
……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
Maharishi Agastya Rishi! !
महर्षी अगस्त्य ऋषी ! !
!!! अगस्तऋषी !!!
भाग – ४१.
रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल होते.
दंडकारण्यात शिरल्यापासून त्या तिघांना सर्वत्र अगस्तऋषींचं कार्य प्रत्यसास येत होते.अनेक ठीकाणी त्यांच्या शिष्यांचे आश्रम,त्यांचे जीवन, अलौकिक विचार,रानोमाळ भटकून केलेली तपःसाधना,संस्कृती स्थापने साठी उचललेले अपार कष्ट,प्राचिन ऋषी च्या कार्याला पुनर्जिवित करुन निर्माण केलेली सुसूत्रित आश्रमांची श्रृंखला, कालकेय सारख्या दानवांचा केवळ स्वसिध्द शक्तीने केलेला निःपात अशा अनेक गोष्टी ऐकल्यापासून,रामाला अगस्त्यऋषींच्या दर्शनाची ओढ लागली होती.
प्रत्येक आश्रमात,कुठे वर्ष,कुठे चार सहा मास असं वास्तव्य करत या तिघांनी बारा वर्षे वनवासात व्यतीत केल्यावर ते ब्रह्मगिरीवर सुतिक्ष्णषींच्या आश्रमात आले.तिथे कांही दिवस वास्तव्य केल्यावर,एके दिवशी रामाने त्या सुतिक्ष्ण ऋषीला विचारले,अगस्तऋषींची भेट घेण्याची तिव्र इच्छा आहे,त्यांच्या आश्रमाचा पत्ता सांगावा.हर्षित होऊन ऋषी म्हणाले,इथून चार योजने गेल्यावर अगस्तींच्या भ्रात्याचा आश्रम आहे,तिथे रात्रभर वास्तव्य करुन पुढे दक्षिणेकडे एक योजन गेले की,विपूल वृक्षांनी सुशोभित असा रम्य प्रदेश लागेल,तिथेच त्यांचा आश्रम आहे.राम लक्ष्मण सीतेला अगस्त्यांची महती सांगत मार्गक्रमण करीत आश्रमात पोहोचल्यावर एवढ्या महान ऋषीने स्वतः त्यांचे अगत्याने केलेले स्वागत पाहून तिघेही अवघडून गेलेत.राम आज तुम्ही थकलेले आहात,विश्रांती घ्या,उद्या बोलुया!महर्षींचा निरोप घेऊन तिघेही त्यांच्यासाठी तयार केलेल्या कुटीकडे गेल्यावर, अगस्त्य त्वरेने पश्चिमेच्या डोंगराकडे गेले. आज राम इथे आले असतां,यांना एवढ्या तातडीचे काय काम निघाले असेल?असा विचार करत लोपमुद्रा त्यांच्या पाठमोर्या आकृतीककडे बघत राहिली.
दुसर्या दिवशी प्रातःकालीन सार्या विधी आटोपल्यावर,राम लक्ष्मण अगस्त्यांबरोबर आश्रमाचा फेरफटका मारण्यास निघाले.आश्रमीयांची कुटीरं, पाठशाळा,होमशाला,गोशाला,सभागृह, धान्यकोठार,आचार्य सदन,वानप्रस्थांची कुटीरं,विद्यार्थी स्नातकांची कुटीरं दाखवत एका बैठकीपुढे आले.हे स्थान ब्रम्हदेवांचे!नंतर प्रत्येक देवतांचे स्थान दाखवत म्हणाले,ही आकाशस्थ देवतांची प्रतिनिधिक स्थाने आहेत.त्या प्रत्येक स्थानापुढे त्या त्या देवांचे आवाहन मंत्रांनी अधिष्ठीत केले आहे.आकाशस्थ देवांच्या विविध शक्ति इथे अव्यक्त स्वरुपात व्यापून असतात.हा पूर्ण आश्रम अशा शक्तींनी प्रभावित आहे.सारा आश्रम दाखवून झाल्यावर ते होमशाळेत आलेत.फलाहार वगैरे झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा!भोगवादी राक्षस या रुजवलेल्या शक्तीचा विनाश करु पाहताहेत.रावण संस्कृती दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे.ही संस्कृती जर भारतवर्षात फोफावली तर,ऋषीय कार्या ला तडा जाऊन,सर्वत्र भोगवाद,स्वार्थ, राजस,तामस वृत्तीचा प्रसार होऊन स्वार्थासाठी लोकं परस्परांचे लचके तोडतील आणि एक दिवस संपूर्ण विनाश होईल.
रामा!माझ्यासारख्या शेकडो ऋषी मुनींनी ही संस्कृती टिकवण्यासाठी रक्ताचं सिंचन करत बलिदान दिल.सर्जन शील कार्य स्थापित करण्यासाठी प्रचंड तप करावा लागला,आहुत्या द्याव्या लागल्या.महर्षी!आम्ही दंडकारण्यात प्रवेश केला तेव्हाच आम्हाला अनेक ऋषींकडून ही सर्व परिस्थिती,इतिहास समजला.या विधायत्मक लोकांचा पूर्णतः निःपात करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.आपण मार्गदर्शन करावे.ठीक! दुपारच्या भोजनानंतर भावी आव्हानावर मात करायचं ना,तर त्या पश्चिमेकडच्या डोंगराकडे जायचे आहे.असे म्हणून ते वृध्द ऋषी कुटीबाहेर पडले.
डोंगर चढतांना अगस्त्य म्हणाले,रामा दंडकारण्यात वास्तव्यास असलेल्या शुर्यणखेसह राक्षसांपासून पूर्णतः मुक्त होणं हे प्रथम आव्हान तुझ्यापुढे आहे. कांही वेळाने अगस्त्य,राम,लक्ष्मण एका कपारीजवळ पोहोचले.कपारीवरची पाषाणशिळा अगस्त्यांनी दूर केली.आणि तिघांनीही गुहेत प्रवेश केला.तीथे भली मोठी असलेली संदूक राम लक्ष्मणाने बाहेर काढली.त्या संदूकीत देवांची शस्रे बघून दोघेही आवाक झालेत.ती सारी शस्रे रामाला सोपवून ऋषी म्हणाले, ही शस्रे आतां तुमची झालीत.याचा इतिहास सांगेन कधीतरी!त्यातील विश्वकर्माने निर्माण केलेले,सुवर्ण,हिरे जडीत वैष्णव धनुष्य व ब्रम्हदत्त बाण देत म्हणाले,हा बाण सोडल्यावर कधीच व्यर्थ जात नाही ही सारी शस्रे देवरचित,पूर्वनियोजित कार्यसिध्दिस्तव तुला सोपवण्यासाठी इंद्राने मला दिलेली आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अगस्तऋषी !!!
भाग – ४२.
अगस्त्य पुढे म्हणाले, दधिचीऋषी कडून वज्राचा स्विकार जसा इंद्राने केला तसचं या शस्रांचा स्विकार करुन महादैत्यांचा संहार कर…निर्णायक प्रसंगी हा ब्रम्हदत्त बाण अर्थात अस्रधारी अग्नि बाण तुला यश प्राप्त करुन देईल.ही देव निर्मित शस्रे वापरण्याचे वेगळे तंत्र आहेत शिवाय मी अभिमंत्रित केलेली आहे.तुम्हा ला ही शस्रं विधिवत प्रदान करतो,असे म्हणून सोबत आणलेल्या जलाने मंत्रीत करुन शस्रांची सदूक रामाला सोपवली व तीघेही गुहेबाहेर आलेत.
आश्रमात आल्यावर अगस्त्य म्हणाले,दोन दिवसांनी तुम्हाला इथून निघायचे आहे.रामाच्या डोळ्यात तरळले अश्रू बघून म्हणाले,रामा!तुझा सहवास मला का नको आहे?पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्यामुळे मी सुध्दा हा आश्रम सोडून पूर्वसागर किनारी जाणार!
दोन दिवसांनी महर्षींचा निरोप घेत, चरणस्पर्श करीत रामाने विचारले,महर्षी!आम्ही नेमके कुठे जायचेय?रामा!इथून दोन योजन अंतरावर पंचवटी नामक एक सर्व सोयीयुक्त प्रदेश आहे,तिथे आश्रम करुन रहा.रामा! या व्रतनिष्ठ,पतीनिष्ठ, सीतेचा उचित सांभाळ कर!राम-लक्ष्मणा चा विरह सहन न होऊन,सारा आश्रम अश्रू ढाळू लागला.सर्वांचा भरल्या अंतःकरणा ने व जड पावलांनी निरोप घेऊन पायी निघालेल्या त्या तिघांच्या पाठमोर्या आकृत्यांकडे बघत,इतकावेळ अडवून ठेवलेल्या बांधाला अगस्त्यांनी वाट मोकळी करुन दिली.
अगस्त्यऋषींच्या सूचनेनुसार चित्रकुट पर्वतावर लक्ष्मणाने बांधलेल्या कुटीत तिघेही स्थिरस्थावर झालेत.तिथे त्यांना अनेक ऋषीमुनी भेटायला येऊ लागले.राम लक्ष्मण अगस्त्याश्रमात जाऊन ज्ञान प्राप्त करीत असत.पुढे अगस्त्य वंगप्रांती गेले व तिथून पुनः ते तामीळप्रांती स्थिरावले.
दंडकारण्यात रावणाला पाय रोवण्यास रामाचा मोठा अडसर वाटत होता.रामाशी नातेसंबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने,रावणाने आपली बहिण शुर्पणखेला रामाकडे पाठवल्यावर रामा च्या संकेतानुसार,लक्ष्मणाने तिचे नाक कापले,शिवाय तिचे सेनानी खर,दूषण व त्याचे सैनिक ठार केले.शुर्पणखेच्या माध्यमातून रावणराज्याचे केंद्रच उध्वस्त केले.सर्व गोष्टी देवांच्या योजनेनुसार घडत होत्या.रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा ब्रम्हदेव संतुष्ट झाले.आपली प्राणप्रिय सीता सोडवण्यासाठी राम कार्य तत्पर होऊन शेवटी रामाकडून रावणाचा अंत होईल हे ब्रम्हदेव जाणून होते. रामावताराचे मुख्य प्रयोजनच ते होते.
सीतेचे अपहरण झाल्यानंतर जखमी जटायूच्या सांगण्यानुसार, राम लक्ष्मण किष्किंधनगरेकडे निघाले.तिथ ल्या वालीराजाने स्वतःचा भाऊ सुग्रीवा ला देशोधडीला लावून त्याची पत्नी आपल्याकडे ठेवून घेतली.दोन समदुःखी वीर एकत्र आल्यावर त्यांच्यात मित्रत्वाचं नातं प्रस्थापित झालं.रामाने वालीला ठार करुन,सुग्रीवाला किष्किंधेच्या राजसिंहा सनावर बसविले.नंतर सुग्रीवाने सीता शोधार्थ आपले दूत दिशादिशांना पाठवले लंकेत गेलेल्या हनुमानाने सीतेचा शोध लावला.हनुमानाबरोबर तिने येण्यास नकार देत,रामाने रावणाला जिंकून मगच मला घेऊन जावे असा निरोप हनुमाना बरोबर पाठवला.अन्यथा देवांची योजना बारगळली असती.
लंकेतल्या अशोकवनातील सीतेची भेट झाल्यावर,हनुमानाने लंका दहन करुन लंकेचं अपरिमित नुकसान केलं. सीतेचा शोध लागल्यानंतर,रामलक्ष्मण वानरसेनेसह दक्षिण सागरतटी आले.या सार्या घडामोडींवर अगस्त्यांची बारीक नजर होती.म्हणूनच ते मलयगिरी आश्रमात आले.देवांची कुटनीती यशस्वी होत होती.
अगस्तऋषींसह राम-लक्ष्मण एका बिल्ववृक्षाखाली बसले असतां,हात जोडून राम म्हणाले,महर्षी!मला वैदेहीची फार चिंता वाटतेय.तो दुष्ट रावण…रामा! तुला मी पूर्वीच सांगीतले,तीचं भूत, भविष्य मला कळले होते,हे असं घडणार विधिलिखित होतं.सीता अतिशय धाडसी व पतिव्रता आहे.अरे!ती कांही अशोक वनात अश्रू ढाळीत बसलेली नाही. कदाचित ती देखावा करीत असेलही,पण सध्या ती फार मोठी कामगिरी करत आहे भेदनीतीने ती राक्षसकुळात दुही माजवत आहे.तिच्या रक्षणार्थ असलेल्या त्रिजटा मार्फत,रावणबंधु विभीषणाशी संपर्क साधला आहे.विभीषणाने भरसभेत रावणाचा धिक्कार केला होता.कुंभकर्णा ने ही अनुमोदन दिले होते.विभीषण सत् प्रवृत्त आहे.ऐन युध्दात तो तुझ्या उपयोगी पडेल.रावणवधानंतर त्याचा राज्यभिषेक कर!सीतेच्या विरह रामाला क्षणोक्षणी दुःखी करत होता आणि त्यामुळेच राम अधिक जोमाने सीतेला सोडवण्याच्या प्रयत्नाला वेग देत होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अगस्तऋषी !!!
भाग – ४३.,
अगस्तऋषी रामाला पुढे म्हणाले, अशोकवनात राहुन सीतेने केलेल्या गुप्त कार्यामुळे विभीषण तुला सहाय्य करण्यास प्रृवृत्त झाला.रावण स्वतःला लंकेत सुरक्षित समजतो.सागर कुणी ओलांडुच शकणार नाही,शिवाय आर्यवर्तात कुणाकडेही आरमार नाही हे त्याला माहित आहे.तरीसुध्दा कुणी लंके कडे फिरकलेच तर,त्याने अंतराळात अतर्क्य संदेशयंत्रनाची योजना केली आहे.सूर्यचक्र नावाचं तंत्रज्ञान त्याने देवाकडूनच मिळवलेले आहे.त्यामुळे लंकेच्या किनार्याकडे कुणी आल्याचं त्याला लगेच समजते.तुम्ही जो सेतू जोडण्याचे काम केले ते सीतेशिवाय शक्य झाले नसते.खरोखर!सीतेने लंकेत राहून फार मोठे कार्य केले.तिने त्रिजटेला आपलस करुन तिच्याकरवी विभीषणाचे मन परिवर्तीत करुन रामाच्या विरोधात न जाण्याविषयी त्याचे मन तयार केले.त्या नुसार रावणसभेत रावणाविरुध्द मत प्रदर्शीत करुन रावणाचा रोष ओढवून घेतला.आणि रावणाने विभीषणाचा अपमान करुन बाहेर हाकलले.
विभीषणाने मग स्वतःचे गुप्तहेर जाळं लंकाभर पसरवलं.एक गुप्तहेर स्री विभीषणाचे संदेश सितेकडे पोहचवत असे.रावणाच्या विनाशासाठी विरांगना सीता एकटीच रावणाच्या गोटात कार्यरत होती.सीतेने हे देवदुर्लभ कार्य केले होते.
रात्रीच्या भोजनानंतर,कुटीमधे अगस्त्य,राम,लक्ष्मणाची चर्चा पुन्ः सुरु झाली.अगस्त्य पुढे म्हणाले,रावणाने सैन्याचे दहा विभाग केले.प्रत्येक विभागा कडे भरपूर शस्रे,लढावू विमानं,युध्द नौका आहेत,त्यांच्या निर्मितीच्या मोठ्या कार्यशाळा इंद्रजितच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.महत्वाचे म्हणजे,रावणाचं तंत्रज्ञान अतिप्रगत आहे.त्याच्या प्रत्येक सैनिकाच्या कानात ‘कर्णयंत्र’ बसवलेलं असल्यामुळे शेवटच्या सैनिकाशीही त्याला संपर्क साधता येतो.या आधुनिक तंत्रज्ञानामुळेच रावण उन्मत्त बनला असला तरी शेवटी विजय निश्चितच तुमचाच आहे.बैठक संपली आणखी दोन दिवसांनी रामलक्ष्मणासह अगस्त्य त्यांच्या सोबत निघाले….
अजुनही युध्दाचा निर्णय लागत नव्हता.शिबिरात वास्तव्यास असलेल्या अगस्त्यांना रावणवधाची प्रतिक्षा होती. त्यानंतरच त्यांच्या तपःकार्याचं उद्यापन होणार होतं.त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण व्हायचा काळ समिप आला होता.रावण नमत नव्हता,त्यामुळे ते थोडे विचलित झाले होते.
सेतूबंध झाल्यानंतर सारी वानरसेना, रामलक्ष्मण,सुग्रीवाच्या नेतृत्वाखाली साग
र ओलांडून लंकेपर्यंत पोहोचले. रावणाला सर्व बाजुने घेरण्याच्या दृष्टीने ‘देवनिवाराजवळ राम,”कालुत्तरजवळ” लक्ष्मण, “कल्याणीजवळ विभीषण, “चिलाद-पुलोत्तम इथे अंगद,हनुमान अशा सेनानींचे सैन्यतळ पडले.रावणाला पाठीमागून घेरण्यात राम यशस्वी झाले होते.वानरसेनेने लंकेच्या घनदाट अरण्यात प्रवेश केल्याची वार्ता कळताच रावणाने संपूर्ण सेनेचा विनाश करण्याचा डाव आखला होता,पण डाव विफल ठरल्याने,त्याने असुर्य देशातून सैन्य मागवले होते,रामाने त्या सैन्याचा फडशा पाडला.
अखेर सर्व आघाड्यावर अस्रयुध्द सुरुं झालं.परस्परांमधे भयानक अस्रांचे प्रयोग केल्यामुळे लंकेतील दक्षिण टोकाचा भाग कोसळून सागरात गडप झाला.कुंभकर्ण वधानंतर इंद्रजितने वानरसेनेवर अनेक अस्रांचा प्रयोग केला. आकाशगमन करुन नागपाश,ब्रम्हास्र, विष्णूपानम अशी अनेक अस्रे सोडल्या मुळे वानरसेनेत हाहाकार उडाला.नाग पाशाने वानरसेना आवळल्या गेल्यावर विभीषणाने गरुडास्र सोडायला सांगीतले त्याचवेळी अकंपन राक्षस ठार झाल्याची वार्ता कळल्याने,संतापून इंद्रजितने आकाशमार्गे अत्यंत प्रखर अस्रांचा मारा केला.रामलक्ष्मणासहीत असंख्य वानर मूर्च्छित झाले,तेव्हा जाबवंताच्या आदेशा नुसार हनुमानानं हिमालयातून द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला व संजीवनी वनस्पती वापरुन सारी सेना शुध्दीवर आली. परत युध्द सुरु झालं.इंद्रजितशी लढतांना लक्ष्मण मूर्च्छित होऊन मृतप्राय झाल्याने तातडीने त्याला शिबिरात आणले.तेथे अगस्त्यऋषींनी मृतवत् लक्ष्मणाच्या मस्तकावरुन हात फिरवत आदित्यह्रदय स्तोस्रांचा विधिवत मंत्रोचारण करु लागले. समंत्रक पठण सुरु असतांनाच
हळूहळू लक्ष्मण शुध्दीवर येऊ लागला.ते बघून सारं शिबिर अगस्त्यऋषी व राम लक्ष्मणाच्या जयघोषाने निनादून गेलं.
रामसेना जयघोष करीत पुन्हा युध्दात उतरली.घनघोर युध्द सुरु झालं.आतां मात्र रामसेना वरचढ ठरुन,रावणाचा एक एक वीर रणांगणांत पडू लागला.रावणाचे सर्व प्रमुख सेनानी मारल्या गेले.शेवटी रावणाने “मूलबलम” राखीव सैन्य रामा वर सोडले.रामाने त्या सेनेचा सेनापती सहस्राक्षा व दुषणपुत्र विरुणाचा पराभव केला.तरी पण रावणाचा पडाव होत नव्हता.कारण तो आकाशगमन करतांना दिसायचा पण त्याचेवर अस्रशस्राचा परिणाम होत नव्हता.शिबिरात बसलेले अगस्त्य कांहीसे खंतावून विचारमग्न झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-१२-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ४४.
युध्दाला थोडा विराम पडल्यावर राम शिबिरात येऊन अगस्त्यांना प्रणाम करुन म्हणाले,ऋषीवर!सर्व राक्षस मारल्या गेले,पण अद्याप दशानन…. अगस्त्य म्हणाले,त्याचं युध्दभूमीवरचं युध्द मायावी आहे.तो जरी युध्दभूमीवर दिसतो तरी त्रिकुटपर्वतावरील वेधशाळेत बसून अस्रे सोडत असल्यामुळे फक्त तो रणांगणावर असल्याचा आभास होतो. नुकतच प्रवेशलेल्या विभीषणाने त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देत म्हणाल्,तेच तर दशाननाचं वर्म आहे.तातडीने त्याच्या वेधशाळेवर अस्रांचा प्रयोग केला तर…
रामाला रावणाचं वर्म समजलं होतं. वेळ न घालवतां अगस्त्यऋषींनी दिलेलं ब्रम्हदत्त अग्नीबाण सिध्द करुन त्या डोंगरावर सोडला.त्या देवनिर्मित अस्रानं रावणाचा वेध घेतला.रावण गतप्राण होऊन कोसळला.परस्रीचं हरण करणारा राजसी,तामसी वृत्तीचं मूर्तिमंत स्वरुप असलेला रावण आज नामशेष झाला होता.त्याच्याबरोबरच त्याची डोंगरावरची वेधशाळा,अनेक प्रकारची मायावी अस्रां चा,मायावी यंत्रणेचाही विनाश झाला. एका राजसीयुगाचा अंत झाला.
रामा! देवांच्या आणि वैदिकांच्या शत्रूंचा आज अंत झाला,पण सूर्यचक्र अजुन राहिले आहे,जे अवकाशस्थित चक्र हीच रावणाची कुपी होती.त्या चक्रा मुळेच रावणाला प्रासादात बसून संपूर्ण लंकेवर नियंत्रण ठेवतां येत होतं.तेव्हा देवांनी दिलेल्या अस्रांनीच त्या चक्राचा त्वरीत भेद कर!कारण भावी काळात त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.रामाने लगेच देवास्राचा प्रयोग करुन,अवकाशा तील सुर्यचक्राचा भेद केला.इंद्रादी देवांना सार्या घडामोडी समजतच होत्या.सारे देव लंकेत येऊन रामावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
अगस्त्यऋषींचे हात हाती घेऊन इंद्र म्हणाले,महर्षी! खरोखर आज आपण आपल्या कार्याचा कळस गाठलात. आपल्यापुढे संपूर्ण देवराज्य नतमस्तक आहे.नंतर इंद्राने राम,लक्ष्मण,हनुमान, सुग्रीवसह सार्या वानरसेनेचं कौतुक केले.आतां रामापुढे महत्वाचे कार्य उरले, पतिव्रता सीतेची भेट घेणे.तीच्या त्यागा मुळेच हा अशक्यप्राय ळिजय मिळाला होता.आणि विभीषणाचा राज्याभिषेक!
अगस्त्याश्रमात श्रीरामाचं यथोचित स्वागत झालं.नंतर रामलक्ष्मणानं त्यांचे पादवदंन करुन म्हणाले,आपल्यामुळे आम्हाला जीवदान मिळाले,विशेषतः लक्ष्मणाला आदित्यह्रदयस्तौस्राने!अरे रामा!मी केलं ते माझ्या लोकांसाठी.पण आज तुमच्या हातून फार मोठं देवकार्य झालय!राक्षस निर्दालनासाठी अगनित ऋषींनी बलिदान दिलेलं असलं तरी, तुझ्या कार्याला तोड नाही.राक्षसांचा महा मेरु,देवांनाही अजिंक्य अशा रावणाचा तूं निःपात केलास यातूनच तुझ श्रेष्ठत्व प्रतित होते.मग सीतेकडे वळून अगस्त्य म्हणाले, मैथिली,तुझ्या धाडसाच कौतुक करावं तेवढं थोडं आहे.तुला रावणाने पळवून नेल्यावर नुसते अश्रू ढाळत न बसतां,दूही माजवून रावणाची अभेद्य यंत्रणा खिळखिळी केलीस,त्याचचं हे फलित आहे.आतां तूं आश्रमातील स्रीयां सोबत जाऊन,तू पूर्वी जेथे तुझे केस सांबार धूतले होते,तशीच न्हाऊन घेतले की,तुझ्या तपःपूत केशभार न्हाऊ घालणार्या ओढ्याचं जल या प्रवरेला मिळून तीर्थ बनेल.भविष्यात इथे येणारे लोक प्रवरेच तीर्थ प्राशन करतांना तुझ्या धाडसाचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.अगस्त्यांच्या विनंतीला मान देऊन सीता ओहोळाकडे निघून गेली.
एव्हाना मध्यान्ह भोजनाची सिध्दता झाली होती.तेवढ्यात इंद्राचा रथ व पाठोपाठ ब्रम्हदेवाचही आगमन झालं. शिवाय जेष्ठ ऋषीगणही आले होते.हे सर्व ऋषी संस्कृती प्रसारास्तव झिजले होते.ते सारे रावण विनाशक रामाला भेटायला व दर्शन घ्यायला तत्परतेने अगस्त्याश्रमात आले होते.आपापले अनुभव कथन करण्यात रंगून गेले.रामाला, ब्रम्हदेव म्हणाले,राक्षसविनाश व दशाननाचा निःपातासाठी मोठं षडयंत्र रचावं लागलं लगेच इंद्र म्हणाले,तुला वनात धाडण्याची प्रेरणा मीच कैकयीच्या माध्यमातून दिली होती.रामा! देवांनी हे षडयंत्र १५-२० वर्षापूर्वीच रचलं होतं.कालकेय दानवांचा संहार करण्यासाठी साठ वर्षापूर्वी या अग्निदेवाला(अगस्त्यऋषी) शाप देऊन देवराज्यातून घालवून दिले होते.देवकार्या साठी हा महान सिध्द महर्षी आयुष्यभर
झिजला.माझा उद्देश जरी चांगला होता तरी या महात्म्याला रानावनांत श्रमवलं. आणि इंद्राच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले.त्यांनी अगस्त्यांना कडकडून मारुन अडवलेल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.देवराज!उलट आपल्यामुळेच मला तपःकार्याची संधी मिळाली.
सर्वांना हात जोडून विनयपूर्वक राम म्हणाले,नंदीग्रामात भरत माझ्या प्रतिक्षेत आहे.त्यामुळे मला तातडीने जाणे अगत्याचे आहे,उशीर झाल्यास अनर्थ घडू शकेल.सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी राम,लक्ष्मण,सीता व वानरसमुहांना निरोप दिला.रावणाकडून आणलेल्या त्या भव्य पुष्पक विमानांत सर्वानी बसून अयोध्येकडे रवाना झाले.नंदीग्रामात आल्यावर भरताने रामाला अलिंगण दिले.त्याने नंदीग्रामात राहून अयोध्येचा राज्यकारभार उत्तमप्रकारे सांभाळला होता.सिंहासनावर कधीच बसला नाही. त्यावर रामाच्या पादूका ठेवल्या होत्या. इतकेच नव्हे तर चौदा वर्षानंतर राम परतले नाही तर,आत्मसमर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती.त्यानंतर भरताने त्यांचे यथोचित स्वागत केले.नंतर शोभा यात्रेचं आयोजन करुन रथ अयोध्यानगर द्वाराशी आला होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-१२-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ४५.
नंदीग्रामातून निघालेला रामाचा शोभिवंत रथ अयोध्येच्या नगरद्वाराजवळ आल्यावर तिथे भव्य स्वागत सोहळा झाला.भरतच्या हातात रथाच्या रश्मी, शत्रृघ्ननानं राम- सीतेवर छत्र आणि लक्ष्मण त्यांचेवर वाळ्याच्या पंख्याने वारा घालत होता तर,लंकाधिपती विभीषण श्रेतवर्णी चावरी घेऊन मागे उभा होता. सुहासिनींनी त्यांचे पुजन केले.पादक्षाला नी विधी आटोपल्यावर,नगारे,दुदुंभी, खंजीर्यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमुन गेला.दुतर्फा नागरिक त्यांचेवर पुष्पवृष्टी करीत होते.
राजप्रसादात रामाचं उत्स्फुर्त स्वागत झालं.कौसल्या,सुमित्राच्या भावनाचे बंधारे फुटले.कैकयीला राम भेटले तेव्हा रामाला अलिंगन देत रडत म्हणाली,रामा,मला क्षमा कर.इंद्राने मला प्रवृत्त केले रें!माते!मी सर्व कांही जाणतो राक्षसनिर्दलनात तुझी घोर अवहेलना होऊन सर्वांचे वाक्बाण सहन करावे लागलेत.भविष्यातही लोकं तुलाच दोष देतील,पण एक दिवस सर्वांना तुझ्या त्यागाचे मोल कळेल.
राज्यभिषेक सोहळा यथाविधी पार पडला.हा सारा सोहळा अगस्त्यऋषी
डोळे भरुन पाहत होते.सर्व आटोपल्या वर,संध्यासमयी थोडा निवांत वेळ मिळाल्यावर,अगस्त्य व वसिष्ठ या दोन बंधुंची भेट झाली.दोघेही आसनावर स्थिरावल्यावर,अगस्त्य म्हणाले,भाऊ! जीवितकार्य संपल्यावर विनाकारण जगण्यांत अर्थ नसतो.भारतवर्षातील सर्व आश्रमांत सुनियंत्रित,स्वयंशासित आचार संहिता प्रस्थापित केली,त्यानुसार सर्व जण वागतील याची खात्री आहे.पण अगदी विशित आलेला दध्वाह?त्याला ऋषीयकार्याचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे,त्याप्रमाणे तो आपलं जीवन घडवेल वसिष्ठ म्हणाले,दादा!केवढा मोठा कालखंड संपला ना.आपण देवराज्यातून पद्च्युत झालो आणि आज त्याच देवांना पुज्यही झालोत.वसिष्ठांना अनंतानं दिलेलं सारे संकेत कळून चुकले होते.
अगस्त्यांच्या दृष्टीसमोर महादेवाचे रुप साकार झाले.सुहास्य वदनानं म्हणाले,अगस्त्य,तुझे अजुन कार्य संपलेलं नाही.पण देवा!या नाशवंत देहाची क्षमता संपलीय!गात्र शिथिल झालीत.आयुष्यभर धावून धावून पायही थकले.ज्या कारणांसाठी या मत्युलोकात आलो त्याची इतिश्री झाल्.राम अयोध्ये
च्या सिहांसनावर बसला,आतां तो सारं कांही बघून घेईल.दक्षिण भारतवर्षातील राज्यांची उभारणी व व्यवस्था लावून दिली.पांड्य,ताम्रवर्ण राज्यांची स्थापना केली.पांड्याचे कुलगुरु म्हणूनही कांही काळ पदभार सांभाळला त्याचवेळी अयोध्येत जाऊन,रामाला अश्वमेध यज्ञा चा सल्ला दिला.आतां भारतवर्षात ऋषी विरोधी,संस्कृतीविरोधी एकही राक्षस उरला नाही.अगस्त्यांचा तरुण पुत्र इध्मवाह त्यांच्याचप्रमाणे वारसा पुढे चालवत आहे,ऋषीय कार्य करीत आहे. शंख,अक्षय,प्रगाथा,गौरांग,षण्मुख इत्यादी अगस्त्यांचे शेकडो शिष्य लाखो आश्रमीयांनी समृध्द असलेल्या अगस्त्याश्रमांची व्यवस्था पाहत होते. सागरांतील अनेक बेटांवरही त्यांचे कार्य स्थिरावले होते.
या कार्याबरोबरच अगस्त्यऋषींनी पुरातन तामीळ भाषेला व्याकरणबध्द केले होते,भावी काळात त्या व्याकरणा ला “अगत्तिय” नांवाने ओळखल्या जाणार होते.तपःपूर्ती व कार्यपूर्तीने तृप्त, नव्वदी ओलांडले अगस्त्य लोपमुद्रेसह तीर्थायटानाला गेले.त्या भ्रमंतीत त्यांनी वेंकटाचलावर ‘श्री’ आणि ‘भू’ या देवींसह श्रीनारायणाचे प्राकट्य केलं.पुढे भारता तील त्यांच्या सर्व आश्रमांना भेटी देऊन,आश्रमांची सुनियोजित व्यवस्था लावून पुन्हा प्रवरेकाठी आले.आतां ते ऋषीदाम्पत्य सर्ववेळ ध्यानधारणेत व्यतीत करीत होते.अगस्त्य पती-पत्नीने आयुष्यभर झिजून माणसां माणसांना प्रेमाने जोडून एक उज्वल संस्कृती संपूर्ण भारतवर्षात प्रस्थापित केली.रुजविली.
एकेदिवशी संध्यासमयी अगस्त्य ध्यानमग्न असतांना श्रीनारायणांनी त्यांना हयग्रीव रुपात दर्शन दिले.त्यांना पुनर्जन्माच्या फेर्यात अडकायचं नव्हते. आयुष्यभर अविरत तप केल्याने ते कार्यसिध्द झाले होते.आतां त्यांना परम तत्वाच्या ध्यानातच देहत्याग करायचा होता,म्हणून त्यांनी भावपुर्ण अंतःकरणा ने त्या ज्ञानस्वरुपुढे आपले मन उघड केले तेव्हा त्या हयग्रीव स्वरुपानं उपदेश करुन, “ललितादेवी” महात्म्याचं संकिर्तन करायला सांगीतलं.त्यांनी श्रीनारायणाच्या उपदेशाचे तंतोतंत पालन केलं होतं.आतां दोघेही पतीपत्नी त्रिदेवांची अनुमती मागत होते,परंतु सृष्टी चालक त्रिदेव अजुनही अनुकुल होत नव्हते.आश्रमीयांना त्यांचा देहत्याग निर्णय पटत नव्हता.परावृत्त करण्याच्या प्रयत्नाला यश आले नव्हते.परंतु दोघांचेही विचार ठाम होते.
त्यारात्री ते ध्यानस्थ असतांना भगवान महादेव त्यांच्यापुढे साकार होऊन अनुमती दर्शवित म्हणाले,तू सगुन देहातून जरी मुक्त झालास तरी सुक्ष्म देहाने या भूमीवर राहायला हवय! अवकाशात राहून या भूमीवर अनुग्रह करावा.प्रातःकालापासून दोघांनीही तो दिवस आश्रमवासियां बरोबर मोठ्या आनंदाने घालवला.आश्रमात असलेल्या ब्रम्हा,विष्णू,महादेव,विश्वकर्मा,मरुत आदी स्थांनाचं दर्शन घेतलं.संध्यासमयी सूर्यदेवांना अर्ध्य देऊन आश्रमात परतले. मंत्रांच्या घोषात अग्निहोत्र विधि सपन्न झाला.अखेरचे सहभोजन झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-१२-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
अंतिम भाग – ४६.
अगस्त्यऋषी व लोपमुद्रेने सर्वांसह अशा प्रकारे मोठ्या आनंदात दिवस घालवल्यावर,होमशाळेच्या मोकळ्या मैदानात सर्वांना ऐकत्रित जमा व्हायला सांगीतले.दोघा पतीपत्नींनी सर्वांवरुन आपली भावपूर्ण,प्रेमळ दृष्टी फिरवून बोलू लागले….माझ्या प्रिय स्वजनांनो,हा मांदार्य, हा अगस्त्य आपल्या भार्येसह तुम्हा सर्वांचा निरोप घेत आहे….ऐकलं मात्र…सर्व आश्रमीयांना दुःख अनावर झाल.तुम्हाला दुःख होणं स्वाभाविकच आहे पण आम्ही तुमचं कार्य पाहण्या साठी भेटत राहणार आहे.देहरुपात नाही दिसलो तरी,आमचं दर्शन ऋषीय कार्यात तुमच्या ह्रदयात असणार आहे.शिवाय गरज असेल तिथे मार्गदर्शनही करणार आहे.उमासे,हुंदके आतां थांबले होते. ऋषीदांम्पत्यांनी सर्वांना हात जोडले, तेवढ्यात इध्मवाह पुढे येऊन आपल्या मातापित्याला बिलगला.रडू आवरेनासे झाले.त्यांनाही गहिवरुन आले.पण निग्रहाने इध्मवाहला दूर करत अगस्त्य म्हणाले,तूंच जर असा शोकग्रस्त झालास तर,या आश्रमीयांना कोण सांभाळेल? आम्ही गलितगात्र राहलेलं तुला आवडेल का?त्यांच्या समजावल्यामुळे इध्मवाहने आपल्या भावना आवरल्या.
पुन्हा सर्वांना उद्देशून अगस्त्य म्हणाले,देह धारण करण्यापूर्वीच आम्ही उभयंतांनी एकत्रच राहणे व एकत्रच देह ठेवण्याचा निर्णय घेतला होता.पूर्वनियो जित कार्यक्रमानुरारच आम्ही देह धारण केला होता.आणि ठेवत आहोत.वायव्या च्या एका भागात ‘गस्त’ हा शब्द पाप वाचक आहे.मी अ-ग-स्त्य’ म्हणून ओळखल्या जातो.निष्पाप जीवन जगण्याचा आम्ही दोघांनीही पुरेपुर प्रयत्न केला.अवधानाने आमच्याकडून कांही चुका,कुणाचा उपमर्द झाला असेल तर….नाही आचार्य!आपण आमच्यावर निरपेक्ष,पुत्रवत प्रेम केलत…
आतां आम्ही आपला निरोप घेतो. खाली प्रवरेकाठी जाऊन बसणार,कुणी ही आमच्या मागोमाग येणार नाही. इध्मवाह फक्त प्रवरेकाठी सोडून येईल. आपल्या वृध्द मातापित्याचा हात धरुन इध्मवाह जाऊ लागला.ते दृष्य बघून आश्रमीयांचा बां फुटला,पण गुरुआज्ञे नुसार मोठ्या प्रयासाने बांध घातला.
प्रवरानदीचं दर्शन घेऊन अगस्त्य आणि लोपमुद्रा नदीकाठी असलेल्या एका विशाल पाषाणावर-तांदळ्यावर स्थानापन्न झाले.सहजासनात ते जेव्हा ध्यानमग्न होऊन बसले,तेव्हा त्यांच्या आज्ञेनुसार इध्मवाह जड अंतःकरणाने आश्रमीय समुदायामधे येऊन मिसळला.
सारे अगस्त्य- लोपमुद्रा बसलेल्या खडकाकडे दूरुन दृष्टी लावून कितीतरी वेळ उभे होते.अंधार पडल्याचेही त्यांना भान नव्हते.अंधारांत कांहीही दिसत नव्हते तरी,त्या दिशेने बघतच होते. तेवढ्यात एक रज्जूसदृश प्रकाशखंड आसमंत प्रकाश करीत अत्यंत वेगाने अवकाशात जाऊन प्रकाशमान व्याधा जवळ जाऊन स्थिरावला.
त्या तपःपूत दाम्पत्याने एकरुप होऊन आपला सूक्ष्मदेह गंगोत्रीला ठेवला आणि विश्वव्यापक देहानं ते अनंत अवकाशात व्याधाजवळ जाऊन स्थिरावले.
आकाशातला तो तेजस्वी ‘अगस्त्य’ तारा पृथ्वीवरच्या मानवाकडे बघत राहणार होता.मार्गदर्शन करीत राहणार..
अश्या या त्यागी,निष्ठावान तपस्व्या ला आयुष्यभर संस्कृती स्थापित करीत झिजणार्या महान महर्षी अगस्त्यऋषींना कोटी कोटी प्रणाम!
।।श्री अगस्त्यार्पणमस्तु ।।
!! समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

