
पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!! बाजीराव मस्तानी !!!
!!! मस्तानी !!!
भाग – ५.
पेशवे राजदर्शनाला सातार्याला जाणार व परतण्याची निश्चिती नसल्यामुळे, फडावरील कामे तातडीने उरकवल्या जात होती तेवढ्यात मातोश्री राधाबाईचा भेटीला येण्याचा निरोप आला.मातोश्रींनी आठवण काढली. होय राऊ, आप्पाचं अवघ २५ वर्षाचं वय.त्यांच आई विनि लहान लेकरु,तो सतत स्वारीवर! कुणी तरी मायेचं माणूस असाव ना? आम्ही मुलगी बघितली पण,आप्पा दुसर्या लग्नाला तयारच होत नाही.नेहमी बाहेर राहणं,कोणत्यावेळी माणसाच्या हातून काय घडेल सांगता येत नाही.
घरात सोन्यासारखी बायको असून देखील पुरुषाचं लक्ष बाहेर जातच, हा तर सडाफटिंग! हा टोमणा आपल्यासाठी मस्तानीच्या संदर्भात आहे हे त्यांनी जाणले.
ठीक आहे.आम्ही करुं राजी आप्पांना लग्नासाठी,पण दौलतीवर तीस लाखाचं कर्ज आधीच असल्यामुळे,पेशव्यांच्या तोलामोलाचं लग्न होऊ शकणार नाही.आमचा आग्रह नाही. फक्त नवी सून लवकर घरात आणावी.
सातार्याला पेशव्यांचा मुक्काम अदालतवाड्यात होता.मुहूर्त पाहून पेशवे राज दर्शनाला गेले.पेशशे भेटीला आले म्हणून छत्रपतींना आनंद झाला.पेशव्यांनी छत्रपतींना लवून मुजरा केला व आणलेल्या विविध भेटी पेश केल्या.नजराणा बघून छत्रपती खुश झाले. निरोपाचे विडे होऊन दरबार बरखास्त झाला. पण बाजीराव व चिमाजींना थांबवुन घेतले. पेशव्यांसाठी तयार असलेल्या आसनावर पेशवे व त्यांच्या बाजूने चिमाजीआप्पा अदबीने बसले
पडद्याआड छत्रपतींच्या लाडक्या राणीसाहेब विरुबाई बसल्या होत्या.
राजकारणावर बर्याच गोष्टी झाल्या वर राजे म्हणाले, राऊ, तुम्ही उत्तरेकडील राजकारण हाती घेणार,पण एक गोष्ट लक्षात ठेवा,आम्ही बादशहाच्या कैदेतून सुटतांना गाईचे पुच्छ धरुन वचन दिले होते, कांही झाले तरी,मराठे बादशाहीला धक्का लावणार नाही. बाजीरावांच्या कपाळावर आठी उमटली.समोर छत्रपती आहेत याचा जणूं त्यांना विसर पडला अन् तोंडून शब्द बाहेर पडले.म्लेच्छांनी दिलेल्या शब्दांंची मात्तबरी ती काय? तेऽ कोणते वचन पाळतात?कोणती वचने पाळावी व कोणती पाळू नये याचे ठोकताळे राजकारणात वेगळे आहेत.पण राऊ, आमचे वचन गुंतले आहे. छत्रपतींनी दिलेलं वचन पाळत नाही असा आमचा दुर्लोकिक व्हायला नको आहे.
पण स्वामींनी म्लेच्छांना वचन देण्या पूर्वी थोरल्या महाराजांनी राज्यभिषेकाच्या वेळी सर्व पवित्र नद्यांच्या जलाला साक्षी ठेवून वचन दिले होते की, अवघा हिंदुस्थान यवनांच्या मगरमिठीतून सोडवून हिंदू तीर्थक्षेत्र मुक्त करीन त्या वचनांची पूर्तता करण्यासाठीच तर स्वामीं नी आम्हाला हे पेशवेपद दिले आहे.पराक्रमाने तीर्थक्षेत्र सोडवावीत यासाठी आमचा शब्द स्वामींजवळ गुंतला आहे.ते जर होत नसेल तर ही मोठी पदं मिरवायची कशाला?बाजीरावांचा आवेश बघून स्वामींचा रोष न व्हावा म्हणून मधेच चिमाजी आप्पा म्हणाले,दिल्लीची बादशाही कायम ठेवूनही धर्मक्षेत्रे सोडवू शकु! आमचेही म्हणणे हेच आहे.निरोपाचे विडे घेऊन दोघे बंधू आपल्या मुक्कामाकडे निघाले.
एके दिवशी चिरंजीव नाना आनंद बातमी घेऊन काशीबाईकडे आले.म्हणाले, राऊंच्या प्रयतानांनी आप्पा लग्नाला राजी झाले मग म्हणाले, ताई, कलावंताचा कारखाना तुमच्या अख्त्यारीत आहे ना? जन्माष्टमीच्या उत्सवानिमित्य पुण्याहून गायक,नर्तक कलावंत बोलवायचेय, त्यात मस्तानीलाही बोलावण्या साठी तुमची आज्ञा हवी आहे.स्वारींची मर्जी व आमची इच्छा दोन नाहीत.ते करतील ते आम्हाला मान्य आहे.जन्माष्टमी उत्सवासाठी मस्तानीला सातार्यास पाठवण्याबद्दलचे पत्र पुण्याला रवाना झाले.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-४-२२०२२
!!! मस्तानी !!!
भाग – ६.
सातार्याला अदालतवाड्यात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची तयारी जोरदार सुरु होती. संबंध वाडा श्रृंगारला होता.शाहू महाराज व त्यांच्या राण्यांना खास आमंत्रण दिल्या गेले. पुण्याहून येणार्यांसाठी कृष्णाकाठी माहुलीला असलेल्या वाड्यात सोय केली.मस्तानी व तिच्या साथीदारांना माहुली वाड्यात पेशव्यांनी स्वतंत्र जागा दिली.
पेशव्यांच्या व्यवस्थेत कुठेही उणीव दिसू नये म्हणून चिमाजीआप्पा व नाना स्वतःच्या देखरेखेखाली व्यवस्था पाहत होते. दालनात लोडतक्याची बैठक व एका बाजूने चिकाचे पडदे सोडून स्रियांच्या बसण्याची व्यवस्था केली होती.काशीबाईही उत्साहाने वावरत होत्या.पण ऐन जन्माष्टमीच्या दिवशी पायाचे दुखणे वाढल्यामुळे सकाळपासून त्या महालातच बसून होत्या.
उत्सवाची सर्व तयारी झाली.सर्व मानकरी,सरदारांंना त्यांच्या मानाप्रमाणे पेशव्यां च्या सेवकांनी बसवले.शेवटी शाहू महाराज आणि बंद मेण्यातून राणीवसा आला.पेशवे जातीने सामोरे जाऊन छत्रपतींना मुजरा करुन स्वागत केले आणि त्यांच्यासाठी बनवलेल्या उंच आसनावर बसण्याची विनंती केली. चिकाच्या पडद्याआडून बिरुबाईने चौकशी केली, पेशवीन दिसत नाही? त्यांचा पाय दुखत असल्यामुळे बसवणार नाही म्हणून आल्या नाहीत.
हरदास कीर्तनासाठी उभे राहिले. कृष्ण जन्माचे रसाळ आख्यान सुरु झाले. रात्री १२ वाजतां कृष्णजन्म झाला.सुंठवड्याचे वाटप झाल्यावर छत्रपती आपल्या राण्यांसह बाहेर पडले.कलावंताच्या नाचण्यासाठी खास बैठक तयार करण्यात आली होती.निवडक मानकर्यां सह बाजीराव पेशवे नृत्य बघण्यासाठी आसनस्थ झालेत.मस्तानी आल्यावर पेशव्यांना मुजरा व मानकर्यांना अभिवादन करुन तिची नजर बाजीरावांवर खिळली.त्यांच्या इशार्या नुसार तिच्या पैंजणातून मुलायम छुमछुम निनादली.आणि नाजूक पावलं थिरकू लागली.
हातांच्या बोटांनी दर्शवलेले विविध भाव,भृकुटी ची विविध मुद्रा आणि वार्याशी स्पर्धा करीत पावलांनी पैंजणातून काढलेल्या स्वरांनी पाहणार्यांचे भान हरपले.दोन अडीच घटका मस्तानी नाचली तरी पाहणार्यांची तृप्ती झाली नाही.नृत्य संपल्यावर बिदागी घेऊन पाठ न दाखवतां हलक्या पावलांनी बैठकीतून मागे सरली.कृष्णजन्माष्टमीचा सोहळा संपला.
बाजीराव आपल्या शयनगृहात झोप येत नसल्यामुळे कुस बदलत होते.अस्वस्थ मनाने दालनात फेर्या मारु लागले.कानात घुमणारा आवाज,तिरपे नेत्रकटाक्ष त्यांचा पाठलाग सोडत नव्हते.शेवटी मनात कांही ठरवले.अंगावर शाल लपेटून,पायात चढाव चढवून बाहेर आले.पहार्यावर असलेल्या कुंवर ला इशारा करुन पागेतील दोन घोडे काढायला लावले.दोघेही घोड्यावर स्वार होऊन कृष्णा नदीच्या तीरी आले.कृष्णानदीला महापूर असल्यामुळे नावाडी नदीत नाव घालायला तयार होत नव्हता.ओळख दाखवायची नव्हती. अखेर बोटातील नवग्रहाच्या अंगठीची लालूच दाखवल्यावर तो तयार झाला.पैलतीरी नांव लागली. मस्तानीच्या मुक्कामी आल्यावर पहार्यावर असलेल्या चंदा जमादाराला मस्तानीला वर्दी द्यायची आज्ञा दिली. तो परत येण्याची वाट न बघतां पेशवे वाड्याच्या आंत गेले.भराभर दरवाजे उघडल्या गेले आणि थेट मस्तानीसमोर उभे राहिले.ती आश्चर्योदगाराने म्हणाली, आप?बाजीराव मस्तानीला आपादमस्तक न्याहाळत होते.मस्तानी आम्ही मजबूर आहोत.तुझ्या पैंजणांच्या नादानं आम्हा ला इथे ओढून आणले.आणि शामदानीने मोमबत्तीच्या ज्योती बाजीरावांनी शांत केल्या. त्या अंधारात त्यांचा विळखा मस्तानीभोवती पडला.
राजकारणाने विलक्षण वेग घेतला. गुजराथ माळवा,बुंदेलखंडात पेशव्यांच्या फौजा धुमाकुळ घालीत होत्या.दिल्लीत पातशहा आपल्या वजीर, सरदारांशी मसलतीवर मसलती करीत होता.दक्षिणेत निजामलाही पेशवे आपल्यावर चालून येतात की काय अशी भीती वाटू लागली.पेशव्यांची दहशत हिंदुस्थान भर पसरली होती.
छत्रपतींच्या आज्ञेवरुन,पेशवे निजामा ला भेटायला जात असल्याची बातमी सर्वांना कळली.तातडीने काशीबाईची आई शिऊबाई चासेहून घोडदौड करी आल्या.जावयांची भेट घेऊन म्हणाल्या,आम्हाला खात्रीलायक बातमी कळली,पेशव्यांचा घात करण्याची छत्रपतीची योजना आहे.छत्रपतींचे आम्ही सेवक,ते कां आमचा घात करतील?
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-४-२०२२.
!!! मस्तानी !!!
भाग – ७.
शिऊबाई पुढे म्हणाल्या,छत्रपतींना भीती वाटते की, पेशवे त्यांना गिळून टाकणार, शिवाय निजामाच्या डोळ्यातही खुपताहात, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं राजकारण छत्रपती खेळताहेत.खरं वाटत नाही.हे खरं आहे तसे आमच्याजवळ कागदोपत्री पुरावा आहे. तुमची आणि निजामाची भेट जर छत्रपतींनी घडवून आणली तर, नबाब त्यांना दोन कोट देणार आहे.मातोश्री, छत्रपतींना आमच्या कांही बाबी पसंत नाही हे आम्हाला ठाऊक आहे पण ते पेशव्यांच्या जीवावर उठतील,खरे वाटत नाही आम्ही सावध करायचं काम केल,याउपर आपली मर्जी,थोड्या नाराजीने शिऊबाई म्हणाल्या. मातोश्री,तुमची आमच्याविषयीची कळकळ समजते, पण शाहू महाराज थोरल्या महाराजांचे नातू आहेत,त्या रक्तात दगाबाजी नाही. सेवकाचा खून शत्रूकडून करवावा एवढ्या हलक्या मनाची व्यक्ती त्या कुळात जन्म घेणार नाही.खुद्द छत्रपती नसतीलही पण त्यांच्या भोवतालचे लोक?त्यांनीच छत्रपतींना सल्ला दिला असला तर?ठीक आहे जरुर विचार करुं!
निजामच्या भेटीस जाण्याचे छत्रपतीं कडून निक्षून आज्ञापत्र आले.त्यांच्या आज्ञेनुसार जाण्याची तयारी सुरु झाली.मात्तबर सरदार आधीच उत्तरेकडील मोहीमेवर गेलेले,पेशव्यां जवळ कार्यक्षम सरदार कोणीच नव्हते.पेशवे निजामभेटीस जाणारची बातमी धावडीला परम हंसांना कळताच त्यांनी खास शिष्य पाठवून जाऊ नये असा निक्षून पत्र पाठवले.त्यांच समाधान होईल असं नम्रतेने पत्राचे उत्तर पाठवले.या गडबडीत इतर गोष्टींची चौकशी करायला फुरसतच मिळाली नाही.
कुंवरने बातमी दिली,गेल्या ३-४ दिवसां पासून काशीबाईंनी अन्नत्याग केला आहे.पेशव्यांनी दोन प्याले दुध पाठवण्यास सांगून त्यांनी काशीबाईंंच्या दालनात गेले.पती ची चाहुव लागताच त्या खाली मान घालून उभ्या राहिल्या.रडून डोळे सुजलेले.बाजीरावांनी त्यांना जवळ बसवत डोळे पुसत म्हणाले, पेशव्यांच्या हवेलीला गृहलक्ष्मीचे अश्रू पाहयची सवय नाही.निजामाच्या भेटीस्तवच एवढा त्रागा ना?अगऽ आम्हीला छत्रपतींची आज्ञा पाळणे कर्तव्य नाही कां? पेशवे निजामाला भिऊन भेटीला गेला नाही, अशी दुष्कीर्ती हिंदुस्थानभर झालेली तुम्हाला चालत असेल तर नाही जात. आज पेशव्यांच्या नुसत्या नांवाने शत्रू थरथर कापतो, तेच त्याला की, भिऊन पेशव्यांनी निजमाची भेट टाळली तर, रणांगणात दहादा पराभव झाल्यासारखं होईल. चालेल तुम्हाला? असा अवघड खोंडा टाकल्यावर काय बोलणार
बाजीरावांनी दिलेला दुधाचा पेला आवंढा गिळत ओठी लावून अश्रूंबरोबर दुध गिळले.आणि म्हणाल्या, फक्त आमचं एक ऐकावं, निजामभेटीस जातांना आम्ही दिलेली शकुनाची नवग्रहाची अंगठी घालून जावे.त्यांनी चमकुन बोटाकडे बघितले तश्या काशीबाई म्हणाल्या, जामदारखान्यात ठेवलेली आहे, तेवढी काढून घ्यावी.त्या अंगठीत आमचा आत्मा वसला आहे.कुठल्याही संकटात इकडच्या स्वारींना ती अंगठी सांभाळुन घेईल.
ठीक आहे,पुटपुटत पेशवे बाहेर पडले.
सारी रात्र बाजीराव मंचकावर तळमळत होते.काळजीने सुकलेला पत्नीचा चेहरा,तर कधी रिक्त बोटावरुन हात फिरत होता.सकाळी आन्हिक आटोपून कुंवरला बोलावून अंगठीबद्दल विचारल्यावर कावरा बावरा होत,घाबरुन म्हणाला,अभय असेल तर हकीकत बयान करतो.सध्या ती अंगठी जानदारखान्यात आहे.त्या अंगठीपायी आप्पा स्वामींनी माझी चामडी लोळवली होती.आणि सक्त ताकीद मिळाली होती,की, कुठे बोललो तर जीभ छाटल्या जाईल,आतांसुध्दा आपले अभय मिळाले म्हणून बोललो.सक्त हुकुम होता ही गोष्ट त्यांना माहीत असल्याबद्दलचा ब्र काढायचा नाही.पाठीवर कोरडे ओढून सत्य घटना माझेकडून वदवुन घेतली होती. अस्स? आणखी कोणाला माहित आहे?बहुतेक पंतांना त्यांना आम्ही तातडीने बोलावल्याचा निरोप सांग!कुवंरने सुटकेचा निःश्वास टाकून घाईने दालनाबाहेर पडला,पंताना निरोप देण्यास.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख
दि. ११-४-२०२२.
!!! मस्तानी !!!
भाग – ८ .
कुंवर अंबाजीपंतांना घेऊन आला व पहार्यावर उभा राहिला.कोणालाही आत न सोडण्याचा सक्त हुकुम दिला.पंत आमची नवग्रहाची अंगठी जामदारखान्यात जमा झाली असल्याचे तुम्हाला माहित आहे?पांढर्या मिशा क्षणभर थरथरल्या.कसेतरी शब्द बाहेर पडले, माहीत आहे श्रीमंत!पण या बाबतीत बोलू नये अशी सक्त आज्ञा आप्पांची होती.पण हवेलीत घडणारी प्रत्येक घटना सांगण्याचे कर्तव्य, जबाबदारी तुमची आहे ना? होय पण मामला नाजूक असल्यामुळे अवघडलो.वहिणीसाहेबां नी मोठ्या प्रेमाने दिलेली अंगठी ज्या परिस्थितीत कोळ्याला दिल्या गेली…म्हणून तुम्ही हा सारा प्रकार लपवून ठेवलात? आम्ही मस्तानीकडे गेलो त्यात गैर काय झाले?श्रीमंत नाटकशाळेकडे गेलेत यात गैर कांहीच नाही. घरंदाज माणसांचे अंगवस्र,नाटकशाळा असतातच, पण आपल्या जिवाभावाच्या माणसाने प्रेमाणं दिलेली वस्तू मागचा पुढचा विचार न करतां एका नाटकशाळेपायी दीडदमडीच्या कोळ्याला दिली.श्रीमंतांनी बाईसाहेबांच्या भावनांची कदर करायला हवी होती.
पंत तुम्ही आम्हाला लहानपणापासून ओळखतां.तुमच्यापासून पेशवे घरातील कोणतीच गोष्ट लपून नाही.होय! पण श्रीमंत बेहोशीत केलेली एखादी गोष्ट भलत्याच थराला जाऊ शकते.पंत,आम्ही बेहोशीतच जगतो. वयाच्या १९ व्या वर्षी स्वामींमी दिलेली शिक्के कट्यार स्विकारतांना आम्ही कोणता विचार केला होता? आजपर्यत आयुष्याची कुर्बानी करीतच आम्ही जगत आलोय.पंत झुंझात आणि इष्कात आम्ही नेहमीच बेहोश असतो. मग बोलनेच खुंटले. नाही पंत, आमच्या हातून घडलेला प्रमाद आम्ही नाकारत नाही.चुक पदरात घेतो.पण पंत, सेवकाने आपली पायरी ओळखून असावं.बाजीरावांचा स्वर एकाएकी चढला.पुन्हा असे घडले तर वयाचा मुलाहिजा ठेवणार नाही.दचकून पंतानी वर पाहिले.पण श्रीमंत… या तुम्ही! श्रीमंत नाराज झाले हे ताडले.नमस्कार करुन पंत निघून गेले.
दिवाळी आली पण हवेलीत उत्साह कुणालाच नव्हता.हवेलीभोवती कोट बांधकाम छत्रपतींच्या आज्ञेने एकाएकी बंद पडले.आधीच नाराज असलेल्या पेशव्यांना निजाम भेट घेण्यास आज्ञा करावी? छत्रपतींची प्रत्येक आज्ञा तत्परतेने झेलत असतांना, केवळ संशयाने, कोट बांधण्यास मनाई करावी,शत्रूच्या भेटीस पाठवावं याचं त्यांना अतिशय दुःख झालं, पण बाहेर दिसू न देता, रोजचे कामं सुरु होती.
परमहंस बाबांकडून निजाम भेटीस न जाण्याबद्दल वरचेवर पत्र येत होते. खुद्द त्यांच्या बहिणी अनुबाई व भिऊबाईंनीही गळ घातली. पण पेशवे कुणाचच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.छत्रपतींच्या मुत्सद्यांनी त्यांना बरोबर पेचात पकडले होते.त्यांचा निश्चय पाहून हेवेली तील सार्यांच्याच तोंडचे पाणी पळाले.पाडव्या च्या दिवशी सणाचा दरबार लवकर आटोपला. आणि आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार होऊन कोथरुडच्या बागेकडे वळवला.
मस्तानीची इमारत दीपमालांनी उजळली होती.ते आतल्या दालनात शिरुन सजलेल्या बैठकीवर विराजमान झाले. तोच मस्तानी त्यांच्याकरितां दुधाचा पेला घेऊन आली.बाजीराव तिच्याकडे भान हरपून बघतच राहिले.दिवाळीचा पोशाख व अलंकार पाठवले होते तेच तिने परिधान केले. हिरवाकंच शालू, केसांच्या खोप्यात मोत्यांनी माळलेल्या मुदी, अग्रफुल खोचलेलं,रत्नजडीत कर्णभूषणं,त्यावर वेली,गळ्यातील अलंकार,कमरपट्टा,हातात गोठ,तोडे,पाटल्या,नाकात टपोर्या मोत्याची नथ,बाजुबंद,कुलीन मराठमोळे खानदानी रुप पाहून तिच्या अप्रतिम सौंदर्यावर खिळलेल्या नजरेने म्हणाले,या सौंदर्यापुढे तर स्वर्गातील अप्सरांचे सौंदर्य फिके पडेल.तिच्यातील एका गौष्टीची उणीव जाणवल्याने बंसंतीला आज्ञा दिली.तिने धावत जाऊन कुंकवाचा करंडा आणलेला पाहून, मस्तानी म्हणाली, हूजूर मी एक सामान्य औरत, ही धगधगती आग या मस्तानीला सहन व्हायची नाही.आमची मर्जी ती मस्तानीची असं आम्ही समजतो.मंजूर? या दासीने दिलाची कुर्बानी कधीच या पायावर अर्पन केली आहे.बाजीरावांनी करंड्यातील कुंकु मस्तानीच्या कपाळावर रेखाटलं.आतां ही तसबीर पूर्ण झाली.फराळपाणी झाल्यावर, म्हणाली, एक बुरी खबर ऐकली ती खरी आहे का?आम्ही निजामभेटीस जाणार तीच ना? होय! आम्ही अडथळा आणणार नाही,पण एक अर्जी आहे.आमचे एक महिन्याचे रोजे संपल्या संपल्या आपण पुण्यात येऊन आमची सेवा कबुल करावी.नक्कीच! मस्तानीने दिलेला विडा घेऊन बर्याच रात्री बाजीराव हवेलीकडे परतले.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
ता. ११-४-२०२२.


