रूख्मिणी चरित्र भाग ७, (३१ ते ३५)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

*!!!रूख्मिणी भाग-३१!!!*

                कौरवसैन्य विराटनगरीच्या सीमेपर्यत येऊन पोहचले होते. प्रथम त्यांनी गोधन पळवून नेण्यास सुरुवात केली. त्या अज्ञातवासाच्या एका वर्षात प्रत्येकाने आपापल्या भूमिका वेगवेगळ्या नांवाने व वेषाने पार पाडल्या होत्या. विराट नगरीची पट्टराणी सुदेष्णेची सैरंघ्री नावाने दासी बनून तिचा साजश्रृंगार करण्याचे काम द्रौपदी करीत होती. राणीचा बंधू किचक हा तिच्या सौंदर्यावर अनुरक्त झाला होता. तो अतिशय कपटी दुष्ट,धूर्त असून त्याने प्रजेवरही वचक बसवला होता. त्याची वाईट नजर द्रौपदीवर होती ही गोष्ट तिने आपल्या पांचही पतींच्या निदर्शनास आणून दिली असल्यामुळे ते, विशेषतः भीम गुप्तपणे किचकवर नजर ठेवून होता. अज्ञातवासाचे अंतिम दिवस जवळ आले होते आणि किचकचा उच्छाद वाढतच होता  त्याला आवर घालणे द्रौपदीला कठीण जात होते. एके दिवशी द्रौपदीला रात्री भेटीसाठी सज्ज राहण्यास सांगीतले ही गोष्ट तिने आपल्या पतींच्या कानी घातली. भीमाचे रक्त तापले. तिला म्हणाला, तूं त्याचेवर अनुरक्त असल्याचे नाटक करुन होकार दे. त्याचा विनाश अटल आहे. आजरात्री प्रथम घटकेला आपला अज्ञातवासाचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे आपले खरे स्वरुप उघड झाले तरी हरकत नाही.

             ठरल्याप्रमाणे रात्री किचकाचा वध झाला. विराट राज्याच्या सेनापती किचकवधाची बातमी वार्‍यासारखी पसरली. अज्ञातवास संपल्यामुळे, सर्वजण आपल्या मुळ रुपात प्रकट झाले. या आश्चर्यकारक घटनांनी राजकुळ आणि आम जनता दिडःमुढ झाले. स्वतः विराट नरेशला अतिशय वाईट वाटले. येवढे शूर पांडवांनी आपल्याकडे चाकरी केली. त्यांनी या बंधूंना व कृष्णेला आदराने वंदन केले. किचकला संपवल्याबद्दल भीमाला सर्वांनी धन्यवाद दिले. सर्व पांडव बंधूंनी लोकांना शांत करीत म्हणाले, आपल्याकडे वेळ फार थोडा आहे.आमच्यामुळे कौरवसेना तुमच्या राज्यावर चालून येत आहे. गोधन पळवण्यास प्रारंभही झाला. त्यांचे पारिपात्य करणे आमचे आद्य कर्तव्य आहे.एखाद्या वादळासारख्या धडकलेल्या पांडवांच्या नेतृत्वाखाली विराटसेनेच्या हल्ल्याने कौरवांची त्रेधा उडाली. कौरवांचा पराभव झाला.विराटांचे गोधन परत मिळाले.त्या दिवशी विराटनगरीत विजयोत्सव साजरा झाला म्हणून या तिथीला विजयादशमी नांव प्राप्त झाले.

             पार्थाच्या पराक्रमावर खुश होऊन विराटराजाने आपली कन्या उत्तराला स्विकारण्याची विनंती अर्जुनाला केल्यावर, अर्जुन म्हणाला, उत्तरा माझी शिष्या असल्यामुळे, ती मला कन्येच्या ठीकाणी आहे. तुमची हरकत नसेल तर माझा पुत्र अभिमन्युसाठी विचार करावा. विराटराजा आनंदाने तयार झाले.आणि थाटामाटात अभिमन्यु-उत्तराचा विवाह संपन्न झाला.

              पांडवांनी विराटनगरी सोडून उपलव्याला वास्तव्य केले. कृष्णाच्या सांगण्यावरुन ठरल्याप्रमाणे इंद्रप्रस्थात पुनरागमन करीत असल्याचा संदेश देऊन विराटराजाने दूत दुर्योधनाकडे पाठवला, पण उत्तर आले नाही म्हणून परत दूत पाठवण्यात आला, तर दुर्योधनाकडून संजयाकरवी निरोप पाठवला, त्यांना वनवासाची संवय झालेली आहे तेव्हा सत्तेचा मोह कशाला? धर्मकार्य, इशचिंतनात जीवन व्यतीत करावे.हा  संदेश ऐकून पांडवांचा क्रोध अनावर झालाच पण सर्वात जास्त द्रौपदी संतप्त झाली. श्रीकृष्णाने तिला शांतवत म्हणाले, मी स्वतः हस्तिनापूरला जाऊन सर्वांना समजावतो, उपयोग नाहीच झाला तर युध्द अटळ आहे.जिवितहानी व वित्तहानी टळावी म्हणून समोपचाराने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे.

            दूताकरवी सार्‍या घटना द्वारकेत कळत होत्या. श्रीकृष्ण हस्तिनापूरला जाणार म्हणून रुख्मिणी चिंतीत झाली. कारण शकुनी, दुर्योधनाची कपटी, दुष्ट प्रवृत्ती तिला ज्ञात होती. तिने उध्ववजींना बोलून दाखवल्यावर ते म्हणाले, वहिनी! व्यर्थ चिंता नका करु. दादा जन्मतःच बंधनमूक्त आहे. आतांपर्यत कित्येक शत्रु त्याच्या जीवावर उठले पण….दादा द्रष्टा आहे. पुढील घटनांची त्याला पूर्ण कल्पना आहे.पण कोणताही निर्णय पायरीपायरिने कसा घ्यायचा हा आदर्श तो घालून देत आहे. दीराशी चर्चा झाल्यावर तिच्या मनातील संशय फिटला. तिला कां पतीचा पराक्रम माहित नव्हता? पण एका पत्नीचे वेडे मन बुध्दीवर मात करत होते. नियतीवर सोडून ती नित्य कर्माला लागली. ती अस्वस्थ झाली की, घटका नी घटका सागराशी संवाद करणे हा तिचा नेहमीचाच छंद होता.

           उत्तरेची स्थिती किती वाईट होती. बलाढ्य पांच सासरे असूनसुध्दा त्यांना हक्काची भूमी नव्हती. बलाढ्य सासर्‍यांची सून असूनही आज तिला दूर इथे द्वारकेत येऊन राहावे लागत आहे.

                    क्रमशः
    संकलन व © ®   मिनाक्षी देशमुख.
                  दि. ८-६-२०२२.

32

*!!!रूख्मिणी भाग-३२!!!*

               द्वारकेत सर्वांचे लक्ष हस्तिनापूरहून येणार्‍या वार्तेकडे व श्रीकृष्णाच्या आगमनाकडे लागले होते. रुख्मिणी द्वीपावरील नित्यकर्मे नियमित करत असली तरी मन मात्र पतीकडे होते. संपली एकदाची प्रतिक्षा! वार्ता आली, श्रीकृष्णाची शिष्टाई असफल झाली. त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्नही असफल झाला. आतां युध्द हा एकच पर्याय उरला होता.

              वरवर बघता हे युध्द फक्त कौरव-पांडवातील असले तरी केवळ सत्तेसाठी,

भूमीसाठी, दोन गटातील युध्द नव्हते तर हे धर्मयुध्द होते. हे युध्द होते सत्य-असत्य, न्याय-अन्यायातील मानवातील वर्तमान आणि भविष्यकाळातील कल्याणासाठी लढले जाणारे अद्वितिय होते.

               हस्तिनापूरहून कृष्ण उपलव्याला जाऊन पांडवांना संपूर्ण वृतांत सांगीतला. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही भूमी पांडवांना देणार नाही हे दुर्योधनाचे उद्दाम उद्गार ऐकून पांडव क्रोधाने पेटून उठले. युध्द अपरिहार्य आहे हे निश्चित झाल्यावर पुढील हालचालींना वेग आला. युध्द प्रारंभ मूहूर्त, युध्दाचे स्थान, अटी हे सर्व ठरवण्यात आले.युध्दाचा मुहूर्त मार्गशीर्ष वद्य द्वीतिया आणि स्थान कुरुक्षेत्र ठरवून श्रीकृष्ण द्वारकेत परतले. त्यांनी सुधर्मा राजसभा भरवून आपले विचार स्पष्ट करुन म्हणाले, मी नेहमी सत्याची व न्यायाची बाजू घेतो तशीच यावेळीही घेणार आहे. द्वारका या गणराज्यातील प्रत्येक व्यक्ती ला कोणत्या पक्षाच्या बाजूने युध्दात भाग घ्यायचा किंवा तटस्थ राहायचे यासाठी संपूर्ण स्वातंत्र आहे.सभा संपली.

              रुख्मिणीची मनःस्थिती मात्र द्विधा झाली. एकीकडे स्री म्हणून द्रौपदीची सूडाची भावना योग्य वाटत होती. भर सभेत तिच्या स्रीत्वाची विटंबना करण्याचा अमानुष प्रयत्न केला होता, या अपराधाला क्षमा नव्हती. तडजोडीला वाव नाही हे तिला मनापासून मान्य होते. तर दुसरीकडे जय- पराजय कुणाचाही झाला तरी हे महायुध्द म्हणजे दोन्हीकडील प्रचंड प्राणहानी, वित्तहानी, अनेक स्रीयांच्या बांगड्या फुटणार, अनेक बालके पोरकी होणार, अनेक माता निराधार होतील. अनेक संसार उध्वस्त होणार हे भीषण चित्र नजरेसमोर आल्या वर नुसत्या कल्पनेने काळीज थरारुन उठले.

          विचार करुन उपयोग नव्हता. सर्व कांही नियतीच ठरवणार होती. एकीकडे शसस्र सेना, तर दुसरीकडे फक्त मी! तेही निशस्र असेन, असे श्रीकृष्णाकडे आलेल्या दुर्योधनाला  व अर्जुनाला सांगीतल्यावर  क्षणाचा विलंब न लावता अर्जुनाने श्रीकृष्णाचे पाय घट्ट धरुन म्हणाला, आम्हाला फक्त तूंच हवास दुर्योधनाला अतिशय आनंद झाला. शस्रविहिन एकटा श्रीकृष्ण आपल्या बाजूस घेण्यापेक्षा त्याची प्रचंड सेना मिळेल या कल्पनेनेच त्याला हर्षाच्या उकळ्या फुटु लागल्या.

बलरामदादा मात्र तटस्थ राहून हिमालयाकडे तीर्थयात्रेला जाण्याचा मार्ग स्विकारला.

               रुख्मिणीलाही श्रीकृष्णाबरोबर युध्दभूमीवर जावेसे वाटत होते. पण महाराणी असल्यामुळे तिला द्वारकेची व्यवस्था पाहण्यासाठी, कर्तव्यपूर्तीसाठी द्वारकेतच राहण्यास अग्रक्रम दिला. बलरामदादा व उध्ववजी हिमालत जाणार, सेनापती, जेष्ठ, श्रेष्ठ रथी महारथी युध्दावर जाणार, मग द्वारके च्या रक्षणाचे काय? हा प्रश्न उपस्थित झाल्यावर, प्रद्युम्न नम्र पणे पुढे येऊन म्हणाला, तात, काळजी करु नका. आम्ही सारे बंधू माता  रुख्मिणीच्या मार्गदर्शनाखाली प्राणपणाने द्वारकेचे रक्षण करु. रुख्मिणीचे ह्लदय भरुन आले.

             युध्दभूमीकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रीकृष्ण प्रत्येक पत्नीकडे स्वतः जाऊन निरोप घेतला. शेवटी रुख्मिणीकडे आल्यावर तिचे हात हातात घेऊन म्हणाले, रुख्मीणी, तुला कांही सांगायची गरज आहे असं वाटत नाही. जीवन म्हणजे काय? युध्द काय? निर्मिती, वृध्दी, अंत आणि लय म्हणजे काय हे तू जाणतेसच! तिच जाण ठेवून विश्वाला संदेश देण्यासाठी निःशस्र सारथी होऊन जात आहे. द्वारकेची मला चिंता नाही. ती तूं माझ्यापेक्षाही जास्त सक्षमतेने व प्राणपणाने रक्षणकर्ती होऊन  सांभाळशीलच! तूं अनभिषिक्त महाराणी असलीस तरी, खरीखूरी महाराणी आहेस हे मी जाणतो. तुला माझ्यासाठी, मला जपण्यासाठी यायचे होते पण द्वारकेसाठी कर्तव्यकठोर होऊन इथे राहणे जास्त आवश्यक आहे आणि तिला हसत मुखाने निरोप दिला.

             ठरलेल्या मुहूर्तावर इडादेवीचे दर्शन घेऊन, निवडक लोकांना बरोबर घेऊन श्रीकृष्ण द्वारकेबाहेर पडले. रुख्मीही मागचे सारे विसरुन, आपल्या बंधूसहित सेना घेऊन कुरुक्षेत्र गाठले पण नियमानुसार युध्दभूमीवर आगमनाचा कालावधी उलटून गेल्यामुळे, दोन्हीकडच्या सेनापतींनी युध्दात भाग घेण्यास नकार दिल्यामुळे निराश मनाने कौंडण्यपुरी परतावे लागले. त्याला तर वाईट वाटलेच, पण रुख्मिणीला जास्त वाईट वाटले. आपल्या पराक्रमी भावांना युध्दात भाग घेण्याची संधी न मिळाल्याने तिला अपार दुःख झाले.

                         क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. ९-६-२०२२.

33

*!!!रूख्मिणी भाग-३३!!!*

              दूताकरवी वार्ता आली, दोन्हीकडचे सेनापती, पराक्रमी सम्राट ससैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. धनुर्धर पार्थाच्या नंदीघोष रथावर स्वामी सारथी म्हणून उपस्थित होते. जे प्रत्यक्ष विश्वरथाचे सारथ्य करतात ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले होते. रुख्मिणी आपल्या अतर्क्य पतीचे अनेक रुपे नजरेसमोर येत होते. जांबवंतीसारख्या आदिवासी स्रीशी विवाह करुन, विश्वाला समतेचा धडा देणारा, सर्व जेष्ठ, श्रेष्ठांचा आदर करणारा, सोळा सहस्र स्रीयांचा आधार होऊन, आदर करणारा, आपल्या आठही राण्यांना योग्य न्याय देणारा आदर्श पती, अनेक क्रूर सम्राटांचा पराभव केल्यावरही मिळवलेले राज्य त्यांच्याच पुत्रांना सोपवणारा, सत्तेचा तिळमात्र मोह नसलेला, निर्लेप वृत्तीचा युगंधर, सर्व भोगाचा भोग घेऊन तरीही अनासक्त असलेला हा जन्मोजन्मीचा अभोगी, अशी कितीतरी रुपे तिच्या दृष्टीसमोर तरळली. तिला कृष्णाच्या अनेक रुपांचे दर्शन घडले. जळी,स्थळी,काष्टी, पाषाणी, ध्यानी मनी तिला दर्शन घडत होते.कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष .कधी रुपमय,कधी गंधमय, कधी नाट्यमय, कधी ध्यासमय तर कधी भासमय दर्शन घडत असे.तिचे ह्रदय पुन्हा पुन्हा कृष्णमय होऊन भावविश्वात विचरण करीत असे. सांगायचे म्हणजे, ती जरी कृष्णाची अर्धांगिनी असली तरी ते मात्र तिचे पुर्णांग आहेत.

           एके दिवशी अनपेक्षित वार्ता दूताने आणली आणि सर्वांना धक्काच बसला. युध्दभूमीवर दोन्हीकडील सैन्य, सेनापती समोरासमोर युध्दासाठी सज्ज झालेले, व्यूहरचना, युध्दभूमीचे पुजन झाल्यावर आतां श्रीकृष्ण पांचजन्य शंख फुंकणार तोच दुःख, निराशा, विषाद अशा अनेक मनोविकारा चे प्रतिबिंब चेहर्‍यावर उमटलेला अर्जुन आवेगाने ओरडला, थांब माधवा.. थांब.. युध्दाला प्रारंभ नको करुस. एकाएकी काय झाले म्हणून सारेच आश्चर्यचकीत झाले. श्रीकृष्ण शांत होते. खरेच, त्यांना सारे विश्व अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखतात ते किती सार्थ आहे. द्वारकाधीश म्हणून ओळखले जाणारे या पृथ्वीवरील कोणत्याही राज्याचे राजे नव्हते. कोणतेही सुवर्ण किंवा रत्नजडीत सिंहासन नव्हते तरी प्रियजनांच्या ह्रदयात त्यांचे मुल्य अनमोल होते. दूत पुढे सांगत होता, श्रीकृष्ण पार्थाजवळ जाऊन म्हणाले, काय झाले पार्था? ऐनवेळी पराक्रमी वीराने माघार घेण्याचा मतलब काय? माधवा केवळ एका राज्यासाठी नीतिनियम मोडू का? ज्यांच्या अंगा खांद्यावर बालपण गेले, ज्या गुरुंनी विद्या देऊन इथपर्यत आणले, समोर असलेले लक्षावधी सैन्य, ज्यांचा कांहीही दोष नसतांना मृत्युच्या खाईत लोटु का? कशासाठी तर, आम्हाला न्याय मिळावा म्हणून? आमचं राज्य परत मिळावं म्हणून? नाही माधवा! जेष्ठ वंदनीय विभूतींच्या आणि अगणित जीवांच्या मोबदल्यात मिळालेली ही रक्तलांच्छीत सत्ता आम्ही उपभोगू शकू का? केशवा! त्यापेक्षा आजन्म वनवास किंवा संन्यासी जीवन पत्करु, पण हा विनाश नको.

               महाराणी, मग भगवान श्रीकृष्णांनी पार्थाला आत्मतत्व, आत्मसत्य स्वरुप, अमरत्व त्याचं अविनाशत्व उलगडून दाखवलं. जन्माला आलेल्या प्रत्येकाने धर्मपालन करणे, क्षत्रियाचा धर्म आहे न्यायासाठी युध्द करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येकाने स्वतःचा उध्दार स्वतः करायचा असतो. नंतर द्वारकाधीशाने विषादयोग पासून पुरुषोत्तमयोग सहित अठरा योग सांगीतले. ज्या काळाला आदी, अंत नाही अशा अनादी काळाचा अर्थ समजावून सांगीतला. प्रत्यक्ष कृष्णाने पार्थाला विश्वरुप दर्शन दिले. आणि पार्थाच्या नेत्रांतुन अश्रूंचा पूर लोटला. पार्थाच्या मनावरचं अज्ञानाचं धूकं दूर करुन दिव्यत्वाची जाणीव करुन दिली. आणि पार्थ म्हणाला, हे योगेश्वरा, युगंधरा, मी क्षत्रिय धर्म पाळण्यास सज्ज आहे. तू  पांचजन्य फुक! क्षणात युध्दभूमी चैतन्यमय झाली. दूत निघून गेला. रुख्मिणीसह सारेच भारावून गेले.

           रुख्मिणी विचार करु लागली, पार्थ केवळ निमित्यमात्र.

त्याच्या निमित्याने संपूर्ण विश्वाला मानवताची शिकवण देऊन, युगानुयुगे कल्पांतापर्यत मानवी जीवनाला दीपस्तंभापर्यत मार्गदर्शक ठरणार होते. तिला प्रश्न पडला, स्वामी नारायण तर, मी कोण? नेमके माझे रुप कोणते?

            कधी हे युध्द संपेल? आणि स्वामींचे दर्शन घडेल? तोच तिला स्कंधावर स्पर्श जाणवला. शब्द कानावर उमटले, रुख्मिणी तू आणि मी वेगळे आहोत का? मि योग्यवेळी येणारच आहे. तोवर तू सगळ्यांना आधार दे. तू सार्‍यांची अनभिषिक्त महाराणी आहेस.

                            क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ९-६-२०२२.

34

*!!!रूख्मिणी भाग-३४!!!*

           रोजची युध्दवार्ता कळत होती. वेगवेगळ्या व्यूहरचना केल्या जात होत्या. रक्ताचे पाट वाहत होते. धारातीर्थी पडलेल्या वीरांचे ढीग साचत होते. दहाव्या दिवशी तपस्वी, जेष्ठ कुरुवंशीय पितामह भीष्मांचा देह शरतृणांवर पडला. दक्षिणायण सुरु असल्यामुळे व इच्छामरणी असल्यामुळे, उत्तरायण सुरु होईपर्यंत  त्यांनी प्राण रोखून धरला होता. तेराव्या दिवशी अतुलनीय पराक्रम करुन द्वारकाधीशांचा लाडका भाचा अभिमन्युचा कपटाने, अपमानकारकरित्या, युध्दाचे सारे नीतिनियम धाब्यावर बसवून, मुर्च्छितावस्थेत असतांना दुर्योधन व पुत्र लक्ष्मणाने त्याचा वध केला.त्याहीपेक्षा लाजिरवाणे कृत्य केले जयद्रथाने.त्याच्या कलेवरावर लत्ताप्रहार केला. हे कळल्यावर संतप्त अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सुर्यास्ताच्या आत जयद्रथ वध किंवा अग्निप्रवेश करेन. आणि श्रीकृष्णाच्या युक्तीने गांडीव धनुष्यातून निघालेल्या शराने जयद्रथ खाली कोसळला.

               हा वृतांत ऐकून रुख्मिणी जागीच थिजून गेली. बालपणापासूनच्या अभिमन्युच्या कितीतरी स्मृती उचंबळून आल्या. सतत मामी.. मामी करणारा अभी आतां कधीच दिसणार नव्हता. आणखी किती भयंकर वार्ता ऐकायला मिळणार आहे? हेच ते महाभारत असेल का?

          सोळाव्या दिवशी गुरु द्रोणाचार्यही पडले. सतराव्या भीमाने केलेली प्रतिज्ञा खरी केली. दुःशासनाचा क्रूरपणे वध करुन त्याच्या रक्ताने द्रौपदीची वेणी गुंफली. ज्या ज्या व्यक्तींनी तिच्या स्रीत्वाला डिवचले, तो प्रत्येकजन संग्रामयज्ञात बळी जात होता. भविष्यात या घटनांमधून मानवजातीने एक धडा घ्यावा, स्री जातीचा, स्रीत्वाचा अपमान करणार्‍याला अंती विनाशाच्या खाईकडे जावेच लागते.

                 सतराव्या दिवशी अतुल पराक्रम करीत असतांना कर्णाचा रथ चिखलात रुतल्यामुळे तो रथाखाली उतरला असता श्रीकृष्णाच्या आज्ञाने पार्थाने अभेद्य अस्रांचा वर्षाव केल्याने कर्ण निष्र्पाण होऊन कोसळला. जाताजाताही कर्णाने आपला सुवर्ण दात दान करुन गेला.एका तेजपर्वाचा अंत झाला.

             युध्दाच्या शेवटच्या म्हणजे अठराव्या दिवशी दुर्योधन पक्षातील महत्वाच्या व्यक्ती धारातीर्थी पडल्या. विशेष म्हणजे महायुध्दाला कारणीभूत ठरलेली व्यक्ती शकूनी सुध्दा. सूर्यकुंड सरोवरात लपलेल्या दुर्योधनाशी गदायुध्द करुन भीमाने, श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्याच्या मांडीवर प्रहार केल्यावर तो खाली कोसळला. अंत समोर दिसत असून सुध्दा त्याचा अहंकार, सूड भावना कमी झाली नव्हती. त्याने द्रोणपुत्र अश्वत्थामाला सेनापती करुन पांडवांचा निर्वंश करीन असे वचन घेतले..

        युध्द संपलेसे वाटल्याने थोडे निश्चिंत होऊन थकलेले सारे निद्राधीन झाले असतां अश्वत्थामाने अर्ध्यारात्री द्रौपदीचे पांच पुत्र, भाऊ धृष्टद्युम्न यांचा अतिशय अमानुषपणे वध केला. वृत्त कळतांच द्रौपदी दुःखाने, त्वेषाने पेटून उठली.ज्या अश्वत्थामाने माझ्या पांच पुत्र व बंधूचा वध केला, त्याचा वध करुन त्याच्या मस्तकावरचा मणी आणेपर्यंत मी अन्नजल ग्रहण करणार नाही भीमाने त्याला शोधून त्याच्या मस्तकावरचा मणी द्रौपदीला आणून दिला. व गुरुपुत्राच्या वधाचे पातक माथी येऊ नये म्हणून त्याला जीवदान दिले. पांडवांचा अंश उत्तरेच्या पोटी वाढत आहे हे जाणून त्याने तिच्या गर्भावर ब्रम्हास्र सोडले.पण श्रीकृष्णाच्या योगशक्तीने गर्भ सुरक्षित राहिला. उत्तराचा गर्भ सोडून पांडवांची पुढील पिढी नष्ट झाली होती.

             अठरा दिवसांच्या घनघोर संग्रामाची समाप्ती झाली. आतां रुख्मिणीला वेध लागले होते श्रीकृष्ण येण्याचे. पण थोडा अवधी होता. युध्दात वीरगती प्राप्त झालेल्यांना तिलांजली देऊन कौरवसम्राट धृतराष्र्ट व महाराणी गांधारीला भेटून येणार होते.

            महायुध्दातील पांडवांच्या विजयामुळे स्वामींची पर्यायाने द्वारकेची कीर्ती सर्वीकडे दुमदुमत होती. द्वारका साम्राज्याशी मैत्री व्हावी म्हणून आर्यवर्तातील अनेक राजांकडून मौल्यवान उपहार, विविध शस्रास्रे, अश्व, गज,उंट धनधान्याचा ओघ द्वारकेकडे वाहू लागला.त्यामुळे द्वारका  वैभवसंपन्नथेच्या शिखरावर पोहचली.

            बर्‍याच कालावधीनंतर उध्ववजी व स्वामींनी नगरात प्रवेश केला. आल्यावर स्वामींनी सर्वांचे कुशलक्षेम विचारले. पण रुख्मिणीला त्यांच्या वृत्तीत झालेला सुक्ष्म बदल जाणवत होता. विचारायचे तर त्यांची निवांत भेट आवश्यक होती. आणि तो योग बंधूसमान उध्ववभावोजींनी घडवून आणला. त्यारात्री स्वामी उशीरा कक्षात येऊन म्हणाले, चल रुख्मिणी आपण सागरकिनारी जाऊ या! तिला अतिव आनंद झाला.

                        क्रमशः
       संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                     दि. ९-६-२०२२.

35

*!!!रूख्मिणी भाग-३५!!!*

            श्रीकृष्णासह रुख्मिणी सागरकिनार्‍यावर बसल्यावर, तिला किती बोलू नि किती नाही असे झाले. असंख्य प्रश्न विचारायचे होते. अनेक गोष्टी सांगायच्या होत्या ज्या दुसर्‍या कुणाबरोबर बोलूं शकत नव्हती. तिची घालमेल ओळखून म्हणाले, रुख्मिणी, तुझे सारे विचार, भावना मी जाणल्या आहेत. म्हणूनच वेळ मिळतांच तुझ्याकडे धावून आलोय.आतां बोल मुक्तपणे! स्वामी तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. माझ्या मनांतील खळबळ विचार तुम्ही जाणताच, तरीपण विचारते, स्वामी तुम्ही आल्यापासुन, तुमच्या वृत्तीतील अलिप्तता, निर्लेपत्व इतरांना नाही पण मला प्रकर्षाने जाणवत आहे. काय कारण?हस्तिनापूरला अशी कांही घटना घडली कां? मनाला क्लेष होईल असं कुणी बोललं का? रुख्मिणी तूं खरच मनकवडी आहेस. प्रजाजन तुला माझा श्वास म्हणतात ते उगाच नाही. तूं माझी अर्धांगिनीच नाही तर एकरुपिणी आहेस.

              ते थोडे अंतर्मुख होऊन बोलृ लागले, क्षत्रिय पुरुष जन्माचे सार्थक म्हणजे पराक्रम करुन क्षत्रिय धर्माचे पालन करणे. आणि मी ते पूर्ण केले आहे. तारुण्याचं दुसरं महत्वाचा भाग म्हणजे, या संसाररुपी रथाचं दुसरं चाक होऊन जीवनरथ यशस्वीपणे तनमनाने एकरुप होऊन साथ देणारी पत्नी मिळणे याबाबतीत मी भाग्याचा परमोच्च बिंदू गाठला आहे. हा संसार यशस्वी होण्यात माझ्यापेक्षा तुझा वाटा मोठा आहे. तूं भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही पिढ्यांना व्यवस्थित सांभाळले आहे. म्हणूनच तूं या राणीद्वीपाची अनभिषिक्त महाराणी ठरलीस. पुरेऽ पुरेऽ स्वामी.! माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाही. थांब रुख्मिणी, मला आज बोलूं दे. पुढे असा  मुक्त संवाद करण्यास वेळ मिळेल न मिळेल! स्वतःच्या जन्माआधीपासून आतांपर्यंतच्या घडलेल्या घटनांचे विवेचन करुन म्हणाले, पण आजकाल मनाला तीव्रपणे जाणवे लागले की, आतां समय आला आहे…

            ते बोलत असलेले शब्दनशब्द रुख्मिणी ह्रदयात साठवत असतांनाच त्यांनी वाक्य अर्धवट सोडल्यावर ती भानावर आली. कां थांबलात स्वामी? कोणत्या विचारांनी तुमच्या ह्रदयात वादळ निर्माण झाले आहे? कसला समय आला? पुन्हा सन्यास घेण्याचा विचार तर नाही ना? या शंकेने   ती अस्वस्थ झाली. अशी अस्वस्थ नको होऊस. मी आतां कुठेही जाणार नाही. पण वाटते की, या व्यापातून या जय-पराजय, यशापयश,मोह,माया या अव्याहत चक्रातून मुक्त होऊन निवांत तत्वचिंतनात मग्न व्हावं. हा सर्व व्याप पुढल्या पिढीकडे सोपवुन, अलिप्त होऊन इथेच या भूमीत वानप्रस्थाश्रम स्विकारावा. तिला हसू आलेले बघून, कां हसलीस?

           स्वामी, जे विकार तुम्ही कधी स्वतःजवळ फिरकू दिले नाहीत, ज्यांचा स्पर्शही कधी झाला नाही, त्यांचा त्याग तुम्ही कसा करणार? सत्तेचा मोह तुम्हाला कधीच नव्हता.अनेक उन्मत्त बलसम्राटाचा उच्छाद करुन तुम्ही विजय मिळवला,पण  त्यांच्या राज्याचा मोह कधी झाला नाही.हेतू संपताच ते राज्यही त्यांना परत केले. निर्मोही म्हणून उगीच नाही सारं विश्व म्हणतं.

‌               रुख्मिणी, अभिषिक्त नसलो तरी, अनभिषिक्त  सत्ता उपभोगतो आहेच ना? द्वारकाधीशाची पदवी प्राप्त झालीच ना तुम्हीच तर म्हणता ना! तुमचा जन्मच मुळी “धर्मसंस्थापनार्थ” आहे. न्याय, धर्माच्या, सत्य धर्माच्या उत्थापनासाठीच आजन्म कार्यरत आहात. दुष्टांचा संहार आणि सत्याची कास सतत धरली आहे. हे कार्य पूर्ण झाले असं वाटते कां? ते पूर्ण झाल्यशिवाय या भूमीत का होईना वानप्रस्थ स्विकारणे योग्य ठरेल कां स्वामी?

          महाराणी, हे विश्वचक्र अविरत फिरतच असतं, नियतीच्या  खेळानुसार विश्वकल्याणासाठी आपला वाटा उचलायचा असतो.पण कोणता मार्ग निवडायचा हे तर आपल्या हाती असते ना? जीवनाच्या या प्रदीर्घ प्रवासात अनेक वळणं लागतात ती पार करणं, कधी सुलभ तर कधी अवघड असते. कर्तव्यधर्म पाळणे हाच श्रेष्ठ मानवधर्म आहे. त्यासाठी कधी जननी, जन्मभूमी, भार्या, अपत्य, मोह, लोभ, सार्‍यांचा त्याग करावा लागतो तो समय येऊन ठेपला आहे. तुझी अनुज्ञा आहे ना?

                      क्रमशः
    संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. ९-६-२०२२.

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading