👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
अव्यक्त आकार अकारलें रूप अभंग क्र.१२१
अव्यक्त आकार अकारलें रूप । प्रकाश स्वरूप बिंबलेंसें ॥
तें रूप अव्यक्त कृष्णनाम निज । नामाअधोक्षज चतुर्भुज ॥
वर्णासी अव्यक्त वर्णरूप व्यक्त । भोगिती विरक्त नामपाठें ॥
निवृत्तिचे काज नाम मंत्र बीज । गयनी सहज तुष्टलासे ॥
अर्थ: ते निर्गुण निराकार रुप कृष्णरुपात सगुण साकारले असुन जसा प्रकाश सर्वत्र बिंबावा तसे भासत आहे.मुळचे अव्यक्त स्वरुपातील ते परमात्मस्वरुप कधी श्रीकृष्ण कधी अधोक्षज भासते. चारी वर्णाला हे रुप स्वतःला लाऊन घेत नाही त्याला रंगरुप नाही असे असले तरी कृष्णनामामुळे ते स्वरुप भोगता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, माझे नित्यकर्मच कृष्णनामाचा जप करणे झाल्यामुळे सदगुरु गहिनीनाथ संतुष्ट झाले आहेत.
निरशून्य बिंबी आकार पाहतां अभंग क्र.१२२
निरशून्य बिंबी आकार पाहतां । आपण तत्त्वता हरि एकु ॥
तें रूप साबडे कृष्णा माजींवडे । सोंवळें उघडें शौच सदा ॥
तेथें वर्ण व्यक्ति कल्पना हरपती । मनाच्या खूंटती गती जेथें ॥
निवृत्ति नितंब सोवळा स्वयंभ । प्रकाशलें बिंब चहूंकडे ॥
अर्थ: निरशुन्य आकाशात दिवसा पाहिले तर एकटे बिंब दिसते.तत्वतः त्या बिंबाकडे पाहिल्यास तोच एकत्वाने हरीरुप दिसतो. तेच उघडे परब्रह्म पवित्र व सोवळे कृष्णरुप घेऊन अवतरले आहे. त्यारुपाकडे पाहिल्यावर तेथे वर्ण, व्यक्ती व कल्पना यांचा लय होतो व मनाची गती कुंठित होते. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच नितळ पवित्र स्वयंभू कृष्ण अवतरला असुन त्याच्या निज प्रकाशाने असे वाटते की चहुकडे सुर्यबिंब प्रकाशित झाले आहे.
हिरण्यगर्भ माया अंडाकार छाया अभंग क्र.१२४
हिरण्यगर्भ माया अंडाकार छाया । ब्रह्म असलया तेथें नेत ॥
तें रूप वैकुंठ जीवशिवपीठ । मायेचा उद्धाट छायासंगें ॥
माया ब्रह्म हरि माता पिता चारी । जीवशिव शरिरीं एक नांदे ॥
निवृत्ति छाया जीवशिवमाया । वासना संदेहा लया गेली ॥
अर्थ: माया ब्रह्माच्या एकत्वाने जगदोत्पन्नाचा संकल्प सिध्द होऊन ते जगत ब्रह्म म्हणुनच प्रसवते किंवा हिरण्यगर्भ होऊन प्रसवते. ते ब्रह्म स्वरुप जीवशिवाच्या एकत्र येण्याचे मुळपीठ आहे. व त्याठिकाणी मायेचा छायारुप प्रवेश होऊन जगाचा भासमान होतो. ते परब्रम्ह व माया हे आईबाप होतात तोच हरि असुन व जीवशिव स्वरुपातील शरिरात अंशात्मक स्वरुपात असते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या स्वरुपाच्या ज्ञानाचा लाभ झाला की जीव शिव व शरिरसह सर्व लय होऊन वासना रहित होऊन वासनेचा लय होतो.
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा अभंग क्र.१२५
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥
तें रूप साजिरें चतुर्भुजवेष । वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥
सिद्धीचें साधन चिंतामणि धन । कल्पवृक्ष वन वसते जेथें ॥
निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ । साधक दयाळ हरि होय ॥
अर्थ: अनंत सृष्टी अनंत देह व त्यांची अनंत घरे जरी वेगळी दिसत असली तरी परिणाम पाहिला तर त्यातील परमात्म तत्व एकच आहे. ते वैकुंठातील साजरे चतुर्भुजरुप नंदाच्या भाग्याने त्याला प्राप्त झाले आहे. त्याच परमात्माच्या ठिकाणी सिध्दीचे साधन, चिंतामणी चे धन व कल्पवृक्ष वन वसती करते निवृत्तिनाथ म्हणतात, माझे मुळ मी त्या गोपाळतच पाहिले व सर्व साधकांसाठी दयाळु हरि तेच स्वरुप आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
