776-13
न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥776॥
ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे आचरण जो करतो.
777-13
नायकावें तें आइके । न बोलावें तें बके । परी दोष होतील हें न देखे । प्रवर्ततां ॥777॥
जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पहात नाही.
778-13
आंगा मनासि रुचावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें । जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी ॥778॥
शरीरास व मनास आवडेल एवढे असले म्हणजे झाले, मग ते कर्म करण्यास योग्य असो वा नसो, याचा काही तो विचार करत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो.
779-13
परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल । हें कांहींचि पुढील । देखेना जो ॥779॥
परंतु यापासून मला पाप लागेल अथवा या योगाने नरकयातना भोगाव्या लागतील, या पुढील होणार्या गोष्टी जो काहीच पहात नाही.
780-13
तयाचेनि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें । जें सज्ञानाही संगें । झोंबों सके ॥780॥
त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल.
781-13
परी असो हें आइक । अज्ञान चिन्हें आणिक । जेणें तुज सम्यक् । जाणवे तें ॥781॥
परंतु ते राहू दे. आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक, ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख होईल.
782-13
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं । नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी ॥782॥
तर ताज्या, सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून रहाते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पहाशील.
783-13
साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन ॥783॥
साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, तेथून हलत नाही,
784-13
ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं । जैसा ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥784॥
बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलट जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा जनावर जसे चिखलात पूर्णपणे फसते,
785-13
तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवें मनें प्राणें । जया साप होऊनि असणें । भाटीं तियें ॥785॥
त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व मेल्यावर तो त्या जागेत सर्प होऊन बसतो.
786-13
प्रियोत्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी । तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥786॥
नवर्याच्या गळ्याला जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून रहातो.
787-13
मधुरसोद्देशें । मधुकर जचे जैसें । गृहसंगोपन तैसें । करी जो गा॥787॥
पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो.
788-13
म्हातारपणीं जालें । मा आणिक एक विपाईलें । तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥788॥
अज्ञानाची लक्षणे = स्त्रीप्रेम
म्हातारपणी झालेले एकुलते एक पुत्ररत्न, त्याचे आईबापास जितके प्रेम असते,
789-13
तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेम आस्था । आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाणेना जो ॥789॥
अर्जुना, तितक्या मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्रीवाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही.
790-13
तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें । कोण मी काय करावें । कांहीं नेणे ॥13-790॥
त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय, हे काही जो समजत नाही
791-13
महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥791॥
ब्रह्मनिष्ठांचे अंत:करण, ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असताना त्याचे सर्व जसे व्यापार बंद पडतात,
792-13
हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाचीं इंद्रियें एकमुखें । स्त्रिया केलीं ॥792॥
जो नुकसान, लाज पहात नाही, दुसर्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयीच असते.
793-13
चित्त आराधी स्त्रीयेचें । आणि तियेचेनि छंदें नाचे । माकड गारुडियाचें । जैसें हो य ॥793॥
ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताचे आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो,
794-13
आपणपेंही शिणवी । इष्टमित्र दुखवी । मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥794॥
ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्ट मित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो.
795-13
तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥795॥
त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरता दान व पुण्य करण्याचे कमी करतो, तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खाच भरीत असतो, तिची खाच भरण्याला कमी पडू देत नाही.
796-13
पूजिती दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी । मायबापां दावी । निदारपण ॥796॥
पूजल्या जाणार्या देवतांची बिगार टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरूला ठकवतो आणि आईबापांना दरिद्रपण दाखवतो.
797-13
स्त्रियेच्या तरी विखीं । भोगुसंपत्ती अनेकीं । आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥797॥
तथापि स्त्रीच्या विषयी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्ये (साधने) व जी जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती ती आणतो.
798-13
प्रेमाथिलेनि भक्तें । जैसेनि भजिजे कुळदैवतें । तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी ॥798॥
प्रेमळ भक्ताने जसे कुलदेवतेला भजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्रचित्ताने करतो.
799-13
साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख । येरांविषयीं जोगावणूक । तेही नाहीं ॥799॥
जे खरे चांगले असेल, ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगावणूक(देहरक्षण) देखील करीत नाही,
800-13
इयेतें हन कोणी देखैल । इयेसी वेखासें जाईल । तरी युगचि बुडैल । ऐसें जया ॥800॥
हिला कोणी (वाकड्या दृष्टीने) पाहील हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल, तर युगांतच होईल असे ज्याला वाटते,