संत गाडगेबाबा संपुर्ण भाग ५, (२१ ते २५)

अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! संत गाडगेबाबा  !!!                 

 

भाग – २१.

        बाबांचे अनुयायी तर खूप झालेत पण बरेचसे कांही कार्य करुन मधेच सोडून गेले.यापैकी श्री गणपतराव गांगण व अत्युतराव देशमुख या दोन हिरे बाबांच्या कठोर परीक्षांतुन तावून सुलाखुन शेवटपर्यत साथ दिली व बांबा नी सांगीतलेली कामे करत राहिलेत.  सुखी घरातले,विरक्त प्राप्त झालेले,बाबां च्या कार्याने प्रभावित झालेले झेबूजी पाटीलांनी जन्मभर बाबांसारखाच वेश धारण करुन,सर्वस्व पणाला लावून, विदर्भातील जागजे गांवी,नवसापायी  कापत असलेले हजारो बकरे बळी देण्याची प्रथा बंद करुन त्यांनी तिथे राममंदिर बांधले.चिंचवडचे म्हातारबा कुंभारांनी महानंदस्वामी नाम धारण करुन बरेच कार्य केले.कांही दिवस पंढरपूरच्या बांधकामावर व्यवस्थापक म्हणून काम केले.संघटन कौशल्य अंगी असल्यामुळे अनेक तरुण महानंदस्वामीं च्या तालमीत तयार झाले.वसतीगृहे, शिक्षणसंस्था काढल्या.पुढे त्यांचे हे तेज कायम नाही राहिले.त्यांच्या हातून कांही प्रमाद घडला.मग मात्र ते खचतच गेले ते परत वर उठलेच नाही.

         गोंदल्याचे यशवंतराव गोंदलेकर, स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ वाघ,सोहलीचे जिजाबा पाटील,गडशेटफळचे रामचंद्र शेलार,पुढे शेलारमामा म्हणून प्रसिध्द झालेले,मुळ आडनांव दांडेकर लोकांनी ओळखु नये म्हणून जोशी आडनांव धारण केलेले गोपाळ जोशी यांचे  अक्षर सुंदर असल्यामुळे,बाबांचा पत्रव्यवहार, हिशोब वगैरेंसाठी बाबांनी त्यांना सोबतच ठेवले.नारायण माळी व पत्नी अनसूया बाई या दाम्पत्यांनी कित्येक दिवस कीर्तने केलीत.शेवटी पंढरपूर धर्मशाळेत कायम राहिले.विजापुरी जन्मलेले रामदास आमटे यांच्या कीर्तनाचा प्रभाव उत्तम पडत.हा युवा किर्तनकार बाबांचा विशेष आवडता होता.सुखवस्तु घरांतील बाबांचे जन्मगांव शेणगांवचे मुकुंद पाटील,बॅंकेचे डायरेक्टर,पडेल ते काम करण्याची तयारी असलेले,पंढरपूर धर्मशाळेत व्यवस्थापक म्हणून काम बघितले.

      कन्या आलोकाबाईचा पुत्र,बाबांचा नातू,शांत,मनमिळावू स्वभावाचे, नातलगापैकी एकमेव वासुदेव सोणवणे बाबांबरोबर शेवटपर्यंत राहिले.मलकापूर चे भास्करराव गुरवने प्रचंड छाया चित्रांसह काव्यबध्द बाबांचे चरित्र लिहिले.एके दिवशी हे साहित्य बाबांच्या दृष्टीस पडल्यावर त्यांनी सर्व नष्ट करुन टाकले.टेंभुर्णीचे शंकरराव वंजारींनी वंजारी समाजाकडून वर्गणी जमा करुन पंढरपूर मराठा धर्मशाळेजवळच बाबांच्या आज्ञेने ” वंजारी धर्मशाळा” बांधली.

       नारायणराव मनमाडकर,पत्नी गया बाई या दाम्पत्याने अतिशय परिश्रम करुन पंढरपूरी विश्वशांती महायज्ञ करुन हजारों लोकास अन्नदान केले.महाराष्र्टात दुष्काळ पडला तेव्हा या दोघांनी कित्येक दिवसपर्यत दुष्काळ पिडितांना जेवण पुरवले.कारल्याचे यशवंतराव भंडारींनी अनेक उपक्रम केले.नाशिक धर्मशाळे जवळील भिमाबाईने बांधलेले दत्तमंदिर यशवंतरावांना बक्षिसपत्र करुन दिले. बाबांनी त्यांना नाशिक धर्मशाळेचे ट्रष्टी केले.

        त्याकाळी मराठवाड्यांत निजामी शासन होते.हिंदू प्रजेला मुक्तपणे श्वासही घेता येत नव्हता.पुजा,भजने,कीर्तनें, पताका तोरणे लावणे यावर निर्बंध होते. पण अशाही परिस्थितीत बाबांच्या प्रेरणे ने त्यांच्या अनुयायांनी मोठ्या हिंमतीने भजन कीर्तन,नामसप्ताहाचा प्रसाराच्या भांडवलावर अर्धा मराठवाडा जिंकला. त्या गरजत्या काळात जो यज्ञाग्नी धगधगत होता त्यांत बर्‍याच जनांनी आपल्या आहुत्या टाकल्या होत्या.

     शेवटचे दोन अनुयायी म्हणजे सामान्य परिस्थितीतले,खडीमुरुम टाकणार्‍या जमातीतील कैकाडी आणि शैतकरी कुटुंबातील तनपुरेंनी फार मोठे कार्य केले.मराठवाड्यांतील रझाकारांच्या छळास कंटाळलेले नागरीक पंढरपूरला आल्यावर त्यांच्या अन्न, वस्र,निवार्‍याची सोय केली.चारीधाम यात्रेचे स्मारक म्हणून बाबांच्या आज्ञेने विठ्ठलमंदिर व चारधाम मंडप बांधला.हा बाबांचा अत्यंत कर्तुत्ववान अनुयायी होता.

 कैकडीबुवांचा भर गोरक्षणावर होता. पंढरपूरला धर्मशाळा बांधून बाबांच्या आज्ञेने श्रीगाडगेबाबा ट्रस्टमधे जमा केली.या दोघांनीही गाय बैलांची खूप सेवा केली.यांना भरपुर देणगी मिळाली पण स्वतःसाठी एक पैसाही न वापरतां सर्व द्रव्य सत्कारणी लावले.बाबांनी पेरणी केली आणि या सर्व अनुयायांनी चांगली मशागत,सोंगणी करुन ते जनते च्या कामी लावले.हे बाबांच्या तपश्चर्येचे फळच म्हटले पाहिजे!

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि. २९-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा !!!

भाग – २२.

        महाराष्र्ट गेली ७०० वर्षे अक्षरशः तलवारीच्या धारेवर होता.स्वराज्यासाठी मराठ्यांनी बलिदान देणे कांही नवीन नव्हते.मराठेशाही बुडाली.इंग्रज राज्य आले आणि प्रजेजवळची शस्रे- तलवारी,भाले,कट्यारी,पेशकब्ज,विटे, पट्टे इंग्रजांनी काढून घेऊन जप्त केले. शस्रे गेली पण रक्ताला मेलेली नजर मात्र तशीच राहिली.याचमुळे पशुवधाचे कांही वाटेना,जन्मभर ज्या बैलांनी शेतकर्‍यास पोसले त्यांना कसायास विकतांना दुःख होत नसे.

       महाराष्र्टभर डोंगर दर्‍यांतून असंख्य दैवते!महादेव,विठोबा,राम,कृष्ण ही सात्विक दैवते सोडून खंडोबा,विरोबा, वेताळ,मरीआई,मातामाय,सातमाय, मानाई,झोलाई या सगळ्यांना गोड नैवद्य न चालणारे.या देवतांसमोर नवस करुन कोंबडी,बकरे,रेडे,डुक्करें यांचा अतिशय हिंसक पध्दतीने बळी देत असत.या  पध्दतीचा आरावा घेतला की,अक्षरशः अंगावर काटे येतात,जीव गलबलून जातो देवासमोर रेडा आणून जुन्यापुराण्या तलवारीने त्याच्या नाकावर घाव घातला की,रक्त गळत असलेल्या रेड्याला घेऊन नगरप्रदक्षिणा करीत प्रत्येक दिशेला त्याच्या मानेवर एकेक घाव घालत प्रदक्षिणा पूर्ण झाली की,कुर्‍हाड कोयत्या ने ठार करावे.

        कोंबडे कापतांना त्याची पूर्ण मान न कापतां अर्धीच कापावी,तो जिवांच्या आकांताने उंच उड्या मारत असतांना देवाजवळ आणून त्याच्या गळ्याचे रक्त देवावर उडले की झाला नवस पुर्ण! देवा समोर खड्डा खणून त्यात बकरा किंवा डुक्कर गळ्यापर्यंत पुरुन फक्त त्यांची तोंडे वर ठेवून भाल्याने टोचत हाल हाल करत त्यांचे प्राण घ्यावे.कुणा देवासमोर खांब पुरुन त्याला बांधलेल्या दोरीवर कापलेल्या कोंबड्यांची धडे अडकवली की, नवस पावता झाला.ही सारी हिंसा मात्र नवस करर्‍याने न करतां एक मध्यस्थ मुलाणीच्या हस्ते होत असे.यात्रे स जातांना गाडीभर सजलेली बाया माणसे बसलेली व गाडीमागे केविलवाणे ओरडत चाललेले बोकड,असे भयंकर दृष्य महाराष्र्टभर दिसत होते.

          असे अत्यंत क्रूर किळसवाणा हिंसाप्रकार बघून बाबांच्या मनाला अतिशय क्लेश होत.बरं मांसच खायचे तर एका बाजूस कापून शिजवून खावे ना पण या हिंसेच्या मागे जी धार्मिक भावना असुरपण होते त्यामुळे बाबांचा जीव कासाविस होई.आणि या क्रूर  कृत्यांविरुध्द आवाज उठवण्याचा निर्णय

बाबांनी घेतला.त्यासाठी त्यांचेजवळ शस्रे कोणती तर कीर्तनाद्वारे विनवणी,प्रार्थना, त्यांच्या भावनांना आवाहन आणि शेवटी कळवळून तळमळीने या कृत्यांचा धिक्कार!आणि प्रतिपक्ष कोणता तर नवसकर्‍यांचा!त्या त्या देवतांशी गुंतले ल्या भावना,बोललेले नवस फेडण्याचा निश्चय!त्या त्या देवांचे भगत,भिल्ल,गोंड, कोरकू,वाघ्ये,भूते,अंगात येणारे पोतराज, मुलाणी असे कितीतरी…

        या धर्मयुध्दात बाबांचे सारे सैन्य उतरले.झाडून सारे महाराष्र्टभर पसरले. पश्चिम महाराष्र्ट,कोंकण,खानदेश,वर्‍हाड आपल्या कीर्तनाने सारा महाराष्र्ट ढवळुन काढला.जवळ जवळ १९३० ते १९५५ असा २५ वर्षे हा तडाखेबंद संग्राम सुरु होता.

      आपल्याला बहुतेक माहित असेल खानदेशात आजही रामनवमीला नवसाचे मासांहाराचा भंडारा करतात.

      कुठे बळी देणे आहे हे कळले की, बाबा आपल्या एखाद्या अनुयायाला तिथे पाठवत.खेडोपाडी कीर्तनाद्वारे सगळा प्रदेश चाळून काढत.हातातील डबडे बडवीत रात्रीच्या कीर्तनाची दवंडी बाबा स्वतः देत.रात्री पटांगणात लोक जमले की,बाबांनी कीर्तनातून या हिंसेविरुध्द प्रचार करुन तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या दाखला देत असे….

” बहिराव खंडेराव। रोटीसुटीसाठी देव ।।

  वेताळे फेताळे। जळो त्यांचे तोंड काळे।    

   रंडी चंडी शक्ती।मद्यमासांते भक्षिती।।”

एकेश्वर पदावर भर देऊन पुढे सांगावे…

“शेंदरी हेंदरी दैवते।कोणती पुजी भुतेखेते

आपल्या पोटासी रडतें।मागती शिते अन्नदान।।” जनमानसातील भूतदया जागवून,प्राण्यांशी क्रूरपणे वागल्यास पाप लागते,ते फेडून द्यावे लागेल अशी भीती घालत असे.अशाप्रकारे पार्श्वभूमी तयार करुन ठेवावी.यात्रेच्या दिवशी त्याच गांवी मुक्काम ठोकून कीर्तनाची झोड उठवीत असत.बळी द्यायच्या १-२ दिवस आधी बाबांचे कीर्तन होणार हे कळले की,आजुबाजुच्या खेड्यापाड्यातू न हजारो लोक जमा होई.बळी देऊन नवस फेडणार्‍यावर प्रभाव पडत.कीर्तन भरात आले की,कधी हलकीशी थट्टा, कधी मनोरंजन तर कधी कठोर होऊन वाणीचे आसूड ओढत कठोर शब्दात हिंसकांना धिक्कारत देवाघरचा न्याय आहे.जसे करावे,तसे भरावे!असे निकरा चे कीर्तन ऐकल्यावर पापभीरु लोक सहसा पशुहत्या करायला धजावत नसे.

             क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
         दि. २९-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – २३.

      प्रत्येक क्षेत्री परिणाम होतोच असे नव्हते.कुठे कुठे वर्षानुवर्षे प्रयत्न करत झुंज द्यावी लागत असे.तरीही हिंसा थांबत नसे.सातारा जिल्ह्यातील मांढरा देवीला मोठी यात्रा भरत असे.देवीपुढे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पशुहत्या होतच होती.सगळे प्रयत्न निष्फळ झाले.राहुरी तालुक्यातील वरवंडी गांवी प्रयत्नाची शिकस्त करुन महानंद स्वामींनी पोलीस विरोधास न जुमानतां देवीच्या अगदी जवळ विठ्ठलमंदिर बांधले.आश्रम स्थापला.मंदिरात रात्रंदिवस वीणेचा पहारा ठेवला.पण मरीआईचे उपासक भिल्ल पुजारीचे उत्पन्न बुडत असल्यामुळे  ते विरोधात उभे ठाकले.त्यांचा विरोध नुसता शाब्दिकच नव्हें तर,कुंपनापलिकडून शिव्यांचा भडीमार,आश्रमाच्या पत्रावर दगडधोंड्याचा पाऊस पडे.इतकेच नव्हे तर आश्रमातील कर्मचार्‍यांना राहणे कठीण करुन टाकत असे.जीव मुठीत धरुन कशीबशी रात्र काढावी.उजाडल्या वर सगळी दगडं वेचून ढीग करावा.पण या सततच्या प्रयत्नाने जीथे हजारोंनी पशुहत्या होत होती ती शेकडोंवर आली.

          उरुसाच्या दिवशी हटवादी बळीचा बकरा वाजत गाजत पीराकडे आणले की,प्राण पणाला लावून कीर्तन सुरु करत.बकर्‍याला कापण्यापेक्षा मला च कापा…ही युक्ती कुठे कुठे सफल होई तर कुठे कुठे,ठीक आहे..चल तुलाच कापतो म्हणून प्रकरण निकरावर आलेले प्रकरण कसेबसे निभावल्या जात.कुठे कुठे तर कीर्तन होणार हे ऐकताच लोकं निघून जात.मग ज्या देवासमोर बळी देणार,तीथेच उपोशनाला बसावे. वातावरण अगदी तापले जाई.हा खरेंच उपवास करतो कि रात्री कांही खातो?मग एकदा खात्री पटली की,बाबांच्या बाजुने होत.हिंसकांच्या हाती एक अमोघ शस्र होते.इंग्रजसरकारच्या नियमानुसार कोणाच्याही धार्मिक रुढीमधे हस्तक्षेप करणार्‍यास पोलीस त्या उपोशन करणा र्‍यास अटक केले जाई.

        मराठवाड्यातील डोंगराळ भागात मष्णेर देवीसमोर दर मंगळवारी हजारों बकरे कापल्या जायची विशेष म्हणजे हे कापलेले बकरे कातडीसह शिजवल्या जायचे.कित्येक वर्षापासुन हे हत्याकांड सुरु होते.बाबांच्या एका शूर,निर्भिड अनुयायी श्रीराम किरजवळेकर नावाच्या तरुणाने त्या डोंगरात ठाण मांडल्याने समर्थक आणि विरोधकांमधे जोराचा वाद उसळला.प्रभावित झालेली बरीच माणसे त्याच्या बाजूने उभी राहिली,पण हत्येच्या समर्थकांनी एक खून करुन आळ श्रीरामवर घालण्याचा प्रयत्न केला.

बाबांनी स्वतः मष्णूरला कीर्तन केले. परिणामी पशुहत्या बंद होऊन पुरणपोळी च्या नैवद्याची प्रथा पडली.

       कुठे कुठे तर स्वतः बाबांनाही आपले प्राण पणास लावावे लागले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बनोसा तालुक्याचे ठीकाण!तिथे रोगराई आली. कशानेच आवरेना,तेव्हा ग्रामदेवतेला बळी द्यायचाय!नदीकाठी असलेल्या ग्राम देवते समोर मोठा खड्डा खणुन त्यांत बकरे आणि डुक्करे पुरायची.बळी द्यायचा दिवस जवळ आला.कांही गावकर्‍यांना बळी देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी गार्‍हाणे बाबांकडे आणले. आदल्या दिवशी बाबा हजर!तंग वातावरणांत रात्री बाबानी कीर्तनाद्वारे कडाडून टीका केली.बरेच उदाहरणें देऊन त्यांचे मतपर्वन केल्यावर बरेचसे लोक बाबांच्या पक्षास येऊन मिळाले. त्यात शीख,पुरभय्ये होते.देवीच्या पुजार्‍यांनी हिंसाबंदीच्या शपथाही घेतल्या,पण कांही हटवादी आपल्या निश्चयावर कायम असल्याचे कळल्यावर, सकाळी त्या खणलेल्या खड्यात उतरुन म्हणाले,बकरे डुक्कराच्या ऐवजी मलाच पुरा!तरी खड्यात पुरावयाचा बळी घेऊन जमाव वाजत गाजत येत असलेला पाहून प्रचंड जमाव बाबांजवळ जमला.शीखने विचारले अब क्या किया जाय?वे लोग तो मान नही रहे।तब उन्हे मुझपर मिट्टी डालनी पडेगी।

        तेव्हा मग शिखांबरोबर बाकीचेही चवताळून उठले.वातावरण तंग झाले.१-२ खून पडेलसा रंग दिसूं लागला. हे बघून बाबांनी विचार केला,खून खराबा होण्यापेक्षा या समर्थकांना दूर न्यावे या  उद्देशाने ते खड्डयाबाहेर येऊन समर्थकां सह  दूर जाऊन एका  झाडाखाली थांबले.कांही वेळाने दुसरीकडे खड्डा खणून बळी दिल्याचे कळल्यावर बाबा अतिशय दुःखी,उदास झाले.

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि. २९-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – २४.

‌         त्यावर्षी ऋणमोचनच्या यात्रेत तेच पशुबळी देणारे बाबांना भेटून म्हणाले, बाबा!तुमच्या विषयी आमच्या मनांत नितांत आदर आहे,पण गावकर्‍याशी असलेल्या वादामुळे निर्णयावर अडून बसलो होतो.बाबा कांही बोलले नाही.पुढे त्या ग्रामदेवते समोर बळीप्रथा बंद झाली. सध्या त्याच ठीकाणी बाबांची प्रचंड स्मरणमंदिर उभारुन त्यांत बाबांचा पुतळा बसवला आहे.

       अमरावती जिल्ह्यातील उपराईला भरणारी शहादवली यात्रा आणि अकोला जिल्ह्यातील दोनदला आसरामायची यात्रा या दोन्ही ठीकाणी प्रचंड पशुहत्या होत होती.बाबांच्या अविरत प्रयत्नाने ती प्रथा बंद झाली.डोंगरदर्‍या,नदीकाठवर असलेल्या जवळ जवळ १५० स्थळांवर ची पशुहिंसा तुफान प्रचार व अविरत प्रयत्नाने बंद पाडली.बाबांच्या अनेक महारथी अनुयायांनी जीवाची पर्वा न करतां निकराचे प्रयत्न करुन बहुतांश हिंसाप्रकार थांबवला.कुठे कुठे तुरळक हिंसा होत होती तेवढच!एक चिंध्या नेसणार्‍या चार घरी मागून खाणार्‍या या  रमत्या रामाच्या महान कर्तुत्वाने व निकराच्या अविरत प्रयत्नाने अगनित जीव वाचले.

           वास्तविक परीट जात अस्पृश्यात मोडत नाही.पण त्यांच्या भ्रमणकाळांत अस्पृश्यांना काय काय भोगावे लागते हे स्वतः बाबांनी खूप जवळून बघीतले. साधनकाळात लोकांचे शिव्याशाप सहन  करत हिंडत असतां स्वतःहुन आपली जात अस्पृश्य आहेसे सांगून वाटेल तसा त्रास सोसला.ब्राम्हण तर शिवाशिव पाळीतच,पण मराठे देखील तसूभरही मागे नव्हते.खेड्यापाड्यातुन बहुधा सगळी सत्ता मराठ्यांच्या हाती असल्याने त्यांनी केलेला छळ अस्पृश्यांना फार सहावा लागे.बाबांनी आपल्या संस्थां मधून अस्पृश्यता अजिबात काढून टाकली.पंगतीत सगळे भेदभाव न करतां शेजारी बसून जेवण करीत.कीर्तनात तर बाबा शिवाशिविवर कडाडून टीकास्र उगारत असे.अनेक उदाहरणाने लोकां च्या मनातील शिवाशिवीच्या भावनेला सुरुंग लावला.बाबांचे अनुयायी मोठमोठे सप्ताह करीत पटवून देत.या सप्ताहात अखंड विणावादन आणि नामस्मरण, रात्री कीर्तन चालत असे.शेवटच्या दिवशी बाबा स्वतः येऊन ते भलेमोठे पटांगण झाडून स्वच्छ करीत.रात्री कीर्तनाला हजारोंच्या संख्येने लोकं जमत असे. दुसर्‍या दिवशी भंडार्‍याला स्पृश्य – अस्पृश्यांची शिस्तीत पंगती बसत,पण त्यातही कांहीनी हरकत घेतली तर,बाबा

तसेच पाण्याचा घोटही न घेता भर उन्हात आपल्या लोकांसह जागा सोडत. जीथे अस्पृश्याचा अपमान होई तीथे क्षण भरही थांबत नसत.

       बाबांच्या वर्षभराच्या कार्यक्रमाची यादी ठरलेली असे,त्यांत थोडाही बदल गोंधळ होत नसे.या लोकोत्तर पुरुषाच्या  संवयी अगदी साध्या होत्या.त्यांना साधं सुपारीचही व्यसन नव्हते.आधी कधीतरी चहा घ्यायचे नंतर तोही बंद केला.एवढे अपार कष्ट करुनही भाकरी चटणी शिवाय दुसरे कांही नको असते.३-४ तासांची झोप त्यांना पुरेशी होई.पहाटेच उठत.सवडीनुसार स्नान करत,लांबचा प्रवास असला की ३-४ दिवस स्नान होत नसे.ते उत्तम पोहत,पण वेळेअभावी असा प्रसंग क्वचितच!मिळालाच तर लोकांच्या गराड्यात असल्यामुळे जमत नसत.ते उत्तम नकलाकार होते.कोणाची ही हुबेहुब नक्कल करीत.ते एकटे दोन चार  साथी असले की त्यांची विनोदबुध्दी जागृत होऊन कुठल्याही गोष्टीवर ते विनोद करीत.ते उत्तम कथाकथक होते.

       वेश मात्र सुरुवातीपासुनचाच शेवट पर्यंत कायम ठेवला.ओळखीच्या शिंप्या कडून रंगीबेरंगी चिंध्या घेऊन स्वतःच्या हाताने सदर्‍यावर शिवित.पट्ट्या पट्ट्या ची विजार त्यावर भगव्या रंगाची लुंगी नेसत.वृध्दकाळात पायात कॅनव्हासच्या सपात्या,कधी दोन रंगाच्या असत.कुणा कडून मागीतलेले मोजे घालत.कानांत एखादी कवडी किंवा बांगडीचा तुकडा अडकवित,डोक्यावर रुमाल त्यावर रबरी वळे,गळ्यात पट्टया पट्टयाचा घोंगडीचा तुकडा असे.त्यांच्या अश्या वेशाभूषेमुळे गाडगेबुवा,मडकेबुवा,लोटकेबुवा,चिंधे बुवा अशी निरनिराळी नांवे मिळालीत.

       बाबांच्या या वेशाचे अवलियापण सोडले तर,दुसरे कोणतेच अवलियाचे लक्षण त्यांच्यात नव्हते.ते अतिशय निसंग,विरक्त,पाण्यातील कमळासारखे निर्लेप राहत असल्यामुळे कोणी कसला ही अपवाद त्यांना चिकटवु शकलं नाही. कधी कधी ते निष्ठूर वाटावे इतके निर्मोही होते.इतके लोकं गोळा करुनही त्यांना तोडून टाकण्यास क्षणभरही वेळ लावत नसत.त्यांना स्वतःला लिहिता वाचतां येत नसले तरी लिहुन घेतलेल्या पत्रांचा आवाका फार मोठा होता.

            क्रमशः
संकलन  व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि.  २९-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग -२५.

        बाबांना कृष्ठरोग्यांविषयी फार कळवळा होता.या रोगामुळे धडधाकट माणूस विदृप होतो.हातापायाची बोटे झडलेली,नाक,कान गायब!बाबांना अतिशय कणव असे. त्यांच्या भ्रमण काळात अश्या असहाय्यांचे उग्र दर्शन बाबांना झाले होते.त्यांचेसाठी कांही करायला हवे हे त्यांना फार पूर्वीपासुन वाटत होते.एकदा आळंदीला असतांना  इंद्रायणीतून आपल्या अनुयायासोबत धर्मशाळेकडे परतत असतांना एका छोट्या झाडाच्या  सावलीत असहायय शरीराचे मुरकुटे करुन एक महारोगी बसलेला त्यांना दिसला.कित्येक दिवसां पासून त्याच्या अंगाला पाणी लागलेले दिसत नव्हते.पायाचे खुंटं विरुप पाहून बाबांनी त्याला उचलून नदीवरील खडका वर बसवून प्रत्येक अवयव स्वच्छ करुन स्वच्छ आंघोळ घातली.अनुयायी निरुपायाने बाबांना मदत करीत  होता.

       अमरावतीच्या डाॅ.शिवाजीराव पटवर्धनांंचे श्री जगदंब कुष्ठ निवासाला बाबा वारंवार भेट देऊन २-३ दिवस बाबा वास्तव्य करुन तिथल्या रोग्यांसमोर कीर्तन करीत.वर्ध्याजवळचे दत्तपूर, अचलपूर जवळचे कुष्ठकेंद्र इत्यादी स्थळी बाबा जात असत.नगरच्या मेहेरबाबाचे सख्य होते.मेहेरबाबांच्या आश्रमात गेले की,दोघेमिळून कुष्ठरोग्यास आंघोळ घालणे,प्रेमाने जेऊ घालणे,वस्रे,पात्रे द्यावीत.त्यांची होईल तेवढी दुःखे कमी करण्याचा प्रयत्न करीत.

         कामाचा पसारा वाढू लागल्याने सर्व अनुयायांनी एकत्र येऊन “श्रीगाडगे महाराज सेवा मंडळाची अनौपचारिक स्थापना केली.जीवदया मंडळाचे चेअरमन श्री.मानकरांचा सल्ला घेऊन  श्रीगाडगे महाराज संस्था रजिस्टर केली. पुढे दोन्ही संस्थाचे एकत्रीकरण करुन सर्वांनी एकदिलाने काम करण्याच्या दृष्टी ने पंढरपूरला २२-७-१९५२ रोजी मराठा धर्मशाळेत एक संयुक्त बैठक झाली.त्यात “सेवासंघ” की “सेवामंडळ” यावर घनघोर चर्चा,बराच वादविवाद होऊन सेवासंघ रजिस्टर असल्यामुळे व घटना तयार  असल्यामुळे सेवामंडळ हे सेवासंघात विलिन करण्याचे सर्वानुमते ठरले.बाबा – अध्यक्ष,गुणवंतराव  चराटे-जनरल सेक्रेटरी,मुंबईचे जोशी- खजिनदार,कांही आजिवन व कांही सक्रीय सभासद अशी रचना केली.या सेवासंघाच्या कामाचा पुढे प्रचंड विस्तार झाला.आश्रमशाळा, विद्यालये,वसतीगृहे असा व्याप वाढला. शासनाकडून अनुदानही मिळू  लागले.

       तुकाराम महाराजांचे आवलीशी व कुंताबाईशी बाबांचे वागण्यात दोघांचे बरेच साम्य आढळते.बिचार्‍या कुंताबाई एका खात्यापित्या परीटाची लेक,हाती पायी धडधाकट, कर्तुत्ववान जावई बघून पत्नीच्या विरोधास न जुमानता पित्याने डेबूजींशी लग्न लावून दिले.सासरी काय तर केवळ सासु व नवरा,राहते घर मामाचे.डेबूजींचे स्वतःचे असे कांहीच नव्हते.पुढे सावकाराचे कर्ज फेडण्याच्या हव्यासापायी नवर्‍याने सुखाने घास खाऊ नाही दिला.सारे जीवन कष्टात. सगळ्या हौसमजा स्वप्नवतच!चार मुलें झालीत पैकी चौथा पोटात असतांनाच नवर्‍याने गृहत्याग केल्याच्या आधी २-३ महिन्यात पहिला मुलगा,धाकटी मुलगी लग्न झाल्यावर कांही दिवसांत आणि शेवटचा मुलगा पिसाळले कुत्रे चावल्याने गेलेत.गृहत्याग केल्यावर तर कित्येक दिवस बाबांचा पत्ताच लागला नाही.शोध लागल्यावर फक्त नांव लावण्यापुरता संबंध बाकी छळवणूकच!कित्येक दिवस तर लहानश्या मुलासोबत ओसाड गावी नेऊन ठेवले.पुढे थोडे भाग्य उजळले, मूर्तिजापूरल झोपडी बांधून दिली.तीने एकट्याने रहायचे.नवर्‍याने कधी पाऊल टाकले नाही.विवाहित असूनही परित्यक्त चे जीवन जगत होती.कधी हट्ट करुन त्यांच्यासोबत बिनातिकिट प्रवासास निघाले तर,मधेच कुठे तरी उतरुन जावे, मग तिकिटतपासनीसाकडून होणारा अपमान एकटीनेच सहन करायचाय!

         अशिक्षित आईबापांपोटी जन्मले ल्या कुंताबाईंना बाबांविषयी एकप्रकार ची भीती सदैव मनी होती.नाशिक,पुणे, पंढरपूर,मुंबई इत्यादी ठीकाणी भव्य धर्म शाळा बांधल्या,सर्व सोयी,स्वयंपाकांची भांडी,विजेचे दिवे,सुरेख विश्रामस्थळें पण,यापैकी कशाचाही उपभोग घेऊ दिला नाही.नशीबी सदैव तूरकाड्यांची झोपडीच!नाशिक,पुण्यात ज्या झोपड्यां त कुंताबाई राहत तिथले दारिद्र्य अगदी ठळक दिसे.ॲल्युमिनियमच्या भांड्या व्यतिरिक्त तांब्या,पितळची भांडी कधी बाबांनी झोपडीत येऊ दिली नाही.नवी वस्रे नाही की अंथरुन पांघरुण नाही. लाखो रुपयांचे कटोरे,ब्लॅंकेट,घोंगडे आंधळ्या पांगळ्यांना वाटत पण त्यातील एकही वस्तु कुंताबाईच्या वाटेला येऊ दिलं नाही.ही दुर्दशा अनुयायांना पाहवत नसल्यामुळे बाबांच्या न कळत कांही आपल्या गुरुपत्नीस आणून दिले की त्याचे सुख फक्त बाबांचा फेरा झोपडीत वळेपर्यंतच!

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            ३०-९-२०२१.

संत गाडगेबाबा संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading