एकादशीचे अभंग
खाली द्वादशीचे अभंग आहेत.
एकूण एकादशीचे ६, द्वादशीचे ७, क्षीरापतीचे ४, अभंग आहेत.
१
जागा रे गोपाळांनो रामनामी जागा।
कळिकाळ आकळा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनि उठी।
नामाचेनि बळें पापे रिघालीं कपाटीं ॥२॥
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन।
एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोटीकुळे उध्दरती।
नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी ॥४॥
२
दशमी व्रताचा आरंभु ।
दिंडी कीर्तन करा समारंभु।
तेणें तो स्वयंभु। संतोष पावे ॥१॥
एकादशी जागरण।
हरिपूजन नामकीर्तन।
द्वादशी क्षीरापती जाण।
वैष्णव जन सेविती ॥२॥
ऐसें व्रत तीन दिन।
करी जो आदरें परिपूर्ण।
एकाजनार्दनी बंधन।
तया नाहीं सर्वथा ॥३॥
३
एकादशीस अन्नपान।
जे नर करिती भोजन।
श्वानविष्ठे समान।
अधम जन तें एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान।
नेमें आचरती जन।
गाती ऐकती हरिकीर्तन।
तें समान विष्णूशीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ।
विडा भक्षितां तांबूल।
सांपडे सबळ ।
काळाहातीं न सुटे ॥३॥
शेज बाज विलास भोग।
करिती कामिनीचा संग।
तया जोडे क्षयरोग।
जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण न वजे हरिकीर्तना।
आणिकां वारी जातां कोणा।
त्याच्या पापें जाणा।
ठेंगणा तो महामेरू ॥५॥
तया दंडी यमदूत।
झाले तयाचें अंकित।
तुका म्हणे व्रत।
एकादशी चुकलिया ॥६॥
४
पंधरा दिवसां एक एकादशी।
कां रे न करिसी व्रतसार ॥धृ॥ १ ॥
काय तुझा जीव जातो एका दिसें।
फराळाच्या मिसें धणी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन।
हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥३॥
थोडे तुज घरी होती उजगरे।
देउळासी कां रे मरसी जाता ॥४॥
तुका म्हणे कां रे सुकुमार झालासी।
काय जाब देसी यमदूता ॥५॥
५
एकादशी व्रत सोमवार न करिती।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ।
आंधळी सकळ बहिर्मुख ॥२॥
हरिहरासी नाहीं बोटभरी वाती।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥
तुका म्हणे नाहीं नारायणी प्रीति।
कोण त्यांची गति होईल नेणो ॥४॥
६
एकादशी एकादशी।
जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नेमाने।
तया वैकुंठीचे पेणे ॥२॥
नामस्मरण जागरण।
वाचे गाय नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा।
एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥
७
आम्हां देणे धरा सांगतों तें कानीं।
चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणें माझें चित्ता होय समाधान।
विलास मिष्टान्न नलगे सोनें ॥२॥
व्रत एकादशी द्वारी वृंदावन।
कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी।
मज तें दिवाळी दसरा सण ॥४॥
द्वादशीचे अभंग
१
झाले ज्ञानदेव वाणी।
आले सामुग्री घेऊनि ॥१॥
पर्वकाळ द्वादशी।
दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
ज्ञानदेवाच्या चरणीं।
शरण एका जनार्दनीं ॥३॥
२
झाली पाकसिध्दि वाट पाहे रखुमाई।
उदक तापलें डेरां चीकसा मर्दू द्यां पायी ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं ॥
उभ्या आंचवणा गोपिका कळस घेऊनि ॥२॥
अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळां।
उध्दव अक्रूर आले पाचारूं मूळा ॥३॥
सावरिली सेज सुमनयाति सुगंधा।
रत्नदीप ताटी वाळा विडीया विनोदा ॥४॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा।
असा सावचित्त सांगें सकळ जनां ॥५॥
३
माझा हा विठोबा येईल गे जेव्हां।
जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाऊनि राउळां तयासी तूं पाहे।
लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे।
लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला।
जाऊनि विठ्ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा।
खोळंबला नामा भोजनासी ॥५॥
४
उठोनि प्रात:काळी ओढितां कांचोळी।
जातो वेळोवेळी महाद्वारा ॥१॥
अहो जी दातारा विनंती अवधारा।
तुम्ही यावे घरा भोजनासी ॥२॥
रखुमाई मातें तुम्ही यावें तेथे।
सामुग्री सांगातें चालवावी ॥३॥
सडे संमार्जन हे माझे करणे।
उदक भरीन सुगंधेसी ॥४॥
शेष पत्रावळी काढीन उष्टावळी।
नित्य वेळोवेळी हाचि धंदा ॥५॥
नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा।
प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥
५
रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषीकारणे द्वादशीचा छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥२॥
प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥३॥
एकाजनार्दनीं एकविध छंद।
तेणें परमानंद प्रगटला ॥४॥
६
नावडे वैकुंठ शेषशयन।
वैष्णव सदन आवडले ॥१॥
रमा म्हणे कैसी नवल परी।
देव भुललें वैष्णवा घरीं ॥२॥
जो नातुडे ध्यानीं समाधिसाधनीं।
तो स्वानंदें कीर्तनी नाचतसे ॥३॥
जो यज्ञावदानीं कांहीं नेघे माये।
तो द्वादशी क्षीराब्धी उभउभ्या खाये ॥४॥
लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणे बुद्धी।
वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धी ॥५॥
वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी।
एका जनार्दनी देव दास्यत्व करी ॥६॥
क्षीरापतीचे अभंग
१
क्षीरसागरीचे नावडे सुख।
क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळ कवळ पाहा हो।
मुख पसरूनि धांवतो देवो ॥२॥
एकादशी देव जागरा आला।
क्षीरापतीलागी टोकत ठेला ॥३॥
द्वादशी क्षीरापती ऐकोनि गोष्टी।
आवडी देव देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालितां वैष्णवामुखीं।
तेणें मुखें देव होतसे सुखीं ॥५॥
क्षीरापती सेविता आनंदु।
स्वानंदें भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो।
मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दन मुखीं।
एका एकी तेणें होतसे सुखी ॥८॥
२
पाहें प्रसादाची वाट।
द्यावें धोवोनियां ताट ॥१॥
शेष घेऊनि जाईन।
तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालों एकसवा।
तुम्हां आडूनियां देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त।
करूनी राहिलों निश्चित ॥४॥
३ पावला प्रसाद आतां उठोनी जावें।
आपुलाले श्रम कळों येताती भावे ॥१॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा।
पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥२॥
तुम्हांसी जागवू आम्ही आपुलिया चाडा।
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥३॥
तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन।
नाहीं निवडिलें आम्हां आपणा भिन्न ॥४॥
४
बहुडविले जन मन झाले निश्चळ।
चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥
पर्यंकी निद्रा करावे शयन।
रखुमाई आपण समवेत ॥२॥
घेऊनियां आलो हाती टाळ वीणा।
सेवेसी चरणा स्वामीचिया ॥३॥
तुका म्हणे आतां परिसावी सादरे।
बोबडी उत्तरें पांडुरंगा ॥४॥

Vittal panthi mudrung vadan
Vittal panthi mudrung vadan
[…] एकादशी अभंग पहा […]
[…] एकादशी अभंग पहा […]