संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १२६ ते १३०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा अभंग क्र.१२६

नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा । सगुणप्रबंधा माजि खेळे ॥
तें रूप सगुण अवघेंचि निर्गूण । गुणि गुणागुण तयामाजि ॥
अनंत तरंगता अनंत अनंता । सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण । सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥

अर्थ: नित्य निर्गुण निराकार असलेला तो गोविंद सगुण साकार होऊन ह्या सृष्टीच्या निर्मितीचा खेळ खेळतो. सगुण रुपात असताना ही त्या परमात्यात गुणातीत मुळ स्वरुप कायम असते. जरी तो गुणातीत असला तरी त्याच्यात ते सर्व गुण भासतात. अनंत स्वरुप समुद्रात अनंत सृष्टीच्या निर्मितीच्या लाटा येतात व त्या लाटारुपी सृष्टीचा लय ही तिकडेच होतो पण त्या आशा सर्व सृष्टीचा पोषण कर्ता तोच असतो.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या व्यापक परमात्मा चे स्वरुप मोजायला ही अनंत परिमाणे लागतात व त्या नारायणात ते मुळ चैतन्य जीवनरुपात राहते.

नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी अभंग क्र.१२७

नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी । द्वैताची परवडी हारपली ॥
तें रूप सुंदर कॄष्णाचें सकुमार । सेविती निर्मळ भक्तराज ॥
विराटे अनंत ज्या माजि विरतें । नव्हेचि पुरतें शेषादिकां ॥
निवृत्ति लक्ष्मी गरूड चिंतिती । तयांचिये मति आकळ हरि ॥

अर्थ: त्या परमात्माच्या नामाची व्यापकता येवढी आहे की त्या ठिकाणी सर्व भेद अभेद होतात.अशा त्या सुंदर, सगुण रुपातील श्रीकृष्ण पूजेच्या सेवेचा लाभ भक्त घेतात. त्या रुपात प्रचंडा पासुन सुक्ष्मा सारखी सर्व जगतातील स्वरुपे लय पावतात. ते रुप ज्याच्यावर पहुडले आहे त्या शेषाला ही त्याचे स्वरुप सांगता येत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, विष्णुप्रिय निकट असणारे लक्ष्मी व गरुड त्याचे सतत स्मरण करतात.तरी त्यांना ही तो अकळ च राहिला आहे.

खुंटले साधन तुटलें बंधन अभंग क्र.१२८

खुंटले साधन तुटलें बंधन । सर्वही चैतन्य एकरूप ॥
नाहीं तेथें माया नाहीं तेथें छाया । निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप ॥
चैतन्य साजिरें चेतवी विचारें । आपरूपें धीरें विचरत ॥
निवृत्ति म्हणे तें कृष्णरूप सर्व । रोहिणीची माव सकळ दृष्टि ॥

अर्थ: त्या एक रुप असणाऱ्या चैतन्यामध्ये अविद्ये बंधन नाही व साधक साधन साध्य ही त्रिपुटी ही नाही.त्या रुपाच्या ठिकाणी कोणते ही गुण व आकार नसुन भ्रम करणारे कोणतेही चिन्ह नाही.ते चैतन्य विचारांच्या चेतना जणुकाही पाणी होऊन संपुर्ण पृथ्वीवर पसरत (फिरत) आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, ते जगताची सर्व रुपात हे तत्व आविष्कारले असले तरी हे जगत मृगजळा प्रमाणे मिथ्या असुन त्याचा लय त्याच रुपात निश्चित आहे.

निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ अभंग क्र.१२९

निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥
तें रूप श्रीधर मानवी अकार । सर्व निराकार सिद्धि वोळे ॥
कुटूंब‍आचार कुळवाडी साचार । सर्व हा श्रीधर एका एक ॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा । नामें कोटि यज्ञा होतजात ॥

अर्थ: माया व परब्रह्म हे निकट आल्या शिवाय जगत उत्पन्न होत नाही तरी मायेचे मायिक गुण अविद्या, जडत्व, दुःख हे त्या व्यापक ब्रह्माला बंधन करु शकत नाही. ह्या पाल्हाळा पासुन ते मुक्त असते. त्या ब्रह्नरुपाने सर्व सिध्दी सह मानवी श्रीधररुपात अवतार घेतला आहे. ते ब्रह्म सर्वापासुन वेगळा एकटे दिसत असले तरी त्याने कुटुंब कबिल्या आचार साचार करुन दाखवला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी दिलेल्या प्रतिज्ञेमुळे मी त्या त्याच्या नामात रत असल्यामुळे मला कोटी यज्ञांचे फळ प्राप्त झाले आहे.

रूप हें सावंळे भोगिताती डोळे अभंग क्र.१३०

रूप हें सावंळे भोगिताती डोळे । उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥
पदरज वंदी ध्यान हें गोविंदी । उद्धव मुकुंदीं तल्लीनता ॥
विदु्र सुखाचा नाम स्मरे वाचा । श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥
निवृत्तीचें ध्यान ज्ञानदेव खूण । सोपान आपण नामपाठें ॥

अर्थ: उध्दव व अक्रुराचे डोळे सगुण सावळ्या कृष्णरुपाचे सोहळे भोगत असतात.मथुरेत नेण्यासाठी आलेल्या अक्रुराने त्या गोकुळाच्या धुळीत उमटलेल्या कृष्णपदाचे पहिले दर्शन घेतले तसे करणारा तो पहिला मथुरावासी होता. त्याच मुकुंद नामात तो उध्दव ही निमग्न आहे. तो विदुरकाका सतत त्या कृष्णरुपाचा जप करत असल्याने श्रीकृष्ण भगवानानी त्याचा अंगीकार केला आहे.निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्या श्रीकृष्ण ध्यानाने, ज्ञानदेव त्या आत्मरुपात त्याची खुण मिळवुन व सोपानदेवानी नामपाठ करुन त्याला आपलासा केला आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading