जनक नंदिनी सीता चरित्र भाग ३, (११ ते १५)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


            आज *मंदोदरी* मंचकावर पहुडली होती. सकाळपासुनच तीला फार अस्वस्थ वाटत होते. बाहेर वातावरण सुध्दा कुंद होते. सगळीकडे उदासीनता व्यापुन आहे अस तीला वाटत होते. सारखी तगमग होत होती तीच्या जीवाची.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सीता चरित्र !!!

सीता*

*भागः-११*

भरत, शत्रुघ्न यांनी माता कैकयीच्या महालात प्रवेश केला. आणि जणू त्या दोघांवर वज्राघात झाला. विधवेच्या वेशात अधोवदन कैकयी दृष्टीस पडताच क्षणार्धात परिस्थीतीची त्या दोघांना जाणीव झाली आणि दोघेही स्फुंदुन स्फुंदुन रडू लागले. कैकयी पुत्रांच्या मस्तकावरुन हात फिरवीत मुकपणे अश्रु ढाळू लागली.

जेव्हा भरताला कळले की, त्याच्यासाठी त्याच्या आईने रामाला वनवासात पाठवले आणि त्यांच्या सोबत लक्ष्मण व सीताही गेली तर त्याला अतोनात दुःख होऊन मस्तकाच्याच्या जणू चिंधड्या उडायला लागल्या. बाहेर तोंड दाखवायची त्याला लाज वाटु लागली. तेवढ्यात तीथे प्रविष्ट झालेल्या वशिष्ठांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, “उठ वत्सा..! असा शोक करण्याची तुला आता मुभा नाही. खांद्यावर पडलेल्या जबाबदार्‍या तुला पार पाडल्याच पाहिजेत. तू आता या भूमीचा शास्ता आहेस. यापुढे तुझे हुकुम चालतील.”

मोठ्या तेलपात्रात ठेवलेल्या राजा दशरथाच्या मृत देहाचे दर्शन झालेवर त्यांची उत्तरक्रीया पार पडल्यावर भरताने सर्व राजकुटुंबासह वनात गेलेल्या बंधुना दक्षिणेतून आणण्यासाठी सेनादल सज्ज करण्याची आज्ञा दिली.

राम, लक्ष्मण, सीता यांना अयोध्या सोडुन तीन महिने होऊन गेले होते. या अवधीत केवळ ऐकीवात असलेल्या अनेक स्थळांना त्यांनी भेटी देत ते भारद्वाज मुनिच्या आश्रमात येऊन पोहोचले. तीथे दोन दिवस मुक्काम करुन भारद्वाज मुनींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार दण्डकारण्यात जाण्यापुर्वी चित्रकुट पर्वतावर जाण्यास सिध्द झाले. त्या पर्वतावर अरण्यवासींच्या टोळ्यांचे वास्तव्य होते पण धान्य पिकवण्याची कल्पना अजुन अस्तित्वात नव्हती. या पर्वतावर असलेले प्रचंड धातुचे साठे असुन अस्पर्शित आहेत, दिग्विजयाची सुरुवात इथुनच होणार याची रामाला जाणीव झाली.

पठारावरच्या एका समतल भूमीवर लक्ष्मणाने कुटीर बांधली. सीतेला आता वनवासी जीवनाची सवय होऊ लागली. तीचा शब्द झेलण्यासाठी पती व दिर तत्पर असल्यामुळे राजमहालातील सुखसोईची उणीव भासत नसे. तीघांच्याही कामाचे विभाजन झाले होते. वनात लक्ष्मण झाडे तोडीत असतांना त्याला दुरवर सैन्याच्या अग्रभागी सुवर्ण कळसावर कोसलांचा ध्वज असलेला रथ पडला. त्याच्या मनात अनेक शंका कुशंका निर्माण झाल्यात, रामाला सावध करण्यासाठी कुटीराकडे धाव घेतली.

राम व सीता गुजगोष्टी, सुधारणा करण्याच्या कांही नविन कल्पना रामाला सीता सुचवित होती. इतक्यात लक्ष्मण धावत तीथे येऊन भरत चाल करुन येत असल्याचे रामाला सांगीतले. रामाने त्याच्या शंकाचे निराकरण केले.

सारे बंध तोडुन भरत शत्रुघ्न यांनी धावत येऊन ओक्सीबोक्सी रडत रडत रामाच्या पायावर झोकुन दिले. रामाने त्यांचे सांत्वन केल्यावर दशरथ राजाच्या निधनाची वार्ता ऐकुन राम, लक्ष्मण, सीता यांना अतिशय दुःख झाले. तिन्हीही माता आल्याबद्दल रामाने आश्चर्य व्यक्त केले.

रामाने भरताला समजावले की, कैकयी माता फक्त निमित्यमात्र आहे. सारा दक्षिण उपखंड कोसलांच्या अंमलाखाली आणण्यासाठी लंकापतीशी अंतिम युध्द करावेच लागेल. तोपर्यत तु राज्यकारभार सांभाळावा. बंधुना परत नेण्यास आलेला भरत रामाच्या पादुका घेऊन कोसल सम्राट भरत म्हणुन अयोध्येकडे परत फिरला.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-१२*

सहा महिने रम्य अशा चित्रकुट परिसर येथे वास्तव्य केल्यानंतर राम लक्ष्मणाच्या नेतृत्वाखाली बराचसा जनसमुदाय दक्षिण दिशेने वाटचाल करु लागला. दण्डकारण्याविषयी अनेक चित्र विचित्र कथा कानी आल्यामुळे सीतेच्या उरात धडकी भरली, परंतु राम लक्ष्मण सोबत असल्यामुळे भीतीला थारा देणे योग्य वाटले नाही तीला.

मार्गक्रमण करीत अगस्ती मुनीच्या आश्रमात पोहोचले. पुर्वी या आश्रमाजवळ नरभक्षकाच्या टोळ्या वास्तव्यास होत्या. अगस्ती मुनीनी कणखर आणि लढवय्या छात्रांच्या सहाय्याने त्यांचेवर हल्ला करुन नरमेध यज्ञात त्यांच्या आहुत्या दिल्या व कांही प्रमाणात तो परिसर भयमुक्त केला. अगस्ती मुनींच्या आश्रमात राम, सीता, लक्ष्मण एक वर्ष राहिले. आता चित्रकुटाच्या दक्षिण पठारावरचा शेवटचा टप्पा पार करुन दण्डकारण्यात प्रवेश करण्यापुर्वी ते अत्री मुनीच्या आश्रमात त्यांच्याकडुन सांगोपांग माहिती आणि सल्ला घेण्यासाठी गेले.

अत्री मुनींचा आश्रम म्हणजे विद्येचे आणि कर्मयोगाचे मुर्तिमंत प्रतिक. तिथे सर्वच प्रकारच्या विद्येचे अध्ययन शिकविले जात असे. या आश्रमात अनार्य छात्र सुध्दा होते. इतकेच नव्हे तर अरण्यवासी गिरिजांमधुन कांही युध्दविशारद शिक्षकही युध्द कौशल्य शिकविण्यास आले होते.

विश्वाचा निर्माता, पालनकर्ता, आणि संहारकर्ता ही ईश्वराची तीन रुपे, तीन तोंड असलेली त्रिदेवाची मुर्ती तयार करुन आश्रमाच्या प्रांगणांत ठेवली. ती मुर्ती पाहुन भोळी भाबडी माणसे विचारीत की, यांना एक कोणी केले ? तर अत्री मुनी अनुसयामातेचे नांव सांगत. अशा प्रकारे ईश्वरविषयक कल्पना आणि तीचे एका मुर्तित रुपांतर हे सारे रामाला नवीन होते. यज्ञयाग आणि वेद मानणार्‍या रुढीमधे बसत नव्हते.

तसे दत्तात्रयाबद्दलची वेगळी दंतकथा आहे. अनुसयेच सतीत्व हरण करण्यासाठी ब्रम्हा, विष्णु, महेश तीच्याकडे येतात व तीला नग्न स्थितीत जेवण वाढण्याची इच्छा करतात. पण त्या महान सतीव्रतेने त्या तिन्ही देवांचे रुपांतर छोट्या बालकांमधे करुन त्यांना जेवायला घातले.

या आश्रमात आल्यावर राम लक्ष्मण सीतेला सार्‍याच प्रकारचे शिक्षण मिळाले आणि इथेच त्यांना शांताची भेट घडली. ती आपला परिचय राम लक्ष्मणाची मोठी बहिण म्हणुन देते, शांता ही दशरथाची जेष्ठ कन्या, जिला अंगदेशाचा राजा रोमपद यांच्या विनंतीवरुन दत्तक दिली. कारण इंद्राने त्या देशात दुष्काळ पाडला. त्याला ऋषि विभंडकाचा मुलगा ऋषश्रृंगाची भीती होती. विभंडाच्या विर्याचे एका हरिणीने गवत खाल्यामुळे तीने शिंग असलेल्या बालकाला जन्म दिला, तोच हा ऋषश्रृंग. याला जर स्रीच्या मोहात अडकविले तर राज्यावरचे संकट टळु शकेल. म्हणुन दशरथाने राजा रोमपदाला शांता दत्तक दिली. शांताने ऋषश्रृंगाला आपल्या मोहात अडकवुन अंगप्रदेशात विजयी प्रवेश केला.

तीच्या बलीदानानेच पुढे दशरथ राजाला यज्ञातील पायस (खीर) या प्रसादाने चार पुत्ररत्न प्राप्त झाले.

शांतानेच सीतेची भेट अत्रीमुनीची पत्नी अनुसयाशी घालुन दिली. अनुसयेने सीतेला शरीरशास्रासंबधी बरीच माहीती दिली आणि उपहार म्हणुन एक वस्र जे कधीच मलीन होणार नाही, एक पुष्पमाला जी कधीच सुकणार नाही, व एक उटीने भरलेले पात्र ज्यामुळे त्वचा सदैव मृदु राहील अशी भेट दिली.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-१३*

अयोध्या सोडुन त्यांना आता जवळ जवळ पाच वर्षे झाली होती. अरण्यमय जीवनाची अरण्यवासीयांची आता त्यांना सवय झाली होती. सभोवताली निबिड अरण्य, दण्डकारण्य प्रदेश सुरु झाला होता.

एक दिवस सीता नदीमधे मनसोक्त डुंबत होती. नंतर ओले वस्र बदलण्यासाठी ती एका झाडाच्या बुंध्याआड गेली असता तीने फोडलेल्या किंकाळ्या राम लक्ष्मणाच्या कानी आल्या. एका धिप्पाड माणसाने सीतेला खांद्यावर घेतले होते. ती तर भीतीने बेशुध्दच पडली. लक्ष्मणाचा बाण त्याच्या दंडात घुसला. रामाने परशूने त्याच्या खांद्यावर प्रहार करताच सीतेची सुटका झाली आणि विराध राक्षसाचा अंत झाला.

अत्री मुनीच्या सल्याने दक्षिणेस गोदावरी नदीच्या किनार्‍यावर पंचवटीत वास्तव्य करण्याचे ठरले. तिथुन काही अंतरावर गृध जमातीची वस्ती होती. या टोळीचा जटायु हा प्रमुख, व त्याचा भाऊ संपाती दुय्यम प्रमुख म्हणुन होता. राम लक्ष्मणाने त्या जमातीला धनुर्विद्येचे, शस्रास्राचे, अश्वरपेटीचे प्रशिक्षण देणे सुरु केले. लंकेश्र्वरासारख्या एका बलाढ्य शत्रुचा निःपात करणेसाठी.

नदीकाठच्या प्रशस्त भागात राम लक्ष्मण आणि वस्तीतील काही लोकं नावा तयार करीत होती. सीता अवलोकन करीत असतांनाच आपल्याच नादात झाडापानांशी संवाद करीत कुटीपासुन बरीच दुर एका कमळाच्या सरोवराजवळ कधी पोहोचली याचे तीला भानही नव्हते. ती सौंदर्य पाहण्यात इतकी तल्लीन झाली की, तीच्या मागे एक सुस्वरुप स्री ऊभी राहिली हे कळलेही नाही.

तीने सांगीतले की ती शूर्पणखा या दण्डकारण्याचा स्वामी असलेल्या रावणाची धाकटी बहीण आणि इथल्या जनस्थान असलेल्या वस्तीची देखभाल तीचे भाऊ खर आणि दुषण करतात. ही हकीकत सीतेने राम लक्ष्मणाला सांगीतल्यावर ती लवकरच पंचवटीत पोहचेल असे रामाने भाकीत केले.

काही दिवसापुर्वी ज्या राक्षसाला लक्ष्मणाने मारले होते तो रावणाचा भाचा, शुर्पणखेचा पुत्र सन्कुमार होता. काही भांडणावरुन शूर्पणखेच्या नवर्‍याने विद्युतजिव्हाने रावणाला गिळले होते, शेवटी तिच्या मुलाला वारस करीन व पसंतीच्या पुरुषाबरोबर लग्न लावुन देईन या आश्वासनावर शूर्पणखेने नवर्‍याचे पोट फाडुन रावणाची सुटका केली.

तीचा पुत्र तपस्या करीत असतांना लक्ष्मणाकडुन मारला गेला, पण अजानताच रावण वाचला. रावणामुळे पतीला गमवावे लागले पण तो भाऊ असलेमुळे ती त्याला शासन करु शकत नव्हती पण ज्या लक्ष्मणामुळे पुत्र गेला त्याला शिक्षा करण्याचा तीने निश्चय केला.

ठरविल्याप्रमाणे ती लक्ष्मणाचा माग काढत पंचवटीत पोहोचली. तीथे सुस्वरुप रुपवान राम लक्ष्मण दृष्टीस पडले आणि शिक्षा देण्याचा विचार जाऊन वासनेनं तीला भोवंडल्यासारखे झाले. प्रथम तीने रामाचा अनुनय केला, त्याने विवाहित असल्याचे सांगीतल्यावर ती लक्ष्मणाकडे वळली असता तीला सीता दिसली व हीच आपली प्रतिस्पर्धी आहे, हीचा काटा काढायच्या उद्देशाने मोठा धोंडा घेऊन सीतेच्या अंगावर धावुन गेली व धोंडा डोक्यात घालणार एवढ्यात लक्ष्मणाने तीचे केस धरुन मागे खेचले व सूरीच्या एका वारात शूर्पणखेचे नाक कापले. आणि सीतेला भविष्यात भीषण घडणार्‍या घटनेचा अंदाज आला.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-१४*

शूर्पणखा दुसर्‍यांदा पंचवटीत येण्यापुर्वी तीने आपले भाऊ, खर आणि दुषण यांना ‘दशरथपुत्र राम-लक्ष्मण सीतेसह जनस्थानाजवळ वस्ती करुन राहिले’ या बाबतची माहिती देऊन त्यांना सावध केले. तीचा हट्ट ते भाऊ पुरवणार नाही, त्यांची संमती मिळणार नाही आणि असेच रडत बसण्यापेक्षा तीने एकटीनेच पंचवटीत जाण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे ती पंचवटीत गेल्यावर लक्ष्मणाने तीचे नाक कापले. ती रक्ताळलेल्या अवस्थेत खर दुषणकडे जनस्थानात गेली. भावांनी तीची दशा पाहुन संतापाने बेभान, पराकाष्ठेच्या क्रोधीत होऊन राम लक्ष्मणावर चाल करुन लढू लागले. पण खर दुषणाचा पराभव होऊन त्यांचा देह छिन्न विच्छिन्न होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.

इकडे, रावणाचे शिवलिंगसानिध्य वीणावादन संपण्याची मंदोदरी वाट बघत होती. पण शेवटी मंदोदरीने मनाचा हिय्या करुन जखमी अवस्थेत शूर्पणखा आल्याची वार्ता त्याच्या कानी घातली. वेळ न दवडता झपाट्याने रावण शूर्पणखेच्या महालाकडे निघाला. तीची अवस्था पाहुन तो क्षणभर सर्व भान विसरला. जनस्थानातून बचावुन आलेल्या व शूर्पणखेला जिवघेण्या हल्यातुन वाचवून आणलेल्या पुजार्‍याने तिथे घडलेली हकीकत कथन केली. सभ्य आणि सुसंस्कृत ओळखला जाणारा तो राजपुरुष क्रोधाने नुसता धगधगत होता. त्याने ताबडतोब मारीच याला बोलावणे पाठवले. ताटीकापुत्र मारीच हा रावणाचा विश्वासू सेवक होता. तो कोणतेही सोंग व कोणाचाही आवाज काढण्यात तो कलानिपुण व सर्व विद्येत पारंगत होता. त्याने रावणाला आश्वस्त केले आणि दण्डकारण्यात जाण्याची सिध्दता केली. ज्याचा सहिष्णुता हा स्थायी भाव, कलासक्त, रसज्ञ, वेदाचे, यज्ञसंस्कृतीचे गाढे ज्ञान असलेला रावण सुडाने पेटुन उठला.

एके दिवशी दुपारी अशीच कुटीरच्या ओट्यावर सीता उदास बसुन होती. थोड्याच अंतरावर राम, लक्ष्मण कांही उद्योग करीत होते. एवढ्यात तीथे सुवर्णमृग आलेला पाहुन ती वेड्यासारखी आवाक झाली. तीने रामाजवळ त्या सुवर्णमय हरिणाच्या कातड्याची चोळी घालायची म्हणुन हट्ट धरला. शेवटी राम धनुष्य घेऊन आणि लक्ष्मणाला तीचे संरक्षण करण्याचे सांगुन त्या हरिणाचा मागोवा घेत निघून गेला. थोड्याच वेळात रानातून कानावर आरोळी पडली. ” *सीते, लक्ष्मणा धाsव…* ” आर्त स्वरात राम जिवाच्या आतंकाने ओरडत होता.

ती लक्ष्मणाला रामाच्या मदतीस जाण्यास विनवत होती, परंतु लक्ष्मण तीची समजुत घालून, “दुसरेच काहीतरी मायाजाल आहे, रामाला कांहीच होऊ शकत नाही.” असे परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण ती काहीही ऐकण्याच्या मनःस्थीतीत नव्हती ती त्याला अद्वातद्वा बोलु लागली. पवित्र अशा जिवाभावाच्या भाऊ बहीण सारख्या दीर वहिनीच्या नात्यावर तीने ओरखडा ओढला. नाइलाजाने लक्ष्मणाने कुटीभोवती एक रेखा आखुन तीला सांगीतले की, ” *कोणत्याही परिस्थीतीत ही रेखा ओलांडू नकोस* ही *लक्ष्मणरेषा* आहे, तुझे रक्षण करेल.” आणि तो निघुन गेला.

नंतर सीतेने विचार केल्यावर लक्षात आले की, ज्या लक्ष्मणाने तेरा वर्ष आपली अखंड पाठराखण केली, ज्याने आपल्यावर मायेची पाखरण केली त्याचेवर इतका नीच आरोप केला, तीचे मन विषादाने भरुन आले. तो आल्यावर त्याची माफी मागायची, जर क्षमा केली नाही तर अन्नपाणी त्याग करु या विचाराने तीला बराच धीर आला.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-१५*

एवढ्यात कुटीर बाहेर भिक्षेकर्‍याचा,

” *ओsम भवति भिक्षान् देहि*”! आवाज कानावर पडला. ” *भिक्षान् देहि माते*” पुनः सौम्य स्वरात तो एकवार म्हणाला. त्यावर सीता म्हणाली माझे पती दिर घरी नाहीत ते आल्यावर आपले अतिशय व्यवस्थीत स्वागत करीन. त्यावर तो म्हणाला, “तू जर भिक्षा घालू शकत नसलीस तर मी जातो.” असे म्हणुन तो खरोखरच जाण्यास निघाला.

सीता त्याला थांबायला सांगुन भिक्षा आणावयास गेली. ती वाढण्यास लक्ष्मण रेषा ओलांडुन पुढे आल्याबरोबर त्याने तीला उचलुन खांद्यावर घेतली.

तेवढ्यात जटायुला रत्नांनी मढलेल्या आकाशयानात सीतेला ठेवीत असतांना दिसले. तो जिवाच्या आकांताने यानाच्या दिशेने धावला आणि यानाचा पाठलाग करुन कोपरा पकडल्यामुळे तो फरफटत वर जाऊ लागला. रावणाने तलवारीने त्याचा एक पंख छाटल्यामुळे जटायू आकाशातुन पृथ्वीवर कोसळला.

आपल्याला कुठे नेत आहे हे समजावे म्हणुन सीता एक एक दागीना काढुन खाली टाकु लागली. सुवर्ण मृगाचा पाठलाग करीत राम बरेच लांब गेल्यावर तो सुवर्णमृग दिसला. रामाने बाण मारल्यावर तो मृग गतप्राण झाला. तो ताटीकापुत्र मारीच होता हे नंतर त्यांना कळले.

शंकाकुल रामाने कुटीरकडे धाव घेतली, तर दरवाज्यात त्याला द्रोणातील तांदुळ सांडलेले दिसले. वस्तीत कुणाला विचारावे या उद्देशाने रामाने बाहेर धाव घेतली असता समोरुन लक्ष्मण येतांना दिसला. रामाने लक्ष्मणाला विचारले, “तू सीतेला एकटीच सोडुन कुठे गेला होता.” त्यावर सीता त्याला कशी घालुनपाडुन बोलली, तीच्या अभिलाषाने रामाच्या मदतीला जाण्याचे टाळतो असा आरोप केल्यामुळे नाईलाजाने जावे लागले. सीता अस बोलु शकते याचे रामाला आश्चर्य वाटले.

तेवढ्यात काही माणसे रडत ओरडत त्यांच्याकडे आले आणि जटायू आकाशातुन पडल्याचे सांगीतले. राम लक्ष्मण तीथे पोहचले तेव्हा थोडा शुध्दीवर आलेल्या जटायूने त्यांना सांगीतले की, लंकेश्र्वर रावण सीतामाईला घेऊन गेला एवढे सांगुन त्याने प्राण सोडला.

अशोक वनातील रावण मंदोदरीच्या आवडत्या ठिकाणी अपहरण करुन आणलेल्या सीतेला ठेवण्यात आले होते. तीच्याभोवती रावणाची पत्नी मंदोदरी, आई कैकसी, त्याची बहिण शूर्पणखा, बिभिषणाची पत्नी सरमा, रावणाची पुतणी, बिभिषणाची मुलगी त्रिजटा, आणि इंद्रजितची पत्नी रावणाची सुन सुलोचना या सर्वांना सीतेची काळजी घेण्याच्या सुचना करण्यांत आल्या.

सीतेला खात्री होती की, राम शुन्यातुन सैन्य उभं करुन तीची मुक्तता करेलच या आशेवर ती अशोक वनातील दिवस कंठू लागली. नकळत तिच्या मनात विचार येई, राम आणि रावण यापैकी निर्दयी कोण ? लक्ष्मणाकडुन शूर्पणखेचे नाक कापवणारा राम की, आपल्यासारख्या निरपराध स्रिचे कपटाने अपहरण करुन कैदेत ठेवणारा रावण ? शेवटी यातना ह्या स्रीलाच भोगाव्या लागल्यात ना..! ती सीता असो की शूर्पणखा….!

क्रमशः संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading