
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
याज्ञसेना द्रौपदी
*द्रौपदीः*
*भागः-११*
श्रीकृष्ण पांडवांना भेटायला आलेत, पांडवांची दयनीय दशा पाहुन शिशुपालच्या वेळी जसे संतप्त झाले होते तसेच आज द्रौपदीला संतप्त झालेले दिसले. अर्जुनाने त्यांना शांत करत म्हटले अरे गोपाला! तू पाठीशी असतांना आम्हाला कळीकळाचे भय नाही. तेरा वर्षे संपल्यावर या धरणीची तृष्णा जरुर पुर्ण करु! श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले.
त्याचवेळी द्रौपदीच्या संयमाचे बांध फुटले. सोशीकतेची परिसीमा संपली. तीला वाटले कृष्ण एवढा संतापला तर असाच पांडवांसह हस्तीनापुरवर चाल करेल, तीच्या अपमानाचा सुड घेईन. पण कृष्णही तेरा वर्षे प्रतीक्षा करायला तयार झालेत. हे पाहुन द्रौपदी त्वेषाने
कृष्णाला म्हणाली, “याचा अर्थ आम्ही ऊन्हात.. पावसाशी, वादळवार्याशी, काट्याकुट्यांशी, निशाचरांशी, जंगली श्वापदांशी, भयानक राक्षसांशी झगडत तेरा वर्ष
कौरवांच्या बलीवेदीवर वाहुन टाकायची का?” एवढी ती पहिल्यांदाच संतापली होती.
त्यावर कृष्ण तीला म्हणाले की! “वस्तुस्थीतीचा विचार करुन पावल टाकावी लागतील. पांडव कौरवांच्या वचनात गुंतलेले आहेत. अधर्मानं त्यांच्याशी युध्द केले तर पांडवांना इतिहासकार कल्पांतापर्यंत दोष देतील हे तुला आवडेल का?”
द्रौपदीने कृष्णाला विचारले, “पण जे अघटीत ते घडुच नये असा प्रयत्न कां केला नाहीस तू? त्यावेळी कुठे होतास कृष्णा?”
अगतीकतेने द्रौपदीने विचारले. त्यावर कृष्ण म्हणाला पांडवांच्या दुर्दैवाने आणि कौरवांच्या सुदैवाने मी त्यावेळी व्दारके पासुन शेकडो योजने लांब सौभपूरनगरात शाल्वाच्या पारिपात्यासाठी गेलो होतो. शिशुपालाच्या वधामुळे चिडुन शाल्वाने द्बारका उध्वस्त केली होती. परत फिरताच ही वार्ता कळली.
द्रौपदी त्याला म्हणाली, “कृष्णा! वीर पांडवांची पत्नी, पांच शूर पुत्रांची माता, तुझी सखी, धृष्टद्यम्नची बहीण असुनही कौरवांनी माझी मी एकवस्रा, रजस्वला असतांना देखील विटंबना केली, त्यांना तुम्ही कांहीच शासन करणार नाही का?”
द्रौपदी आक्रोशाने म्हणाली ही द्रौपदी तुमची कोणी नव्हेच! नाही माधवा! नाही ! माझं या उभ्या विश्वात कुणीच नाही रे! ना पती, ना पुत्र! ना बंधु! ना पिता! आणी कृष्णा तू…तू देखील माझा नाहीस. कुणी कुणी लागत नाही तू माझा. आणी ती ओक्सीबोक्सी रडु लागली. तीच्या खांद्यावर हात ठेवुन कृष्ण तीला म्हणाला, मी जर कोणीच नाही तर त्या संकटाच्या क्षणी कां धावा केलास, कां आर्त हाक मारलीस? कां आर्तपणे साद घातलीस? वेडे! सहस्र योजने दूर असलेल्या मला एखाद्या विद्युत लहरींसारखी तुझी हाक कानात शिरली. शरीराने पोहचने शक्य न झालेने आत्म्याने तुझ्याकडे धाव घेतली, तुझा मी कोणी नव्हतो म्हणुन का?
द्रौपदीची अब्रु राखण्यासाठी भक्तवत्सल कृष्ण सहस्र योजने दुरुन धावत आला होता. श्रध्देला निष्ठा मिळाली. तीने चटकन त्याचे पाय आपल्या अश्रूने धुतले. तीला उठवत कृष्ण तीला म्हणाला, विटंबना, अपमान तू सोसलास पण आत्म्याला मुक्तीची युक्ती मला लाभली.
त्या देवाला स्मरुन तुला अभिवचन देतो की, ज्यांनी तुझा अपमान, विटंबना केली त्यांचा सर्वनाश होईल आणी पुनः तूपांडवांची सम्राज्ञी होशील. धन्य धन्य झाली द्रौपदी.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*भागः-१२*
कधी कधी वाळल्याबरोबर ओलही जळते. अर्जुनाशी सुभद्रेचा विवाह झाला म्हणुन आणि एकाच कुटुंबातील असले मुळे, द्रौपदीचे पांच पुत्र व अभिमन्युसह सुभद्रा पण वनवासी झाले होते. अर्थातच हे द्रौपदीला पटणे शक्यच नव्हते. आपल्याबरोबर त्यांची फरफट तीला नको होती, अशा विचारात असतांनाच कृष्णाने जणू तीचा भाव जाणला. धृष्टद्युम्नला कृष्ण म्हणाला, “पांडव कौरवांच्या वचनाने बांधील आहेत, पांचाली दुर्दैवानं त्या वचनाची बंदिनी ठरली आहे” परंतु पांचाली पुत्र, सुभद्रा, अभिमन्यु यांना तेरा वर्षाचा वनवास भोगण्याचे काहीच कारण नाही. त्यांना परत घेऊन जा.
सुभद्रा जायलाच तयार नव्हती पण द्रौपदीने तीला परोपरीने समजावले, मुलांच्या भवितव्याचा विचार करुन पुढची पिढी भाग्यदायीनी व्हावी या हेतुने तीला जाण्यास भाग पाडले.
सर्वांच्या सल्याने *व्दैतवनात* वास्तव्य करण्याचे निश्चित झाले. ते अरण्य अवर्णनिय, सृष्टीसौंदर्य विलक्षण होते. सरस्वती नदीचा खळखळाटाच्या तालावर मोर, चातक, कोकीळांचे मधुर गुंजन ऐकु येत होते. सिंह व्याघ्रापासुन ते हरणांपर्यंत सर्व प्राण्यांचे वास्तव्य थरारकतेबरोबर आनंदातही भर टाकीत होते. अनेक तपस्वी, ञृषी, मुनि तीथे वास्तव्याला होते.
द्वैतवनाला स्वर्गाची कळा आली. सर्वस्व गमावलेले युधीष्ठीरांची संन्यस्त वृत्तीबरोबर चारही भावांचीही विरक्ती कडे नेऊ लागले. त्यामुळे द्रौपदीच्या मनाची अस्वस्थता मात्र वाढु लागली. तीने निश्चय केला की, कांहीही झालं तरु धर्मराजाला संन्यासी होऊ द्यायचे नाही. कारण तसं झालं तर तीच्या अंतःकरणातील जखम कधीच भरुन निघणार नव्हती. तीच्या झालेल्या विटंबनेचा प्रतिशोध घेतला जाणार नव्हता. पांडवांचं अधःपतन होऊ द्यायचा नाही असा निश्चय द्रौपदीने केला.
त्याप्रमाणे युधिष्ठीराशी वितंडवाद चालु असतांनाच महर्षि व्यासांचे आगमन झाले. त्यांनी अर्जुनाला *पाशुपतास्राची* प्राप्ती करुन घेण्याची आज्ञा दिली. सारंच विलक्षण. आजपर्यत द्रौपदीच्या जीवनातील प्रत्येक सुखाच्या क्षणाला कुठेतरी दुःखाची किनार ही नियतीने कोरुन ठेवलेली असायचीच. तसं नसतं तर धर्मराजाला संन्यस्त वृत्तीपासुन परावृत्त करतानांच अर्जुनाचा किमान पांच वर्षाचा वियोग सहन करावा लागावा ही दुःखाची गोष्ट. तीचा भाग्यविधाताच सोडुन गेल्यावर जगायचे तरी कसे?
यापुर्वीही केवळ तत्वासाठी अर्जुन असेच तीर्थाटनास सर्वस्वाचा त्याग करुन निघुन गेले होते. ती राजमहालात असुनही अवती भवती सर्व लोक असुनही एका विरहीणीचे जीवन जगली होती त्या क्षणी. आता तर वनवासीच होती ती. या सर्व प्रकारात प्रयत्न करुनही स्वतःला सावरु शकत नव्हती, स्वतःचे अश्रू थांबवू शकत नव्हती. वनवासात आल्यापासुन मायेचा स्पर्श, प्रेमाचा ओलावा या सार्या भावनांना मुकली होती ती .
वनात आल्यापासुन जोगीनच बनली होती ती. नाही! जाणुन बुजुन जोगीन बनवल्या गेलं होतं! जणू काही सर्वाकाही दोष तीचाच होता!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*भागः-१३*
अर्जुन *पाशुपतास्र* प्राप्त करायला निघुन गेल्यावर द्रौपदीचे तर सर्वस्वच हरवले, पण इतरांची स्थितीही कांही वेगळी नव्हती. जणू अर्जुन स्वतःबरोबर चैतन्य, आनंदच घेऊन गेला. त्यामुळे *कामाक्य वनाचा* त्याग करण्याचे विचार सुरु असतांनाच नारदमुनी प्रगटले. धर्मराज त्यांना म्हणाले, “अर्जुनाच्या विरहानं राज्य गमावण्यापेक्षा जास्त दुःख झाले.”
त्यावर नारदमुनींनी *महर्षी लोमश* यांच्या बरोबर तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला.
महर्षी लोमश, कांही ब्रम्हवृंद आणि धौम्य ऋषि सोबत तीर्थयात्रा सुरु झाली. प्रवास करीत नैमीष्यारण्य, कन्यातीर्थ, अश्वातीर्थ, गोतीर्थ केले. बालकोटी पर्वत आणि वृषप्रभ पर्वत ओलांडुन सर्वजण *प्रयागला* पोहचले.
दुर्जया तीर्थावर *अगस्ती मुनींचा* आशिर्वाद घेतला. तिथुन कौशिकी नदीतिरावरचा *विश्वमित्रांच्या* आश्रमाची धुळ घेतली. महेंद्र पर्वतावर *भगवान परशुरामाचे* दर्शन झाले.
प्रभास तीर्थावर पोहोचल्यावर द्रौपदीला कृष्णाची आठवण झाली. कारण तिथुन द्वारका जवळ होती. तीचे मनोगत ओळखुन बलरामसह कृष्णाने त्यांना भेट दिली. अभिमन्युसह सुभद्रेची भेट झाल्याने द्रौपदी अगदी हरखुन गेली. सर्वांचा निरोप घेऊन निरनिरनिराळ्या तीर्थांना भेटी देत *गंधमान पर्वतावर* पोहोचलेत. पण द्रौपदीची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे तिथुन जवळच असलेल्या *बद्रीकाश्रमात* आश्रय घेतला. तीथे इतके दिवसात मिळाला नाही तेवढा आनंद तीला मिळाला. तीच्या चित्तवृत्ती फुलुन आल्यात.
अशातच द्रौपदीने भीमाजवळ *कमळपुष्पासाठी* हट्ट केला. तीच्या इच्छेखातिर तो कमलपुष्प आणायला गेला. तसेच बाकीचेही कामानिमित्य बाहेर गेलेले होते. लोमश व धौम्य मुनी आश्रमापासुन दुर एकांतित समाधी लावुन बसले होते. आणि इतर सर्व ब्रम्हवृंद निरनिराळ्या मुनींच्या दर्शनासाठी गेले होते.
आश्रमात द्रौपदी एकटीच होती. तीला हुरहुर वाटत होती. तेवढ्यात एक धिप्पाड देहाचा ब्राम्हण समोर उभा ठाकला. त्याला पाहुन तीने त्याच्या येण्याचे प्रयोजन विचारले असतां, तो म्हणाला “मला तू पाहिजे. मी तुझ्या प्राप्तीसाठी आलो. मी *जटासूर राक्षस* आहे. तुला पळवुन नेण्यासाठी संधीची वाट बघत होतो.” विकट हास्य करीत त्याचा चेहरा भयानक झाला. तोंडातुन दोन सुळे बाहेर आलेत. बोटाला फुटलेली तिक्ष्ण नखे, सर्वांगाला केस फुटले. हे सर्व पाहून भीतीने तीची गाळण उडाली आणि आपोआप डोळे मिटले. दुसर्याच क्षणी त्याचा विळखा तिच्या कमरेला पडला. तीला उचलुन तो नेऊ लागला. तेवढ्यात सहदेव आला. त्याचा प्रतिकार करत असतांना युधीष्ठीर पण आलेत. ते लढण्या ऐवजी त्याला उपदेश करायला लागले.
द्रौपदीला अतिशय संताप आला, वाईट वाटले. स्वतःच्या दुर्बलतेवर पांघरुन घालण्याचा तीला तिटकारा आला. एवढ्यात भीम *कमलपुष्प* परतला. जटासूराबरोबर युध्द करुन त्याचा वध केला. आणि द्रौपदीवर आलेले संकट टळले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*भागः-१४*
अर्जुनाने कठोर तपश्चर्या करुन इंद्रलोकी जाऊन शंकराला प्रसन्न करुन *पाशुपतास्राची* प्राप्ती करुन परतले. द्रौपदीचा आनंद काय वर्णावा ???
पण आज जटासूराला मारण्यासाठी युधीष्ठीराने प्रयत्न न केल्यामुळे तीचे मन खंतावले. त्यामुळे अर्जुन परत आल्याचा निर्भेळ आनंद सुध्दा मिळु शकला नाही.
लोमेश मुनी आपल्या मार्गाने निघुन गेलेत. द्रौपदीसह पांडव चीनी संस्कृतीचे अवलोकन करीत चीन देश ओलांडला आणि तुषार देशाचे सीमोल्लंघन करुन दरद, कुणिन्ह देश पार करुन राजा सुबाहुच्या राज्यात प्रवेश केला. राजाश्रय न घेता येत असल्यामुळे ते *द्वैतवनात* पोहोचलेत.
पावसाळा संपल्यावर पुनः काम्यक वनात वास्तव्यास गेलेत. तीथे सत्यभामेसह कृष्णाची भेट झाली. मार्कंडेय मुनी तीथेच वास्तव्यास राहिलेत.
त्याचवेळी दुर्योधन वनवासी पांडवांना चिडवण्यासाठी आणि आपलं वैभव दाखवण्यासाठी घोषयात्रेच्या निमित्याने काम्यक वनात आलेत. जवळच्याच सरोवरावर गंधर्व आपल्या स्रियांसह जलक्रीडा करीत होते. त्यांनी कौरवांना मनाई करुनही न ऐकल्यामुळे दुर्योधन व गंधर्वाचे युध्द झाले. त्यात कौरवांची हार झाली. कौरवांच्या स्रियांना व दुर्योधन – दुशाःसनाला बंदी बनवले. ही वार्ता पांडवांना कळल्यावर युधिष्ठीराच्या आज्ञेने पांडवाने त्या सर्वांची मुक्तता केली. हे सर्व द्रौपदी संतापुन पाहत होती. दुर्योधनाला संकटातुन मुक्त होण्यास पांडवांची मदत घ्यावी लागली याहून दुसरी शोकांतिका ती कुठली?
पांडवांचा १२ वर्षाचा कालावधी संपला, उरलेले एक वर्ष अज्ञात वासात काढायचे म्हणुन सर्वानुमते विराट नगरात *विराट राजाकडे* वेगवेगळ्या भुमिकेत जायचे निश्चित केले. युधिष्ठीर *कंक* च्या भुमिकेत राजाला द्युत खेळुन प्रसन्न ठेवायचे. भीमाने *पौरोगव बल्लवच्या* भुमिकेत आचाराचे काम स्वीकारले. अर्जुनाला इंद्रलोकी असतांना एक वर्ष नपुंसक होशील असा शाप मिळाल्यामुळे *बृहन्नडा* नांवाने राजमहालातील स्रियांना नृत्य शिकवण्याचे ठरले. द्रौपदीला याचे अतिशय वाईट वाटले पण काय करणार…!
नकुल *ग्रंथीक* नावाने घोड्याची देखरेख आणि सहदेव गायींची देखभाल *तंतीपाल* या नावाने करण्याचे ठरले.
द्रौपदी सुदेष्णा राणीकडे दासी *सैरंघ्री* म्हणुन राहीलि. अशा प्रकारे नियोजन करुन विराट नगरीच्या वेशीवर येऊन पोहोचलेत. स्मशानातील *शम्मीच्या झाडाच्या* ढोलीत आपापली शस्रास्रे लपवून ठेवलेत. आणि सर्वांनी वेशांतर करुन वेगवेगळ्या वाटेने विराट नगरी प्रवेश केला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*द्रौपदीः*
*भागः-१५*
पांचही पांडव आपाआपल्या भूमिकेत विराट राजाच्या आश्रयाला आलेत, पण द्रौपदीची मात्र पंचायत झाली. तीचे असामान्य रुप, तीच्या शरीरातुन निघत असलेला गंध, हे सर्व पाहुन राणी सुदेष्णेला तीला दासी म्हणुन ठेवायला अवघड वाटत होते. सुदेष्णा राणीला भीती वाटत होती की, हिच्या रुपावर महाराज जर भाळले तर!
द्रौपदीची अवस्था मोठी अवघड झाली. तीला तीथे कोणत्याही परिस्थीतीत प्रवेश तर पाहिजे होता, पण राणी तीला ठेवायला तयार नव्हती. शेवटी द्रौपदीने युक्ती वापरली. बिजलीसारखी जागची हलली आणी समोरच्या फळांच्या तबकातील कट्यार उचलुन उरात मारण्याचा अविर्भाव करीत असतांनाच राणी सुदेष्णाने झडप घालुन तीच्या हातातील कट्यार हिसकावुन घेतली. आणि रागाने तीला म्हटले, “हे जर महाराजांना कळले असते तर!” तेवढ्यातच महारांजांचा तीथे प्रवेश झाला. राणीचे त्यांच्या बद्दलचे विचार ऐकुन अतिशय वाईट वाटले. त्यांनी सिंहासनाची शपथ घेऊन सांगीतले की! ” *सैंरघ्री* आजपासुन आमच्या कन्येसारखी असेल.”
आणि अशाप्रकारे द्रौपदीची *सैंरघ्री दासी* म्हणुन राणीमहालात प्रवेश मिळाला.
इकडे, युधिष्ठीर कंक ब्राम्हण म्हणुन विराट महाराजांच्या राजसभेत द्युताचे फासे टाकीत महाराजांचे मनोरंजन करीत असे. भीमसेनने बल्लवाचे आचारी म्हणुन निरनिराळे पदार्थ करुन खाऊ घालुन महारांजांची मर्जी संपादन करुन घेतली. तसेच त्यांच्या बलदंड शरीराचा उपयोग बैलाशी किंवा हत्तीशी झुंज लावून मनोरंजन करीत तेव्हा द्रौपदीच्या जीवाची काहली होत असे. ग्रथीक बनलेला नकुल खरोखरच अश्व पारखी होता. तो तबेल्याची व्यवस्था पाहत असे.आणि तंतीपाव बनलेल्या सहदेवाने गायीच्या गोठ्याचा निवारा शोधला. राजैश्वर्यात लोळणारे हे राजहंसाना तबेला व गोठ्याचा आश्रय घेऊन अज्ञातवासाचे क्षण मोजावे लागले.
सर्व काही पाहु शकते पण आपल्या पुरुषाला स्री वेशात पाहण्यासारखं दुर्दैव ते कोणते?
अज्ञातवासाचे अकरा महिने संपले होते.
अशातच किचकच्या रुपाने तीच्या समोर संकट उभे राहीले. किचकाने तीच्यावर हात घालताच त्याचा प्रतिकार करुन भीमाकडे धाव घेतली.त्याला त्याच्या बाबतीत सर्व कथन केले. आणि ओक्सीबोक्सी रडायला लागली. भीमाने तीचे सांत्ववन करुन आश्वास्त केले. युक्तीने भीमाने किचकाचा वध केला. किचकाचा वध झालेला पाहुन द्रौपदी बेफान होऊन वेड्यासारखी खदखदुन हसत सुटली. असं हसणं आता कळीकाळालाही थांबवता, रोखता आलं नसतं!
किचकाच्या धडधडत्या चितेकडे पाहुन त्याच्या बद्दलच्या तीच्या मनातला सारा आक्रोश, क्रोध, संताप, सुडाची भावना त्या चित्तेत भस्म, खाक झाल्यात.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख


