संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ३१ ते ३५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

आपुलेनि हाते कवळु समर्पी अभंग क्र.३१

आपुलेनि हाते कवळु समर्पी । ब्रह्मार्पण मुखी ब्रह्मपणे ॥
सोपान सावता निवृत्ति निधान । यासि जनार्दन कवळ देतु ॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरी । सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥
देऊनी हस्तक पुशी पीतांबरे । पुसतसे आदरे काय आवडे ॥
राहीरखुमाबाई कासवी तुषार । अमृत सार सर्वाघटी ॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता । हरि कवळु देता तृप्त जाले ॥

अर्थ: श्री विठ्ठल आपल्या हातानी भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास घालुन तो ब्रह्मार्पण करत आहे. सोपान सांवता निवृत्ती ह्यांसर्व भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास स्वतः श्रीहरि भरवत आहे. श्रीहरीने दिलेल्या ह्या काल्याच्या प्रसादामुळे त्यांना अंतर बाह्य ब्रह्मस्वरुप दिसायला लागले. मग देव ह्या भक्तांच्या मस्तकावर हात ठेऊन त्यांचे मुख स्वतःच्या पीतांबराने त्यांचे मुख पुसुन त्यांना लडिवाळपणे विचारत आहे की तुम्हाला अजुन काय हवे आहे. जशी कासवी आपल्या दृष्टीने तिची पिल्ल पाळते तश्या प्रेम वात्सल्याने राही रखुमाई काला प्रसंगी आपल्या भक्तांना प्रेम पान्ह्याचे अमृत सार रुपात देत आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात देवांने आपल्या हाताने काल्याचा घास दिल्याने मी, विसोबा खेचर, सोपानदेव व सांवतामहाराज तो प्रसाद घेऊन तृप्त झालो.

उपजे ते मरे मरे तें तें उपजे अभंग क्र.३२

उपजे ते मरे मरे तें तें उपजे । जन्म येरझारे एकरुपे ॥
तें हें कृष्णनाम गोपीसंगे मेळे । नंदाघरी सोहळे बाळक्रीडा ॥
अमर अमरे अमर कंद खरे । होऊनि गोजिरें दुध मागे ॥
निवृत्ति परिचार सर्व हा गोपाळ । पूजी दिनकाळ आत्माराम ॥

अर्थ: जन्मले ते मरते मरते ते जन्मते ह्या जन्ममरणाच्या चक्रात एकत्वाने फक्त निर्गुण आत्मा आहे. तो निर्गुण आत्माराम गोकुळात नंदा घरी गोपिकांसह बाळक्रीडा करत आहे व ते जगासाठी सोहळाच आहे.असे हे अमर आत्मतत्व म्हणजे अमरत्वाचा कंदच झाला आहे. असे ते आत्मतत्व स्वतःच यशोदेकडे दुध मागत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात असा हा आत्माराम आपल्या सानिध्यातुन चराचरात तोच आहे याची जाणीव करुन देत आहे. अशा त्या परमात्म्याची मी नित्य पूजा करतो.

धीराचे पै धीर उदार ते पर अभंग क्र.३३

धीराचे पै धीर उदार ते पर । चोखाळ अमर अभेदपणे ॥
तें हें चतुर्भुज कृष्णरुपें खेळे । माजि त्या गोपाळें छंदलग ॥
किडाळ परते चोखाळ अरुते । मी माझे हे कर्ते तेथे नाही ॥ 
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ । सर्वत्र गोपाळ सखा आम्हां ॥

अर्थ: धीरगंभीर असलेले परमतत्व उदारांचा राणा आहे प्रेमसुखाची जगतावर बरसात करत आहे. असे हे परब्रह्म गुणातीत निर्दोषस्वरुपात एकत्वाचे दर्शन घडवत आहे. ते चतुर्भुज परमतत्व कृष्णरुप गोपाळांना आपल्या कृष्णरुपाचा छंद लावुन त्यांच्या सोबत खेळत आहे. कोणत्याही वाईटाचा डाग नसलेले चोख निर्मळ असलेले हे ब्रह्म या ठिकाणी मी माझे असा कोणताही भेद करत नाही. व कोणत्याही कर्तेपणाचा लेश लाऊन घेत नाही.निवृत्तिनाथ म्हणतात की धर्माचा शुध्द विचार चोखपणे करुन असलेला तो गोपाळ माझा सखा आहे.

विश्रामधर्मता आश्रमपूर्णता अभंग क्र.३४

विश्रामधर्मता आश्रमपूर्णता । आपरुप कथा निमे जेथे ॥
तें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे । नंदाघरी सोहळें आनंदाचे ॥
कथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता । अरुप अच्युता सर्व असे ॥
निवृति समाधान कृष्ण हे चोखडे । मनोनिग्रह खोड चरणी गोवी ॥

अर्थ: धर्माची विश्रांती व आश्रम व्यवस्थेतेची पूर्णता ह्याच्याच ठिकाणी होत असते. अशा त्या परमात्म्याने आत्मरुपाचे ज्ञान दिले तेंव्हा स्वस्वरुप त्यात मावळुन गेले. तेच हे परमात्मस्वरुप कृष्णस्वरुपात गोपिंकांबरोबर नंदाच्या घरात खेळले तेंव्हा नंदाचे घर आनंदात न्हाले. अशा त्या अरुप, अकर्तुम परमात्म्याची कथा केली तर करणाऱ्याला पूर्णत्व मिळते. निवृतिनाथ म्हणतात मनोनिग्रह करुन मी ह्याच्या चरणी एकरुप झाल्यावर मला त्यांचे शु्ध्द स्वरुप दिसले त्यामुळे मला समाधान प्राप्त झाले.

अकर्ता पै कर्ता नाही यासी सत्ता अभंग क्र.३५

अकर्ता पै कर्ता नाही यासी सत्ता । आपण तत्वता स्वये असे ॥
ते रुप चोखाळ कृष्णनामे बिंबे । यशोदा सुलभे गीती गाय ॥
व्योमाकार ठसा नभी दशदिशा । त्यामाजी आकाशा अवकाश होय ॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म । उपदेश सुगम कृष्णनाम ॥

अर्थ: तो अकर्त असला तरी त्याच्या सत्ते शिवाय काही होत नाही. एकटे म्हणावे तर तो चराचरात अशांत्मक स्वरुपात जाणवतो. त्या अरुप परमात्म्याचे कृष्णस्वरुपात नाम दर्शन होते व त्याला माता यशोदा अंगाई गाते. त्या आकाशाच्या आत दशदिशेला फाकलेले चिदाकाश आहे. आकाशाने पोकळ होऊन त्या चिदाकाशाला पोटात धरले आहे. 
निवृत्तिनाथ म्हणतात ब्रह्मस्वरुपाला प्राप्त असलेल्या श्री गुरु मुळे ते कृष्णनाम मला सोपे व सुलभ झाले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading