
सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग -३१.
छत्रसालांनी घोषणा केली, बाजीराव पेशव्यांनी वेळेवर येऊन मदत केल्यामुळे, आम्ही आज विजयाच्या जवळ उभे आहोत. त्यांना मी मानस पुत्र मानला आहे. त्यांना राज्याचा एक तृतीयांश भाग आणि सध्या असलेली नगदी संपत्तीचा एक तृतीयांश भाग प्रदान करीत आहे. बाजीराव म्हणाले, राजासाहेब तुमच्या या औदर्याबद्दल आभारी आहे. पण माझी एक इच्छा आहे. सांगा.. निःसंकोचपणे सांगा… बाजीराव म्हणाले, नर्तकी मस्तानी आमच्या राज्यात नृत्य संगीताच्या विकासात सहाय्यक व्हावी.
छत्रसाल आश्चर्यचकित झाले. त्यांना या मागणीची अपेक्षा नव्हती. मस्तानीवर त्यांचा अधिकार नव्हता. त्यांनी मस्तानी व तिच्या आई-वडिलांना बाजूला घेऊन पेशवे बाजीरावांची इच्छा सांगितली. हमरा संकोचून म्हणाली, आम्ही आपल्या आश्रयाला आहोत. जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तुमचा हुकूम आम्हाला मान्य आहे. मस्तानी मात्र या प्रस्तावाने अतिशय आनंदीत झाली.तिची मनमुराद अशी पूर्ण झाली. तिने मनोमन देवाचे आभार मानले. छत्रसाल म्हणाले, ठीक आहे. तुम्ही तिघे आणि वाद्य वृंदासह पेशव्यांच्या आश्रयाला जा. ते नेण्याची तुमची व्यवस्था करतील.
बाजीरावांनी कृतज्ञता व्यक्त करून छसालांना म्हणाले, आपण माझा मान राखला. हे मी नेहमीच लक्षात ठेवीन. मस्तानी व तिच्याबरोबरच्या लोकांना कधी पश्चाताप होणार नाही. उलट माझ्या आश्रयाला त्यांच्या मानसन्मानच वाढेल. याचा मी प्रयत्न करीन .
पेशवे निघून गेल्यावर, छत्रसालांनी स्वबळावर बंगषचा सामना करायचा होता. आणि बंगषची जैनपूरच्या बंद किल्ल्यात पिंजऱ्यात अडकलेल्या उंदरासारखी परिस्थिती झाली होती. छत्रसालांनी किल्ल्याभोवती कडक वेडा घातला. थोड्याच दिवसात किल्ल्यात हाहाःकार माजला. त्याचे सैनिक तहान भुकेने तडपडू लागले. शेवटी किल्लेदार खिलजी खान बंगषला म्हणाला, हुजूर, रसद संपली. घोडे, उंटे, खेचर मारून सैनिक आपली भूक भागवत आहे. विहिरीत पाणी नाही. असे किती दिवस चालणार?
निराशेने बंगष म्हणाला, मलाही सर्व दिसते. या स्थितीत आपण युद्ध करू शकत नाही. बादशहाला इतके निरोप पाठवून तो मदत पाठवत नाही. कसे पाठवतील? माझ्या कानावर आले आहे की, आपण जर बुंदेलखंडाचे युद्ध जिंकले तर,त्यांच्या सिंहासनाला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे त्याचे कान भरल्या जात आहे. म्हणून बादशहाची मदत येत नाहीय!
खिलजीखान म्हणाला, काहीतरी निर्णय तात्काळ घ्यावा लागेल. आपल्या शिपायांच्या तलवारी आपल्याकडे वळण्याआधी, शेवटची का होईना आरपारची लढाई का नाही करत ?
बंगष म्हणाला, कशासाठी लढाईचे? त्या कृतघ्न बादशहासाठी? आता रक्ताचा एक थेंबही सांडणार नाही. मी छत्रसालशी तह करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही छत्रसालशी तह करणार?
होय! छत्रसाल बहादूर आणि बेजोड योद्धा आहे. आपल्या मातृभूमीसाठी बलदान करण्याची त्याची भावना आहे. अशा उच्च कोटी विचारांच्या, स्वतंत्र धाडशी राजाशी तह करण्यात मला अभिमान वाटेल. दुसऱ्या दिवशी एका विश्वासू सरदाराला शांती आणि तहाच्या पांढऱ्या निशाणासह दोरीच्या सहाय्याने खाली सोडले. सोबत छत्रसाला साठी पत्र होते. त्यात बंगषने आपल्या दोन अटीवर तह करायला तयार असल्याचे सांगितले. एक… त्याला व त्याच्या सैन्याला जैतपूरच्या किल्ल्यातून सुखरूप निघून जाऊ द्यावे. आश्वासन देतो की, पुन्हा कधी तो बुंदेलखंडावर आक्रमण करणार नाही. दोन… दिल्लीला कर देणारे राजा म्हणून बुंदेलखंडाने राहावे.
छत्रसाल गेली नऊ वर्षे बंगषशी संघर्ष करीत होते. त्यांनाही युद्ध समाप्ती हवीच होती. बंगष पुन्हा बुंदेलखंडावर आक्रमण करणार नाही, ही सन्मान जनक अट होती. दुसरी… कर देणारे राज्य म्हणून राजे म्हणून राहणे. या अटीला ते फारसे महत्त्व देणार नव्हते. त्यांनी त्याच सरदाराबरोबर संधी प्रस्ताव स्वीकृत असल्याचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बंगषने किल्ला सोडावा, असा निरोप दिला.
बंगषने दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबर १७२९ मध्ये किल्ला सोडून कसवी जवळची यमुना पार करून अलाहाबादला गेला. तो दिलेल्या शब्दाला जागला होता.
छत्रसाल निश्चित झाले. पुढच्या एक महिन्यात जैतपुरच्या किल्ल्यात बुंदेले पुन्हा राहू लागले. तिथली सगळी व्यवस्था करून आपल्या परिवारासह छत्रसाल राजधानी पन्नाला परतले. बंगष बरोबर सतत नऊ वर्ष युद्धात गुंतल्यामुळे राज्यात निष्क्रियता, अव्यवस्था झाली होती. युद्ध समाप्तीनंतर छत्रसालांनी राजधानीची नीट घडी बसवली.
आणि एक दिवस दरबार भरवला. दरबार भरल्यावर काही मान्यवरांनी छत्रसालांचा सत्कार केला. त्यानंतर छत्रसाल उभे राहून बोलायला सुरुवात केली…. आपण सर्वांनी दीर्घकाळ संघर्ष करून आज बुंदेलखंडाचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. आज ते पूर्णपणे सुरक्षित आहे. आता आपण सर्वांनी प्रेमाने, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे. सुख, शांतीने राहून राज्याचा विस्तार करावा.ही आपली प्राथमिकता आहे.
बुंदेल केसरी महाराज छत्रसाल की जय.. च्या घोषाने दरबार दणाणून गेला.
तसेच सर्वांसमोर एक घोषणा केलेली आहेच. ती आपणा सर्वांना सांगू इच्छित आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी बंगषच्या विरुद्ध सर्वतोपरी आपली मदत केली, त्याची भरपाई म्हणून राज्याचा एक तृतीयांश भाग, काल्पी, हट्टा, सागर, झाशी, सिरोंज, कौच गढाकोटा आणि हिरदे नगरची जहागिरी त्यांच्या नावाने करत आहे. तसेच सध्या असलेल्या एक करोड संपत्तीतील एक तृतीयांश भाग त्यांना प्रदान करीत आहे. कोणीच काही हरकत, प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
आमच्या सुनबाई जैतकुंवरने प्राणाची बाजी लावून बंगष सारख्या बलाढ्य शत्रूच्या घेऱ्यातून आपल्या पतीचे प्राण वाचवले. त्यांना बक्षीस म्हणून जलालपूर आणि दरसैडाचे परगाणे प्रदान करीत आहोत.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
अंतिम भाग – ३२.
राणी जैतकुंवरीच्या जयघोषाने दरबार दुमदुमुन गेला. तिने पुढे होऊन, महाराज छत्रसालांना साष्टांग नमस्कार घातला. आशीर्वाद देत म्हणाले, तुमच्या पराक्रम ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. तुमच्या प्रेरणेने बुंदेलखंडातील स्त्रियांच्या बांगड्यांमध्ये तलवारीचा झंकार उत्पन्न करतील.
छत्रसालाने आणखी एक घोषणा केली. बघेल खंडाशी संबंध मजबूत करायच्या दृष्टीने राजकुमार जगतराजचा विवाह बघेल खंडाच्या राजकुमारीशी करण्याचे ठरविले आहे. पुढच्या काही दिवसात हा विवाह संपन्न होईल.
जगत राजचा चेहरा राजेने लाल झाला. थोड्या वेळाने म्हणाला, मी आपल्याला विनंती केली होती, आपल्या जीवनातील प्रसंग आपल्या हाताने लिहून मला द्यावे. आपले व्यक्तिमत्व आणि कृतीत्वाचे प्रामाणिक लेखन येणाऱ्या पिढीमध्ये उद्बधक ठरतील.
छत्रसाल म्हणाले, आहे माझ्या लक्षात. शिवाजी महाराजांच्या भेटीपासून आतापर्यंतचा सर्व घटना क्रमवार पत्र रूपाने लिहून तुला पाठवीन. त्यासाठी मला एकांताची गरज आहे. ती मला आपल्या मऊसहानीयामध्ये मिळेल. माझ्या उद्देशा पूर्तीची सुरूवात याच ठिकाणापासून केली होती.
नंतर छत्रसालांनी पुन्हा एक घोषणा केली. जगतराज आणि हिरदेशाचा पराक्रम आणि रण कौशल्य आपण सर्वांनी पाहिलेच आहे. बुंदेलखंड सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने आणि योग्य देखरेख ठेवण्यासाठी त्यांना त्यांचे अधिकार ठरवून द्यायचेत. पन्ना, कलींजर मऊ, येरच आणि धामौनीचा प्रदेश हिरदेशच्या अधिकारात आणि जतपूर, अजयगड चरखारी, भुरागड आणि बांदाचा प्रदेश जगतराजला देण्यात येईल. हे दोघे भाऊ त्यांचे भाऊ पदमसिंह, भारतीचंद्र यांची मदत घेऊन माझ्या नावाने शासन चालवतील.
दोन्ही भावांनी मान झुकून संमती दिली. राजधानी पन्ना हिरदेशहा कडे राहील. जगत राजने विरोध केला नाही. कारण शासन व्यवस्था महाराज छत्रसालांच्या नावाने चालवले जाणार होते. दरबार बरखास्त झाल्याची घोषणा झाली.
काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे, महाराज छत्रसाल मऊसहायनियाला पोहोचले. आधी रयत, मग राजा या सिद्धांतावर शासन व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे रयतेतील भांडणे कमी झाले, द्वेषाएवजी मैत्री वाढीला लागली. परस्पर प्रेमभावनेत समृद्धी झाली. महाराजांनी जी आदर्श मूल्य ठरवून दिली त्यावर जनता आणि अधिकारी चालत होते. योग्य बंदोबस्तासाठी काही नवीन परगाणे बनविले. ओरछा, दतिया चंदेरीच्या प्रमुखांना बोलावून, मिळून मिसळून वागण्यास सांगितले.
महाराज छत्रसाल मऊसहायनिया मध्ये असले तरी त्यांचे लक्ष संपूर्ण बुंदेलखंडावर होते.
कधी कधी ते जुन्या आठवणीतून हरवून जात. कधी वडील चंपत रायची आठवण येत असे. ज्यांनी आयुष्यभर मोगलांच्या तलवारी आपल्या छातीवर झेलल्यात. पण कधी त्याच्यापुढे मान झुकवली नाही. कधी छत्रपती शिवरायांच्या चेहरा आठवे. ज्यांनी मोगलांच्या नकाशावर आपल्या तलवारीच्या टोकाने राज्याच्या सीमा रेखाटल्या. मग आठवायचे समर्थ रामदास. स्वामींचा आशीर्वाद घेऊन ते पुढे निघाले, ते मागे वळून बघितलेच नाही.
ते लहान होते. पण त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांनी सतत त्यांचा उत्साह वाढवत साथ देत राहिले. कधी त्यांच्या मनातही आले नाही की, आपण मोठे असून धाकट्या भावाच्या मनाप्रमाणे वागतोय. मग आठवले, पत्नी देवकुवरी. साथीने चालताना कधी डळमळली नाही की, कधी तक्रार केली नाही.
गेल्या साठ वर्षाच्या आयुष्यात एकही दिवस असा गेला नाही की, युध्दाचा विचार केला नव्हता. रक्ताच्या शाईने लिहिलेला इतिहास त्यांच्या नजरेसमोरून सरकत होता. आणि इतके घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. उगवला सूर्य स्वतंत्र बुंदेलखंडाचा.
संध्याकाळची वेळ होती. हिरदेशाह सोबत होता. त्याला त्यांनी एक रहस्य सांगितले. मी ९०० करोड रुपये बचत करून, माझ्या शयन कक्षात असलेल्या पलंग खाली तळघर आहे तिथे ठेवले आहे. जेव्हा बुंदेलखंड राज्यावर संकट येईल, तेव्हा या पैशाचा उपयोग कर. त्याच्या हाती किल्ली सोपवली. जणू बुंदेलखंडाचे नेतृत्व त्याला सोपवले.
तेवढ्यात जगतराज आला. दोन्ही मुलांबरोबर महाराज छत्रसाल राजोद्यानात गेले. मग जीवनाचा गहन अर्थ विशद करून गीतेत लिहिलेला श्र्लोक विशद केला….
“वासांसि जीर्णानि यथा विहाय।
नवती गृहाती नरोऽपराणी ।
तथा शरीराणि विहाय।
जीर्णान्यन्यानि संयती नवनि देही।।”
मनुष्य जसे जुने कपडे टाकून नवीन वस्त्र धारण करतो, तसेच आत्मा जुना देह सोडून नवीन देह धारण करतो. सृष्टी याच क्रमाने चालते. आणि पुढेही चालत राहील.
हिरदेशाह म्हणाला, बाबा, आज आपण असे का बोलत आहात? छत्रसाल म्हणाले, एक स्वतंत्र बुंदेलखंडाचे राज्य स्थापन करायचे स्वप्न साकार झाले. त्याच्या रक्षणाची व समृद्धीची जबाबदारी तुम्हा दोघांवर सोपवून मी मुक्त झालो. मला खूप लांब जायचे आहे. कोणी माझी प्रतीक्षा करत आहे. तुम्ही येथेच थांबा.
ते बागेतून पुढे… पुढे… जात राहिले. एकटे पुढे… आणखी पुढे… आणखी पुढे….
सूर्यास्त झाला. तरी दोघे भाऊ तिथेच थांबले होते. खूप वेळ झाला तरी बाबा परत आले नाही म्हणून शोधा शोध सुरू केली. कुठे शोध लागला नाही. म्हणून दोघेही गेल्या दिशेने निघाले. तर त्यांना गुलाबाच्या झुडपामध्ये त्यांचा अंगरखा दिसला. त्यांचे बोलणे आठवले. मग बाबा जुने वस्त्र टाकून गेले की काय? नवीन वस्त्र धारण करण्यासाठी… हे महाराजांचे का महाप्रयाण समजायचे का? महापुरुषाचे जन्म, जीवित आणि अंत सगळेच वेगळे असते.
जा… बाबा… जा… पुन्हा परत या… त्याच तेजो वयालयाने, त्याच वैभवाने… त्याच ऐश्वर्याने… आपल्या या बुंदेलखंडात…. आपल्या लोकात…
दोघा भावांनी अश्रू भरल्या नेत्रांनी दोन्ही हात आकाशाकडे करून जोडले…
अशा या महान राजा छत्रसालांना कोटी कोटी प्रणाम!!
!!! समाप्त !!!
संकलन,लेखन व ©® मिनिक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.

