जनक नंदिनी सीता चरित्र भाग ५, (२१ ते २७)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


            आज *मंदोदरी* मंचकावर पहुडली होती. सकाळपासुनच तीला फार अस्वस्थ वाटत होते. बाहेर वातावरण सुध्दा कुंद होते. सगळीकडे उदासीनता व्यापुन आहे अस तीला वाटत होते. सारखी तगमग होत होती तीच्या जीवाची.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सीता चरित्र !!!

सीता*

*भागः-२१*

राजसभेमधे रावणाला परोपरीने सर्वांनी समजावले की, हनुमान दूत म्हणुन आलेला आहे, त्याचा अपमान, विटंबना करु नकोस पण रावण कोणाचे काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याचे आजोबा *माल्यवान* ज्यांनी युध्दसदृश्य परिस्थिती पाहून आपल्या राज्यातून बरेचसे गलबते सैन्यांनी भरुन आणले, त्यांनी सुध्दा समजावले. तेव्हा रावण आजोबाला म्हणाला, “ज्यावेळी शूर्पणखेची विटंबना झाली, त्यावेळी तीच्या अहवेलनेने मी पेटुन उठलो, त्यांच्या तोडीस तोड सीतेला पळवुन आणून उलट उत्तर दिले. पण त्यावेळी आपण एका भयाण कृष्णविवराकडे जाणार्‍या मार्गावर प्रस्थान ठेवल्याचे भान नव्हते. सुडाच्या शत्रुत्वाच्या विचारांनी पुरता ग्रासलो होतो. भानावर आलो तेव्हा परतीचे मार्ग बंद झाल्याचे ध्यानात आले.”

रावण पुढे म्हणाला, “सीतेची पाठवणी करण्याबाबत मला सर्वानी समजावले. पण नीट विचार केला तर लक्षात येईल की, राम लक्ष्मणाच्या लंकेवर स्वारीचा उद्देश फक्त सीतेची सुटका नव्हे तर लंकेतुन रावणाचे समुळ उच्चाटन हा आहे. सीतेची पाठवणी करुन चेष्टेचा विषय बनण्यापेक्षा आलेल्या परिस्थिला धैर्याने सामोरे जाणे एवढेच माझ्या हाती राहीले आहे. सीता हे त्यांचे निमित्यमात्र आहे.”

इकडे हनुमानाने पेटलेल्या शेपटीने जेवढी नासधुस करता येईल तेवढी करत, लंकेच्या युध्दपरिस्थितीचे, भौगोलीक, सामाजीक अवलोकन करुन समग्र माहिती संकलीत करुन शेपटी समुद्रात विझवुन रामाकडे परतला.

इकडे रावणाने लंकेतील सर्व नागरीकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने माल्यवानने आणलेल्या गलबतातुन पाठवुन दिले. मंदोदरीने मात्र अट्टाहासाने शेवटपर्यत रावणाच्या साथीलाच राहण्याचे ठरविले. रावणाने मंदोदरीचे समाधान करतांना सांगीतले की, ” *शूर्पणखा* किंवा *सीता* हे निमित्य मात्र आहेत. मुळात दण्डकारण्यात वनवासाला येणे, जनस्थानका जवळ मुक्काम करणे ह्या गोष्टी योगायोगाच्या नाहीत. शूर्पणखेचे निमित्य नसते तर त्यांनी अन्य मार्ग पत्करला असता. *एका विशिष्ट हेतुने त्यांनी वनवास पत्करला आहे.* “

सर्व निघून गेल्यावर लंका नगरी, राजगृह सुने सूने भासत होते. मंदोदरीसाठी फक्त एक दासी मागे राहिली. अशा उदास वातावरणात तीला भडभडुन आले. एकदा तीला वाटले अशोक वनात जाऊन सीतेला आपल्या पोटच्या कन्येला पाहून यावे. पण तीलाच प्रश्न पडला, अखेर तीला पाहुन आपण काय साधणार? ममत्वं? मनाला विरंगुळा? आता यापैकी कशाचीच गरज आपल्याला नाही याची जाणिव झाली व अशोकवनात जाण्याचे रहित केले.

राजगृहाप्रमाणेच लवकरच लंकानगरी सुनी होणार, राजप्रसादाला आक्रमणाच्या प्रतिक्षेत अखेरच्या घटका मोजत उरलेला काळ व्यतीत करणे एवढेच हाती राहिले.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता*

*भागः-२२*

हनूमानाने लंकाप्रवेशाची जागा हेरुन समग्र माहिती रामाला येऊन कथन केल्यावर रामाच्या नेतृत्वाखाली वानर, अस्वले, गिधाडे आणि अन्य प्राण्यांची प्रचंड सेना हनुमानाच्या पाठोपाठ जाऊ लागली. समुद्र ओलांडतांना कठीनाई आली तेव्हा रामाने वरुणाला विनंती केली त्यानुसार वरुणाने प्रगट होऊन सांगीतले की, तुझ्या सेनेमधे अग्निचे मुलगे *नल* आणि *नील* उत्कृष्ठ अभियंते आहेत. त्यांना सेतु बांधवायला सांग तो सेतु मी तरता ठेवीन. हा सेतु बांधण्यासाठी अनेक पशूपक्षी यांनी रामास भरपूर मदत केली. विशेषतः वानर, हत्ती, हरणं, कावळे व एक खारही होती. तीचाही सेतु बांधण्यात वाटा होता.

पुलाचं काम सुरु असतांना लंकेकडुन जांबुद्वीपकडे काहीतरी तरंगत येतांना दिसले. ते एका स्रीचे धड होते लक्ष्मणाने सीतेचे पाऊले ओळखली. ही वार्ता रामाला कळल्याबरोबर त्यांचा विश्वासच बसेना. राम ते शरीर बघण्यासाठी त्वरेने समुद्राकडे पोहोचला. पाहतो तर हनुमानाने दहनाची तयारी सुरु केली होती. रामाकडे दुर्लक्ष करुन हनुमानाने चितेला अग्नि दिल्याबरोबर एक भयानक किंकाळी चितेतुन उठली. आणि मृतदेह जिवंत होऊन चितेतुन बाहेर पडली. ती मायाविनी राक्षसी *बेंजकाया* होती.

असाच प्रयोग अशोकवनात राम लक्ष्मणाचे शीर सीतेसमोर नेऊन केला. परंतु ती सुद्धा फसली नाही. वानर सेनेत बिभिषण त्यांना यथाशक्ती मदत करीत असतांना त्याला त्यांच्यात कांही रुप पालटणारे रावणाचे हेर, शुक, शार्दुल, हरणं इ. दिसले. रामाने त्यांना इथली स्थिती रावणाला सांगून त्याचे मनोधैर्य अधिकाधिक खच्ची होईल या उद्देशाने लंकेला वार्तांकन करण्यासाठी परत रावणाकडे जाऊ दिले.

समुद्राची राणी *सुवर्ण मत्स्यकन्या* ही रावणाची चाहती होती. पण ती हनुमानावर आसक्त झाली. पण हनुमानाचा रामाबद्दलचा निस्पृह भाव पाहुन रावणाचा धोका पत्करुनही तीने पुल बांधण्यास मदत केली. तीच्या मनात आले की, अपेक्षाचे जाळं तोडलं तर आपल्या विश्वाच्या कक्षा रुंदावू शकतो. अपेक्षांमधे स्वतःला गुरफटुन घेतलं तर आपलं विश्व आपणच संकुचित करु.

अवघ्या पांच दिवसांत केवळ काड्या, झाड पाला, आणि दगडाच्या साहाय्याने सेतु बांधुन पुर्ण झाला. सेतुवरुन लंकेच्या किनार्‍यावर सैन्य पोहोचणार एवढ्यात मोठा स्फोट झाला, रावणाने दोन शक्तीशाली अस्रे सोडुन सेतुची दोन्ही टोके मोडुन टाकली. परंतु हनुमानाने शेपटी लांब करुन शेपटीवरुन सेना लंकेत पोहचवली. एवढ्यात बिभिषनाला सेनेच्या दिशेने *भस्मलोचन* राक्षस येतांना दिसला. रामाने लगेच बाण सोडुन त्याचा आरसा तयार केला. सैन्याला भस्म करण्यासाठी भस्मलोचनाने डोळ्याची पट्टी सोडल्या बरोबर त्या आरशात तो स्वतःच दिसला आणि भस्म झाला.

लंकेत प्रवेश झाल्यावर वानरच ते त्यांनी नुसता गोंधळ घातला. इंद्रजीतला हा अपमान सहन झाला नाही. त्याने राम लक्ष्मणावर *नागपाश* बाण सोडुन सापाच्या विळख्याने जेरबंद केले. विषामुळे व जखडल्यामुळे दोघेही निश्चल झाले. तेवढ्यात गरुडाने येऊन त्यांची सुटका केली.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-२३*

युध्द सुरु होण्यापुर्वी रामाचा दूत म्हणुन *अंगदला* रावणाच्या राजसभेत पाठविले.

“फार वर्षापुर्वी ज्या *वालीने* रावणाभोवती त्याची शेपटी गुंडाळून संबंध किष्किंधाभर फिरवले होते त्या वालीचा पुत्र अंगद रामाचा दूत म्हणुन आलो” अशी ओळख करुन दिली. आणि रामाचा संदेश कथन केला. राम त्याची वानर सेना घेऊन नगरीच्या वेशीबाहेर आक्रमणासाठी सज्ज आहे. रामाला त्याची पत्नी सीता परत दिली तर शांती राहु शकते.

रावणाने त्याचे म्हणणे झीडकारुन लावले. अंगदने आपला डावा पाय घट्ट जमीनीत रोवला व तो कोणीही हलविण्याचे आव्हान दिले. पण सर्वांचे प्रयत्न निष्फळ झाले. रावणाचे वडील सुमाली, भाऊ माल्यवान, आई कैकसी, सर्वांनी रावणाला सलोख्याचा सल्ला दिला, परंतु त्याने कोणाचेही ऐकले नाही.

शेवटी युध्दाला तोंड लागलेच. अतोनात हानी झाली. दोन्हीकडचे सैन्य मृत्युमुखी पडले. रावणाच्या बाणाला प्रत्युत्तर म्हणुन रामाने त्याला एका ठिकाणी जखडल्यासारखे केले. अगतिकतेने रावणाने धनुष्य खाली टाकल्यावर रामाने त्याला माघारी जाऊ दिले.

रावणाने सैन्य मागे घेतल्याची वार्ता नगरात पसरली. युध्द पुनः सुरु झाले व रावणाने आपल्या पुत्रांना लढण्यासाठी पाठविले. त्यांची छिन्नभिन्न प्रेतेच परत आली. शेवटी इंद्रजीतने सैन्याचे नेतृत्व हाती घेतले. इंद्रजीत जन्माला आला होता तेव्हा तो रडण्याऐवजी वादळी मेघासारखी गर्जना केली म्हणुन त्याचे नाव *मेघनाद*, आणि युध्दात इंद्राला जिंकले म्हणुन *इंद्रजीत* हे नामानिधान प्राप्त झाले.

भयंकर लढाई झाली इंद्रजीत मायावी शक्ती वापरत होता. कधी भ्रामक प्रतिमा, तर कधी उडत्या रथात सीता दिसायची, तर कधी वानर सेनेच्या डोक्यावर तीचे तुकडे तुकडे केलेले दिसायचे. यामुळे क्षणभर राम सुध्दा विचलीत झाले. पण लवकरच सर्व प्रकार रामाच्या लक्षात आला. इंद्रजीतच्या लक्षात आले की, रामाचा लक्ष्मण कच्चा दुवा (Weak point) आहे, लक्ष्मण ही रामाची हळवी जागा आहे हे इंद्रजीतने ताडले आणि सर्व लक्ष लक्ष्मणावर केंद्रीत केले. दोघांमधे घनघोर युध्द झाले. इंद्रजीतच्या एका बाणाने लक्ष्मणाच्या छातीचा वेध घेतलाच. ते पाहुन राम वेडापीसा झाला.

लक्ष्मणाच्या अंगात विष भिनत चाललेले पाहुन वृध्द जांबूवंत हनुमानाला विंध्य पर्वताच्या सुदूर उत्तरेला हिमालयाच्या उतारावर गंधमान पर्वतावर असलेली *संजीवनी वनस्पती* सुर्योदयापुर्वी आणायला पाठवले. हे मनोर्‍यावरुन रावणाने पाहिले आणि कालनेमी राक्षसाला हनुमानाच्या मोहीमेत विघ्न आणण्यास पाठविले.

हनुमान गंधमादन पर्वतावर पोहचल्यावर तिथल्या तलावात स्नान करीत असतांना एक शापीत अप्सरा मगरीच्या रुपात त्याच्याशी झगडत होती. त्याच्या जवळ वेळ फार कमी होता. शेवटी तिच्यावर मात करुन तिच्या सहाय्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. संजीवनी वनस्पतीच्या शोधात हनुमानाने पुर्ण पर्वत पालथा घातला, पण हवी ती वनस्पती न कळल्यामुळे पुर्ण पर्वतच उचलुन लंकेत नेत असतांना अयोध्येवरुन जावे लागले. तिथे भरताची भेट झाली. लक्ष्मण संकटात आहे हे कळल्यामुळे भरताने आपल्या बाणावर एका हातात पर्वत आणि एका बगलेत रावणाने वेळेपुर्वीच सुर्योदय करण्यास भाग पाडले म्हणुन सुर्य घेऊन भरताच्या बाणावर आरुढ होऊन वेळेत लंकेत पोहचल्यामुळे ती संजीवनी औषधी लक्ष्मणाला देता आली.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-२४*

लक्ष्मण सावरलेला पाहुन इंद्रजीत भयंकर संतापला. त्याला माहित झाले की, लक्ष्मण गेल्या तेरा वर्षात झोपला नाही आणि ब्रम्हचर्य व्रत कडकडीत पाळले होते. इंद्रजीतचा मृत्यु अशाच व्यक्तीच्या होण्याचे भाकीत होते. भयभीत झालेल्या इंद्रजीतने *निकुम्बिला* टेकडीवरच्या गुहेतील देवीला बळी देऊन प्रसन्न करण्यास गेला असता विभिषणाच्या सहाय्याने लक्ष्मणाने त्याचा माग काढला. दोघांमधे तुंबळ युध्द झाले. शेवटी लक्ष्मणाने एक चंद्राकृति बाण सोडुन त्याचा वध केला. त्याचे शीर थेट रावणाच्या सभागृहात पडले. पुत्राचे छेदलेले मस्तक पाहुन रावण मंदोदरीला अतोनात दुःख झाले. लंकेचा सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम योध्दा हरपला.

इंद्रजीतची पत्नी सुलोचना रामाच्या युध्दभुमीवर पतीचे पडलेल त्याच धड घेऊन परतली. असं घडणारच याची पुर्ण खात्री असल्यामुळे आलेले प्राक्तन तीने धैर्याने स्विकारण्याची मनाची तयारी केली होती आणि त्याप्रमाणे पतीच्या दहनाबरोबर स्वतः सती गेली आणि तेव्हापासुनच ही बेकायदेशीर प्रथा रुढ झाली.

कुंभकर्णाच्या तपस्येमुळे त्याला (इंद्रासन) इंद्राचे आसन मागायचे असते पण चुकुन (निद्रासन) झोपेचे आसन मागीतले गेले. वर्षातुन फक्त एकच दिवस तो स्वतःहुन जागा झाला तर त्या दिवशी तो अजिंक्य असेल, पण दुसर्‍याने त्याच्या झोपेत व्यत्यय आणला तर त्याच दिवशी त्याचे मरण असेल असा वर त्याला मिळाला होता. ढोल-ताशे, सुगंधीत पदार्थ ठेवुन त्याला ऊठवल्यावर तो शस्रास्राने सज्ज होऊन रणांगणात उतरला. घनघोर युध्द झाले. भाकीताप्रमाणे त्याच दिवशी त्याचा रामाच्या बाणाने मृत्यु झाला. नंतर तरणीसेन युध्दात उतरला. त्याच्या पुर्ण अंगभर रामनाम गोंदवले होते. बिभिषनाच्या सल्याने दोन उच्चारांच्या मध्ये रामाने बाण मारला.आणि तो मृत्युमुखी पडला. तो विभिषनाचा पुत्र होता.

विभिषणाच्या कयासाप्रमाणे रावण त्याचा मित्र महिरावणाकडे गेला. राम लक्ष्मणाच्या संरक्षणासाठी वेटोळे करुन तटबंदी ऊभारली. महिरावणाने शिरकाव करण्यासाठी त्याने अनेक रुपे घेतली. शेवटी विभिषणाचे रुप घेतल्यामुळे हनुमान फसला. महिरावणाने राम लक्ष्मणावर मोहिनी घालुन पाताळलोकी नेले.

शोध घेतल्यावर हनुमान पाताळाच्या प्रवेशद्वाराशी पोहचला. तिथे त्याचा सामना त्याचाच मुलगा मकरध्वजाशी झाला. हनुमान आजन्म ब्रम्हचारी असल्यावर मुलगा असल्याचे त्याने सांगीतले ते पटले नाही. तेव्हा मकरध्वजाने सांगीतले की हनुमानाने समुद्रावरुन उड्डान करीत असतांना त्याच्या घामाचा थेंब मकरध्वजाच्या मत्स्यरुपी आईने गिळला आणि त्याचा जन्म झाला.

ओळख पटल्यावर मकरध्वजाने हनुमानाला रामलक्ष्मणाजवळ जाऊ दिले. त्याने मधमाशीचे रुप घेऊन रामाच्या कानांत सुटका कशी करायचं ते सांगीतले. हनुमानाने एकाच वारात महिरावणाचे मुंडके धडावेगळे केले. हनुमान जेव्हा राम लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन जाऊ लागला त्याचवेळी महिरावणाची गर्भवती पत्नी चंद्रसेना हिने रस्ता अडवला असतां हनुमानाने तीला लाथेने दूर लोटले. आईच्या झालेल्या अपमानाने गर्भातुन बाहेर येऊन अहिरावणाने द्वदांचे आव्हान केले.

रावणाला महिरावणाचा पराभव झालेचे कळल्यावर त्याने कालीला आव्हान केले. त्यात सुग्रीवाने विघ्न आणले आणि रावणाची उपासना भंग झाली.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-२५*

रावणाचे पुत्र, भाऊ, मित्र बरेचसे सैनिक मारले गेले. शेवटी तो स्वतः युध्दात उतरला. राम रावणाचे तुंबळ युध्द सुरु झाले. रावणाच्या बेंबीत अमृत आहे हे विभिषणाकडुन कळल्यावर लक्ष्मणाने त्याच्या बेंबीवर बाण मारला. अमृतपात्र फुटले आणि रावण उघडा पडला. योग्य मंत्र जपत रामाने सर्वश्रेष्ठ ब्रह्माची शक्ती असलेलं *ब्रह्मास्त्र* वापरुन ब्रह्माच्याच या *नातवावर* सोडलेला बाण थेट रावणाच्या ह्रदयातुन आरपार गेला. तो खाली कोसळला आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या तोंडी रामाचे नांव होते. विश्वाचा मुलगा, ब्रम्हा आणि पुलस्त्याचा महान वंशज पुनः कधीही उठणार नव्हता. रावणाचा शेवटचा श्वास सुरु असतांना रामाने लक्ष्मणाला त्याचेकडुन उपदेश घ्यायला सांगीतले.

त्यानंतर रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत यांची उत्तरक्रिया पार पडली. बिभिषणाचा अभिषेक झाल्यावर तो मंदोदरीच्या अंतरगृहाकडे गेला. मंचकावर मंदोदरी निद्राधीन झाल्यासारखी पहुडली होती. सीतेच्या मातेचे अश्या प्रकारे तीचा अंत पाहतांना रामाच्या मनात करुणा दाटुन आली. रावणाचे आणि मंदोदरीचे देह एकाच चित्तेवर ठेवुन विधियुक्त अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांतपणे व संयमपुर्वक सीता हे सर्व ऐकत होती, अवलोकन करीत होती. तीचा सारा दिवस उत्कंठतेने प्रतिक्षा करण्यात व्यतीत झाला. बिभिषणासह राम लक्ष्मण तीघेही सीतेपाशी आलेत.

रामाची अस्वस्थ स्थिती पाहुन लक्ष्मणाने कारण विचारल्यावर रावण व मंदोदरी हे सीतेचे जन्मदाते असल्याचे सांगीतल्यावर क्षणभर लक्ष्मण दिगःमुढ झाला. राम म्हणाले, “आज मी एका परिपुर्ण माणसाला मृत्यु स्वीकारायला भाग पाडले. सीतेचा पिता ही त्याची ओळख जगाला सदैव अज्ञातच राहील. एकीकडे मी कर्तव्यपुर्तीने समाधानी, शांत झालोय तर दुसरीकडे माझ्या अंःतकरणातला माणुस एका सालस, सह्रदयी माणसाची हत्या करावी लागली म्हणुन खंतावला.

रामाच्या योजना आधीच तयार होत्या. परतीच्या प्रवासापर्यत सीता इथेच अशोक वनात राहिल. असे रामाचे बोलणे ऐकुन सीता हिरमुसली. तीला वाटले ज्या अशोकवनांत आपण रात्रंदिवस झुरत होतो तीथे पतीशी हितगुज करु. पण रामाचे पुढील शब्द ऐकले, ते म्हणाले “विभिषणा सीता ही एक राजस्री आहे. एका अनार्याच्या गृहात दीर्घकाळ राहिलेल्या तिच्यासारख्या स्रीचे मुनीजनांकडुन शुध्दीकरण झालेशिवाय तीचा पती किंवा कुटुंब तिचा स्वीकार करु शकत नाही.

सीता शुभ्र वस्र परिधान करुन पाठीवर केस मोकळे सोडुन आलेल्या मुनिजनांकडुन शुध्दीकरणाची प्रतिक्षेत होती. रावणासारख्या अनार्याकडे राहिल्यामुळे ती अमंगल झाली या गोष्टीचा रामाने निर्देश केल्यावर तीच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. आपल्याला लागलेला हा अमंगल कलंक नेमका कुठे लागला ? अशोक वनाच्या मातीतुन ? त्रीजटेने प्रेमाने भरविलेल्या अन्नातुन ? की समुद्रावरुन लंकेच्या भूमीवर खेळणार्‍या खार्‍या वार्‍यातुन ? बहुधा अपहरण कर्त्याने उचलुन आणतांना त्याच्या स्पर्शातुन असेल.

त्यानंतर त्याने दखलही घेतली नाही, कोणत्याही प्रकारे आपल्याला कलंकीत केले नाही, तरीही कलंकीत म्हणुन आज आपले शुध्दीकरण करणार! विचार करुन बुध्दी काम करेनाशी झाली तीची. अग्निच्या साक्षीने शुध्दीकरण विधि सुरु झाला. विधि संपल्यावरही रामाची तीला स्विकारण्याची आतुरता न दिसल्याने तीने शांतपणे पेटलेल्या अग्नित प्रवेश केला. तेव्हा ज्वाळा तीच्या शरीरापासुन दुर झाल्या. रामाला अग्नि म्हणाला तीचा पत्नी म्हणुन स्वीकार कर….!

सीता समोर येईपर्यत राम प्रेम विव्हल असतो पण ती समोर येताच तो कठोर होतो. तीच्या आगमनापुर्वी तो तीचा पती असतो. ती येताच त्याचे रुपांतर रघुकुलाच्या वंशजात होते,

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता*

*भागः-२६*

शुध्दीकरण विधी आणि अग्निपरिक्षा आटोपल्यावर सीता रामाशेजारी बसली, तेवढ्यात क्षितिजाकडुन भयंकर गर्जनेसह हजार मस्तक असलेला रावणाचा जुळा भाऊ, हजार मस्तकांचा प्राणी येतांना दिसला. रामाचा धनुष्यास हात पोहोचण्यापुर्वीच सीतेचे रुप बदलले. तीला अनेक हात फुटले. सशस्र होऊन तिथे अचानक प्रगटलेल्या सिंहावर उडी घेऊन त्या राक्षसाशी युध्द केले. त्याचे रक्त प्याली. त्याचा नाश झाल्यावर पुनः स्रीच्या रुपात सीता रामाशेजारी स्थानापन्न झाली.

सीता ही गौरी होती, तशीच कालीही होती. स्वतःचे अपहरण तीने करु दिले तसेच सुटकाही करु दिली. ती स्वतंत्र देवी होती, तीने रामाला एक आश्वासक देव बनवले होते.

युध्द संपल होत. रावणाचा वध झाला, सीतेची मुक्तता झाली. लंकेला नवा राजा मिळाला. चौदा वर्षाचा वनवास संपला. इतरांनी लंकेवर आक्रमण करु नये म्हणुन विभिषणाच्या सांगण्यावरुन समुद्रावरचा सेतु नष्ट करण्यात आला होता. त्यामुळे पुष्पक विमानाने सर्वजन अयोध्येस पोहोचले. आंदोत्सव सुरु झाला. रघुकुलाची जेष्ठ कन्या शांता ही सुध्दा उपस्थीत होती. तीने अधिकाराने सर्व सुत्र हाती घेतली.

राजा दशरथाच्या घोषणेनंतर १४ वर्षांनी रघुकुलाचा प्रमुख, अयोध्येचा रक्षक राम इक्ष्वाकुच्या सिंहासनावर बसला. त्याला पुर्णत्व आणत सीता त्याच्या मांडीवर अंकीत झाली. फार काळ अपेक्षिलेला हा सोहळा अयोध्यावासीयांनी आनंदाश्रुंनी डोळे भरुन पाहत होते.

अखेर राम सीतेचे मिलन झाले. सीता गर्भवती झाली. सगळीकडे आनंदी वातावरण झाले. पण सीतेला वेगळेच डोहाळे लागलेत. तीला मुक्तपणे अरण्यात विहार करावा, बागडावे, वाघीणीचे दुध प्यावे असे वाटु लागले.

रामाच्या हेरांनी बातमी आणली की, सीतेच्या चारित्र्याबद्दल एका धोब्याने शंका घेतली. रामाला दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते. रघूकुलाची राणी निष्कलंकच असली पाहिजे. रामाने लक्ष्मणाला सीतेला अरण्यात दूरवर सोडण्याची आज्ञा केली. लक्ष्मण रामाला म्हणतो की, सीता अग्नितुन चालत आली ती शुध्द, पवित्र आहे, त्यावर राम म्हणाले ती शरीराने, मनाने शुध्द आहे निश्चीतच, परंतु किर्तीने नाही.

तीचे डोहाळे पुरविण्याचे निमित्य करुन भल्या पहाटे रथ सज्ज झाला. सारथ्याच्या जागी हिरमुसल्या चेहर्‍याचा लक्ष्मण बघितल्यावर तीच्या *सर्व काही लक्षात आले.*

तीने लक्ष्मणाला थांबायला सांगुन परत प्रासादात गेली आणि रामाच्या प्रत्येक कर्मचार्‍याला त्याची कशी काळजी घ्यायची सांगुन परत आली आणि रथात जाऊन बसली.

घनदाट अरण्यात रथ थांबला. लक्ष्मणाने सीतेला रामाला निरोप सांगीतले की, रामाची पत्नी संशयाच्या पलीकडे असली पाहिजे. आज्ञा केली की, त्याच्यापासुन नगरीपासुन, राजवाड्यापासुन दूर राहावे. स्वतःची ओळख कुणालाही न सांगता.

सीतेने लक्ष्मणाला आश्वस्त करुन त्याला परत पाठविले. ती अवघडलेल्या अवस्थेत फिरत फिरत वाल्मिकी मुनीच्या आश्रमाजवळ आली आणि त्यांच्या सांगण्यावरुन तिथेच आश्रमात राहुन दिवस कंठु लागली. एके पहाटे तीने मुलाला जन्म दिला. वाल्मिकींनी बाळाचे नांव लव ठेवले.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*अंतीम भागः-२७*

कलाकलाने बाळ वाढु लागला. एक दिवस सीता नदीवर पाणी आणण्यास गेली होती. वाल्मिकी श्लोक लिहिण्यात गुंग असतांनाच बाळ कुटीरमधे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा सर्वीकडे शोध घेतला पण तो कुठेच सापडेना. वाल्मिकांचे ह्रदय दुःखाने व भीतिने भरुन आले तेवढ्यात सीता येतांना दिसली. त्यांनी घाबरुन थोडेसे कुश गवत एकत्र केले. त्याला बाहुलीचा आकार दिला. तपस्येने प्राप्त झालेली सिध्दी वापरुन लव सारख दिसणारं दुसरं बाळ तयार केल. तेवढ्यात सीता लव ला घेऊन परत आली. वाल्मिकीच्या हातातल दुसरं बाळ पाहुन हा कोण? हे विचारले असता त्यांनी हा तुझा दुसरा मुलगा कुश असल्याचे सांगीतले.

दोन्ही मुलं अरण्यांतील वातावरणात वाढत होती. टणक होत होती. एके दिवशी मुलांनी सीतेला वडीलांबद्दल विचारले असतां तीने सांगीतले की! तुम्ही सीतेचे मुलं असण्यात समाधान माना, तीने मुलांना उत्तम संस्कारक्षम सर्व प्रकारचे शिक्षण दिले. दोन्ही मुलांचे व्यक्तीमत्व भिन्न होते. लवला गणीताचे तर कुशला व्याकरणाचे नियम आवडत. दोघेही उत्तम धनुर्धारी होते.

वाल्मिकींनी रामायण पुर्ण करुन सीतेला दाखवले. तीला खुप आवडले. वाल्मिकींनी राम ही संकल्पना रामायण या गीतेतुन लव कुश यांना शिकविली. एक दिवस मथुरेचा राजा लवण याचा पराभव करुन शत्रुघ्न सीतेच्या आश्रमात आला. मुलांनी शिकविलेले गीत रामायण त्याच्या समोर गाऊन दाखवले. शत्रुघ्न चांगलाच प्रभावित झाला. त्याने अयोध्येमधे येऊन राजासमोर म्हणजेच रामासमोर गायला सांगीतले. राम अश्वमेध यज्ञ करीत असल्याने दोन्ही मुलांना घेऊन वाल्मिकी अयोध्येस जायला निघाले.

सहा रात्री मुलांनी रामायणाचे सहा खंड गाऊन दाखवले. रामाने खुपच कौतुक केले. परंतु जेव्हा मुलांना खरी परीस्थिती कळली की, याच रामाने आपल्या आईचा त्याग केला तेव्हा ते संतापुन बाहेर पडले.

अश्वमेध यज्ञाचा घोडा जेव्हा आश्रमाजवळ आला तेव्हा लव कुश ने घोड्याला पकडले. त्यामुळे अयोध्याच्या सैनिकांसोबत त्यांचे भयंकर युध्द झाले. त्यांनी लक्ष्मण, भरत, शतृघ्न आणि हनुमान यांना पराभूत केले. शेवटी राम गेले. राम आणि मुलांनी एकमेकांवर धनुष्य उंचावले असतांनाच सीता मधे आली. अजिंक्य रामाला मुलांकडुन पराभव स्विकारावा लागला.

वाल्मिकींनी सीतेचा स्विकार करणे बाबत रामाला विनंती केली. त्यावर राम म्हणाले की, रामाने नाकारले ते अयोध्याच्या राणीला, पत्नीला कधीच नाही. तिच्याशिवाय रामाचे सर्व जीवन निरस, भेसुर, एकाकी आहे. राम व सीता जवळ उभे असुनही एकमेकांकडे बघत नव्हते. आश्रमाजवळच हे सर्व सुरु असतांनाच अयोध्येचे प्रजाजन तिथे पोहोचले. दोन जुळी मुलं, सीता त्यांना दिसलेवर सर्व काही त्यांच्या लक्षात आले. काय समजायचे ते समजले.

ही सर्व स्थिती सीतेला असह्य झाली अपमानाने व लाजेने ती विध्द झाली, आणि त्याभरातच तीने धरतीला प्रार्थना केली की, आणि म्हणाली की, धरणी सारी बिजं प्रेमाने स्विकारते, माझं रामावरचं प्रेम जर धरती इतकं खरं असेल तर धरणीमाता दुभंगुन मला पोटात घेईल.

आणि काय आश्चर्य क्षणार्धात धरती दुभंगली आणि सीता त्यात समावली. काय घडत आहे या आश्चर्याच्या धक्याने राम धावत पत्नीला थांबवायला, तीचा हात धरुन ओढायला लागले पण ते पोहचण्याआधीच फट बंद झाली. त्यांच्या हाती फक्त केसांची टोकं लागली जाचे रुपांतर गवताच्या पात्यामधे झाले.

रामाची पत्नी असण्याच्या जोखडातुन ती फार पुर्वीच मुक्त झाली होती, आणि आज पुर्णतः मुक्त झाली.

सीता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading