
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!संत मुक्ताबाई !!
!!! मुक्ताबाई !!!
भाग – ४.
मडके कच्चे की पक्के ही परीक्षा गोरोबा कुंभारकरवी घेतल्यावर अध्यात्म मार्गातील सद्गुरुची असणारी आवश्यकता मुक्ताबाईंनी नामदेवांना पटवुन दिली. पण हे गोरोबा कोण? नामदेवांसारख्या महान संताची परीक्षा घेण्यासाठी तेवढीच अधिकारी व्यक्ती परीक्षक असली पाहिजे. म्हणुन आपल्या गुरुपरंपरेतील विख्यात आचार्य गोरक्षनाथांनाच निमंत्रीत केले. अव्यक्त स्वरुपातील गोरक्षनाथांची स्वतःच्या योग सामर्थ्याच्या बळावर मुक्ताईने भेट घेतली. मुक्ताईच्या वैराग्यावर प्रसन्न होऊन ते प्रकट झाले, ते प्रत्यक्ष देहरुपात प्रत्यक्ष प्रकट झाले की नाही हे निश्चित सांगता येणार नाही, पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र तेथील उपस्थितांना झाली.
गोरा कुंभारच्या हातात असलेले थापटणे त्यांच्या व्यवसायाला साजेसे असले तरी, अध्यात्मिक प्रातांतील परीक्षा घेण्यास कसे योग्य आहे हे तर्कबुध्दीस पटत नाही. इथे साध्या थापटण्याचा उल्लेख नसून “अनुभवाचे थापटणे” अभिप्रत असावे. निवृत्तीनाथांच्या मस्तकावर जेव्हा थापटणे मारले, ते स्वतःच ब्रम्हरुप होते. ज्ञानदेवांची “आता कैचे कोरे उरे” अशी परिस्थिती झाली आणि सोपानदेवांच्याही बाबतीत तेच घडले. मुक्ताबाईच्या मस्तकावर जेव्हा थापटणे मारले तेव्हा “अमृत संजीवनी उतो आली आणि नामदेवावर जेव्हा प्रयोग झाला तेव्हा ते मात्र वेदनेने कळवळले, संतापले ज्यावेळी ज्ञानदेव-नामदेवांची भेट झाली होती, त्याचवेळी नामदेवाचे मडकं कच्चे असल्याचे मुक्ताबाईच्या लक्षात आल्यावर ते जर तसेच कोरे राहिले तर आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठे नुकसान होईल हे ओळखुन त्या आपल्या सद्गुरु व भावंडांशी प्रतिवाद करुन हा परीक्षेचा प्रसंग मुक्ताबाईंनी घडवुन आणला.
गोरक्षकृपेचा अनुभव जिच्यामुळे आला म्हणुन तीची भावंडे कौतुक करुं लागले आणि त्याचमुळे या प्रसंगी मुक्ता बाईंचे आदिमायेचं स्वरुप उघड झाले. धाकटी बहिण, सत्शिष्य, गुरुभगिनि ही सारी नाती एका क्षणांत मागे पडली आणि मुक्ताबाई, मुक्तामाता, माय या स्वरुपात प्रतित होऊ लागल्या. सार्यांच्या नजरेत मुक्ताबाईचे स्थान तर उंचावले होते, पण मुक्ताईच्या आंतरिक जीवनाच्या दृष्टीनेही फार मोठा बदल झाला होता. त्यांनी अनुभुतीच्या स्थिरीकरणासाठी अज्ञातवासाचे स्थळ सोळू हे गांव निवडले. सोळु गांव आळंदीच्या पूर्वेस आहे. या गांवाला सोळू हे नांवं कसे पडले तर, ज्ञानेश्वरांच्या समाधीपुर्वी मुक्ताबाई या गांवी रुसुन आल्या होत्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी ज्ञानेश्वरादी भावंडे या गांवात आली होती, त्या निमित्याने गावाने एक आनंद सोहळा केला होता. सोहळा-सोहळु असा अपभ्रंश होऊन सोळु नावांने या गांवाची उत्पत्ती झाली. सोळु गांव म्हणजे मुक्ताबाईचे घर अशी समजुत आजही तेथील लोकांत रुढ आहे त्या गांवी मुक्ताबाईचे मंदिर पण आहे.
ज्ञानदेव आणि मुक्ताबाई नुसते भाऊ बहिणच नव्हते तर, अध्यात्म मार्गावरील सहप्रवाशी या नात्याने गुरुबंधुही होते. ज्यावेळी समाज व लोकांकडुन त्रस्त झालेले ज्ञानदेव स्वतःला कोंडुन घेतात तेव्हा, मुक्ताबाई हळुवारपणे पण अधिकार वाणीने ज्ञानदेवांची समजुत घालतात. मुक्ताबाईंच्या समजावण्याने ते आपल्या कोषाच्या परिघातुन बाहेर पडुन परत ते समाजाभिमुख होतात. यावरुनच मुक्ताबाईची थोरवी दिसुन येते. “विरालीसे शक्ती झालीसे निवृत्ती । झाली ब्रम्हप्राप्ती मुक्ताबाई।” ज्ञानेश्वरांसारख्या महायोग्याने असा उल्लेख करावा यापरते आणखी भाग्य ते काय असणार?
मुक्ताबाईंचे व ज्ञानेश्वरांचे मन परस्परांशी किती समरस झाले याचे उदाहरण म्हणजे, चांगदेवांची भ्रांती दूर व्हावी या दृष्टीने “चांगदेव पासष्टी” या ग्रंथाची निर्मिती झाल्यावर त्याचा अर्थ ज्ञानदेवांच्या सुचनेनुसार मुक्ताबाईंनी त्यांना अर्थ समजावुन दिला.
गोरक्षनाथांच्या अनुग्रहाने मुक्ताबाईंचा स्तर उंचावला, हा बदल निवृत्ती, ज्ञानदेव व सोपानदेवांनाही संवेदित झाला. बदलली अवस्था लक्षात घेऊन ज्ञानदेव कृतज्ञापुर्वक म्हणाले,
“मुक्त प्रवाहाची नाव। निवृत्ती अवल्या सद्गुरु। सोपान वरी ज्ञानदेव। पार जावे।।” एकेकाळी ज्या ज्ञानदेवांकडुन मुक्ताईने ज्ञान ग्रहन केले, त्यांच्याही पुढे गेल्याचे आढळल्याने ज्ञानदेव मुक्ताईची मुक्त मनाने स्तुती करतात.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या सर्वांनी नंतर मुक्ताबाईंना माय या भूमिकेतुनच बघितले. यावरुन मुक्ताबाई केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच अग्रसर नव्हत्या तर आईची माया सुध्दा त्यांच्या ठायी असल्याचे दिसुन येते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! मुक्ताबाई !!!
भाग – ५.
मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांमधे सममेळ असला तरी, मतभेद झालेच नाही असेही नाही. ज्ञानदेव तीर्थयात्रेला जायचे ठरवतात तेव्हा कदाचित त्यांचे यात्रागमन मुक्ताबाईंना मान्य नसावे. त्या ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रेला न जाता एकट्याच प्रथमच दीर्घकाळ परस्परां पासुन दूर राहिलेत. मतभिन्नता असली तरी मतभेद कधीच नव्हता. दोघांच्याही अभंगाचा तुलनात्मक विचार केला तर त्यातील भावसमरसता बघुन मन थक्क होते.
नामदेवांबरोबर ज्ञानदेवांनी तीर्थाटन करण्याचा मनसुबा प्रगट केला, तेव्हा
“वेदाचिया मते तीर्थी देव आहे।
देशोदेशी काय उणा जाला।
अष्टोत्तरशते तीर्थे जयाच्या भीतरी।
तो तुझे अंतरी आत्माराम।।”
असे मुक्ताबाईंनी ज्ञानदेवाना समजावण्याचा प्रयत्न केला.
“न लगती तीर्थे हरिरुपे मुक्त। अवघेचि सूक्त जापिनले।।” असे म्हणुन स्वतः न जाण्याच्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. त्यांच्यासोबत चांगदेव, वटेश्वर आदी मंडळीही न जातां थांबली. मुक्ताबाईंच्या उपदेशामुळे गहनमार्ग मोकळा, सोपा होत आहे याची जाणीव शिष्यांना होऊं लागली. मुक्ताबाई जवळच्या शिष्यांना, साधकांना आतां मुक्ताबाईचे एक वेगळेच दर्शन घडुं लागले. साध्या व्यावहारीक गोष्टी, साध्या प्रसंगाच्या निमित्याने त्या मोठे गहन तत्वज्ञान सांगावे, साधकबाधक चर्चा करावी असे वारंवार घडुं लागले. ध्यानावस्थेत त्यांना उच्चत्तर अनुभव आले की, त्या चांगदेवाजवळ बोलुन दाखवत. “मुंगी उडाली आकाशी। तिने गिळिले सूर्याशी। थोर नवलावा जाला। वांझे पुत्र प्रसळला। विंचू पाताळाशी जाय
शेष माया वंदी पाय। माशी व्याली धार झाली। देखोनी मुक्ताई हासली।।”
मुक्ताईचे असे लोकविलक्षण अनुभव ऐकुन शिष्य मंडळी स्तिमित होत असत. ही सारी मंडळी मुक्ताई आणि चांगदेवांमधील संवाद अगदी कानात प्राण आणुन ऐकत असत. कधी कधी त्या चांगदेवांना कोडेही टाकत. “टेकावरी टेक त्यावरी टेकली। तेथे एक बाळी विस्मो करी। तिचे नांव काय त्याचे नांव काय। विचारोनि पाहे मनमाजी। डोळियांतील बाहुली जालिसे गुरुवारु। तिशी सुईण मेळवि अरुवास। सुईचे आणीवर रचिले पाठार। मुक्ताई म्हणे चांग्या सांग याचा विचार।।”
त्यांच्या सहवासात असलेल्या सर्वांनाच रोजच असे प्रबोधनपर ऐकावयास मिळत असे.असेच बरेच दिवस उलटले.
नामदेव, ज्ञानेश्वर तीर्थयात्रा करुन पंढरपूरास परतले. निवृत्तीनाथ, सोपानदेव, विसोबा खेचर, नरहरी सोनार, गोरा कुंभार, चोखामेळा इत्यांदींच्या समवेत तीर्थायात्रेचे उद्यापन झाले. या निमित्याने ज्ञानदेवांनी यात्रेतील अनुभव उपस्थित असलेल्या वारकर्यांना कथन केले. याप्रसंगाने ज्ञान देवांनी वारकरी संप्रदायाची एक सुनिश्चित व्यवस्था लावुन दिली.
हा आनंदसोहळा चालु असतांना आपण समाधी घेत असल्याचा निर्णय ज्ञानदेवांनी जाहीर केल्यावर, सार्यांच्या अंगावर जणुं विजच कोसळली. अपार दुःख झाले. सार्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयापासुन परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला पण, ज्ञानदेव आपल्या निर्णयावर ठाम होते. समाधीसाठी आळंदीला जाण्यापुर्वी, आळंदीपासुन पांच कोसावर असलेल्या सोळु गांवी मुक्ताबाई, चांगदवादी मंडळी होती तिथे आले. “पंढरीचा पोहा आला अलंकापुरी। पंचकोसावरी साधुजन।
पांडुरंगासंगे वैष्णवांचे भार। दिंड्या ते बाहेर निघाल्यासे। पातकांचे भार निघाले बाहेर। भेटती ऋषीवर पांडुरंगा। अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी। मग अलंकापुरी येते झाले।।” अशा शब्दात नामदेवांनी वर्णन केले. आतांपर्यंत मुक्ताबाईंच्याही कानी ज्ञानदेव समाधी घेत असल्याची वार्ता ज्ञात झाली होती.
ज्ञानदेवांशी आत्यंतिक सख्यत्व असणार्या मुक्ताबाईंना त्यांच्या समाधीचा निर्णय ऐकुन काय वाटले असेल याची कल्पनाही करवत नाही. त्या ज्ञानोबांना म्हणाल्या, “मज विठोबासी निरवा। मजवरी लोभ असो द्यावा।।” ज्ञानदादाशिवाय जीवन कंठण्याचा असह्य विचाराने स्वतःच लीन, निरव होण्याचा विचार त्यांच्या मनांत आला. ज्ञानदादांच्या समाधीच्या निर्णयाने मुक्ताबाई व सोपानदेवांना गतकाळातील आठवणी जाग्या होऊन उमाळा दाटुन आला. “आम्हा मातापिता नित्य ज्ञानेश्वर
नाही आता थार विश्रांतीसी।” असे म्हणत दोघेही बहिण भाऊ विकल होऊन रडुं लागले. त्यांचा विलाप, आकांत पाहवल्या जात नव्हता. अखेर पांडुरंगाने त्यांचे सांत्वन केल्यावर मुक्ताबाईने आपला शोक आवरला आणि मोठ्या धैर्याने प्रसंगाला सामोर्या गेल्यात.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! मुक्ताबाई !!!
भाग -६.
ज्ञानदेवांनी समाधीचा निर्णय घेतल्यामुळे मुक्ताबाईंचे चित्त विकल झाले. “आवरली माया पुरातन आपुली।” ही गोष्ट निवृत्ती, सोपान, मुक्क्ताबाई यांना कळुन चुकली. शिवाय आपलेही अवतार कार्य संपत आल्याची ही सूचना त्यांना मिळाली. “मार्ग हा मोकळा झाला आम्हा।” त्यामागची ही भूमिका तिघांचीही होती.
मुक्ताबाईंची स्तुती करतांना एकनाथ महाराज म्हणतात…
“अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी।
तोडिली उपाधी सर्वत्रांची।”
सर्वांचा अहंकार तोडुन मोक्षमार्गावर त्यांची प्रगती करण्याची विलक्षण हातोटी मुक्ताबाईंना साध्य होती हे चांगदेव आणि नामदेवांच्या उदाहरणावरुन स्पष्ट होते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे ज्ञान असणारे चांगदेव सिध्दाईच्या अहंकारामुळे परमेश्वरापासुन दूर आहेत हे ओळखुन त्या अहंकारालाच सोsमची जोड देऊन शुध्दी करविणारी आणि नामदेवांचा भक्ती अहंकार दूर करणारी मुक्ताबाईच! “देवांचे जवळी आम्ही निरंतर हाच अभिमान नामदेवांत असल्यामुळे परमेश्वरानेच सुत्रधार म्हणुन मुक्ताबाईंची योजना आखली होती.
मुक्ताबाईंच्या वागण्याने अपमानित झालेले नामदेव त्यांचेवर संतप्त होऊन “अतिथि आदर केला मुक्ताबाई।लाकडाने डोई फोडली माझी।।” अशी तक्रारही निवृत्ती, ज्ञानदेवांसमोर केली. घाबरे झालेले नामदेव पांडुरंगाजवळ गार्हाणे करीत म्हणाले, “मुक्ताबाईने तेथे माजविली कळी। ही संत मंडळी कपटी तुझी। सणकांडी म्हणजे तागाची काडी! या काडीचा पेटवण म्हणुन उपयोग होतो. ही काडी पटकण पेटते व इतरांना पेटवते.
लहानशी मुक्ताई जैसी सणकांडी।
केले देशोधडी महान संत ।
सगळेची काखेसी येई ब्रम्हांड।
नामा म्हणे पाखंड दिसते मज।।”
नामदेवांनी जरी मुक्ताबाईबद्दल विरोधी भूमिकेतुन उद्गार काढले असले तरी, त्यातुनच मुक्ताबाईंचे श्रेष्ठत्वही प्रतित होते.
नामदेवांनी देवाजवळ तक्रार केल्यावर देवानेही मुक्ताबाईचे वागणे आणि सद्गुरु करण्याविषयीचा सल्ला योग्यच असल्याचा निर्वाळा दिल्यावर, मग नामदेवांनी विसोबा खेचरला गुरु केले, आणि मुक्ताबाईबद्दलची संतापाची जागा आदराने घेतली. ते म्हणतात…
“ज्ञान सोपान निवृत्ती। मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती। धन्य चौघेजण। मुक्ताबाई ब्रम्हपूर्ण। यांनी तारिले सकळ जन।
दुःख दारीण नासले।।” असे उद्गार काढुन नामदेवांनी मुक्ताबाईंचे वेगळेपण अधोरेखित केले. एके काळी जिचे वर्णन लहानशी मुक्ताबाई म्हणुन केले होते, त्याच मुक्ताईची योग्यता कळल्यावर तीला “माय” म्हणुन त्यांनी संबोधले. मुक्ताबाईच्या रुपाने अमृताचा ओघच जणुं नामदेव आणि चांगदेवांची भक्ती समृध्द करण्यास कारक ठरली.
चांगदेव आणि मुक्ताबाईमधले नाते फक्त गुरुशिष्य इतकेच मर्यादित नव्हते तर “गुरुमाऊली” या स्वरुपात चांगदेवाला भासमान होते. पुढे तर माय आणि लेकराचे ह्रद्य नातं निर्माण झाले. त्या दोघांच्या नात्यात विविधता दिसुन येते, जसे- गुरुशिष्य, माता बालक इत्यादी नात्यातुन हे भावबंध अभंगाच्या माध्यमातुन उलगडत जातात.
हे भावबंध कसे निर्माण झाले तर, चांगदेवांनी पाठविलेल्या कोर्या पत्राने, व सिंहावर आरुढ होऊन भेटीला गेले असतां, प्रत्युत्तर म्हणुन निर्जिव भिंत ज्ञानदेवांनी चालवलेली पाहुन, त्रिखंडात योगी म्हणुन किर्तीमान असलेल्या चांगदेवांचा अभिमान पार गळाला, व आपल्याला शिष्य करुन घेण्याबद्दल ज्ञानदेवांना विनवणी केली. चांगदेव आत्मज्ञानी व्हावे असे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांना वाटत असल्यामुळे, एकमुखाने त्यांनी मुक्ताबाईस उपदेश करायला सांगीतले. यावरुन मुक्ताबाईंची योग्यता व श्रेष्ठता किती महान होती हे स्पष्ट होते.
सोsहम् भावाचा उपदेश केल्यावर, मुक्ताई आणि चांगदेव यांच्यात गुरुशिष्याचे अलौकिक नाते निर्माण झाले होते आणि चांगदेवांनीही जे जे मुक्ताबाईने सांगीतले त्याला प्रत्यक्ष रुप दिले आणि “चांगधा भला। सागितले ते अंगचि जाला।” अशी मुक्ताबाईंकडुन पावतीही मिळवली.
निवृत्तीनाथांकडुन मुक्ताबाईस नाथ पंताची दीक्षा लाभली. गहीनी आणि निवृत्तीनाथ यांच्या माध्यमातुन कृष्ण भक्तीची, सगुनभक्तीची जोड लाभलेली मुक्ताई, निर्गुणामधे रमणार्या मुक्ताबाईने स्वतःच्या साधनेच्या जोरावर गोरक्षनाथांची कृपा साध्य करुन निर्गुण भक्तीचा उपदेश आपल्या शिष्यवर्गाला दिला. चांगदेव आणि मुक्ताबाईच्या नात्याचे दर्शन घडविणारा महत्वपुर्ण प्रसंग म्हणजे चांगदेवाची समाधी ! समाधी प्रसंगी त्यांना आपल्या आयुष्यातील अहंकार, पातकांची जाणीव होऊन दुःखी होत असतांना या सार्यांतुन आपल्याला मुक्ताबाईने बाहेर काढल्यामुळे त्यांच्या बद्दल धन्यता, कृतज्ञता याबद्दल वर्णन केली…” अवघ्या विद्येचा अभ्यास। पावलो मी क्लेष देवराया। मुक्ताबाई योगे उत्तरलो भवसिंधु। तैसी दीनबंधु कृपा करी। कृपावंत झाली जेव्हा मुक्ताबाई। स्वरुप दिशा दाही दाखविले। पाठी पोटी स्वरुप केले सद्गुरुते। तव अभिमान गेला माझा।।” चांगदेवांच्या समाधीप्रसंगी मुक्ताबाईस शोकाश्रू आवरेनासे झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


