नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १७६३
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥
नाम घेता न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करिता ऐके कानी । बांधे निजोनि डोकियासी ॥धृपद॥
घरा व्याही पाहुणा आला । म्हणे त्याला बरे नाही । तुमचे गावी वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥
उजवू किती होतिल पोरे । मरता बरे म्हणे यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोने ॥३॥
पर्वकाळी भट घरासी आला । बोंब घाला म्हणे पोरा । तुमचा उणा होईल वाटा । काळ पिठासी आला ॥४॥
दाढी करिता अडका गेला । घरांत आला बाइलेपे । म्हणे आता उगवी मोडी । डोई बोडी आपुली ॥५॥
तीर्थ स्वप्नी नेणे गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारी । आल्या घर म्हणे ओस ॥६॥
माझ्या भय वाटे चित्ती । नरका जाती म्हणोनि । तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी । या ही तारी जीवांसी ॥७॥
अर्थ
महाराज या अभंगामध्ये एका श्रीमंत पण नास्तिक आणि कंजूष असलेला व्यक्तीचे वर्णन करतात ते म्हणतात हा मनुष्य जन्माला येऊन फार उदार झाला आणि याने आपल्या वंशाचाही उद्धार केला. ते म्हणजे कसे माहित आहे का? याने पुष्कळ धन संपत्ती मिळवली आणि मातीत पुरून ठेवली आणि सदा सर्व काळ उभे आयुष्य भिकाऱ्या सारखेच भोगीत राहिला. अशा कंजूस व्यक्तीचे नांव जरी घेतले तरी दिवसभर अन्न मिळणार नाही व कसल्याही प्रकारचे काम होणार नाही. दुसऱ्याने कोणीही दानधर्म केले असेल असे याने कानाने ऐकले तरी याचे डोके दुखते मग तो डोक्याला फडके बांधुन झोपतो. याच्या घरी जर त्याचा व्याही पाहुणा म्हणून आला तर तो म्हणतो तुमच्या जावयाला बरे नाही त्यामुळे त्याला तुमच्या गावाला पाठऊन दिला आहे कारण तुमच्या गावाला चांगला वैद्य आहे आणि त्या वैद्याला विचारून आम्हाला तुम्हीच कळवावे तुमचा येथे थांबुन काय उपयोग आहे? तुम्ही तुमच्या घरी जावे असे तो त्याच्या व्याह्याला म्हणतो कारण त्याच्या खाण्याचा खर्च होणार असतो म्हणून. हा मनुष्य स्वतःशीच मनात बोलतो की अजुन किती दिवस मुले बाळे होणार आहेत आणि कधी राग आला तर तो म्हणतो ही मुले कधी मरणार काय माहिती? आणि याकरता तो देवाला नवसही करतो आणि नवस पावन झाला आणि तर तो देवाला वाहायचा नैवद्य घरी बसल्या बसल्या देवाला दाखवतो. तो मुलांना सांगतो पर्व काळी जर ब्राम्हण घरी आले तर आपल्या घरात चोरी झाली आहे असे बोंब मारून सांगा. अरे तुम्ही त्या ब्राम्हणाला पीठ वगैरे वाढवू नका कारण तुम्ही असे केले तर तुमचा वाटा कमी होईल. हा मनुष्य न्हाव्याकडे दाढी करत असताना थोडे पैसे जास्त गेल्यामुळे घरी आल्यानंतर आपल्या सौभाग्यवतीला म्हणतो, आता तू केस ठेवण्याची जुनी पद्धत मोडून टाक व त्या न्हाव्याकडे जाऊन संपूर्ण केस काढून टाक कारण त्याच्याकडे माझे जास्त पैसे गेले आहेत. अशा कंजूस मनुष्याला केव्हाच तीर्थयात्रा करून गंगेत स्नान करून किंवा गावाच्या शंकराच्या मंदिरात जाऊन पुजा करता येत नाही. आणि तो दाराला कडी लावून बाहेरच बसतो कारण कोणी पाहुणा आला तर त्याला सांगतो हे घर ओस पडलेले आहे इथे कोणीच राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझ्या चित्ताला भय वाटते हे असे मनुष्य नरकाला जातात म्हणुन. देवा हे हरी असे लोक या जगामध्ये आहेत परंतु त्यांचा तु द्वेष. करू नको त्यांचा द्वेष न करता त्यांना या भवसागरातून तार.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA