जनक नंदिनी सीता चरित्र भाग २, (६ ते १०)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


            आज *मंदोदरी* मंचकावर पहुडली होती. सकाळपासुनच तीला फार अस्वस्थ वाटत होते. बाहेर वातावरण सुध्दा कुंद होते. सगळीकडे उदासीनता व्यापुन आहे अस तीला वाटत होते. सारखी तगमग होत होती तीच्या जीवाची.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सीता चरित्र !!!

*सीता*

*भाग – ६*

विश्वामित्राच्या तोंडुन अहिल्येची हकीकत ऐकुन राम फार अस्वस्थ झाले. काय दोष होता अहिल्येचा ? तीची संमती न घेता, तीच्या इच्छेची विचारपुस न करता गौतम मुनींनी तीच्याशी विवाह केला, पण ती आपले प्रथम प्रेम नाही विसरु शकली. किंवा दंतकथेप्रमाणे जर इंद्र तिच्यावर मोहित होऊन तीच्या पतीचे रुप घेऊन तीला भ्रष्ट केले असेल तर *त्यात तीचा काय दोष?* तरी शिक्षा मात्र आजन्म तीलाच भोगावी लागली कां?

शुभ्र केसांच्या जटा झालेली ती वृध्दा, तीला धड चालताही येत नव्हती, एवढी गलीतात्र झालेली तीला राम लक्ष्मणाने दोन बाजुस आधार देऊन कसेबसे चालवत आश्रमाकडे आणत होते.

आश्रमातील पाठशाळेत मुनी गौतम पद्मासन घालुन छात्रांची वाट पाहत बसले होते. एवढ्यात दोघे – तीघे छात्र घाईघाईने येऊन भेदरलेल्या आवाजात त्यांना सांगीतले की, *अयोध्याच्या राजकुमारांनी त्या गुहेत राहणार्‍या वृध्देला आश्रमात आणतायत.*

हे वृत्त ऐकल्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. चेहरा पांढरा फटक पडला, क्षणभर सार्‍या संवेदना बधीर झाल्या. बाहेरचे दृष्य पाहुन त्यांची वाचाच गेली.

राम लक्ष्मणाने धरुन आणलेली वृध्द स्री एखाद्या राखेच्या पुतळीप्रमाणे भासत होती. तीच्या सर्व हालचाली निर्जिव, चैत्यन्यहीन होत्या. बुबुळाच्या हालचालीतून ओळखीच्या कोणत्याच खुणा प्रतित होत नव्हत्या. नजर भकास होती. अंगावरची सुरकुतलेली कातडी लोंबत होती. हातापायांची वाढलेली वेडी वाकडी नखे तिची गणना जणु अमानुषांत करु पाहत होती.

संतापाने पेटुन उठलेले गौतम मुनी, ज्यांची पन्नास वर्षे धुसमणारी गुप्त व्यथा अशी चव्हाट्यावर आणणार्‍या राजकुमारांचा भयंकर राग आला होता. परंतु अहिल्येची ती भयानक अवस्था पाहुन त्यांना विलक्षण धक्का बसला. पन्नास वर्षापुर्वीच्या लावण्यवतीची ही हालत? त्यांचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. शक्तिपात झाल्यासारखे दारुण उद्वेगाने हातांनी त्यांनी आपला चेहरा झाकुन घेतला.

गलीततात्र होऊन बसलेल्या गौतमांना आधार देऊन उठवित राम लक्ष्मण त्यांना म्हणाले, मुनीवर दुःस्वप्नाचा आता अंत झालाय. मातेचा स्विकार करावा. गौतमांना हे सारे असह्य झाले. अहिल्येकडे पाहत आशिर्वादाचा हात उभवुन डोळ्यातील अश्रु निपटीत, पाठमोरे होऊन निघुन गेले. तिथे राहत असणार्‍या ऋषिपत्नींनी तीच्या अभ्यंगस्नानाची व निवासाची व्यवस्था करण्यास सिध्द झाल्या. अशा तर्‍हेने अहिल्येचा उध्दार झालेला पाहुन आणि मिळालेल्या उःशापाप्रमाणे रामामुळे अहिल्येला जणुं पुर्नजन्म मिळला. हे सर्व पाहुन विश्वामित्राच्या चेहेर्‍यावर समाधान मिळाले.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भाग – ७*

मिथिला नगरी *सीता स्वयंवरासाठी सज्ज झाली होती.* राजकन्या सीता पती म्हणुन कोणाची निवड करील या विषयी तर्क लढविले जात होते. एवढ्यात बातमी पसरली की, नृपश्रेष्ठ *जनकाने कन्येच्या स्वयंवराठी शिवधनुष्याचा “पण” लावला,* लब्धप्रतिष्ठातांच्या भुवनापासुन ते सामान्य कष्टकरी कुटीरापर्यत ” *शिवधनुष्य* ” हा एकच विषय चर्चेला होता.

रामाने शिवधनुष्याबद्दल विचारल्यावर विश्वामित्राने सांगीतले की, जनक राजाच्या पुर्वजाला कोणा अनार्य गणप्रमुखाने मैत्रीचे प्रतिक म्हणुन ते भेट दिली होते. अनंत काळापुर्वी पृथ्वीवर तीन सुसज्ज पुरे अस्रविद्येने सिध्द करुन आक्रमण झाले असतां याच शिवधनुष्याच्या साहाय्याने त्रिपुरे नष्ट केली होती. म्हणुन हे शिवधनुष्य भूमिजा कन्येच्या स्वयंवरासाठी जनकराजाने “पण” म्हणुन ठेवले.

अखेर स्वयंवराचा दिवस उजाडलाच. सभामंडपाच्या मध्यभागी यज्ञकुंड त्याच्या बाजुच्या विशाल वेदीवर ते महाकाय धनुष्य ठेवलेले होते. थोड्याच वेळात जनक राजा आणि कन्येचे लवाजम्यासह आगमन झाले. अमात्यांनी स्वयंवराच्या कार्यक्रमाचा तपशील सांगीतला. नंतर राजा जनकाने शिवधनुष्याची महती सांगीतली. त्यांनी सांगीतले की, हे शिवधनुष्य वेगळे जरी दिसत नसले तरी हे धनुष्य इतर धनुष्याहुन भिन्न आहे. असे बोलणे सुरु असतांनाच रावणाचे आगमन झालेचे कळले. जनकाने त्याचे स्वागत करुन “पणास” ठेवलेले धनुष्य दाखवले. त्या धनुष्याला वंदन करण्याकरितां तो शिवधनुष्याच्या दिशेने जाऊन धनुष्याला प्रदक्षिणा घालीत असतांनाच प्रेक्षकांमधुन शिव्यांची लाखोली वाहली जात होती. तो धनुष्यापुढे नतमस्तक होऊन वेदीवर डोके ठेवले. संतप्त जमावाचे शिव्याशाप ऐकुन रावण अतिशय क्रोधीत होऊन म्हणाला की, “मी इथे पण जिंकायला आलेलो नसुन या राजाच्या निमंत्रणाचा मान ठेवण्यास आलो होतो.”

एवढे बोलुन तो कोणाकडेही न पाहतां ताडताड पावले टाकीत निघुन गेला.

विश्वमित्रांचा जत्था मिथिलेमधे उभारलेल्या अतिथि डेर्‍यात स्थानापन्न झाले. शिवधनुष्याची चर्चा सुरु असतांनाच दुसरी वार्ता पसरली की, लंकाधिपती रावण स्वयंवराला उपस्थीत राहणार याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होते.

सुसंस्कृत, विद्याविभूषित रावणाची प्रजा मात्र रानटी अवस्थेत जगत होती. ज्यावेळी रावण सीता स्वयंवराला जायला निघाला तेव्हा मंदोदरीने त्याने न जाण्याबाबत निक्षुन विनवण्या केल्यात तरी पण तो गेलाच. सर्वाना वाटले मंदोदरीसाठी रावण मिथिलेवरुन सवत आणेल म्हणुन ती व्यग्र आहे. पण तीच्या मनातला सल निराळाच होता, ज्याची रावणाला सुध्दा कल्पना नव्हती.

मंदोदरीचा जीव कासावीस होऊन तीने जेव्हा त्याला मनाई केली तेव्हा रावण तीला म्हणाला, मी त्या अयोनिजा कन्येशी विवाह करण्याचा विचारही मनाला शिवला नाही. मी फक्त जनकाच्या विनंतीचा मान राखण्यासाठी व अनार्य म्हणुन हेटाळणी करणार्‍या आर्यपुंगवांना दाखवुन द्यायला की अनार्य सुध्दा आर्यापेक्षा श्रेष्ठ असुं शकतात. या साठी जात आहो.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता*

*भागः-८*

रावण निघुन गेल्यावर सभामंडपातील संतप्त जमाव शांत झाला. खिन्न व म्लान मुद्रेने बसलेल्या जनकाचे निरिक्षण राम करीत होते. निघुन गेलेल्या रावणाच्या विचाराने रामही अस्वस्थ झाले. रावणाविषयी आतापर्यत ऐकलेली सर्व विधाने, वर्णन खोटी ठरली होती. रावणाला ना दहा तोंडे होती, ना अक्राळ विक्राळ रंग रुप. उलट त्याचा तांबुस सावळा रंग, उंच रेखीव बांधा, भरदार शरीरयष्टी आणि सौम्य मुद्रा व सभ्यता ही त्याची रुप वैशिष्ठ्ये डोळ्यात भरणारी होती.

राम अशा विचारात असतांनाच एक एक राजपुरुष धनुर्भंग करण्यासाठी उठत होते आणि पराभूत होऊन जागेवर येऊन बसत होते. बरेचजण आवेशाने धनुष्य उचलण्याच्या प्रयत्नात जमीनीवर कोसळत होते. एवढ्यात विश्वामित्राच्या सांगण्यानुसार राम उठले. वेदीजवळ जाताच रावणाप्रमाणे त्यानी सुद्धा धनुष्याला प्रदक्षिणा घातली, आणि वंदन करण्याकरिता वेदीवर मस्तक टेकवले. मात्र… काय आश्चर्य…! ते धनुष्य हलकेच हलले…. त्यामुळे ते अत्यंत सावधतेने एकाग्र होऊन पाहत असतांनाच त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या गळ्यात असलेल्या ताटीकेचा लोहयुक्त ताईतकडे वेदीवरचे धनुष्य आकृष्ट होत आहे.

क्षणार्धात त्यांच्या लक्षात आले की, धनुष्यात चुंबकीय शक्ती असलेमुळे त्यांनी ते वर न उचलता खाली सरकवत आणले आणि इतरांप्रमाणे धनुष्य वर न उचलता आणि वेळ न दवडता बाजुला असलेला बाण त्या धनुष्याला जोडला. अत्यंत कुशलतेने प्रचंड धनुष्य पेलीत प्रत्यंचा चढवली. आणि छतावर असलेल्या उघड्या भागातुन बाण विद्युतवेगाने आकाशात लुप्त झाला.

वरमाला हाती घेतलेल्या अधोवदन सीतेने सलज्जीत होऊन वरमाला रामाच्या गळ्यात घातली. त्यानंतर विवाह सोहळा थाटामाटात साजरा झाला. सोबतच लक्ष्मण, भरत! शत्रुघ्न यांचे सुध्दा विवाह सीतेच्या इतर तीन्ही बहिणीं सोबत विवाह लावण्यात आला. विवाह सोहळा आटोपुन अयोध्येला परतल्यानंतरही रामाच्या डोक्यातुन रावणाचा विचार जात नव्हता, कारण एकांतात जनकराजाने सीतेचे जन्म रहस्य रामाला सांगीतले होते.

विवाह सोहळ्यामुळे अयोध्येच्या राजकुलात आनंदपुर्ण वातावरण पसरले. परंतु राम मात्र दुसर्‍याच विचारात गर्क होते. लंकाशासित दंडकारण्यात अफाट भुभागात नगरे वसविणे, विकास करणे, एक सामर्थ्यशाली साम्राज्य स्थापन न करता पराकोटीच्या स्वयंकेंद्रीत वृत्तीमुळे त्याच्यातील व्यक्तिगत

सद्गुणांना काहीच अर्थ उरला नव्हता. रामाने विचार केला की, ही धूरा आपल्यालाच वहावी लागेल आणि त्या दिशेने त्यांनी पाऊले टाकण्याचा निर्णय घेतला.

जनक राजाने सीता जन्माचे सांगीतलेले रहस्य मात्र सीतेला माहीत नव्हते. ती स्वत:ला भूमिकन्याच समजत होती. ती भूमिलाच आपली खरीखुरी माता समजत होती. एकांतात असतांना राम तीला म्हणाले, “बघ! जगातल्या किती लोकांना भूमीकन्या प्राप्त झाली असेल? तो एकमेव भाग्यवान मीच आहे.” आणि गुढ हसत. त्यांनी असे काही म्हटले की सीता तृप्त होत असे. पण त्याच वेळी रामाच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत असत.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-९*

सार्‍या दंडकारण्य प्रदेशातुन रावणाच्या सत्तेचे उच्चाटन करुन तो पुर्ण प्रदेश कौसलांच्या अंमलाखाली घेण्याचा निर्णय रामाने घेतला. त्याबाबत दशरथ, राजगुरु वशिष्ठ यांचेशी दिवस-रात्र चर्चा सुरु होती. त्यांतील संभाव्य धोक्याचा विचार करणे गरजेचे होते. रावणाच्या भावांच्या खर आणि दुषण यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दंडकारण्यातील जनस्थानातील वसाहत दुर्लक्षुन चालणार नव्हते. एकुण लंकेवर आक्रमण करणेसाठी वेगळा मार्ग अवलंबून अत्यंत मुत्सदीपणाने निर्णय घेण्याबद्दल रामाच्या मनात विचार चक्रे फिरु लागली.

राजा दशरथाने आपले उतार वय लक्षात घेऊन महापराक्रमी आणि वारस असलेल्या जेष्ठ पुत्र रामाच्या हाती कारभार सोपवुन उर्वरीत आयुष्य शांततेत घालवावे व राजसंन्यास घ्यावा हा विचार करुन त्यांनी रामाचा अभिषेक करण्याचे घोषित केले. अयोध्या नगरीला उत्साहाचे उधान आले. ताटीका वध, शिवधनुर्भंग केलेल्या रामाचा राज्यभिषेक होणार म्हणुन सर्व नगरी आनंदात न्हाऊन निघाली.

इकडे राणी कैकयी ही कैकय देशाची राजकन्या, शस्रविद्येत, राजकारणात, अश्वरपेटीत निपुण असलेली, अनेक वेळा राजा दशरथाबरोबर राजकारणाविषयी चर्चा, सल्लामसलत करणारी कैकयी ही दशरथाची अत्यंत लाडकी व आवडती पट्टराणी होती. तीला जेव्हा कळले की, रामाचा राज्यभिषेक होऊ घातला आहे, तेव्हा तिच्यातील राज्यकर्ती खडबडुन जागी झाली. तीला रामाबद्दल अतिशय प्रेम, आदर होता, पण त्याच्यातील साधा, सरळ, सालस स्वभाव, कर्तव्य कठोरतेचा, कणखर वृत्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवला आणि राम हे राज्य, राज्यविस्तार करण्याची कुवतची कमतरता तीला जाणवली

आणि तीने कठोर होऊन, सर्वस्वाची होळी करुन स्वतःला जगामधे अपमानीत व्हावे लागले तरी चालेल पण अनार्याचा नाश करण्यासाठी, राज्यविस्तारासाठी आणि राम प्रशिक्षित व्हावे या दृष्टीने अयोध्येपासुन कांही काळ दूर पाठवणे भाग आहे या निर्णयाप्रत येऊन पोहचली. त्यानुसार तीला लग्नापुर्वी दशरथ राजाकडुन मिळालेल्या दोन वराचा उपयोग करण्याचे ठरविले. त्यापैकी *एका वराने रामाला चौदा वर्षे वनवास* व *दुसर्‍या वराने भरताला राज्य,* अशी मागणी राजाकडे केली. हे ऐकून दशरथ राजाची परिस्थीती अतिशय शोचनीय झाली. कैकयीला परोपरीने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

एक दंतकथा अशीही आहे की, कैकयीच्या बालपणी दुर्वासमुनी समाधीस्त असतांना तीने त्यांच्या तोंडाला काळा रंग लावला. त्यामुळे त्यांनी संतप्त होऊन तीला शाप दिला की पुर्ण जगात तुझे नेहमीसाठी तोंड काळे म्हणजेच बदनाम होईल.

दुसरी दंतकथा अशी आहे की, तीची प्रिय दासी मंथरेने तिचे कान फुंकल्यामुळे तीने मोहवश होऊन रामाला वनवासाला पाठविले.

पण कैकयीचा त्याग पराकोटीचा महान आहे. कर्तव्याच्या बलीवेदीवर तीने सर्वस्वाचे बलीदान केले. वैधव्य स्विकारावे लागले.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता*

*भागः-१०*

राज्यभिषेक सोहळा दुसर्‍या दिवसावर येऊन ठेपला. सीतेच्या आणि कौसल्येच्या आनंदाला पारावार नव्हता. महाराणी आणि राजमाता होण्याचे त्यांचे स्वप्न जवळ जवळ साकार झाल्यासारखेच होते. सगळीकडेच समारंभाची जय्यत तयारी सुरु होती.

भल्या पहाटेच उठुन सीता स्वतःचा श्रृंगार करण्यात मग्न होती. थोड्या वेळापुर्वीच दशरथ राजाच्या बोलावण्यानुसार कैकयीच्या महालात राम गेल्याचे तीला कळले. बराच वेळ झाला. राज्यभिषेकाचा मुहुर्त टळुन जात होता. काय झाले असेल ? सीतेच्या मनावर कुशंकेचे सावट पसरले. सर्वीकडे स्मशान शांतता पसरलेली दिसत होती. सारे वातावरण घुसमटत होते. एवढ्यात तीची खास दासी तीच्या दालनात आली आणि सांगीतले की, “महाराणी कैकयीच्या मागणीनुसार रामाला १४ वर्षे वनवास आणि भरताला राजपद द्यायचा हट्ट धरुन बसल्यात. महाराज तीच्या विनवण्या करीत आहेत.” सीतेने ऐकले आणि ती मुर्छित होऊन पडली.

ती सावध झाल्यावर रामाचा अविभाज्य भाग असलेला लक्ष्मण तर त्यांचे बरोबर जाणार मग सीतेचे काय ? *रामाविना…!* आणि तेही कैकयीचे वर्चस्व असलेल्या राजप्रसादात राहण्यापेक्षा कष्टमय वनवास केव्हाही श्रेयस्कर. जेव्हा सोबत येण्याबद्दल रामाला निक्षुन सांगीतले तेव्हा रामाचा नाइलाज झाला. तीला न्यायचे कबुल झाले. सकाळी ज्या उत्साहाने तीने श्रृंगार केला, मुल्यवान वस्रप्रावणे परिधान केले त्याच उत्सहाने आता तीने वल्कले धारण केले.

सारी अयोध्या शोकमग्न असतांना *राम लक्ष्मण सीता* यांनी सर्वांचा निरोप घेतला व वनवासात जाण्यासाठी रथारुढ झाले. सुमंत्रासारखा कुशल सारथी असलेमुळे लवकरच गंगाकिनार्‍यावरच्या निषाध वस्तीत पोहचले. निषाध राजाने त्यांचे अतिशय आत्मतियतेने, उत्साहाने व आनंदाने स्वागत केले. त्यांचा उत्साह पाहुन राम, लक्ष्मण, सीता भारावले.

त्या रात्री निषाधाकडे मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी पहाटेच तिघांनीही तयारी करुन दुसरीकडे जाण्यासाठी नावेत बसले. निषाध राजाने स्वतः त्यांना थेट वत्स देशाच्या सीमेवर सोडले. इथुन त्यांनी स्वतःचे अन्न स्वतः मिळवायचे होते. त्याप्रमाणे लक्ष्मण अन्नाच्या शोधात निघायचा.

इकडे भरत आणि शतृघ्नला आजोळवरुन तातडीने अयोध्येस परत येण्याबद्दलचा संदेश मिळाला. त्याप्रमाणे त्या दोघांनी जेव्हा अयोध्येत प्रवेश केला तेव्हा त्यांना वातावरणातील फरक जाणवला. वेगळेपणाची तिव्रतेने जाणीव झाली. राजप्रसादात पोहोचल्यावर राजकुटुंबातील कोणीही सामोरे आले नाही हे पाहुन ते दोघे अचंबीत झालेत. त्यांच्या ऐवजी वशिष्ठ मुनी आणि अमात्य सामोरे आले. वशिष्ठांनी त्या दोघांना प्रथम माता कैकयीच्या प्रासादात जायला सांगीतले.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading