संत मुक्ताबाई संपूर्ण भाग ३, (७ ते १०)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇



“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!संत मुक्ताबाई !!

!!! मुक्ताबाई !!!

भाग – ७.

मुक्ताबाईचा परमशिष्याने समाधी घेतल्यावर “गेले योगीराज राहिले ठायी ठायी। आतां मुक्ताबाई जाईल की ।।”असे नामदेवांना आंतरिक वाटले आणि ज्ञानदेव, सोपानदेवांनी समाधी घेतल्यानंतर चांगदेवांनीही समाधी घेतल्यावर मात्र खरोखरच मुक्ताबाईंनाही स्वतःच्या समाधीचे वेध लागले.

आपल्या विलक्षण झळाळीने क्षणकाल झळकुन गेलेली आणि जिथुन आली तिथेच निमालेली विद्युल्लता म्हणजे मुक्ताबाई. इतकी वर्षे उलटल्यावर ही त्यांंची प्रकाशमयता आणि दिप्तीच फक्त जाणवते. परंतु ही प्रकाशरेखा, अवकाशात क्षणकाल उद्भवुन परत नलिकाशात शांतपणे विलिन होणे, हे तपशील जरी आज आपल्याला स्पष्ट होत नसले तरी, त्याकाळी त्यांच्या अस्तित्वाने उजळुन प्रकाशित झालेल्या व्यक्तींनी काढलेले उद्गार या “सौदामिनीचे” स्वरुप खर्‍या अर्थाने आकलन होऊ शकते…. जनाबाई आपल्या अभंगात म्हणते… निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने। मुक्ताबाईची वचने ज्ञानदेवे।। “ज्ञानदेवांसारख्या योग्याने मुक्ताईचे अभंग लिहुन घ्यावेसे वाटावे यातच त्यांचे श्रेष्ठत्व सिध्द होते.” आदिशक्ती मुक्ताबाई। दासी जनी लागे पायी।।” मुक्ताबाई ह्या आदिमाया असल्याची सर्वमान्य समजुन जनाबाईच्या अभंगातुन व्यक्त होते. ज्ञानदेवांची भेट झाल्यावर कान्होपात्रा आनंद व्यक्त करतांना म्हणते, “शिव तो निवृत्ती। विष्णु ज्ञानदेव पाही। सोपान तो ब्रम्हा। मूळ माया मुक्ताई।।” तिन्ही मूर्ती अवतार।धरुनि करिती जगचा उध्दार। मूळ आदिमाया साचार। धरी अवतार मुक्ताबाई असे संत सेना न्हावी म्हणतात. संत चोखामेळा, परसा भागवत, एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांचा नातू मुक्तेश्वर निळोबा महाराज, महिपती, निरंजन माधव, श्री आदिनाथ भैरव, शिवदिन केसरी, गुरुदेव रानडे, धुंडामहाराज देऊलकर या सर्वच महान विभूतींनी मुक्ताबाईबद्दल अभंगरुपाने गौरवात्मक स्तुतीसुमने, थोरवी गाईली आहे आणि मुक्त प्रवाहाची नांव।निवृत्ती अवल्या सद्गुरुराव । सोपान वरी ज्ञानदेव । पार जाले।।” ज्ञानेश्वरांनी केलेल्या या गौरवापेक्षा आणखी कोणता गौरव असु शकतो

निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधन मार्गावरुन ज्ञानदेव व मुक्ताबाईचा सह प्रवास सुरु असतांना मुक्ताबाईंना आलेल्या शंका ज्ञानेश्वरांना विचारुन शंका समाधान करुन घेत होत्या. समोर असलेली विठ्ठलाची मूर्ती ही ज्योतींची निजज्योत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, परंतु मुक्ताबाईंना मात्र वेगळे जाणवले. त्यांना सगुण-निर्गुणाचा पेच पडल्यावर सखोल विचारांती लक्षात आले की, ती विठ्ठलमूर्ती सगुणही नाही आणि निर्गुणही नाही. हा आपला विचार चुक की बरोबर म्हणुन त्या ज्ञानेश्वरांना म्हणतात…

म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानेश्वरा।

विचार हा बरवा करुनियां।।”

मुक्ताबाईंचा हा अत्यंत गहन प्रश्न ऐकुन, आतां तत्वज्ञानाच्या खोल डोहात शिरल्याशिवाय गत्यंतर नाही हे जाणुन, ज्ञानदेवांनी त्यांना निर्गुणातुन सगुणाची उत्पत्ती कशी झाली?मूळद्वारी मूळापाशी स्थापिलेल्या गणपतीशी निर्गुणाची वस्ती कशी आहे? “निर्गुणाचा बंद सगुणीं उत्तरला।कर्दम तो झाला एकाएकी।।” अशा सोप्या भाषेत हा गहन विषय उलगडुन दाखविला. ज्ञानदादाकडुन समर्पक उत्तरे मिळुन ज्ञानांत भर पडते म्हणुन, मुक्ताई रोजच कांहीना कांही प्रश्न विचारुन स्वतःचे शंकासमाधान करुन घेत असे. मुक्ताईची जिज्ञासा पाहुन ज्ञानदेवही भरभरुन ज्ञानबोध देत असत.

मुक्ताई हे जे प्रश्न विचारी ते केवळ वर वरचे किंवा बौध्दीक भूक भागवण्यासाठी विचारलेले नव्हते तर त्या प्रश्नांमागे प्रखर साधनेची भरभक्कम पार्श्वभूमी होती. तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास, ज्ञान असलेले ज्ञानेश्वर त्यांना समजावुन सांगत. अध्यात्मिक रसाचे नित्यनवे सेवन करणार्‍या मुक्ताबाईंना तत्वज्ञानासारखा रुक्ष विषयात किंवा विशेष क्रीया करुन ईश्वरप्राप्ती करुं पाहणार्‍या लोकांच्या मार्गावरही त्यांचा विश्वास नव्हता.

“सर्वांतुनि वेगळा हाती कैसा येई।

म्हणे मुक्ताबाई सांगा दादा।।” ज्ञानेश्वरांनी गुरुकृपेचे महत्व सांगीतल्यावर मुक्ताईला प्रश्न पडला, गुरुकृपा झाली किंवा नाही हे कसे ओळखावे? व्यास, वाल्मिकी, वेद या सार्‍यांना देखील ज्याचा पार लागला नाही, इंद्रियावेगळा, मनबुध्दी निराळा तो, सर्वांमधे व्यापला आहे हे कसे ओळखावे यासाठी ज्ञानदादाला मुक्ताई विनवताहेत.

क्रमशः
संकलन ©® मिनाक्षी देशमुख.

!!! मुक्ताबाई !!!

भाग – ८.

मुक्ताईच्या विनंतीला मान देऊन, देहाला ज्यामुळे मोक्षप्राप्त होतो ती साधना मुक्ताबाईला सांगीतल्यावर या मार्गाचा खरा बोध होऊन नेमका उलगडा झाल्यावर, त्याची साक्षात प्रचिती घेण्या साठी स्वतःला कठोर साधनेमधे गाडुन घेतले. या कठोर तपश्चर्येचा परिणामाने झालेल्या ब्रम्हप्राप्तीचा अनुभव त्या ज्ञानदेवांना सांगत म्हणाल्या…

सहज समाधि लागली निर्गुणी।

खुंटलीसे वाणु न चले पुढे।

खुंटला हा शब्द राहिला व्यवहार।

झाला साक्षात्कार सदोदित।

गळाली इंद्रिये राहिलेसे मन।

झाले महाशून्य एकाएकी।।”

मुक्ताबाईंनी इतक्या अल्पावाधित प्राप्त करुन घेतलेल्या उच्च दशेनी ज्ञानदेव समाधान पाऊन म्हणाले,

“म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई।

उघडी समाधी घेई जगामाजी।

आठवे समाधिचे अंग आले तुज।

आता नाही काज आणिकांसी।।”

उघडी समाधी घेण्याइतकी योग्यता मुक्ताबाईंच्या ठायी आली याची जाणीव ज्ञानदेवांना झाली.

मुक्ताबाईंना ब्रम्हप्राप्ती झाल्यावर, योग्यता ओळखल्यावर ज्ञानदेवांना प्रश्न पडला, लहानपणी प्रश्ने विचारुन भंडावुन सोडणारी हीच का ती मुक्ताई? कां तिचे प्रश्न विचारणे म्हणजे, जे तीला आधीच माहित होते, तो का खेळ होता?

मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजे, लहानग्या लाडीवळ मुक्ताईने, थोरल्या भावाची ज्ञानदेवांची अधिकार वाणीने घातलेली समजूत! ज्ञानेश्वर भिक्षा मागत असतांना रोज समाजाची उणीदुणी बोलणी, अवहेलना, अपमान, उपेक्षा सहन करावी लागत असे. एके दिवशी हा अपमानकारक प्रकार असह्य झाल्यावर, विषण्ण झालेल्या ज्ञानेश्वरांनी कुटीचे दार बंद करुन बसले असतां, या रुसलेल्या भावाची वडीलकीच्या नात्याने समजुत घातली ती ताटीच्या अभंगाव्दारेच…

विश्व रागे झाले वन्ही। संत सुखे व्हावे पाणी।।” ज्ञानवंताने ज्ञानाची कवाडे बंद करुन बसणे योग्य नाही असे त्या परखड पणे सांगतात. “जीभ दातांनी चावली। कोणे बत्तीशी तोडिली।।” मुठभर पंडीतांच्या वागण्याचा परिणाम सार्‍या समाजाला कां भोगायला लावता? ती शिक्षा समाजास ज्ञानापासुन वंचित कां ठेवता? असा खडा, गहन प्रश्नही मुक्ताई करतात. ताटीच्या अभंगाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की, समाजविन्मुख झालेले ज्ञानेश्वर विश्व तारण्यासाठी पुन्हा कटी बध्द झाले व यातुनच प्रेरणा मिळुन आणि त्यांचे गुरु, मोठे बंधु निवृत्तीनाथांच्या आदेशाने पुढे भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरी निर्मितीचा प्रेरणास्तोस्र स्वरुप म्हणुन मुक्ताबाईंचे श्रेष्ठत्व, आगळे वेगळे दर्शन आपल्याला होते. एवढे असुनही स्वतःच्या योग्यतेविषयी कोणताही अहंभाव मुक्ताईच्या मनी नव्हता. उलट ज्ञानदादापेक्षा आपली योग्यता कमी आहे हे त्या मनोमनी जाणुन होत्या.

चांगदेवांनी समाधी घेतल्यानंतर,

निवृत्तीनाथ, नामदेव व इतर शिष्य समुदाय मुक्ताबाईच्या स्थानाकडे निघाले. मुक्ताबाई आतां अधिकाधिकक आत्म मग्न होत असलेल्या दिसतात. निवृत्तींना ही आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाली, तेव्हा मुक्ताबाई जी आपल्यापेक्षाही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत आहे म्हणुन कांही प्रश्नांची उकल करुन घ्यावी असा विचार त्यांच्या मनी आला. योग्याची जननी, सखी, मायबहिण, अनाथांची माय माऊली अशा अनेक स्वरुपात मुक्ताईचे दर्शन निवृत्तीनाथांना झाले आहे. ” कोठे काय याचा पहावा आद अंत। तुजवीण वाट उमजेना।।” मुक्ताबाईंनी उत्तरे द्यावीत म्हणुन दीर्घ काळ निवृत्तीनाथ विचारताहेत, याचना, विनवणी करताहेत, माता, बालक, गुरु शिष्य इत्यादी भावनांनी आळवले. धाकटी बहिण म्हणुन भीड पडत असेल असे वाटल्याने निराकरण करत म्हणतात

“लडीवाळ म्हणोनी सलगीचे चाड।

बोलण्याची भीड वाटो ने दी।

भिडेची ही चाड आम्हा नाही नाही।

निभिड होऊनिया पाई जोडीयले।।” तरीही त्या बोलत नाही, उत्तरे देत नाहीसे बघुन…”धरीले गूढ बोलनास कांही । मजविषयी संदेह काय जाला।।”

बालकाची, शिष्याची भूमिका घेऊन इतकेच नव्हे तर “दारीचा कुत्रा” ही उपमा देखील स्वतःला लावली तरी मुक्ताईचे मौन कायमच! निवृत्तीनाथ मुक्ताबाईंची करत असलेली मनधरणी, विनवणी अत्यंत ह्रद्य आहे. शिष्याची महती जाणुन एक सद्गुरु स्वतःचे थोरपण विसरुन कसे लीन होतात हा उत्तम आदर्श नमुना आहे. ” थोरपणाचे सांडियले ब्रीद। जोडोनिया कर मागती पै ।।” एवढे सारे प्रयत्न करुनही मुक्ताबाई आपल्या आत्ममग्नतेतुन बाहेर पडणे शक्य नाही अशी मनाची समजुत घालुन निवृत्तीनाथ स्वस्थ बसतात.

क्रमशः
संकलन ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  मुक्ताबाई  !!!

भाग  – ९.

        मुक्ताबाई ही केवळ पाठची बहिण या नात्याने निवृत्तीनाथ बघत नसुन ती साक्षात आदिमाया,पराप्रकृति हे तिचे मुळ स्वरुप आहे, हे जाणत असल्यामुळे ते मुक्ताईंना प्रश्न विचारताहेत.निवृत्तीनाथ स्वतः सद्गुरुपदी आरुढ,सर्वज्ञानी असल्यावर प्रश्न विचारण्याचे कारणच काय? तर त्यांचे प्रश्न तीन भागांत आहेत.पहिल्या प्रश्नाचे स्वरुप अगदी साधे सोपे आहे. ते माध्यम इतर शिष्यांच्या शंका समाधानासाठी असावे.

दुसरा प्रश्न शुध्द तत्वज्ञानपर,सृष्टीच्या उत्पत्तीचे गूढ आकलनाची जिज्ञासा स्पष्ट  आहे.आणि तिसरा प्रश्न थोड्या भिन्न स्वरुपाचा आहे.ज्या उच्चस्थानी मुक्ताई जाऊन पोहोचल्या,तेथील अनुभव, त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी,मुक्ताईने आपल्याला सांगावे,मार्गदर्शन करावे ही त्यांची इच्छा तीच्यापाशी व्यक्त करतात.

        आदिमाया स्वरुप मुक्ताबाईने स्वमुखाने ब्रम्ह आणि माया यांच्या स्वरुपाची चिकित्सा करावी असे निवृत्ती नाथांना वाटत होते,ते म्हणतात…..

निवृत्तीदेव म्हणे सांग अनुभवासी।

तुम्ही जे येके देसी नांदत आहां।।ज्ञानेश्वर, सोपान,निवृत्ती या तिघांनी ठरवुन विधि पुर्वक समाधी घेतली,पण मुक्ताबाईंची समाधी घेण्याची पध्दत इतरांपेक्षा वेगळी आहे.त्यांचे शरीर चिरकाल अभंग निरंतर राहणार म्हणुन त्या वेगळ्या पण अधिक प्रगत मार्गाचे अनुसरण करीत असल्याची सुस्पष्ट जाणीव निवृत्तीनाथांना आली.

         बदललेल्या उच्च अवस्थेतील पुढील वाटचाल करत अमृतसंजीवनीचा जो अनुभव व ते स्थिरीकरणाचे काम या कालखंडात मुक्ताबाईच्या अंतःजीवनात सुरु होते.निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना व्याकुळतेने विनवत म्हणतात….

“उघडा उघडा अभ्यासाची ओवरी।

माझी मज सोयरी भेटवा हो।

भेटल्या सोयरी दावीतील सोय।

माझे मज ठाये सापडेल।”

मुक्ताई,अग! तूं जे अमृतभजन करत आहेस त्यातील उच्छिष्ट मला द्यावे अशी विनवणी ते करताहेत.मुक्ताबाईंना बोलते करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत म्हणता

 “साधीतो शोधीतो परि हाता नये।

याला उपाय माये काय करुं।।”

         मुक्ताबाईने जर आपल्याला बोध नाही दिला तर,इश्वरही देऊ शकत नाही. इतकी विनवणी करुनही मुक्ताबाईकडचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही असे पाहुन शेवटी ते मनाला समजावतात.एक वेळ साधन संपले तरी चालेल,पण सद्गुरुचा संग प्राप्त व्हावा असे त्यांना वाटत असे.निवृत्तीनाथांनी दीर्घकाळ विनवणी केल्यावर,मुक्ताबाई “ज्ञानबोध”

ग्रंथ निर्मितिच्या माध्यमातुन त्या उत्तर देतात.मुक्ताबाईंना स्वज्ञान व स्वरुपाची जाणीव असूनही त्यांच्यापेक्षा आपण कमीच आहोत हे भान न सोडतां अतिव लीनतेने निवृत्तीनाथांना म्हणतात…

“जे पुसीले ते की तुम्हा नाही ठावे।

काय आम्ही द्यावे करुनी नवे।

म्हणे मुक्ताबाई तुम्ही केली लावण।

सेवकाती उगवण सहजची आले।।”

      गुरु हा शिष्य बनुन आपल्याच शिष्याला शंका विचारताहेत आणि शिष्य गुरुच्या भूमीकेतुन आपल्याच गुरुला कांही सांगत आहे हे या ग्रंथाचे व गुरु शिष्यांच्या भूमीकांची अदलाबदल, हेच वैशिष्ट्य आहे.तरीसुध्दा त्या म्हणतात…

” पुत्राने पित्याते काय मती द्यावी।

  मा स्फुर्ती चालती बालकाची ।।”

            आणि निवृत्तीनाथांच्या तीनही प्रश्नांची आध्यत्मिक स्तरानुसार उच्च दर्जाची देत असलेल्या उत्तरांचा स्तर पाहतां त्या निवृत्तीनाथांच्याही फार पुढे गेलेल्या आहे हे लक्षात येते.

        बाळपणी ज्ञानदादांना अनेक प्रश्न विचारुन त्रस्त करणारी,ताटी उघडण्या साठी विनवणी करणारी,भावंडांचे मायपण स्विकारणारी,परमार्थमार्गावर सर्वांना खंबीरपणे मार्गदर्शन करणारी, स्वतःच्याच सद्गुरुंनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देणारी आणि त्यांना अधिकारवाणीने चार शब्द सुनावणारी केवळ १७-१८ वर्षांच्या मुक्ता बाईंच्या जीवनाचा चढतावाढता आलेख आहे.त्यानंतर त्या स्वरुपाकार होऊन गेल्याने,आपल्याला दुःख,खंत वाटते.पण त्या आपल्याला सावधही करतात.

” तव मरणाची वेथा सहज व्यापिली देही

 जव अनुभव आपुले ठायी आला नाही।”

हा स्वरुपाचा अनुभव आपण घ्यावा म्हणुन अजुनही आपल्याला ज्ञानबोध मिळत आहे.लहानग्या मुक्ताबाईचे अचाट कर्तुत्वाने आश्चर्यचकीत व्हावे असे गीत..

” माझी मुक्ताई मुक्ताई।दहा वर्साचं लेकरुं चांगदेव योगीयानं।तिले मानले रे गुरु।।”

       मुक्ताबाईची दिवसेंदिवस वाढती आत्ममग्नता पाहुन एक दिवस निवृत्ती नाथांनी “गमन कोणे दिवशी आरंभिले” असा प्रश्न त्यांनी मुक्ताईला केला.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  ३०-३-२०२१.

!!! मुक्ताबाई !!

अंतिम भाग – १०.

निवृत्तीनाथांनी ” गमन कोणे दिवशी आरंभिले” असे विचारल्यावर मुक्ताबाई म्हणतात….

” जावे यावे कोठे।

अवघे निघोट स्वरुप स्वामी।

आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार। अवघी चराचर प्रकाश तत्वे।

उदय आणि अस्तु नाही स्वरुपासी।

ऐसे मुनी ऋषी जाणताती।

आम्ही कधी आलो स्वरुप सोडोन।

जावे पालटोन जेथिले तेथे।

अंतर बाहेर स्वामीचे स्वरुप।

स्वये नंदादीप उजळिलो ।।”

मुक्ताबाईंची ही उच्चकोटीची आध्यात्मि क स्थिती पाहुन निवृत्तीनाथ समाधानी पावले. सर्वांना मुक्ताबाईंना जपण्याबद्दल लक्ष ठेवण्याबद्दल विनवत होते.वैशाख महिन्यातील वद्य दशमीला, भजनकीर्तना साठी तापी नदीच्या तीरावर सारेजन जमा झाले होते.निवृत्तीनाथ मुक्ताबाईंचा हात धरुन चालवित,मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेल्या अतिशय रमणीय वृक्ष राजींमुळे शांत वातावरण असलेल्या तापीतीरी येऊन पोहोचले.

टाळविणा,मृदुंगांच्या कल्लोळामधे देहभान विसरुन सारे भजनकीर्तनात दंग झाले होते.या तापसांच्या मेळ्यातील ज्ञानेश्वर,सोपानदेव,वटेश्वर,चांगदेव हे केव्हाच समाधिस्थ झाले होते.त्यांच्या आठवणींने सार्‍यांची मने कातर झाल्याने भजनकीर्तनामधेही एक प्रकारची आर्तता निर्माण झाली होती.

सकाळपासुन नामगजरांत दंग असणार्‍या लोकांना माध्यान्ह कधी झाला कळलेही नाही.अचानक वातावरणात बदल घडुन आला.भरदुपारी वीजांचे कडकडणे,प्रचंड वारा सुटला, अंधकार दाटुन आला.वारा,वादळ,पाऊस वीजा यांचे जणुं तांडव नृत्यच सुरु झाले.

जवळपासचेही कोणाला कांही दिसत नव्हते.देहदृष्ट्या विकल झालेल्या मुक्ता बाईंना धरुन ठेवा म्हणुन निवृत्तीनाथ इतरांना विनवत होते,पण कोणालाही कांहीच ऐकु येत नव्हते.वीजेचा विलक्षण कडकडाट सुरु असतांनाच एकदम घंटा नाद सार्‍यांच्या कानी ऐकु आला.थोड्या वेळाने वातावरण पुर्ववत स्वच्छ झाल्या वर,निवृत्तीनाथांनी पहिला प्रश्न केला तो मुक्ताबाईसंबंधी! सार्‍यांनी सर्वीकडे खुप शोध घेतला,पण १८ वर्षांची मुक्ताबाई एकदम अदृष्यच झाल्या.मघाशी झालेल्या घंटानादाचा अर्थ आतां निवृती नाथांना उलगडला.सार्‍यांना समजावत

” कडाडली वीज निरंजनी जेव्हा।

मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली।

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकधाई।

झाली मुक्ताबाई स्वरुपाकार।

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी।

जेव्हा निरंजनी गुप्त झाली।।”

निवृत्तीनाथांनी धीर एकवटुन सार्‍यांना ही गोष्ट सांगीतली मात्र,आणि त्यांना शोक अनावर होऊन आवरेनासा झाला.

एकटेच मागे राहिलेल्या निवृत्तींना सर्व भावंडांच्या आठवणींनी ते व्याकुळ झाले.त्यातही मुक्ताबाईच्या जाण्याने त्यांना विलक्षण दुःख झाले,एक पोकळी निर्माण झाली.आणि त्यांच्या मुखातुन उत्स्फुर्त अभंग निघाला….

” अवघ्यापरीस कष्टी केले मुक्ताईने।

कांहीच बोलणे घडले नाही।।”

मुक्ताईच्या बाळपणापासुनच्या वागण्या बोलण्याच्या सार्‍या आठवणी त्यांच्या मनःचक्षुसमोर फेर धरुन येत होत्या.

” अविट बोलणे बोलावे अनादी।

ते गुह्य वेदी सापडेना।

कीर्ती वैराग्य केले सामराज्य।

घडविला विलास अध्यात्माचा।

नाशवंत शरीर केले अविनाश

घडविला विलास अध्यात्माचा।

तुझ्यामुळे हरि चालतो उगला।

देहा आधी गेला प्राण माझा ।।”

मुक्ताबाईच्या परमपावन आठवणी काढत सारेजण तिथे एक महिना राहिलेत.निवृत्तीनाथांची अवस्था पाहुन नामदेवांना जाणीव झाली.

” देवा करिता ऐसा थोर

सांडील शरीर निवृत्तीराज ।।”

खरच होते, देहातुन प्राणच गेल्यावर देह तरी कसा शिल्लक राहील? त्यानंतर थोड्याच दिवसांनी निवृत्तीनाथयोगीनीही समाधी घेतली.या सार्‍यांचे साक्षीदार नामदेव म्हणतात…

” गेले दिगंबर इश्वर विभूती।

राहिल्या त्या कीर्ती जगामीजी।

वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी।

आता ऐसे कोणी होणे नाही।

सांगतील ज्ञान म्हणतील खूण।

नयेची साधन निवृत्तीचे।

परब्रम्ह डोळा दावू ऐसे म्हणती।

कोणा नये युक्ती ज्ञानोबाची।

करतील अर्थ सांगतील परमार्थ।

नये पां एकांत सोपानाचा।

नामा म्हणे देवा सांगुनिया कांही।

न ये मुक्ताबाई गुह्य तुझे ।।”

केवळ १८ वर्षाच्या मुक्ताबाईंनी गुरुपुढेही जाऊन अगाध ज्ञानाची प्राप्ती करुन,स्वरुपाकार होऊन, नाशिवंत शरीर अविनाशी केले.आज एवढी वर्षे उलटल्यावरही मुक्ताबाईंचे बोध,विशेषतः समस्त स्रीजातीस बोधप्रद आहे.

अशा या मुक्ताबाईस कोटीकोटी प्रणाम !

!! समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                         

मुक्ताबाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading