संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा २६ ते ३०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

नुघडिता दृष्टी न बोले तो वाचा अभंग क्र.२६

नुघडिता दृष्टी न बोले तो वाचा । हरिरुपी वाचा तल्लीनता ॥
उठी उठी नाम्या चालरे सांगाते । माझे आवडते जीवलगे ॥
कुरवाळिला करे पुसतसे गुज । घेई ब्रह्म बीज सदोदित ॥
ज्ञानासि लाधले निवृत्ति फावले । सोपाना घडले दिनकाळ ॥
तें हें रे सखया खेंचरासी पुसे । गुरुनामी विश्वासे ब्रह्मरुपे ॥
निवृत्ति म्हणे आता अनाथा श्रीहरि । तूंचि चराचरी हेचि खुण ॥

अर्थ: काल्याच्या आनंदात देहभान हरवलेले नामदेव राय डोळे ही उघडत नव्हते व बोलत ही नव्हते. त्या हरिरुपात ते पूर्ण तल्लीन झाले होते. तेंव्हा देव म्हणाले माझ्या आवडत्या जीवलगा नामया आता भानावर ये. देवाने नामयाला हाती धरुन करुवाळले व हे सर्वांचे बीज असलेले नाम ब्रह्म सदोदित भोगायला सांगितले. ह्याच नामब्रह्माचा लाभ ज्ञानदेव निवृत्तिनाथ तर घेतातच तसेच सोपानदेव ही दिवसरात्र अनुभवतात. ते हे नाम ब्रह्म कसे भोगायचे हे तु तुझे गुरु खेचर ह्यांना विचार व सदगुरुंच्या उपदेशाचा बोध विश्वासाने घेऊन तु त्याला प्राप्त तुच ब्रह्मरुप होशिल.निवृत्तिनाथ म्हणतात हे अनाथांच्या नाथा हे श्रीहरि तुच एकत्वाने पूर्ण चराचरात भरला आहेस.

अनुक्रमणिका        ईतर अॅप        ग्रंथ सूची        मदत        अभंग सूची

सत्यभामा माये अन्नपूर्णा होय अभंग क्र.२७

सत्यभामा माये अन्नपूर्णा होय । वेळोवेळी सूये कवळु मुखी ॥
राहिरखुमाई आदिमाता मोहे । नामा तो उपाये बुझाविती ॥
घे रे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाळा । आवडसी गोपाळा प्रीतीहूनी ॥
कुरवाळीतो हरि नुघडी तो दृष्टी । सप्रेमाच्या पोटी आधिक होसी ॥
धरुनी हनुवटी पाहे कृपादृष्टी । आनंदाचे सृष्टी माजि नामा ॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि । यासी परोपरी कवळु देतु ॥

अर्थ: प्रत्येक संतांच्या तोंडात काल्याचा प्रसाद भरवताना सत्यभामेने जणु अन्नपूर्णेचे रुप घेतले होते. नामदेवाच्या मोहाने राहिरखुमाबाई त्यांना भानावर आणण्यासाठी अनेक उपाय करु लागल्या.दोघी अत्यंत लडिवाळपणे नामदेवांना तो ब्रह्मरस काल्याचा घास घे म्हणुन सांगत आहेत. त्या भगवंताने तुला कुरवाळल्यामुळे तुझी भावसमाधी जास्त दृढ झाली असुन तु त्यामुळे डोळे उघडत नाहीस.पुन्हा देवाने नामयाच्या हनुवटीला धरुन त्याला कृपादृष्टीने पाहिले. त्या प्रेमामुळे नामदेवराय आनंदाच्या सृष्टीत निमग्न झाले. निवृत्तिनाथ म्हणतात मला, ज्ञानदेवांना, सोपानदेवांना, चांगदेवांना परिपूर्ण काला दिला.

काला तंव निकटी श्रीरंग जाले अभंग क्र.२८

काला तंव निकटी श्रीरंग जाले । भक्तांचे सोहळे पुरविले ॥
वेणुनादी काला एकत्र पै जाला । दहिंभात झेलाझेलितु देवा ॥
तोचि कवळु घेतु नामयासी देतु । ज्ञानासि भरितू पूर्णतोषे ॥
निवृत्ति सोपान कालवले काली । खेचराची धाली तहानभूक ॥

अर्थ: भक्तांची निकटता अनुभवण्यासाठी भगंवताने काला केला.व सर्व भक्तांच्या देवाच्या सहवासाची इच्छा पूर्ण केली. काला म्हणजे एकत्रीकरण असा एकत्र केलेला काला देवांने वेणुनाद तीर्थावर म्हणजे भीमातीरी केला.जीव व ब्रह्माचे प्रतिक अ़सणारे दही व भात करुन त्याचे घास बनवले व ते भक्तांनी वरच्यावर मुखातच झेलले. कण ही वाया जाऊ दिला नाही.त्याच काल्याचा घास करुन ज्ञान व आनंदाला एकत्र करुन तो घास देवाने नामदेवरायांना दिला. निवृत्तिनाथ म्हणतात काल्याच्या आनंदात ते ही कालवले गेले म्हणजे एकरुप झाले. तसेच विसोबा खेचर ही आपली तहानभूक विसरला.

वैष्णवांचा मेळ सकळ मिळाला अभंग क्र.२९

वैष्णवांचा मेळ सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥
हरिनाम विनट हरि उच्चारीत । सप्रेमे डुल्लत भक्तजन ॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई गोविंदी तल्लीनता ॥
निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुल्लत सनकादीक ॥

अर्थ: पंढरीत सर्व संतांनी एकत्र येऊन देव विठ्ठल व देवाचे नाम यांना एकत्र करुन काला केला.सप्रेमाने घेतलेल्या हरिनामाने डुल्लत असलेले भक्त त्या नामात तल्लीन झाले. हरिनामात तल्लिन झालेले सोपानदेव व ज्ञानदेव काल्याच्या दिंडीत मुक्ताई सह चालताना तल्लीन झाले आहेत.निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वतः, विसोबा खेचर, परसा भागवत, सनक, सनंदन, सनातन, व सनत्कुमार हे ह्या आनंदात डुल्लत आहेत.

पांडुरंग हरि माजी भक्तजन अभंग क्र. ३०

पांडुरंग हरि माजी भक्तजन । कैसे वृंदावन शोभतुसे ॥
ब्रह्मादिक ठेले विमाने अंबरी । काला तो गजरीं पंढरीये ॥
सनकादीक देव देहुढा पाऊली । गोपाळ वांकुली दाविताती ॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व । भीमातीरी देव प्रगटले ॥
ज्ञानदेव सोपान विसोबा खेचर । नरहरि सोनार नाचताती ॥
निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा । हरिचा पवाडा झेलिताती ॥

अर्थ: पांडुरंग व त्याचे नाम घेत येणारे भक्त यांच्या मुळे पंढरी वृंदावन क्षेत्रा सारखी शोभत आहे. तो हरिनामाच्या गजरात होणारा काला पाहायला पंढरीत ब्रह्मादिकांच्या विमानांची गर्दी झाली आहे. सनकादीक भक्त व एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेऊन देव त्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. हरिनामाच्या गजरात नाचणाऱ्या पुंडलिकाला पाहुन ते सर्व देव पंढरीत प्रगट होऊन नाचु लागले.तसेच ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार हे सर्व संत ही नाचु लागले. निवृत्तिनाथ म्हणतात ते स्वतः, मुक्ताई व चांगदेव हरिनामात रंगुन गेले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading