
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१८
पावलों जी म्हणे देखिलें जें देखणें । गेली आधीं तेणें दृष्टी माझी ॥१॥ उचललिया बाह्या क्षेम देईन तया । गेली माझी माया देहत्यागे ॥२॥ आनंदे स्फुदत येती अश्रुपात । अगा गुरूनाथ देवराया ॥३॥ निवृत्तिदास म्हणे तूतें जीवें वोवाळिलें । शिर निरोपिलें तुझ्या चरणीं ॥४॥
अर्थ:-
परमात्मस्वरूप पाहिले. आणि मी कृतकृत्य झालो.त्या योगाने पूर्वीचा संसार सत्य आहे. अशी दृष्टि नाहीसी झाली. आतां मी उचललेल्या बाहूने माझे शरीर अर्पण करीन. शरीर माझे नाही. असे ठरल्याबरोबर त्या शरीरावरील माया म्हणजे मोह आपोआप गेलाच. हे देवादिदेवा श्रीगुरूराया त्या आनंदाने डोळ्यांत अश्रुपात व कंठात स्कुंदन येते. हे श्रीगुरुनिवृत्तिराया, तुम्हालाजीवाभावाने ओवाळले. आणि मस्तक तुमच्या पायावर ठेविले. असे निवृतिदास माऊली ज्ञानदेव सांगतात.
