राजा छत्रसाल चरित्र भाग २, (६ ते १०)

सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! राजा छत्रसाल म.!!!  

भाग – ६.

              काका म्हणाले, छत्रा, ही वेळ योग्य नाही. बलाढ्य  मुगल सैन्यासमोर आपण मूठभर लोक काहीच करू शकणार नाही. मोगल आपल्याला चिरडून टाकेल. औरंगजेब किती खुनशी आहे हे तुला माहित आहे. तू जिकडे जाशील तिकडे, त्याचा कोणता न कोणता सुभेदार आडवा येईल. छत्रसाल म्हणाले, मग मी काय करू काका? मला मोगलांचा अत्याचार पाहावल्या जात नाही. त्यांचे सुभेदार बादशहासारखे हुकूम सोडतात. मन मानेल तसा दंड वसूल करतात. खोटे आरोपाखाली लोकांना तुरुंगात पाठवतात. स्त्रियांची विटंबना करतात. या सर्व मुळे माझे रक्त सळसळते. मी परिणामाची पर्वा न करता मोहिम सुरू करणार आहे. काका म्हणाले, छत्रा, तुझ्या वेदना मला समजतात. तुझ्या मोहिमेला माझा पूर्ण पाठिंबा आहे, पण योग्य संधीची वाट पहा. या अवधीत आपली ताकद वाढव. उत्साहाच्या भरात राज्य वाढवणे किंवा मिळवणे होत नसते. त्यासाठी मोठ्या सैन्याची आहे आवश्यकता असावी लागते. त्यासाठी अजून बरच काही करावे लागेल .आता तू तर तू पहिले पाऊल ठेवले आहे. तुला मी हतोत्साहित  करत नाही. चुकीचा समज करून घेऊ नकोस.

              काका म्हणाले, आता मी काय सांगतो ते शांतपणे ऐक! तुम्ही मोगल सैन्यात भरती व्हा. छत्रसाल ओरडून म्हणाला, कायऽऽ? काय म्हणता काका? तुमच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर….? ज्या मोगलांच्या पायाखाली जनता  चिरडली जात आहे, त्यांचेच पाय चेपायला मला सांगता? काका म्हणाले, आधी मी काय म्हणतो ते समजून घ्या.

         आपल्याजवळ संघटन नाही. पुरेसा पैसा नाही. मोगलांना टक्कर देणे इतपत सैन्य नाही. अशा परिस्थितीत बंड उभारले तर, मोगल चुटकेसरशी चिरडून टाकेल. अशावेळी कोणीही आपली मदत करणार नाही. आपले सर्व राजे महाराजे मोगलांच्या चाकरीत आहे. मोघलांच्या आधीन राहूनच त्यांनी आपले राज्य वाचवले आहे. अधून मधून त्यांना दरबारात हजेरी लावून अपमान सहन करावा लागतो. पगडी भेट करावी लागते. म्हणूनच आपल्याला योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल. आपली वेळ नक्की येईल. तुम्हाला कोणत्याही मुगल सरदाराच्या हाताखाली काम करायला सांगत नाही. तुम्हाला मी मिर्झाराजे जयसिंग कडे घेऊन जाईल. त्यांचे बरोबर राहून मोगलाची शक्ती, युद्ध कलेची माहिती करून घ्यायची आहे. त्यांचे बरोबर असल्याने मोगलांचे लक्ष तुमच्याकडे जाणार नाही. तुमच्याबरोबर मी सुद्धा त्यांच्या सैन्यात राहील. त्यामुळे तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेता येईल. मोठ्या मुश्किलने काका जाम शाहाने आपला बेत त्यांच्या गळी उतरवला. रतनशहा म्हणाले, तुम्ही दोघे काका म्हणतात त्याप्रमाणे जा. मी येथे राहून बुंदेल्याना विश्वासात घेऊन समजावून सांगावे लागेल की, अंगद, छत्रसाल आणि काका जयसिंगच्या सैन्यात का भरती झाले? त्यांना जागृत करणे, एका छत्राखाली एकत्रित आणणे, सैन्य उभारणी करणे आणि कोष भरणे यासाठी आपल्यापैकी एकाला बुंदेलखंडात पाय रोवून उभे राहावे लागेल. रतनशहाचे म्हणणे सगळ्यांना पटले.

               रतनशहा म्हणाले, काका, तुमच्याबरोबर चार-पाच सैनिकांना सुद्धा भरती करून घ्या. ते आपल्याला गोपनीय बातम्या देण्या घेण्याचे काम करतील. अंगदने विचारले आपले कुटुंब? त्यांनाही बरोबर घ्या. आपण कधी परत येऊ माहित नाही.

           सगळ्यांनी यात्रेची तयारी सुरू केली. सातव्या दिवशी एका लहानशा तांड्याच्या रूपात हे बुंदेले कुटुंब देवगडावरून रवाना झाले.

         मिर्झाराजे जयसिंग हे अमेरचे राजा. त्याकाळी राजस्थानातील लहान-मोठे राजे मोगलांच्या अधिपत्याखाली होते. राजपुतांच्या शौर्याचा सूर्य अस्त पावला होता. एखाद्याने मोगलाविरुद्ध उठाव केलाच तर हिंदू त्यांना मदत करीत नव्हते. पण बादशहाच्या आज्ञाने पारिपात्य मात्र करीत असे. दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बंडाचा उठाव केला होता, तेव्हा त्यांचा  बिमोड करायला याच मिर्झाराजाला औरंगजेबने पाठवले होते.

           १६६१ च्या सुरुवातीला मिर्झाराजे दक्षिणेकडे निघाले असून त्यांच्या झाशीला मुक्काम असल्याचे कळले. तेव्हा ही संधी आहे हे जाणून, जामशहा, अंगद व छत्रसाला घेऊन जयसिंगना भेटायला त्यांच्या छावणीत गेले. पाच दिवसांनी  भेटीची परवानगी मिळाल्याचे अंगदने येऊन सांगीतले. संध्याकाळी दोघे भाऊ काकांबरोबर सशस्त्र सैनिकाच्या घेर्‍यात राजासमोर पोहोचले. तिघांनीही त्यांना नमस्कार केला. जयसिंग म्हणाले, तर तुम्ही पराक्रमी चंपतरायचे पुत्र आहात? म्हणाले, चंपतराय पराक्रमी होते. पण ते माझ्या मार्गाने न येता त्यांनी धोक्याने भरलेला वेगळा मार्ग पत्करला आणि धोक्यातच संपले. निदान त्यांची मुले माझ्या मार्गावर चालायला तयार आहे ते पाहून आनंद वाटला. अंगदचा चेहरा रागाने लाल झाला. छत्रसालांनी स्वतःला कसेबसे आवरले. जाम शहांना देखील खटकले .पण स्वतःला सावरुन म्हणाले, सध्या तरी आपण आमचे अग्रणी आहात. आम्ही कुठे जाणार?

                मिर्झाराजे म्हणाले, आम्हाला पराक्रमी शिपायांची गरज आहे. सध्या मी दक्षिणेत शिवाजी भोसल्यांशी युद्ध करायला जात आहे. बादशहाने आमच्यावर दोन कामे सोपवली आहे. एक म्हणजे, पुरंदरला वेढा घालणे व दुसरे म्हणजे देवगडवर आक्रमण. ही तुमची परीक्षेची वेळ आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही आपले पराक्रम करून यश मिळवून दिले तर, तुम्हाला पद देण्याबद्दल बादशहाकडे शिफारस करीन. बादशहा माझा शब्द डावलणार नाही. खात्री आहे.

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

               भाग – ७.

             काका सहित दोघे पुतणे राजे जयसांगच्या सैन्यात भरती झाले. त्यांना घोडे, पोशाख, शस्त्रे, राहण्यास राहूट्या दिल्या गेल्या. जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारी छत्रसालची पत्नी देवकुंवरने घेतली.

          रात्री एकांतात देवकुंवरने पतीला विचारले, स्वामीऽ, या मोहिमेत तुम्ही खुश आहात? म्हणाले, मिर्झाराजे मोगलांच्या आधिन आहेत. त्यांच्या सैन्यात भरती होणे जरा विचित्र वाटते. लग्ना आधीपासून मी आपल्या स्वाभिमान, शौर्याबद्दल ऐकले होते. छत्रसाल म्हणाले, माझ्या मनात नव्हते पण संपूर्ण हिंदुस्तानवर मोगलांचे राज्य आहे. आपल्याजवळ ना सैन्य, ना पुरेसा पैसा.. अशा परिस्थितीत त्यांच्याशी दोन हात कसे करणार? ती म्हणाली, नंतर पश्चातापाची पाळी येऊ नये म्हणून बोलले. पश्चाताप तर आताही होत आहे. पण काकांच्या म्हणण्यानुसार यातूनही काही मार्ग निघेलच.

       पण स्वामी ही मोहिम, देशभक्ती आणि हिंदू बद्दल अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांविरुद्ध आहे. तुम्ही तिघेही पराक्रमात कमी नाही. जर शिवाजी महाराजांचा पराभव झाला तर, देशात स्वातंत्र्याचे पुनर्जीवन होण्याच्या शक्यताच नष्ट होईल. प्रिये! सध्यातरी दुसरा मार्ग नाही. छत्रसालाचे हृदय पत्नी बरोबर होते. बुद्धिमात्र मोगलांच्या ध्येयाकडे!  देवकुंवरी! सध्या आम्ही कमकुवत आहोत. पाया मजबूत करण्यासाठी काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. हा सगळा देखावा असेल. ती म्हणाली तुम्ही जे काही कराल ते बुंदेल आणि क्षत्रिय धर्माचा हितासाठी व रक्षणासाठीच कराल. मी कायम  तुमच्याबरोबर असावे  ही इच्छा आहे. बघू कसे जमते ते.

          काका, दोघे पुतण्यांना दिलेरखानाच्या तुकडीत सामील केले .मजल दर मदर करत सैन्य पुरंदरच्या किल्ल्याजवळ पोहोचले. मिर्झाराजांनी सैन्याची तीन भाग केले. मुख्य दारावर स्वतः दिलेल खान होता. त्याच्याबरोबर काही पराक्रमी योध्दे व हे तिघे होते.

               मुरारबाजी देशपांडे सारखा धाडसी योध्दा पुरंदरेचा  किल्लेदार होते. त्यांना शत्रूची चाहूल लागल्यावर, मुरारबाजींनी किल्ल्याची चांगलीच नाकेबंदी केली. दिलेरने बरेच प्रयत्न करूनही पुरंदर दाद देत नाहीसे पाहून, राजे जयसिंगाच्या अनुमतीने आक्रमण करण्याचे ठरविले. या तुकडीत युरोपचा गोलंदाज मनुची होता. त्याने पुरंदरावर तोफा डागल्या. हळूहळू नाकेबंदी ढासळू लागलेली पाहताच नाईलाजाने मराठी सैन्याला बाहेर यावे लागले. घनघोर युद्ध झाले. छत्रसालने आपल्या अतुल पराक्रमाने मराठी सैन्यात घाबराहट पसरवली. काही सैन्य पळून गेले. एकटे मुरारबाजी काय करणार होते? अनेक शूर सरदार धारातीर्थी पडले होते. शिवाजी महाराजांना कळले तेव्हा, पराभवाचा कलंक लावून घेण्यापेक्षा,  राजेंनी जयसिंगाकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. जयसिंगने अट घातली, मोगलांची जिंकलेले सगळे किल्ले परत करावे. अखेर शिवाजी राजांनी २३ किल्ले देण्याचे कबूल केले. शिवाय बादशहाची दुसरी अट होती, शिवाजींनी त्याला राजधानीत घेऊन भेटावे. मुलगा संभाजींना दरबारात पेश करावे. त्याप्रमाणे दोघेही पिता पुत्र राजधानीकडे निघाले….

        राजा जयसिंगाच्या शिफारनुसार छत्रसाल, अंगद आणि काकांना मनसबी दिल्या गेल्या. आता देवगडावर आक्रमण करण्याची दुसरी मोहीम बाकी होती. जयसिंगने या मोहिमेसाठी या तिघांना पुन्हा दिलेरखानच्या तुकडीत दिले.

        एक दिवस छत्रसाल व अंगद तंबूत बसले असताना, काकाजींनी बातमी आणली, बऱ्हाणपूर मध्ये राजा जयसिंगचा मृत्यू झाला. असेही ऐकण्यात आले की, बादशहाने आपला पुत्र  मुअज्जमला बऱ्हाणपूरचा सुभेदार नियुक्त केले आहे. आपल्याबद्दल कोणता निर्णय घेतला जाईल माहित नाही. छत्रसाल निराशेने म्हणाले, एक आशा होती की पुढे मागे राजे साहेबांना विनंती करून दिलेरच्या हाताखाली काम करण्यापासून मुक्ती मिळवू. पण…

        काका म्हणाले, छत्रा निराश होऊन चालणार नाही. देवगडच्या आक्रमात जर आपल्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.

       मजल दर मजल करत मोगल सैन्य देवगडाजवळ पोहोचले. किल्ला जास्त मजबूत नव्हता. पण गौड राज्याचे सैन्य पराक्रमी होते. ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची होती. आघाडीला होते छत्रसाल, अंगद आणि जामशाह. दोन्हीकडच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. दुपारपर्यंत राजा गौडचे सैन्य डळमळू लागले. छत्रसालने पराक्रमाची शर्थ केली. त्यांनी पाच सैनिकांसह किल्ल्याच्या बुरुजावर मोगलांचा ध्वज फडकवला. किल्ल्यावर मोगली ध्वज पाहून गौड सैन्य हिम्मत हरून पळू लागले. युद्ध समाप्त झाले. सैनिक आपापल्या तंबूत परतले.

       छत्रसाल बरेच जखमी झाले होते. व्याकूळ पत्नी देवकुवर पतीच्या सुश्रुषाला लागली. दुसऱ्या दिवशी छावणीत विजयोत्सव साजरा झाला. त्यात दिलेरखानचा जयजयकार झाला. पण आपल्या तंबूत मृत्यूशीत झुंज देत असलेल्या छत्रसालचे नावही नव्हते.

           तंबुत छत्रसाल विचार करू लागले… जवळच पत्नी देवकुवर होती.  तिला म्हणाले, आपण काय मिळवलं? काहीच नाही. उलट सगळं घालवलच. स्वतःचा धिक्कार वाटत आहे. मोगलांच्या बाजूने लढलो. कुणाविरुद्ध तर शिवाजींसारख्या खर्‍या देशभक्ताशी. त्या महान व्यक्तीशी, ज्याने आपले सर्वस्व पणाला लावून शहंशाह औरंगजेबाला आव्हान दिले.  देवगडच्या भोळ्या भाबड्या गौंडावर आक्रमण केले. त्यांच्याच देशात त्यांना पददलित केले. या अक्षम्य अपराधाचे प्रायचित्त कसे होऊ शकेल? देवकुंवर  शांतवन करीत म्हणाली, भूतकाळाचे स्वागत करायचे नसते. एका नवीन पहाटेची वाट धरायची असते. जास्त काळजी करू नका.  स्वथ पडून झोपण्याचा प्रयत्न करा.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

               भाग – ८.

              जामशहा आणि अंगदही जखमी झाले होते. पण त्यांच्या जखमा जास्त खोल नसल्यामुळे दोघेही लवकर बरे झाले. छत्रसालना मात्र दुरुस्त व्हायला दोन महिने लागले.

           एके दिवशी संध्याकाळी अंगद आणि काका जामशहा छत्रसालच्या छावणीत आले. आणि बातमी सांगितली, पुरंदरच्या लढाईनंतर बादशहाने शिवाजी महाराज व मुलगा संभाजीला भेटायला राजधानी आग्र्याला बोलावले. आणि तिथे त्यांना कैद केले. पण वाघाला किती दिवस डांबून ठेवणार? तिथून दोघेही निसटले. सध्या पुण्यात ते सुरक्षित आहेत.

         दुसरी बातमी आहे, शहजादा मुअज्जम आणि दिलेरखान मध्ये देवगडच्या लढाई वरून खूप भांडण झाले. देवगडच्या विजयाचे श्रेय बादशहाला पाठवलेल्या पत्रात स्वतःचे पाठवले. शहजादाचे नाव सुद्धा घातले नाही. मुअज्जाच्या भीतीने दिलेरखान माळव्याकडे पळून गेला. बादशहाने दिलेल्या आश्वासनामुळे तो परत आला. याचा अर्थ आपल्याला दिलेरखानाच्या सैन्यात राहावे लागेल. होय! सध्या तरी असेच दिसते.

         छत्रसाल म्हणाले, काका, माझे इथे मन लागत नाही. विनंती करत म्हणाले, चला आपल्या मातृभूमीकडे जाऊ. छत्रा, हे इतके सोपे नाही.  आपण फक्त दिलेरखानाच्या अनुमतीनेच जाऊ शकू. आणि तो आपल्यासारख्या पराक्रमी वीरांना सोडणार नाही. याचा अर्थ आपल्याला मोगलांच्या बाजूनेच लढावे लागेल. उदास छत्रसालने जामशाकडे पाहिले. पण त्यांची नजर मिळवण्याचे धैर्य नव्हते.

     छत्रसालच्या जखमा भरून ते पूर्णपणे बरे झाले होते. दररोज व्यायाम शस्त्राचा सराव, स्वाध्याय करीत होते. युद्धाचे संकट नसल्यामुळे अंगद आणि जामशाहानी आपले कुटुंब  बोलावून घेतले. तिन्ही कुटुंबे सलोख्याने राहत होते. छावणीपासून जवळ असलेल्या गावात राहण्यासाठी मोठा तंबू घातला होता.

           छत्रसालने ३० सैनिक आणि घोडेस्वरांचे लहानसे सैनिक पथक तयार केले होते. ते सगळे सैनिक छत्रसालशी प्रामाणिक, एकनिष्ठ होते.

            छत्रसाल शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवत होते. त्यांनी सुरत लुटून खूप संपत्ती मिळवली. दिंडोरी मध्ये मुगलांशी सामना झाला. घनघोर युद्ध झाले. कारंजा हस्तगत केला. पुढे बाळगण भागातील अहिवंत, साल्हेर आणि कारकंडाचे किल्ले जिंकले. लूटमार करत आपला खजिना वाढवत साताऱ्याकडे गेले. त्यांचा उद्दमपणा आणि विजय मोहिमेने औरंगजेब अतिशय संतापला. त्याने मराठ्यावर दबाव आणण्यासाठी मोहिमेची योजना आखली. सूत्रधार दिलेरखानाला ठरवले. बादशहाने त्याच्या अधिनस्त असलेल्या अमरसिंग, चंदावत वगैरे राजपूत सरदारांना दिलेरखानला मदत करण्यासाठी दक्षिणेकडे कुच करण्याचा आदेश दिला. काही करून शिवाजींना धडा शिकवायचा होता. आता त्यांना लवकरच या मोहिमेत सामील व्हावे लागणार होते.

        दिलेरखान ससैन्य दक्षिणेकडे निघाला. या मोहिमेत छत्रसाल, अंगद व काकांना सामील केले. छत्रसालने आपली लहानशी सैन्य तुकडी बरोबर घेतली होती. दिलेरखानने दक्षिणेत बरेच आत गेल्यावर मुक्काम केला. हा मुक्काम बराच लांबला. या मुक्कामामुळे छत्रसाल अगदी कंटाळून गेले. त्यांचे मन बुद्धी आणि शरीर सुद्धा सुस्त झाले होते. एके दिवशी देवकुवरच्या सल्ल्यानुसार दिलेरखान्याला विचारून शिकारीचा बेत केला. पतीचा एकटेपणा जाईल म्हणून एकीकडे तिला आनंद झाला, तर पती शिकारीला जाणार परत येण्याची अनिश्चितता असल्यामुळे ती उदास झाली. त्यांनी तिला, स्वतः व स्वतःची सैनिक तुकडी सैन्य तुकडे बरोबर नेण्याची परवानगी दिलेरखानाकडून मिळवली. पण त्याने तीन आठवड्याची मुदत दिली. या मुदतीत किंवा मधेच युद्धावर जायचे काम पडले तर तुम्हाला परत यावे लागेल. छत्रसाल कबूल झाले. ही आनंद वार्ता अंगद आणि काकाला सांगून शिकारीला सहकुटुंब जाण्याची तयारी करायला सांगितलं.

       छत्रसाल म्हणाले, आपण शिकारीच्या निमित्याने एकदा मोगल छावणी सोडली की परत येणार नाही. जामशहाला भीती वाटली. दिलेरला नुसता सुगावा लागला तरी, नंतर तो जे काय हाल करेल या विचाराने त्यांच्या पोटात गोळा उठला. छत्रसाल म्हणाले, आपल्याजवळ तीन आठवड्याचा अवधी आहे. या काळात आपण इतके लांब जायचे की त्याच्या हाती लागणार नाही. म्हणून आपला एकही माणूस मागे न ठेवता पूर्ण तयारीनीशी उद्या सकाळी छावणीचा निरोप घेऊ.

        काकांची अनाकानी बघून, अंगद म्हणाले, काका तुमच्या म्हणण्यानुसार मोगल सैन्यात भरती झालो. आता हे मानेवरचे परकीय जोखड फेकून दिले पाहिजे. जे होईल ते पाहिले जाईल. ३० दिवस पुरेल इतके सामान घेऊन आपले तीस अंगरक्षकांना बरोबर घेऊन दाट अरण्यातून जाऊ. त्या रस्त्याने आपल्याला मोगलांना शोधायला कठीण जाईल. आपल्याला तीन आठवड्याची सुट्टी मिळाली आहे. त्यानंतरच आपली शोधाशोध सुरु होईल. तोवर आपण कुठल्या कुठे निघून जाऊ. काका, आता मात्र विचार करू नका. पुढे पाऊल टाका. अशी संधी परत मिळणार नाही. जाम शहा तयार झाले.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

          !!!  राजा छत्रसाल  !!!

              भाग – ९.

          आपले सगळे कुटुंबीय अंगक्षकासह छत्रसालने तिसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मोगलल छावणी सोडली. अरण्य  घनदाट असल्यामुळे, अनेक संकटांना तोंड देत रस्ता बनवत दिवसा प्रवास व रात्री मुक्काम करत प्रवास सुरू होता. कसेबसे ते सगळेच भीमा नदीकाठी पोहोचले. आणि पुढच्या योजनेचा विचार करू लागले.

            छत्रसाल म्हणाले, काका, तुम्ही अंगद भैय्या सोबत आपल्या गावी देवगडला जा. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला दक्षिणेकडे जाणार. नाही छत्रा, अशा परक्या ठिकाणी आम्ही तुला एकटे असाहाय्य सोडून जाऊ शकत नाही. काही दिवसांनी आम्ही सुद्धा शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊ. नाही काका, हा काही दिवसांचा प्रश्न नाही. मी फक्त शिवाजी महाराजांची भेटच घेणार नाही तर, काही दिवस त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची राजनीती, कुटनिती, राजधर्म, गनिमी कावा शिकेल. अस्त्र शस्त्राचे बारकावे जाणून घेईन.

          म्हणून तुम्ही गावी परत जाऊन बुंदेल्यांमध्ये आपसात प्रेम आणि मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यात एकता आणि समन्वय आणण्याचा प्रयत्न करा. काही दिवसांनी मी तिथे आलो की, पुढची योजना ठरवू, ठामपणे छत्रसाल म्हणाले.

         जामशहा परवानगी देत म्हणाले, सुनबाई देवकुवर व छत्रसाल शिवदर्शनाला जातील. व आम्ही सगळे गावी जाऊ.

        दुसऱ्या दिवशी जामशहा कुटुंबासह दहा शिपाई घेऊन पश्चिमेकडे निघाले. आणि बाकीचे शिपाई आणि घोडेस्वारांच्या संरक्षणात छत्रसाल पत्नीसह जंगलातून वाट काढत पुढे निघाले. छत्रसालना बातमी मिळाली की, कृष्णा नदीच्या पलीकडच्या काठी शिवाजी महाराज छावणी टाकून आहेत. छत्रसालने लाकडी फळ्या जोडून तीन नाव तयार केल्या. व पलीकडच्या काठावर सर्वजण अगदी शिवाजींच्या छावणी जवळ पोहोचले. छत्रसालने शिपायांबरोबर आपली सोन्यात नवरत्नांनी मढवलेली व रत्नामध्ये छत्रसाल नाव कोरलेली अंगठी देऊन, छत्रसाल आपल्या पत्नीबरोबर आपल्या दर्शनाला उत्सुक असल्याचा निरोप पाठवला.

            दुसऱ्या दिवशी मराठ्यांचे दहा शिपाई, एक घोडा व पालखीसह आपला सरंजामा घेऊन घ्यायला आले. देवकुवर पालखीत बसली. छत्रसाल घोड्यावर स्वार झाले. सोबत शिपाई आणि घोडेस्वार होते. छत्रसाल शिवाजींचाच विचार करत होते. आपल्याला भेट देतील का? कसा व्यवहार करतील? आपण काय बोलू? या विचारात असतानाच शिबिर आले. शिबिराची जागा पाहून छत्रसाल विस्मित झाले. पुढे नदी, मागे डोंगर जबरदस्त सुरक्षा व्यवस्था. थोड्याच वेळात एका छोट्या रस्त्याने एका भव्य शिबिरा जवळ सगळे पोहोचले. तेवढ्यात एक सैन्याधिकारी त्यांचे समोर येऊन, निरोप दिला की, आज विश्रांती घ्या. उद्या संध्याकाळी छत्रपती भेटतील. तुम्हा सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. एका शिबिरात छत्रसाल व देवकुंवर आणि दुसऱ्या शिबिरात शिपायांची व्यवस्था केली होती.

            दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी शिपाई आले. त्यांनी छत्रसाल व पत्नी देवकुवरला महाराजांच्या शिबिरासमोर आणले. शिपायाने छत्रसाल जवळची कटार व तलवार घेऊन समोरच्या कट्ट्यावर ठेवली. छत्रसाल कंबरपट्टा काढू लागताच सैनिकाने मनाई करत म्हणाला, तुम्ही सशस्त्र महाराजां समोर जाऊ शकता. तो सैनिक पती-पत्नीला बरोबर घेऊन एका मोठ्या दालनात आले. तिथे सहा आसनं होती. मधल्या आसनावर समर्थ रामदास स्वामी बसले होते. त्यांचे भोवती तेजवले होते. त्यांच्या उजव्या बाजूला राजमाता बसल्या होत्या. स्वामींच्या दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज बसले होते. छत्रसाल पुढे होऊन स्वामींच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. देवकुवर ने थोड्या अंतरावर जमिनीवर डोके टेकून नमस्कार केला. स्वामींनी “राजन” असा आशीर्वाद दिला. नंतर दोघांनी जिजामातांना नमस्कार केला. त्यानंतर छत्रसालांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करण्यासाठी वाकले तोच, महाराजांनी .त्यांचे हात हाती घेऊन म्हणाले, आसन ग्रहण करावे. दोघेही पती पत्नी आसनस्थ झाल्यावर, महाराज म्हणाले, तुम्हाला समर्थ महाप्रभूंनी “राजन” संबोधित केले हा तुमच्यासाठी शुभ शकुन आहे. तुम्ही समर्थांच्या दरबारात आला आहात. सर्व ठीक होईल. आम्ही तुमच्या पराक्रमाबद्दल ऐकून आहोत. छत्रसाल हात जोडून विनयाने म्हणाले, महाराज हा आपला मोठेपणा आहे. सर्वात आधी मी आपली क्षमा मागतो. मला माझ्या मनाविरुद्ध मोगलान तर्फे आपल्या सेनेशी लढावे लागले. महाराज म्हणाले, पराक्रमाची व पराक्रमी पुरुषाची कदर आम्ही करतो. मग तो कोणीही असो. छत्रसाल म्हणाले, महाराज! हा आपला मोठेपण आहे. मला वर येण्याची संधी कधी मिळेल देव जाणे. सध्या तरी मी जमिनीवरच आहे. खूप काही करायचे मनात आहे. बुंदेलवासीयांवर होणारा अत्याचार नष्ट करायचा आहे. त्यांना स्थैर्य द्यायचे आहे. पण सगळीकडून मी साधनहीन आणि विपन्न आहे. मन मारून मोगलांची चाकरी केली. त्याबद्दल पश्चातापाच्या आगीत होरपळत आहे. पण उद्देश एवढाच होता की मोगलांची युद्ध कौशलता, राजनीती शिकून त्यांचेच विरुद्ध त्यांची विद्या वापरायची संधी कधीतरी मिळेल. केवढी विटंबना आहे पहा, ज्याच्या विरुद्ध लढण्याचे त्याचे अन्न खावे लागते. ते शिवाजी महाराजांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते.

     समर्थ रामदास म्हणाले, जीवनात असे अनेक प्रसंग येतात. त्यात विचलित न होता पुरुषार्थांने मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि. २८-७-२०२३.

!!!  राजा छत्रसाल  !!!

               भाग – १०.

              छत्रसालला शिवाजी महाराज म्हणाले, राजन, याला सद्गुरु भगवंताचा आशीर्वाद समजा. छत्रसाल म्हणाले, माझी तीव्र अभिलाषा आहे मोगल सत्तेचा विध्वंस करावा. पण माझ्यात तेवढे बळ नाही. म्हणून आपल्याकडे आलो आहो. लिनतेने म्हणाले, आपण मला मार्ग दाखवावा. एक विनंती आहे. मोगलाची चाकरी करताना मनाला अतिशय खेद होतो. त्याच्याकडे परत जायला लागू नये असा आशीर्वाद द्या. छत्रसाल करुणेने समर्थाकडे पाहत म्हणाले.

          स्वामी समर्थ रामदास म्हणाले, मार्ग मिळेल. आश्रय सुद्धा मिळेल. योग्य वेळेची प्रतीक्षा करा. सम विषम परिस्थिती येतच असते. त्याचा आपल्या पराक्रमाने सामना करा. परमेश्वर तुमचे कल्याण करेल. असे म्हणून पूजेची वेळ झाल्यामुळे समर्थ शिबिरातून बाहेर पडले.

             स्वामी समर्थ गेल्यावर छत्रसाल म्हणाले, महाराज, स्वामींच्या आशीर्वादाचा मला अर्थ समजला नाही. महाराज म्हणाले, साधुसंत संकेतात बोलत असतात. तुम्हाला पुरुषार्थ कायम ठेवण्यास सांगितले तेवढे लक्षात ठेवा.

             छत्रसाल म्हणाले, महाराज, माझी एक विनंती आहे, बोला.. मला काही दिवस आपल्या सानिध्यात राहू द्यावे. तुमच्याजवळ राहून युद्धाचे बारकावे, राजकारण, कूटनीती, गनिमी कावा समजून घ्यायचा आहे. राजकीय शिष्टाचार, लोकव्यवहार, लोकसंग्रह या गोष्टी शिकायचे आहेत. तरी अनुमती द्यावी. आनंदाने… पाहिजे तितके दिवस राहू शकता. मी तुमची तशी व्यवस्था करायची सूचना देतो. आता तुम्ही विश्रांती घ्या. उद्यापासून तुमच्या दिनचर्याला  सुरुवात होईल. मासाहेब, आपण आपल्या दालनात चलावे.

          उठतां उठतां  मासाहेब देवकुवरला म्हणाल्या, बेटी जेव्हा राजासाहेब इतरत्र व्यस्त असतील तेव्हा तू आमच्या जवळ येऊन रहा. दोघी पती-पत्नीने मासाहेबांना वाकून नमस्कार केला.

         काही दिवसांनी शिवाजी महाराज ससैन्य पुण्यात परत आले. छत्रसाल साठी वेगळ्या घराची व्यवस्था केली. आता छत्रसालची दिनचर्या ठरुन गेली. दुपारपर्यंत युद्धाभ्यास होत असे. गनिमीकाव्याचे बारकावे समजावून घेत होते. युद्धात केवळ शक्तीच नाही तर युक्तीचीही फार आवश्यकता असते, यासाठी छावणीची योग्य जागा निवडणे हे सर्व ते आत्मसात करू इच्छित होते. दिवाण आणि इतर  पदाधिकाऱ्यांची राजकारणावर चर्चा होत असे. भोजनानंतर छत्रपती बोलावून घेत, तेव्हा कुटनीतीवर मोगलांची साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा, त्याच्या सामाजिक, धार्मिकतेवर चर्चा होई. आता त्यांचे एकच ध्येय होते, मोगलांची सत्ता उलथून पाडणे. छत्रसालांना सुद्धा हेच करायचे होते. याच उद्देशांची समानता त्यांना महाराजांपर्यंत घेऊन आले होते. या वीस वर्षाच्या तरुणाला फक्त तलवार चालवता येत होती. बाकीच्या गोष्टींचे ज्ञान त्यांना नव्हते. पण त्यांच्यात अतूट संकल्प आणि विश्वास होता. यामुळेच महाराज सुद्धा त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते. सध्या त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीची नितांत गरज आहे हे महाराज जाणून होते.

                सहा महिन्यानंतर शिवाजी महाराजांनी छत्रसालांना आपल्या कक्षात बोलावून घेतले. येताच त्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणाले, गेल्या सहा महिन्यात तुमच्या कार्याची माहिती घेत होतो. तुमची शिकण्याची जिज्ञाशा, समजावून घेण्याची तडप पाहून आम्ही फार प्रभावीत झालो. तुम्ही एकही क्षण वाया घालवला नाही. तुमच्या बहादुरी बद्दल मला सांगण्यात आले की, कोणताही शस्त्रधारी सैनिक तुमच्यापुढे टिकू शकत नाही. हा नवयुवक काळाशी टक्कर देऊ शकतो. ऐकून आम्हाला फार आनंद झाला. छत्रसाल विनयाने म्हणाले, हा आपला मोठेपणा आहे. मी एक शुल्क फार लहान व्यक्ती आहे. ज्याचा कोणताही ठाव ठिकाणा नाही. आणि निघाला आहे आकाशाला गवसणी घालायला. आपल्या चरणी आणखी एक विनंती आहे, काही दिवस राहून रणनीती, राजनीतीचे बारकावे शिकावे. तुम्हाला हवे तेवढे दिवस राहू शकता.    

               आतापर्यंत तुम्ही घेतलेले शिक्षण एका राज्यासाठी पुरेसे नाहीच. आणखी काही महत्त्वपूर्ण विषयांची माहिती असणे आवश्यक आहे, ते म्हणजे राज्याची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था. काही दिवस आमचे पेशवे, कोषाध्यक्ष, न्यायाधीश यांचे बरोबर राहून, या विषयांची माहिती घ्या. आपली आज्ञा शिरोधार्य! आपले फार मोठे उपकार आहेत माझे वर. हे ऋण कसे फिटू शकेल?

             महाराज म्हणाले, या गोष्टींचा विचार करू नका. आता या दिवाणजीबरोबर राहून सर्व विषयांची माहिती प्राप्त करून घ्या. नगरात जाऊन लोकांना भेटा. त्यांच्या अडचणी, दुःखे समजावून घ्या. महाराजांनी दिवाणाला बोलावून त्यांना आवश्यक सूचना दिल्या.

            पुढचे सहा महिने छत्रसालसाठी फार त्रासाचे गेले. शास्त्रास्त्र विद्येबरोबर त्यांनी दिवाणी व फौजदारी विषयात प्राविण्य मिळवले. अर्थनीती समजावून घेतली. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी आपले व्यक्तिमत्व बनवून महाराजां समोर आले तेव्हा, महाराजांना समाधान वाटले. आज पैलू पाडलेली या दैदीप्यमान रत्नाकडे पाहून महाराजांचे हृदय अभिमानाने भरून आले. त्यांनी छत्रसालांना हृदयाशी धरले. छत्रसाल गदगदलेले आवाजात म्हणाले, आपल्या कृपेने मी शिकू शकलो. आपला मी सदैव ऋणी राहील.

                महाराज म्हणाले, मला शूरवीर धाडसी आवडतात. बलिदानाची हिंमत ठेवणाऱ्यांचा मी नेहमी सन्मान करतो. हे गुण तुमच्यात परिपूर्ण भरलेले आहेत. बोला तुमच्यासाठी काय करू? महाराजांनी आपल्या उदार हृदयाचा परिचय दिला.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २८-७-२०२३.

       

राजा छत्रसाल म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading