भाग क्र.7
पुष्य नक्षत्र माहात्म्य
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातले संस्कृती दर्शन पाहु.अयोध्याकांडापासुन आपला विषय सुरु आहे.मागील भागात मंगल स्नान विषयी माहिती घेतली होती आज पुढिल विषयाकडे वऴुया.
रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली होती.मंथरेने हे सर्व पाहिले व ती कैकयीकडे गेली व विचारु लागली “कोणत्या उत्सवाची हि तयारी सुरु झालीय “?
तेव्हा कैकयी म्हणते.
श्व:पुष्येण जितक्रोधो यौवराज्येन चानघम्।
राजा दाशरथो राममभिषेक्ता हि राघवम् ।। (सप्तम सर्ग 11 श्लोक)
उद्या पुष्यनक्षत्रयोगावर दशरथ राजा हे क्रोधावर विजय मिऴवलेल्या, पापरहित, रघुनंदन रामचंद्राचा राज्याभिषेक करणार आहेत.
पुष्य नक्षत्र व भारतीयांचे एक विशेष आपुलकीचे नाते आजहि सुरु आहे.कृ.यजुर्वेदात नक्षत्र त्यांचा देवता व कार्ये या संबधीचे विस्तृत वर्णन आलय.याचा उल्लेख वेदात तिष्य असा आलाय
देवगुरु बृहस्पती हे या नक्षत्राची देवता आहेत.गुरुचे सर्व शुभ गुणधर्म या नक्षत्रातच वृध्दिंगत होतात त्यामुऴे हा योग अमृताप्रमाणे मानला गेला आहे. विवाहकार्य सोडुन अन्य मंगल कार्य या योगावर केली असता शुभफलदायी होतात.
नक्षत्र म्हणजे तारकांचे समुह हा पुष्य नक्षत्र समुह आयनिक वृत्ताच्या उत्तरेस वृत्ताला लागुनच आहे.हे नक्षत्र कर्क राशीत येते.
पुनर्वसु व मघा या दोन नक्षत्रांच्या मध्यभागी हा अंधुक किंवा मंद प्रकाशाचा तारका समुह आहे. या सर्व तारकांच्या पुजांना पाहिले असता “खेकड्या “प्रमाणे आकृती दिसते (कर्क रास)
कौस्तुभ असा हि याचा उल्लेख काहि पोथ्यात आढऴतो कारण हाराच्या मध्यभागी असणार्या गुच्छाप्रमाणे हे नक्षत्र दिसते.
हेमाद्रि नावाच्या विद्वानाने याचे वर्णन करताना हे नक्षत्र मेघवर्ण, मेषारुढ, चतुर्भुज असे केलेय.
हे पुंल्लिंगी नक्षत्र असल्याने गर्भाधान, पुंसवनादि गर्भ संस्काराकरता प्रशस्त मानले गेलेय.
आयुर्वेदात हि पुष्यनक्षत्रावर बालकांना सद्बुध्दि प्राप्ती व आरोग्यवर्धना करता सुवर्ण प्राशन विधि करावा असे वर्णन आहे.
काहि विशेष औषधांची निर्मितीहि याच नक्षत्रावर केली जाते.
या नक्षत्राबद्दल थो़ड अधीक जाणुन घेवुया
या नक्षत्राची मध्य नाडि, मेष योनी, देवगण, पिंपऴ हा याचा आराध्यवृक्ष, गुरु हि देवता, लालरंगाचे वस्त्र हे याचे दान आहे, अंधदृष्टि आहे, अग्नितत्व आहे व क्षिप्रसंज्ञा आहे.
पुष्य हे जन्मनक्षत्र असणार्यांनी पिंपऴाच्या झाडाखाली बसुन उपासना किंवा अध्ययन करणे हे लाभदायक आहे. त्याच सोबत स्वत:नक्षत्राधिपती देवगुरुची उपासना करणे हि लाभदायक आहे.
आजहि सोने खरेदिकरता गुरुषुष्यामृत योगच निवडतात कारण या योगावर केलेली खरेदि हि भरभराटिची ठरते.
वेदकाऴापासुन ते आजपर्यंत पुष्यनक्षत्र पाहुन महत्वाचे कार्य करुन घेण्याची आपली संस्कृती आहे रामायणकाळ हा याला अपवाद राहणे शक्य नाहि
सहज एक सांगतो कि वेदामध्ये या नक्षत्रांचे वर्णन आहे.त्यावेऴच्या ऋषिमुनींकडे कोणत्याहि दुर्बिणी किंवा उपग्रह नसताना नासा इस्त्रो सारख्या संस्था नसताना त्यांनी केलेले अवकाशाचे वर्णन पाहिले वाचले तरी नि:शब्द व्हायला होते अगदि पृथ्वी गोल आहे (चक्राणास 。ऋग्वेद) किंवा सूर्या भोवती पृथ्वी फिरते (मित्रो दाधार 。)वगैरे ऋग्वेदातले मंत्र पाहिले व अभ्यासले कि आपण किती क्षुल्लक “ज्ञानी “आहोत हेच समजते.
त्यामुऴे पुष्यनक्षत्र हि हल्लीचीच टुम आहे अस म्हणण्यास वाव राहत नाहि
तेव्हा आपणहि या नक्षत्रावर मंगल कर्म करुया व देवगुरुंची कृपा प्राप्त करुया.
आपले पूर्वज हे संशोधकच होते त्यांचा संशोधनात ईश्वरी अधिष्ठान व नैतिकता होती
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले