संत  ज्ञानेश्वर महाराज चरीत्र भाग ३, (११ ते १५)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


           विठ्ठलपंतांना देहान्ताची शिक्षा फर्मावल्यावर ते क्षणभर विचलित झाले, पण आपल्यानंतर मुलांचे कल्याण होत असेल, त्यांना सामाजिक दर्जा, स्थान मिळत असेल, सन्यासाची पोर म्हणुन हिनवणार नसतील तर, देवच घेइल त्यांची काळजी असा विचार करुन ते कुटीत आले.  निवृत्ती-ज्ञानदेवाला जवळ घेऊन बर्‍याच महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!!  संत  ज्ञानेश्वर महाराज चरित्र  !!!

!!   संत  ज्ञानेश्वर   !!

भाग  –  ११.

            ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ सांगत होते, सर्व महान ग्रंथ संस्कृतमधे असल्यामुळे जनसामान्य, सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत जावे, त्यांना कळावे म्हणुन हा परमार्थ विचार मराठी भाषेंत आणुन वेदान्तगंगेचा भगीरथी तु  व्हावेस, ज्यामुळे ही परमार्थाची गंगाजळ सर्वांच्या दाराशी जाईल. त्यांत ते मनसोक्त डुंबतील. मराठी भाषेच्या सावलीत बसुन परमार्थाचं अमृत प्राशन करतील, यासाठी तू मराठीत टीका लिही. निवृत्तीनाथ ज्ञानोबाचे नुसते थोरले भाऊच नव्हते तर त्यांचे ते गुरु सुध्दा होते.आणि गुरुबद्दल ज्ञानोबांच्या मनांत नितांत आदर! त्यांनी आज्ञा शिरसावंद्य मानुन त्यांच्या पायी मस्तक ठेवलं आणि गीतेवरील टीका लिहायला त्यांनी प्रारंभ केला,

‌          महादेवाच्या देवळांतील एका खांबाला टेकुन ज्ञानोबा बसलेत. ज्ञानोबांची कृपा झालेले सच्चिदानंदबाबा लेखणी घेऊन लिहायला सज्ज झाले. समोर निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, संत सज्जनांचा मेळावा बसला आहे. लिनतेने ज्ञानोबा म्हणाले हे काम फार मोठं व अवघड! गीता मराठीत आणायची म्हणजे सुर्याला अंगरखा शिवायचा किंवा सुर्याला उजळुन काढायच! पण माझे श्रीगुरु निवृत्ती कामधेनु, त्यांच्या कृपेनेच हा ग्रंथप्रपंच करायला बसलो.

            आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली . गीता मराठी भाषेत आणली. खरे आणि मऊमवाळ, मोजके आणि रसाळ असे अमृताच्या कल्लोळांसारखेच शब्द! साधीसुधी मर्दमराठ्यांची खडबडीत भाषा, ज्ञानोबांनी तिच्यातुन अमृताचे पाझर फोडले. मराठी रांगडा मराठ्याच्या बोलनेही अमृताशी पैज जिंकावी अशा रसाळ वाणीत अपुर्व असा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी रचला. एवढी वर्षे झाली पण ज्ञानेश्वरीची बरोबरी करणारा ग्रंथ अजुनपर्यंत तरी जन्माला आला नाही.

             एवढा महान ग्रंथ लिहिल्यावर त्यांनी विश्वात्मक देवाजवळ काय मागावं? तर देवानं  या माझ्या वाणीच्या यज्ञानं संतुष्ट होऊन पसायदान घ्यावं! कसलं पसायदान तर दुष्टांचा दुष्टपणा जाऊन चांगली कामं करावीसी वाटावी, वाईटाचा अंधार नष्ट होऊन चहुकडे धर्माचा जयजयकार व्हावा, सगळ्या प्राणीमात्रांत प्रेम निर्माण व्हावं, प्रत्येकाची चांगली इच्छा पुर्ण व्हावी!

         एखादं देऊळ जसं चंदनाच्या अन् उदबत्त्यांच्या सुवासाने दरवळावं तसा महाराष्र्ट ज्ञानेश्वरीच्या परिमलानं घमघमला. सुवास कमी न होता वाढतच राहिला.

          ज्ञानेश्वरी शेवटास नेऊन गुरु निवृत्तीनाथांना समर्पित केल्यावर आणखी काय आज्ञा आहे म्हणून ज्ञानोबांनी विचारल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, आदीनाथ शंकराचे शिष्य मत्छेंद्र, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षांचे शिष्य गहिनिनाथ! त्यांनी आपल्याला उपदेश केल्यामुळे आपण कृतार्थ झालो आहे. त्याची अल्पशी फेड म्हणुन गहिनीनाथांनी सांगीतलेले गुज ग्रंथरुपाने लोकांकरितां गुंफुन ठेवावं.

         आणि ज्ञानोबांनी अनुभवामृत ग्रंथ लिहिला, अनुभवाचं अमृत, ज्याचं मनन केलं की जीव कृतार्थ व्हावा, चहुकडे आनंदच आनंद. “ज्ञानेश्वरी” आणि “अनुभवामृत” दोन युगं निर्माण करणारे ग्रंथ लिहुन झाले आणि मंडळी नेवाशाहुन आळंदीला पोहोचली.

        तापीच्या तीरावर एक महान चांगदेव नांवाचा योगी राहत होता. तो सर्व विद्यांमधे प्रविण, कर्मकाण्ड, ज्योतिष, शिल्प, वैधक, काव्य, नाटक, स्मृति, गारुड, व्याकरण, तर्क या सगळ्या विद्या त्याच्या घरी पाणी भरीत. त्याचा केवढा मोठा शिष्य समुदाय, भला मोठा मठ, पुजा अर्चा, नैवद्य, आरत्या असा सगळा गाजावाजा.

                       क्रमशः
           मिनाक्षी देशमुख

!!!  संत  ज्ञानदेव  !!!

भाग – १२.

          पैठणाला ज्ञानदेवांची झालेली किर्ती ऐकुन व त्यांच झालेल कौतुक पाहुन एक ब्राम्हण चांगदेवाला सांगण्यासाठी तापीतीरी जाऊन  पैठणला झालेल्या सर्व घटनांचा वृतांत कथन केला. एका बारा वर्षाचा मुलगा रेड्यामुखी वेद बोलवतो हे कांही चांगदेवांच्या शिष्यांना पटले नाही, हा ब्राम्हण कांहीतरी थापा मारतो असे वाटुन त्याला मारायला धावले. चांगदेवांनी त्यांना निवारले, थांबवले आणि काय खरी हकीकत घडली ती सांगायला सांगीतले. ब्राम्हणाने सर्व हकीकत सांगीतल्यावर, बारा तेरा वर्षाचा अगदी लहान बालक असं अघटीत कार्य कसं काय करुं शकतो? याचा अचंबा वाटला, त्यांना  फार अस्वस्थ वाटलं! चांगदेव ताडकन उठले आणि समाधीस्थानी जाउन समाधी लावली. त्यांना दिसले की, चार ज्योती हळुहळु पुढे येताहेत, आणि आपला प्रकाश कमी होत आहे! बावरले, घाबरले ते. बाहेर येऊन शिष्याला कागद, बोरु, शाई आणायला सांगीतले.

          काय लिहावे? मोठा पेच पडला त्यांना. चिरंजीव ज्ञानेश्वर लिहिले तर ज्ञानाच्या अधिकाराने मोठे! तिर्थरुप ज्ञानेश्वर कसे लिहावे?चांगदेवांना कांही सुचेना! एकही मायना मनास येईना! शेवटी त्यांना युक्ती सुचली. एक कोरा कागद दोन शिष्यांजवळ देऊन ब्राम्हणासहित आळंदीला रवाना केले.

        चौघं भावंड पोहचण्याआधीच पैठणची किर्ती  आळंदीला पोहोचली. पैठण म्हणजे काशी! पैठणच्या धर्माधिकारी व ब्राम्हणांनी यांच्यापुढे लोटांगण घातल्याचे ऐकल्यावर आळंदीकरांना लाज वाटली. या भावंडांचा सत्कार व उदोउदो करण्यासाठी आळंदीकर त्यांची वाट पाहत होते, तोच ब्राम्हणासहित चांगदेवांचे दोन शिष्य पोहोचले. ज्ञानदेवाला चांगदेवाचे पत्र दिले.ज्ञानोबांनी पत्र पाहुन निवृत्तीनाथांना दिले. निवृत्ती म्हणाले, ज्ञानोबा या पत्राला उत्तर लिही.

       आणि ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या वेदान्ताचा अर्क असलेल्या मराठी भाषेत लिहिलं, त्याचं नांव चांगदेव पासष्टी! शिष्यांनी ज्ञानोबांनी लिहुन दिलेलं उत्तर चांगदेवांना नेऊन दिलं ,

स्वास्ति श्री वटेशू। जो लपोनि जगदाभासु। दावी मग ग्रासु। प्रगटला करी। तया पुत्र तूं वटेश्वराचा। रवा जैसा कापुराचा! चांगदेव तुजमज आपणयाचा। बोलु लाख प्रयत्न करुन। खुप डोकं खर्च करुनही पत्राचा अर्थ कांही उमगेना, कांहीच लक्षात येईना!

            शेवटी हातात नागाचा चाबुक घेऊन, वाघावर स्वार होऊन वाजत गाजत, बरोबर हजारों शिष्यांचा ताफा, डोक्यावर छत्रचामर असे लवाजम्यासहित गर्जत  चांगदेव आळंदी जवळ आले आलेत.  सकाळची वेळ! चौघ भावंड एका भिंतीवर कोवळी ऊन अंगावर घेत बसली होती. धापा टाकीत लोकांनी लोकांनी येऊन त्यांना सांगीतले की, जिवंत वाघावर बसुन , हाती नागाचा चाबुक घेऊन चांगदेव आपल्या भेटीस येत आहे. चौघही गदागदा हसलीत. मुक्ताबाई म्हणाली, एवढं वय झालं, म्हातारपण आलं, पण अहंकार कांही गेला नाही.

          ज्ञानोबा म्हणाले, एवढ्या मोठ्या योग्याला सामोरं तर गेलंच पाहिजे ना! त्यांनी भिंतीला आज्ञा केली. अन् काय आश्चर्य! जड भिंत, निर्जिव भिंत! धावायला लागली. आळंदीकरांना तर  हे अलौकीक पाहुन थक्क झालेत. आणि चांगदेव! त्यांनी ते कौतुक पाहुन क्षणभर स्वतःलाच विसरले. केवढं हे अघटीत? जिवंत वाघाला नमवणं, जिवंत वाघाला खेळवणं हे कठीण असलं तरी एकवेळ प्रशिक्षणाने जमु शकेल, पण दगडमातीची अचेतन, निर्जिव  भिंतीला ज्याने चालवायला लावले त्यांचा अधिकार केवढा मोठा? चांगदेवांचा सर्व अहंकार गळुन पडला. यांच्यापुढे आपण अगदीच शुद्र! चांगदेवाने पटकण वाघावरुन उडी टाकली व धांवत जाऊन ज्ञानदेवांचे पाय धरले. ज्ञानदेवांनी त्यांना उठवुन मुक्ताईला म्हणाले, मुक्ते! हा घे तुझा मुलगा! मुक्ताईने चांगदेवाला उपदेश केला. चांगदेव कृतार्थ झाले. एकनाथांनी म्हटलेच आहे……

चालविली जड भिंती। हरली चांगयाची भ्रांती। मोक्षमार्गाचा सांगाती। ज्ञानोबा माझा!!

                   क्रमशः
                  मिनाक्षी देशमुख.‌‌

!!  संत  ज्ञानेश्वर !!

भाग  –  १३.

          ज्ञानेश्वरांनी ठरविले की, या सर्व भक्तांना कुठ तरी एकत्रीत करुन त्यांना कांही तरी नेम नियम लावणे आवश्यक आहे, त्याशिवाय हे सर्व मोकाट सुटतील, कांहीच धरबंध राहणार नाही. त्यांना आठवलं पंढरीचा पांडुरंग! लहानपणी वडीलांसोबत पाहिलेलं देखणं रुप, गोपाळाचा वेश, हरी आणि हरविष्णू आणि शंकर, दोन्ही देव एकाच ठीकाणी! विष्णुने शंकराला मस्तकावर धारण केललं! अशी दोघांची एकता. जणूं ब्रम्हच वाट चुकुन पंढरीला आले. पुंडलिकाने विटेवर उभं करुन ठेवलं!पांडुरंगाची ज्ञानोबाला आठवण झाली. आणि त्यांना ब्रम्हानंद झाला. अभंगात ते म्हणतात….माझीया जीवाची आवडी। पंढरपुरा नेइन गुढी।। गोविंदाचे गुणी बोधिलें। पांडुरंग मन रंगलें।। पंढरपुरला गुढी नेऊन तिथल्या वाळवंटात नाचाव! तो पंढरीचा निळा! लावण्याचा पुतळा, त्या विठ्ठलाच्या गुणांनी त्यांना वेड लागलं होतं. ते इतके उताविळ झाले की, क्षणाचाही विलंब न लावतां केव्हा पंढरपुरला जाऊन माझ्या माहेरला कडकडुन भेटेन? कधी अलिंगण देईन? आणि सगळा संसार सुखमय करुन टाकीन एवढे आतुर झाले होते.

          ज्ञानोबा सोबत सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव आणि भक्तांचा मेळावा कार्तिक एकादशीसाठी पंढरपुरला निघालेत. त्यावेळी पंढरपुरला संत नामदेवाचा मोठा महिमा, पाटीलकी होती. पांडुरंगाचा मोठा लाडका भक्त! एकटा नामदेवच नाही तर त्याची दासी जनाबाई जी आपल्याबरोबर देवाला दळण, कांडण करविणारी! नामदेवाने ज्ञानदेवाची व ज्ञानदेवाने नामदेवाची किर्ती ऐकली होती, त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटायला मोठे आतुर, उत्सुक झाले होते.

        चंद्रभागेच्या वाळवंटात या संताची  गाठ पडली. ज्ञानानं भक्तीला भेटावं, योगानं प्रेमाला अलिंगन द्यावं, तसं नामदेव व ज्ञानोबांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारली. आणि काय आनंद वर्णावा! भजन, कीर्तनाची धुमाळी सुरु झाली, भक्तीरसाची गंगा दुथडी वाहायला लागली. अपुर्व प्रेमाचा पुरच आला तिथं! कधी नामदेवाने अभंग किर्तन करावे, तर कधी ज्ञानोबांनी! हा सर्व सोहळा जनाबाई स्वतः अनुभवत होती. तिने तिथली गंमत लिहुन ठेवली.

            चंद्रभागेच्या वाळवंटांत भक्तांचा अफाट मेळावा गोळा झालेला, नामदेव काल्याचे किर्तन करीत आहे आणि ज्ञानदेव स्वतः भक्त गोपाळांना लाह्या वाटताहेत. जनाईच्या आग्रहास्तव ज्ञानदेव अभंग गाताहेत, गोड गळा, अपुर्व रंग, मिटलेल्या कमळासारख्या मोठ्या डोळ्यातुन मोत्याच्या धारा वाहताहेत……

जीवाचिया जीवा। प्रेमभावाचिया भावा।तुजवाचोनि केशवा। अनु नावडे।।

अन् किर्तनात असा कांही रंग भरला की, स्वतः परमात्मा किर्तनात उभा राहुन नाचायला लागला….

एकचि टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी।ज्ञानराजा माझा गोपाळांसी लाह्या वाटी।। नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग।। अभंग बोलतां रंग किर्तनी भरिला। प्रेमाचिया छंदे विठ्ठल नाचु लागला।।

        ज्ञानोबांनी पंढरीच्या सगळ्या संताना वेड केले, मोहवुन टाकले. नामदेवाला विसोबा खेचरकडुन गुरुपोदेश घ्यायला लावुन कृतार्थ केले. जनाबाईला आईचे सुख मिळाले नसल्यामुळे ज्ञानोबाचे दर्शन झाल्यावर त्यांच्या रुपाने तीला आई लाभल्याचा आनंद झाला. ती म्हणाली, आई तूं माझी आंधळ्याची काठी, कुण्या सिध्देश्वरात अडकुन राहालास रे! मी तुझी अपंग पाडस! तुझी माझी चुकामुक झाली, डोळ्यांत प्राण आणुन वाट पाहत होती. तीने एवढा आकांत केला की, या जन्मी मरुन जावं आणी ज्ञानाचा सागर ज्ञानाईच्या पोटी जन्म घ्यावा.

                      क्रमशः
                     मिनाक्षी देशमुख

!!!  संत  ज्ञानेशवर  !!!

भाग  –  १४.

        अवघ्या वारकर्‍यांवर अपरंपार प्रेम करुन वेडं केलं. पण हा वारसा पुढे चालवायला नामदेवा सारख्या योग्यतेचा पुरुषच करुं शकेल, म्हणुन त्याला तयार करण्याच्या दृषटीने आपल्या बरोबर तिर्थयात्रा करीत, तळागळातील जनतेची स्थीतीचे अवलोकन व्हावे या  विचाराने त्याला बरोबर हिंडवावं, त्यानुसार ते नामदेवाला म्हणाले, तुझ्या बरोबर अंतरीच्या गुजगोष्टी कराव्यात, त्यासाठी तिर्थ पाहत फिरत फिरत चालतांना सुवांद साधता येईल.पण नामदेवाला प्रश्न पडला, पांडुरंगाला सोडुन कसे जावे? दोघेही देवांजवळ जाऊन जाण्याची आज्ञा मागीतली. देवाने अनुमती दिल्यावर दोघेही उत्तरेकडे निघाले. प्रभास, द्वारका, गिरनार करीत ते चारी धाम हिंडले. ज्ञानोबाची किर्ती चहुकडे पसरलेली! त्यामुळे जिथं तिथं त्यांचं कौतुक होई.

        ज्ञानोबा काशीजवळ आल्याचे कळल्यावर रामनगर जवळ विश्वनाथ त्यांना सामोरे गेले. विश्वनाथ शंकर ज्ञानोबांचे आदिगुरु! आणि आदिनाथ महादेवाच्या परंपरेतले ज्ञानोबा! दोघेही कडकडुन मिठी मारुन भेटल्यावर, आतांपर्यंत केलेल्या कार्याचा परिहार विश्वनाथांना कथन केला. त्यावर प्रेमाने, कौतुकाने म्हणाले, ज्ञानोबा! तू धन्य झालास! जीवन सफल झाले. तुझे कार्य संपले. कृतार्थ झालास!

          नामदेवाशी हितगुज करीत पंढरीला परतले. सावता माळी, जगमित्र नागा, सुदाम, विसोबा खेचर, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका, गोरा कुंभार, ही सगळी मंडळी त्यांच्या स्वागताला जमा झालेत. आणि किर्तनाच्या गजराने पंढरीचं आकाश हरीनामानं दुमदुमलं.भक्तीगंगेला दुथडी जणुं पूर आला. ही सर्व वेडी, बेभान होऊन नाचायला, गायला लागली.

          नामदेवांच्या आग्रहाने ज्ञानोबा किर्तनाला उभे राहिले. आज ते वेगळेच दिसत होते. सर्वांत असुनही त्यांच्यापासुन अलिप्त होते. मन उन्मन, दृष्टी प्रेमाने भरलेली, सगळ्या अंगातुन जणुं तृप्ती वाहते आहे, निवृत्तीनाथ समोर बसलेले, सगळी संत मंडळी टाळ विणा घेऊन उभी आहेत. ज्ञानोबा म्हणाले, माझे जीवन गुरु निवृत्तीनाथांनी कृतार्थ केले. माझ्याकडुन जे कांही कार्य करायचे ते करवुन घेतले व मी ते कार्य माझ्या कुवतीप्रमाणे मनोभावे कायावाचे केलेत. आतां मी माझ्या गावाला जाऊन सुखसागरी विसावा घ्यावा असे मनी आले.

         ज्ञानदेवांच्या तोंडुन हे बोल ऐकले मात्र! सर्व संत मंडळी चैतन्यशुन्य झालीत, त्यांना प्रचंड हादरा बसला, म्हणजे ज्ञानदेव समाधी घेणार! जिथं शंकराचा वास आहे, जिथं अनेक त्रृषी-मुनींनी साधना, तपस्या केली, जे शिवपीठ आहे, अशा आळंदी-अलकापुरीला ज्ञानदेव समाधी घेणार! आधीचीच पवित्र अलंकापुरी, ती अधिकच पावन होणार, उजळणार! जीथे इंद्रायणी झुळझुळ वाहते आहे, जे सिध्दबेट कैलासाहुन श्रेष्ठ आहे, ज्याठीकाणी अलीकडे पलीकडे संतमंडळींच्या भगव्या पताकांनी आकाश कोंदले आहे अशा ठीकाणी ज्ञानदेव समाधी घेणार!

           अवघी संतमंडळी जपीतपी, मुनी, संन्यासी, त्रृषी तिथे गोळा झालीत. कारण हे ज्ञानाचं अंजन, बोलता चालता कैवल्याचा पुतळा, योग्याची जीवनकळा, मोक्षमार्गीचा सांगाती परत दिसायचा, भेटायचा, लाभायचा नाही. सगळे खिन्न होऊन रडताहेत, उदास आहेत. फक्त दोघेच तेवढे प्रसन्न आहेत,ज्ञानदेव आणि पांडुरंग!

        पांडुरंग जगाची सुत्र हलविणारा म्हणुन, अन् ज्ञानोबा! जो अत्यंतिक समाधानी, मन उन्मन झालेलं, अंगावर रोमांच उभे राहिलेले असा ज्ञानोबा स्वरुपी मिळालेला हा विरक्त पुरुष तुमच्या आमच्यातला नाही तर त्याला कसा खेद होईल?

            ज्ञानोबाजवळ जाऊन खेद करायची सोय नाही, मात्र पांडुरंगाजवळ जो तो गार्‍हाणे मांडतो आहे. नामदेव देवाजवळ अगदी कळकळीने, काकुळतेने विचारतो आहे, देवा! ज्याच्यामुळे माझा उध्दार झाला, मला किर्तन करायला लावून तळागळ्यातल्या जनांपर्यत माझ्याकरवी भावना पोहोचवल्या तो जिविचा जिव्हाळा आज आम्हाला सोडुन जाणार? आतां मी काय करुं? कुणाशी हितगुज करु? कंस बोलु? श्रीहरी माझा जीव कासावीस होत आहे रे!

                        क्रमशः
                         मिनाक्षी देशमुख

!!  संत  ज्ञानेश्वर  !!

भाग  –  १५.

          नामदेवाचा आकांत पाहिल्या जात नव्हता. ज्ञानोबांच्या आतांपर्यतच्या कार्याचा आढावा घेत म्हणाले, माझ्या ज्ञानोबाचं कौतुक कुठवर वर्णन करु? रेड्याच्या मुखी वेद म्हणवले, जड भिंत चालविली, परमार्थाची वाट भोळ्या भाविकांसाठी मोकळी करुन पतीतांचा उध्दार केला. योगमार्गाचा दीप पाजळुन भक्तीची पताका फडकविली. अपरंपार भजन, किर्तनाचा सोहळा, गीतेवर मराठीत टीका करुन जन सामान्य, सर्व स्तरांतील लोकांसाठी ज्ञानाचे भांडार उघडे केले.

           देवा! जळाविणं जसा मासा तडफडतो, तशी माझी गत झाली, प्राण कंठाशी आले रे! दाही दिशा उदासवाण्या झाल्यात. योग्याची विभुती चालली रे! मी खंत तरी किती करु? देवाने नामदेवाला जवळ घेऊन आसवे पुसली. त्याचे समाधान करत देव म्हणाला, नाम्या अरे! कुणासाठी येवढा शोकमग्न झालास? ज्ञानदेवासाठी? अरे! तो तर ज्ञान्यांचा देव, योग्यांचा योगी, ज्ञानाची संजीवनी, ज्ञानाचा सागर, आगर, भवसिंधु तरुन पलीकडे नेणारी नांव आहे. ज्ञानदेव हा माझं प्रत्यक्ष रुप आहे. तो कुठही जात नाही की, कुठुनही येत नाही…….

ज्ञानदेव ज्ञानसागरु। ज्ञानदेव ज्ञानगुरु। ज्ञानदेव भवसिंधु तारु। प्रत्यक्ष रुपे पै असे।। ज्ञानदेव हाचि देव।ज्ञानदेवां धरलिया भाव। ज्ञान होईल जीवां सर्व यासी संदेह नाही।।

तरी पण जीथे नामदेवाचे समाधान होत नव्हते, तिथं निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांचे काय? त्यांना काय वाटत असेल? त्यांच्या मनाची अवस्था कशी असेल?ज्ञानदेव भावावेशांत बसले आहेत. निवृत्ती स्फुंदताहेत, सोपान, मुक्ताई ढसाढसा रडताहेत, देव समजावतो आहे, पण कांहीच उपयोग नाही.

निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी। धरियेली कंठी पांडुरंगे।।कळवळती मनीं करिती दीर्घश्वनी। आठविती मनी ज्ञानदेव।।

विकल झालें चित्त संत हे दुश्चत्ता। नामा विकल तेथ होत असे।।

         सर्व साधुसंत निवृत्तीनाथांना समजावूं गेले, तर निवृततीनाथ अत्यंत आर्ततेने, विकलतेने म्हणाले, एखाद्या तळ्याचा बांध फुटावा आणि पाणी बारा वाटेने वाहुं लागावे, गवताच्या पेंडीचै बंधन सुटुन गवत रानोमाळ व्हावं, हरिणीने पाडसाला टाकुन दूर निघुन जावं, अन् पाडसांनी दशदिशा हाकारत शोधावं! अगदी तसच माझं झालं आहे, कसं समाधान करुन घेऊ? अरे! जेव्हा एका रात्री आमचे आई बाबा आम्हाला टाकुन पोरके करुन गेलीत, त्यावेळी तर अगदी लहान होतो, तरी सुध्दा त्यावेळी आतांसारखे मनाला कष्ट झाले नाहीत. आतां माझा ज्ञानोबा  चालला! मी कसं सहन करु? काय करु? निवृत्तीनाथ म्हणजे मुक्त योगी! त्यांच समाधान कुणी करायच? शेवटी  विठ्ठल रुख्माईसह अन् कांही साधुसंत निवृत्तींना समजावत म्हणाले,” निवृत्तीराजा, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानदेवांचे गुरु! तुम्हीच जर असा शोक केला, स्वतःला सावरलं नाही तर, बाकीच्यांनी, अडाणी माणसांनी काय करावे बर?

 कसे बसे निवृत्तीनाथांनी आपल्या भावनांना आवर घालुन मनाला समजाव ले पण सोपान, मुक्ताईचे काय? त्यांच्या दुःखाला तर ना अंत ना पार! मुक्ताईचे पालन पोषण तर आई होऊन ज्ञानोबांनी केले. तीच्या दुःखाची तर कल्पनाच करवत नाही. सोळा वर्षाच्या मुक्ताईने जमीनीवर घालुन घेतले. बिचारीला अगदी लहान, नासमज असतांना आईवडील सोडुन गेलेत, त्यांच्या माघारी ज्ञानोबाच तीचं सर्वस्व होऊन  प्रत्येक नात्याने तीचे आईवडील, भाऊ बहिण, मार्गदर्शक, संरक्षक होऊन तीची वेणीफणी, न्हाऊ माखु घातले , झोपतांना अंगाई म्हणुन झोपवणे, सर्व नात्याने व खर्‍या अर्थाने तीला वाढवले. अशा या ज्ञानोबासाठीची तिच्या दुःखाची परिसीमाच राहिली नाही.

                     क्रमशः
                    मिनाक्षी देशमुख

                         

संत ज्ञानेश्वर म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading