
मीराला त्रास देण्याच्या सहायार्थ विक्रमजीतसिंहाची बहीण, मीराची ननंद उदाबाईचाही हात होता. उदाबाई मीराचा द्वेष करीत असे. मीराला मानसिक प्रताडना देणे, बदनामी करणे, धमकी देणे असे करीत .वंशातील समजत असे. मीराला मानसिक प्रताडना देणे, बदनामी करणे, धमकी देणे असे करीत .एके दिवशी रात्री उदाबाई राणाला म्हणाली, मीराच्या खोलीतुन कुणी पुरुष असुन त्याच्याशी मीरा प्रेमावार्ताप करीत असलेले ऐकु येत आहे
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत मीराबाई चरित्र !!!
भाग – ७
मीराला त्रास देण्याच्या सहायार्थ विक्रमजीतसिंहाची बहीण, मीराची ननंद उदाबाईचाही हात होता. उदाबाई मीराचा द्वेष करीत असे. मीराला मानसिक प्रताडना देणे, बदनामी करणे, धमकी देणे असे करीत .एके दिवशी रात्री उदाबाई राणाला म्हणाली, मीराच्या खोलीतुन कुणी पुरुष असुन त्याच्याशी मीरा प्रेमावार्ताप करीत असलेले ऐकु येत आहे वास्तविक मीरा श्रीकृष्णाच्या स्मरणाने व्याकुळ, विरह विव्हल होऊन त्याच्याशी संवाद करीत होती. पण बहिणीनेच शिकायत केल्यावर, मीराला मारण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन मीराच्या महालाकडे निघाला. महालात कुणीही पुरुष आढळला नाही. मीरा आपल्या भाव समाधीत अर्धबेशुध्दावस्थेत डोळ्यांतुन अश्रूंच्या धारा वाहत आहे व तीच्या सर्वांगातुन प्रकाशकिरणे निघतांना त्याला दिसले. तीला मारण्यासाठी त्याने तलवार उगारल्याबरोबर एक तेज किरण शलाका प्रकाशमान झाल्याने तो घाबरुन पटकन बाहेर आला. बाहेर उभी असलेल्या ऊदाबाईला आंतल कांहीच माहीत नसल्याने भाऊ घाबरुन बाहेर आलेला पाहुन तीला आश्चर्य वाटले म्हणुन तीने आंत डोकावुन पाहिले तर, मीरा आपली सुध बुध गेलेल्या अवस्थेत बसलेली व मुख अलौकीक प्रकाशाने उजळलेले दिसले. उदा मंत्रमुग्ध होऊन बघत राहिली. आतांपर्यत मीरावर केलेले अन्याय, रचलेले कट कारस्थान आठवुन तिला अतिशय खेद, पश्चाताप झाला आणि अश्रू ढाळत मीराच्या पायांवर लोटांंगण घातले. राणाने मीराला त्रास देण्यासाठी आणखी दोन स्रीयांची नियुक्ती केली होती. पण कालांतराने उदाबाई प्रमाणेच त्यांनाही अनुभुती येऊन त्या मीराच्या प्रशंसक बनल्या. मीराच्या अनेक पदांमधुन राणाने तीला भक्तीमार्गापासुन हटवण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. ती राणाला कोमल शब्दात म्हणाली, राणाजी! मी तुमचे काय बिघडवले ?कां मला मारायचा प्रयत्न करताहात ?मी तर कधीच तुमचे अहित केले नाही की चिंतलेही नाही. मला कुळ, जात यात कांही गम्य नाही. मी तर फक्त माझ्या गिरिधराचीच उपासना आराधना करते ना ?
राणाचा कठोर व्यवहार, अन्याय मीराला विचलित नाही करुं शकले ना लोकनिंदा तिला मार्गावरुन डगमगु शकले. सांसारिक विचार, सामाजिक बंधने तिने तोडले होते झुगारुन दिले होते. फक्त परमात्म्याचेच प्रेम तिच्या मन, ह्रदय आणि आत्म्यावर स्थिरावले होते.
मीराचे गुरु रविदास खालच्या जातीच्या वस्तीत थांबले होते, उच्चवर्णिय लोक तिथे जात नसत. पण असे म्हटले जाते की, मीराने साधारण दासीचे कपडे परिधान करुन कुणालाही न कळु देतां, परिणामाची पर्वा न करतां चुपचाप आपल्या गुरुला भेटायला जात असे. परंतु गुरुच्या संगतीचा परिणाम, तीला कळुन चुकले की, संताचा, भक्तीचा मार्ग चोरी आणि कायरताचा नाही. त्यानंतर ती बेझिझक जाती भेद, उंच नीच, भेद भाव या सार्यांची पर्वा न करतां अन्य साधारण शिष्यासोबत बसुन गुरुंच्या चरणी लीन होऊन, प्रसाद सुध्दा ग्रहण करीत असे. जोवर रविदास चितौडमधे होते, मीरा त्यांच्या दर्शनाला न चुकता दररोज नित्यनेमाने जातच असे. उदाबाई, सख्या, राणा, राण्या सर्वजणं त्या नीच जातीच्या घरी जाण्यास प्रतिबंध करुनही मीरा ऐकत नाहीसे पाहुन तिच्या महालावर सख्त पहारा बसवला, तरीसुध्दा ओढणीचा दोर करुन त्या सहाय्याने किल्ल्याच्या ऊंच भिंती उतरुन ती रविदासांकडे जातच राहिली.
कांही विद्वानांच्या मते परमात्माच मीराचा गुरु होता. कोणताही देहधारी गुरु तिने केला नव्हता. कारण मीरा सर्व संताप्रमाणे गुरु आणि परमात्मा एकरुप किंवा एकमेकांस पुरक मानते. ती पदांमधे म्हणते की, गुरु आणि परमात्मा एकच आहे. मेवाडच्या रुढीवादी कट्टरपंथीयांचा द्वेषपूर्ण विरोध वाढतच होता. मीराच्या सद्गुरुप्रेमाने त्यांच्या क्रोधाग्नीत भरच पडत होती. तीच्यावर होणारा अत्याचार, विरोध शत्रुपुर्ण व्यवहार होत असुनही, मीरा पदभ्रष्ट, कुळाला कलंक, चांगल्या वाईटाची समज नाही असे आरोप, इतकेच काय तीला वेडी ठरवल्यावर ती गुजराती पदांमधे म्हणते, होय! मी वेडी आहे पण या वेडापायीच मनुष्य जन्माचे असली ध्येय, सार्थकता प्राप्त झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! संत मीराबाई !!!
भाग – ८.
दरबारातील प्रमुख सामंत, राज पुरोहित, ब्राम्हणांनी राणा विक्रमजीत सिंहाचे कान भरुन मीराला विष देण्याची योजना निश्चित झाली. दयाराम नांवाच्या एका व्यक्तीच्या हाती चरणामृत म्हणुन सोन्याच्या वाटीत जहाल विष घेऊन पाठवले. या षडयंत्राचा सुगावा लागल्याबरोबर परिवर्तन झालेल्या उदाबाईने मीराला सजग केले, परंतु देवाचे चरणामृत म्हणुन आलेले विष मीराने आनंदाने प्राशन केले. कांही वेळानंतर मीराचे विषामुळे काळे निळे झालेले शरीर वनांत नेऊन टाकण्यासाठी राणाने आपल्या माणसांना पाठवले असतां त्यांना काय दिसले ? मीरा आत्मविभोर होऊन तल्लीनतेने दिव्य प्रेमाच्या अलौकीक दीप्तीने चमकणार्या मुखाने भजन गात आहे. सोनं तापुन जसे निर्मळ शुध्द होते, तद्वतच या परीक्षेमुळे मीराचे झाले. आतां तर तीचे कृष्णप्रेम आणखीन तिव्र झाले. रात्रंदिवस साधुसंत, भक्तजनांत ती आपला वेळ घालवु लागली. तिची प्रसिध्दी दूरवर फैलल्यामुळे, जास्त करुन गरीब, साधारण प्रजा तिच्या दर्शनाला व भजनाला येऊ लागली.
अस म्हटल्या जाते की, मुगल शहंशहा अकबर वेषांतर करुन त्याच्या दरबाराच्या प्रसिध्द गायक तानसेनला घेऊन मीराला बघायला व तीचे भक्तीपुर्ण भजने ऐकावयास चितौडला आला. मीराच्या अलौकिक अद्वितिय व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन त्याने हिर्याचा मुल्यवान हार आदरपुर्वक भेट देऊ लागला असतां मीराने नम्रतापुर्वक अस्विकार केला. परंतु ऐतिहासिक दष्ट्या पाहिले तर, १५५६ मधे अकबर गादीवर आला, त्या वेळी मीराने चितौड सोडले होते. हरमेन गोएट्स मीराच्या जीवनावर प्रकाश टाकतांना म्हणतो, मीराच्या जीवनाच्या उत्तरार्धाचे कांहीच दिवस उरलेले असतांना, अकबर चितौडला नाही आमेरला भेटला होता. युवा अकबरवर मीराच्या व्यक्तीमत्वाचा इतका गहरा असर पडला होता की, पुढे त्याने विश्वव्यापी धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला असे म्हटल्या जाते.
हरमेन गोएट्स म्हणण्यानुसार मीराला मारण्याच्या प्रयासात विषारी नाग पाठवणे किंवा तिला विष दिले याची पुष्टी मीरांच्या पदांतुन, इतर भक्त व कवींनी केली असली तरी, या सत्य घटनेवर आपत्ती घेत म्हटल्या जाते की, असेही होऊ शकते, कुणी नेक व्यक्तीने विषाच्या जागी कांही हानिरहित पेय व सापाच्या जागी असली फुलांचा हार पाठवला असुं शकते. परंतु कांहीही असले तरी, मीराची दृढता, विश्वास आणि तिच्या हरिभक्तीवर शंका घेतल्या जाऊच शकत नाही. कारण तिने प्यायलेले विष म्हणुन प्यायलीच नव्हती तर देवाचे चरणामृत म्हणुन प्राशन केले होते. तसेच साप म्हणुन पेटारा उघडला नव्हता तर फुलांचा हार आहे समजुन..
कांही विद्वांनांच्या मते, मीरावर झालेले अत्याचार हे राजनैतिक षडयंत्रामुळे केल्या गेले, परंतु मीरा प्रत्यक्ष वा अपरोक्ष रुपे चितौडच्या राजनितीत हस्तक्षेप केल्याचे दूरदूरपर्यंत आढळत नाही. ती परमात्मा भक्तीतच इतकी मग्न गुंग होती की, तीला समाज, राजनितीशी कांहीही घेणेदेणे नव्हते. आपल्या स्पष्ट, निर्भिक, परंपराविरोधी भक्तीसाठी मीराला बरचस भोगावं लागल. तसही परंपरागत क्रिया, पुजापाठ, कर्मकांडांचे खंडन, जातपात, उचनीचच्या विचारांची संतांनी केलेल्या विरोधामुळे सदैव सर्वच संत व भक्तांना अग्निपरीक्षेतुन जावे लागले. मीराला जरी फाशीवर लटकवले नसले किंवा तिचे शरीर कलम केले नसले तरी तीला ज्या कष्टाचा सामना करावा लागला तोही कांही सामान्य नव्हता.
आपल्याच परीजनांकडुन उत्पीडीत, स्वजनांकडुन, समाजाकडुन तिरस्कृत, राजकीयांकडुन निंदित असे निरंतर कष्ट आणि यातनांना सामोरे जावे लागले, तरी सुध्दा कोणतीही वैरभावना वा शिकायत न करतां साहसपुर्ण व धीराने, सहीष्णुतेने शांतीपुर्वक तीने सर्व सहन केले.
मीराच्या सहिष्णुती व नम्रतावर एका घटनेने प्रकाश पडतो. धार्मिकतेबाबत खुप नांव असलेला एक पुरोहित चितौडमधे मीराचा पाहुणा म्हणुन थांबला असतां, एके दिवशी मीराच्या परंपरा विरुध्द गात असलेले भक्तीगीत ऐकुन, आपल्या मान्यतेचा अपमान समजुन भक्तसमुदायात उठुन उभे राहत जोर जोराने मीराला अपशब्द बोलुन मीराचे अतिथ्य अस्विकार करुन जाऊं लागले असतां, मीराने त्यांना थांबवण्याबद्दल बराच अनुनय केल्यावरही पुरोहित आपल्या निर्णयावर अटल आहेसे पाहुन तीने त्यांच्यासाठी वस्र, धन व खाण्याची सामुग्री पाठवली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! संत मीराबाई !!!
भाग – ९.
मीरा अशा स्थितीत पोहचली होती की, तिला निंदा-स्तुती, यश-अपयश सारखेच होते. ती निर्विकार व अनासक्त असण्याबरोबरच, उदार ह्रदय व सर्वांप्रती प्रेमभावना तीच्या मनांत होती. एका पदात ती म्हणते, खर्या भक्ताने विशाल वृक्षासारखे नेहमी शांत, विशाल ह्रदयी व सहिष्णु असले पाहिजे. कोणतेही आलेले संकट विना शिकायत शांत भावनेने सहन करायला पाहिजे.
मीराच्या संपर्कात जो कोणी आला तो तिच्या असाधारण व्यक्तीमत्व आणि दिव्य प्रेम, भक्ती, नम्रताने प्रभावित झाल्याशिवाय राहिला नाही. भक्त व साधुसंतांसाठी तिच्या महालाचे दरवाजे नेहमीच उघडे असत. पण कांही कट्टरपंथी मीराच्या उन्मुक्त भक्ती आणि तिच्या वाढत्या प्रभावाने जळत असत. तिला अपमानीत करण्यासाठी एका युवकाला षडयंत्रात सामील करुन, त्याला परमेश्वराने दृष्टांत देऊन आदेश दिला की, मीरासोबत त्याने एका सेजेवर रात्र काढावी असे त्याला सांगुन मीराकडे पाठवले. त्या युवकाचा धृष्टतापुर्ण प्रस्ताव ऐकुन मीराने निर्विकार मनाने ऐकले व संध्याकाळी येण्यास निमंत्रीत केले.
नेहमीप्रमाणेच साधुसंत, भक्तगण मीराच्या अंगणात जमुन भक्तीगीत, भजनं गात असतांना तो युवक मीराच्या महाली पोहचला असतां मीराने त्याचे स्वागत केले. युवकाने जेव्हा पाहिले की, भक्त मंडळींच्या मधे सेज सजवली आहे हे दिसल्यावर तो घाबरुन म्हणाला, इतक्या लोकांसमोर मी कसा सोबत झोपु शकतो मीरा शांत स्वरांत म्हणाली, देवांपासुन कांहीच लपुन नसते. तो सर्वव्यापी आहे. तो सर्वत्र असुन सारे बघत असतो. मीराची सरळ व निष्कपटता पाहुन त्या युवकाचे ह्रदय पश्चातापदग्ध होऊन तो मीराच्या पायावर कोसळला. त्याला क्षमा करुन, परत ती आपल्या भक्तीगीतांच्या रसात बुडुन गेली. उपस्थित भक्त समुदाय व तो तरुण मंत्रमुग्ध होऊन अलौकीक भक्तीच्या दिव्य ज्योतीने चमकणार्या मुखमंडलांतुन निघणारे गीत ऐकु लागले.
राणा आणि त्याचे सलाहाकार चमच्याद्वारे मीराला सतावण्यात कांहीच कमी आली नाही. मीराच्या महालांत जाणार्या भक्तांना व साधुसंतांना भीती घालुन, धमकी देऊन जाण्यास प्रतिबंध राणा करुं लागला. आपल्या भक्तीमार्गात अश्या प्रकारच्या येणार्या आडकाठीने तंग होऊन चितौड सोडण्याचा कठोर निर्णय तिने घेतला. तिला स्वतःला ना लोकांची पर्वा, ना जीवाची भीती, पण आपल्याकडे येणार्या भक्तांना आपल्यामुळे होणारा त्रास सहन करणे तिला स्विकार नव्हते.
वास्तविक मीरा एक रजपुत हिंदु स्री होती. कितीही, कसेही संकटे, यातना सहन कराव्या लागल्या तरी पतीचे घर सोडत नाही, याच कारणाने ती आतापर्यंत राणांचे अत्याचार धैर्यपुर्वक सहन करत आली, पण मीरा साधारण स्री नव्हतीच !
एके दिवशी मीरा चुपचाप चितौड किल्ल्याबाहेर पडली. कांही विद्वानांच्या मते १५३४ च्या शेवटी मीराने चितौड सोडला असावा कारण गुजरातचा सुलतान बहादूरने विशाल सेनेसह चितौडवर १५३५ ला आक्रमण केले. त्या पुर्वीच मीराने चितौड सोडल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी जर ती चितौडमधे असती तर तिथुन निघणे तीला त्या युध्दस्थितीत अवघड झाले असते. सुल्तान बहादूरने आक्रमण केल्यावर राणा विक्रमजीतसिंग पळुन गेला असावा किंवा आपल्या विश्वासु सामांतासह सुरक्षीत ठीकाणी लपुन बसला असावा.
शासनविहिन चितौडची विधवा राणी, जवरबाई व कर्णावती या दोघींनी किल्ल्याचा भार आपल्या शिरी घेतला. राजभक्त व योध्दांना एकत्रित करुन किल्ला लढविला, पण शक्तिशाली आक्रमण कारीयांचा, सिमित युध्द सामग्रीने जास्त वेळ सामना करुं शकली नाही. जवरबाईला युध्दभूमीतच आपल्या स्रीसेनेसह वीरगतीला प्राप्त झाली. तिच्या युध्दकौशल्याने शत्रुसुध्दा चकीत झाला होता. बहादूरशाहने किल्ल्याला वेढा दिल्यावर, पुरुष योध्यांच्या लक्षात आले की, आतां चितौडचे रक्षण करणे असंभव आहे, तेव्हा त्यांनी केसरीया परिधान करुन शस्र धारण केले व किल्ल्याचे दार उघडुन शत्रुवर तुटुन पडले. या युध्दात ऐकही व्यक्ती जिवंत राहिला नाही. राणी कर्णवतीच्या नेतृत्वाखाली चितौडच्या सर्व महिलांनी जोहारद्वारे आपल्या प्राणांचे बलिदान दिले. जेव्हा विजेत्या बहादूरशहाने किल्ल्यात प्रवेश केला तर पुर्ण किल्ला विराण व जनशुन्य आढळला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! संत मीराबाई !!!
भाग – १०.
जोधपुरचा राजा मालदेवने मेडता वर स्वारी करुन जिंकल्यावर मेडतावर तो राज्य करुं लागला. एकाच कुळातील दोन्ही राजे, पण सत्तेसाठी भांडु लागले, हिंसा करुं लागले. एकाच पुरुषाचे दोघेही नातू, स्वार्थासाठी नाते विसरुन धर्म विसरुं लागले. मीराचा जीव ह्या गृह कलहाला विटुन गेला. नकोसा झाला या स्वार्थी संसारात, कलहप्रिय नातलगांचा सहवास! संसाराबद्दल लेश भरही आसक्ती उरली नव्हती. जखमी ह्रदय घेऊन, गिरधर वैद्यच जखम दुरुस्त करेल, त्याचं दर्शन हेच एकमेव औषध या भावनेने घरादाराचा त्याग करुन भ्रमंती करण्याचे ठरविले. त्या गिरिधर वैद्याच्या शोधासाठी त्रिखंड पालथे घालावे लागले तरी ती प्रयत्न सोडणार नव्हती.
गोपालकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वृंदावनांकडे जातांना वाटेत मीराच्या वयाचाच असलेला चुलत भाऊ जयमल राठोडकडे कांही काळ मुक्काम करायचे ठरविले. मीराची आई मरण पावल्यावर तीचे आजोबा रावदूदाने दोघांवर भक्तीचे संस्कार करत एकत्र वाढविले होते. जयमल राठोड भाविक व शूर होता. चितौडवर मोगलांची तिसरी स्वारी झाली तेव्हा उदयसिंहाच्या गैरहजेरीत जयमलने फार मोठा पराक्रम केला होता. लढतांना जांघेत गोळी घुसल्यावर, आपला मित्र कल्ला रोठोडच्या खांद्यावर बसुन मोगलांशी लढला. त्याच्या पराक्रमावर, शौर्यावर अकबर बादशहा इतका खुष झाला की, त्याची मूर्ती बनवुन आपल्या किल्ल्यात ठेवली. नाभादासाने “भक्तमाल” ग्रंथात जी अनेक भक्तांची चरित्र्ये गायली त्यात भक्त जयमलचे चरित्र आहे. अशा या शूर आणि भक्त बंधुच्या संगतीत कांही काळ घालवुन उत्तरेकडे निघाली.
अरे श्रीहरी! कधी रे भेटशील ? किती अंत पाहणार आहेस? तुझ्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग करुन, तुझ्या नांवाचा पुकारा करत दारोदार फिरते आहे रे !तुझ्या शोधापायी तहानभूक विसरले, कित्येक रात्री जागुन काढल्यात, तरी सुध्दा तूं मला तळमळत, तडफडत ठेवतोस. अरे! उरात पेटलेला विरहाग्नि कधी भेट देऊन विझवशील रे ? मला वेड लावुन कुठे दडुन बसलास ? तुझ्याशिवाय जगणे अशक्य आहे रे !
मेघासाठी तडफडणार्या चातकाची आर्तता तिच्या स्वरांत होती. चांदण्यांसाठी तळमळणार्या चकोराची व्याकुळता डोळ्यांत होती. सकाळ उजाडण्याची वाट बघत रात्र कंठणार्या चक्रवाक पक्षाची उत्कंठा ह्रदयात होती. जलबिन मासोळीची अधिरता देहात होती. समुद्राकडे निघालेल्या सरीतेची उत्कटता तीच्या ऊद्गारांत होती.
शेवटी व्रजमंडळात मीरा येऊन पोहोचली. कृष्णाची द्वारका, स्थानेश्वर, डाकोर, इत्यादी पुण्यक्षेत्रात व्रजमंडळाची महती अधिक आहे. व्रजमंडळ म्हणजे मथुराक्षेत्र व आसपासचा गोकुळ, वृंदावन महाबन, गोवर्धन इत्यादी यमुनेकाठचा, श्रीकृष्णाच्या रासलिलांनी पावन झालेला प्रदेश! मीरा मंदिरामंदिरांतुन कृष्ण दर्शन घेत फिरुं लागली. द्वारकाधीश, कृष्ण कुब्जा, केशवदेव, गोपालजी, विजयगोविंद इत्यादी मंदिरामंदिरांतुन तिची भजनें निनादू लागली. कंसवधानंतर ज्या घाटावर श्रीकृष्णाने विश्रांती घेतली, त्या विश्रांतीघाटाच्या दर्शनाने ती पुलकित झाली. मोक्षतीर्थ, चक्रतीर्थात तीने पुण्यस्नान केले. वसुदेवघाट, बलभद्रघाट, कृष्णघाट अशा अनेक घाटांचे तीने दर्शन घेतले. कालिंदीच्या काठच्या वृंदावनातील कृष्णलीलांची अनेक क्षेत्रे, कालीया डोह तीर्थ, रासक्रिडेचे स्थान, गोपींची वस्रे ठेवलेली कदंबवृक्षाचे स्थान, कालिंदी तीरावरील राधाकृष्ण क्रीडेचे स्थान, श्रीकृष्णाने मधु राक्षसास मारले ते मधुबन पाहिले. नंतर गोवर्धन पर्वतास वीस मैलांची प्रदक्षिणाही तीने केली.
ब्रम्हांडघाट…इथेच कृष्णाने माती खाल्ली म्हणुन यशोदामातेने त्याला तोंड उघडायला सांगीतल्यावर श्रीकृष्णाने सार्या ब्रम्हांडाचे दर्शन करविले होते. ही सारी मंदिरे, तीर्थकुंडे, उपवने, कुंज, वने, घाट, टेकड्या सगळीकडे कृष्ण व्यापुन राहिलेला आहे, या जाणीवेने ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेत, श्रीहरिचे गुणगान करीत वृंदावन, मथुरा, नी गोकुळ या ठीकाणी तिने जिवन व्यतीत केले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! संत मीराबाई !!!
अंतिम भाग – ११.
श्रीकृष्णाने वसवलेली, सुदामाला दिलेली, गोपुरांनी डोकावणारी, सोन्याने झगमगणारी द्वारका…मीरा हरिचे स्मरण करत, भ्रमण करीत करीत द्वारकेला पोहोचली. द्वारका ही, रामेश्वर, जगन्नाथपुरी बद्रीकेदारनाथ आणि द्वारका पुराणांतील मोक्ष देणार्यांंपैकी एक…
मीराला तिचे आजोबा रावदूदांनी साहित्य, संगीत, कला या विद्येंमधे पारंगत केले होते. तिचे सासरही रसिक होते. महाराणा कुंभ याच घराण्यांतील साहित्याचे दर्दी, व संगीतशास्राचे जाणकर होते. त्यामुळेच मीराच्या विकासाला सासरीही अनुकुल वातावरण मिळाले होते. मीराने २०० हुन अधिक गीते रचली. तिची सर्व पदे स्फुट व गायनाकुल आहेत. गुजरातमधील गरबागीते तिनेच रचलेले आहेत, असे विद्वानांचे म्हणने आहे. तिनेच मल्हार रागाला जन्म दिला म्हणतात. मीराची सर्व गीते करुण, प्रसन्न आहेत.
इथल्या समुद्रतीरी केशवजीच्या भव्य मंदिरातील केशवजीच्या मूर्तीला कुणी डाकोरजी, तर कुणी रणछोडरायजी म्हणतात. देवाच्या भेटीसाठी सतत भ्रमण करीत असणार्या मीराला द्वारकेतील रणछोडजीची मूर्ती अतिशय आवडली. त्याच रुपात ती विलिन झाली. द्वारकेलाच सरीतारुपी मीरा कृष्णभक्तीरुपी सावळ्या सागरांत विलिन झाली.
एकदाची गिरिधरच्या घरी पोहचुन सारी स्वप्ने रणछोडरायजींच्या दर्शनाने पुरी झालीत. घायाळ मनाला औषध देणारा वैद्य मिळाला. ज्याच्यासाठी रांत्र दिवस व्याकुळलेली होती, त्या गिरिधरचा आधार मिळाल्यावर आतां त्याला सोडुन कुठेही जाणार नव्हती.
कृष्णमय होऊन मीराने आपल्या अनेक गीतांतुन जणुं कांही प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले अशी समरस होऊन दही, बासरी, घडा, वस्रहरण, कालिया इत्यादी संबंधींचे वर्णन केलेले आहे. ती पुर्व जन्मांचा कौल देत म्हणते की, गिरिधरची व आपली प्रीती जन्मोजन्मी चालत आलेली जुनी आहे. ती स्वतःला “ललिता” गोपींचा अवतार मानते. हरीसाठी रात्र रात्र जागुन आसवांची माळ गुंफुन आकाशातील तारे मोजत राहते.
उदयसिंहाने जेव्हा कांही ब्राम्हणांना मीराला परत आणण्यासाठी पाठवले व तीला न जाण्याच्या निश्चयावर कायम पाहुन त्यांनी ऊपोषणाचा मार्ग अनुसरल्यावर, त्यांची उपोषणाने बिघडलेली हालत पाहुन मीरा कळवळली व त्यांना थोडा वेळ थांबायला सांगुन ती गाभार्यात येऊन कळवळुन विनवत म्हणाली, देवा ! आतां तुझ्या ह्रदयांत जागा दे ! ही नदी आतां सागरांत विलिन होऊ दे! देवा ! जन्म मरणाचा हा फास कायमचा कापुन सगळ्या व्याधी, ताप नष्ट कर !मीराची अंतःकरणापासुनची विनवणी गिरिधराने ऐकुन आपल्यामधे तिला सामावुन घेतले. ज्योतीत ज्योत मिळाली. मीराच्या जीवनाचा सुवर्ण प्याला कृष्णकृपेच्या अमृताने भरुन गेला. तिने जन्मभर आसवांनी भक्तीची वेल शिंपली, विस्तारली आणि हरिकृपेचे अखंड फळ येऊन तिचे जीवन धन्य झाले. बराच वेळ झाला तरी मीरा बाहेर आली नाही म्हणुन गाभार्यात पाहिले असतां, मीरा केव्हाच हरिचरणी विलिन झाली होती.
साधारणतः १५४६-१५६० च्या दरम्यान संत मीराची जीवनज्योत श्रीहरिच्या ज्योतीत मिळुन गेली. तीच्या मृत्युनंतर ५०-६० वर्षांनी तीची गणना श्रेष्ठ संतात होऊ लागली. भक्तकवी व्यासांच्या “बानी” मधे तीचा गौरव केलेला आहे. नाभादासांनी “भक्तमाला” ग्रथात मीराचे चरित्र, धृवदासांनी “भक्त नामावली” मधे मीराविषयीचा आदर “भक्तीची खाण” या शब्दांनी गौरवले आहे. गुरुनानक, चैतन्यदेव, वल्लभाचार्य यांच्या भक्तीगंगेत मीराने आपल्या भक्तीची गंगा सोडली. मीराने गीतगोविंदांवर टीका लिहिली होती, पण आज आढळत नाही. जयदेव, चंडीदास, सूरदास, विद्यापती यांनी सगुण कृष्णभक्तीत रंगुन गीत निर्मिती केली होती. मीरा देखील या थोर भक्तांच्या परंपरेतील एक थोर भगवद् भक्त! मीरा आपल्या भक्तीपुर्ण गीतांनी अमर झाली.
मीरा म्हणजे हरिदर्शनाची उत्कंठा ! मीरा म्हणजे हरि मिळेपर्यत निर्माण झालेली व्याकुळता ! मीरा म्हणजे हरिभक्ताच्या विरही मनाची आर्तता ! मीरा म्हणजे युगानुयुगे परमात्म्याचा मिलनार्थ तळमळणारी उत्कट भक्ती !
अशा या मीराला कोटीकोटी प्रणाम!
*समाप्त*
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! संत मीराबाई !!!
*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे
–

