रूख्मिणी चरित्र भाग ८, (३६ ते ४०)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

*!!!रूख्मिणी भाग-३६!!!*

                श्रीकृष्णाच्या बोलण्याने क्षणभर रुख्मिणी बावरली पण लगेच सावरुन म्हणाली, स्वामी तुम्ही घ्याल तो निर्णय योग्यच असतो याची खात्री आहे. पण माझं काय? तुम्हीच तर माझं विश्व, जीवन आहात. तुम्हीच जर माझ्या भावविश्वातून दूर गेलात तर माझा जीवनहेतूच संपेल. माझं पुढील ध्येय काय डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांच्या भावनिक विरहाची कल्पनाही तिला सहन होईना.

              स्वामींनी मस्तकावर हात ठेवून म्हणाले, रुख्मिणी कष्टी नको होऊस.तू आणि मी वेगळे का आहोत? या चराचर सर्व भूतांठायी मी आहे आणि तू देखील. तुझ्यातील दिव्य शक्तीला जाण. तू आदिशक्ती आहेस. तू सुध्दा माझ्या वानप्रस्थाश्रमाची वाटेकरी होणार आहेस. आपण देहाने वेगळे असलो तरी जीवनमार्गाची दिशा एकच असणार आहे.निर्मिती तिथं अंत असतोच. तो या विश्वाच्या कालचक्राचा नियम आहे नियतीवर विश्वास ठेव. स्वामींच्या मस्तकावरी हस्तस्पर्शाने शरीर तेजोमय झाल्याचा भास झाला. काया दिव्यशक्तिने चेतून उठली. मन शांत, निवांत, निर्भय झाले.

            दिव्यशक्तीने निर्भय होऊन भविष्यकाळाला सामोरी जाण्यास ती सज्ज झाली. निःशब्दपणे एकमेकांच्या साथीने, विश्वासाने पावले टाकीत दोघेही महालाकडे निघाले. स्वामींनी आपला निर्णय कृतीत आणण्यासाठी सर्वांची संमती घेतली. जेष्ठ मानकर्‍यांच्या पदावर त्यांचेच पुत्र जे कुशल कार्यक्षम असतील त्यांना ते पद दिल्या जाते. अमात्य विपृथूंचा पुत्र सुकृत हा नवनिर्मित अमात्य झाला. आमच्या पुत्रांचे पुत्र व कन्या उपवर झाले होते. प्रद्युम्नचा पुत्र अनिरुध्दचा विवाह रुख्मीदादाची धाकटी कन्या रोचनेशी झाला. ज्या दादाने माझा विवाह कृष्णाशी होऊ नये म्हणून अथक प्रयत्न केले होते,प्राण पणाला लावले होते, त्याच दादाने आपल्या दोन कन्यांचा विवाह श्रीकृष्णाच्या वंशजांशी लावून दिला होता.

‌               स्वामींनी अप्रत्यक्षपणे घोषित केले, यापुढे ते  प्रत्यक्ष युध्दात भाग घेणार नाही. वयानुसार बलरामदादा व स्वामींना विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे.बालपणापासून आता पर्यंतचे त्यांचे जीवन संघर्षमयच गेले. प्रत्यक्ष युध्दावर न जाण्यामागे पुढच्या पिढीला कर्तुत्वाची संधी मिळावी हा उद्देश असावा.आठही राण्यांचे पुत्र विविध अस्र, शस्र, युध्द कलेत निपून झाले होते. महायुध्दाच्या काळात द्वीपाच्या संरक्षणाची धूरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. जांबवंती पुत्र सांब व त्याचे बंधू शरप्रक्षेपण कलेत निपून, तर बलरामदादाचे पुत्र  त्यांच्यासारखेच गदायुध्दात प्रविण झाले होते. प्रद्युम्न तर शाल्वयुध्दवेळी आपला पराक्रम सिध्द केलाच होता.

          पण स्वामींचा हा निर्णय नियतीला मान्य नव्हता. शोणितनगरच्या बाणासुराची कन्या उषाची प्रिति अनिरुध्दावर जडली होती. अनिरुध्दला कळल्यावर त्याच्याही मनात प्रेमाचे झंकार उठले. उषाच्या प्राप्तीसाठी तो शोणित नगराकडे गेला असतां बाणासुराने त्याला कारागृहात टाकले. हे वृत्त कळताच आपला लाडका नातु अनिरुध्दला सोडवण्यासाठी बाणासुराशी

युध्द करण्याचे सामर्थ्य फक्त स्वामींमधेच होते. न धरी शस्र करी मी ” हा विचार बदलवून आपल्या पौत्रासाठी, निवडक सैन्यानिशी शोणितनगरला जाऊन बाणासूराचा पराभव केला आणि उषा व अनिरुध्दचा विवाह थाटात लावून दिला.

             या युध्दावरुन परत आल्यावर मात्र स्वामींचा अलिप्त पणा प्रकर्षाने दिसू लागली. त्यांचा कल तत्वज्ञानाकडे वळू लागला.

            वास्तविक या सार्‍या अवस्था पार करण्याची स्वामींना गरजच नव्हती. मुळातच ते अपरंपार होते. प्रत्यक्ष भगवान म्हणून ख्याती पसरली होती. या निर्लेप अवस्थेत शिरण्यापूर्वी विश्वाला आत्मतत्व सांगीतले. विषादयोगासह अठरा योगातून जीवनाचे मर्म उलगडून दाखवले. विराट विश्वरुपाचे दर्शन घडवले.आदी नाही अंत नाही या कालप्रवाहाचा अर्थ विशद केला. मानव जातीच्या मनावरचे अज्ञानाचे धूके दूर सारुन कर्तव्यधर्माचे दिव्यज्ञानाचे झणझणीत अंजन घातले. अशा या गुरुंच्या गुरुला मानसिक वानप्रस्थाश्रमाची खरच आवश्यकता होती का? त्यांनी आपल्या जीवनात कर्तव्य श्रेष्ठ मानले, तिला आठवले, स्वामींशी विवाह झाल्यावर, माहेरची आठवण झाली की अस्वस्थ होऊन डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करायची पण स्वामींच्या नजरेतून कसे सुटणार? तेव्हा ते म्हणाले होते, रुख्मिणी, व्यक्तीचा, स्थलाचा संबंध नियतीने आखला असतो. खंत नको करुस. सध्या तुटलेल्या संबंधाचे धागे कदाचित भविष्यात जुळले जातील. प्रारब्धावर विश्वास ठेवून समोर आलेलं कर्तव्य मन लावून कर. केवळ स्रीयांनाच  प्रिय व्यक्तींचा, भूमीचा त्याग करावा लागतो असं नाही तर पुरुषांनाही करावा लागतो. माझं उदाढहरण तुझ्या समोर आहे.

                      क्रमशः
     संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ९-६-२०२२.

37

*!!!रूख्मिणी भाग-३७!!!*

                  श्रीकृष्णाचा शब्द नी शब्द रुख्मिणीच्या ह्रदयावर कोरल्या गेला. महाभारतातील महायुध्दाचा विजय म्हणजे सत् प्रवृत्तीचा, न्यायप्रवृत्तीचा असून अन्याय प्रवृत्तीवर मिळवलेला विजय होता.हे अवजड धनुष्य पांडवांना पेलायचे होते.त्या साठी विधिवत राज्याभिषेकाची मोहोर लागणे आवश्यक होते. या राज्याभिषेकाचे आमंत्रण देण्यासाठी स्वतः पार्थ धौम्यऋषी सह द्वारकेत आले.

              स्वामींच्या आज्ञेने आठही राण्या संपूर्ण परिवारासह व इच्छुक प्रजाजनासह अवधी कमी असल्यामुळे वेगाने प्रवास करत हस्तिनापूरककडे निघाले. एवढा मोठा लवाजमा नेण्यास स्वामींचा अंत्यस्थ हेतू कोणता असावा? कोणती प्रबळ कारणे असावीत? रुख्मिणीच्याच मनाने उत्तर दिले. स्वामींचे आपल्या प्रजेवर नितांत प्रेम असल्याने त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न असावा. ” बहुजन सुखाय, बहुजन हिताय ” या  मानवी धर्माचे बोधवाक्याला त्यांनी मानले होते. वृध्दत्वामुळे थोरले महाराज व दोन्ही माता येणार नव्हत्या. त्यांची व्यवस्था सत्यकींची पत्नी बघणार होती. ती नव्हती येणार, कारण तिचे दहाही पुत्र या महायुध्दात कामी आले होते. पुत्रवियोगाचे दुःख तिथे जाऊन अधिक जाणवले असते.तिच्या वेदनेवरुन तिला द्रौपदीची आठवण झाली.तिच्या ह्रदयात एकाचवेळ परस्पर विरोधी भावनांचा कल्लोळ माजला असेल. कौरवांवर मानभंगा चा सूड उगवल्याचे समाधान, तर त्याच वेळ स्वतःच्या रक्ताचे लाडाकोडात वाढवून युवावस्थेत पोहचलेले शूरवीर पुत्र, लाडका अभिमन्यु, बंधू, असंख्य आप्तांच्या प्राणांचे मुल्य देऊन मिळालेले हस्तिनापूरचे सम्राज्ञीपद! किती केविलविणी, असहाय्य अवस्था झाली असेल द्रौपदीची? इतक्या सर्वांबरोबर प्रवास करीत असतांना सुध्दा रुख्मिणी अस्वस्थ होती.

              काय कारण असावे? अशुभाची चाहूल तर नसेल ना हस्तिनापुरात प्रवेश केल्यावर, या नगरीचे वैभवी प्रासाद,मंदिरे, वाटिका, राजमार्ग, उद्योगधंदे सारं पुर्ववतच होतं, तरीसुध्दा उदासिनतेचे सावट जाणवत होते. राजप्रासादात सर्वांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. यावेळी स्वामी विदूरांकडे राहणार होते. स्वागत समारंभ आटोपल्यावर मी आणि रेवतीताई सुभद्राला भेटायला गेलो.आम्हाला पाहून तिच्या ह्रदयाचा बांध फुटला. शब्द मुके झाले.थोडी निवळल्यावर उत्तरेची काळजी घेण्यास सांगून नंतर कुंतीमातेचे दर्शन घेतले.

               युधिष्ठीरांचा विधीवत राज्याभिषेक सोहळा एच सप्ताहभर सुरु राहीला. देशोदेशीचे सम्राट, मान्यवर, सन्माननीय अतिथींनी हजेरी लावली होती.महाराणी द्रौपदी सारे उपचार हसतमुखान पार पाडत होती,पण त्या हास्याला कोठेतरी कारुण्याची किनार जाणवत होती.

‌             नंतर श्रीकृष्ण व रुख्मिणीने महाराज धृतराष्र्ट व माता गांधारीची भेट घेतली. गांधारीने तिला जवळ घेत म्हटले, तूं थोर भाग्याची म्हणून एका अलौकिक दिव्य तेजाची छाया झालीस. तुला एकच आशिर्वाद देते, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळो. तिने मौनपणे वंदन केले.कारण त्यांचे सांत्वन करण्याचे  सामार्थ्य तिच्यात नव्हते. त्यांच्या शब्दाने मात्र मनात अशुभाची पाल चुकचुकली. या शंकेचे निरसन फक्त स्वामी किंवा उध्ववजीच करु शकणार होते.

           हस्तिनापूरच्या प्रवासात स्वामींच्या निर्लेप अस्तित्वाची जाणीव तिच्या मनाला कुठे तरी स्पर्शुन जात होती. यावेळी ते पूर्वीसारखे हस्तिनापूर, इंद्रप्रस्थात रमले नाही की, कोणताही मानसन्मान स्विकारला नाही. ठरलेल्या मुहूर्तावर सर्वांनी द्वारके साठी प्रयान केले. द्वारकेत आल्यावर प्रत्येकजण आपापल्या कक्षाकडे वळले. रुख्मिणी कक्षात येऊन थोडी स्वस्थ झाल्यावर, मनातील शंका उसळी मारुन वर आली.

          धृतराष्र्ट व गांधारीला वानप्रस्थाश्रम स्विकारण्यास व त्यांची सेवा करण्यास कुंतीमातेलाही त्यांच्यासोबत जाण्याची आज्ञा शरपंजरी असलेल्या पितामह भीष्मांनी दिली. कुंतीमातेस त्यांच्या सोबत जाण्यास सांगणे, कुंती रुख्मिणीचा कोड्यात टाकणारा संवाद आणि गांधारींनी तिला उद्देशून केलेली विधाने ही तीन कोडी होती. पैकी दोन कोड्याची उत्तरे किती भयानक होती हे नंतर कळले तेच ठीक झाले. नाही तर भावी आयुष्य कसे काढले असते,

कल्पनाही करवत नाही.

                       क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                दि.  १०-६-२०२२.

38

*!!!रूख्मिणी भाग-३८!!!*

               रुख्मिणीचे विचारचक्र फिरुं लागले. स्वामींना या भयंकर भविष्याची पूर्ण कल्पना असतांना त्यांनी कोणालाही साधी कुणकुणही लागू दिली नाही ना उध्ववजींनी.ते तर स्वामींची सावलीच! सर्व गुणसंपन्न, कला, शास्रात पारंगत असूनही सर्वार्थाने सन्यासी होते.

म्हणूनच त्यांना अवधूत पदवी प्राप्त झाली होती.

             माझे स्वतःचे विचार असे आहेत की, मानवदेह धारण केलेल्या या दिव्य विभूतींना केवळ देवत्व बहाल करुन त्यांची पुजा अर्चा, कर्मकांड करण्यापेक्षा त्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करुन, त्यांनी सुखदुःखाचे चढउतार, न्याय, सत्य नीति या आदर्शासाठी लढतांना, प्रबळ शत्रुंशी कसा संघर्ष केला, कधी शक्तीने तर कधी युक्तीने, प्रसंगी माघार घेऊन विजय कसा मिळवला हे जर डोळसपणे अवलोकन केले तर अभ्यासकांना निश्चितच जीवनाचे तत्वज्ञान उमजेल असा मला विश्वास वाटतो.

         रुख्मिणीची कथा आतां अंतिम पर्वापर्यत येऊन ठेपली. तिचा आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास, कांही घटना वगळता, सरळ मार्गी झाला.युधिष्ठीरच्या राज्याभिषेकाहून द्वारकेत  परत आल्यावर, श्रीकृष्णाने राजकारणातून अंग काढून आध्यात्मिक विश्वात जास्त रमू लागले. द्वारकेत सतत ऋषीमुनी यायचे. त्यांचेशी सतत संवाद व्हायचा. ते आपल्यासमोर आहेत याच कल्पनेने सारे आनंदात होते, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे हे कुठे त्यावेळी माहित होते?

           महाराज धृतराष्र्ट, गांधारी कुंतीमातेसह वानप्रस्थ स्विकारुन अरण्यात निघून गेले. कुंतीच्या दैवात राजभोग उपभोगणे नव्हतेच जणू! त्या पुढेमागे वानप्रस्थ स्विकारतील हे अपेक्षित असले तरी एवढ्या लवकर जातील असे कुणालाच वाटले नव्हते.

                एके दिवशी सुवार्ता आली, युधिष्ठीर अश्वमेधयज्ञ  करणार आहे.यज्ञाचे आमंत्रण  देण्यास अर्जुन धौम्यऋषीसह  आला. त्याने रितसर लहानमोठ्या सगळ्यांना आग्रहाचे आमंत्रण दिले. अर्जून परत जाण्यास निघाला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी स्वतः येऊ शकत नाही,पण प्रतिनिधी म्हणून सेनापती येतील. स्वामी जाणार नाही म्हणून बलरामदादा व उध्वजींनीही जाण्याचे नाकारले.

               आतापर्यत पांडवांकडे होणार्‍या प्रत्येक प्रसंगी उपस्थित राहत आले. आतांतर पांडव सत्ताप्राप्तीचे सर्वेसर्वा असतांना श्रीकृष्णाने हस्तिनापूरी जाण्याचे कां नाकारले? आणि सांपडले तिला उत्तर! पांडवावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी स्वामींनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. पांडवांना आणि पर्यायाने संपूर्ण विश्वाला न्याय धर्माचे महत्व पटवून दिले हाच तर त्यांचा नरदेहजन्म घेण्याचा उद्देश होता आणि आतां त्यांचा हेतू साध्य झाला होता.

              याच काळात आणखी एक वार्ता कळली.इंद्रप्रस्थाचे राज्य अनिरुध्द-रोचन पुत्र व्रजाला देण्यात यावे असे वचन कुंतीने युधिष्ठीराकडून घेऊन, विधिवत आश्वासक पत्र तयार करवून घेतले. द्वारका साम्राज्य भरभराटीत असतांना, द्वारकेचा वारस ब्रज असतांना कुंतीदेवींनी इंद्रप्रस्थाचा भावी वारस व्रजाला कां घोषित करावे? हस्तिनापूर साम्राज्यासाठी स्वामींनी केलेल्या अनमोल मदतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कां? कां? कां?

             कुंतीदेवी अंतर्यामी होत्या का? द्वारकेचे भविष्य त्या जाणत होत्या कां? नियती म्हणून त्यांनी सर्व स्विकारले होते का? आणि रुख्मिणीच्या मनात लख्खन वीज चमकली. मग स्वामी पण अंतज्ञानी होते. कांही प्रसंगी त्याच्या अंतर्शक्तीचे प्रत्यंतरही आले होते. स्वामींचे आंतरिक रुप, आंतरदर्शन कांही अंशी, अवधूत पदवी मिळालेले महान योगी उध्ववजी, या योगेश्वराला कांही प्रमाणात जाणत होते. आणि मी? मी स्वामींना जाणण्याचा प्रश्नच कुठे येतो? मी आणि स्वामी देहाने वेगळे असलो तरी मनाने एकच होतो. स्वामींना अंतर्ज्ञान होते. भविष्यही जाणत होते पण त्यांनी आपल्या या दिव्य शक्तिचे प्रदर्शन कधीच केले नाही. नरजन्म घेतला आहे तर,नियतीचे वर्चस्व मानून सामान्य म्हणूनच वावरले. प्राक्तनातले भोग, उपभोग, संकटे, दुःख, आनंद सारेच भोगले म्हणूनच त्यांना पुरुषोत्तम म्हणतात. महाभारतीय युध्दानंतर दोन तपे उलटून गेली. पुत्र,पौत्रही प्रौढाकडे झुकले होते. सांब आणि कांही राजपुत्रांचा वांढपणा वाढत्या वयाबरोबर   वाढतच होता.सर्व सुरळीत चालले होते पण ती वादळापूर्वीची शांतता होती.

                         क्रमशः
   संकलन  व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. १०-६-२०२२.

39

*!!!रूख्मिणी भाग-३९!!!*

        स्वामी निर्लेप झाल्यामुळे त्यांनी राजकारभारातून पूर्ण अंग काढून घेतले होते. बलरामदादांनीही सर्वावर आंधळा विश्वास टाकला होता. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. द्वारकावासियांचे सामाजिक, आर्थीक, कौंटुबिक जीवन आतून दुर्गुणांच्या वाळवीने पोखरले जाऊ लागले. अशातच द्वारकेत व्यासांचे आगमन झाले. ते एक विलक्षण बहुआयामी व्यक्तीमत्व होते. सडेतोड बोलणे त्यांचा स्वभाव होता. द्वारकेतील नीतिमत्तेच्या विस्काळलेल्या घडीविषयी चर्चा झाली संबंधीत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली आणि ते आले तसे निघून गेले.

              रुख्मिणीला अनमोल ध्येय साध्य करण्यासाठी भारी मोल चुकवावं लागले होते. स्वामींची प्राप्ती झाल्याने जीवन कृतार्थ झाले. पण त्याचवेळी तिला जन्मभूमी, मातापिता,बंधू, सख्याचा विरह दीर्घकाल सहन करावा लागला. पुत्र झाल्याचा आनंद पुरते पांच दिवसही उपभोगता आला नाही.लगेच पुत्र विरहाचे दुःख पचवावे लागले. स्वामींची प्राप्ती झाली पण ते सदैव द्वारकेबाहेर असल्यामुळे विरहही सहन करावा लागला.

                  महर्षी व्यास आणि घोरअंगिरसांच्या आगमना नंतर दुर्वासऋषी द्वारकेत आले. त्या उग्र तपस्व्याचे मन सांभाळणे म्हणजे सुळावरची पोळी. या कोपिष्ट तपस्व्याच्या अनपेक्षित आगमनाने सर्वांचीच त्रेधा उडाली. आपल्या पुत्र, पौत्र, कन्या, स्षुनांना त्यांंच्या दर्शनाला नेले. रुख्मिणीला आशिर्वाद देत म्हणाले, तुला मनःशांती, मुक्ती लाभेल. कृष्णा प्रमाणेच तुझे दिव्य रुप या पृथ्वीवर युगानुयुगे कर्तव्यपालना साठी जन्म घेत राहील.नंतर स्वामींकडे वळून म्हणाले,उदईक सोमनाथकडे जाईन तिथं प्रभासपाटणाला कांही धार्मिक विधी व एक स्वश्राध्द करायचे आहे. तेव्हा प्रभासक्षेत्री माझ्या कार्य सिध्दीसाठी सुयोग्य व्यक्तीस पाठव म्हणून ते आपल्या निवास स्थानाकडे निघून गेले.

            रुख्मिणीला तपस्वींचा आशिर्वाद आठवला. ” सर्व शक्तीमान भव ” असे कां म्हणाले? एवढा शक्तीवान पुरुष माझा पती असतांना असे उद्गार कां काढले? कसली शक्ती? आणखी विघ्नं येणार आहेत की काय? शंकेची पाल चुकचुकली. पण लगेच दुसरे मन म्हणाले, स्वामी जर शांत मनाने नियतीला स्विकारु शकतात तर आपण कां नाही? सारा भार प्रारब्धावर, त्यांचेवर टाकून मुक्त कां राहू नये?

              उध्ववा, तू गुरुवर्षांच्या कार्यसिध्दीकरितां प्रभास पाटणला मुलांपैकी सहाय्यार्थ कोणी येत असेल तर त्यांनाही घेऊन जा. ते कक्षात आल्यावर जांबवंतीपुत्र सांब त्यांच्याकडे येऊन विनयाने म्हणाला, काका! मी आणि कांही बंधू प्रभास क्षेत्री येऊन गुरुवर्यांना सहाय्य करण्याची इच्छा आहे. सांबचे वर्तन पुर्ण जाणणार्‍या उध्ववजींना अतिशय नवल वाटले. आणि त्याचेकडे शासंकतेने पाहिल्यावर मन्र स्वरात म्हणाला, माझा कांही कुटील डाव असेल अशी शंका तुम्हाला येत असेल ना? पण विश्वास ठेवा, मी व माझ्या बंधूंनी स्वभावात बदल करण्याचे ठरवले आहे. एकदा संधी द्या.

              सांब ऊत्तम नाटकी व नकलाकार होता. कितपत विश्वास ठेवावा? शेवटी एक संधी द्यायचा निर्णय उध्ववजींनी घेतला. आणि प्रभासक्षेत्री येण्याची संमती दिली. आणि तसे त्यांनी रुख्मिणीला कळविले. महर्षींच्या कार्यसिध्दतेसाठी, ऊध्ववजी,सांब व त्याचे बंधू प्रभासपाटण क्षेत्री पोहोचले. प्रारंभी या पोरांनी कामात भाग घेऊन गोमयाचे शिंपण,वगैरै अनेक लहान सहान कामे उत्साहाने पार पाडल्यामुळे, दुर्वासऋषी व त्यांचे शिष्यगगण समाधान पावले.श्रीकृष्णाचे आज्ञापालन उत्तमरित्या पार पडल्याच्या आनंदात उध्ववजी होते.

           सर्व विधीसंस्कार आटोपल्यावर, दुर्वासऋषींचा आशिर्वाद सर्वांनी घेतला.तेवढ्यात सांब गर्भार स्रीचे सोंग वठवून, तोंड झाकून आशिर्वाद घेण्यासाठी त्याच्या समोर येऊन मोठ्या कष्टाने वाकून नमस्कार करत असतांना त्याचा सख्खा भाऊ म्हणाला, हिला पुत्रप्राप्ती व्हावी असा आशिर्वाद द्यावा. त्याच्या मुद्रेवरचे खट्याळ भाव पाहून दुर्वासांना शंका आली. त्यांनी सोंग घेतलेल्या सांबरुपी स्रीला सरळ उभे राहण्यास सांगीतल्या बरोबर तिच्या वस्रातून मुसळाचे तुकडे खाली पडले.

                      क्रमशः
   संकलन व  © ®  मिनाक्षी देशमुख.
                    दि. १०-६-२०२२.

40

*!!!रूख्मिणी भाग-४०!!!*

                अखेर जे नको घडायला तेच घडले. सांब कंपनीच्या हास्याच्या लाटेने  दुर्वासऋषी क्रोधाने लालीलाल झाले. जणूं भडकलेला ज्वालामुखीच भासू लागले.उपस्थितही स्तब्ध झाले महर्षी दुर्वासऋषींच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. हे यादव कळातील कुपुत्रा, तुझ्या या उदरातील मुसळानेच तुझा व यादवकुळाचा संहार आणि निर्वंश होईल. उध्ववजींनी क्षमा याचना केली पण व्यर्थ! महर्षी शिष्यांसह पाठ फिरवून निघून गेले. उध्ववजी हतबल झाले, कोणत्या तोंडाने कृष्णदादासमोर जाऊ? पण सत्य सांगणे तर भाग होते. त्या मुसळाचे तीन तुकडे श्रीकृष्णाला दाखवावे, जेणेकरुन ते आपल्या सामर्थ्याने हे महासंकट टाळू शकतील, असे वाटून, तुकडे घेण्यासाठी सांबकडे गेले असतां कळले, त्या मुसळाचे चूर्ण करुन समुद्रात फेकून दिले. मुळच नष्ट केल्यावर आतां कसली भीती?अस्वस्थ मनःस्थितीत उध्ववजी द्वारकेत परतले. स्वामींपुढे अपराधी मनाने उभे राहत घडलेली दुर्दैवी घटना सांगीतल्यावर, शांतपणे स्वामी म्हणाले, अवधूता, तूं सारे जाणतोस, जे घडणार आहे ते अटळ आहे. फक्त गवगवा नको होउ देउस, फक्त रुख्मिणीला सांग. नियतिचा खेळ समजण्याचे आणि पेलण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच आहे.

                वरवर बघतां द्वारकावासियांचे जीवनक्रम सुरळीत असल्यासारखे दिसत असले तरी, समाजजीवन आतून पोखरले होते. नवी तरुण पिढी व्यसनाधीन झाली होती. कितीही बंधने घातले तरी चोरुन लपून मद्यप्रसार वाढला होता. आतां या गोष्टी लपून राहिल्या नव्हत्या. वेळ केव्हाच निघून गेली  होती. विनाशाचा काळ व वेळ जवळ आली होती. भविष्यातील  द्वारकेच्या विनाशाची चाहूल लागली होती. नियतीपुढे सारे हतबल झाले होते. उध्ववजी रोज महत्वाच्या घटनांचा वृतातं रुख्मिणीला देत असत. त्यादिवशी ते अत्यंत अस्वस्थ मनःस्थितीत आलेले बघून विचारले, भावजी काय झाले? स्वामी ठीक तर आहेत ना? दादा चांगला आहे वहिनी, पण भविष्यात घडणार्‍या अशुभ अमंगल घटनांचे संकेत मिळत आहे. म्हणजे? प्रभासपाटणला दुर्वांसांनी दिलेल्या शापवाणीची फळे दिसूं लागली आहे. सांब आणि त्याच्या बंधूंनी सागरात जिथे मुसळाचे चूर्ण करुन टाकले होते,त्या ठीकाणी लोहासारखी टोकदार व धारदार गवताची तीष्ण पाती उगवली आहे. हाताने तुटत नाही, त्याचा स्पर्श झाला तरी रक्त येते. म्हणजे भयानक अंतिम समय जवळ आला आहे तर? हे परमेश्वरा! पीढच्या पिढीचा अंत बघण्याचे दुर्दैव वाट्याला नको येऊ देऊस! ऊध्ववजी कधीच निघून गेले.

             अश्विनी पोर्णिमा! शरदऋतुतील आल्हादकारक रम्य दिवस.या दिवशी रासक्रीडा खेळून द्वारकाधीश सर्वांना आनंद देत. या दिवसाला अनन्यसाधारण महत्व होते. पण तोच शुभ दिन आज द्वारकावासीयांसाठी अशुभ ठरेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.यावर्षीची रासक्रीडा द्वारकावासींयासाठी मृत्युची रासक्रीडा ठरली.

             अलिकडे स्वामी रासक्रीडा किंवा अन्य सामाजिक समारंभात भाग घेत नसत.त्यांचा जास्तीत जास्त वेळ,ध्यान धारणा व मौनव्रतातच व्यतीत होत असे. त्यामुळे आजच्या रासक्रीडेत त्यांनी जाण्याचा प्रश्नच नव्हता. बलरामदादांना मात्र कार्यकारी शासक म्हणून जाणे भाग होते. रासक्रीडा इच्छुक प्रभासपाटणला निघून गेले. मानकर्‍यांसह दादाही गेलेत. गोरसाचा नैवद्य चंद्राला दाखवण्याचा कुळाचार पाळायचा होता  म्हणून रुख्मिणी जाण्यासाठी बाकी राण्यांकडे गेली तर, रेवतीताईसह सर्व राण्या सत्यभामेच्या कक्षाबाहेर उभ्या दिसल्या. अगऽ! एवढ्या निश्चिंत उभ्या कां? आपल्या नाती, सुनांचे कौतुक बघायला जायचे नाही का? रेवतीताई म्हणाल्या रुख्मिणी, आज फारच उदास वाटतेय, जायची मुळीच इच्छा नाही. याच अर्थाचे सार्‍याचजणी बोलल्या. रासक्रीडेला जायची कुणाचीच इच्छा नव्हती. सर्वजणी आपापल्या कक्षाकडे निघून गेल्या. रुख्मिणीही तिच्या कक्षात परतली. सर्वांचेच चित्त उदासितेने भरलेले होते. एखाद्या भयंकर घडणार्‍या घटनेची पूर्व सूचना तर नव्हती ना?

                       क्रमशः
     संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. १०-६-२०२२.

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading