्षित बांसाला यावे असा निरोप दिला. पुत्रप्राप्ती झाल्याने छत्रसाल प्रसन्न होते. त्यांनी जे प्रांत जिंकले होते त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी होती.
एक दिवस तिघेही भाऊ बोलत बसले असता रतनशाह म्हणाले, या द्वंदयुद्धामुळे तुझा दरारा वाढला आहे. तुझी प्रकृती पाहायला बाॅंकेखाॅं आला होता. आम्ही त्याला भेटू दिले नाही. तो म्हणत होता, बुंदेलेंनी सागर पासून दमोहापर्यंत आणि म्हैसूर पासून बांसापर्यंतचा प्रदेश ढवळून काढल्याने, औरंगजेब चिडला आहे. त्याला धामौनीची फिकर आहे. या प्रांतात मोगलांची सर्वात मोठी छावणी आहे. सहेल्ला खानला तिथे फौजदार म्हणून पाठवणार आहे. त्याने चंदेरी, ओरछा आणि दतियाच्या राजांना हुकूम दिला की, बुंदेलां विरुद्ध सहेल्लाखानला मदत करा.
दुसरी बातमी अशी आहे की, ओरछाचे राजा सुजानसिंहाचा स्वर्गवास झाला. त्यांचा धाकटा भाऊ इंद्रमणी राजा झाला. तो मोगलांच्या जी हुजरीत लागला आहे. छत्रसाल म्हणाले, सरळ धामौनीवर आक्रमण करणे जोखीमची आहे. प्रथम जवळपासचे प्रांतातील खजिना, शस्त्रे लुटावीत. आपली शक्ती वाढवून, संधी साधून धामौनीवर आक्रमण करू. तेवढ्याच शिपायाने वार्ता सांगितली की दानकुंवर आपल्या बाळांसह येत आहे.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.


