अपराजित योध्दा बाजीराव पेशवे भाग ३, (११ ते १५)

छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन  "सेनाकर्ते"  किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन  “सेनाकर्ते”  किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!! 

भाग – ११.

             गुजरात मधील सुभेदार सरबुलंदखानाची बादशहाने त्याच्या नाकर्तेपणाबद्दल चांगलीच खरडपट्टी काढली. पिलाजी गायकवाड आणि कंठाजी कदम बांडे यांना शांत करण्यासाठी त्याने गुजरातमधल्या धनाढ्य सावकारांकडून प्रचंड रकमा उकळल्या. त्यामुळे पुष्कळ व्यापारी परागंदा झाले. अर्थव्यवस्था कोलमडून पडली.

             सरबुलंदखानची दरबारात नाचक्की झाली. त्याला आणखी कुमक मिळेना. त्यामुळे पिलाजी व कंठाजींचा बंदोबस्त करणे अशक्य झाले. त्या दोघांनी बडोदा व चंपानेरवर कब्जा केला. शेवटी त्याने बाजीरावांकडे मदत मागितली. बाजारावांनी तात्काळ चिमाजी अप्पांना गुजरातेत पाठवले. चिमाजींनी काही महत्त्वाच्या पेठा लुटल्या. हताश होऊन सरबुलंदखानने चौथाई व सरदेशमुखीचे हक्क चिमाजींना देण्याचे कबूल केले. त्या बदल्यात अप्पांनी मराठे लुटारुंचा बंदोबस्त करायचा.

         १७२९ मध्ये बाजीराव आणि सरबुलंदखान मध्ये तह झाला. चौथाई आणि , सरदेशमुखीच्या बदल्यात बाजीरावांनी पिलाजी व कंठाजींच्या बंदोबस्तासाठी २६०० घोडदळ देण्याचे कबूल केले.

        गुजरातमधल्या बाजीरावांच्या या कार्याने पूर्वीचे मराठ्यांचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंचा मुलगा त्र्यंबकरावला वैषम्य वाटले. कारण पूर्वी दाभाड्यांनी गुजरातचा फार मोठा भाग जिंकला असल्यामुळे, गुजरात आपल्याच  घराण्याचाच वारसा आहे अशी त्याची धारणा होती. पेशव्यांचा शिरकाव त्याला सहन होणे शक्य नव्हते. त्याने पिलाजी गायकवाड, कंठाजी कदमबांडे यांना हाताशी धरून बंडाचा झेंडा उभारला. त्यावेळी बाजीराव बुंदेलखंडाच्या सरहद्दीवर होते. हातातील मोहीम सोडून येणे त्यांना शक्य नव्हते.

       बाजीराव देवगड जवळ होते. तिकडे निजामाच्या धास्तीने शाहूराजे अस्वस्थ झाले होते. निजाम हा दाभाडे सोबत संगनमत करून नवीन भानगड उपस्थित करेल असे त्यांना वाटत होते. त्यासाठी बाजीराव जवळ असावेसे त्यांना वाटत होते. बाजीरावांकडून पैसाही हवा होता आणि बाजीराव ही जवळ हवे. म्हणून शाहू राजे सतत बाजीरावांना वरचेवर निरोप धाडत होते.

        इकडे बाजीरावांनी देवगडच्या गौड राजाशी तह केला. त्याच्याकडून वार्षिक पाऊण लाख रुपये खंडणी सुरू केली. ८० वर्षे वयाच्या छत्रसाल राजानी  कळकळीने त्यांना बोलावल्यामुळे बाजीराव बुंदेलखंडात आले.

                राजा छत्रसालच्या मदतीला बाजीराव बुंदेलखंडावर स्वारी करून गेले. त्यात बाजीराजांचा फारच मोठा फायदा झाला. वयोवृद्ध छत्रसालने बाजीरावांना तिसरा मुलगा मानून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बक्षीस दिला. शिवाय देखणी मस्तानीही भेट केली. मस्तानी मुळे पेशव्यांच्या घरात मोठे काहूर माजवले गेले होते.

          छत्रसालच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी बाजीरावांना अडीच लाखांचे महसूल उत्पन्न देणारी कसदार जमीन दिली. १७३९ मध्ये बाजीरावांनी या दोन्ही भावांना गरज वाटेल तेव्हा मदत देण्याचे आणि सीमेबाहेर सैन्यांना लागणाऱ्या खर्चाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. या दरम्यान  बाजीरावांना बुंदेलखंडमध्ये पाच लाखाची जहागीर मिळाली. मराठा साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने या प्रदेशावर पकड असणे आवश्यक होते. उत्तरेमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी या प्रदेशाचा उपयोग होण्यासारखा होता.

         माळवा प्रातांत कार्यरत असणारे शिंदे, होळकर आणि पवार यांच्या उत्तर व पूर्व भारतामध्ये वर्चस्व स्थापनेसाठीच्या  प्रयत्नांसाठी बुंदेलखंडासारखा मध्यवर्ती प्रदेश मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आणणे  हे पेशव्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

            बंगेशचे व वृद्ध छत्रसालचे सतत २४ महिने १७२७ ते १७२८ युध्द चालले. अशा बिकट प्रसंगी छत्रसालने त्यावेळी माळव्यात असलेल्या बाजीरावांकडे मदत मागितली. छत्रसालने दोह्याच्या रूपात बाजीरावांना पत्र पाठवले….

” जो गति ग्राह गजेंदकी सो गत भई है आज।

 बाजी जात, बुंदेलकी राखो बाजी लाज।।”

 छत्रसालला बंगेशच्या विरुद्ध मदत देण्यात बाजीरावांचा उद्देश दूरगामी होता. मोगलांच्या सरदारांना पराभूत करण्याची आयती संधी तर होतीच, शिवाय मराठ्यांविषयी उत्तर हिंदुस्तानात आदराची भावना निर्माण करणे, हा पण  अंतःस्थ हेतू होताच.. .

         सतत २४ महिने बंगेशचे सैन्य लढल्यामुळे व छत्रसालला, त्यांचे पुत्र व नातूंना पाडाव करून बंदोबस्तात ठेवल्यामुळे, थकलेले बंगेशचे सैन्य थोडे सैलावले होते. या संधीचा फायदा घेऊन छत्रसाल आपला पुत्र, आणि नातूसहित निसटले. आणि थेट बाजीरावांकडे आले. त्यांनी जंगलातल्या, पहाड्यातल्या अवघड वाटा मराठे सैन्यांना दाखवल्या. आणि बाजीरावांनी ३० मार्च १७२९ रोजी जयपुर येथे बंगेशला गाठले. त्याचा पूर्ण पराभव केला. पराभूत बंगेशने जयपूर किल्ल्याच्या आश्रय घेतला. किल्ला फार मजबूत होता. पण किल्ल्यात दाणागोटा काहीच नव्हता. मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. व किल्ल्यात रसद पोहचणार नाही याची खबरदारी घेतली.

क्रमशः
संकलन लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

               भाग – १२.

           या जयपूरच्या किल्ल्यावर स्वतः बाजीरावांची देखरेख होती. मराठ्यांनी या किल्ल्याचा वेढा एवढा आवळला की,  बंगेशच्या सैन्याची किल्ल्यामध्ये अन्नान्न दशा झाली. सैन्यांनी बैल, घोडे, खेचरे कापून खाल्ली . त्याची  ( बंगेशची )  सुटका करण्यासाठी बंगेशचा मुलगा करीमखान ३०,००० फौज घेऊन आला. मराठ्यांनी त्याचाही पराभव केला. त्याच्याकडचे ३००० घोडे व १५ हत्ती मराठ्यांना मिळाले. बादशहाने सरदार बक्षीखानला  जैतपूरवर चालून जाण्याची आज्ञा दिली. पण त्याने काहीतरी सबबी काढून टाळले. उलट त्याने छत्रसालांना पत्र लिहून कळवले की, तुमच्या ताब्यात असलेल्या महम्मद बंगेशला ठार करा. एव्हाना पावसाळा आला. शेवटी बंगेशला अटी घालून सोडण्याचे ठरवले. पुन्हा बुंदेलखंडात येऊन त्रास देणार नाही, असे त्याच्याकडून लिहून घेतले. आणि जायची परवानगी दिली.

              छत्रसाल राजधानीत परत आले. त्यांनी बाजीरावांना राज्याचा तिसरा हिस्सा… काल्पी, हट्टा, सागर, झाशी, शिरोंज, कूंच, गडकोटा, हटद नगर असा तीन लाखांचा मुलुख व एक किल्ला दिला. उत्तरेतला हा सर्व प्रदेश मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला असला तरी, वस्तुस्थिती वेगळी होती. तिथले बरेच रजपूत आणि मोगल सरदार  मोगल  राज्यकर्त्यांशी संधान साधून होते. ते स्वतःला स्वतंत्र राज्यकर्ते मानत होते.

       जेव्हा पेशवे बुंदेलखंडात आले, त्यांनी एका मागून एक भाग ताब्यात घेतला. या कामी छत्रसालांच्या पुत्रांनी त्यांना पाठिंबा दिला. माळवा आणि बुंदेलखंडातील आपले स्थान बळकट केल्यानंतर भोपाळही मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला. मराठ्यांना बुंदेलखंडातील चौथाई जमा करण्याचा अधिकार असला तरी, त्यावेळच्या प्रथेनुसार दिल्लीतील राजर्त्याकडून मान्यता मिळणे आवश्यक होते. वास्तविक बाजीरावांनी बुंदेलखंडामध्ये मराठा साम्राज्याची स्थापना केली होती.

            एका शतकानंतर बाजीरावांचा हाच मुलुख झाशीच्या राणीचे राज्य बनले. १७२९ मे मध्ये बाजीराव जैतपूरहून पुण्याकडे निघाले. या मुलखाची व्यवस्था पाहण्याचे काम गोविंदा खेळ यांच्यावर सोपविले. हेच  गोविंदपंत बुंदेल म्हणून पुढे प्रसिद्ध झाले. १७३१ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी छत्रसालांचे निधन झाले. त्यांच्या दोन पुत्रांनी —  हरदेश राय व जगतरायने बाकीचे राज्य वाटून घेतले. व पुढे या दोघां मुलांनी बाजीरावांच्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला होता. मोहिमांसाठी मदत लागल्यास बाजीरावांनी साताऱ्याहून मागण्यापेक्षा बुंदेलखंडाकडूनच  मिळण्याची सोय  आपोआपच केली  गेली होती.

        या मोहिमेमुळे बाजीराव आणि शाहू राजांमध्ये काही विमनस्कता निर्माण झाली होती. याला दोन कारणे होती. एक म्हणजे… आपण मोगल बादशहाचे मनसबदार आहोत ही भावना शाहू राजांच्या मनात इतकी घर करून बसली होती की ते उघडपणे मोगलांशी लढणे त्यांना योग्य वाटत नव्हते. बादशहाचा पराभव करून त्यांचा प्रदेश काबीज करणे राजांना पटत नव्हते.

               शिवाय ब्रम्हेंद्र-स्वामींनी सिद्दीचे पारिपत्य  करण्याचा तगादा शाहू राजांकडे लावला होता. सिद्दीच्या मोहिमेवर बाजीरावांनीच जावे असा शाहूराजांचा आग्रह होता. आणि बाजीराव अजिबात उत्सुक नव्हते. या मोहिमेने पदरात काहीच पडणार नाही. असे मुत्सद्दी व व्यवहारी बाजीरावांना वाटत होते. शिवाय प्रतिनिधी फत्तेसिंगबरोबर राहून काम करणे बाजीरावांना पसंद नव्हते. शेवटी शाहूराजांनी  चिमाजी आप्पांना या मोहिमेवर पाठवले. त्यांनी ही मोहीम तडीस नेली व दक्षिणेत आले.

            बाजीरावांचा मुख्य उद्देश, ध्येय होते, राज्य वाढवण्याचे. पण निजाम ;  राज्य विस्तारात नाना प्रकारे अडथळे निर्माण करीत होता. त्याने कोल्हापूरच्या संभाजीराजांना हाताशी धरून शाहूराजांनाच शह देण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान सेनापती दाभाडेंना फितवून पेशव्यांना नेस्तनाबूत करण्याचा घाट घातला.  बाजीरावांनी शिताफीने आपली सुटका  करून घेतली. यावरून बाजीराव केवढे श्रेष्ठ योद्धा होते हे दिसून येते.

           बाजीराव दक्षिणेत आले तरी, त्यांचे सारे लक्ष उत्तरेकडे लागलेले होते. त्रिंबकराव दाभाडेचे परिपत्य आणि जंजिराची मोहीम करायची त्यांची इच्छा नव्हती तरी त्यांना त्या कराव्या लागल्या. सेनापती दाभाडेंचे बाजीरावांविरुद्ध कारवाया करण्याचे सत्र सतत चालू असे . बाजीराव त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करीत होते. पण जेव्हा दाभाडेंनी सगळीकडून जुळवणी करून बाजीरावांच्याच विरुद्ध बंड पुकारले, सोबत निजाम व बंगेशला बरोबर घेतले तेव्हा  मात्र त्यांचा बीमोड करणे अपरिहार्य झाले.  तर जंजिराच्या कारवाईत सिद्दीच्या बिमोडापेक्षा धावडशीच्या ब्रम्हेंद्रस्वामींनी शाहूराजांकडे लावलेला तगादा  कारणीभूत होता.

१७२८ च्या उत्तरार्धात छत्रपती शाहूराजांचे महत्त्वाचे दोन मोहरे गळून पडले. एक आरमाराचे प्रमुख सेना सरखेल कान्होजी आंग्रे व २७ सप्टेंबरला सेनापती खंडेराव दाभाडे मरण पावले. कान्होजींचा ज्येष्ठ पुत्र सरखेल सखोजीला सेनापतीपद देण्यात आले.  मानाजी व सखोजी शाहूराजे व बाजीरावांच्या बाजूने होते. मात्र त्याचे दोन भाऊ संभाजी व तुकोजी बाजीरावांच्या विरोधात होते.

          खंडेराव दाभाडेंच्या निधनानंतर त्यांचा पुत्र त्रिंबकजींना सेनापतीपद देण्यात आले. तो शूर, बहादूर होता. पण अतिशय संतापी, स्वार्थी आणि मत्सरी होता.  बाजीरावा विरुद्ध असलेल्या मत्सरापोटी तो स्वराज्याचाच शत्रू बनला.

           क्रमशः
संकलन ;  लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित  योध्दा बाजीराव पेशवे  !!!

                भाग – १३.

               साताऱ्यात हे राजकारण चालू असताना बाजीराव माळव्यात होते. गुजरात, माळव्यांची वसुलीची जबाबदारी चिमाजी आप्पा, होळकर, उदाजी पवारावर सोपवली. त्यामुळे कंठाजी कदम व पिलाजी जाधव नाराज झाले. १७२९ च्या दिवाळीनंतर बाजीरावांच्या फौजा दूरवरच्या मोहिमा करू लागले. चिमाजी अप्पा  तापी व नर्मदा उतरून बडोद्या जवळ चंपानेरपर्यंत पोहोचले. उदाजी पवार व मल्हारराव होळकरांनी मांडूचा किल्ला घेऊन माळव्याच्या दक्षिण भागात मराठी सत्ता स्थापन  करण्याच्या उद्योगास लागले. याच वेळेला कंठाजी कदमने गुजरात माळव्याच्या हद्दीवरील पावागढचा किल्ला बळकावला. चिमाजींनी पावागडला वेढा घालून कंठाजींचा प्रतिकार मोडून काढला. फेब्रुवारीत  इंद्राजी कदमने कंठाजीचा पराभव करून किल्ला हस्तगत केला.

         चिमाजींनी गुजरात मधील पेटलाद, नदियाड, ढोलका ही मोगल ठाणी लुटून तिथे मराठी अंमल जारी केला. गुजरातच्या सुभेदार सरबुलंदखानाने चिमाजींशी करार केला की, सुरत वगळता बाकीच्या सगळ्या भागावर गुजरात प्रांताचा चौथाई, सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांना  दिले. तसेच त्या भागाच्या रक्षणाची जबाबदारी ही सरबुलंदने घेतली.

           सेनापती त्रंबक दाभाडेंनी निजामाशी संगनमत करण्याचे ठरविले. निजाम तर शाहूराजेंच्या दरबारातील शक्तिशाली बंडखोरास मदत करण्यास टपूनच बसलेला असे. दरम्यान महम्मद बंगेशने  १७३० मध्ये माळव्याच्या सुभेदारास फितवून आपल्याकडे वळवून घेतले. बंगेशने निजामाशी चर्चा करुन आपल्या दोघांचा हेतू एकच  असल्यामुळे नर्मदा काठी बैठक घेण्याचे  ठरविले. पिलाजी गायकवाड आणि उदाजी पवारांचे बाजीरावांशी बिनसले हे माहीत झाल्यावर बंगेशने त्यांच्याशी हात मिळवणी करण्यास तयार केले.

      आता सेनापती त्रिंबकराव दाभाडेंना पिलाजी व कंठाजी मिळाले. त्रिंबकरावांचा अखत्यारीतील प्रदेशावर पेशव्यांनी आपला अंमल बसवला हे त्याला सहन होण्यासारखे नव्हते.  त्याने शाहूराजांकडे गार्‍हाणे नेऊन पेशव्यांचे मुळासकट उच्चाटन करण्याचा बेत केला. माळव्यातील वसुलीचा वाटा एकट्या मल्हाररावांना दिल्यामुळे संतापलेला उदाजी पवारही त्र्यंबक दाभाडेला येऊन मिळाला. मग वऱ्हाडातून प्रतिनिधी कान्होजी भोसलेही त्याला येऊन मिळाले.

          बाजीरावांवर मत्सराने पेटलेल्यांची एकजूट झाली. दाभाडे हे अंतर्गत कारवाई करून थांबले असते तरी हरकत नव्हती, मामला घरचाच होता, पण त्याने निजाम व बंगेशला आपल्यात सामील करून  घेऊन सरळ सरळ राष्ट्रद्रोह केला होता.

           दाभाड्याकरवी निजामला त्याच्या प्रदेशातून पेशव्यांचे उच्चाट्टन करण्याची संधीच प्राप्त झाली. त्याच्या फौजा गुजरातकडे निघाल्या. दाभाडेच्या  कृत्याने संतापून शाहूराजेंनी त्याला पत्र पाठवून चांगलीच कान उघडणी केली. मत्सर आणि स्वार्थाने अंध झालेल्या दाभाडेंनी शंभूराजेच्या पत्राकडे दुर्लक्ष करून, ३५,००० सैन्यानिशी शाहूराजेंची पेशव्यांच्या प्रभावातून मुक्तता करण्याची गर्जना करून, साताऱ्याकडे कूच केले. वास्तविक त्याला मराठा साम्राज्यच बळकावायचे होते.

              बाजीराव,  सेनापती त्रंबकराव दाभाडे व निजामाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतेच .

       ८ ऑक्टोबर १७३० रोजी निजाम आणि त्र्यंबक दाभाडेंनी प्रस्थानास सुरुवात केली. आणि साताऱ्यास न जाता संगमनेर मार्गे नारायणगावला गेले. तिथे तुर्कजखानाशी सल्लामसलत करून, चाळीसगावला गेले. तिथे गिरणा नदीच्या काठी निजामाची भेट घेतली. अकबरपुरला बंगेशला भेटले. निजामाच्या सूचनेनुसार जुन्नरचे कुवर बहादुरशहा त्र्यंबकरावांना येऊन मिळाले. कोल्हापूरच्या संभाजीराजेंचे माजी मंत्री चिमाजी दामोदरने मुल्हेरचा मार्ग मोकळा केला. त्रिंबकरावांनी गुजरातमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना पिलाजी गायकवाड, दोन पवार बंधू आणि कंठोजी कदम बांडे सारखे आणखी मित्र सुरतला येऊन मिळाले. १२ मार्च १७३१ मध्ये त्यांनी मांडवीचा किल्ला ताब्यात घेतला. २६ मार्चला नर्मदा नदी ओलांडून करनालीला तळ ठोकला.

            यादरम्यान गुजरात माळव्यात बरेच राजकीय बदल झाले. माळव्यात बंगेशशी झुंज घेण्याची जबाबदारी मल्हारराव होळकर व राणोजी शिंदेवर होती. शाहू राजे, बाजीराव आणि  चिमाजी अप्पा यांच्यामधे दाभाडे संबंधी जुलैमध्ये खलबते झाली.

             १३ ऑक्टोबरला बाजीरावांनी गुजरातकडे कूच केले आणि लांब लांब मजला मारत अहमदाबाद गाठले. त्याचवेळी निजामही गुजरातकडे निघाला पण बाजीरावांनी त्याला इतकी दहशत बसवली होती की, एकट्याने बाजीरावांची गाठ घेण्याची त्याला हिंमत झाली नाही. त्याने मदतीला बंगेशला बोलावले. बंगेशला माळव्याची सुभेदारी मिळाल्याने, त्याला चेव आला. त्याला अडवण्याचा मल्हाररावांनी आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांची ताकद कमी पडली. बंगेश उज्जैनला येऊन पोहोचला. मार्चमध्ये निजाम आणि  बंगेशची भेट झाली.

बाजीरावांचा मुकाबला कसा करायचा यावर दोघांनी दहा-बारा दिवस खल केला.

         मल्हारराव पाठीवर असल्याची बंगेशला माहिती नव्हती. तर बाजीराव अहमदाबादला पोहोचले असून, त्यांची बोलणी अभयसिंगशी चालली असल्याची खबर निजामाला नव्हती.

          क्रमशः
संकलन ; लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित  योध्दा बाजीराव पेशवे  !!!

                भाग  – १४.

              बाजीरावांनी अभयसिंगाशी युती करून पिछाडी निर्वेध केली. दोघांमध्ये करार झाला… दरवर्षी त्यांना  १३ लाख रुपये देण्यापैकी अर्धी रक्कम तात्काळ देण्याचे अभयसिंगने कबूल केले. त्याबद्दल बाजीरावांनी कदमबांडे व गायकवाडचा बंदोबस्त करण्याचे ठरले. बाजीराव लगेच बडोद्याकडे वळले.

            बाजीरावांच्या व दाभाडेंच्या फौजा डभोई येथे आमने-सामने आल्या. बाजीरावांनी समेटाचा प्रयत्न केला पण त्र्यंबकरावांनी मानले नाही.

            १ एप्रिल १७३१ रोजी लढाईला तोंड लागले. बाजीरावांच्या शिस्तबद्ध सैन्यापुढे दाभाडेंच्या  बेशिस्त सैन्याचा निभाव लागला नाही. त्र्यंबकरावला गोळी लागून ठार झाले.

          बाजीरावांनी युद्ध जिंकले होते. ते आपल्या मुख्य लष्करी तळापासून बरेच दूर होते. या युद्धात त्यांचे बरेचसे सैन्य गारद झाले होते. यशवंतरावांच्या  मनात बदला घेण्याची भावना होतीच. महमदखान बंगेश व निजाम हे त्यांच्या मागावर होते. अशा परिस्थितीत अहमदबादला जाण्यापेक्षा निजामाचे सैन्य येण्याआधी त्यांनी डभोईतून कूच केले. नाहीतर यशवंतराव व निजामाच्या सैन्यापुढे पराभव व विनाश अटळ होता. त्यांनी नर्मदा नदी ओलांडून सुरत, दमण, जव्हार, कल्याण, जुन्नर, खेडमार्गे पुणे गाठले. हा प्रवास त्यांनी अतिशय वेगाने केला होता.

       एका शक्तिशाली सेनापतीवर विजय मिळवल्याचे पाहून त्यांच्या विरोधात असलेल्या सरदारांची शत्रुत्व घेण्याची इच्छा नव्हती. गिरीधर बहादूरच्या विरोधात लढताना त्यांचा उदाजी पवारावर फार मोठा विश्वास होता. आता तेच त्यांचे बंदी झाले होते. तीच तर्‍हा कोल्हापूरच्या संभाजीराजांचे  माजी मंत्री चिमाजी दामोदरची होती.  बाजीरावांनी त्या दोघांची सन्मानाने एक एक हत्ती  त्यांना  नजर करून सुटका केली. बाजीरावांनी  डबोईच्या युद्धात वापरलेले तंत्र पालखेड आणि बुंदेलखंडाच्या युद्धात वापरलेल्या पद्धतीपेक्षा  वेगळे होते. शत्रूला चकविणे, शत्रूच्या समोरासमोर जाण्याचे टाळणे यावर त्यांचा भर होता. त्यांनी शत्रूचा पाणीपुरवठा, रसद बंद करून त्यांना वाटाघाटीस भाग पाडायचे. बाजीरावांनी संपूर्ण शरणागतीचा कधीच आग्रह धरला नाही किंवा मानहानीकारक अटी लादल्या नाही. त्यांचा दृष्टिकोन विशाल, दयाळूपणा आणि काही अंशी वस्तुस्थितीवर आधारित असायचा. मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहता  त्यांचे व्यक्तिमत्त्व गंभीर — तितकेच   आभाळासारखे  विशाल होते. सागराप्रमाणे अगाध होते. सैन्यात आणि रयतेत देखील सर्वांच्याच मनीमानसी  त्यांच्याविषयी आदरच दरवळत असे. राजकर्त्याचे क्वचितच आढळणारे गुण या युवा पेशव्यांमध्ये होते. बाजीरावांचा पाडाव करण्याचा बंगेश आणि निजामाने अनेकदा प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही.

        बाजीरावांच्या डावपेचामध्ये नमूद करण्यासारखे असाधारण वैशिष्ट्य होते. ते आणि चिमाजी अप्पा आपला मुक्काम सतत बदलत असल्यामुळे शत्रू पक्षाला ते केव्हा? कुठे? किती तीव्रतेने हल्ला करतील? याचा अंदाज येत नसे. त्यांचा  युद्धाचा  इतिहास बघता त्यांनी शक्यतो रक्तपात टाळण्याचा प्रयत्न केला आहे. हा नियम त्यांनी डबोईच्या युद्धात मात्र पाळला नाही. डभोईला त्यांनी एक नवीनच युक्ती अमलात आणली होती. आवेशात असलेल्या त्रिंबकरावांना निजामाने प्रलोभाने देऊन युद्धात त्याच्या मदतीला येऊ शकणार नाही अशा पद्धतीने मुख्य सैन्यापासून दूर ठेवून दोघांमध्ये अडथळा निर्माण केला. निजामास सामील होऊन सेनापती त्र्यंबकरावने राजद्रोह केला होता. बाजीरावांनी त्याचा बंदोबस्त केला नसता तर पुन्हा मराठा साम्राज्याला धोका निर्माण झाला असता.

        दाभाडेच्या पराभवाचा परिणाम असा झाला की, निजामाचे अवसान गळाले. त्याने बाजीरावांशी टक्कर घेतली नाही. त्याने केलेल्या किरकोळ चकमकीला न जुमानता बाजीराव नर्मदा ओलांडून  १४ मे १७३१ ला पुण्यात पोहोचले. आणि वेगळ्याच मोहिमेच्या तयारीला लागले.

          नंतर राजेंनी जंजिऱ्याच्या सिद्दीचे पारिपत्य करण्यासाठी बाजीरावांना तातडीने बोलावून घेतले. बाजीरावांनी उत्तरेकडील मोहीम शिंदे, होळकरांवर सोपवून ते जंजिरा मोहिमेवर गेले.

                सिद्दीचा उपद्रव शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सुरू होता. महाराजांनी त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पुरता बीमोड करू शकले नव्हते. त्यांच्यानंतर संभाजीं महाराजांनी त्याच्यावर विजय मिळविण्याचा अगदी निकराचा प्रयत्न केला, पण त्यांनाही यश मिळाले नाही. एकाच वेळी त्यांना अनेक शत्रूंशी लढावे लागत होते. ते जर अनपेक्षितपणे मोगलांच्या हाती लागले नसते तर, आज स्वराज्याचे चित्र वेगळे दिसले असते.

राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांची सगळी ताकद औरंगजेबाचा मुकाबला करण्यात खर्ची पडत असल्यामुळे, हा कोकणचा किनारा तसा अनाथाचा होता. कान्होजी आंग्रेंनी स्वबळावर कुलाबा, (अलिबाग) खांदेरी, विजयदुर्ग अशी काही ठिकाणें आपल्या ताब्यात घेतली होती.  बाकी सगळ्या किनारपट्टीवर सिद्दीचाच अंमल होता.

        कान्होजी आंग्रेंचा वचक, दरारा नसता तर सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच  यांनी सारी कोकणपट्टी गिळून टाकली असती. सिद्दीने मुघलांच्या चाकरीत असल्याचा बहाणा करून रायगड, मंडणगड, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड हा प्रदेश आणि गावळकोट, अंजनवेल, उंदेरी या जलदुर्गात त्यांनी हातपाय पसरले होते.

          क्रमशः
संकलन ;  लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित  योध्दा बाजीराव पेशवे  !!!

               भाग  – १५.

               सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी  ब्रम्हेंद्र स्वामींनी शाहूराजांकडे सतत लकडा लावला होता. परंतु निजाम, कोल्हापूरचे संभाजीराजे, दाभाडे यांचा बंदोबस्त होईपर्यंत त्यांना जंजिरा मोहिम हाती घेता येत नव्हती. अखेर १७३३ मध्ये बाजीरावांना बोलावून जंजिरा मोहीम त्यांच्याकडे सोपवली.

             मोहिमेचे नेतृत्व बाजीरावांकडे असले  तरी, हुजरातीची  म्हणजे छत्रपतींची स्वतःची हुजरत फौज फत्तेसिंह भोसलेकडे दिली होती. पेशवे आणि राजांच्या  फौजा  एकत्र होऊन १७३३च्या एप्रिलमध्ये भोरच्या डोंगराळ प्रदेशातून कोकणात उतरल्या.

           सिद्दीची राजधानी जंजिरा किल्ला, राजगड जिल्ह्यातील मुरुडजवळ दंडाराजपुरी खाडीच्या मुखाशी मैलभर दूर समुद्रात आहे. किनार्‍यावरील मुरुड, राजापुरी, दांडा ही ठाणी आणि समुद्रातील जंजिरा हे सिद्धीचे सामर्थ्याचे मानबिंदू होते.

          दक्षिणेला गोवळकोट, अंजनवेल तर, उत्तरेला अलिबाग तालुक्यातील समुद्रातील उंदेरी बेट ही सुसज्ज आरमारी ठाणे, बाजीरावांच्या शब्दात सांगायचे तर दोन वज्रबाहू होते. मोहिमेची आखणी बाजीरावांनी फार विचारपूर्वक केली. जमिनीवरून बाजीरावांचे सैन्य आणि समुद्रातून कुलाब्याचे सरखेल सखोजी आंग्रेचे, अशी आरमाराची योजना आखली. जेणेकरून सिद्दीच्या जंजिर्‍याला गोवळकोट किंवा उंदेरीहून मदत मिळू नये. यात बाजीरावांचे स्ट्रॅटिटिक  आणि तांत्रिक  कौशल्य दिसून येते.

                त्यासाठी बाजीरावांच्या अखत्यारीत, नियंत्रणाखाली संपूर्ण भूदल असणे आवश्यक होते. पण शाहूराजांनी प्रतिनिधी श्रीनिवासला या मोहिमेत पाठवले. त्याने बाजीराव बरोबर काम करायला हवे होते. पण स्वतःचे प्रतिनिधित्वाचे अस्तित्व दाखवण्यासाठी बाजीरावांच्या योजनेला सुरुंग लावला.

   इथे लक्षांत घ्यायची गोष्ट हीच की, बाजीरावांची रणनीती सर्वोत्तम आहेच. अगदी शास्त्रशुद्ध अशीच आहे. सैनिकांचे मनोबल पण  उत्कृष्ट आहे. प्रतिनिधींनी यात साथ द्यायलाच हवी होती. पण अहंकार आडवा आला. जेव्हां शास्त्र आणि शस्त्र यांचा अचूक मेळ साधला जातो, तेव्हां कोणताही चक्रव्यूह भेदणे अशक्य मुळीच नसते. त्या दृष्टीने शाहूराजेंनी संपूर्ण अधिकार बाजीरावांचे बहाल करणे आवश्यक होते. फार तर प्रतिनिधीला युद्धावर पाठविलेच नसते  तर हे युद्ध पेशव्यांनी काही महिन्यातच तडीस नेले असते.

             योजनेनुसार बाजीरावांनी दंडराजपुरी तळ ठोकून जमिनीवरून जंजिऱ्याची नाकेबंदी करावी, आणि प्रतिनिधीने  गोवळकोट, अंजनवेल कडून येणारी रसद बंद करायची, सरखेल सखोजीने एकीकडे पोर्तुगीज व इंग्रजांशी बोलणी चालू ठेवून त्यांना गुंतवून ठेवायचे, आणि उत्तरेकडील सिद्दीचे तळ, रेवस ठाणी मारायची. अशाप्रकारे सगळीकडून जंजिरा कोंडीत पकडून त्याच्यावर समुद्र व जमिनीवरून असे दोन्हीकडून हल्ले करून काबीज करायचा. त्यासाठी सखोजीचे समुद्रावरून सहकार्य आवश्यक होते. जमिनीवरही जास्त फौजेची आवश्यकता होती. आणि नेमकी त्यांच्याजवळ पैसा आणि फौज दोन्हींची कमतरता होती. पण शत्रूसमोर दिसत असताना नुसते निष्क्रिय बसणेही योग्य नव्हते. बाजीरावांनी जमिनीवर असलेले सिद्दीचे बलस्थान काबीज करून, त्याचे बळ जेवढे खच्ची करता येईल  तेवढे करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांचा बेत होता लाच देऊन रायगड घेण्याचा. परंतु त्यांच्या प्रयत्नांची  बातमी फुटल्यामुळे फसला. तरी त्यांनी बिरवाडी, अवचितगड, सुरगड, घोसाळी, बाणकोट वगैरे जंजिराभोवतीची ठाणी मारून सिद्दीच्या ताकदीचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते.

           योजना अशी होती की, अंजनवेल गोवळकोट घेऊन मग रायगडावर चाल करायची. पण प्रतिनिधी आधी रायगड घेण्यास आले. फंदफितुरी करून रायगड घेतला व जे बाजीरावांना जमलं नाही ते आपण करून दाखवले अशी शेखी, प्रौढी मिरवू लागले. या दरम्यान सिद्दी सावध होऊन  त्यानेही आपल्या बाजूची तयारी केली. दोन जूनला प्रत्यक्ष लढाईला तोंड  लागले.

          बाजीरावांच्या योजनेप्रमाणे घडले असते तर, वर्ष अखेर जंजिरा पडला असता. पण आता युद्ध रेंगाळले. आणि जे युद्ध पाच-सात महिन्यात संपणार होते, त्याला तीन वर्षे लागले. याला कारण होते प्रतिनिधी. अखेर विजयही नाही व पराभवही नाही, अशी अवस्था बाजीरावांची झाली.

        प्रतिनिधींचा बाजीरावांबद्दलचा मत्सर सिद्दीचा बीमोड करण्याआड कसा आला हे पाहूया…

       सरखेल सखोजी आंग्रेनी कुलाबा किल्ल्यावरून कारवाई सुरू केली. दोन जूनला तुकोजीकरवी चौलवर हल्ला करून काबीज केला. जुलैमध्ये बाजीरावांचे  सरदार  जमिनीवरून थळ व रेवसवर चालून गेले. उंदेरी बेटावरून सिद्दीने तोफांचा मारा सुरू केला. त्याबरोबर जमिनीवरूनही निकराचा प्रतिकार करू लागला. मराठ्यांनी त्याच्या प्रतिकाराला उत्तर देऊन थळ व रेवास जिंकून घेतले. सिद्दी पळून उंदेरीवर गेला.

मराठे उंदेरीवर हल्ला चढवण्याच्या तयारीस लागले. आणि इथूनच गोंधळाला प्रारंभ झाला. मुंबईकरांची जहाजे सिद्दीच्या मदतीला उंदेरीकडे येत असलेली पाहून, शेखोजी आंग्रेंनी थळ व खांदेरी वरून तोफांचा भडिमार सुरू केला. पण चिवट इंग्रज मारा चुकवत अखेर उंदेरीवर पोहोचले. सिद्दीने पराभव पत्करण्यापेक्षा बेटच इंग्रजांच्या हवाली केले. सिद्दी आणि इंग्रजांचा सलोखा जुळला. पुढे पोर्तुगीजही त्यांच्यात सामील झाला. सरखेल सखोजी बाजीरावांना निरोपावर निरोप पाठवत होते. दुसरीकडे मुंबईवर हल्ला करण्याचा बेत आखत होते.

        सिद्धीचे अंजनवेल, जयगड, गोवळकोट, बाणकोट, मंडणगड, विजयगड, ठाणी तात्काळ काबीज करणे गरजेचे होते. त्याप्रमाणे प्रतिनिधी, पेशवे, आंग्रे या तिघांनीही कार्यवाही सुरू केली. पण प्रतिनिधीच्या स्वतंत्र वागण्याने एकसूत्रता राहिली नाही. आंग्रेंनी बाणकोट, भंडारगड, विजयगड घेतला. आता अंजनवेल आणि गोवळकोट घ्यायचा होता. बंकाजी नाईकने गोवळकोट आणि प्रतिनिधीने अंजनवेल घ्यावी अशी योजना होती पण….

       क्रमशः
संकलन ; लेखन  व ©®मिनाक्षी देशमुख.

अपराजित योध्दा बाजीराव पेशवे संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading