
विठ्ठलपंतांना देहान्ताची शिक्षा फर्मावल्यावर ते क्षणभर विचलित झाले, पण आपल्यानंतर मुलांचे कल्याण होत असेल, त्यांना सामाजिक दर्जा, स्थान मिळत असेल, सन्यासाची पोर म्हणुन हिनवणार नसतील तर, देवच घेइल त्यांची काळजी असा विचार करुन ते कुटीत आले. निवृत्ती-ज्ञानदेवाला जवळ घेऊन बर्याच महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र !!!
भाग – ६.
विठ्ठलपंतांना देहान्ताची शिक्षा फर्मावल्यावर ते क्षणभर विचलित झाले, पण आपल्यानंतर मुलांचे कल्याण होत असेल, त्यांना सामाजिक दर्जा, स्थान मिळत असेल, सन्यासाची पोर म्हणुन हिनवणार नसतील तर, देवच घेइल त्यांची काळजी असा विचार करुन ते कुटीत आले. निवृत्ती-ज्ञानदेवाला जवळ घेऊन बर्याच महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या. निरवानिरवीची भाषा ऐकुन ज्ञानदेवांना शंका आली. त्यांनी विचारल्यावर विठ्ठलपंताने समजावण्याच्या सुरात म्हणाले, तुमची मुंज होऊन शिक्षणासाठी गुरुकडे जाऊ शकाल.
रात्री मुलं झोपल्यावर विठ्ठलपंतानी रखुमाईला खुण करुन कुटीबाहेर बोलावले. ग्रामसभेत घडलेला सर्व वृतांत कथन करुन, प्रयागला जाऊन गंगेत जलसमाधी करण्याचा बेत सांगीतला. हे ऐकल्यावर रखुमाईला ब्रम्हांड आठवले. पतीला थोडं थांबायला सांगुन ती कुटीत शिरली. आपल्या काळजाच्या तुकड्यांना शेवटचे डोळाभर पाहुन बाहेर आली. दोघेही अंधारांत विलिन झाली… नेहमीकरतां!
दुसर्या दिवशी पहाटे निवृत्ती जागा झाल्यावर आई-बाबा सर्वीकडे शोधुनही नाही दिसल्यामुळे त्याला काय झाले असावे याची कल्पना येऊन चुकली. हळुच ज्ञानोबाला ऊठवुन कुटीबाहेर नेले, आणि त्याला घट्ट मिठी मारुन अश्रुला वाट मोकळी करुन दिली.मोठ्या भावाच्या डोळ्यातील अश्रु पाहुन ज्ञानोबास सर्व कांही उमगले.
सोपान, मुक्ताई झोपेतुन उठल्यावर आई-बाबांची चौकशी केल्यावर मोठ्या धीराने ज्ञानोबा त्यांची आई होऊन समजुत काढली. सोशिकता, सहनशीलता त्यांच्या रक्तातच असल्यामुळे त्यांना सावरायला जास्त वेळ लागला नाही. युगांताचं दुःख ते वैरागी मुलं पिऊन गेले. आणि नेहमीप्रमाणे नित्यनेमाणे ध्यानधारणा, योगाभ्यास, भजन किर्तन अशी गतिविधी सुरु केली. सोपानाने मुक्तेला सांभाळावं, आणि निवृत्ती-ज्ञानदेवाने मधुकरीला जावं! पण गांवातल्या ठेकेदारांना तेही सहन झालं नाही. त्यांनी मुलांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना खुप छळावं. विसोबा चाटी नांवाचा वजनदार आसामी तर अग्रस्थानी होता. एकदा मुक्ताला मांडे खायची इच्छा झाली म्हणुन ज्ञानोबाला कुंभाराकडुन खापर आणायला सांगीतले, पण विसोबा चाटीने सर्व कुंभारांना दम दिल्यामुळे ज्ञानोबा रिकाम्या हाताने परत कुटीत येऊन तीला पीठ मळायला सांगीतले. योगसामर्थ्याने ज्ञानोबाची पाठ तव्याइतकी तापवली. मुक्ताई ज्ञानोबाच्या पाठीवर मांडे भाजु लागली. ही मुलं काय करीत असतील या कुतुहलाने विसोबा लपुन कुटीतील दृष्य पाहुन चाटच पडला, सपशेल ज्ञानोबाच्या पायावर कोसळला. तसाच कुटीत धावला. ज्ञानोबाच्या पायावर डोके ठेवुन पश्चाताप दग्ध झाला व त्या क्षणापासुन त्याने प्रपंचाचा त्याग केला. पण एकाने काय होतय? असे कितीतरी विठोबा या कैवल्याच्या पुतळ्यांना छळणारे, दुस्वास करणारे गांवात होतेच.
छळकरांनी परोपरीने त्यांना छळावे, एखादे द्वाड कुत्रंच अंगावर सोडावे, कधी माधुकरी वाढतो म्हणुन तासंतास दारात ऊभं करावं, कधी धक्का देऊन आणलेली माधुकरी सांडवावी वर शिवलास म्हणुन मारायला धावावं, फार फार सहन केलं ज्ञानोबांनी! हाल अपेष्टा, तिरस्कार, चिडवण, धुडकावणं, खेकसणं! एका चांडाळानं तर त्यांच्या भरल्या ताटांत रस्त्यावरची धुळ टाकली अन् ज्ञानोबाच्या सहन शक्तीचा अंत झाला. ताट तिथेच सोडुन विजेसारखे धावत कुटीत शिरले. पुनः या जगाचं तोंड पाहयचं नाही असं ठरवुन कुटीचे दार घट्ट लावुन घेतले. त्यांनी ठरवलं, प्रायोपशन करायचं, आत्मा ब्रम्हांडी नेऊन देहत्याग करायचा. निवृत्ती माधुकरी घेऊन परतला. त्यांनी दाराच्या फटीतुन पाहिलं तर आंत ज्ञानोबा निर्वाणीचं ठाण मांडुन बसलेले दिसले. त्यांनी व सोपानाने दार उघडण्यासाठी काकुळतीने हाका मारल्या पण ज्ञानोबांचा निश्चय कायम! कमळासारख्या डोळ्यांतुन मोत्याच्या सरी पाझरत होत्या.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
!!! संत ज्ञानेश्वर !!!
भाग – ७.
मुक्ता नदीवरुन आल्यावर कळले की, ज्ञानोबादादा दार घट्ट लावुन आंत स्वतःला कोंडुन घेतले. तीने मन घट्ट केले, ही आपली परिक्ष्राच आहे असं समजुन डोळे पुसले व गोड शब्दात दाराशी जाऊन म्हणु लागली……
हात आपुला आपणा लागे। त्याचा करुं नये खेद।। जीभ दातांनी चावली। कोणे बत्तीशी पाडली।। अरे! जग जर संतापाच्या आगीने पेटले, तर आपण पाण्याने विझवावे, लोकांनी केलेल्या शब्दांच्या तलवारीने चौफेर केलेल्या मार्याला उपदेश मानावा. कारण जग म्हणजे काय रे? ब्रम्हाच्या सुताने विणलेला कापड, ते ब्रम्ह आपलं रुप! मग कशाला रागावलास? उघड की रें दार!
योगी पावन मनाचा। साही अपराध जनांचा।। विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावे पाणी।। शब्दशस्रें झाले क्लेश। संती मानावा उपदेश।। विश्वपट ब्रम्हदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।। अरे दादा! साधुपण कां सोपं आहे? लोखंडाचे चणे खावे लागतात, तेव्हा कुठे ब्रम्हपद मिळते. अरे! तूं ज्ञानाचा देव! तूं कोपलास तर जगात सगळा अंधार होईल ना! तुझी लडीवाळ मुक्ता तुला हाक मारत्येय! मुक्तेसाठीही दार उघडणार नाहीस कां? हे सर्व ऐकतांना ज्ञानोबाचा राग दूर होत होता. मन निर्मळ होऊन आसवांच्या वाटे संताप वाहुन जात होता.
ज्ञानोबा झडझडुन उठला , धावत त्यानं दार उघडुन बाहेर उभ्या असलेल्या निवृत्तीच्या पायावर कोसळला. नंतर मुक्तेला मिठीत घेऊन माझी मुक्ता! माझी मुक्ताई! डोळे पुशीत पुटपुटला.
गावातली सगळीच मंडळी काही दुष्ट नव्हती. कांही सुष्ट लोकांना या चार मुलांचा होत असलेला छळ सहन न होऊन दुःखी होत असत. शेवटी एकाने मोठी हिंमत करीत त्यांच्या कुटीकडे आला, त्यावेळी ज्ञानोबांनी रचलेला अभंग म्हणण्यात दंग होता. बाकी भावंड ऐकत होते. तेवढ्यात बाहेर कोणी आल्याची चाहुल लागली म्हणुन निवृत्तीने बाहेर येऊन पाहिले असतां त्यांना बाहेर एक गृहस्थ उभा दिसला. त्याला आंत बोलावले, तो गृहस्थ आंत आल्यावर म्हणाला, तुमचा होणारा छळ पाहवल्या जात नाही, म्हणुन मी तुम्हाला कांही सांगायला आलो. तुम्ही गांवकर्यांसमोर उभे राहुन त्यांना म्हणावं, “आम्हाला प्रायश्चित देऊन पावन करुन घ्यावे”. सांगीतल्याप्रमाणे त्यांनी कबुल केले.
गांवकर्यांची सभा सिध्देश्वराच्या समोर भरली. आणि त्यांच्या समोर उभी होती ही चार भावंड! निवृत्ती हात जोडुन म्हणाले, आपल्या आज्ञेनुसार आमच्या आई वडीलांनी प्रायश्चित घेऊन आम्हाला पोरके करुन गेलेत. आतां त्यांच्या ठायी तुम्हीच आहात. आम्हाला सरतं करुन घेण्यासाठी आम्ही काय करावं ते सांगावं!
आळंदीकर विचारमग्न होऊन विचार विनिमय करुं लागलेत. पोथ्या, ग्रंथ पाहिले, पण सन्यासांच्या मुंजी करायला कुठं कांही आधार सांपडेना! शेवटी सर्वानुमते दक्षिण काशी असलेल्या पैठण क्षेत्री या मुलांना पाठवायचं ठरविले. पैठणकरांनी जर यांना शुध्द करुन घेतले तर इथल्या धर्मधिकार्यांना कांहीच हरकत नसणार!
आळंदीकरांनी विद्वतसभेसाठी पत्र देऊन मुलांना शुध्दीकरणाकरितां एकमताने पैठणला पाठवण्याचे निश्चीत केले. चौघही भावंड कुटीत परतलेत. इंद्रायणीकाठी बसुन निवृत्ती ज्ञानदेवांची चर्चा करुं लागले. ज्ञानोबांनी आतां काय करायचे विचारल्यावर शांतपणे डोळे मिटुन निवृत्ती म्हणाले, पैठणच्या विद्वानांकडुन कोणता आणि कोठला निकाल आणायचा? आपली मुंज करतां येईल की नाही? ज्ञानोबा मुंज कोणाची करायची? कुणी करायची? आपण ना ब्राम्हण, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शुद्र! ज्ञानोबा आपण देव, यक्ष, किन्नर, त्रृषी आणि निशाचरही नाही. आप ? तेज? वायु? आकाश? पृथ्वी? या पंचमहाभुत, यापैकी एकही नाही. सगुन होऊन प्रगटलो नाही की, निर्गुन होऊन प्रगटलो नाही.आम्ही अविनाशी ब्रम्ह! अव्यक्त चैतन्य! जे सगळ्यात भरुन आहे ते!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
!!! संत ज्ञानेश्वर !!!
भाग – ८ .
निवृत्ती म्हणाले, ज्ञानोबा! कशाला पैठण? कशाला विद्वत्सभा? सोपाणला व मुक्तालाही विचार पटल्याने त्यांनी सम्मतीदर्शक मान डोलावली. पण ज्ञानोबा? ज्ञानोबांचे विचार करण्याची पध्दतच वेगळी! चाकोरी सोडुन जगावेगळं जाणे, धर्माच्या, शास्राच्या बाहेरचे वर्तन त्यांना कसं पटावे? शास्राची आज्ञा झाली व तशीच वेळ आली तर राज्यावरही पाणी सोडावे….. शास्र म्हणेल जें सांडावे.। तें राज्यही तृण मानावे।। कार्याकार्य विवेकी। शास्रेंची करावीं पारखीं।। अगदी हेच तत्व ज्ञानोबा या वेळीही बोलले. दादा! आपला अधिकार मोठा! मी आपल्या समोर अजान! पण दादा! आज नाही तरी उद्या लोकांना आपल्या वागण्यावर शंका न घेता, आपलेच बरोबर आहे असा त्यांना दृढविश्वास येईल.
पण याचा परिणाम? जो तो आपल्या मनाप्रमाणे वागेल. धर्माचं बंधन तुटुन अराजकता माजेल, कुणी कुणाचं ऐकणार नाही. कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत राहणार नाही! आणि मग सगळीकडे अधर्माचे राज्य होईल, कुणामुळे? आपल्यामुळे! आपला शुध्द हेतू लोकांना दिसणार नाही, फक्त वागणं तेवढ त्यांना दिसेल. असं होऊ द्यायचं की, धर्माप्रमाणे वागुन जगापुढे आदर्श ठेवायचा?
स्वधर्म अधिकार जातीपरत्वे भेद। उचित तें शुध्द ज्याचें तथा।। म्हणोनियां संती अवश्य आचारावें। जना दाखवावे वर्तोनियां।।प्रत्यवाय आहे अशास्रीं चालतां। पावन अवस्था जरी झाली।।ज्ञानदेव म्हणे ऐका जी निवृत्ती। बोलिली पध्दती धर्मशास्रीं।। शेवटी आपण सांगाल तेच होईल! निवृत्ती गोड हंसले, प्रेमाणे अलिंगण देत म्हणाले, चला आपण पैठणला जायचेय! आणि चौघांचीही पैठणची महायात्रा सुरु झाली.
आळंदी ते पैठण….कोरडा मुलुख, रुक्ष जमीन। हा शंकर-महादेवाचा देश. त्याला रुक्ष, ओसाड! उदास, आवडेल. सुपीक जमीन कशी आवडेल? त्याच भूमीत बसुन आदीनाथ शंकर-ऊमाची तात्वीक चर्चा चालायची.
वर रखरखलेला भास्कर तापतोय, खाली धरती गरम, भाजणारे उसासे टाकतेय. मृगजळाचे वाफारे, हाती कांहीच न लागणारे वाफारे पळताहेत, कुठे पाण्याचा थेंब नाही अशा ओसाडीतुन या चौघांना एकदाचं पैठणला पोहोचलंच पाहिजे. कारण त्यांचा खांद्यावर उद्याच्या धर्माचं राऊळ उभं राहायचंय! यांच्या अंगातुन गळणार्या घामातुन उद्याची धर्माची शेती पिकवायचीय! या फुफाट्यांतुन उठणार्या पावलांवर पाऊल टाकुन ऊद्याचा महाराष्र्ट निर्माण करायचाय!
वाटेतील कोरडे ठणठणीत ओढे, भकास माळराण, बोडक्या टेकड्या, कोरड्या नद्या, तलखी करीत पावसाची वाट पाहणारी चिराळलेली शेती हे सगळं पार करीत एका संध्याकाळी ही भावंड पैठणला येऊन पोहोचली. त्यांना गोदामाई दिसल्यावर तिच्यात मनसोक्त डुंबुन वाटेत आलेला सर्व शिणभाग निघुन गेला. रात्र एका देवळाच्या ओवरीत काढली.
दुसर्या दिवशी ही भावंड पैठणभर फिरुन गोदामाईच्या काठावर बांधलेली कधीकाळीची मोठमोठी देखणी देवळं, जिथं विद्वान ब्राम्हणांच्या वादसभा होत, ते सभामंडप वगैरे पाहुन शेवटी धर्माधीकार्यांच ठीकाण त्यांनी शोधुन काढलच!
धर्माधिकारी अन् मोठमोठे शास्री मंडळींची गांवदेवळात विविध विषयांवर वाद सुरु होता. त्या शास्री मंडळीत कुणी सहाशास्री, कुणी दशग्रंथी, कुणी नैय्यायिक, तर कुणी सांख्यशास्री होते.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
: !!! संत ज्ञानदेव !!!
भाग – ९.
ह्या विद्वत् महान शास्रीमंडळी समोर जाऊन या चार लेकरांनी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्या कोवळ्या,कोमल बालकांना पाहुन शास्रीमंडळींना मोठं नवल व कौतुक वाटले. ज्ञानोबाचं रुप कसं होत, तर त्यांनीच स्वतःचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात केलेलं आहे.
तो कनकचंपकाचा कळा। कीं अमृताचा पुतळा। नानि रासिन्नला गळा। कोवळीकाचा।। हां हो जे शारदियाचे बोले। चंद्रबिंब पाल्हेलें। का तेजाची मुर्त बैसलें। आसनावरी।। अशी ती चार रुपडी नमस्कार करतांना पाहुन धर्माधिकारींनी काय हवं म्हणुन विचारले असतां, आळंदीहुन आणलेले पत्र त्यांच्या हातात दिले. इतर मंडळींनीही पत्र वाचल्यावर, एवढी देखणी मुलं अन् सन्याशाची! म्हणुन गोंधळात पडली.भानावर येऊन शेवटी धर्माधिकारी त्या भावंडांना म्हणाले, हा प्रश्न आमच्यासाठी नविन आहे, आजवर असं कधी घडलं नाही म्हणुन पैठणमधले विद्वान शास्री गोळा करुन विचारविमर्श करण्यासाठी हा प्रश्न सभेसमोर ठेवावा लागेल.
बातमी सबंध पैठणभर पसरली. दुसर्या दिवशी सभा भरली. धर्माधिकारी, झाडुन सारे पैठणकर शास्री, पंडीत समेला उपस्थीत झालेत. आणि या सन्यास्यांच्या चार मुलांना बघायला चिक्कार गर्दी झाली. कुणी त्यांना पहायला, कुणी त्यांची थट्टा, टिंगल, शिव्या द्यायला जमा झालेत. अन् ही चारही भावंड सभेसमोर येऊन हजर झालीत.
यांनी आणलेलं पत्र धर्माधिकार्यांनी सगळ्या सभेला वाचुन दाखविले. झालं! पोथ्यांचे बंद सुटले. ग्रंथांची पाणं फडफडायला लागली, सगळ्या स्मृती धुंडाळुन निघाल्यात. पण मार्ग कांही सांपडेना! शेवटी धर्माधिकार्यांनी मुलांना सांगीतले की, आम्ही सर्व शास्र शोधली पण तुमच्यासाठी कांही मार्ग सांपडला नाही.म्हणुन तुमची मुंज करतां येत नाही. तुम्ही देवाची मनोभावे भक्ती करावी. सचोटीने वागावे, भजन किर्तन करुन समाजाचे प्रबोधन करावे. सगळ्यांच्या ठीकाणी समभाव ठेवावा.हे ऐकुन चौघाही भावंडांना खुप आनंद झाला.
पण टवाळखोरांना इतका सरळसरळ लागलेला निकाल कांही आवडला नाही.त्यांना विशेष कांहीतरी खरबरीत, विपरीत बोलाचाली अपेक्षित होती. कांहीच न घडतां सहजा सहजी मिटलेलं प्रकरण त्यांना कसं बरं पचनी पडेल? काहीतरी खुसपट काढुन या मुलांना हैराण करावं, त्रास द्यावा असा त्यांचा विचार सुरु होता, तोच ज्ञान्या नावाचा पखालीचा रेडा येतांना टवाळखोरांना दिसला. त्यातला एकजन म्हणाला या दोघांचे नांव एकच आहे, दोघेही भाऊच की जणुं!
ज्ञानोबानं ऐकलं मात्र, तसा तो तेजाचा पुतळा तेजाळत म्हणाला, या रेड्यातील चैतन्य आणि माझ्यातील चैतन्य सर्वात्मक दोन्ही एकच आहे. तो निंदक उठुन पखालवाल्याच्य हातातला आसुड घेतला अन् रेड्याच्या पाठीवर सटासट तडाखे मारायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! प्रत्येक तडाखा रेड्याच्या पाठीवर अन् तांबडा निळा ऊठावदार वळ ज्ञानोबाच्या पाठीवर! ज्ञानोबाची पाठ सगळी फुलुन निघाली.
मग मात्र निंदक हादरले. तरी एकजण धीर धरुन चाचरत म्हणालाच, हा जादुटोणा, विद्या असुं शकते. तुम्हा दोघांच चैतन्य ऐकच आहे ना, तर तु या रेड्याच्या मुखातुन वेदमंत्र वदवुन दाखवं! ज्ञानोबांनी हसत हसत आव्हान स्विकारले. ज्ञानोबा रेड्याजवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवुन म्हणाले,या भूदेवाची तुला आज्ञा आहे. तूं रुग्वेद आणिं ओंकार म्हणुन दाखव.
आणि अद्भुत घडलं! अत्यंत स्वच्छ, स्पष्ट स्वरांसहित वेदमंत्रांचा घोष रेड्याच्या मुखातुन सुरु झाला, ॐ अग्निमीळे पुरोहितम्। यज्ञस्य देवमृतविजम्। होतारम् रत्नघातमम्।। हे अद्भुत आश्चर्य पाहुन सर्व पंडीत शास्री पटापट ज्ञानोबांच्या पायी कोसळले. निंदकांनी स्वतःच्या तोंडात मारुन घेतले. सज्जनांना आनंद झाला. एकनाथांनी म्हटलंच आहे……
रेड्यामुखीं वेद बोलविला। गर्व द्विजांचा हरविला। शांतीरुपे प्रगटला ज्ञानोबा माझा।।
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
!!! संत ज्ञानेश्वर !!!
भाग – १०.
आतां कुचेष्टा, थट्टा, मस्करी, टिंगल टवाळी मागे पडली. त्यांचा जिकडे तिकडे जयजयकार होऊ लागला. धर्माधिकारी हात जोडुन म्हणाले, आम्ही काय आपल्याला पावन करुन घेणार? आपण पावन करुन घेण्याच्या पलीकडे आहात. सर्व त्रिभुवन पावन करण्याची आपली योग्यता! आपल्याला सरतं करुन घ्यायची भाषा म्हणजे सुर्याला काजवा दाखवण्यासारखेच आहे.
कर्मठपणाच्या अभिमानानं सर्व जीवन व्यर्थ, वाया गेले. फुकाचा डौल! कशाचे आम्ही शास्री, पंडीत? वैराग्य माहित नाही, भक्तीची ओळख नसलेली, नुसते प्रपंचाचे दास! आपल्याला मुंज करुन घेण्याची गरजच नाही. मुक्त आहात आपण.
निंदक वंदु लागले, कुचेष्टा करणारे लोटांगण घालु लागले. ही चौघे भावंड जिथे असतील तिथे ही तोबा गर्दी! प्रत्येकाचा आग्रह, आपल्या घरी येऊन चटणी भाकर जेवायला यावे. कांही दिवस पैठणमधे मोठ्या आनंदात गेले. भजनाचा, किर्तनाचा,प्रवचनाचा, श्रवणाचा आनंद!
संध्याकाळी देवळात रसाळ प्रवचण करावं! कधी ज्ञानोबा स्व-रचित एखादा देखणा अभंग म्हणावा, किर्तनाला उभं राहावं. निवृत्तीदादा ज्ञानोबाचे गुरु, त्यांनी समोर बसावं, मागे सोपान, मुक्ताबाईंनी टाळ घेऊन ऊभे राहावं! गर्दी एवढी की, मुंगी शिरायला वाव नसायचा. झाडुन सर्व पैठण लोटायचं ! ज्ञानोबाच्या एखाद्या अभंगात गोकुळातल्या एखाद्या गोपीचं वर्णन करतांना श्रीहरी कुठे गेला? तो सांपडेना म्हणुन गोपीची तळमळ व्यक्त करायचे तर कधी श्रीहरीची वाट पाहणार्या गोपीचं रसाळ वाणीत हुबेहुब वर्णन करायचेत.
कधी ज्ञानोबानं गोपाळाचं रुपक करुन देवाशी भांडण उकरुन काढावं. तो( गोपाळ) देवाला म्हणतो, देवा, तु मोठा लबाड आहेस. स्वतः तेवढी चांगली घोंगडी, जी सत्वगुणांनी विणलेली आहे, तिला रत्नांनी जडवलेले सहा गुणांचे गोंडे आहेत आणि आम्हाला मात्र सहा विकारांनी विणलेली फाटकी, नऊ ठीकाणी ऊसवलेली अशी वाईट घोंगडी तेवढी आम्हाला!
ज्ञानोबांनी जणुं सगळ्या पैठणला वेडच लावले. आळंदीकरांच्या समाधानासाठी पैठणकरांनी या भावंडाच्या हाती पत्र लिहुन दिले. काय लिहिले होते त्या पत्रात? नामदेवांनी सांगीतलय, हे परलोकीचे तारुं देवत्रय यांसी। प्रायश्चितासी घ्यावे कोणी।। जणुं हे तिघेही ब्रम्ह, विष्णु, महेशच! तेव्हा यांना कोणी आणि काय प्रायश्चित देणार? उलट यांच्या संगतीत राहणारेही संसारसागर तरुन जातील, एवढा यांचा महिमा!
पत्र घेऊन हे चार बाल साधु, बरोबर भक्त मंडळी, हरी रंगात रंगलेली, गांवोगावी भक्तीचा पूर वाहावित प्रवरातीरी नेवाशाला पोहचलेत. नेवासा गांव मोठं देखणं! प्रवर नदीला मोठाले घाट, गांवात मोहणीराजांचे देऊळ, मोहणीराज म्हणजे महामाया. देव-दैत्यात अमृतासाठी भांडण झाले तेव्हा श्रीविष्णूंनी आदीमायाचं रुप घेतलं. ती आदीमाया म्हणजेच मोहणीराज! नेवाशाला त्यांचं वास्तव्य, त्यामुळे या गावाला क्षेत्राचा महिमा!
गांवाबाहेर प्रवरेकाठी असलेल्या महादेवाच्या देवळांत ही सर्व मंडळी उतरली. ओघवती, रसाळ वाणीत भजनं किर्तन, भक्तिचा रंग जमु लागला. एके दिवशी निवृत्तीनाथ ज्ञानोबाला म्हणाले, अरे! आजपर्यतचा सगळा परमार्थ, गीता, महाभारत, रामायण, स्मृती, पुराण हे सगळं संस्कृतमधे असल्यामुळे याची मक्तेदारी फक्त विद्वान ब्राम्हणांकडेच! भोळ्या भाबड्या जनतेला यापासुन वंचितच राहावे लागले. परमार्थरुपी ही गंगा त्यांच्यापर्यत पोहचलीच नाही.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख


