पेशवा बाजीराव ची दुर्भागी ” मस्तानी ” संपूर्ण भाग १, (१ ते ४)

पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां................................

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


       पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !! बाजीराव मस्तानी !!!

!!!  प्रस्तावना  !!!

!!!  प्रस्तावना  !!!

                      नमस्कार !!

            आतांपर्यत ४६ वेगवेगळ्या विषयांवर व्यक्तिरेखा लिहून आपल्यापुढे सादर केल्यात. आपण केलेल्या भरभरुन कौतुकाने मी प्रोत्साहित होत गेले,उर्जा मिळत गेली आणि मी लिहित गेले.

           इतिहासातील अतिशय दुर्लक्षित, धुक्या सारखेच धूसर,धुरकट,अस्पष्ट अशा २८०-८२ वर्षा पूर्वीच्या पेशवाईत विरलेल्या धूक्यातुन शोधून एक व्यक्तिरेखा आपल्या समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमी प्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!

          १५-१६ वर्षाची नुकतीच विवाह झालेली तारुण्याने मुसमुसलेली एक बुंदेली स्री मराठी मुलखात पुण्यात येते आणि उण्यापुर्‍या अवघ्या दहा वर्षाचा पुण्यातील वास्तव्यानंतर वयाच्या ऐन उमेदीत केवळ २६ व्या वर्षी आपणहुन मृत्युला सामोरी जाऊन अकस्मात गुप्त व्हावी तशी अलगद पावलांनी निघून जाते.

          वयाच्या १६ व्या वर्षी ती महाराष्र्टात आली.ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण करावा अशी तिची प्रतिभा नव्हती.प्राज्ञाही नव्हती.तरी सुध्दा तिचे अलिखित पसायदान ज्ञानदेवांच्या वांच्छिताहून फार वेगळे नसावे असे तीच्यातील श्रध्दा,निष्ठांवरुन जाणवते. बुंदेली स्री हिंदुस्थानात परकी मानण्यांत आली असली तरी, ती एक विवाहित स्री, एवढेच नव्हे तर, सतीत्वाचा वसा घेतलेली,सच्चारीत्र्याने आणि नैतिक वागणूकीने ती एक सौभाग्यवती होती हे तिने आपल्या वागणूकीने सिध्द केले होते.

             तिचा विवाह  हा  निसर्ग विरुध्द   वागणार्‍या   मानवाच्या  संकुचित दृष्टीने निषिध्द ठरला तरी तिने तो मनोमन स्विकारला.

एवढेच नव्हे तर, वैवाहिक जीवनाचा अनेकानेक सुष्ट-दुष्ट वाक्- वळणांच्या अत्यंत खडतर प्रवास एकदाही मागे वळून न पाहतां अखेरपर्यंत दृढ निष्ठेने केला.सासरचा खडतर, उबग आणणार्‍या जिन्याला वैतागून तिने कधीही माहेरच्या वाटेकडे चुकुनही बघितले नाही.उलट सासरच्या शेवाळ्यातील अनेक लहान मोठे उघडे अथवा छुपे खडक-कातळांना धडक देऊन अथवा टक्करुन अत्यंत संयमाने मुकाबला करुन अथवा वळसा घालून कमालीच्या चिकाटीने तिक्ष्ण कंगोरे, जीवघेणे बोचकारे सहन करुन,सोसून वैवाहिक जीवना चा प्रवाह आणि प्रवास अखेरच्या क्षणापर्यंत सोशिक सातत्याने सहिष्णू निष्ठेने चालू ठेवला.

            आपल्या लक्षात आले असेलच, मी हे कुणाबद्दल सांगत आहे, अर्थातच “मस्तानी”!

गंगेहून पवित्र मानण्यात येणारी नर्मदा ओलांडून मस्तानी मराठी मुलखात पुण्याला आल्यानंतर, तिचा कारुण्यपूर्ण इतिहास बघितला तर,शंका येते की, नर्मदेऐवजी ती चुकुन पुराणातील ‘वैतरणी’ नदी पार करुन या यमराज्यात तर आली नव्हती ना?पुण्यातील तिचे वास्तव्याचा इतिहास म्हणजे,तिच्या वस्राहरणाची, चारीत्र्य हननाची एवढेच नव्हे तर,तिच्या प्रत्यक्ष हननाची सुध्दा कथा ठरते.

           महाराजा छत्रसालच्या राजवंशी खानदानाची भरजरी वस्रे परीधान करुन ती पुण्यात आली आणि पुण्यातील दुःशासनांनी तिचे खानदानी वस्रच समूळ फेडून तिला एका अतिसामान्य कुळाची ठरवण्यात आले.एवढ्या वरही स्थानिक किचकांचे समाधान झाले नाही. तिला नीच कुळातील नव्हे तर चक्क खासे चाकरीची अक्षरशः भोगदासी ठरविले.छत्रसाल ची राजकन्या म्हणून तर त्यांच्या खिजगणीतही नव्हती,परंतु मराठ्यांच्या एका महापराक्रमी सेनानीची,श्रीमंत पेशवे बाजीरावांची पत्नी होती याचीही त्या मदांधांनी पर्वा केली नाही.त्यांनी मस्तानीच्या राजवंशी खानदानीचे वस्रहरण केले असले तरी, तिच्यातील सर्वधर्मसमभावी प्रणामी निष्ठेची वस्रे सहजी फेडू न शकल्याने, शिवाय प्रणामीपंथाविषयी सर्वस्वी अज्ञानी असल्याने, मस्तानीला केवळ पाखंडीच नव्हे तर धर्माधर्म न जाणणारी भ्रष्ट,दुराचारी,धर्मदुष्ट ठरवून बहिष्कृत केले.तिच्या श्रध्दा-निष्ठांचे भक्तीवस्रही पाखंडी ठरवून ओरबडण्यात आले तरी तिच्या अव्याभिचारी,पतीनिष्ठेचे पवित्र मंगल सौभाग्य वस्र अजूनही तिच्या अंगावर होते आणि ते फेडण्यास फार मोठ्या धाडसाची गरज होती.पण मदमत्त विरोधक असले ओंगळ धाडस करायला मुळी कचरले नाही.हे धाडस करण्यास खुद्द बाजीराव पुत्र तरुण नानासाहेब ही दोन पावले पुढेच होते.एक स्री म्हणून लाज झाकणारे ‘विनयाचे’ एकमेव अलौकिक वस्र फेडून मस्तानीला अक्षरशः वस्रविहिन करण्याचा अत्यंत ओंगळ मात्रागमनाचा प्रकार स्वतः बाजीरावपुत्र नानासाहेबांनी केला.

           एवढ्यावरही मस्तानीच्या मागची साडेसाती थांबली नाहीच.वरील सर्व अग्निदिव्यातून ती वज्रप्राय धैर्याने आणि कमालीच्या संयमाने पार पडूनही तिची सुटका होऊ शकली नाही. तिला सर्वतोपरी नागवल्या वरही अनेक प्रयत्न निष्फळ ठरल्यावरही तिचे निसर्गदत्त ‘देहवस्र’ अजून शिल्लक होतेच. ते विरोधकांच्या काकदृष्टीतून सलामत सुटणे शक्य नव्हते.अखेर उरले सुरले एकमेव देह-वस्र ही ” वासांसि जीर्णानि” म्हणून नव्हे तर,२६ वर्षा च्या ऐन उमेदि तिच्या पंचप्राणासकट नाहीसे  करुन तिला नामषेश,नेस्तनाबूत करण्याचे कुटील मनसुबे गुप्त रितीने करण्यांत आले. अशा या दुर्भागी,अभागी मस्तानीची कथा घेऊन आपल्या समोर येत आहे.

                 क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                  ८-४-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                    भाग – १.

               पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां? नानासाहेब पेशव्यांची पत्नी गोपिकाबाई हिने दौलताबादेस पाठवलेल्या सुपार्‍यांची दखल घेणारे, थोरल्या माधवरावांच्या धोतराची लांबी, काठाच्या जरीची रुंदी टिपून ठेवणारे, राघोबां च्या पुस्तकखान्यातील अनेक पोथ्यांची लिहिणावळ दर्ज करणारे, सुमेरसिंग गारद्याच्या लग्नात लग्नात लावलेल्या केळीच्या पानांची आणि द्रोण,पत्रावळींचा चोख हिशोब ठेवणारे, इतकेच नव्हे तर,कोपरगांवी कैदेत असलेली आनंदीबाई कोणत्या दिवशी व दिवसा किंवा रात्रीच्या कोणत्या प्रहरी ‘अस्पर्श’ झाली याची नोंद करुन नाना फडणविसांना कळविणारे दक्ष तत्पर कारकुनी कलम,मस्तानीच्याच बाबतीत मात्र शाई गिळून गप्प कां बसले?

             मस्तानीबाबतची बखर अथवा कैफियत उपलब्ध नसल्यामुळे, मस्तानीच्या पूर्व चरित्राबद्दल कपोलकल्पित कथाच निर्माण झाल्यात.कोणी म्हणतो,मस्तानी बाजीरावास निजामाच्या छावणीतील एका धर्मशाळेत मिळाली,कुठे म्हटले आहे,ती निजामाच्या नाटकशाळेची मुलगी आहे.ती निजामाच्या जनानखान्यातून पुरुषवेश धारण करुन पळाली व बाजीरावांच्या छावणीत येऊन त्यांना भेटल्या वर, तिच्या धाडसावर, सौंदर्यावर आणि चतूर बोलण्यावर लुब्ध होऊन तिला ठेवून घेतले.एका काव्यात तिला वेश्याच म्हटले.अशा अनेक प्रकाराने मस्तानिला बदनाम करणार्‍या भाकड कथा प्रसिध्द करण्यात आल्यात.

            पेशवाई संपुष्टात आल्यानंतर बुंदेल खंडातील बांदा प्रांतात मस्तानीचे वंशज बांद्याचे नवाब म्हणून ओळखले जात व त्यांना पेशवे घराण्याविषयी अत्यंत अभिमान असे.१८५७ च्या उठावात त्या वेळचे बांद्याचे नवाब,दुसरे नानासाहेब पेशवे,झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने इंग्रजांंविरुध्द लढले म्हणून इंग्रजांनी बांद्याचे राज्य खालसा करुन,तेथील नबाबांना पेंशनीवर इंदुरात आणून ठेवले.आज पेशव्यांचा वंश  फक्त इंदुरला बांद्याच्या नबाबाच्या म्हणजेच मस्तानीच्या वंशात चालू आहे.आणि इथेच कांही खात्रीलायक माहिती मस्तानी संबधात उपलब्ध झाली.

             या माहितीवरुन बुंदेलखंडाचा राजा छत्रसालकडून बाजीरावास मस्तानी प्राप्त झाली एवढे निश्चित झाले.बुंदेलखंडावर मुगल सरदार महमदखान बंगशने स्वारी केली तेव्हा छत्रसालने बाजीराव पेशव्यांना मदतीस पाचारण केले.बाजीरावांनी बंगशचा पराभव केल्यामुळे छत्रसाल खुश होऊन, त्यांना यवनस्री पासून झालेली कन्या मस्तानी त्यांना दिली.ती यवन उपपत्नीपासून झाली असली तरी ती एक राजकन्या होती.तिचा जन्म,शिक्षण संगोपन आणि तिच्यावर झालेले धार्मिक, सामाजिक संस्कार हे छत्रसालच्या धार्मिक निष्ठे नुसार व राजघराण्यानुसारच झाले होते.

            छत्रसालचा कुंटुंब परिवार फार मोठा होता.युध्दात पराजित शत्रुच्या मुलींशी विवाह करण्याचा त्यांचा प्रघात होता.त्यामुळे अनेक राजकिय सोयरिका झाल्या होत्या. एकेश्वरी, वर्गविहिन “प्रणामी संप्रदायाचे संस्थापक देवचंद्राचे शिष्य प्राणनाथ प्रभु हे छत्रसालचे राजकिय व अध्यात्मिक गुरु होते.या सांप्रदाया त हिंदु मुस्लिम भेद मानल्या जात नव्हता. वेद कुराणाचा इश्वर एकच आहे अशी या पंथाची शिकवण होती.या पंथात कृष्णभक्तीला विशेष महत्व होते.वयाच्या ३४ व्या वर्षापासून छत्रसाल प्रणामी पंथाचे प्रवर्तक व आश्रयदाता होते.या पंथावरील निष्ठेमुळेच हिंदु-मुस्लीम भेद ते मानत नव्हते.त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. छत्रसालचा निःपक्षपाती आणि निधर्मी स्वभावाला अनुसरुनच त्यांनी आपली कन्या मस्तानी बाजीरावांना दिली.तिचे त्यांच्याशी रितसर लग्न मस्तानीच्या संमतीने लावून दिल्यावर बाजीरावांच्या सुपूर्द केले.

           छत्रसालचा निधर्मी दृष्टीकोन लक्षात घेतला तर,यवन उपपत्नीपासून झालेल्या मस्तानीस अनौरस समजणे गैर ठरते. मस्तान नावाचा त्यांचा एक गुरुबंधु होता.त्याच्या नावा वरुनच आपल्या मुलीचे नांव त्यांनी मस्तानी ठेवले होते.ती कोणत्याही नृत्यांगनेची मुलगी नव्हती तर, ती सुविद्य,सुसंस्कृत राजकन्या होती.तिच्यावर पित्याचे निधर्मी निष्ठेचे संस्कार  झाले होते.बाजीराव पेशव्यांनी केलेल्या मदतीने प्रभावित होऊन कृतज्ञ भावनेने आणि मराठ्यां शी विशेषतः पेशव्यांशी सोयरीक जोडली होती. सोयरीक आपल्या तोलामोलाची व्हावी या  दृष्टी कोनातून जहागीर म्हणून साडे तेहतीस लाखाचा प्रदेश व पन्ना येथील हिर्‍याच्या खाणीच्या उत्पन्नाचा तिसरा भाग बाजीरावांना दिला होता.

              छत्रसालचा निधर्मी दृष्टीकोन बाजीरावांना मान्य नसतां तर,इतरांच्या दृष्टीने अंशतः मुसलमान असलेली आपली लाडकी कन्या, ब्राम्हण असलेल्या बाजीरावास देण्याचे धाडस छत्रसालने कधीच केले नसते.राजकियच नव्हे तर हिंदुस्थानी जीवनांत निधर्मी निष्ठेचे महत्व बाजीरावांना अपरिहार्य वाटल्यामुळेच छत्रसालशी भावनिक जवळीक होऊ शकली. आणि या जवळीकतेमुळेच  बाजीरावांना त्यांनी आपला तिसरा मुलगा मानुन आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा जागीर म्हणून दिला होता,

                   क्रमशः
  संकलन व © ®  मिमाक्षी देशमुख.
                   दि.  ८-४-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                    भाग – २.

         ह्या सार्‍या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गोष्टी लक्षात घेतल्या तर, मस्तानीचा स्विकार करतांना बाजीरावांचा दृष्टीकोन किती वेगळा होता हे दिसून येते. कर्मठ ब्राम्हण व सनातनी म्हणून जगणे त्यांना मान्य नव्हते.परंतु पुण्यातील लोकांनी विशेषतः पेशवे कुटुंबियांनी बाजीरावां ची ही भूमिका समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. समजले फक्त शाहू महाराज व त्यांच्या सैन्याला.तिच्या रुपाबद्दलही अनेक अफवा ऐकू येतात.ती सुंदर होती हे निश्चितच,पण बाजीरावांची पत्नी असतांना, तिच्या राहण्याच्या वाड्याचे बंदिस्त वातावरण असतांना ती लोकांच्या दृष्टीस पडणे,जवळ जवळ अशक्य असतांना तिला बदनाम करुन घरंदाज,पडदाशीन व्यक्तीमत्वच चव्हाट्यावर आणणेच लोकांचा मुख्य उद्देश दिसतो.

             मस्तानी हे नांव मुसलमान किंवा फारसी नसून हिंदी शब्द आहे.मस्तान हा अरबी पुलिंगी शब्द, मस्त शब्दापासून मस्तान, मस्त म्हणजे मत्त, यौवन मदाने भारलेला,परमप्रसन्न, मग्न,आनंदीत,इश्वर चिंतनात मग्न,तल्लीन असाही अर्थ होतो.परंतु “मस्तानी” या नावामुळे मराठी संशोधकांची दिशाभूल झाली असावी.

               उत्तर हिंदुस्थानात कृष्णाष्टमी उत्सवा ला फार महत्व होते आणि आजही आहे. रास क्रीडे  सारख्या नृत्यात स्री पुरुष सामील होत . छत्रसाल “प्रणामी” पंथाचे अनुयायी असल्या मुळे, कृष्णाष्टमीचा उत्साह राजवाड्यात थाटाने साजरा होणे व मस्तानीने त्यात भाग घेणे स्वाभाविकच होते.ती जेव्हा पेशवे वाड्यातील  कृष्णाष्टमीच्या ऊत्सवात, बाजीरावांची आजारी पत्नी काशीबाईच्या उपस्थितीत मस्तानीने नृत्य केले म्हणून ती नर्तकी कशी ठरते?स्वतः बाजीरावांना गाण्याचा नाद होता,ते स्वतःही एखादे आवडीचे गाणे गुणगुणत किंवा गात म्हणून कां ते गवई ठरणार?

             मस्तानीला नृत्यकला अवगत होती, कारण त्यावेळी उत्तर हिंदुस्थानातील राजघराण्यातील मुलींना मिळणार्‍या शिक्षणाचा एक संस्कार म्हणून.. ना की नर्तकीपेशा करावा म्हणून! मस्तानीला कंचनी ठरवून तिला बदनाम  करण्याचे,तिला अटक करुन बाजीरावांपासुन दूर करण्याचे,तिच्या निष्ठेविषयी बाजीरावांच्या मनात शंका निर्माण होईल असे कट रचून, तिच्या जीवाला अपाय करुन शेवटी तिचा कायमचा बंदोबस्त करण्याचे निर्घृण क्रुरकर्म प्रत्यक्ष बाजीरावांच्या हयातीत,प्रत्यक्ष पेशवे कुटुंबाकडूनच अव्याहत चालू होते.

         हि झाली मस्तानीची पार्श्वभूमिका.आतां मुख्य कथानकाला सुरुवात  करत आहे.

            गुजरातमधे मराठी दौलतीचे पेशवे व सेनापती दाभाडे यांच्यात झगडा सुरु होता. सार्‍या पुण्याचे लक्ष येणार्‍या बातम्यांकडे लागले होते.राऊ(बाजीराव) च्या माघारी त्यांचे चिरंजीव नानासाहेब आणि अंबाजीपंत दौलती चे कामकाज पाहत होते.पण त्यांचेही लक्ष गुजरातच्या वार्तांकडेच असायचं. राऊंच्या सुरक्षिततार्थ व विजय मिळवण्यासाठी, कोथरुडच्या बागेतल्या देवालयात, कोथरुडमधे वास्तव्यास असणार्‍या मस्तानीने अभिषेक करण्यास काशीबाईंनी परवानगी दिली होती. एका यवनस्रीला अभिषेक करण्यास अनुमती दिली म्हणून त्यांच्या सासुबाई राधाबाईंनी काशीबाईंची चांगलीच कानउघाडणी केली. काशीबाईंना फार अवघडल्यासारखे झाले. आपल्या पतीच्या कल्याणासाठी देवाला अभिषेक करणार्‍याला आपण परवाणगी दिली यांत त्यांना कांहीच गैर केलं,चुकलं असे वाटत नव्हते.पण सासुबाईंसमोर कांही बोलता येत नसल्यामुळे त्या गप्प राहील्या.राधाबाईच म्हणाल्या, सुनबाई तुम्ही अभिषेकास दिलेली परवाणगी आम्ही रद्द केली आहे. काशिबाईंनी उद्गीन मनाने सासुला नमस्कार करुन आपल्या महाली परतल्या.

             आणि सांडणीस्वाराने राऊंची फत्ते झाल्याची बातमी आणली.खासे दाभाडे आणि इतर तीन खासे लढाईत कामी आले.दाभाड्यां च्या मोहीमेचे पडसाद नुसत्या मराठी दौलतीतच नव्हे तर हैदराबादच्या निजामालाही चपराक बसली.मराठ्यांचे दोन सेनापती निजामाला फितूर झाले होते. त्या दोघांचाही बंदोबस्त पेशव्यांनी केल्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांची जरब उभ्या हिंदुस्थानला बसली.

            पुत्रवधाने उमाबाई दाभाडे संतापाने बेभान झाली. पेशव्यांचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुन गुजरातेतून परतणार्‍या पेशव्यांचा पाठलाग सुरु केला.

             पुढे आलेले चिमाजीआप्पा सात महिन्यानंतर आईला भेटत होते.युध्दवार्ता ऐकल्यावर राधाबाई म्हणाल्या,राऊंना खास पत्र लिहून, उमाबाई चवताळलेली नागीन आहे, तिच्यापासून सावध राहण्यास कळवा.आज्ञा मातोश्री! आणि लवकरच बाजीराव पेशवे पुण्यात पोहचत असल्याची खबर आल्यावर त्यांचा मुक्काम कोथरुडच्या बागेत होणार म्हणून तिथली चोख व्यवस्था लावण्यासाठी जातीने चिमाजीआपा बागेत गेले.

                  क्रमशः
  संकलन © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ९-४-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                  भाग – ३.

             चिमाजीआपा नानासहित कोथरुडच्या  बागेत आल्यावर एका मोठ्या झाडाच्या गर्द छायेत अंथरलेल्या जाजमावर विश्रांतीसाठी थोडे विसावले तोच त्यांना गडबड ऐकू आली. पहारेकर्‍याकडे चौकशी केल्यावर कळले की, बुंदेलखंडातील मस्तानीला तिच्या लवाजम्यासह  राऊंनी इथे मुक्कामाला ठेवल्याचे समजले. आप्पा थकल्यागत डोळे मिटून पुटपुटले..हरेहरे

              बाजीराव पेशवे पुण्यात परतले. काशीबाईंनी त्यांना औक्षण केले. पेशवे आपल्या महालात लोडाला टेकून बसले. अदबीने काशीबाई उभ्या होत्या.उभयंतामधे हलकं फुलकं हासपरिहास सुरु असतांनाच भोजनाची वर्दी आली.

           शनिवारवाड्यात नवीन बांधलेल्या हवेलीत प्रवेशाचा मूहुर्त १५ दिवसांनी असल्या मुळे, बाजीरावांचा मुक्काम कोथरुडच्या छावणीत होता. तुंबलेल्या कामाचा फडश्या पाडण्याचे काम सुरु होते.१५ दिवसांनंतर एका सुयोग्य मूहुर्तावर पेशवे नव्या वास्तुत प्रवेशले. चिमाजीआपा,खाजगी कारभारी,आणि ज्यांनी वास्तु बनविली ते मुख्य मोठ्या उत्साहाने हवेली तले एकएक दालन त्यांना दाखवत होते.आरसे महाल बघून राऊ एकदम खुष झाले.प्रत्येक दालन वेगवेगळ्या तर्‍हेने सजवले होते.दिवाण खाना, फडाची जागा, इत्यादी निरनिराळ्या शिल्प सौंदर्याचा आस्वाद घेत हवेलीची पाहणी करुन पेशवे आपल्या दालनात आले.

             शनिवारवाड्याच्या खलबत खान्यात  चिमाजीआपा आणि पेशव्याचे  दौलतीचे कामकाज बर्‍याच उशीरापर्यंत चालत असे. त्या दिवशी कामे आटोपल्यावर आपा हळूच म्हणाले,राऊ, नाराज होणार नसाल तर एक नाजुक गोष्ट विचारायची आहे.अस्स! बोला! कांही दिवसांपूर्वी कोडरीडच्या छावणीची व्यवस्था बघायला नानासह गेलो होतो.तिथे मस्तानी नावाची कलावंतीन राहत असल्याचे कळले.तिची हरणाची जोडी चोरीला गेल्याची तक्रार आली होती.होळकरांच्या माणसांनी नेली असे कळले.आणि होळकरांची माणसे काही बोलल्याचेही आमच्या कानावर आले. राऊ, ब्राम्हणाला जे अभ्यक्ष ते तुम्ही कधीकधी सेवन करता असे ते शब्द होते.बाजीराव जड शब्दात म्हणाले, आपा आम्ही हमेशा मोहीमेवर असतो. सोबत असतात ही सारी सरदार मंडळी.त्यात कुणी कुणबी,धनगर,कोळी,भिल्ल उन्हातान्हात वार्‍यापावसात आमच्या संगाती असतात.मधेच आपा म्हणाले,ते कां आम्हाला ठाऊक नाही?पण आपला ब्राम्हणधर्म कसा सोडता येईल? आपा चार भिंतीच्या आड आमचा तो ब्राम्हण धर्म ठीक होता. पण ज्यावेळी ब्राम्हणाच्या हाती तलवार आली तेव्हा असल्या किरकोळ गोष्टी कडे दुर्लक्ष नको कां करायला? तरी सुध्दा आम्ही प्रयत्न करुं असे म्हणून पेशवे खलबत खान्यातून बाहेर पडले.

             मोहिमा आटोपून पेशवे व प्रमुख सरदार परत आले की,हिंदुस्थानातील निरनिराळे व्यापारी पुणे, सातार्‍यास येत असत. घोड्यांचा, हत्तींचा बाजार भरत.बंदुका, तलवारी,बारुद,भरजरी उंची वस्रे,अत्तरं घेऊन व्यापारी जमा होत.एके दिवशी एक आलेल्या जवाहिर्‍याला श्रीमंतांनी काशीबाईकडे कांही खरेदी करण्यासाठी पाठवले.त्याने अनेक प्रकार चे दागिने दाखवले पण त्यांना कांहीच पसंत पडले  नाही.अखेर त्याने दाखवलेली लाखमोलाची नवरत्न अंगठी पसंत पडली.

           रात्री निवांत बाजीराव काशीबाईंच्या महाली आले.आणि त्यांनी खरीदलेली ती नवग्रहाची अंगठी पतीच्या बोटात घालत म्हणाल्या,ही शकुनाची अंगठी जोवर इकडच्या बोटात आहे तोवर आम्हाला कशाचीच मातबरी वाटणार नाही.आणि गोविंद विडा देत विचारले, आपण मोहिमेवर असतांना कोण विडा देत?  बाजीरावांनी त्यांची फिरकी घेत म्हणाले, आम्हाला काय कोणत्याही नाजूक हातचा विडा चालतो.मग गंभीर होत म्हणाले, तुम्ही विड्याचं विचारले पण आम्ही भोजन कुठे घेतो हे नाही विचारले.आतां सांगाव! आमचं जेवण असते घोड्याच्या पाठीवर.कित्येक दिवस अन्नाची व आमची गाठ सुध्दा पडत नाही.आम्ही स्वारीवर असलो की,आमच्याभोवती असतात हे राकट सरदार,शिलेदार आणि त्यांची हत्यारे म्हणूनच आम्ही मोहिमेवरुन परतलो की,आस असते तुमच्या हातच्या विड्याची!

                  क्रमशः
  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                   दि. ९-४-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                    भाग – ४.

           काशीबाईंचा पाय दुखत असल्याचे कळल्यावर बाजीराव त्यांच्या समाचाराला  महाली आले.त्यावेळी त्या येसू दासीबरोबर बुध्दिबळ खेळत होत्या. श्रीमंत आल्यावर दासी ताबडतोब निघून गेली.नंतर थोडावेळ उभयंता खेळलेत.कंटाळा आल्यावर पट बाजूला सारला बाजीराव म्हणाले,आम्ही सतत मोहिमेवर असतो म्हणून तुन्ही सतत चिंतेत असता,तर तुम्हाला एक काम सोपवावं म्हणतोय! आज्ञा करावी,आमच्याने होणार असेल तर जरुर करु.

          आमचा कलावंतांचा कारखाना आहे. त्यांच्या बिदागीचे आकडे कारकुनाच्या मदतीने तुम्ही घालावेत म्हणजे कुणा कलावंताला तक्रार करायला वावच राहणार नाही.तुमचा निर्णय अखेरचा असेल. आम्ही जरुर प्रयत्न करुं!

‌           पर्वतीच्या डोंगराजवळ सपाट केलेल्या मैदानात घोड्यांचे सौदागार विक्रीसाठीआपले घोडे घेऊन जमा झाले. बाजीराव अश्वपरीक्षेत प्रविण होते.घोड्यांची परीक्षा करुन बरीच घोडे खरेदी केले.तेवढ्यात त्यांचे लक्ष एका नाठाळ पांढर्‍या शुभ्र घोड्यावर गेली.तो अतिशय तेज असल्याचे सांगीतल्यावरही पेशव्यांनी त्याच्या वर मांड ठोकली.त्यांना सहजी बसू न देण्या साठी घोड्याने बरेच नखरे केले पण पेशव्यांपुढे त्याचे कांही चालले नाही

‌बरेच लांब आल्यावर त्यांना जंगलात माणसांचा घोळका दिसला.चौकशीअंती कळले की, आज बकरी इद असल्यामुळे मस्तानी फकीरांना खैरात वाटत आहे.पेशवे अचानक

 समोर आलेले बघून मस्तानी खाली पाहत अवघडून उभी राहिली.सरकार आज इकडे कुठे या घोड्याने आणले.पण कोथरुडमधे राहत असतांना तिथे खैरात वाटण्याऐवजी एवढ्या दूर जंगलात?मस्तानी म्हणाली,तिथे महादेवाचे मंदिर असल्यामुळे बकरीईदची खैरात तिथे न वाटतां इकडे दूर येऊन वाटतो.सारा प्रकार लक्षात आल्यावर गंमतीने बाजीराव म्हणाले, आमच्या वाट्याला कांही खैरात?आपण ब्राम्हण आहात.इच्छा असल्यास आमच्या ठीकाणाकडे चलावं.आमच्या बुध्दीनुसार आपली सेवा करु.

            ठीक आहे.आम्हीही सकाळपासून घोडा फिरवून दमलोय.घसा सुकला.आम्ही बागेतील मंदीराकडे जातो असे म्हणून त्यांनी घोड्याला टांच दिली.मंदिराजवळ घोडा येताच पहार्‍यावर असलेल्या चंदा जमादार धावत येऊन मुजरा  केला.आम्ही देवदर्शन करुन येतो तोवर पर्वतीवरच्या लोकांना व पुण्यातील हवेली कडे आम्ही इथे मुक्कामाला असल्याची वर्दी दे. दर्शन घेऊन ते सभामंडपात आल्यावर पुजार्‍याने दिलेले पाणी पित आहेत तोच घोडा फेकत मस्तानी व बसंती  येऊन पोहोचल्या. मस्तानीने मोठ्या ऐटबाज नजाकतीने घोड्या वरुन खाली उडी मारली.आणि कुर्निसात करुन श्रीमंतांना म्हणाली,हुजुरांनी कांही तरी घेतल्या शिवाय जाऊ नये ही विनंती.ठीक आहे. पेशवे गाशावर बसल्यावर ब्राम्हणाने आणलेला दुधाचा पेला मस्तानीने हाती घेऊन पेशव्यां समोर धरला.दुध घेत असतांनाच माणसांचा व घोड्यांच्या टापांचा आवाज आला.पाठोपाठ  पर्वतीवर पेशव्यांसोबत असलेले लोकं त्यांचा माग घेत कोथरुड बागेत येऊन पोहचले. काही चर्चा झाल्यावर ते लोकं निघून गेले.पेशव्यांचा मुक्काम त्या रात्री कोथरुड बागेत झाला.

             संध्याकाळी पेशव्यांनी मस्तानीकडे गाण्याची फरमाईश केली.सभामंडपात बिछायतीची व्यवस्था केली.निवडक सरदार व मानकरीही हजर होते.हीना अत्तराचा शिडकाव केल्याने संपूर्ण वातावरण सुगंधाने दरवळत होते.पेशवे आसनस्थ झाल्यावर इतरही लोकांनी आसन ग्रहण केले.मस्तानी आपल्या  सांजिंद्यासह प्रवेशली.खाली वाकून मस्तानीने पेशव्यांना तीनदा कुर्निसात केला.त्यांनी गाणे सुरु करायचा इशारा दिला. मस्तानीच्या गळ्यातून सूर बाहेर पडले.

   “निसदिन बरसत नयन हमारे” मस्तानीचा मुलायम स्वर रसिकांच्या मनाला स्पर्शुन गेला. आर्तता अंतःरंगाला भिडली.सारंगीचा सूर आणि तबल्याच्या ठेक्यात मस्तानीने सुरांच्या बरसातीत न्हाऊ घातले.सारंगीतून तरल स्वर आणि गळ्यातून स्वर्गीय तान बाहेर पडत होती. धुंद स्वरांबरोबरच डोळ्यांचे विभ्रमही होत होते. भृकुटी आणि नेत्रांच्या हालचाली एवढ्या मोहक होत्या की,तिच्या कंठातून निघणारे सूर कानात साठवावे की, सुरांपाठोपाठ तिच्या त्या तारुण्याने रसरसलेल्या मुखावरचे हावभाव नजरेत साठवावे याचा संभ्रम पडत होता.बेहोषी सगळीकडे पसरली.मस्तानी गात होती.नयना तील अदाकारी जाणकार्‍यांना समजणारी होती गाणे संपल्यावर आणखी फरमाईश झाली. सुरांनी मंडप भरुन गेला.मस्तानी चिजामागून चिजा पेश करत होती.आणि बाजीराव खुशीची बरसात करत होते. बैठक संपल्यावर बाजीराव दालनात आले.

             मस्तानी, राजाज्ञानुसार आम्हाला कांही दिवसांसाठी महाराजांकडे जावे लागेल. परत येण्यास कधी अनुमती मिळेल याचा नेम नाही.तूं सांभाळून रहा.

                 क्रमशः
  संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. १०-४-२०२२.

मस्तानी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading