संत  ज्ञानेश्वर महाराज चरीत्र भाग ४, (१६ ते १७)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


           विठ्ठलपंतांना देहान्ताची शिक्षा फर्मावल्यावर ते क्षणभर विचलित झाले, पण आपल्यानंतर मुलांचे कल्याण होत असेल, त्यांना सामाजिक दर्जा, स्थान मिळत असेल, सन्यासाची पोर म्हणुन हिनवणार नसतील तर, देवच घेइल त्यांची काळजी असा विचार करुन ते कुटीत आले.  निवृत्ती-ज्ञानदेवाला जवळ घेऊन बर्‍याच महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!!  संत  ज्ञानेश्वर महाराज चरित्र  !!!

!!! संत  ज्ञानेश्वर  !!!

भाग  –  १६..

         मुक्ताईचा विलाप पाहवल्या जात नव्हता. ती ऊसासुन म्हणाली, ज्ञानदादा! असा कसा रे निष्ठुर झालास? अरे! तुझ्याशिवाय मला कोणीच नाही रे! मी कुणाच्या मांडीवर डोकं टेकवु? कुठं विसावा घेऊ? तूं गेल्यावर मी सुध्दा राहणार नाही…….आम्हा मातापिता नित्य ज्ञानेश्वर। नाही आतां थार विश्रांतीसी।।  रुख्माई तीला पोटाशी धरुन म्हणाली, अग! मुक्ते किती रडशील मी आहे ना! देव समजावु लागले! मुक्ते! गंगा उगमापासुन निघाली अन् समुद्राला मिळाल्यावर समद्रातील वेगळं व गंगेतल उदक कां कधी वेगळ होऊ शकतं का? तसंच ज्ञानोबा जरी समाधी घेत असला तरी माझ्या स्वरुपापासुन कधीच वेगळा नाही.

        कसंबसं देवाने या दुःखी जीवाचं समाधान केले, आणि म्हणाले, ज्ञानोबाचे गुण अपार आहेत,

देव म्हणे असे आठवाल फार। लागेल उशीर समाधीसी।।

          सिध्देश्वराच्या नंदीची शिळा बाजुला सारली की, खाली भूयार आहे.वर अजान वृक्ष, आज कार्तिक वद्य त्रयोदशीला ही जागा निश्चित झाली, शिळा बाजुला काढली. नामदेवाची नारा,विठा, गोदा, महादा ही मुलं भराभर खाली भूयारात उतरुन विवर झाडून पुसुन स्वच्छ केलं. बाकी संतांनी….

धुवट वस्राची घडी ते अमोल। तुळशी आणि बेल अंथरले। दुर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे। पुष्पें तीं सकळ समर्पिली।। मग पांडुरंगाने ज्ञानोबाला चलायला सांगीतले. ज्ञानोबाने सोपानाला अलिंगन दिले, मुक्ताईला पोटाशी धरले, नामदेवाला मिठी मारली, सर्व संतांना नमस्कार केला. नी मग निवृत्तीनाथाजवळ आले. हात जोडुन त्यांना आज्ञा मागीतली, म्हणाले, दादा! तुम्ही फक्त माझे जेष्ठ बंधुच नाही तर, गुरु तर आहातच, पण त्याहीपेक्षा माझे सर्वस्व आहात, आईबाबाच्या मायेने पालन पोषण केलं, प्रत्येक हट्ट पुरवला, आळी पुरवली. तुमच्याच कृपेने मी माझ्या स्वरुपात मिळालो.

         निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना कडकडून मिठी मारत गहिवरल्या स्वरात स्फुदंत म्हणाले, माझ्या ज्ञानराजा कधी ऊलटुन बोलला नाहीस, अधिक उणं उत्तर दिलं नाही. तुझ्या सारखा धाकटा भाऊ, शिष्य कधी होणे नाही. गुरुशिष्यपण तुझ्यामुळे खरं झालं!

            अशा शोकाकुल वातावरणांत कुणाच्यानेच टाळ ऊचलवत नव्हता, गळ्यांतुन शब्द निघत नव्हते. सगळे चित्रासारखे उभे राहुन शेवटचे ज्ञानदेवाला पाहुन घेत होते. निवृत्तीनाथ आणि पांडुरंग या दोघांनी ज्ञानदेवांना समाधीकडे चालवले. कुणीही पापणी न लवता केवल्याच्या पुतळ्याला भुयारांत ऊतरतांना सर्व जण पाहत आहेत. आतां हा दिसायचा नाही. पायर्‍या उतरुन ज्ञानोबा आसनावर बसले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. प्रसन्न ज्ञानोबाने देवाकडे मागणं मागीतलं…..

ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा। पादपद्मीं ठेवा निरंतर।।

        लहानपणी भोगावे लागलेले हाल अपेष्टा, कष्ट सर्व सोसुनही त्यांच्या मनांत कोणताही किंतु उरला नाही. कुणाबद्दल राग, द्वेष, आकस नाही. देवाने ज्ञानोबांच्या मस्तकावर अभयकर ठेवला. ज्ञानोबांनी तिनदां नमस्कार केला अन्  आपले कमळासारखे मोठे डोळे मिटुन घेतलेत! नेहमीसाठी!

                     क्रमशः
                         मिनाक्षी देशमुख

!!!  संत  ज्ञानेश्वर  !!!

अंतिम भाग – १७.

            ज्ञानोबा गेलेत. समाधिस्त झालेत. आतां कुणासाठी व कशासाठी जगायचे? तिन्ही भावंड स्वैरभैर झालेत. त्यांच्यांतील जणुं चैत्यन्यच नष्ट झालं. त्याचा परिपाक म्हणुन मार्गाशीर्षातील वद्य त्रयोदशीला सोपानदेवानं सासवड येथे समाधी घेतली. कांहीदिवसानंतरच उदासवाणी मुक्ता पुढल्या वैशाखात तापीतीरी हरवली, ती कधीच कोणाला दिसली नाही…..

सकळांचे चित्ती येतो कळवळा। मुक्ताई डोळां पाहिली नाहीं।।

        आणि या तिघांना निरवुन निवृत्तीनाथांनी जेष्ठामधे त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली. मागे कांही ठेवले नाही.

         ज्ञानोबांचं अनेकांनी अनेक परींनी वर्णन केले. नामदेव गहिवरुन म्हणतात, ही भावंडे इश्वराच्या विभूती होत्या! हरपल्या आतां! असं कुणी होणे नाही. वैराग्याविषयी तर खुप ऐकलं, पण ज्ञानोबांचं वैराग्य? असा वैराग्याचा पुतळा पुनः दिसायचा नाही. ज्ञानोबासारखी युक्ती  कोणाला साधायची नाही. मूर्ती गेल्यात आतां नुसती किर्ती राहिली.एकनाथ म्हणतात… सर्व सुखाची लहरी। ज्ञानाबाई अलंकापुरी।। असे दयाळे ज्ञानाबाई। माझें आर्त तुझे पायीं।।

      तुकोबा तर ज्ञानोबांच्या पायावर डोके ठेवुन म्हणतात….. ज्ञानदेवा, महाराजा! आपल्या युक्तीची खोली कुणाला कळली आहे? मग उगाच कशाला धडपड? मी अपलं अज्ञान लेकरु, कांही वेडंवाकडी  उत्तरे बोललो असेल तर आपण दयावंत आहांत क्षमा करुन पायाजवळ थोडी जागा द्यावी.

            ज्ञानदेवांनी भयंकर सोसलं, पण कधी कुणावर राग काढला नाही, मात्र त्यांनी जे पाहिलं ते मात्र तुमच्या आमच्यासाठी लिहुन ठेवलं आहे. अपार योग्यतेचा ग्रंथ “ज्ञानेश्वरी”! पण अद्यापपर्यत तरी कुणी तीथपर्यत पोहोचला नाही. ज्ञानोबांनी सरस्वतीच वर्णन करतांना म्हटले आहे……

आतां अभिनव वाग्विला खिनी। चातुर्यार्थ कलाकामिनी। हे शारदा विश्वमोहिनी। नमस्कारिली मायां।। हे  वर्णन कसले शारदेचे? हे तर ज्ञानेश्वरीचचं! एवढा अपूर्व ग्रंथ वयाच्या १५  व्या वर्षी, ज्या वयात तुम्ही आम्ही नुसते आई बापावर विसंबुन असतो. आणि एकटी ज्ञानेश्वरीच नव्हे तर अनुभवामृतासारखा डोळस ग्रंथ पण!

           आज एवढी वर्ष झालीत, अतीरथी, महारथी, पंडीत, विद्वान हे सर्व अर्थ लावण्याचा प्रयत्न करताहेत पण नेमका  अर्थ हाच असं ठामपणे सांगण्याचं साहस अजुन तरी कुणाच्यानेही करवलं नाही. याहीपेक्षा फार मोठं कौतुक म्हणजे या खडबडीत महाराष्र्टात तळागळातील जनतेसाठी गंगा आणली. आज ७५० वर्षे होऊन गेलीत पण अजुनही ती संथपणे वाहते आहे. दोन्ही थडींना अपरंपार पीक पिकवित, काठं फुलवित, लाखो भक्तांची जीवनं या वाटेने जाऊन कृतार्थ झालीत.

          आणि कृतज्ञ अंतःकरणाने आळंदीला जाऊन तुकोबा  भक्तीरसाने व्याकुळ होऊन ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं टेकवुन म्हणतात…..

ज्ञानाबाई, तूं आमची आई आहेस!

      बावीसाव्या वर्षी समाधी घेतलेले ज्ञानदेव! एवढ्या लहान वयांत तुमची आमची सगळ्यांची आई झालेत. याहुन आणखी वर्णन कसं आणि काय करायचचं त्यांचं? 

बोला, ज्ञानेश्वर माऊली, तू  सकलांची आई!

                  !!   समाप्त.  !!
                          मिनाक्षी देशमुख.

संत ज्ञानेश्वर म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading