👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
भरतें ना रितें आपण वसतें अभंग क्र.१३१
भरतें ना रितें आपण वसतें । सकळ जग होते तयामाजी ॥
तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरीं ॥
आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण । सकळ जग होणे एक्यारूपें ॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक । जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥
अर्थ: ज्या रुपा पासुन ह्या जगता पसारा पसरतो व त्या रुपात लय ही पावतो. ते स्वरुप आपल्या स्थानी कधी रिते व कधी भरते असत नाही. तेच ब्रह्म रुप सदा निर्दोष व आनंदरुप असुन सगुण श्रीकृष्ण रुपात नंदाच्या घरी आले आहे. त्यारुपाला कोणते ही आशापाश, पुर्णापूर्ता वगैरे नाही. सर्व जगताचे ऐक्य त्याच्यात सामावले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच रुपाचे सर्व ऋषी मुनी ध्यान करतात मी ही त्या नामसरोवराचा एक तट आहे
न देखों सादृश्य हारपे पैं दृश्य अभंग क्र.१३२
न देखों सादृश्य हारपे पैं दृश्य । उपनिषदांचें पैं भाष्य हारपले ॥
तें रूप उघडें कृष्णरूप खेळें । गोपाळांचें लळे पुरविले ॥
न घडे प्रपंच नाही त्या आहाच । सर्वरूपें साच हरि आम्हा ॥
निवृत्तिचें पर कृष्ण हा साचार । सर्व हा आचार कृष्ण आम्हां ॥
अर्थ: जगतात दिसणाऱ्या सर्व वस्तुत त्या स्वरुपाचे अस्तित्व असुन त्या रुपातच त्या सर्व वस्तूंचा लय आहे. त्या स्वरुपाचे वर्णन उपनिषदानाही करता येत नाही. तेच रुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोकुळात अवतरले असुन गोकुळवासीयांचे लाड त्यांच्या बरोबर खेळत आहे. त्या रुपाचे दर्शन जरी होत असले तरी त्याला प्रपंच नाही तोच सर्व जगतातील वस्तूंचे जीवाचे रुप घेऊन हरिरुप दाखवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, सर्वांच्या आचाराचे मुळपीठ असलेला तो कृष्ण असुन त्याच रुपात माझ्या समोर साकार झाला आहे.
नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु अभंग क्र.१३३
नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु । गोकुळीं साचारु अवतरला ॥
गाई चारी हरी गोपवेष धरी । नंदाचा खिलारीं ब्रह्म झालें ॥
ध्याताति धारणें चिंतिताती मौन्यें । योगियांची मनें हारपति ॥
निवृत्ति म्हणें तें वसुदेवकुळीं । अवतार गोकुळीं घेतलासे ॥
अर्थ: ते परब्रम्ह निर्गुण असल्यामुळे ते कर्मविरहित व विटाळ नसलेले सोवळे स्वरुप असुन तेच सगुण साकार होईन गोकुळात अवतरले आहे. तेच परब्रम्ह यमुनातटी गायी चारते व ब्रह्माने जेंव्हा नंदाची खिलारे चोरली तेंव्हा त्या खिलारांचे ही रुप त्यानेच घेतले.योगी जेंव्हा मौन धारण करुन त्याचे ध्यान करतात तेंव्हा त्यांचे मन ही त्या स्वरुपात हारपुन जाते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाने गोकुळात येऊन नंदाघरी आपला अवतार धारण केला आहे.
अजन्मा जन्मला अहंकार बुडाला अभंग क्र.१३४
अजन्मा जन्मला अहंकार बुडाला । बोध पै ऊठिला गोकुळीं रया ॥
आपरूपे गोकुळीं आपरूपें आप । अवघेंचि स्वरूप हरिचें जाणा ॥
रूपाचें रूप सुंदर साकार । गोकुळीं निर्धार वृंदावनीं ॥
निवृत्तीचें पुण्य वेणु वाहे ध्वनि । जनमनमोहनि एकरूप ॥
अर्थ: आपण चोरलेले गोधन परत गोकुळात दिसल्यामुळे तेंव्हा त्याचा अहंकार गळाला व त्याला शुध्द ज्ञानाचा बोध त्या गोकुळात झाला. त्या स्वरुपात त्याला पाहुन ब्रह्मा समजुन गेला की तो श्रीकृष्ण असुन त्यानेच सर्व रुपाचे धारण केले आहे. हे संपुर्ण गोकुळ त्या रुपाचे आविष्कार दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या मुरलीच्या ध्वनीने जग मोहित होते तो मुरलीचा ध्वनी मी ही ऐकत आहे.
परेसि परता न कळे पैं शेषा अभंग क्र.१३५
परेसि परता न कळे पैं शेषा । तो गौळिया अशेषा माजी हरी ॥
भाग्य पैं फळलें नंदाघरीं सये । यशोदा पैं माय परब्रह्माची ॥
गौळिये नांदती गोधनाचे कळप । त्यामाजि स्वरूप कृष्णमूर्ति ॥
निवृत्तीचें ध्यान गोपाळ आमुचा । आतां जन्म कैचा भक्तजना ॥
अर्थ: ज्याच्या स्वरुपाचे वर्णन परा वाणीला करता येत नाही ज्याच्यावर ते स्वरुप आरुढ आहे आशा शेषालाही करता येत नाही ते सगुण रुप धारण करुन गोकुळात आले आहे. हे बुध्दीरुपी मैत्रीणी तेच रुप नंदा घरी आले असुन यशोदेला त्याचे मातापण मिरवायचे भाग्य मिळाले आहे. गौळियांबरोबर नांदतात ते गोधनांचे कळप, ते गोप हे सर्व त्या कृष्णाचे स्वरुप झाले आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्याचे ध्यान करता करता आम्हाला जन्मच राहिला नाही म्हणजे त्या नामाने आम्हाला जन्म मरणाच्या चक्रातुन बाहेर काढले आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६