
पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!! बाजीराव मस्तानी !!!
!!! मस्तानी !!!
भाग – १३.
खानदेश सुभ्यातून खंडणी वसूल करण्याकरितां बाजीरावांनी फौजा रवाना केल्या. खंडणीच्या रकमा लादलेले उंट रोज बाजीरावांच्या छावणीत दाखल होत होते. जी खंडणी देण्याची आपण टाळाटाळ करीत होतो ती खंडणी बाजीराव पेशवे वसूल करत आहे हे निजामाला समजेपर्यंत महिना लोटला. निजाम दरबारात असलेले मराठ्यांचे वकील निजामाचे लक्ष इकडे जाऊ नये म्हणून प्रयत्न करीत होते. आणि शांतपणे पेशवे सुभा लुटीत होते.
खंडणी वसुलीचे काम संपत आले तसे काशीबाईच्या नर्मदास्नानाची निकड सुरु झाली. यासाठी खुद्द मल्लारराव होळकर आले होते. नर्मदेच्या पैलतीरी रावेरखेडीला पेशव्यांची छावणी पडली होती. तिकडे हिंदुस्थानभर चिमाजीअप्पा, शिंदे, पवार धुमाकुळ घालत होते.विजयी वार्ता रावेरखेडीला पोहचत होत्या. नर्मदातिरी बसून पेशवे दिल्लीच्या पातशहाचे पाणी जोखत होते. हिंदु तीर्थक्षेत्रे मुक्त करण्याचे मनसुबे शिजत होते दुपारी तलखी फार असल्याने, एका मोठ्या डेरेदार वृक्षाखाली मल्हारराव व पेशवे बोलत बसले होते. बाजुला कनातीने केलेल्या आडोशात काशीबाई बसल्या होत्या. त्या एकदम म्हणाल्या आम्ही खूप दिवसांपासून एक गोष्ट विचारायची होती चिरंजीवांच्या महालाबरोबर दुसरा महालाचं बांधकाम सुरु आहे ते कशासाठी समजलं नाही. सरळ उत्तर द्यायच टाळून राऊ म्हणाले, आधी महाल तयार तर होऊ द्या.नंतर बघू!
मल्हाररावांनी नर्मदास्नानाची व्यवस्था चोख केली होती. काशीबाईंनी इथे रेवाकाठी महादेवाच मंदिर नसल्याची खंत बोलून दाखवताच त्यांच्या इच्छेनुसार नर्मदाकाठी ऐका उंचवट्यावर जागा निश्चित करुन संध्याकाळी पतीपत्नीने ब्राम्हणांच्या मंत्रघोषात मंदिराच्या जागेचे भूमीपुजन केले. डेर्यात आल्यावर लगेच पुजेच्या व्यवस्थेसाठी मावळातल्या जमीनीचे दानपत्र तयार करुन काशीबांईंच्या सांगण्यावरुन मंदिराचे नांव रामेश्वर त्या दानपत्रात घातले.
निजामअली उत्तरेकडे निघाल्याचे समजताच खानदेशात खंडणी वसूलीसाठी घुसलेल्या मराठी फौजांनी परत फिरण्याचा हुकुम दिला. स्वतः पेशवे काशीबाईंना झेपेल अशा मजला मारत व दानधर्म करत, विजयश्री मिळवून पुण्यास परत आले.
एके दिवशी बाजीराव व चिमाजीअप्पा बोलत असतांना येसूदासीने काशीबाईंना पुत्ररत्न झाल्याची बातमी दिली. आप्पांनी अत्यानंदाने बोटातील अंगठी तिच्याकडे फेकली. नगारखान्याच्या चौघड्यावर टिपरी पडली आणि पेशव्यांना पुत्ररत्न झाल्याची बातमी पुण्यात सर्वांना समजली.तोफांचे बार झाले. सर्व मानकर्यांकडे मानाची साखर हत्तीवरुन वाटण्यात आली.
कोथरुडच्या बागेतील हौदाच्या कट्ट्यावर तिसर्या प्रहरी ब्राम्हणी पध्दतीने खंबायती लुगडं नेसलेली, सुवर्णालंकार घातलेली,कपाळावर मोठ कुंकु अशा पेहराव्यात मस्तानी बसली होती. स्वगतच पुटपुट, राऊ मोहिमेवरीन आले तरी इकडे यायला फुरसत झाली नाही…तेवढ्यात बसंतीदासी धावत येऊन श्रीमंतांना मुलगा झाल्याची खबर घेऊन आली. मस्तानीला आनंद झाला. पेशव्यांकडे बाळंतविडा पाठवण्या साठी एवढी अवघडलेली,पायावर सुज असूनही बसंतीच्या सहाय्याने आपल्या दालनात आली. बाजीरावांना आवडणार्या मिठाईचा पेटारा, बुंदीलखंडी दागिना देऊन बसंतीला बसंतीला श्रीमंतांच्या हवेलीवर पाठवले. एवढशा श्रमानेही मस्तानीला थकवा आला ती डोळे मिटून पडून राहिली.
थोरल्या नानासाहेबांच्या सेवेत असलेले अंबाजीपंत पुरंदरेंचा मृत्यु अचानक झाल्यामुळे फडावरच्या कामाचा ताण आप्पावर आला.दोघे बंधू सकाळपासून रात्री उशिरापर्यत कामे करुनही संपत नव्हती. कामाच्या गर्दीमुळे राऊंना कोथरुडकडे जायलाही सवड होत नव्हती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-५-२०२२.
!!! मस्तानी !!!
भाग – १४.
एके दिवशी फडावरची कामे उरकवून पेशवे आपल्या महाली विश्रांती घेत असता ८-१० दिवसांपूर्वी मस्तानीला मुलगा झाल्याची बातमी कुंवरने दिल्यावर श्रीमंत म्हणाले इतके दिवस होऊनही आम्हाला कसे कळले नाही? बागेतून मस्तानी साहेबांची खास दासी रोज हवेलीवरुन हेलपाटे मारुन परत जाते. मग आमच्याकडे कशी नाही आली? आप्पास्वामींचा सख्त हुकुम, बागेतला कोणताही सेवक पोहचु देत नाही. आज कोथरुडच्या बागेत गेलो म्हणून कळले. बाजीरावांना अत्यानंद झाला पण येवढे पेशवे असूनही आनंद व्यक्त करु शकत नव्हते
बाजीराव तसेच तडक उठले. कुंवरला घेऊन कोथरुड कडे निघाले. मस्तानीच्या महालात ते बसत नाही तोच दुप्पट्यात गुंडाळलेल छोटसं बाळ घेऊन मस्तानी राऊंच्या समोर आली. बाळाला पाहण्याची त्यांची घाई बघून मस्तानी नाराजीने म्हणाली, मुलाचं मुख पाहण्याची ऐवढी उतावळी होती तर एवढा उशीर कां करावा माणसाने? बाजीरावांच्याजवळ उत्तर नव्हते. काय सांगणार होते तिला? मस्तानीच्या मांडीवरचं ते इवलसं बाळ बघून त्यांचे मन भरुन आले.अतिशय आनंद झाला. टाळी वाजवून कुंवरला बोलावले. त्याच्याजवळच्या थैलीतून सुवर्णाचा एक लहानसा अलंकार काढून बाळाच्या गळ्यात घातला.मस्तानी कौतुक बघत होती. राऊ पुन्हा मोहिमेवर जाणार अस ऐकलं. मोहिमेवर नाही.छत्रपतींच्या आज्ञेनुसार त्यांच्या भेटीसाठी सातार्याला जायचय! पुन्हा लवकर भेट होईल न होईल, आतांच विचारते बाळाचे नांव काय ठेवायचे? मस्तानीचा पेच त्यांना सोडवता येईना. हसून म्हणाले, तुझी न् आमची पसंत वेगळी थोडीच आहे? तूंच सांग. जन्माष्टमीला राऊ-मस्तानीची प्रथम भेट झाली ती आठवण म्हणून “कृष्णसिंग” ठेवले तर? वाऽऽ फारच छान.एकदम पसंत! मिठाईचा तुकडा मस्तानीच्या तोंडात घालत म्हणाले, तुम्ही कृष्णसिंग म्हणा आम्ही मात्र त्याने आमच्यासारखी समशेर गाजवावी म्हणून “समशेरबहाद्दर” म्हणू.
बाजीराव कोथरुडच्या बागेतून रात्री परत आल्यावर खाजगी कारभार्यांना बोलावून भराभर आज्ञा दिल्या. दुसर्या दिवशी सकाळीच अप्पांना माहित होण्यापूर्वीच दागदागिने, आणि उंची वस्रे भरलेली संंदूका मस्तानीकडे रवाना झाल्या. मस्तानिला ब्राम्हणी रितीरिवाज शिकवणार्या पंडीतजींना मानाची वस्रे मिळाली.
आज पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई तीर्थयात्रेवरुन आल्याने गारपिरापासून शनिवारच्या हवेली पर्यंत त्यांची मिरवणूक काढली होती.आप्पास्वामी मातोश्रीच्या बंदोबस्तावर होते.शहर कोतवाल गर्दी हटवत होता. रयत यात्रेचं पुण्य पदरी पडावं म्हणून मातोश्रींचे दर्शन घेत होते. तो सोहळा दाखवण्या साठी चंदा जामदार छोट्या समशेरबहाद्दरला घेऊन गेला होता. सर्व लोकं मातोश्रींचे दर्शन घेत असलेले पाहून चंदाने त्यांच्या पायावर समशेरला घातले.कुणाचा पोर म्हणून विचारल्यावर कुणीतरी राऊस्वामीचा म्हटल्यावर,समशेरच्या हातावर खडीसाखर ठेवणारा हात मागे घेतला व पालखीत जाऊन बसल्या. चंदा जामदार गर्दीतून बाजूला झाला.तेवढ्यात अप्पा स्वामींच्या आदेशावरुन शहर कोतवालाने त्याला ताबडतोब निघून जायला सांगीतले.
हे ऐकून मस्तानीने खोल निःश्वास टाकला. समशेरच्या जन्मापासून तिला असे अनुभव नेहमीच येत होते.राऊंच्या मातोश्रींनीच चारचौघात समशेरला धुत्कारल्यामुळे तिला अतोनात दुःख झाले.तरी सुध्दा मातोश्रींना मानकर्यांप्रमाणे आपणही अहेर करावा म्हणून तिला रितिरिवाज शिकवणार्या पंडीताला आहेर नेण्याबद्द म्हटल्यावर, पंडीत म्हणाले, त्यांना जिथे यवनांची सावली वर्ज्य तिथे तुमचा स्पर्शित आहेर कसा चालेल? पण आम्ही स्पर्श न करतां आमच्या वतीने परस्पर आहेर केला तर? आप्पास्वामींनी परवाणगी दिली तरच असे गुळमळीत उत्तर दिले. मावंद झालं पण अप्पास्वामींची भेट झाली नाही.
त्याच रात्री मोहिमेची दगदग, मातोश्रीच्या मिरवणूकीत दिवसभर उन्हात राहिले या सर्वाचा ताण सहन न होऊन अप्पांना फणफणून ज्वर चढला.इतका की, ते भ्रमात वाटेल तसे बरळू लागले. कलावंतीणीच्या नादाने राऊ बहकले, गैरवर्तनाला कांही सीमा असावी.मी एकटा काय काय सांभाळू अशाच प्रकारचे बरेच कांही. काशीबाई त्यांना भेटण्यास गेल्या असतां वैद्याने त्यांच्या कानावर हे सारे घातले.
आप्पांच्या दुखण्यामुळे सर्वीकडे उदासी पसरली.ज्वर हटत नव्हता, भ्रम वाढतच होता,बडबड सुरुच होती. वैद्य पराकाष्ठा करीत होते. अनुष्ठानं,दान, अभिषेक, अंगारे, धुपारे सुरु होते.आठ दिवसांनी अप्पांच्या प्रकृतीला थोडा उतार पडला. एके दिवशी संध्याकाळी महादोबा पुरंदरे ज्याला काशीबाई पुत्राप्रमाणे समजत असत, त्यामीळे वर्दीशिवाय तो कधीही काशीबाईंच्या महली येण्याची मुभा होती.आल्यावर म्हणाला, आप्पासाहेबांच्या आजाराची बातमी कळल्यामुळे त्यांच्या समाचाराला येण्यास परवाणगीसाठी मस्तानीने कारकुन पाठवला आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-५-२०२२.
!!! मस्तानी !!!
भाग – १५.
महादोबा पुरंदरेच्या तोंडून मस्तानीचे नांव ऐकताच काशीबाईंच्या काळजात कळ उठली आणि कितीतरी गोष्टी आठवल्या.गेले वर्षभर काशीबाई पतीबरोबर मोहिमेत होत्या. निकट सहवासाने त्यांच्या स्री मनाने कितीतरी गोष्टी निरखल्या होत्या.पतीच्या वर्तनात पडलेला फरक त्यांनी हेरला होता. एक वर्षाच्या छोट्या जनार्दनाचे ते कौतुक करीत पण त्यांच्या वागण्यातील औपचाररिकता इतरांना नाही पण काशीबाईंना जाणवला होता. हे सर्व मनातले विचार दडवून महादोबाला विचारले, भावोजींना तिला भेटण्याचे कारण काय? तिचे म्हणणे, आजारी अप्पास्वामींच्या समाचाराला गेले नाही तर राऊ खफा होतील म्हणून परवाणगी मागत आहे.
काशीबाई कठोर स्वरात म्हणाल्या, मस्तानीला कळवा, एका बंधूवर नजर पडली तेवढी पुरे, दुसर्यावर नको पडायला. महादोबा म्हणाला, दुसरे कांही कारण सांगून कारकुनाला परत पाठवतो.
आठ दहा दिवसांनी चिमाजीआप्पा थोडे थोडे हिंडू फिरु लागले. एके दिवशी तिसर्या प्रहरी विसाजीपंत पेठ्यांना घेऊन कोथरुडच्या बागेत असलेल्या मृत्युंजय मंदिरांत दर्शनाला गेले. दर्शन झाल्यावर सभामंडपात अंथरलेल्या गाशावर विसाजीपंत व आप्पा बसून दोघांचे बोलणे सुरु असतांना कारकुन एका सेवकाला डोक्यावर फळाचा लहानसा पेटारासह आला.सेवक मुजरा आप्पांना म्हणाला, आपण इथे आल्याचे कळल्याने मस्तानींनी ही फळांची भेट पाठवली आहे. आणि आपल्या दर्शनासाठी अनुमती मागीतली आहे. मस्तानी? राऊंची नाटकशाळा? क्षणभर विचार करुन म्हणाले, आम्ही बाहेर येऊन झाडाखाली थांबू तेव्हा तिला भेटता येईल. कारकुन मुजरा करुन निघून गेला.
बर्याच वेळाने आप्पा आणि विसाजीपंत मंदिराबाहेरील झाडाखाली आलेले दिसल्यावर, ओढणीचा पदर डोक्यावरुन पुढे ओढून मस्तानी चिमाजीअप्पासमोर आली व खाली वाकून कुर्निसात केला. शेजारी बसंती समशेरला घेऊन उभी होती त्यालाही वाकून नमस्कार करायला सांगीतला.आप्पांनी दुर्लक्ष केल्यासारख केलं कशासाठी भेट मागितली? कांही सांगायचं आहे? आपली तब्बेत नादुरीस्त असल्याचे कळल्यावर आम्ही भेटीसाठी इजाजत मागीतली पण तेव्हा मिळाली नाही म्हणून आतां आलो. त्याची कांही जरुरी नाही. आमची प्रकृती ठीक आहे आणि नसली तरी, काळजी घेण्यासाठी बाकी मंडळी आहेत. कलावंतीणीने फिकर करु नये. आजारी बंधूंच्पा भेटीस आम्ही गेलो नाही हे राऊंना कळतं तर त्यांची मर्जी खपा झाली असती.
मस्तानी समोर ऊभी होती पण आप्पा तिच्याकडे न पाहतां दुसरीकडे पाहत बोलत होते. पण तिच्या तोंडून राऊंचा उल्लेख ऐकताच आवाज चढवून म्हणाले, राऊ म्हणण्याची तुझी हिम्मत कशी झाली? ते मराठी दौलतीचे पेशवे आहेत. लोक त्यांना श्रीमंत नावाने ओळखतात. एक वेळ शेवटची बेअबदी खपवून घेतली पुन्हा ‘राऊ’ असा उल्लेख झाला तर आम्हाला पारिपात्याचा विचार करावा लागेल,
विसाजीपंताकडे रागाने बघत विचारले, कलावंताचा कारखाना कुणाकडे आहे? नीट माहित नाही पण बहुतेक ताईसाहेबांकडे आहे. काय? वहिणीसाहेबांकडे? आश्चर्याने आप्पाच्या भुवया वर चढल्या. काशीबाईंच्या उल्लेखाने मस्तानीला अवघडल्यासारखे झाले. चुक झाली, माफ करावं. नम्रपणे म्हणाली, पण अजून आपली तब्बेत तितकीशी सुधारलेली नाही, तेव्हा एवढ्यात श्रम घेऊ नये. ठीक आहे. आणखी कांही? समशेरला आपला आशिर्वाद द्यावा,बस्स. आमच्या आशिर्वादाची कांही जरुरी नाही असे म्हणून समशेर कडे न पाहतां आप्पा घोड्यावर बसून निघून गेले.
हवेलीसमोर आल्यावर आप्पा म्हणाले, पंत, राऊंच्या चिरंजीवाबद्दल आम्ही एवढं कठोर व्हायला नको होत ना?त्या बिचार्याचा काय दौष? आमच्या खाजगीतून त्याच्यासाठी १०० रुपयांची थैली पाठवून द्या.
मोहिमेवरुन पुण्याला येत असलेल्या पेशव्यांच्पा स्वागताला, अप्पांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते जात नसल्या मुळे नाना व निवडक मानकर्यांना घेऊन संगमापर्यत त्यांना सामोरे गेले. पितापुत्राची भेट झाली. औपचारिक बोलणे झाल्यावर, पेशवे अंबारीत न बसतां घोड्यावर स्वार होउन नगर प्रवेश झाला. यावेळी पेशवे नेहमीप्रमाणे आनंदी दिसत नव्हते. घोड्यावरुन उतरुन प्रथम ते मातोश्रीच्या दर्शनाला गेले. शेजारी आप्पा व पलिकडे नाना बसले होते.इतर किरकोळ गोष्टी झाल्यावर आप्पांनी सांगीतले नवीन बांधलेल्या हवेलीत नाना रहायला गेले. राऊ निघून गेल्यावर, राधाबाई म्हणाल्या, आप्पा, दोन महाल बांधले, पैकी एकात नाना राहतात, दुसरा कुणासाठी? आप्पा अवघडले, सारवासरव करत म्हणाले, आम्हाला माहित नाही,पण कुणासाठी तरी बांधला असेलच!
सुस्कारा टाकून राधाबाई म्हणाल्या, आप्पा माणसाची वाणी खोटी बोलली तरी, त्याचा चेहरा खोटं बोलत नाही. काय समजायचे ते समजलो आम्ही
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २०-५-२२.
!!! मस्तानी !!!
भाग – १६.
श्रींमत बाजीराव पेशवे कोथरुड बागेतील मस्तानी महाली बसले होते. त्यांच्यासमोर अदब राखून दोन ज्योतिषी समोर कुंडल्या मांडून बसले होते. त्यांचे सांगून झाल्यावर त्यांना निरोप दिला. मस्तानीने येऊन विचारले काय म्हणतात ज्योतीषी आपल्या समशेरबद्दच्या भविष्याबद्दल? त्याला राजयोग सांगीतला. एवढी जीवघेणी थट्टा कशाला? एका नाचीज औरतीचा मुलगा अन् राजयोग? इतर तर हिणवतातच आपणही असे म्हणून तिचे डोळे डबडबले. आज प्रथमच तिच्या डोळ्यात अश्रू पाहून बाजीराव व्यथित झाले. वेडे, सार्या जगाने हिणवले तरी आम्ही हिणवू असं वाटलच कसं तुला? आम्हाला तहान लागली. थोड्या वेळाने दोन सेवक रुप्याच्या तबकात चांदीची दोन नक्षीदार पेले आणि उंच गळ्याची सुरई घेऊन आत आले. सेवक जाताच त्यांनी विचारले ये क्या है? शराब ? अरे या मद्याच्या हजारपट कैफ आणणारे मद्य आमच्या जवळ असतांना याची आता मातब्बरी ती काय?
आणि मद्याला स्पर्शही न करतां मस्तानीच्या अंगावर शहारे आले. डोळ्यात भीती दाटली. आम्ही असतांना भीती? होय, आपल्यामुळेच! पण आता राऊ आणि मस्तानी दोन नाहीत.एक सवाल विचारु? बेशकक! इतके दिवस आमच्या संगतीत आपण जे खाऊ नये ते खातात याचीच अपूर्वाई वाटत होती, पण ही सुरई राऊंना कधीपासून आवडू लागली. ज्या क्षणी तुझे हे मधाळ डोळे आमच्या डोळ्याला भिडले त्याच क्षणी कळून चुकले की, आमच्यासारख्या वादळाला छेद करणारी बिजली ही मस्तानी आहे. हलक्यासलक्या गोष्टींनी बहकून जाण्याइतका हा राऊ शुद्र नाही. आम्हाला दिसला तुझ्यातला दिलदारपणा, उदारवृत्ती, वात्सल्य, प्रेमासाठी झोकून देणारी, उच्च विचारांची देवाण घेवाण करणारा स्वभाव आमच्या दिलात उतरला, भिडला आणि आम्ही तुझ्या प्रेमात डुबलो.
मद्याचे दोन प्याले रिचवून झाल्यावर धुंद स्वरात राऊ म्हणाले, आज आम्ही बहोत खुष आहोत, तुला काय हव ते मागून घे. मिठीतील हे स्वर्गसुख उपभोगतांना कांही मागायची इच्छा तरी कशी राहील? नाही, आज तुला कांही तरी मागायला हवय, निदान आमच्या समाधानासाठी तरी…मागेन, पण आतां नाही. आपल्यावर नशेचा अमंल असतांना वचन घेऊन गुंतवून ठेवण्याइतकी मस्तानी शुद्र खचितच नाही. नंतर? नंतर नाही. नाही राऊ थोडा विचार…. विचार? मस्तानी, या राऊने विचार केला असतां तर त्याच्या आयुष्यात मस्तानी कधीच आली नसती. विचार केला असतां तर, शेकडो कोस दूर भूमी तुडवीत हातावर कणसे चोळून फाके मारत, तलवार मारत हिंदुस्थान भर आपला घोडा नाचवला नसतां. मस्तानी अमंल आमच्यावर नाही आम्ही दुसर्यावर चढवत असतो. आम्ही देऊ तो शब्द अखेरचा असतो… माग!
राऊ, ज्यावेळी मस्तानीला राऊंची भेट घ्यावी वाटेल त्यावेळी कुणाच्याही परवाणगीची गरज न लागतां, कसलेही रीतिरिवाज आडवे न येता मस्तानीला राऊंचं दर्शन घडावं. आपल्या दोघांमधे प्रचंड दरी आहे.जेव्हा भेटीसाठी जीव तडफडतो तेव्हा ही दरी पार करतां येत नाही. बऽऽस इतनीसी बात? दिले.. ज्याक्षणी,ज्या परिस्थितीत तुला आमची भेट घ्यावीसी वाटेल त्याक्षणी राऊच्या महाल, हवेली, राजवाड्याचे दरवाजे खुले राहतील.अब खुष? लाजेने लाल झालेली आपली चर्या मस्तानीने बाजीरावांच्या छातीत दडवली.
तिसर्या प्रहरी राऊ फडावरच्या कामात गुंतलेले पाहून, आप्पा काशीबाईच्या महाली आलेत. भावोजी, यावेळी? फडावरच्या कामाची वेळ असतांना? त्यांनी वहिनी कडे बघितले, डोळ्याखाली काळी वर्तुळे, कृश झालेले शरीर पाहून आप्पांचे मन गलबलून आले. कांही खाजगी बोलण्या साठी मुद्दाम आलोय. थेट दिल्लीवर झेप घेण्यास्ठी राऊ मोहिमेवर लवकरच जात असल्याचे तुहाला माहित असेल ना? आलेला हुंदका दाबत काशीबाई म्हणाल्या, भाऊजी, पुण्याहुन इकडून येणे झाले हे आम्हाला नोकरचाकरांकडून कळले. काय म्हणतां वहिनी? राऊना येऊन आठ दिवस झाले आणि महालात आलेच नाही? काशीबाईंनी नकारार्थी मान हलवली. मग गेले आठ दिवस ते आहेत तरी कुठे? आणि लगेच आप्पांनी जीभ चावली. वहिनी आम्ही याबद्दलच बोलायला आलो. परवा बाजीपंत रेठे आम्हाला भेटले. वहिनी, राजस्थानमधील मोहिमेत तुम्ही राऊंबरोबर होतात ना? या मोहिमेत राऊंकडून कांही दुर्वर्तन घडलं असं ते सांगत होते. दुसरा कोणी असतां तर लगेच पारिपत्य केले असते,पण बाजीपंत घरच्या सारखेच.जिव्हाळ्यापोटी ते बोलले. त्याचाच शहानिशा करायला आलो.या मोहिमेत राऊ अपेयपान करत होते, तुम्हाला माहित आहे? नाही. आणि त्यांना हुंदका आवरता आलाच नाही. भावोजी, तुम्ही आणि मातोश्रीं सासुबाईंनी आम्हाला मुद्दाम मोहिमेत इकडच्या स्वारीबरोबर पाठवलं पण आम्ही अपयशी ठरलो.कांहिच करुं शकलो नाही. हे सारं आमच्या समोर घडत होतं पण उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून कांही करुं शकत नव्हतो. आमच्या हाती काहीच नव्हते. खरच? होय भाऊजी!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २०-५-२०२२.


