526-13
वर्णाश्रमपोषकें । कर्में नित्यनैमित्तिकें । तयामाजीं कांहीं न ठके । आचरतां ॥526॥
वर्णाश्रमधर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता त्यात काहीही रहात नाही.
527-13
परि हें मियां केलें । कीं हें माझेनि सिद्धी गेलें । ऐसें नाहीं ठेविलें । वासनेमाजीं ॥527॥
परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमधे ठेवला नाही.
528-13
जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें । कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥528॥
ज्याप्रमाणे अहंकारावाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे हे जसे निरभिमान असते.
529-13
कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेंविण चाले । तैसें अवष्टंभहीन भलें । वर्तणें जयाचें ॥529॥
अथवा वेद जसे स्वभावत: बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतूवाचून वहाते त्याप्रमाणे अहंकारावाचून ज्याचे चांगले वागणे असते.
530-13
ऋतुकाळीं तरी फळती । परी फळलों हें नेणती । तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मीं सदा ॥530॥
वृक्षास तर योग्य ऋतुकाळात फळे येतात परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाहीत. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमधे त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहेमी असते.
531-13
एवं मनीं कर्मीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥531॥
ज्याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते.
532-13
संबंधेंवीण जैसीं । अभ्रें असती आकाशीं । देहीं कर्में तैसीं । जयासि गा ॥532॥
ज्याप्रमाणे आकशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्यशिवाय ती कर्मे असतात.
533-13
मद्यपाआंगींचें वस्त्र । लेपाहातींचें शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ॥533॥
मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते.
534-13
तया पाडें देहीं । जया मी आहे हे सेचि नाहीं । निरहंकारता पाहीं । तया नांव ॥534॥
त्याप्रमाणे ज्याला आपण देहामधे आहो अशी आठवण नसते, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारिता हे नाव आहे, असे समज.
535-13
हें संपूर्ण जेथें दिसे । तेथेंचि ज्ञान असे । इयेविषीं अनारिसें । बोलों नये ॥535॥
ही निरहंकारिता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये.
536-13
आणि जन्ममृत्युजरादुःखें । व्याधिवार्धक्यकलुषें । तियें आंगा न येतां देखे । दुरूनि जो ॥536॥
जन्म-मृत्यू-जरा-व्याधी- व दोषाचे अनुदर्शन
जन्म = आणि जन्म, मृत्यू, दु:ख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पहातो.
537-13
साधकु विवसिया । कां उपसर्गु योगिया । पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवीं ॥537॥
जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक मांत्रिक किंवा ठेवा काढणारा मनुष्य जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यास येणार्या अडथळ्यासंबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो.
538-13
वैर जन्मांतरींचें । सर्पा मनौनि न वचे । तेवीं अतीता जन्माचें । उणें जो वाहे ॥538॥
जसे सर्पाच्या मनातून जन्मजन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो.
539-13
डोळां हरळ न विरे । घाईं कोत न जिरे । तैसें काळींचें न विसरे । जन्मदुःख ॥539॥
डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही म्हणजे सारखा खुपत रहातो अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर एकसारखे खुपत रहाते, त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दु:ख विसरत नाही.
540-13
म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रें निघाला । कटा रे मियां चाटिला । कुचस्वेदु ॥540॥
तो म्हणतो, हाय, हाय, मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरेरे स्तनावरील घाम मी चाटला.
541-13
ऐसाइसिया परी । जन्माचा कांटाळा धरी । म्हणे आतां तें मी न करीं । जेणें ऐसें होय ॥541॥
याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व म्हणतो की ज्या योगाने असे होईल (जन्म घ्यावा लागेल) ते मी यापुढे करणार नाही.
542-13
हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥542॥
पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा माणूस जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो.
543-13
मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागें । तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं ॥543॥
(वडील भावाला) मारल्याचे रागाने जसा पाठचा भाऊ सूड मागतो (सूड घेण्यास खटपट करतो) तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो.
544-13
परी जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निज । संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं ॥544॥
परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याची लाज केव्हाही सोडीत नाही.
545-13
आणि मृत्यु पुढां आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे । परी आजीचि होये । सावधु जो ॥545॥
मृत्यू =आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला आहे असे समजून तो सावध असतो.
546-13
माजीं अथांव म्हणता । थडियेचि पंडुसुता । पोहणारा आइता । कासे जेवीं ॥546॥
नदीमधे अथांग पाणी आहे असे म्हणतात, अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो.
547-13
कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडण सुइजे घावो । न लागतांचि ॥547॥
अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी,
548-13
पाहेचा पेणा वाटबंधा । तंव आजीचि होईजे सावधा । जीवु न वचतां औषधा । धांविजे जेवीं ॥548॥
उद्याच्या मुक्कामावर वाटमारा आहे असे कळल्यावर जसे आजच सावध व्हायला पाहिजे, प्राण जाण्याचे पूर्वीच औषधाकरिता वैद्याकडे धावत गेले पाहिजे.
549-13
येऱ्हवीं ऐसें घडे । जो जळतां घरीं सांपडे । तो मग न पवाडे । कुहा खणों ॥549॥
नाहीतर, ज्याप्रमाणे जळत्या घरात सापडलेला मनुष्य विहीर खणून पाण्याने आग विझवू शकत नाही, त्याप्रमाणे होईल.
550-13
चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे ॥550॥
खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो ‘मी बुडतो’ अशा ओरडण्यासह मेला, आता तो याप्रमाणे तो मेला असे कोण सांगेल?