सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७२६ ते ७५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

726-13
जो लाटणें ऐसा न लवे। पाथरु तेवीं न द्रवे। गुणियासि नागवे। फोडसें जैसें॥१३-७२६॥
जो लाटण्यासारखा लवत नाही, जसा दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही.
727-13
किंबहुना तयापाशी। अज्ञान आहे वाढीसीं। हें निकरें गा तुजसीं। बोलत असों॥१३-७२७॥
फार काय सांगावे? त्याच्याजवळ अर्जुना, अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे आम्ही तुला निक्षून सांगतो.
728-13
आणिक पाही धनंजया। जो गृहदेह सामग्रिया। न देखे कालचेया। जन्मातें गा॥१३-७२८॥
(अज्ञानाची लक्षणे = मागील जन्माची आठवण नाही, मृत्यूचे स्मरण नाही, विषयसुखात रममाण) अर्जुना, आणखी असे पहा की जो, शरीर सामग्रीच्या योगाने घर वगैरे पसार्‍यात गुंतल्याने मागील जन्माची आठवण ठेवीत नाही
729-13
कृतघ्ना उपकारु केला। कां चोरा व्यवहारु दिधला। निसुगु स्तविला। विसरे जैसा॥१३-७२९॥
मागील जन्माला कसा विसरतो हे माऊली दृष्टांताने सांगतात, कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो
730-13
वोढाळितां लाविलें। तें तैसेंच कान पूंस वोलें। कीं पुढती वोढाळुं आलें। सुणें जैसें॥१३-७३०॥
कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते.

731-13
बेडूक सापाचिया तोंडीं । जातसे सबुडबुडीं । तो मक्षिकांचिया कोडीं । स्मरेना कांहीं ?॥731॥
बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो पण ‘आपण मरतो’ ही आठवण ठेवीत नाही.
732-13
तैसीं नवही द्वारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती । जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया ॥733॥
त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे ही नऊ द्वारे मळाने पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ट अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंत:करणात सलत नाही,
733-13
मातृकोदरकुहरी । सूनि विष्ठेचां दकथरी । जठरीं नवमासवरी । उकडला जो ॥733॥
आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांमधे घालून, त्या पोटात नऊ महिने पर्यंत ज्यावेळी शिजला.
734-13
तें गर्भींची जे व्यथा । कां जें जालें उपजतां । तें कांहींचि सर्वथा । नाठवी जो ॥734॥
ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काळी झालेले कष्ट, ते काहीच जो मुळी आठवत नाही.
735-13
मलमूत्रपंकीं । जे लोळतें बाळ अंकीं । तें देखोनि जो न थुंकीं । त्रासु नेघे ॥735॥
विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो किळस घेत नाही व कंटाळत नाही.

736-13
कालचि ना जन्म गेलें । पाहेचि पुढती आलें । ऐसें हें कांहीं वाटलें । नाहीं जया ॥736॥
मागला जन्म नुकताच संपला नाही काय? व लागलीच पुन: उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही.
737-13
आणि पैं तयाची परी । जीविताची फरारी । देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥737॥
आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही,
738-13
जिणेयाचेनि विश्वासें । मृत्यु एक एथ असे । हें जयाचेनि मानसें । मानिजेना ॥738॥
जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की, येथे एक मृत्यू आहे, हे ज्याच्या मनाला पटत नाही.
739-13
अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा । न वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥739॥
थोडक्या पाण्यातील मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही.
740-13
कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टी न घाली । गळु न पाहतां गिळिली । उंडी मीनें ॥740॥
अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरिणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पहाता, गळास लावलेले आमीष माशाने गिळावे.

741-13
दीपाचिया झगमगा । जाळील हें पतंगा । नेणवेचि पैं गा । जयापरी ॥741॥
दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही.
742-13
गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे । नेणतां जेंवी विखें । रांधिलें अन्न ॥742॥
जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले, तरी तिकडे लक्ष न देता खातो.
743-13
तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्युचि आला असे । हें नेणेचि राजसें । सुखें जो गा ॥743॥
त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणार्‍या सुखामुळे जाणतच नाही.
744-13
शरीरींचीं वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥744॥
शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा (आयुष्याचा) लाभ, विषयसुखाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी जो खर्‍याच मानतो.
745-13
परी बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें । तेंचि तें नागवणें । रूप एथ ॥745॥
वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे, हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय त्याप्रमाणे राजससुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे. पण त्या बिचार्‍याच्या हे काहीच लक्षात येत नाही.

746-13
संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें । लेपा स्नपन करणें । तोचि नाशु ॥746॥
आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश होय.
747-13
पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवे खुंटलें । तैसें नेणें भुललें । आहारनिद्रा ॥747॥
पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, मग त्यातच पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषयवृद्धीत खरी वृद्धी नसून खराखुरा नाशच आहे हे जाणत नाहीत.

748-13
सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा । प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं ॥748॥
समोर असलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो.
749-13
तेवीं देहा जंव जंव वाढु । जंव जंव दिवसांचा पवाडु । जंव जंव सुरवाडु । भोगांचा या ॥749॥
त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, जसजशी दिवसाची वाढ होते म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल,

750-13
तंव तंव अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके । मीठ जेवीं उदकें । घांसिजत असे ॥750॥
तसतसे अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे अधिकाधिक घासले जाईल तसतसे विरघळत जाते.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading