1076-13
तें सुख येणेंचि देहें । पाय पाखाळणिया लाहे । जो भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी ॥1076॥
भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते).
1077-13
दीपांचिया कोडी जैसें । एकचि तेज सरिसें । तैसा जो असतुचि असे । सर्वत्र ईशु ॥1077॥
कोट्यवधि दिव्यात जसे एक तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र (चराचरात) भरलेला आहे
1078-13
ऐसेनि समत्वें पंडुसुता । जिये जो देखत साता । तो मरण आणि जीविता । नागवे फुडा ॥1078॥
अर्जुना, अशा समत्वाने चराचराकडे पहात असता जो जगतो, तो खरोखर जन्ममरणाच्या स्वाधीन होत नाही.
1079-13
म्हणौनि तो दैवागळा । वानीत असों वेळोवेळां । जे साम्यसेजे डोळां । लागला तया ॥1079॥
म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याला अभेदभावरूपी बिछान्यावर डोळा लागला आहे. (तो अभेदभावात स्थिर झाला आहे).
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथाऽऽत्मामकर्तारं स पश्यति ॥13.29॥
श्लोकार्थ -: :- सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय.
(आत्मा अकर्ता आहे. हे जो जाणतो तो ज्ञानी)
1080-13
आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥1080॥
आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते. असे जो खरोखर जाणतो.
1081-13
घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥1081॥
घरातील माणसे घरात वागतात व घर काही एक करीत नाही व आकशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते.
1082-13
तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1082॥
याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे (सर्व कर्मात) आत्मा हा खांबासारखा (केवल आधारभूत) असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही.
1083-13
ऐसेनि येणें निवाडें । जयाच्या जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥1083॥
अशा या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले.
यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥13.30॥
श्लोकार्थ -: भूतांचा पृथग्भाव निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच आत्म्याचाच हा विस्तार आहे असे जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते.
(ज्ञानी पुढे चालू)
1084-13
एऱ्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ॥1084॥
सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल.
1085-13
लहरी जैसिया जळीं । परमाणुकणिका स्थळीं । रश्मीकरमंडळीं । सूर्याच्या जेवीं? ॥1085॥
लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर,
1086-13
नातरी देहीं अवेव । मनीं आघवेचि भाव । विस्फुलिंग सावेव । वन्हीं एकीं ॥1086॥
अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या,
1087-13
तैसे भूताकार एकाचे । हें दिठी रिगे जैं साचें । तैंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारूं लागे ॥1087॥
त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील (खरोखर अनुभवाला येईल) त्याचवेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज (होडी) मिळेल.
1088-13
मग जया तयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे । किंबहुना जोडे । अपार सुख ॥1088॥
मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे? त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल.
1089-13
येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था । ठायें ठावो प्रतीतिपथा । माजीं जाहली? ॥1089॥
अर्जुना, एवढ्याने प्रकृती-पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभावाच्या मार्गात आला. (तुला पूर्णपणे कळला).
1090-13
अमृत जैसें ये चुळा । कां निधान देखिजे डोळां । तेतुला जिव्हाळा । मानावा हा ॥1090॥
अरे, चूळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पहावा, त्याप्रमाणे हा प्रकृतीपुरुषविचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा.
1091-13
जी जाहलिये प्रतीती । घर बांधणें जें चित्तीं । तें आतां ना सुभद्रापती । इयावरी ॥1091॥
अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे (म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा) ते आताच नाही तर यानंतर
1092-13
तरी एक दोन्ही ते बोल । बोलिजती सखोल । देईं मनातें वोल । मग ते घेईं ॥1092॥
आता या एकदोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे. आणि मग त्या घे. (म्हणजे ऐक).
1093-13
ऐसें देवें म्हणितलें । मग बोलों आदरिलें । तेथें अवधानाचेचि केलें । सर्वांग येरें ॥1093॥
असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले.
अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥13.31॥
श्लोकार्थ -: कौंतेया, अनादि व गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो जरी शरीराचे ठिकाणी स्थित असला तरी (काही कर्म) करीत नाही. (सर्व कर्मांपासून) अलिप्त असतो
(आत्म्याचे अलिप्तत्व)आत्मा व देह वेगवेगळे आहेत.
1094-13
तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें । जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा ॥1094॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला, तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात, तो प्रकृतीत असूनही, प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, (तो शुद्धच रहातो). अशा स्वरूपाचा तो आहे असे समज.
1095-13
कां जे जळा आदीं पाठीं । तो असतुचि असे किरीटी । माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये ॥1095॥
कारण की अर्जुना, जळाच्या आधी व नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामधे तो प्रतिबिंबित होतो. ते दुसर्याच्या दृष्टीने. (वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही).
1096-13
तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं । साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥1096॥
त्याप्रमाणे आत्मा देहात आहे, असे जे म्हटले जाते, ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे.
1097-13
आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे । देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥1097॥
आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामधे आत्मतत्वाचे राहणे आहे. (देहात आत्मतत्व प्रतिबिंबरूपाने असते).
1098-13
तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गांठी । केंही आहे? ॥1098॥
त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वार्याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय?
1099-13
आगी आणि पिसा । दोरा सुवावा कैसा । केउता सांदा आकाशा पाषाणेंसी?॥1099॥
अग्नि आणि पीस यांना दोरा कसा घालायचा? (म्हणजे दोघांचा संबंध कसा जोडायचा?) आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडायचा?
1100-13
एक निघे पूर्वेकडे । एक तें पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पाडें । संबंधु हा ॥1100॥
एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे.